गुरबानी!
आज एका वेगळ्याच विषयावर लिहायचा मोह झाला आहे. आज सकाळीच मोबाइलवर गाणी ऐकताना अचानक माझी अत्यंत लाडकी गुरबानी ‘इक ओंकार सतनाम’ ऐकायला मिळाली आणि लिहावेसे वाटले. (गुरबानी हा शब्द ईकारान्ती असल्यामुळे मी स्त्रीलिंगी वापरत आहे.)
मन अशांत असताना ही गुरबानी ऐकल्याचे असे खास आठवत नाही परंतु ही जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा मनाला अतिशय शांत, प्रसन्न वाटतं हे मान्य करायलाच हवं. मला वाटतं कोणत्याही श्लोक/मंत्र उच्चारात ते सामर्थ्य असतं. त्यातील लय आणि शांत रस याचे ते फलित असावे. आपले ‘मनाचे श्लोक’ किंवा ‘गायत्री मंत्र’ हे सुद्धा तितकेच प्रभावी आहेत. पण मला आज ‘आपलं आणि इतरांचं’ ह्या फंदात न पडता त्या पलीकडे जाऊन व्यक्त व्हायचंय. सरतेशेवटी सर्व धर्मांची शिकवण ही मानवतेचा उद्धार करणारी असते. ‘धूल का फूल’ ह्या सिनेमातील साहिर लुधियानवी यांनी शब्दबद्ध केलेलं गाणं ‘तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद है इन्सान बनेगा’ हे आज ६५ वर्षांनंतर सुद्धा समर्पक वाटतंय. तेव्हा तुलनात्मक दृष्टीकोन न ठेवता एक व्यक्ती म्हणून जे आवडते ते समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून पुढील लेखात मी तुलनात्मक लेखनाचा मोह टाळला आहे.
मी लहानाची मोठी झाले त्या काळात आजूबाजूला शीख (Sikh) सोडून बाकी सर्व धर्माचे लोक होते. आमच्या सोसायटीमध्ये मराठी, गुजराती, पारसी, भय्या, पंजाबी, सिंधी, मुस्लिम आणि अनेक ख्रिस्ती होते. सर्व गुण्या गोविंदाने एकत्र वाढलो. आमचे शेजारी पंजाबी आणि मुस्लिम होते. त्यामुळे विविध संस्कृती चालीरीती जवळून पहिल्या, अनुभवल्या असल्या तरी शीखांविषयी फारसे काही माहित नव्हते.
अकरावीत असताना केस कापायला मी नवीनच उघडलेल्या पार्लर मध्ये गेले तेव्हा ते एका शीख बाईचे होते ते कळले. घरातच बाल्कनी मध्ये तिने चालू केले होते. ही माझी पहिली वहिली ओळख. मला अजून आठवतंय की केस कापताना ती खूप गप्पा मारत होती. त्यांच्या धर्मात केसाला कात्री लावत नसताना तिने इतरांसाठी ती हातात घेतली आणि त्यासाठी तिला थोडाफार संघर्ष करावा लागला हे सर्व सांगितल्याचे आठवते आहे. लग्नानंतर ‘कॉलनी’ वास्तव्यात काही जणांशी ओळख झाली तरी मुलांच्या व्यापात तेव्हा जास्त जाणून घ्यायला सवडच नव्हती. मग हळू हळू हिंदी टीव्ही मालिका आणि सिनेमा ह्यातून आणि आंतरजालावरून बरीच माहिती मिळत गेली. जी चांगली माहिती मिळाली ती वाचून कौतुक वाटले.
सर्व समभाव (All are equal) आणि नि:स्वार्थी सेवा (Selfless service) ही मुख्य शिकवण! दसवंद म्हणजे मिळकतीतला आणि वेळेतील एक दशांश (Ten percent) भाग हा सेवेसाठी देणे अपेक्षित असते. गुरुद्वारा मधील लंगर माहीतच असेल. शाकाहारी भोजन जे सर्व एकत्र येऊन बनवतात आणि सर्वाना मोफत उपलब्ध असते. सर्वाना म्हणजे कोणालाही जाऊन जेवता येते. गुरुद्वारा मध्ये सर्व समान मानले जातात. सर्व अनुयायी आर्थिक आणि व्यक्तीश: सेवा करतात. कोणतेही कष्ट करा पण भीक मागू नका हेही शिकवले जाते. गुरुद्वारा मध्ये धर्म, प्रांत, लिंग भेद न ठेवता कोणीही जाऊ शकतात. तिथे गुरबानीचे पठण होत असते. गुरबानी म्हणजे गुरूंनी लिहिलेली ज्ञानवाणी किंवा चित्तवाणी.
अशीच एक गुरबानी आपण बरेचदा ऐकली आहे – ‘इक ओंकार सतनाम’- रंग दे बसंती मधील. मला ही खूप आवडते म्हणून मी अर्थ जाणून घेतला तर तोही आवडला. ‘गुरु ग्रंथ साहिब’ मधील ‘मूल मंत्र’ मधील प्रथम ओवी आहे जी सकाळच्या प्रार्थनेसाठी म्हणतात. आज सिनेमाच्या माध्यमातून गुरबानी घराघरात ऐकली गेली आहे. श्रद्धा ही व्यक्तीनुरुप बदलत असते. तेव्हा कोणी प्रार्थना म्हणून ऐकेल तर कोणी फक्त एक गाणं म्हणून ऐकेल. पण तरीही ती अनेक लोकांच्या तोंडी आहे आणि तिला सर्वत्र ओळख मिळाली आहे.
प्रत्येक धर्म श्रेष्ठ असतो आणि चांगलीच शिकवण देत असतो. कोणी कोणत्याही धर्माचा असू दे त्याने ‘माणुसकी’ हा धर्म विसरू नये हीच सदिच्छा!
– उल्का कडले
Gurbani
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ੴ ਸਤਿ ਨਾਮੁ ਕਰਤਾ ਪੁਰਖੁ ਨਿਰਭਉ
गुरबानी ऐकायला अतिशय आवडते.
सर्वच धर्म मानवतावादी नाहीत.
फार सुंदर.
खरंच सुंदर.
गुरबानी ऐकायला खूप आवडते,
मी कधी गुरुद्वारा मध्ये न
अगदी असा मंजुळ स्वर कानी पडला
मराठीत मला समजलेला अर्थ मी
गुरबानी! अहाहा ____/\_____
छान!
फार कमी वयात मी मरण पाहिले,
छान लेख
रंग दे बसंती सिनेमा पाहिला
हेच
वर बापूंनी सांगीतल्याप्रमाणे
पुन्हा लिंक देते आहे.
स्वातीताई, सोन्याबापू व
छान लेख!