Skip to main content

गोखल्यांचे सीमोल्लंघन

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 03/09/2016 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
गोखल्यांचे सीमोल्लंघन
गोखले टिळक रोडवरच्या महाराष्ट्र बँकेत होते. बाजीराव रोडला घर आणि दूर टिळक रोडला नोकरी... असं खूप मोठ्ठं सीमोल्लंघन गोखले दररोज करीत असत. आमचे वडिल हे गोखल्यांचे श्रद्धास्थान. आयुष्यातली कोणतीही छोटीमोठी गोष्ट त्यांच्याशी शेयर केल्याशिवाय गोखले रहात नसत. आमच्या वडिलांची दाद त्यांना महत्त्वाची वाटे. वडिलांकडे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे अशीही गोखल्यांची ठाम श्रद्धा होती. त्यांच्या चाललेल्या गप्पा ऐकण्याचा अनेकदा योग येत असे. कधी कधी गोखले भयानक अस्वस्थ होवून विचारीत "काय चाललंय या देशात ? अरे हिंदूंना कुणी वाली आहे की नाही ?" आमचे वडिल अशावेळी फक्त श्रोत्याची भूमिका घेत. कारण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सामान्य माणसाकडे असतेच असे नाही, हे त्यांना ठाऊक होते. एकदा असेच गोखले घरी आले. कुठेतरी हिंदूंवर हल्ला झाल्याची बातमी होती. त्याची चर्चा करत होते. एकदम पेटून उठले आणि म्हणू लागले, "या साल्यांना कापून काढलं पाहीजे, त्याशिवाय हे हरामखोर वठणीवर येणार नाहीत" अर्थात ते बोलले म्हणजे त्यामागे निश्चयाचे सामर्थ्य असणार. बॅकेच्या कामातून रजा घेऊन ते पुण्याबाहेर जातात तेव्हा अशी कापाकापी करायलाच जात असावेत. अशी आमची समजूत होती. जम्मू-काश्मीरात हिंदूच्या हत्या होत होत्या, हिंदूं मुलींना त्रास दिला जात होता आणि नंतर हिंदू काश्मीर सोडून जात होते. त्यावेळी सगळे पेपर याच बातम्यांनी रंगलेले असत. त्या वेळी गोखल्यांचा वडिलांना तळमळून प्रश्न असे "काय चाललंय जम्मू-काश्मीरात ? हिंदू सर्वत्र असाच मार खाणार का ? " अशा वेळी त्यांच्या चेहेर्‍यावरचा आवेश पाहण्यासारखा असे. आता पुढच्याच क्षणाला गोखले तलवार घेवून जम्मू-काश्मीरातल्या दहशतवाद्यांना संपवायला बाहेर पडणार असे वाटे. एकदा ते म्हणाले, "जी गोष्ट महाराजांच्या काळात शक्य होती, ती आज का शक्य होऊ नये ?" "कोणती गोष्ट ?" गोखले म्हणाले "घरवापसी आज का शक्य नाही" आता यावर काय बोलणार. या सगळ्यामुळे लहानपणी बराच काळ माझा पक्का समज होता की गोखले बँकेत देखील बंदूक घेऊन काम करतात किंबहूना हातात बंदूक घेऊन बॅकेच्या दारात अर्थात बँकेच्या सीमेवर लढण्याचीच त्यांची ड्यूटी असावी. हा समज बराच काळ टिकला. पुढे त्याच बँकेत अगदी मायनॉर असताना वडिलांनी खाते उघडून दिले. तेव्हा प्रथम तिथे गेलो. त्यावेळी काऊंटरपलिकडे बसलेले आणि लेखणी हातात असलेले गोखले दिसले. तेव्हा तो समज दूर झाला. अहिंसेच्या तत्त्वज्ञानामुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. असे गोखले नेहमी बोलून दाखवत. अहिंसेची ते नेहमी टिंगलही करत. "गोखले, दाढीचे ब्लेड सोडले तर कुठले शस्त्र कधी हातात घेतले आहे का, कधी कुणाशी साधी मारामारी केली आहे का ?" असे विचारता गोखले काहीच उत्तर देत नसत. कारण रस्त्यावर कुणी भांडलं तर गोखल्यांना घरात घाम फुटतो हे सर्वाना माहीत होते. अर्थात नेहमी देव, देश, स्वधर्म, अखंड हिंदूराष्ट्र या गोष्टीच ते बोलत असत. क्षुल्लक गोष्टी त्यांच्या बोलण्यात कधीही डोकवत नसत. (मिळमिळीत ते अवघे टाकून द्यावे. . .) बरेच दिवस गोखल्यांना आमच्याकडे चक्कर टाकणे जमले नाही. पण एक दिवस ते आले. बोलण्यातही नेहमीचा जोश नव्हता. आमच्या मनात उगाचंच शंका "मूंग्यांनी मेरु पर्वत तर गिळला नाही ना, हिंदूंनी पुन्हा कुठेतरी सपाटून मार तर खाल्ला नाही ना, हिंदूस्थानची पुन्हा एखादी फाळणी तर झाली नाही ना, मग गोखले तुमचा चेहेरा असा निस्तेज का" मग ते सांगू लागले, "अहो फार मोठं राजकारण झालं हो. आता बघा आमच्या बँकेत एवढे लोक आहेत पण सगळ्यांना सोडून साहेबांनी माझीच बदली केली. पार लांब टाकून दिलं" नेमकं याच काळात आमच्या छोट्या काकांना त्यांच्या बँकेने प्रमोशन दिले आणि लांब बदली केली कानपुरला. ते तिकडे जॉइनही झाले. असाच प्रकार असणार. गोखले अटकेपार झेंडे फडकवणार असे वाटू लागले. म्हणून त्यांना विचारले कुठे झाली बदली. ते म्हणाले लांब तिकडे पुलाच्या पलिकडे शिवाजीनगरच्या लोकमंगल ब्रांचला. यावर वडिलांचा प्रश्न "बरं मग" गोखले म्हणाले, "अहो, बरं मग काय ? पूर्वी मी बाजीराव रोडच्या घरून चालत जरी निघालो तरी टिळक रोडच्या ब्रांचला २० मिनिटात पोचत असे. मधल्या सुटीत जेवायला घरी येत असे. बायकोच्या हातच्या गरमागरम पोळ्या खात असे. पण आता ते शक्य नाही हो" ashutoshjog@yahoo.com
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9851
प्रतिक्रिया 55

