Skip to main content

अर्पणपत्रिका...

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 09/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकांचं एक वेगळं, स्वतःच असं जग आहे हे सगळ्यांना ठाउक आहे. पण या पुस्तकांत सुद्धा एक त्याचाच भाग असलेलं पण तेवढचं स्वतंत्र अस एक जग असतं ते म्हणजे 'अर्पणपत्रिका'... मनात वाटलं या अर्पणपत्रिका, हे जग एकत्र आणलं तर... बस या एका विचाराने हा धागा काढला आहे... मला भावलेल्या आवडलेल्या काही अर्पणपत्रिका मी इथे देत आहे... आपणही या संग्राहात हातभार लावावा अशी विनंती... अर्पणपत्रिका म्हटलं कि सगळ्यात पहिल्यांदा मला जी.ए. आठवतात.. म्हणुन सुरुवात त्यांच्याचकडुन.. ‘हिरवे रावे’ हा कथासंग्रह आपल्या आईला अर्पण करताना जी.ए. म्हणतातः कै. तीर्थरूप ताईस, रात्री उशीरा घरकाम करताना तुला सोबत व्हावी म्हणून लहनपणी मला समोर बसवून तू पुष्कळ कथा सांगितल्यास आता तू गेल्यावर मला त्या कथांची सोबत आहे याच जी.ए.ची मला अत्यंत आवडलेली अर्पणपत्रिका... त्यांच्या ‘रक्तचंदन’ या कथासंग्रहातुन... स्पर्धेच्या धुंदीत आपल्या हातानी आभाळात सोडलेली, पण जिचा मृत्यू असहायपणे खालून पहावा लागला ती गुलाब पाकळ्यांच्या चोचीची चंद्रावळ, मघापर्यंत उत्साहाने पाऊल स्थिर न ठेवणारा पण आकस्मिक वेदनेने तडफडत ओंजळीत निपचिप झालेला, माणके बसवलेल्या कवडशाप्रमाणे दिसणारा लाल डोळ्यांचा पिवळा पक्षी, अजाण संतापाने पाठीवर सपासप वेत मारल्यावरही ते वळ अंगावर घेऊन आपुलकीने अंगाला अंग घासू लागणारी क्षमाशील कृष्णी गाय, आपल्या वासाने पहाट ओली करणारा, पण घरबांधणीच्या वेळी तो काढून टाकायचे ठरताच त्याआधीच दोनचार दिवस आपण होऊन मूकपणे आडवा झालेली पारिजातक, जत्रेमधील फिरते चक्र मला पहायला मिळावे म्हणून मला खांद्यावरून सात मैल घेऊन जाणारा लंगडा हाडकातडी म्हातारा बसलिंग, ‘कसा पोट जाळतो बघा’ असे आईने म्हणताच ताडकन पानवरून उठून तीन मजली बारा खणी घरातून नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडून शेवटपर्यंत एकवस्त्री रहाणारा, लाकडे फोडून पोट भरत असता अर्ध्या गावाला जातिवंत मोत्यांची पारख सांगणारा आणि शेवटी एका धर्मशाळेत शेजारे कुऱ्हाड ठेवून संपून जाण्यापूर्वी मला साबणाचे फुगे कसे करायचे हे शिकवून जाणारा दत्तू इनामदार, आतड्याच्या चोवीस माणसांचे मृत्यू डोळ्यांनी पाहिलेली, आता उरलेल्या दोनचार जिव्हाळ्याच्या माणसांना तरी आपल्या प्रेमापासून मुक्त ठेवण्यासाठी त्यांच्याप्रमाणे मलाही हिडीसफिडीस करण्याची केविलवाणी धडपड करणारी काकाची आई, ‘अरेबियन नाईटस’ मला प्रथम वाचायला देणारा, फुटबॉल खेळण्यासाठी जीव टाकणारा, पण एका अपघातात नेमके दोन्ही पाय गमवून घेतलेला भागिरथ देशपांडे, माझ्या आयुष्यातील पहिली पूर्ण लांबीची शिसपेन मला देणारा रुद्राप्पा बेलीफ, स्वतः निरक्षर असूनदेखील मी खूप शिकावे असे दत्ताजवळ सतत मागणे करणारी, मे पहिलीची परीक्षा पास होताच पै पै जमा केलेले पुष्कळसे पैसे खर्च करून पेढे वाटणारी. ठीकठीकाणी वार लावून जेवणारी, आणि एक दिवस अचानक नाहीशी झालेली, कापऱ्या अंगाची, तोतरी, अनाथ, वेडसर रखमाकाकू यांस…. तुम्ही सगळेच जण पुढे निघून गेलात. मी तुमच्याकडे येईन, पण आता तुम्ही मात्र माझ्याकडे कधी येणार नाही. आपण पुढे पुन्हा कधीतरी भेटू. आता सुशींचा नंबर.. जी.ए. नंतर कुणी उत्तम अर्पणपत्रिका लिहिल्या तर फक्त सुशींनी.. कोवळीक २ री आवृत्ती - चार वर्षांच्या अल्पावधीत ज्यांनी सहस्र करांनी अनुभवाचं विश्व उधळलं-त्या, बी.एम्‌.सी.सी. मधल्या समृद्ध क्षणांना!- रोल नं, वन-फोर-सेव्हन, टी.वाय्‌. 'बी' मधुचंद्र'- विश्वामित्र पाहत असताना 'मेनके' च्या ज्या प्रथम दर्शनाने मला ही कल्पना सुचली, त्या दर्शनाला-अर्थात, 'भानुप्रिया' ला ही, नित्या क्षणी माझ्यासकट सर्वांचाच 'विश्वामित्र' करणाऱ्या सर्व यशस्वी कला-तंत्रज्ञांनाही ! आणि काही दिवसांपुर्वीच मिळालेली गुलझारंच्या 'पुखराज'मधली ही अर्पणपत्रिका.. गुलझार हा संग्रह आपल्या लाडक्या बोस्की अर्थात मेघना गुलझारला अर्पण करताना लिहितात... नज्मोंके लिफाफोंमे कुछ मेरे तजुर्बे है, कुछ मेरी दुंवाए है, निकलोगे सफरपे जब, ये साथ रख लेना, शायद कही काम आए... बस...माझ्याकडच्या या...एवढ्याच!! वाट पाहतोय तुमच्या अर्पणपत्रिकांची... - अनिरुद्ध
लेखनविषय:

