Skip to main content

श्रीगणेश लेखमाला: पायरोग्राफी: जाळ अन् धूर संगटच...

लेखक मूनशाईन यांनी शनिवार, 10/09/2016 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
Pyrography (पायरोग्राफी) - To draw with fire..

1

शब्दशः 'जाळ अन् धूर संगटच' असेच या कलेचे वर्णन करता येईल. पायरोग्राफी 'wood burning art' म्हणूनदेखील परिचित आहे. आगीच्या मदतीने किंवा आगीवर तापवता येईल अशा पेनाने केलेले रेखाटन. फार प्राचीन काळापासून ही कला अस्तित्वात आहे. काळानुसार वापरायची साधने बदलत वा सुधारत जाऊन, आता user friendly तयार पायरोग्राफी पेन बाजारात मिळते. दिसायला अगदी सोल्डरिंग पेनासारखे, पण याला टाक, कॅलिग्राफी पेनाप्रमाणे पुढे जोडायला वेगवेगळ्या जाडीची, आकाराची, टोकदार किंवा सपाट attachments लावता येतात. विजेच्या मदतीने या attachments तापतात. पेनाला तापमान नियंत्रित करायची सोय असते. ज्या वस्तूवर रेखाटन करायचे त्याप्रमाणे तापमान कमी-जास्त करावे लागते. लाकूड, लेदर, कागदावर आपण जाळून लिहू शकतो, चित्रे काढू शकतो. काही हौशी लोक तर हाडेदेखील वापरतात. माझी धाव अजून लाकडापर्यंतच आहे. दोन वर्षापूर्वी, माझ्या वाढदिवसाला नवीन कला शिकायची, म्हणून आम्ही दोघे येथील क्राफ्ट शॉपमध्ये गेलो. अनिल अवचटांच्या लाकडी कोरीवकामाबद्दल जाणून होतो, उत्सुकतेपोटी सहज आम्ही त्या भागात गेलो. वेगवेगळ्या लाकडी वस्तू, त्याच्या संबंधित असलेल्या कलेची पुस्तके व लागणारी साधने तिथे आजूबाजूला ठेवलेली होती. कोरताना घरात कचरा होईल आणि साफसफाई कोण करत बसणार... म्हणून पुढे वळलो. एका पुस्तकावर 'पायरोग्राफी' लिहिलेले दिसले. जाळपोळ करून चित्रकला करता येईल या उत्सुकतेने जरा चाळले. नवीन काहीतरी दिसते आहे म्हणून नवर्‍याने हेच भेट दिले. पेन व काही फळकुटे सरावाकरिता उचलून आणली. सोबत पेन बनवणारी संस्था यू ट्यूबवर त्याबद्दल माहिती सांगणारे व्हिडिओ टाकते असे पत्रकावर लिहिले होते. त्याचबरोबर इतर कलाकारांनी त्यांचे अपलोड केलेले काही व्हिडिओ तिकडे सापडले. थोडे गुगलून हळूहळू मी शिकायला सुरवात केली. यात पहिला टप्पा होता तो म्हणजे जमेल तितक्या कमी वेगाने, अगदी कासवाच्या गतीने हे पेन वापरणे. आपल्या हाताला इतक्या वर्षांची लिहायची सवय असते, त्याच्या चार ते पाच पट संथ वेगाने पायरोग्राफी पेन वापरावे लागते. घाई केल्यास लाकूड एकसारखे जळत नाही. पेन/पेन्सिलीने लिहिताना आपल्याला थोडा दाब देऊन लिहायची सवय असते. इकडे मात्र उलटे आहे. जेवढा कमी दाब देता येईल तेवढा चांगला, नाहीतर लाकडावर खड्डे पडून पृष्ठभाग खडबडीत दिसतो. तापमान कमी-जास्त करून वेगवेगळ्या छटा साकारता येतात. जास्त ठेवल्यास जर्द काळा, तर जसजसे कमी करू तशा तपकिरी छटा उमटत जातात. लाकूड कोणत्या प्रकारचे असले पाहिजे हा या कलेमध्ये फार महत्त्वाचा भाग आहे. शक्यतो फिकट, भुरकट असल्यास जाळल्यावर चित्र उठून यायला मदत होते. घट्ट तंतू व गोलाकार वलय एकमेकांच्या जवळजवळ असतील तर जळताना धूर होतो. कधीकधी राळ वर येऊन खूप वेळ लागतो. जर सुटसुटीत तंतू असतील तर कमी वेळात, चांगल्या प्रकारच्या छटा साधता येतात. राळ वर न आल्यामुळे एकसारख्या रेषा उमटत असल्याने सारखे पेनाने त्याच जागेवर गिरवायला लागत नाही. या कलेसाठी नुकतेच कापलेले लाकूड अथवा शक्यतो वार्निश न मारलेले लाकूड वापरत असल्याने सर्व संपल्यावर तेल किंवा polyurethaneचे वरून एक-दोन थर द्यावे लागतात. कालांतराने पायरोग्राफी फिकी पडत जाते. तेल वापरल्यास लाकूड आणि पायरोग्राफीच्या छटा राजस दिसतात व चांगल्या टिकतात. नकळत भाजू नये किंवा इतर काही अपघात होऊ नये यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. लाकडातून निघणारा धूर हा त्रासदायक असू शकतो. यासाठी एका बाजूने टेबलावरील छोटा पंखा चालू ठेवावा लागतो. खिडकीजवळ बसल्यास उत्तम, कारण पंख्याच्या मदतीने धूर बाहेर जातो. काही कलाकार मास्क लावूनदेखील काम करतात. सुरुवातीला नकळत पटकन हात गरम पेनास लागू नये म्हणून हातमोजा घालणे बरे किंवा फर्स्ट-एड किट जवळ ठेवायला लागते. डोळ्यांच्या बचावासाठी तसा चश्मा घातल्यास धुरामुळे डोळे चुरचुरत नाहीत व अपघातदेखील टळतो. व्यवसायाने मी वास्तुविशारद, मात्र हस्तकलेची आवड.. यातूनच माझ्या पायरोग्राफीची सुरुवात झाली. सराव वाढला तशी आवड वाढली. रोज नवीन काहीतरी करावे वाटू लागे. वास्तुकला शिकताना कोणतीही रचना कशी असावी, त्यासाठी कोणकोणते मुद्दे लक्षात घावे यावर पहिली दोन वर्षे फार भर असतो. सध्या कोणाही व्यक्तीसाठी जेव्हा एखादी वस्तू करायला घेतली, तर ती फक्त त्या व्यक्तीसाठी आगळीवेगळी करायला शिक्षणाची साथ होते. आजूबाजूला मित्रमंडळी भरपूर असल्याने हळूहळू प्रत्येकाचे वाढदिवस, लग्न, गृहप्रवेश, बारसे असे एकही कार्यक्रम मी सोडले नाहीत, जेव्हा त्यांना आम्ही स्पेशल पायरोग्राफी भेटवस्तू दिल्या नाहीत. ही पहिली वाढदिवसाची भेट, जेव्हा माझी अगदी सुरुवात होती. पानाच्या आकाराच्या attachmentने उलटा ठसा उमटवून ही फुले केली. नंतर टोकदार attachmentने नक्षी काढली.

