Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मार्मिक गोडसे on Tue, 08/30/2016 - 16:17
टीव्ही ,रेडिओ ,वर्तमानपत्रातून आपण देशातील काळ्या पैशाबदल ऐकत असतो, वाचत असतो. काही राजकीय नेते छातीठोकपणे देशातील काळ्या पैशाचे आकडेही सांगत असतात व ह्यातील बराचसा पैसा स्विस वा अन्य विदेशी बँकांमध्ये ठेवला गेला आहे ह्याची आकडेवारीही सांगतात. हे प्रचंड आकडे ऐकून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची छाती दडपून जाते व डोळे पांढरे होऊन जातात. मधेच कोणीतरी सोम्या गोम्या उठतो आणि हा परदेशात गेलेला काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन देतो. परदेशातून हा काळा पैसा देशात आल्यावर आपली अर्थव्यवस्था कशी गुटगुटीत होईल, लोकांना नवीन कर लावले जाणार नाही अशी स्वप्ने दाखवतो. हे ऐकून सर्वसामान्य माणूस खुश होतो. तरीही त्याला नेहमी प्रश्न पडत असतो,की हा काळा पैसा येतो कुठून ? किंवा तो ओळखायचा कसा ? रिझर्व्ह बँक ही संस्था ठरवते की किती नोटा छापायाच्या किंवा रद्द करायच्या. रिझर्व्ह बँकेने बाजारात वितरीत केलेल्या ह्या नोटा अधिकृत समजल्या जातात. काळा पैसा हा वेगळा छापला जात नाही तो ह्या अधिकृत छापलेल्या पांढऱ्या पैशातूनच तयार होता असतो. तो कसा तयार होतो हे समजण्यासाठी प्रथम काळा पैसा म्हणजे काय ? हे जाणून घेणे गरजेचे आहे. ज्या आर्थिक व्यवहाराची कागदोपत्री किंवा डिजिटली नोंद होत नाही अशा अनधिकृत व्यवहारातून तयार होणार्‍या पैशाला काळा पैसा म्हणतात. आपणही नकळत काळ्या पैशाला जन्म देत असतो. उदा. बँकेतून पैसे काढून आपल्या गाडीने निघत असताना आपण वाहतुकीचा नियम तोडल्यास पोलिसाने दंडाची पावती फाडू नये म्हणून त्याला चिरीमिरी देतो तेव्हा आपल्या हातातील पांढरा पैसा क्षणात काळा झालेला असतो. असेच आपण जमिनीचे, घराचे व सोने खरेदीचे व्यवहार रोखीने करतो व अधिकृत पावती घेत नाही तेव्हाही काळ्या पैशाच्या वाढीला हातभार लावत असतो. काळ्या पैशाची एक समांतर अर्थव्यवस्था आहे बिल्डर,सिनेसृष्ष्टी, हिरे व्यापार, क्रिकेटचे सामने ई . मध्ये प्रचंड प्रमाणात काळा पैसा वापरला जातो. हा पैसा बँकेत ठेवता येत नाही (लॉकर अपवाद ).त्या पैशाने अधिकृत व्यवहार करता येत नसल्यामुळे सरकारचा कररूपाने मिळणारा महसूल बुडतो. ह्या पैशाच्या विरुद्ध बोलणार्‍या राजकारण्यांकडेही मोठ्या प्रमाणात काळा पैसा असतो. मोठ्या उद्योगपतींप्रमाणे ह्यांचेही स्विस बँकेत खाते असते, जेथे हा काळा पैसा ठेवला जातो. हा पैसा अनेक मार्गाने परदेशात पाठवला जातो. त्यापैकी हवाला हा एक मार्ग आहे. हवालाचे व्यवहार कसे केले जातात? हा एक गुप्त व विश्वासावर चालणारा व्यवहार आहे. समजा भारतातील व्यक्तीने 100 कोटी रोख रुपये ह्या इथल्या हवाला एजंटकडे दिले तर तो त्या रुपयाचे विदेशी चलनात (त्याचे कमिशन वजा करून ) डॉलर किंवा पौंडात रूपांतर करतो व परदेशात इच्छित स्थळी पोचवतो. ते पैसे स्विस बँकेत त्या विदेशी चलनात ठेवले जातात. संपूर्ण व्यवहारात प्रत्यक्षात कुठेही भारतीय चलन (रुपया) देशाबाहेर जात नाही. म्हणजे 100 कोटी रुपये आपल्या देशातच राहतात फक्त काळ्या पैशाचे हस्तांतरण होते. स्वीस बँकेत ठेवलेल्या पैशाचा उपयोग परदेशात पर्यटन, हॉटेल खर्च, महागड्या खरेदी , बेटिंग,मॅच फिक्सिंग ई. साठी वापरला जातो. काही पैसा रितसर मार्गाने पांढरा होऊन शेअर मार्केट,जमीन खरेदी, वायदे बाजार ई.साठी वापरला जातो. खरोखरच उद्या स्विस बँकेतील पैसा भारतात पांढरा बनून आला तर काय होईल? आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. शीर्षकात म्हटल्या प्रमाणे आपल्या देशातील एकही रुपया बाहेर गेलेला नाही . स्विस बँकेतून मिळणार पैसा हा विदेशी चलनात असणार.त्यामुळे विदेशी चलनाचे रुपयात रूपांतर करण्यासाठी बाजारातला पैसा वापरावा लागेल. ती अशक्य कोटीतील गोष्ट आहे. परकीय गंगाजळी भरमसाठ फुगल्यामुळे रुपया व डॉलर/पौंड ह्याच्या विनिमय दरावर परिणाम होईल. रुपया मजबूत झाल्यामुळे निर्यात परडवणार नाही. परदेशी गुंतवणूक होणार नाही. म्हणजे धरलं तर चावतंय व सोडलं तर पळतंय अशी गत होईल. खरं तर हा पैसा स्विस बँकेत असल्यामुळे फार काही तोटा होत नाही, परंतु देशात तो काळ्या स्वरूपात तयार होतो व वावरतोय ह्यापासून आपल्या अर्थव्यवस्तेला खरा धोका आहे. सरकारने आपली शक्ती इथे वापरली पाहिजे, ते आपल्या हातात आहे व शक्य आहे. देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपण ह्याला नक्कीच रोखू शकतो. लेख बराच विस्कळीत झाला ह्याची जाणीव असल्यामुळे काळा पैसा पांढरा कसा होतो व हवाला विषयी विस्तृतपणे पुढे कधीतरी.
  • Log in or register to post comments
  • 42786 views

प्रतिक्रिया

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Wed, 08/31/2016 - 08:07

In reply to मेरे जैसे नादान और भी होंगे.. by वामन देशमुख

Permalink

नादान क्रमांक 3 प्रेझेन्ट सर!

