अशी स्मिता होणे नाही...
लौकिकार्थाने काही लोक आपल्यात नसले तरीही त्यांच्या कार्याने, कलाकृतीने ते कायम आपल्या सोबत असतात. पु.ल. , वसंतराव देशपांडे हि अशीच काही माणसं. स्मिता पाटील पण अगदी याच रांगेत सहज सामावून जाते, ते तिच्या अभिनयामुळे. आज तिचा ६१ वा वाढदिवस. मी वाढदिवस या साठी म्हणतोय कि ती कुठे गेलीच नाही, ती कायम आपल्यात वावरत असते कधी उंबरठा मधली सुलभा बनून तर कधी जैत रे जैत मधली नाग्याची चिंधी बनून. उण्यापुर्या ७५ चित्रपट आणि ३१ वर्षांच्या आयुष्यात तिने अनेकांच्या हृदयावर अमीट छाप सोडली.
दूरदर्शनची निवेदिका ते एक यशस्वी अभिनेत्री हा तिचा प्रवास खरंच रोमांचक होता. सुंदर डोळ्यांच लेणं लाभलेल्या स्मिताचा जन्म पुण्याचा. समाजसेविका आई आणि राजकारणी वडील यामुळे समाजसेवेचं बाळकडू तिला घरूनच मिळालं होतं जे तिच्या सार्वजनिक जीवनात कायम दिसत होत. रेणुका स्वरूप शाळेत शिक्षण घेऊन तिने पुढे फिल्म इन्स्टिटयूट मधून कारकीर्द सुरु केली. दूरदर्शन मध्ये निवेदिका म्हणून काम करत असतांना प्रतिथयश दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी तिला पाहिलं त्यांना तिचे बोलके डोळे आवडले होते. त्यांनी तिला 'चरणदास चोर (१९७५)' या चित्रपटात भूमिका दिली आणि त्यानंतरचा सगळा इतिहास ज्ञात आहेच. पण त्या आधी सामना (१९७४) मधल्या कमळी मधून तिची झलक दिसली होतीच. त्या श्याम बेनेगल आणि दूरदर्शन चा मी कायम ऋणी राहील ज्याच्यामुळे इतकी सुंदर अभिनेत्री लाभली.
तिची भूमिका असणारा गुजरातच्या दूध व्यापाऱ्यांवर आधारलेला मंथन (१९७६) हा सिनेमा यशस्वी तर झालाच पण भारतीय सिनेजगतात आजही सिनेमा महत्वाचा मानल्या जातो. १९७७ हे वर्ष तिच्या आयुष्यतील खूप महत्वाचं असं वर्ष ठरलं तिने काम केलेल्या 'भूमिका' चित्रपटातल्या रोल साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं. पुढे 'चक्र' मध्ये याची पुनरावृत्ती झाली. त्या दशकात तिने शबाना आझमी, ओमपुरी, नसरुद्दीन शाह यांसारख्या कसदार अभिनेत्यांसोबत काम केले पण, यामुळे तिच्या वर समांतर चित्रपटात काम करणारी अभिनेत्री हा शिक्का बसला तो कायमचा. पण कोण काय बोलेल याचा विचार करणारी ती अभिनेत्री नव्हतीच. त्याच साली आलेल्या जैत ते जैत या चित्रपटामध्ये चिंधी ची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या चित्रकारणाच्या वेळी ती भूमिकेत एवढी समरस होऊन गेली होती कि एखाद्या सामान्य कातकरी स्त्रीप्रमाणे सहजच डोंगर चढायची उतरायची. पुढे तिने गमन, अर्थ, चक्र,बाजार यासारख्या वेगळी धाटणीच्या चित्रपटात पण भूमिका केल्या आणि अभिनयाचा वस्तुपाठ घालून दिला. यापैकी अर्थ मधली 'कविता संन्याल' आणि बाजार मधली 'नजमा' माझ्या खासच आवडीची. समांतर चित्रपटांसोबत तिने व्यावसायिक हिंदी सिनेमे हि केले आणि ते हि तितकेच हिट झाले. अमिताभ सोबत 'नमक हलाल' मध्ये 'आज रपट जाये तो' मध्ये काय दिसलीये ती. या गाण्यातली तिची हि निराळी अदा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आणि ती कमर्शियल चित्रपटात सुद्धा तितक्याच सहजपणे काम करू शकते हे सिद्ध झालं.
मग १९८२ साली आला जब्बार पटेलांचा 'उंबरठा' त्यात तिने 'सुलभा महाजन' ची साकारलेली भूमिका अजूनही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बिनतोड आहे. सार्वजनिक जीवनात हि ती महिलांविषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांशी प्रत्यक्ष पण जोडली गेली होती. त्यामुळे उंबरठा मधल्या तिने साकारलेली भूमिका अधिकच वास्तवदर्शी वाटते. आपल्या संबंध आयुष्यात ती कायमच सडेतोड राहिली आहे. समाज काय म्हणेल याची तिने कधीच फिकीर केली नाही. राज बब्बर सोबत केलेलं लग्न हे त्याचं उत्तम उदाहरण . असं म्हणतात कि तिच्यामुळे राज बब्बर चा संसार मोडला, पण हे बिलकुल खरं नव्हतं. कोणाच्या संसारात आपणहून उध्वस्त करणे तिला कधीच पटलं नसतं. एखाद्या गोष्टीत सर्वस्व झोकून देण्याची तिची वृत्ती होती. पण त्यातुन जर पूर्णत्व भेटलं नाही तर ती जाणीव तिला अस्वस्थ करायची. हे आपल्यात असलेले अपूर्णत्व आहे असं तिला कायम वाटायचं. अपुर्णत्वाशी तिचा असलेला संघर्ष हा तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरु होता.
१० वर्षांच्या कारकिर्दीत स्मिताने अनेक उत्तम चित्रपट देऊन चितपट सृष्टीमध्ये एक अढळ स्थान निर्माण केलं होतं, म्हणून....
तू साकारलेल्या 'चिंधी' ला सलाम....
निगेटिव्ह शेड्स मधल्या 'कविता संन्याल' ला सलाम ....
स्वत्वाची जाणीव करून देणाऱ्या 'सुलभा महाजन' ला सलाम .....
'स्मिता' तुला सलाम. !!!!
पण शेवटी स्मिता होणे नाही असंच म्हणावं वाटतं.
प्रतिक्रिया
सुंदर लेख!! फार आवडला..
अप्रतीम!
आह्ह्ह्ह,
स्मिता म्हणजे तेज धारेची
लेख छानच. पण त्रोटक वाटला.
गुणाला दीर्घायुष्याचं वरदान
एवढ काही अद्वितीय वगैरे वाटत
स्मिता..
उंबरठा फारच सुंदर.
तिने चित्रपट निवडताना
तिने चित्रपट निवडताना
प्रत्येक कलाकार कधीही
चुकीचे निर्णय म्हणण्यापेक्षा
अस्सल अभिनेत्री
स्मिता पाटलांची काही दुर्मीळ
छान लिहिलंय.
स्मिता पाटील यांची आठवण हळवी
अत्यंत आवडती अभिनेत्री..
सर्वांचे मनापासून धन्यवाद !!!