११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेवर सगळ्यात मोठा अतिरेकी हल्ला झाला. त्याचे परिणाम सगळ्या जगावर झाले. तेव्हापासून अमेरिकेत एक वाक्प्रचार बनला आहे अमुक देशाचे ९/११. जसे २६/११ चा मुंबईवरील हल्ला हा भारताचे ९/११, स्पेनमध्ये माद्रिद येथे रेल्वे गाड्यांमध्ये अनेक स्फोट होऊन शेकडो लोक मेले त्याला स्पेनचे ९/११ म्हटले जाते. हाच नियम लावला तर मक्केतील १९७९ साली झालेला उठाव ह्याला सौदी अरेबियाचे ९/११ म्हणता येईल. ह्या घटनेने सौदी राजघराणे मुळापासून हादरले. बंडखोरांचा क्रूरपणे बिमोड केलाच. पण पुन्हा असे होऊ नये म्हणून त्यांनी आपली धोरणे पूर्णपणे बदलली. पश्चिमी संस्कृतीकडे होणारी आपली वाटचाल थांबवून अत्यंत कर्मठ आणि धार्मिक बनण्याच्या दिशेने पावले उचलली. ह्या प्रकारामुळे तमाम मुस्लिम जग मोठ्या प्रमाणात बदलले. जगभरातील मुस्लिम लोकांना खरा इस्लाम शिकवावा म्हणून सौदी अरेबियाने भरपूर पैसा धार्मिक उत्थानाकरता वापरायला घेतला.
ज्या घटनेमुळे हे सुरु झाले त्याचा हा मागोवा. फार लोकांना ही घटना माहीत नसते. असलीच तर त्याची चुकीची आवृत्ती माहीत असण्याची शक्यता जास्त. पण मला तरी ही इतिहासातली एक रोचक आणि महत्त्वपूर्ण घटना वाटते.
ज्याला आज सौदी अरेबिया म्हणतात तो देश हा पूर्वी एकसंध नव्हता. एक तर मक्का मदिना ही धार्मिक स्थळे सोडल्यास त्या भागात मुख्यतः: वाळवंट होते. त्यामुळे अरबी टोळ्या तिथे राहात होत्या. ऑटोमन तुर्क साम्राज्याने १६ व्या शतकात मक्का आणि मदिना ह्या शहरात आपला सेनापती नेमला आणि ह्या भागावर हक्क प्रस्थापित केला. अर्थात ही दोन शहरे सोडून बाकी भूभाग नावालाच ऑटोमन होता. स्थानिक टोळ्याच तिथे राज्य करत होत्या. बाकी भागात फार काही उत्पन्न नव्हते त्यामुळे ऑटोमन सुलतानाला त्यात फार स्वारस्यही नव्हते.
पहिल्या महायुद्धाच्या वेळी तुर्कांचे आणि दोस्त राष्ट्रांचे शत्रुत्व होते त्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्सने सौदी अरेबियावर ताबा मिळवण्याकरता हालचाली सुरु केल्या. आधी त्यांनी मक्केच्या ऑटोमन प्रतिनिधीलाच फितवण्याचा प्रयत्न केला पण तो डोईजड झाला म्हणून त्यांनी सौदी नामक टोळीच्या प्रमुखाला हाताशी धरले. ह्या सरदाराने ऑटोमन सरकाराविरुद्ध उठाव केला. त्या वेळेस इखवान नावाची एक कडवी धार्मिक संघटना ह्या भागात प्रबळ बनत होती. इखवान म्हणजे (मुस्लिम) बांधव. तमाम मुस्लिम लोकांना एकत्र करून आपले साम्राज्य बनवण्याची त्यांची मनीषा होती. आजच्या आयसिसची ही आद्य आवृत्ती! सौदी सरदाराने (अब्दुल अझीझ बिन साऊद) ह्या लोकांना पटवले आणि त्यांच्या मदतीने ऑटोमन साम्राज्याला पराभूत केले. हा विजय मिळाल्यावर ब्रिटनने सौदी घराण्याला ह्या भूभागाचे स्वामित्व बहाल केले. परंतु इखवान संघटनेचे समाधान झालेले नव्हते. त्यांना इराक आणि कुवेत ह्या देशावर हल्ला करून तिथेही इस्लामी राज्य आणायचे होते. हे ब्रिटनच्या अधिपत्याखाली असणारे प्रदेश होते. सौदी राजाची ब्रिटनशी वाकडे वागण्याची इच्छा नव्हती त्यामुळे त्याने त्याला विरोध केला. पुढे इखवान मंडळींनी सौदीविरुद्ध उठाव केला. तो फसला. सौदी सैन्याने त्यांची मोठी कत्तल केली. अर्थात ही संघटना पूर्ण नष्ट झाली नाही. जरी इखवान हे तमाम मुस्लिमांना एकत्र आणू पाहात होते तरी त्यांचा सेनापती ओतेबी ह्या टोळीचा होता. ह्याच टोळीचा एक सदस्य हा १९७९ च्या उठावाचा प्रमुख होता. पण ते नंतर पाहू.