वाचने 5592
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

मराठी आठवतील तसे लिहीनच, आतापुरती एक इंग्लिश अर्पणपत्रिका: “I wrote this story for you, but when I began it I had not realized that girls grow quicker than books. As a result you are already too old for fairy tales, and by the time it is printed and bound you will be older still. But some day you will be old enough to start reading fairy tales again. You can then take it down from some upper shelf, dust it, and tell me what you think of it. I shall probably be too deaf to hear, and too old to understand a word you say, but I shall still be your affectionate Godfather, C. S. Lewis.”

या ठिकाणी नाव नसल्यास ज्यांना ज्यांना वाईट वाटेल वा राग येईल अशा सर्वांस - मौनाची भाषांतरे, संदीप खरे

तसाच प्रसंग पडला तर मराठी राजमन साक्षात म्रुत्यूलाही कसं सामोरे जाऊ शकत हे काळाला साक्षी ठेवून, आपल्या असंख्य जललहरींचे नेत्र करून, ज्यांनी तुळापूरी प्रत्यक्ष पाहिले त्या 'इंद्रायणी आणि भीमा' या लोकगंगाना ही 'राजकथा' सश्रद्ध समर्पण! - छावा, शिवाजी सावंत

सर्वसामान्य माणसाला सत्तासंपत्तीप्रतिष्ठा यांपासून वंचित ठेवणाऱ्या शोषणव्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या तमाम छोट्यामोठ्या चळवळींना. प्रवृत्तींना .. ।।नामदेव ।।

" तस्मै श्री गुरवे नम: " या वचनास नुसते बोलुन नव्हे तर , प्रत्यक्षात लिहुन, आपली साहित्य-निर्मिती, त्यांनाच अर्पण केलेली ही ' अर्पण- पत्रिका '. सलाम त्या आदरणीय ' गडकरी ' यांना ! ! माझे परमपूज्य लेखनगुरु स्वतंत्र शक्तीचे नाटककार, प्रतिभासंपन्न कवि व, मार्मिक टीकाकार, कुशल विनोदपंडित व विद्वान निबंधकार— रा. रा. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर बी. ए. एल्एल्. बी. वकील खामगाव. संगीत वीरतनय, मूकनायक, गुप्तमंजूष, मतिविकार, प्रेमशोधन व वधूपरीक्षा या नाटकांचे व सुदाम्याचे पोहे या लेखसंग्रहाचे कर्ते यांस– गुरुवर्य तात्यासाहेब, माझ्यासारख्या विषम स्थितींतल्या असदृश योग्यतेच्या मनुष्याला आपण आज इतकीं वर्षे उदार ह्रुदयाने, बरोबरीच्या व मित्रपणाचा थोर मान देत आला. वेळोवेळीं माझ्या चुकल्या बालबुध्दिला वडीलपणाने सदुपदेश करीत आलां; कधीं कधीं उच्छृंखलपणाने माझ्याकडून आपला उपमर्द झाला असतां त्याचीही बंधूप्रेमाने क्षमाच करीत आलां; आजवर मी लिहिलेल्या वेड्यावकड्या शब्दांचें पितृतुल्य प्रेमाने प्रोत्साहनपर कौतुकच करीत आलां; याप्रमाणें एक ना दोन, हजारों उपकारांचें आज एकसमयावच्छेदेंकरून स्मरण होऊन अंतःकरण कृतज्ञतेने उंचबळून येत आहे ! त्या कृतज्ञतेचे अश्रूच आज मी सानंद भक्तिभावाने आपल्या परमपूज्य चरणीं वाहत आहे. आपलेच लेख वाचून मला हे चार शब्द लिहिता आले. तेव्हा यांत जें चांगलें असेल तें आपलेंच आहे, त्याचा आपण स्वीकार करालच; आणि जें वाईट आहे त्याचें तरी क्षमापूर्ण व उदारतेने कौतुक आपल्या इतकें दुसरें कोण करणार? आपला कृपावभलाषी राम गणेश गडकरी. ‘प्रेमसंन्यासा’ ची ही अर्पणपत्रिका येथे मुद्दाम समग्र उदधृत केली आहे.