नादान क्रमांक 3 प्रेझेन्ट सर!
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Wed, 08/31/2016 - 10:41

In reply to नादान क्रमांक 3 प्रेझेन्ट सर! by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

मै

बी कतार मे! नादां क्रं ४ ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Fri, 09/09/2016 - 17:33

In reply to मै by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

मी पण

क्र. ६४४०
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 08/31/2016 - 08:23

Permalink

लेख आवडला. अजुन वाचायला आवडेल

लेख आवडला. अजुन वाचायला आवडेल. पुभाप्र... धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 08/31/2016 - 09:24

Permalink

चूक क्र. ३

भारतातील व्यक्तीने 100 कोटी रोख रुपये ह्या इथल्या हवाला एजंटकडे दिले तर तो त्या रुपयाचे विदेशी चलनात (त्याचे कमिशन वजा करून ) डॉलर किंवा पौंडात रूपांतर करतो व परदेशात इच्छित स्थळी पोचवतो. ते पैसे स्विस बँकेत त्या विदेशी चलनात ठेवले जातात. संपूर्ण व्यवहारात प्रत्यक्षात कुठेही भारतीय चलन (रुपया) देशाबाहेर जात नाही. म्हणजे 100 कोटी रुपये आपल्या देशातच राहतात फक्त काळ्या पैशाचे हस्तांतरण होते.
अहो पण हे विदेशी चलन आणि तेही एवढ्या मोठ्या प्रमाणात हवाला एजंटकडे येणार कुठून? शिवाय १०० कोटी रोख ही रक्कम एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी हलवणार कशी? ते जाऊ दे. मुख्य प्रश्न हा आहे की ज्या परकीय चलनात मला हे पैसे रूपांतरित करुन हवे आहेत तेवढे पैसे मला हवाला एजंट कुठून आणून देणार आहे? बरं, यात इतरही गैरसोयी आहेत. आता भारतीय रूपया आणि अमेरिकन डाॅलर यांचा विनिमय दर हा बाजारपेठेनुसार ठरतो. या हवाला एजंटने मला बाजारापेक्षा कमी दर द्यायला हवा, कारण तरच माझा फायदा आहे. पण मग एजंटचा किंवा त्याला हे परकीय चलन उपलब्ध करुन देणाऱ्याला कुठे फायदा होतोय?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 09:49

In reply to चूक क्र. ३ by बोका-ए-आझम

Permalink

माझ्या अल्प माहितीनुसार हवाला

माझ्या अल्प माहितीनुसार हवाला रॅकेट हे कुटुंबीय चालवतात, दोन भाऊ , एक इकडे एक बाहेर, आपण इकडच्या भावाकडे पैसे द्यायचे तो तिकडच्या भावाला मिळाल्याचे सांगतो, मग तिकडचा भाऊ आपल्या स्वतः जवळचे पैसे संबंधिताला देतो, थोडक्यात बँकेसारखं, आपण कोणत्याही शाखेत पैसे भरून कोणत्याही शाखेतून काढू शकतो तसे, फक्त ह्या व्यवहारांची सरकारी नोंद नसते,
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 08/31/2016 - 10:03

In reply to माझ्या अल्प माहितीनुसार हवाला by संदीप डांगे

Permalink

कुटुंबं आहेत हवाला व्यवसायात

पण हा व्यवसाय मुंबईत तरी आंगडियांमुळे (couriers) भरभराटीला आला, विशेषतः १९८८ ते १९९३ या काळात. हवाला या शब्दाचा अर्थच विश्वास असा आहे आणि गल्फ देशांमधून भारतात मार्केट रेटपेक्षा जास्त दराने पैसे पाठवण्यासाठी त्याचा उपयोग व्हायला लागला. सध्या त्याचा वापर हा untraceable cash packets पाठवण्यासाठी करतात. मुंबई पोलिसांच्या EOW (Economic Offenses Wing) ने जुलै २००७ च्या लोकलगाड्यांमधल्या स्फोटांनंतर हवाला व्यवहारांवर कडक कारवाई केली कारण या स्फोटांसाठी मारेकऱ्यांना मिळालेले पैसे हवाला पद्धतीने पाठवण्यात आले होते. त्यामुळे ज्याला homegrown terror म्हणतात, त्यांना पैसे मिळायचा मार्ग बंद झाला. त्यामुळे पाकिस्तानी ISI ने २००८ च्या मुंबई हल्ल्यासाठी पाकिस्तानी फिदायीनना पाठवलं असावं - असं मला वाटतं मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ए.एन.राॅय यांच्या मुलाखतीत वाचलं होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 10:19

In reply to कुटुंबं आहेत हवाला व्यवसायात by बोका-ए-आझम

Permalink

आंगडीया हे देशांतर्गत

आंगडीया हे देशांतर्गत व्यवहारासाठीच वापरले जातात असं मला वाटतं-चूक असू शकेल,
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 08/31/2016 - 12:02

In reply to आंगडीया हे देशांतर्गत by संदीप डांगे

Permalink

देशांतर्गत व्यवहारांसाठीच.

पण त्यात हवाला व्यवहारांची भारतातील बाजूही समाविष्ट होती.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 12:07

In reply to देशांतर्गत व्यवहारांसाठीच. by बोका-ए-आझम

Permalink

असणारच. इट्स अ कॉन्ग्लोमेरेट!

