Skip to main content

उपासाच्या सुरळीच्या वड्या

लेखक अनन्न्या यांनी सोमवार, 03/10/2016 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्र चालू आहे. नऊ दिवस उपास करणाय्रांसाठी थोडी वेगळी पण चविष्ट पाककृती घेऊन आलेय. उपास नसला तरी करून आस्वाद घ्यायला हरकत नाहीच! साहित्यः पाऊण वाटी शिंगाडा पीठ, पाव वाटी साबुदाणा पीठ, दोन वाट्या पाणी, एक वाटी ताक, मीठ, दोन ओल्या मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ओलंखोबरं, दोन चमचे साजूक तूप, अर्धा चमचा जिरं. vadya कृती: खोबरं खवून घ्यावं. कोथिंबीर धुवून बारीक चिरावी. मिरच्या वाटून घ्याव्या. खोबरं कोथिंबीर, मिरचीचं वाटप आणि मीठ एकत्र करावं. दोन वाट्या पाणी आणि ताक नॉनस्टीक पॅनमध्ये एकत्र करावं. चवीनुसार मीठ, लाल तिखट घालावं. आता त्यात शिंगाडापीठ आणि साबुदाणा पीठ घालून नीट मिसळावं. गोळी होता कामा नये. vadya आता मंद गॅसवर मिश्रण सतत ढवळत राहावं. दोन ताटाना तूपाचा हात लावून घ्यावा. मिश्रण शिजत आलं की घट्ट होत जातं. पिठाचा रंग बदलतो. आता मिश्रण उलथ्याच्या सहाय्याने भराभर ताटावर पसरावे. त्यावर खोबरं कोथिंबीर घालावी. तूप जिय्राची फोडणी करावी. या मिश्राणावर पसरावी. हा फोटो फोडणी घालण्या पूर्वीचा आहे. vadya आता उभ्या रेषा मारून घ्याव्या. अर्ध्यापर्यंत गुंडाळावे. vadya अश्या पध्दतीने सर्व वड्या गुंडाळून घ्याव्या. मस्त डीश तयार आहे. आता मनसोक्त उपास करा!!! vadya

वाचने 14483
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

कसले सही पदार्थ सांगतेस तु मला तर कधीच असल काही येत नाही.

नक्की करशील तूही, आणि करायला लागलं सुचत जातं.

In reply to by खटपट्या

पाऊण वाटी शिंगाडा पीठ, पाव वाटी साबुदाणा पीठ, दोन वाट्या पाणी, एक वाटी ताक, मीठ, दोन ओल्या मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ओलंखोबरं, दोन चमचे साजूक तूप, अर्धा चमचा जिरं.
हे सगळं उपवासाला चालतं.. मग ह्याचं थालपीठ बनवा नाही तर सुरळीच्या वड्या.. फर्क की पेंदा! भारतीय हिंदु उपवास तरी असेच असतात.. खाऊन पिऊन.. जीवाला त्रास नाही!! बाकी अनन्या, महान आहेस!!!!!! साध्या सुरळीच्या वड्या जमायला अवघड, तू शिंगाड्याच्या पीठाच्या कशा जमवतेस ग बाई!!!

खूपच मस्त...कधी कल्पनाच केली नव्हती शिन्गाड्याच्या पिठाचे असे भारी काहीतरी करता येइल. धन्यवाद...!

रेखीव वड्या झाल्या आहेत. एकदम मस्त :) (मी सुरळीची वडी केली तर ताट घासायच्या आधी चिकटलेले पीठ खावे लागते. तुझे ताट एकदम साफ सुधरे असेल ना ;) )

यातली फक्त कोथिंबीर काहीजण उपासाला खात नाहीत पण बाकी सर्व उपासाचेच आहे! शेवटी एवढं करायचं ते जीभेचे चोचले पुरवायला!!!

मस्त पा़कृ.

सगळ्यांना तर दिसतायत

फार सुबक दिसत आहेत ग ह्या सुरळीच्या वड्या.. स्वाती

ईथे साध्या सुरळीच्या वड्या जमताना मारामार...तू चक्क उपासाच्या केल्यास!!! ईथूनच दंडवत घालतो...एक ताट्भर पाठवून दे ईकडे....तोंड खवळलय.