2

चहा, कॉफी, वाईन वगैरेसाठी टेबलवर पेला/कप ठेवायला हे कोस्टर्स केले. यावरचे नक्षीकाम मेंदीसारखे केले. आमच्या एका मैत्रिणीने तिच्या देवघरात ठेवायला एक छोटे टेबल मला आणून दिले. त्यावर आपली शुभचिन्हे मिळून देवघरास साजेसे असे मंडला बनवले आहे.

3

  4

माझी नणंद स्वतः एक कलाकारच आहे आणि अलादीनची जास्मिन तिची आवडती राजकन्या. तेव्हा तिच्यासाठी स्पेशल, जवळजवळ ५० तास बसून ही पेटी बनवली.

5

अशाच माझ्या एका मैत्रिणीबरोबर कलेची देवाणघेवाण केली. ही नावाची पाटी तिच्या नवीन घरासाठी पाठवली. तिने माझ्या नावाचा बॉक्स तिच्या decoupage (कागद चिकटवून कला)ने बनवून पाठवला.

6 7

झिम्बाब्वेची माझी एक मैत्रीण, रुफारो, तिला छोटासा भारत तिच्या घरी असावा या उद्देशाने तिच्यासाठी ताजमहाल असलेला दागिन्यांचा डबा बनवला. एका जवळच्या मैत्रिणीने तिच्या आजोळी रशियाला जाताना काही भेटवस्तू बनवून घेतल्या.

89

एका काकूंनी नेदरलँड्सला जाताना भारतीय नक्षीकाम असलेल्या वस्तू बनवून नेल्या.