असणारच. इट्स अ कॉन्ग्लोमेरेट!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 09:58

In reply to चूक क्र. ३ by बोका-ए-आझम

Permalink

आणि दुसरा प्रश्न volume चा तर

आणि दुसरा प्रश्न volume चा तर, 100 कोट रुपये माफियांसाठी चिल्लर खुरदा आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 09:59

In reply to चूक क्र. ३ by बोका-ए-आझम

Permalink

बाजारातल्या दरापेक्षा कमी रेट

बाजारातल्या दरापेक्षा कमी रेट मिळणे यापेक्षा कर वाचवणे जास्त फायदेशीर आहे, कधीही!
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 09/02/2016 - 11:38

In reply to चूक क्र. ३ by बोका-ए-आझम

Permalink

चूक २. हवाला आणि स्विस बँक

चूक २. हवाला आणि स्विस बँक किंवा इतर टॅक्स हेवन्स
हवाला हा परदेशात आणि परदेशातून पैसे पाठवण्याचा मार्ग आहे हे मान्य पण ती बँकिंगशी समांतर आणि बेकायदेशीर व्यवस्था आहे. स्विस बँक किंवा इतर बँकांमध्ये पैसा हवाला पद्धतीने जात नाही.
लेखात हा पैसा अनेक मार्गाने परदेशात पाठवला जातो. त्यापैकी हवाला हा एक मार्ग आहे. असे स्पष्ट लिहिलेले असताना ' इतर टॅक्स हेवन्स ' तुम्हाला कुठे आढळले? लेखाच्या शेवटी लेख बराच विस्कळीत झाला ह्याची जाणीव असल्यामुळे काळा पैसा पांढरा कसा होतो व हवाला विषयी विस्तृतपणे पुढे कधीतरी. अशी तळटीप टाकलेली होती त्यामुळे पुढे त्या विषयावर सविस्तर चर्चा करता आली असती. असो.. हवालावर तुम्ही वर एका प्रतिसादात कुठ्लीही लिंक न देता सोप्या भाषेत उदाहरण देऊन छान लिहीले आहे. त्यामुळे हवालावर सविस्तर लिहिण्याचे माझे कष्ट वाचले.
अहो पण हे विदेशी चलन आणि तेही एवढ्या मोठ्या प्रमाणात हवाला एजंटकडे येणार कुठून? शिवाय १०० कोटी रोख ही रक्कम एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी हलवणार कशी? ते जाऊ दे. मुख्य प्रश्न हा आहे की ज्या परकीय चलनात मला हे पैसे रूपांतरित करुन हवे आहेत तेवढे पैसे मला हवाला एजंट कुठून आणून देणार आहे?
एजंट लोकं हवालाबरोबर ईतर काही उद्योगही (कायदेशीर व बेकायदेशीर) करत असतात. त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पैसा उपलब्ध असतो व त्यांचे हवाला जाळे फार मोठे असते. संपूर्ण व्यवहारात प्रत्यक्षात कुठेही भारतीय चलन (रुपया) देशाबाहेर जात नाही असे मी लेखात लिहिले आहे. खरं तर दोन्हीकडच्या देशातील चलन प्रत्यक्षात हलत नाही. त्यामुळे देशातील चलन कमी (Quantity ) होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Fri, 09/02/2016 - 19:34

In reply to चूक २. हवाला आणि स्विस बँक by मार्मिक गोडसे

Permalink

चर्चा अजूनही होऊ शकते.

स्विस बँक हा शब्द तुम्ही tax haven याच अर्थाने वापरला आहे असं प्रतिसादावरुन वाटलं. म्हणून तसा उल्लेख केलेला आहे. फक्त स्वित्झर्लंडमधल्या बँका तुम्हाला अभिप्रेत होत्या असं वाटलं नाही. बाकी, परदेशात भारतीय पैसा पाठवायला हवाला फार कमी वापरला जातो. हवाला पद्धतीचा जास्तीत जास्त वापर हा भारतात पैसा पाठवायला होतो आणि सामान्य माणूस हवाला वापरण्याचं कारण बाजारभावापेक्षा जास्त भाव परकीय चलनाला मिळतो म्हणून. हवाला आॅपरेटर्सना भारतीय चलनाची एवढी गरज नाही. त्यांना डाॅलर्स, रियाल, दि-हाम वगैरे चलन हवं असतं, कारण या देशांत (अमेरिका, सौदी अरेबिया, यु.ए.ई.) परकीय चलनावर कडक निर्बंध आहेत आणि अंमलबजावणीही कडक आहे. हे लोक सौदीत काम करणाऱ्या भारतीय माणसाकडून त्याला पगार म्हणून मिळालेले रियाल घेऊन त्याच्या भारतातील कुटुंबाला बाजारभावापेक्षा जास्त दराने रुपये देतात. हे पैसे जर त्याच्या कुटुंबाने बँकेत ठेवले, तर तो पांढरा पैसा आहे, आणि जर खर्च केले (जे बहुतेकवेळा होतं) तर तो काळा पैसा आहे. इकडे त्या सौदीतल्या हवाला आॅपरेटरला रियाल मिळाले, जे तो डाॅलर्समध्ये रूपांतरित करेल - पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने आणि ते डाॅलर्स मग अनेक बेकायदेशीर कामांसाठी वापरले जातील. इथे हा हवाला आॅपरेटर रियाल मिळावेत म्हणून हे सगळं करतोय कारण सौदी रियाल सौदी अरेबियाच्या बाहेर नेण्यावर कडक निर्बंध आहेत. त्याला हे करून रियाल सहजपणे उपलब्ध होतात. ज्याने रियाल दिले तो काही बोलणार नाही आणि त्याच्या भारतातील कुटुंबाला बाजारभावापेक्षा जास्त पैसे मिळाल्यामुळे तेही खूष. मधल्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं कारण भारतात परकीय चलन येत नाही, जरी भारताच्या एका नागरिकाने काम केलेलं असलं तरीही. शिवाय भारतात या रकमेची कुठेही नोंद नसतेच. भारतातील कुटुंबियांनी जर खरेदी केली तर अप्रत्यक्ष कर तेवढा मिळतो. आता या कुटुंबाला भारतातील हवाला आॅपरेटर जे पैसे देतो, ते गुन्हेगारी कारवायांमधून मिळवलेले पैसे असू शकतात. हे पैसे एखादा अधिकृत आणि कायदेशीर व्यावसायिक आपला खर्च म्हणून दाखवतोय - असंही होऊ शकतं. पण हवाला आणि टॅक्स हेवन्स यांचा संबंध अत्यंत दूरदूरचा आहे. नाही म्हणलं तरी चालेल.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 09/02/2016 - 19:45

