खांडवी (नागपंचमी विशेष)

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
1 Aug 2014 - 12:58 pm

आमच्याकडे कोकणात नागपंचमीला चंदन उगाळून त्याने पाटावर नाग काढून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीला उकडीचे मोदक किंवा खांडवी केली जाते. तसे कोकणातल्या पाककृती म्हणजे त्यात तांदुळ, गूळ आणि ओले खोबरे हे मुख्य घटक हवेतच!
साहित्यः दोन वाट्या तांदळाचा रवा, दोन वाट्या गूळ, एक वाटी ओले खोबरे, मीठ, तूप वेलची, पाणी.
कृती: पूर्वी जातिणीवर रवा काढला जाई. आता मात्र बाजारात तयार इडली रवा मिळत असल्याने काम बरेच सोपे झालेय. हा रवा थोडा कोरडा भाजून झाल्यावर साधारण पाव वाटी तूप घालून मंद आचेवर तांबूस भाजावा. रव्याच्या दुप्पट पाणी घेऊन ते उकळण्यास ठेवावे. त्यात गूळ. मीठ, थोडे ओले खोबरे आणि वेलची पावडर घालावी. उकळी आली की भाजलेला रवा मिसळावा. नीट मिक्स करून मंद आचेवर झाकण ठेवून शिजवावे. थाळ्याला तूपाचा हात लावावा. रवा व्यवस्थित शिजला की मिश्रण थाळ्यात पसरावे, थापताना वर ओले खोबरे पसरून थापावे. आवडीप्रमाणे वड्या पाडाव्यात.
मस्त कणीदार तूप किंवा नारळाच्या दुधाबरोबर खाव्या.
khandvi

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Aug 2014 - 1:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

येस, आज डब्यात खांडवीच आहे.
नारळाच्या दुधा बरोबर कधी खाल्ली नाही. बघायला पाहिजे

रच्याकने :- जाते माहिती आहे पण ये जातिण जातिण क्या है ये जातिण जातिण

अनन्न्या's picture

1 Aug 2014 - 5:30 pm | अनन्न्या

आपल्या बोलीभाषेत काही शब्द इतके पक्के असतात डोक्यात, त्याचा प्रतिशब्द माहित असूनही अगदी नकळत लिहीला गेला. माझ्या माहेरी जात्याला जातिण म्हणतात! लहानपणापासून तोच शब्द कानावर पडल्याने चुकलेय असे वाटलेच नाही.

स्वाती दिनेश's picture

1 Aug 2014 - 2:07 pm | स्वाती दिनेश

मस्त दिसते आहे खांडवी..
स्वगत- कित्येक महिन्यात्,वर्षात केली आणि खाल्ली नाहीये.. करायला पाहिजे आता..
स्वाती

इरसाल's picture

1 Aug 2014 - 2:08 pm | इरसाल

जातिण

पैसा's picture

1 Aug 2014 - 2:23 pm | पैसा

रत्नागिरीला आवडता पदार्थ! सध्या कित्येक वर्षे गोव्यात पातोळ्या खायची सवय झाल्यामुळे विसरायला झालं होतं. पण अगदी सोपा आणि चविष्ट प्रकार. आज संध्याकाळी करणार!

प्रभाकर पेठकर's picture

1 Aug 2014 - 2:24 pm | प्रभाकर पेठकर

खांडवी नांवाचा हा दूसरा पदार्थ पाहिला. नेहमीचा आवडीचा पदार्थ म्हणजे आपल्या पाटवड्या किंवा सुरळीच्या वड्या म्हणतो तो. त्याला गुजराथीत खांडवी म्हणतात. असो.

हा खास कोकणी पदार्थ करून पाहिला पाहिजे.

अत्रन्गि पाउस's picture

2 Aug 2014 - 12:38 am | अत्रन्गि पाउस

इथल्या काही गुज्जू दुकानात सुरळीची वडी मागितली कि ते आपापसात खमणी म्हणतात ...

प्रभाकर पेठकर's picture

2 Aug 2014 - 1:58 am | प्रभाकर पेठकर

खांडवी आणि खमणी दोन्ही शब्द सुरळीच्या वडीसाठी वापरले जातात. इथे प्रतिमा पाहता येतील.

ह्या पाककृतीलाही नक्कीच खांडवी म्हणत असणार. पण ह्या नांवाने दूसरा पदार्थ (सुरळीच्या वड्या) सुद्धा आहे एव्हढेच मला म्हणायचे आहे.

'खमणी' नांवाचेही मी दोन वेगवेगळे पदार्थ खाल्ले आहेत.