10 

लग्नात माझ्या नणंदेच्या सासरी लोकांना आम्ही स्वतःहून छोट्या डब्या भेट केल्या. साहजिकच याने वेगवेगळ्या विषयांवर काम करता आले आणि आपण फक्त त्यांच्यासाठी मेहनत करून बनवलेल्या वस्तूंचे त्यांना अप्रूपही वाटे. त्यातच काही मित्रमंडळींनी social mediaवरती प्रतिक्रिया जाणून घेण्यास सुचवले, त्यातून फेसबुक आणि इंस्ताग्रामवर 'कोयरी' या नावाने कलादालन सुरू केले. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून प्रचंड उत्साहाने प्रतिसाद मिळाला. इंस्ताग्राममुळे तर जगातून वेगवेगळ्या राष्ट्राच्या कालकारांकडून हळूहळू प्रतिक्रिया यायला आरंभ झाला. नवीन दिग्गज कारागीर कळले, त्यांच्याकडून आणखी जास्त शिकता आले. भारतीय कलेत पायरोग्राफी थोडी त्यांच्यासाठी वेगळी असल्याने काहींनी स्वतःहून देवाणघेवाणीस प्रवृत्त केले. एकदा वार्निशबरोबर झालेल्या गोंधळात या लोकांशी संपर्क साधला. एका बाईंनी, ना ओळख ना पाळख, पण स्वतःहून त्यांची गौप्य तेलाची कृती व त्याचा डबीभर नमुनादेखील माझ्या घरी पाठवून दिला. सगळ्यांचा हा असा प्रतिसाद मिळतो आहे, तो खरच बहुमूल्य आहे. नवरा त्याच्या शिक्षणात दिवसेंदिवस जास्त गढून जात असल्याने, तो घरी नसतानाचा वेळ मी या छंदाकडे दिला. तसेच एखादा दिवस मी अगदीच जास्त वेळ काम करणार असेन तरी त्याची काही हरकत नव्हती. तरी मी स्वतःहून घर आणि छंद या दोघांना समान प्राधान्य दिले. आता हा फक्त छंद ठेवायचा की त्याचा व्यवसाय करायचा, याचा पूर्ण निर्णय त्याने माझ्यावर सोडला आहे. छंदाचा व्यवसाय व्यावहारिकतेने सांभाळताना आवड जोपासली गेली पाहिजे असा प्रयत्न राहील. सोशल नेटवर्किंगमुळे या कलेतल्या दिग्गजांचे काम घरबसल्या बघता येते. त्यांनी स्वतःहून त्यांची वेगळी निर्माण केलेली रचनाशैली अभ्यासता येते. सुरुवातीला तयार रेखाटने सरावासाठी उपयोगी ठरली. मात्र आता छंद आणि व्यावसायिक शिक्षण यांचा मेळ घालून, पुढे आपली वेगळी अशी शैली विकसित करायचा साध्या प्रयत्न सुरू आहे. यातून थोडी मिळकत झाली तर हरकत नाही, मात्र एक दिवस छोटे का होईना, एखादे प्रदर्शन भरवावे असा मानस आहे. सहज मिळालेल्या वाढदिवसाच्या भेटीबरोबर नवीन काहीतरी शिकताना, जोपासताना, एका वेगळ्या कलेमध्ये हरवताना .. असाच जाळ अन् धूर संगटच ... सैराट...

11

इतर कलाकृती बघण्यास कलादालन: www.facebook.com/koyripyrofolio www.instagram.com/koyri_pyrography

वाचने 47160
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

अप्रतिम. हे असा काही प्रकार असतो हे बिलकुल माहिती नव्हते. तुमच्या फेबु पेजबर जाऊन पाहिले. एकसो एक कलाकृती आहेत. फारच सुंदर.

बाप रे !! चिकाटी आणि कल्पनाशक्तीचं करु तितकं कौतुक कमीच आहे. अप्रतिम देखण्या वस्तु आहेत. यावर एक लेखमाला नक्की काढा. वाचायला फार आवडेल.

काही दिवसांपूर्वी तूनळीवर सहजच एक दुवा बघितला होता. तो पायरोग्राफीसाठी पेन कसे तयार करायचे त्याबद्दल होता. आता हे बघून तर डोळ्यांचे पारणेच फिटले..

म्हणजे मला नक्की सुचत नाहीये की नक्की कसं तुमचं कौतुक करु?!! अहो काय सुंदर कला आहे ही! ती जास्मिन तर पार "ती पाहताच बाला.. " आहे.. ज्या भाग्यवान मुलीला ही पेटी मिळाली तीचा भयानक हेवा वाटला हो.. तुम्ही व्यवसाय म्हणुनच करा हो हे.. आणि इथे नक्की सांगा. मी १००% तुमची पहिली गिर्‍हाईक असेन! फारच आवडला हा लेख!

अफाट आणि अचाट आहे हे सगळं! अशा नावाची एखादी कला असते हेच मुळात माहीत नव्हतं. आणि वाढदिवसाची भेट म्हणून मिळालेल्या गोष्टीतून इतकं काही करणं म्हणजे फारच भारी. हे सगळं पाहिलं की "आपण नक्की आपल्या आयुष्यात काय करत आहोत" असं वाटतं. तुमचं फेसबूक पेजही पाहिलं. कौतुक करायला शब्दच सुचत नाहीयेत. _/\_

"हे सगळं पाहिलं की "आपण नक्की आपल्या आयुष्यात काय करत आहोत" असं वाटतं" हा त्रास मला मिपावर ब-याचदा होतो, आतातर मला वाटतं बहुधा मला याचं व्यसन लागलय.