In reply to चर्चा अजूनही होऊ शकते. by बोका-ए-आझम

Permalink

सहमत, हवाला आणि टॅक्स हेवन

सहमत, हवाला आणि टॅक्स हेवन दोन वेगळ्या संकल्पना आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 09/02/2016 - 20:48

In reply to चर्चा अजूनही होऊ शकते. by बोका-ए-आझम

Permalink

स्विस बँक हा शब्द तुम्ही tax

स्विस बँक हा शब्द तुम्ही tax haven याच अर्थाने वापरला आहे असं प्रतिसादावरुन वाटलं.
नाही हो,असा कोणताही प्रतिसाद मी दिलेला नाही. तुम्ही दिलेल्या उदाहरणात भारतातील कुटुंबाला रोखीत मिळालेला पैसा बँकेत ठेवल्यास तो पांढरा कसा होणार?
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 09/03/2016 - 00:09

In reply to स्विस बँक हा शब्द तुम्ही tax by मार्मिक गोडसे

Permalink

बँकेत ठेवल्यावर त्याची नोंद होणार.

बँक कशाला विचारेल की हे पैसे कुठून आलेत? समजा, या माणसाने आपल्याला सौदीमध्ये मिळालेला पगार सौदीमध्येच एखाद्या भारतीय बँकेच्या NRE account मध्ये भरला तर या माणसाच्या कुटुंबाला तो पगार रुपयांमध्ये उपलब्ध होईल आणि हा रियाल- रूपया रेट कायदेशीर असेल. जेव्हा हवाला व्यवहार होतो तेव्हा पैसे NRE account मध्ये भरले जात नाहीत त्यामुळे त्यातून झालेलं withdrawal हे समजून येत नाही आणि हे परकीय चलन RBI ला मिळत नाही. जेव्हा हा पैसा हवाला व्यवहाराने भारतात येतो तेव्हा त्याची कुठेही नोंद नसते. ज्या कुटुंबाला पैसा मिळालाय त्यांनी जर तो बँकेत ठेवला तर त्याची नोंद होते. Remittance म्हणून हे पैसे IT returns मध्ये दाखवले की पैसा पांढरा झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by अमितदादा on Sat, 09/03/2016 - 06:15

In reply to बँकेत ठेवल्यावर त्याची नोंद होणार. by बोका-ए-आझम

Permalink

तुमचा मूळ प्रतिसाद

तुमचा मूळ प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. परंतु वरील प्रतिसादातील काही वाक्ये परस्परविरोधी आहेत, कारण हवाला मार्गे आलेल्या पैशाची जर RBI कडे remmitance ची नोंद नसेल होणार तर तो पैसे बँकेत ठेवून IT रिटर्न मध्ये remmitance म्हणून कसा दाखवायचा ? कारण भारतात राहून भारतातील बँकेत ठेवलेला पैसा कसा remmitance म्हणून दाखवणार ?
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 09/03/2016 - 10:53

In reply to तुमचा मूळ प्रतिसाद by अमितदादा

Permalink

हो. हाही एक मुद्दा आहे.

पण IT returns मध्ये remittance म्हणून पैसे दाखवायला ते RBI किंवा अधिकृत बँकेमार्फतच पाठवायला हवेत असा नियम आहे का? तसं असेल तर ठीक आहे, पण नसेल तर एखाद्या बरोबर काम करणाऱ्या आणि भारतात आलेल्या मित्रामार्फत पाठवले असं पण सांगू शकतो. तसंही IT inquiry येण्याएवढे पैसे कुणी एकरकमी पाठवत असेल असं वाटत नाही. अर्थात हा माझा तर्क आहे. नियम वेगळे असू शकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sat, 09/03/2016 - 11:01

In reply to हो. हाही एक मुद्दा आहे. by बोका-ए-आझम

Permalink

रेमिटन्सचे पैसे भारतात असेच

रेमिटन्सचे पैसे भारतात असेच पाठवून दिले इतक्या सोप्या पद्धतीने बॅन्केत जमा होणार नाहीत. तसे झाले तर गोंधळ माजेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अमितदादा on Sat, 09/03/2016 - 11:26

In reply to हो. हाही एक मुद्दा आहे. by बोका-ए-आझम

Permalink

मलाही नियम नाही माहित पण मला

मलाही नियम नाही माहित पण मला नाही वाटत हे शक्य असेल ते करणं आजकाल बहुतांश बँक अकाउंट PAN अथवा आधार कार्ड शी संलग्न आहेत त्यामुळे IT डेपार्टमेंट तुमचे remmittance डिटेल्स सहज चेक करू शकतात. तसेच खाली लिहलेली भारत सरकार ची import regulation पहा, तुम्ही मित्रातर्फे किंवा स्वतः सुद्धा भारतीय पैसा परदेशातून आणू शकत नाही. Foreign currencies : unlimited. However, amounts exceeding USD 5,000.- (or equivalent) in cash, or USD 10,000.- (or equivalent) in traveller's cheques must be declared; Local currency (Indian Rupee-INR): Import of INR is prohibited, except for residents of India importing up to INR 7,500.- Foreign currencies include currency notes, traveller's cheques, cheques, drafts etc. (Re)exchange only through banks and authorized money exchange points. तसेच हवाला मध्ये actual currency transfer होतच नाही. असो तुमचा मुद्दा समजला, मलापण संभ्रम आहे ह्या विषयी.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 09/03/2016 - 13:57