अत्रन्गि पाउस's picture

2 Aug 2014 - 8:24 am | अत्रन्गि पाउस

सुरुवातीला तर मी खमण, खमण ढोकळा आणि खमणी ह्यातच कन्फ्युज व्हायचो त्यात अमिरी खमण ऐकला
आता आपण म्हणताय २ खमणी
स्कॉलरशिप परीक्षेमधल्या प्रश्नांची आठवण झाली :)

मी अजूनपर्यंत खांडवी=सुरळीच्या वड्या असं समजत होतो.

मुक्त विहारि's picture

1 Aug 2014 - 2:33 pm | मुक्त विहारि

बाकी,

जात्यापेक्षा जातीण जास्त आवडले...

भिंगरी's picture

1 Aug 2014 - 2:40 pm | भिंगरी

जात्याची बायको जातीण

मस्त आहे गं हि पाकृ. मी पहिल्यांदाच बघितली. खांडवी म्हणजे मी पण सुरळी वडीच समजत होते. आता हि गोड खांडवी करुन बघायला पाहिजे.
ह्यात आपला नेहमीचा साधा उपम्याचा रवा चालतो का? कि ईडलीचाच रवा पाहिजे?

शिद's picture

1 Aug 2014 - 3:09 pm | शिद

मी पहिल्यांदाच बघितली.

मी सुद्धा.

फोटोमध्ये खांडवी झकासच दिसताहेत. सोपी पाकृ असल्यामुळे लवकरच करुन पहायला/चाखायला लागेल. :)

रुमानी's picture

1 Aug 2014 - 3:26 pm | रुमानी

खांडवी ह प्रकार तिखट चविमधे महित होता ..हे गोड प्रकारातली करुन पाहवि लगेल....! :)

दिपक.कुवेत's picture

1 Aug 2014 - 4:01 pm | दिपक.कुवेत

आणि फोटोतली तर फारच आकर्षक दिसतेय. गरमागरम तर छान लागतेच पण शीळि झाली कि अजुनच टेस्टि लागते. आजीच्या हातची खाउन बरीच वर्ष झाली आहेत.

सुरेख फोटू व कॄती. आजकाल इडली तांदळाच्या रव्याची सगळेजण करतात पण पूर्वी तांदूळ धुवून सावलीत वाळवून मग रवा काढत असत ना? माझ्या साबा हा पदार्थ करतात ते आठवले. छान लागतो.
ही महाराष्ट्रीय खांडवी आहे आणि सुरळीवडीला गुज्जु लोक खांडवी म्हणातात. एकदा मी फसले होते.

अनन्न्याजी, खांडवी अप्रतिम झाली आहे . मस्त . त्यावर तुप घालुन खायच. सही. भारी लय भारी.

सानिकास्वप्निल's picture

1 Aug 2014 - 5:09 pm | सानिकास्वप्निल

सगळ्यात आवडता पदार्थ खांडवी, तुपाबरोबर तर सह्हीच लागतं :)

मी कधीतरी बद्ल म्हणून लापशी रव्याच्या पण बनवते.

शिर्‍याच्या रव्याची केली की तिला रवळी म्हणतात बहुतेक, नारळाचं दूध पण घालतात त्यात ईफ आयाम नॉट राँग!!

सानिकास्वप्निल's picture

1 Aug 2014 - 8:41 pm | सानिकास्वप्निल

लापशी रवा (दलिया) म्हणजे गोडाचा सांजा बनवतात तो गव्हाचा जाड रवा. तो वापरून अशीच खांडवी बनवते मी बदल म्हणून.

शिर्‍याचा रव्याची(रोजचा बारिक रवा) घेऊन रवळी बनवतात हे ऐकून माहित आहे पण मी अजून कधी नाही बनवली.

कवितानागेश's picture

2 Aug 2014 - 1:03 am | कवितानागेश

लापशी रवा भाजून घेतेस का? तो भाजून चिकट होतो.
मी एकदा भाजून फसलेय. नंतर गुळाचा शिरा करताना चिक्की झाली होती! :(

सानिकास्वप्निल's picture

2 Aug 2014 - 1:48 am | सानिकास्वप्निल

शिरा/ सांजा करताना थोड्या तुपावर लापशी रवा परतून घेते मग सरळ कुकर ला ३-४ शिट्ट्या काढून शिजवून घेते. छान होतो गं.

मागे इथे दिली होती पाकृ.

अनन्न्या's picture

1 Aug 2014 - 5:36 pm | अनन्न्या

मृणालिनी, हा रवा तांदळाचा असतो. साध्या रव्याची कधी केली नाहीय, पण चव वेगळी लागेल असे वाटते.
सुरळीच्या वड्यांना खांडवी म्हणतात हे मी पहिल्यांदाच ऐकले.
तुपाबरोबर ही छान लागतेच पण दाट नारळाच्या दुधाबरोबर जास्त छान लागते.