१९३८ च्या सुमारास पेट्रोलियमचे महत्त्व वाढले होते. आणि सौदी अरेबियात उत्कृष्ट गुणवत्तेचे तेलाचे प्रचंड साठे सापडले आणि त्यामुळे सौदी घराण्याला मोठी लॉटरीच लागली! ब्रिटन आणि अन्य पश्चिमी सत्तांनाही मोठा फायदा झाला कारण सौदी राजा त्यांचा मित्र होता. इथून ह्या देशाची अफाट भरभराट सुरु झाली. बापजन्मात पाहिला नसेल इतका पैसा ह्यांना मिळू लागला. आपण आपला धर्म निष्ठेने पाळला म्हणून अल्लाहने आपल्याला हे बक्षीस दिले आहे अशी सर्वसामान्य श्रद्धाळू अरबांची भावना झाली. पण दुर्दैवाने अशी सुबत्ता आल्यावर धर्माचे नियम धाब्यावर ठेवून लोक चैन करू लागले. सौदी घराण्याकडे राज्य असल्यामुळे त्या घराण्यातील लोकांची तर चंगळ झाली मग जुगार, बायका, कार, बोटी, दारू, खाणे पिणे सगळे राजविलास सुरु झाले. हे लोक युरोपात जाऊन आपली हौस पुरी करू लागले. अरब आणि त्यांची ऐयाषी हा विनोदाचा, टिंगलीचा विषय बनू लागला. भारतातही सत्तरीच्या दशकातले सिनेमे पाहिलेत तर त्यात बर्याचदा एखादा अरब मोडके तोडके हिंदी बोलत पचास लाख के हिरे वगैरे काहीबाही बोलताना दिसेल!
सौदी अरेबियातील लोक विशेषतः: बिगर सौदी घराण्यातील लोक हे सगळे पाहून संतापत होते. परंतु सौदी घराण्याची हुकूमशाही होती त्यामुळे कुठल्याही प्रकारचा विरोध, टीका करणे धोकादायक होते. कुठले निमित्त होऊन शिरच्छेद वा हातपाय कापण्याची वेळ येईल हे सांगणे कठीण. त्यामुळे ही धुसफूस आतल्या आत धुमसत होती. कुणालाही राजकीय प्रतिनिधित्व नव्हते. इकडे पश्चिमेच्या प्रभावामुळे सौदी राजाने टीव्ही, सिनेमे, ऑपेरा वगैरेही सुरु केले. टीव्हीवर चेहरा उघडा ठेवून बोलणार्या स्त्रिया पाहून अनेक धार्मिक अरबी लोकांचा तिळपापड होऊ लागला. सौदी राजघराणे धर्म बुडवत आहे अशी भावना मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये वाढीस लागली.
क्रमशः
वाचने
36831
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक
नाही
In reply to रोचक by चित्रगुप्त
अरबी म्हणजे कोण ?
In reply to नाही by हुप्प्या
माझ्या माहितीप्रमाणे
In reply to अरबी म्हणजे कोण ? by चित्रगुप्त
बगदाद हे तसे खऱ्या अर्थाने
In reply to माझ्या माहितीप्रमाणे by हुप्प्या
+१
In reply to माझ्या माहितीप्रमाणे by हुप्प्या
बगदाद मधे बहुधा तैग्रीसच आहे.
In reply to +१ by अमितदादा
धन्यवाद. आता नकाशात पाहिलं
In reply to बगदाद मधे बहुधा तैग्रीसच आहे. by प्रचेतस
मला वाटतं बॅबिलाॅन
In reply to धन्यवाद. आता नकाशात पाहिलं by अमितदादा
बॅबिलाॅन हे ह्या भागाचं
In reply to मला वाटतं बॅबिलाॅन by बोका-ए-आझम
माझ्या माहितीप्रमाणे
In reply to माझ्या माहितीप्रमाणे by हुप्प्या
शक्य आहे
In reply to माझ्या माहितीप्रमाणे by विशाखा पाटील
बगदाद - Ctesiphon - पारशी कनेक्शन
In reply to माझ्या माहितीप्रमाणे by हुप्प्या
आवडल.
In reply to बगदाद - Ctesiphon - पारशी कनेक्शन by मन१
छान सुरूवात
मस्त...
वाचते आहे..
वा! मस्त माहिती ! वाचतोय!
सुंदर माहिती.
चांगली माहिती, पण
सुरेख प्रतिसाद
In reply to चांगली माहिती, पण by विशाखा पाटील
टी. ई. लॉरेन्स (लॉरेन्स ऑफ अरेबिया) हा त्या करारामागचा शिल्पकार होता.सेव्हन पिलर्स ऑफ विजडम चा लेखक.आभारी आहे
In reply to चांगली माहिती, पण by विशाखा पाटील
रोचक इतिहास ! पुभाप्र.
हुप्प्या यांना एक प्रश्न.
बोकोबा
आयातुल्ला ही पदवी होती किंवा आहे.
In reply to बोकोबा by मारवा
अली हाशमी रफसंजानी हे सर्वोच
In reply to आयातुल्ला ही पदवी होती किंवा आहे. by बोका-ए-आझम
हो. तो गोंधळ झाला.
In reply to अली हाशमी रफसंजानी हे सर्वोच by अमितदादा
* पदांवर
In reply to हो. तो गोंधळ झाला. by बोका-ए-आझम
सर्वोच्च धार्मिक नेते
In reply to बोकोबा by मारवा
माहितीपूर्ण
माहितीपूर्ण लेख
लेख माहितीपूर्ण आहेच.विशाखाचे
सुरेख... पुभाप्र!!
मस्त, पु भा प्र
वाचतोय
मार्क धिस!
झक्कास... पुढील भागाच्या
चांगली माहिती आणि उत्तम
पु भा प्र.
छान सुरुवात
छान सुरवात आणि उत्तम प्रतिसाद
अप्रतिम
अप्रतिम माहिती. खूप गोष्टी
ऊत्तम लेख
पेगन- मूर्तीपूजक- अनेक देव मानणारे - ते देव कोणकोणते ?