अफाट! घरातली सगळी लाकडं तुम्हाला आणून द्यावी म्हणतो! ती जास्मिन तर फारच भारी! व्यवसाय सुरु कराच!

अशा अनवट कलेचा ध्यास घेतल्या बद्दल अभिनंदन. तुमची कला उत्तरोत्तर अशीच सुबक जळत राहो आणि नवनव्या डिझाईन उमलोत. हे जरा जाड कागदावर करता येण्यासारखे आहे का?

In reply to by शिव कन्या

होय. जाड कागदावर करता येते. मी एकदा प्रयत्न केला आहे, पण माझ्या पेनाचे कमाल तापमान देखील कागदासाठी अपूरे पडते. कागदावर खूप जास्त तापमानावर, मात्र अगदी हलक्या हाताने वापरावे लागते.

In reply to by मूनशाईन

हे आश्चर्य! मी विचार केला कि कागद लाकडापेक्षा एकदम thin माध्यम आहे तर त्याला कमी तापमान लागणार. हलक्या हाताने पेन वापरावा हे मान्य. पण कागदावर कमाल तापमान ही अपुरे कसे काय पडते? काही कारण? व्य नि पाठवत आहे.

In reply to by शिव कन्या

लाकूड कितीही झाले तरी सच्छित्र मटेरिअल आहे. डेन्सीटी कमी असते. पेपर जरी पातळ असला तरी त्याची डेन्सिटी जास्त असते. एकाच आकारमानाचा (लांबी रुंदी उंची) कागदाचा गट्ठा आणि त्याच आकारमानाचा लाकडाचा ठोकळा उचलून पहा. कळेल. बाकी मी हा पेपरवर पायरोग्राफीचा प्रयोग केलेला नाहीये. पेपरची माहीती असलेने सांगितले.

वेगळीच कला. मला 'पायरोग्राफी' नामक काही असतं हेच माहिती नव्हतं.

दहा बोटे तोंडात या प्रतिक्रिये सारखिच अवस्था . खूपच छान.

द्यावीशी वाटणारी सगळी विशेषणे आधीच्या सर्व प्रतिसादांमध्ये आलेली आहेत! जबरदस्त कला आहे हातात! व्यवसाय कराच, नक्कीच यशस्वी व्हाल!

नविनच काहीतरी पाहायला मिळालय... जास्मिन तर अप्रतीमच

लेख वाचताना वाटत होतं की असं काहीतरी आहे घरी माझ्याकडे. कुंपणीने भेट दिलेले पेन साठीचे स्टँड आहे आणी दुसरी छोटुशी बेसबॉल बॅट पण.

अतिशय सुंदर कला. खूप छान केल्या आहेत सगळ्या कलाक्रुती, विशेषतः जास्मिन अन सैराट फार आवड्ले. इथे चित्रे दिसत नाहीत म्ह्णून तुमचे फेसबूक पेज लाइक करुन पहिलेत सगळे फोटो , केवळ अप्रतिम , फोटोग्राफी पण अगदी प्रोफेशनल आहे. तुमचा या कलेचा प्रवास असाच बहरत राहो. पुढे मागे तुमचे मार्ग्दर्शनपर लेख वाचून हे करुन पाह्ण्याची इच्छा आहे, तेंव्हा लवकर पुढचे लेख येवुद्यात

In reply to by सिरुसेरि

ऍमेझॉन.कॉम वर नक्की मिळते. ऍमेझॉन.इन वरून एका मैत्रिणीने घेतले आहे. मात्र ते अमेरिकन कंपनीचे असल्याने व्होलटेज कनर्वटर लागेल.

माय गॉ ड !!!!!!!! शब्द नाहीत माझ्या कडे तुझ कौतुक करायला, आणी हे मी पहिल्यानदाच पाहतिये अशी काही कलाकुसर करता येते म्हणुण . जबरदस्त गुणी आहेस तु :)

लेख आवडला. एकही चित्र दिसत नाही. घरी जाऊन बघतो.

वाह! केवळ अप्रतिम! मधे फोटोग्राफीवर जशी एक उत्तम लेखमालिका झाली तशी कृपया या कलेबद्दल सुद्धा एक लेखमालिका करावी.

खुप छान लेख. आणि कलाक्रुती लै भारी. हे स्रव मलानव्यान्रकळलेते आहे.