In reply to हो. हाही एक मुद्दा आहे. by बोका-ए-आझम

Permalink

केवळ IT return मध्ये उत्पन्न

केवळ IT return मध्ये उत्पन्न (आलेले पैसे) दाखवले म्हणजे ते योग्य उत्पन्न होत नाही. म्हणुनच, IT return विवरणात उत्पन्नाचा स्त्रोत (सोर्स ऑफ इनकम) नोंदवावा लागतो. अवैध उत्पन्न असणे गुन्हा आहेच, पण उत्पन्नाचा खरा स्त्रोत लपवून दुसराच काही सांगणे हाही गुन्हा आहे. अवैध मार्गांनी (यात हवाला व इतर अनधिकृत नॉन-बँकिंग मार्गही येतात) परकीय किंवा भारतिय चलन भारतात आणणे किंवा भारताबाहेर नेणे गुन्हा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Tue, 09/06/2016 - 21:10

In reply to बँकेत ठेवल्यावर त्याची नोंद होणार. by बोका-ए-आझम

Permalink

ट्रॅक करणं अवघड आहे

मुंबई, पुण्यात बऱ्याच सोनारांकडे करन्सी एक्सचेंज करून मिळते, जिथे XOOM किंवा तत्सम मार्गांपेक्षा जास्त दर मिळतो. त्याची कुठलीही रिसिट नसते किंवा नोंद नसते कारण संपूर्ण व्यवहार रोखीत होतो. समजा एक कुटुंब (४ लोक) अमेरिकेतून मुंबईला सुट्टीवर आलं. कायद्याने प्रतिमाणशी $३००० रोख नेता येते. जर ह्या कुटुंबाने $१०,००० बरोबर नेले जे त्यांनी अमेरिकेत वैध मार्गाने मिळवलेले आहेत. पुढे मुंबईत सोनाराकडे जाऊन हे पैसे रुपयात बदलून घेतले. हा व्यवहार रोखीत झाला. मग हे पैसे पांढरे का काळे? या पैश्यांवर अमेरिकेत ट्याक्स भरलेला असेल तर परत भारतात ट्याक्स भरावा का?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 09/06/2016 - 21:22

In reply to ट्रॅक करणं अवघड आहे by ट्रेड मार्क

Permalink

वर लिहिल्याप्रमाणे...

वर लिहिल्याप्रमाणे... १. अवैध मार्गांनी (यात हवाला व इतर अनधिकृत नॉन-बँकिंग मार्गही येतात) परकीय किंवा भारतिय चलन भारतात आणणे किंवा भारताबाहेर नेणे दंडनिय गुन्हा आहे. आणि त्याचबरोबर... २. परवाना नसलेल्या कोणत्याही व्यक्ती/संस्थेबरोबर परकीय चलनाचे व्यवहार करणे गुन्हा आहे. त्यामुळे, वैध मार्गांनी भारतात आणलेले परकिय चलनही वैध मार्गांनीच भारतीय रुपयांत बदलले नाही तर तो दंडनिय गुन्हा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Tue, 09/06/2016 - 23:07

In reply to वर लिहिल्याप्रमाणे... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

दोन प्रश्न

दोन प्रश्न 1) अवैध मार्गांनी (यात हवाला व इतर अनधिकृत नॉन-बँकिंग मार्गही येतात) परकीय किंवा भारतिय चलन भारतात आणणे किंवा भारताबाहेर नेणे दंडनिय गुन्हा आहे. --- अवैध म्हणजे कुठले मार्ग? जर समजा मी काही परदेशी चलन कॅश स्वरूपात घेऊन आलो तर तो अपराध आहे का? माझ्या माहितीप्रमाणे नाही. पण जरा स्पष्ट करावे. 2) परवाना नसलेल्या कोणत्याही व्यक्ती/संस्थेबरोबर परकीय चलनाचे व्यवहार करणे गुन्हा आहे. - --- मुंबई / पुण्यात जे सोनार परदेशी चलन घेऊन त्याबद्दल भारतीय पैसे देतात त्यांच्याकडे परवाना आहे का नाही हे कसे चेक करायचे?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 09/07/2016 - 00:21

In reply to दोन प्रश्न by अभिजीत अवलिया

Permalink

भारतात परदेशी चलन आणण्यावर

भारतात परदेशी चलन आणण्यावर बंदी नाही. पण कॅश $३००० पेक्षा जास्त किंवा त्या रकमेच्या इक्विव्हॅलंट इतर चलन भारतात आणताना ते कस्ट्म्समध्ये CDF (Currency Declaration Form) भरून जाहीर करणे आवश्यक असते. अश्यावेळेस त्या वेळेस त्या रकमेचा स्त्रोताची चौकशी होऊ शकते व तो स्त्रोत वैध (पगार, व्यापारी उत्पन्न, इ) असल्याबाबतचे पुरावे जवळ असणे चांगले. परदेशी चलनाचे व्यवहार करण्याचा परवाना असणार्‍या संस्थांकडे त्याबाबतीतले सरकारी सर्टिफिकेट असते. माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही सोनाराकडे तसा परवाना नसतो. परवानाधारकांची यादी रिझर्व बँकेच्या संस्थळावर AUTHORISED DEALERS IN FOREIGN EXCHANGE या पानावर मिळू शकेल. अधिक माहितीसाठी रिझर्व बँकेचे FREQUENTLY ASKED QUESTIONS हे पान उपयोगी ठरेल. अजून महिती हवी असल्यास रिझर्व बँकेच्या संस्थळावरची परदेशी चलनासंबंधीची इतर पाने पहावित किंवा परदेशी चलनासंबंधी तज्ञ असलेल्या अधिकृत अर्थसल्लागाराचा सल्ला घ्यावा.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Wed, 09/07/2016 - 00:25

In reply to भारतात परदेशी चलन आणण्यावर by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 09/07/2016 - 00:48