प्रतिक्रिया

ता क गोखले कुणाला भेटल्यास आम्हालाही भेटवावे

In reply to by आशु जोग

"गोखले, दाढीचे ब्लेड सोडले तर कुठले शस्त्र कधी हातात घेतले आहे का, कधी कुणाशी साधी मारामारी केली आहे का ?" असे विचारता गोखले काहीच उत्तर देत नसत. कारण रस्त्यावर कुणी भांडलं तर गोखल्यांना घरात घाम फुटतो हे सर्वाना माहीत होते. असे हे गोखले, तळमळून हिंदू सर्वत्र असाच मार खाणार का ? " या प्रश्नाणे आवेशात येऊन, एका हिंदू संघटनेत सामील झाले, हा सुद्धा कलियुगातील एक चमत्कारच होय....

पहिल्याच वाक्याला टाळ्या! दुसऱ्या वाक्याला खो खो... ही ही.. हे... हे आणि हेच शेवटपर्यंत कंटूनि! Sandy

लोल! असेच एक 'गोखले' माझ्या मित्राचे आतोबा आहेत. त्यांनी निवृत्तीआधीच्या शेवटच्या वर्षी निश्चय केला होता की "मस्टरवर सहीसाठी सोडून पेनाला हात लावणार नाही." हा निश्चय कसा पाळणार याची मला फारच उत्सुकता. कारण त्या ब्यांकेसारख्या कीर्द खतावण्यांनी माखलेल्या जगात पेन ना वापरता काम कसं करणार? ('जिव्हाळ्याचा ब्यांके'त कोअर बँकिंग यायचं होतं.) तर आतोबांनी "मे आय हेल्प यू"च्या पिंजऱ्यात स्वतःची बदली करवून घेतली!

मोठ्या आशेने धागा उघडला.गोखले गृहउद्योगाचे दाढीवाले मालक कुठल्या शिरेलीत कसा तोच निर्ढावलेला चेहरा ठेवून कसे गोग्गोड सूड काढणार नदीपलीकडून याबद्दल असेल वाटलं होतं.

लेख खुसखुशीत आहे. तोयबाला प्रत्युत्तर म्हणून काही वर्षांपूर्वी पुण्यात, कुठल्याशा पेठेतून शनवारवाड्यापर्यंत 'लष्कर-ए-शिवबा' असा मोर्चा निघाला होता म्हणे. त्याची उगाचच आठवण झाली :)

In reply to by पगला गजोधर

दुपारी १२ ते ४ यावेळेत संपर्क करू नये, अन्यथा अपमान करण्यात येईल.

In reply to by पगला गजोधर

त्यांचं मुख्य अस्त्र "अपमान करने" असावे बहुदा. पाकिस्तानात जाऊन त्यांचा अपमान करून दंगल घडवून आणणे हा मुख्य हेतू असावा.

In reply to by पगला गजोधर

वरील पत्त्यावर कार्यालय आहे, प्रेक्षणीय स्थळ नाही, उगाच डोकावून पाहू नये, व नसत्या चौकशा करू नये. सुज्ञ व्यक्तीनीं कार्यालयाच्या दारासमोर वाहने उभी करू नये. केल्यास कठोर कायदेशीर कार्यवाही करणेत येईल. आदेशावरून

मस्त लिहिलंय. फक्त ते एचटीएमएल फॉर्म्याटींगमुळे निळी अक्षरे वाचायला त्रास होतोय. नका करत जाऊ असले प्रयोग.

जबरदस्त व्यक्तिचित्रण जबरदस्त तुम्ही अस सहसा लिहीत नाही ना म्हणजे मी तरी पहील्यांचाच वाचलय तुम्ही अगोदर काही व्यक्तिचित्रणे लिहिलेली आहेत का ?