सुरेख धागा. -दिलीप बिरुटे

नियम करणार्या, नियम पाळणार्या, आणी नियम मोडणार्या समस्त मनुष्यजातीच्या मजबूरीस... ||नातिचरामी|| - मेघना पेठे.

अप्रतिम धागा. जी ए ची दुसरी अर्पण पत्रिका कधीही वाचली कि डोळे ओलावतातच. 'We Are All Completely Beside Ourselves' या नुकत्याच वाचून झालेल्या कादंबरीची किंचित खट्याळ अर्पणपत्रिका - In memory of the wonderful Wendy Weil, champion of books, animals, and, in both categories, me.

याच विषयावरचे 'अर्पणपत्रिकेतून जीए' हे व्ही. जी. वडेर यांनी लिहिलेले पुस्तक उत्तम आहे.

हटके धागा. ही मला आवडलेली एक ''दुनियादारी''च्या ३ -या आवृत्तीची - त्या सर्व वाचकांना, ज्यांनी ‘दुनियादारी’ विकत घेतली, वाचनालयातून वाचली, मित्राची ढापली, वाचनालयाची पळवली… पण ‘दुनियादारी’वर मनापासून प्रेमच केलं! त्यांनाही, ज्यांनी ‘दुनियादारी’च्या लोकप्रियतेचा मनापासून द्वेष केला! आणि….खेडं, गाव, शहर, नगर, व महानगरातील तमाम ‘कट्टागँग्ज’ना, ज्या ‘दुनियादारी’ जगल्या….जगतात.. जगतील! - सुहास शिरवळकर

In reply to by इनिगोय

पुन्हा सुशि. वास्तविक – आयुष्यातून एक –एक माणूस गळत जाणं, किंवा एक – एक माणसाणं आपल्याला वज़ा करत जाणं… शेवटी, स्वत:साठीची एक शून्य पोकळी, अन त्या पोकळीत स्वतःचाच शोध घेत पोकळीच्या अस्थिरतेन अखेरच्या श्वासापर्यंत भिरभिरत राहाणं ... म्हणजेच अंतिम वास्तव असेल का ? - सुहास शिरवळकर

व.पुं.च्या ही अर्पणपत्रिका उत्तम आहेत. आत कुठेतरी भिडतात, विचार करायला लावतात. सगळ्या नाही पण काही खास इथे देतोय... आपण सारे अर्जुन : संसारात माणसाला काय हवं असत? इंग्रजी भाषेत योग्य शब्द आहे - CONCERN याच्या जोरावर बाकीचे सगळे मतभेत दृष्टीआड करता येतात. यशस्वी संसारच हेच सूत्र आहे, CONCERN हि आवृत्ती त्या संसाराला!! गुलमोहर: काही काही व्यक्तींच्या बाबतीत 'त्याचं आणि तुमचं नातं काय?' असा प्रश्न विचारला जातो. नातेवाईकांकडून फटके खाऊनही नात्याचं महत्व संपत नाही. नुसती मैत्रि एवढ्यावर समाधान होत नाही. मैत्री आणि नातेवाइक यांच्यामध्ये एक धूसर पडदा असतो तो दिसत नाही पण जाणवतो. हा 'गुलमोहर' त्या धूसर जाणीवेला. पुन्हा पास तुमच्याजवळ...

मुकबधीर मुलांना बोलायला शिकवायच्या पद्धतीवर लिहिलेल्या पुस्तकाची अर्पणपत्रिका 'या बोलक्या जगातील मुक्या कळ्यांना व त्यांच्या गुरू माऊलींना'. आपल्या आजूबाजूला किंवा ओळखीत जर कुणी मुकबधीर व्य्क्ती असतील तर लगेच या ओळीचा संदर्भ लागेल.