In reply to भारतात परदेशी चलन आणण्यावर by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

रु ७५०० पेक्षा जास्त भारतिय

रु ७५०० पेक्षा जास्त भारतिय चलन परदेशातून भारतात आणता येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अमितदादा on Tue, 09/06/2016 - 22:09

In reply to ट्रॅक करणं अवघड आहे by ट्रेड मार्क

Permalink

म्हात्रे सरांनी

म्हात्रे सरांनी लिहल्याप्रमाणे हे अवैद्य आणि दंडनीय आहे. ट्रॅक करता न येणे हा वेगळा प्रश्न आहे, भारतात हजारो मार्ग आहेत ज्याने काळा पैसा तयार होतो आणि सरकार ट्रॅक करू शकत नाही. पण तो वेगळा विषय आहे. तसेच NRI लोकांनी परदेशात कर भरलेल्या पैशावर भारतात NRE अकाउंट वर माझ्या माहितीनुसार कर नाहीये.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 09/07/2016 - 00:46

In reply to म्हात्रे सरांनी by अमितदादा

Permalink

NRE सेविंग्ज अकाउंट मधील पैसे

NRE सेविंग्ज अकाउंट मधील पैसे; NRE व FCNRE मुदतीच्या ठेवीमधील पैसे; आणि दोन्हीवरील व्याज भारतात करमुक्त आहे... परदेशात त्यावर कर आहे की नाही याचा भारतात ते करमुक्त असण्यावर प्रभाव पडत नाही. अनिवासी भारतियाला, निवासी भारतिय होईपर्यंत, परदेशी उत्पन्न "भारतिय करविवरणात" दाखविणे सक्तीचे नाही. याउलट, अमेरिकेत करपात्र असलेल्या व्यक्तीला तिचे जगभरचे उत्पन्न (ग्लोबल इन्कम) करविवरणात जाहीर करून त्यावर कर भरणे अपेक्षित असते.
  • Log in or register to post comments

Submitted by देशपांडे विनायक on Wed, 08/31/2016 - 10:37

Permalink

वेळेवर आलेली dish

वेळेवर आलेली dish अ माझा मित्र . . ब हा मित्राच्या बायकोचा भाऊ. हा सांगतो कि वडिलांनी मला authorit दिली आहे . आणि वडिलांनी मान्य केलेल्या अटीप्रमाणे काही इस्टेट विकली आहे . अ माझ्याकडे काही दिवसापूर्वी आला आणि म्हणाला '' बायको म्हणतीय तुम्हाला धनयोग आहे . काही पैसे cash आणि काही cheque ने मिळतील "" मी म्हणालो मग तुला कसला त्रास वाटतोय ? तो म्हणाला आजपर्यंत काळा पैशाबद्दल ऐकलं खूप पण आता दरवाजा जवळ आला आहे . त्याचे स्वागत करावयाचे कि नाही ? १] व्यवहार सासऱ्याने केला आणि काही काळा पैसा स्वीकारला . हे दिसते आहे २] पण अ ला [ त्याच्या वाट्याचे ] हे पैसे मिळणार तेंव्हा हि सासऱ्याकडून असणारी गिफ्ट आहे . तो हि गिफ्ट बिनधास्तपणे वापरू शकेल ?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 10:59

In reply to वेळेवर आलेली dish by देशपांडे विनायक

Permalink

मला मिळणार्‍या पैशाचा स्रोत

मला मिळणार्‍या पैशाचा स्रोत कोणताही असो, ते आयकर विभागाला सादर करावेच लागतात. सासर्‍याने ते जमीन विकुन मिळवले असो, गुप्तधन सापडले असो, रस्त्यात पडलेले मिळालेले, दरोडा टाकलेला असो. मला आयकर विभागाकडे सांगतांना बक्षिस-भेट म्हणून सांगितले तर त्यानुसार कर लागू होतो. बक्षिस-भेटींवरही कर असतोच. माझ्या एका सीए मित्राने सांगितलेला किस्सा: त्याच्याकडे एकदा एक वेश्या आयकर विवरण पत्र भरायला आलेली. त्याचे म्हणणे असे, तुम्ही पैसा कुठून कमावला ह्याच्याशी 'आयकरविभागाला' काहीही घेणेदेणे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 08/31/2016 - 11:30

In reply to मला मिळणार्‍या पैशाचा स्रोत by संदीप डांगे

Permalink

तिने नक्कीच ते उत्पन्न

दुस-या कुठल्यातरी आणि कायदेशीर मार्गाने आलेलं आहे असं दाखवलं असणार.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 11:35

In reply to तिने नक्कीच ते उत्पन्न by बोका-ए-आझम

Permalink

हा प्रश्न मलाही आहेच. तुम्ही

हा प्रश्न मलाही आहेच. तुम्ही म्हणताय तसे जर बेकायदेशीर व्यवहारातुन मिळालेला पैसा आक्षेपार्ह आहे तर मग हे कसे बसवले असेल? परत तो मित्र भेटला की विचारलं पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Wed, 08/31/2016 - 12:37

In reply to हा प्रश्न मलाही आहेच. तुम्ही by संदीप डांगे

Permalink

पैसा !