ओह ओके. मग इडलीचा रेडी रवा मिळतो, तो वापरला तर चालेल का?
मी कधी खाल्ली नाहिये हि खांडवी म्हणुन एवढे प्रश्न. :)

होय गं, तोच! विकतचा इडली रवा वापरल्याने बरेच काम वाचते, नैतर तांदूळ धुवून सावलीत पंच्यावर वाळत घालून बर्‍यापैकी सुकले की मिक्सरवर (पूर्वी जात्यावर) भरड रवा काढावा लागतो. चाळून त्यातल्या रवा घेऊन हा पदार्थ केला जातो असे आठवतेय.

अनन्न्या's picture

1 Aug 2014 - 6:19 pm | अनन्न्या

रेवतीने दिलेय तसेच आता इडली रव्यामुळे खूप सोपे पडते. चांगली लागते चव!

ग्रेट. मग माझ्याकडे आहे ईडली रवा. त्याचा करुन बघते.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Aug 2014 - 5:48 pm | अत्रुप्त आत्मा

नारळाच्या दुधाबरोबर... मस्त..............! *i-m_so_happy*

सखी's picture

1 Aug 2014 - 6:42 pm | सखी

मस्तच दिसतेय अनन्न्या, करुन बघायला पाहीजे.
मला कोकण आणि केरळमधल्या लोकांचे फार कौतुक वाटते यासाठी की दुध, नारळ आणि गुळ वापरुन किती पदार्थ या दोन प्रांतात होतात परत चवीतही काहीतरी फरक/नाविन्य आहेच.

खर तर असं म्हणायचं होतं: नारळ व नारळाचे दुध, आणि तांदुळ, गुळ या ३-४ मुख्य जिन्नस वापरुन कितीतरी पदार्थ होतात.

मधुरा देशपांडे's picture

1 Aug 2014 - 6:47 pm | मधुरा देशपांडे

मस्त. मागे एका कोकणातल्या मैत्रिणीबरोबर खांडवी की सुरळीच्या वड्या यावर चर्चा झाली तेव्हा मला पण हे पहिल्यांदाच कळले होते की हे दोन वेगळे पदार्थ आहेत. आत्ता फोटो बघून नेमके कळले.

प्रचेतस's picture

1 Aug 2014 - 7:51 pm | प्रचेतस

मस्त पाकृ.

मयुरा गुप्ते's picture

1 Aug 2014 - 8:28 pm | मयुरा गुप्ते

आमच्या कडे शिळ्सप्तमी साठी सांदणी/सांजणी नावाचा प्रकार साधारण अश्याच प्रकारानी करतात.

वरच्या रेवती ताईंच्या प्रतिसादात त्यांनी सांगितल्या प्रमाणेच्.

सुगंधीत तांदुळ धुवुन, पंच्या वर सावलीतच वाळवावेत,
त्याची मिक्सर मधुन भरड काढुन, तुपावर मंद भाजावे, नारळाच्या दुधात गुळ, वेलची पुड घालुन त्या मिश्रणाची उकड काढावी. साधारण ढोकळ्या एवढा वेळ लागतो.

खांडवी सुंदरच. पटकन एक उचलुन तोंडात घालावीशी वाटते.

--मयुरा.

सानिकास्वप्निल's picture

1 Aug 2014 - 8:49 pm | सानिकास्वप्निल

कोकणात ही आंब्याचे, केळ्याचे , फणसाचे अश्याच पद्धतीने सांदण करतात.

इशा१२३'s picture

1 Aug 2014 - 9:18 pm | इशा१२३

अप्रतिम....उचलून तोंडात टाकावीशी वाटतेय..

सस्नेह's picture

1 Aug 2014 - 9:30 pm | सस्नेह

आतापर्यंत नाव ऐकले होते आज पाहिली

अनन्न्या's picture

2 Aug 2014 - 3:51 pm | अनन्न्या

मला वाटलं होतं, बहुतेक सर्वाना माहित असेल! बरं झालं, त्यामुळे बय्राच जणांना कळली पाकृ.
परत एकदा सर्वाना धन्यवाद!

प्यारे१'s picture

2 Aug 2014 - 5:40 pm | प्यारे१

मस्तच आहे जे काही आहे ते.

चवीला चांगलं लागलं की नाव काहीही ठेवा. नाहीतर नावं ठेवावी लागतात. (कंडीशन्स अप्लाय)