किस्सा फारच मनोरंजक लिहला आहे . अशा गोष्टीना मना पासून दाद मिळणार यात शंकाच नाही . मात्र कधी कधी चमत्कारिक अनुभव देखील वाट्याला येतात . चित्रपटात एखादा क्रूर पोलीस इन्स्पेक्टर असावा कि ज्याचे नाव "गोखले" असावे थोडे विसंगत वाटते ." शेवटी असा कोणी गोखले आपणास भेटलोय का ? तर याचे उत्तर " सुदैवाने नाही " पण ज्यांच्या बद्दल ऐकले ते सर्व याला अपवादच ठरले . म्हणजे त्यातील" एक गोखले" कि त्यांची न्याय प्रतिष्ठा इतकी होती कि ,सर्व थरातील लोंकानी त्यांच्या नावे एक प्रसिद्ध विद्यालय काढले तर दुसऱ्या गोखल्यानी तर कमालच केली .बांगला देशाच्या युद्धात एक चौकी लढवताना धारातीर्थी पडले .

In reply to by Sanjay Uwach

'अज्ञात आडनावे" असं नाव बदलून घेऊया का मुख्य पात्राचं?

In reply to by संदीप डांगे

एवढं तरी कशाला, फक्त " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " व्यक्ती म्हणा, कारण यांच्यामते जगात दुसरे कोणतेही लोकं " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " नसावीत कदाचित

In reply to by Sanjay Uwach

खरंय संजय तुमचं पण एवढे दुखावून घेऊ नका आमचेही अनुभव खरेच असतील ना फक्त टाळ्यांसाठी नसतील ना

गोखल्यांचे सख्खे भाऊ शोभतील असे माझे आतोबा. ते संघस्वयंसेवक होते .ह्यातभर गणवेश-दंड -टोपी या वेशात ध्वज;प्रणाम आणि प्रात :कालीन शाखा त्यांनी कधीही चुकवली नाही. निरलस सेवाभावी आणि मेहनती कार्यकर्ते, पण मुलखाचे घाबरट .एकदा मी रिक्षावाल्याशी वाद घालताना पाहून तेच भयानक घाबरून म्हणाले "वाद घालू नकोस अश्या लोकांशी , तू एकटी असलीस तर तो काहीतरी करायचा उगीच". तात्पर्य..... समजून घ्यावे.

अवांतर : संजय उवाच, तुमच्या प्रतिसादावरून तीन गोखले स्मरले. पहिले उत्तरपेशवाईतले सुप्रसिद्ध सरदार बापू गोखले. त्यांनी चौदाव्या वर्षी सरदार विंचूरकरांचा पराभव केला. दुसऱ्या बाजीरावाच्या रक्षणार्थ झालेल्या आष्टीच्या लढाईत ते धारातीर्थी पडले. दुसरे गोखले म्हणजे दादर (मुंबई) चे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार गोखले. त्यांना एप्रिल १९८४ च्या हिंदूमुस्लिम दंगलीत दाऊदच्या गुंडांकरवी वीरमरण आलं. तिसरे गोखले म्हणजे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले. हे अद्यापि हयात आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माफ करा, हा धागा हलका फुलका विनोदी वाटतोय मला, उगाच काही लोक त्याला जातीय अस्मितेची खरूज खाजवून वादग्रस्त करत आहे. काही नामोलेख्ख आहेत ते केवळ साहित्यिक समजावेत, राहता राहिले आडनाव, तर महात्मा गांधीचे गुरु, ना गोपाळ कृष्ण गोखले, यांच्या सारखं इतिहासाला दिशा देणारे व्यक्तिमत्व भारतामध्ये अढळ स्थानावर आहे,

गोखलेवर खार का खाऊन आहात तुम्ही? गोखलेंच्या एखाद्या लेकीने तुमचा अपमान केल्याचा बदला म्हणून हा लेख तर नव्हे ना ? आपले साधे सरळ नाना, आण्णा, तात्या अशी अजातीय टोपणनावे वापरून पण हा लेख लिहिता आला असता कि. पुढे तसे करा हि विनंती. बाकी धाग्यात फेरफार करता येऊ नयेत म्हणून या format मध्ये टाकण्याची कल्पना चांगली आहे.

मी काय म्हणतो, गोखले हे बरंच प्रचलित व प्रसिद्ध आडनाव वापरल्याने अनेकांना त्रास झालेला दिसतोय, त्यापेक्षा माझं डांगे हे आडनाव वापरा, माझ्या भावना काही दुखावणार नाहीत, ज्यांच्या दुखवल्यात त्यांची सुटका होईल, संपादकांना सांगून बदल करून घ्या, मी गंभीरपणे बोलतोय,चेष्टा नाही.

In reply to by संदीप डांगे

आता माणूस म्हटला की त्याला आडनाव आलंच. डांगे वातावरण काही नाही तापत. इथले सर्व सदस्य आणि संपादक अगदी परिपक्व आहेत. तुम्ही इथे नवीन आहात का...