भगवद्गीता .... अर्जुना , शरीर हे सुखाबरोबरच दु:खही घेउन येते. पैसा सुख व जबाबदारी दोन्ही घेउन येतो. मिळालेला गिफ्ट पैसा त्याने त्याच्या हिशोबात गिफ्ट दाखवुन ट्याक्सही भरावा. पण , यदाकदाचित देणार्‍याने तो पैसा लुबाडलेला असेल व कोर्टात ते सिद्ध झाले तर तो पैसा घेणार्‍याला परत करावा लागेल. अन्यथा , त्या पैशाला असा दुसरा वारस नसेल तर तो पैसा सत्कार्यास वापरुन पुण्य मिळवावे.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत लाटकर on Wed, 08/31/2016 - 11:26

Permalink

माझा निरागस प्रश्न

काळ्या पैसाचा मुद्दा काॅग्रेसने खुप पुर्वी काढला होता,आता पर्यंत कितीजणांनी आपला पैसा स्विस बँकेतच ठेवला असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 08/31/2016 - 12:20

Permalink

अंदाज सांगा

वरच्या चर्चेत म्हटल्याप्रमाणे बारीक सारीक प्रमाणावर निर्माण होणार्‍या काळ्या पैशाचा एकूण आकडा आपल्या देशात किती असावा? एकूण काळा आणि पांढरा पैसा विचारात घेता भारत हा मला वाटते जगात सर्वात श्रीमंत देश असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 12:40

In reply to अंदाज सांगा by पैसा

Permalink

नक्कीच आहे. केवळ देशात

नक्कीच आहे. केवळ देशात व्यक्तिगत, खाजगी, सरकारी, पेढीतल्या सोन्याचा साठा मोजला तर तो जगात सगळ्याला विकत घेईन एवढा असेल. फक्त ती लक्ष्मी झोपलेली आहे म्हणून तिला 'अर्थ' नाही. जो चालतो तो पैसा. कागदाला किंमत नाही, व्यवहार झाले तर त्याला जीवंतपणा येतो. बाकी पैताई, तुम्ही आम्हा लोकांची फिरकी घेताय काय?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 08/31/2016 - 12:50

In reply to नक्कीच आहे. केवळ देशात by संदीप डांगे

Permalink

फिरकी नाय!

सिरीयसली! देशात किती काळा पैसा आहे याच्या अंदाजाचे आकडे येतात, ते मोठ्या लोकांच्या कारवायांचे असतात. लहान लहान करत किती प्रचंड प्रमाण असेल असा मी विचार करते आहे. कारण सुमारे ५० कोटी लोक जर मध्यमवर्गात असतील तर हिशेबातून बाहेर गेलेला पैसाही प्रचंड प्रमाणात असणार. साक्षात चंपाबाईसुद्धा गंभीरपणे फिलॉसॉफिकल प्रतिसाद देत आहेत, म्हणजे विषय किती गंभीर आहे बघा! पैशाबद्दलची चर्चा अर्थातच आवडली आहे! =))
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 13:01

In reply to फिरकी नाय! by पैसा

Permalink

पन्नास कोटी नाही, खर्च करणारे

पन्नास कोटी नाही, खर्च करणारे सर्वच धरावे लागतील. साधारणपणे जेवढं पांढरे व्यवहार होतात त्याच्या दहापट तरी असेल असा अंदाज आहे. आणि ह्याचा मोठा हिस्सा हा शहरी नसून ग्रामिण आहे. एका छोट्या पंधरा ते तीस हजार लोकवस्तीच्या गावात दरवर्षी सर्व व्यवहार मिळून सुमारे शंभर कोटींची उलाढाल होऊ शकते. हे सरासरीचं निरिक्षण आहे. कुठे कमी कुठे अधिक होऊ शकते. यातलं किती व्हाईट असेल? फक्त पेट्रोलपंपाचा विचार केला तर दुचाकीवाले कधीच बिल घेत नाहीत, अपवाद कंपनीला द्यायचे असेल तरच. दिवसाला शंभर दुचाक्यांनी शंभर रुपयांचे पेट्रोल विनाबिल घेतले तर दहा हजार रुपये तिथेच होतात. पेट्रोलपंपवाला ह्याचा फायदा उचलत असणारच.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 08/31/2016 - 13:17

In reply to पन्नास कोटी नाही, खर्च करणारे by संदीप डांगे

Permalink

फक्त पेट्रोलपंपाचा विचार केला

फक्त पेट्रोलपंपाचा विचार केला तर दुचाकीवाले कधीच बिल घेत नाहीत, अपवाद कंपनीला द्यायचे असेल तरच. दिवसाला शंभर दुचाक्यांनी शंभर रुपयांचे पेट्रोल विनाबिल घेतले तर दहा हजार रुपये तिथेच होतात. पेट्रोलपंपवाला ह्याचा फायदा उचलत असणारच. पेट्रोल पंपाला जी कंपनी पेट्रोल विकते त्या कंपनीच्या सेल्स मध्ये या पंपाचे नांव असणार आणि टॅन नंबर वगैरे रजिस्टर्ड असणार.. भेळपुरी आणि पेट्रोल पंपातून निर्माण होणार्‍या काळ्या पैशाचे मॉडेल बहुदा वेगवेगळे असावे..
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 13:32

In reply to फक्त पेट्रोलपंपाचा विचार केला by मोदक

Permalink

तसे तर ते मग प्रत्येक ठिकाणी

तसे तर ते मग प्रत्येक ठिकाणी होते. भेळपुरीवाला कच्चा माल घेतो तिथून जरी त्याने बिल नाही घेतले तरी तो कच्चा माल पुरवणारा कुठेतरी बिलींगमधे येतोच. गुंतागुंतीचं आहे कारण कृषीउत्पादनांवर कर नाही पण त्यापासून निर्माण झालेल्या पक्क्या मालावर आहे. शेतात तयार झालेल्या गव्हावर कर नाही पण त्याचे पिठ करुन विकले तर आहे. कर नसला तरी व्यवहार हे सरकार दरबारी जमा होतातच. ते मागे एका प्रतिसादात दिले होते. व्यापारी शेतकर्‍यांना पेमेंट करतात ते त्यांना दाखवायला लागतं. आता इथे कच्चामाल वाल्याकडून बिल न घेणारा भेळवाला बिन न घेणार्‍या ग्राहकाकडून पैसे घेतो तेव्हा तो शंभर टक्के काळा पैसा होतोय. पेट्रोलपंपाचे उदाहरण फक्त दिलंय. लूपहोल्स प्रत्येक ठिकाणी असतातच. माझा भर एन्डयुजरने बिल मागण्याच्या आग्रहावर आहे. अजून एक गंमत. एचपी पेट्रोलियमने पुण्याच्या एका पंपाला पेट्रोल दिले, त्या पंपावरुन मी पेट्रोल भरुन पावती घेतली, ती माझ्या ऑफिसला नाशिकमधे सबमिट केली, तेव्हा माझा खर्च कंपनी जेव्हा ऑपरेशनल एक्स्पेन्सेस म्हणून दाखवते तेव्हा हे हजार रुपये किंवा ते पेट्रोलशी संबंधित सर्व ट्रॅन्झॅक्शन टॅली होत असेल काय? म्हणजे कुठल्या गल्फमधुन घेतलेला कच्चा माल ते माझ्या गाडीत पडेपर्यंतचा खर्च सुत्रबद्ध रित्या रेकॉर्ड होतो काय? असा व्हावा असे फार वाटते. दुसरं उदाहरण. मी भाड्याने घर घेतो, घरमालकाला भाडे देऊन पावती घेतो, ती पावती माझ्या विवरणपत्राला जोडतो, तेव्हा ते ट्रॅन्झॅक्शन बघून माझ्या घरमालकानेही आपल्या विवरणपत्रात ते मिळालेले भाडे दाखवले आहे काय हे आयटीडी चेक करतं का? विशेषतः जेव्हा व्यवहार रोखीने असेल तेव्हा? पॅन इन्व्हॉल्व नसतील तेव्हा काय?
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 08/31/2016 - 13:48

In reply to तसे तर ते मग प्रत्येक ठिकाणी by संदीप डांगे

Permalink

माझ्या माहितीप्रमाणे गेल्या ६

माझ्या माहितीप्रमाणे गेल्या ६ / ७ वर्षात हळू हळू नाड्या आवळायला सुरूवात झाली आहे. वरच्याच उदाहरणात... जर मी ठरावीक रकमेपेक्षा जास्त घरभाडे भरत असेन तर घरमालकाचे पॅन डिटेल्स देणे बंधनकारक झाले आहे (निदान आमच्या कंपनीत तरी). बाकी मुद्दा मान्य. एंड युजरने बिल जरी घेतले तरी ते बिल खरे असेल याचीही काही ठिकाणी खात्री देता येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Wed, 08/31/2016 - 13:50

In reply to तसे तर ते मग प्रत्येक ठिकाणी by संदीप डांगे

Permalink

एका आर्थिक वर्षात जर 1

एका आर्थिक वर्षात जर 1 लाखाहून अधिक रकमेच्या भाडे पावत्या विवरण पत्राला जोडल्या असतील तर घरमालकाच्या पॅन ची एक प्रत जोडणे सुद्धा अनिवार्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 14:15

In reply to एका आर्थिक वर्षात जर 1 by गणामास्तर

Permalink

म्हणजे एक लाखाच्या आत असलेला

म्हणजे एक लाखाच्या आत असलेला पैसा काळा होऊ शकतो? जर ते मालकाने त्याच्या विवरणपत्रात दाखवले नाही तर.. =)) =)) इथे सामान्य जनतेचीच खरडपट्टी निघत चालली आहे. अभ्भितक धनदांडगे आणि नेते लोक्स तर दुरदूरतक दिखाई नही पड रहे!
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 08/31/2016 - 14:21

In reply to म्हणजे एक लाखाच्या आत असलेला by संदीप डांगे

Permalink

मग या न्यायाने एखादी गोष्ट

मग या न्यायाने एखादी गोष्ट बदलायला कधी सुरूवात करावी जेणेकरून सगळे जण सदासर्वदा सुखी राहतील..?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 14:33

In reply to मग या न्यायाने एखादी गोष्ट by मोदक

Permalink

सुरुवात तर झालीये ना, इट्स इन

सुरुवात तर झालीये ना, इट्स इन प्रोग्रेस, काही लोक स्वतःहून भाग घेतायत, काही सरकार कचाट्यात पकडतंय, सामान्य जनतेने बिलं घ्यावीत हे तर लहानपणापासून ऐकतोय. लोक दोन-पाच टक्के वाचवायला बिलं घेत नाहीत. जिथे मी आत्ता काम करतोय त्या शेतकी औषधांच्य क्षेत्रात सुमारे ९० टक्के प्रॉपर बिलिंग होतंय. प्रत्येक दुकानात कम्प्युटराइजड सिस्टीम आहे बिलिंगची. जे काही डिस्काउंट्स आहेत ते नीट वजा करुनच बिलं होतात, वॅट व्यवस्थित भरला जात आहे. शेतकर्‍याकडे बिल असेल तर औषधांच्या तक्रारी करायला त्याला जागा राहते, हिशोब नीट राहतात. खुप सुटसुटीत होतंय. बिल नको असा म्हणणारा व न देणारा दुकानदार विरळाच! लोकप्रचार-प्रसार मोठ्याप्रमाणात व्हायला हवा. ह्याचं महत्त्व समजायला हवं, दोन-पाच टक्के वाचवून आपण फायदा नाही तर नुकसानीत भागीदार होतोय हे कळायला हवं. जेव्हा असे पैसे द्यायला लागतील तेव्हा जबाबदारीची जाणिव होऊन भ्रष्टाचारालाही आवर घालता येईल. सध्या तेरीभी चूप मेरीभी चूप प्रकार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Wed, 08/31/2016 - 14:27

In reply to म्हणजे एक लाखाच्या आत असलेला by संदीप डांगे

Permalink

टेक्निकली एक लाखाच्या आतला

टेक्निकली एक लाखाच्या आतला पैसा काळा होऊ शकतो. बहुसंख्य घरमालक ऍक्चुअल आकारलेल्या रकमेच्या भाडेपावत्या देत नाहीतचं.
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Wed, 08/31/2016 - 13:49

Permalink

माई मोड ऑन

माई मोड ऑन पण,मी काय म्हणते शिंच्या मार्मिका देशातील एक रुपयाही स्विस बँकेत नाही. मग कसल्या रे वांझोट्या चर्चा करताय. माई मोड ऑफ़
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 13:54

In reply to माई मोड ऑन by महासंग्राम

Permalink

फाउल फाउल फाउल

माई कधीच काही म्हणत नाही, त्यांचे 'हे' म्हणत असतात.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com