✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गुलजार!

र
रुपी यांनी
Fri, 08/19/2016 - 23:10  ·  लेख
लेख
महान कवी, गीतकार गुलजार यांचा १८ ऑगस्ट हा वाढदिवस! गुलजार यांच्या प्रतिभेबद्दल आणि शब्दप्रभूत्त्वाबद्दल मी काय लिहिणार? पण त्यांच्याबद्दल आधी धागा येऊन गेला की कसे याबद्दल माहिती नाही. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या गीतांबद्दल, त्यांच्या काही आठवणी प्रतिसादांमधूनही वाचायला मिळतील म्हणून हा धागा काढत आहे. खरे तर माझ्या बालपणातली बरीच वर्षे मी फक्त त्याच काळातली गाणी ऐकणे, पाठ करणे यातच रमले होते. आईबाबांना जुन्या गाण्यांची आवड असली तरी ठराविकच गाणी ऐकण्यात आली. केबल तर आमच्याकडे नव्हतीच, रेडिओही फार काही चालू नसायचा. नगरच्या साहित्य संमेलनात गुलजार प्रमुख पाहुणे म्हणून आले होते - मला वाटते बहुतेक समारोपाच्या कार्यक्रमात. तेव्हाही मला त्यांच्या गाण्यांपेक्षा फक्त गुलजार हे खूप ख्यातनाम गीतकार म्हणूनच माहीत होते. त्यावेळी आम्हां मैत्रिणींमध्ये ऑटोग्राफ बूकचे चांगलेच फॅड आले होते. साहित्य संमेलनाच्या तीनही दिवशी आम्ही तिकडेच पडीक तर होतोच, पण साहित्यिक काय सांगत आहेत हे जाणून घेण्यापेक्षा त्या वहीत सही मिळवायचीच आम्हांला उत्सुकता असायची. मला आठवते त्याप्रमाणे समारोपाचा कार्यक्रम संपण्याआधीच गुलजारांना निघावे लागले. स्टेजच्या मागच्या बाजूने ते बाहेर पडत होते. कुठून कुठून वाट काढून, जोरात पळत जाऊन एकदाचे मी आणि मैत्रिणीने त्यांना गाठले आणि सही मागितली. बर्‍यापैकी वैतागून त्यांनी "I don't give it... I don't give it" असे म्हटले, आम्ही "प्लीज,प्लीज" म्हणत आहोत, ते "नो नो" म्हणत पुढे जात आहेत असा काही वेळ आम्ही त्यांचा पाठलाग केला. बघणार्‍यांनाही गंमत वाटत होती. शेवटी ते गाडीत बसून निघाले आणि सही नाहीच दिली. हिरमोड होऊन मी पुन्हा माझ्या जागी जाऊन बसले. त्या वयातले माझे तुटपुंजे ज्ञान आणि (अ)समज यांना अनुसरुन मी त्यांना "शिष्ट" लोकांच्या यादीत बसवून टाकले. तर अशी ही माझी त्यांच्याबरोबरचे प्रत्यक्ष भेट. त्यानंतरही त्यांच्या गाण्यांपासून मी दूरच. म्हणजे, गाणी माहीत असली तरी फक्त ते गाण्यापुरतेच बोल माहीत करुन घ्यायचे. त्यातला अर्थ-बिर्थ समजून घ्यायचा काही प्रयत्न केला नाही. हळूहळू डायरीत गाणी लिहून काढणे, सिनेमाचे नाव, गायक, गायिका, त्यानंतर संगीतकार माहीत करुन ते लिहिणे हे सुरु झाले. पण एकंदरीत गाण्याच्या बोलांचा, अर्थाचा, त्यामागच्या घटना, प्रसंग आणि गीतकारांचा विचार असा बरीच वर्षे कधी केला नाही. इंजिनीअरिंगला असताना गाणी जमा करण्याचा सपाटाच लावला होता आणि जुन्या सिनेमांतली गाणी सरसकट "ओल्डीज" म्हणून जमवण्यात यायची. पण पुढे लग्न झाल्यावर नवर्‍याकडे असलेली गाणी शोधताना एकदा गुलजारांची गाणी असलेले एक फोल्डर सापडले. गीतकाराच्या नावाने बनवलेले हे पहिलेच फोल्डर पाहिले आणि तेव्हा पहिल्यांदाच एका वेगळ्याच दृष्टीकोनातून ही गीते समजून घ्यायला सुरुवात केली, आणि मग मी हरखूनच गेले. नंतर परदेशात वर्षभर राहायची संधी मिळाली. तिथली लायब्ररी - त्यातले भारतीय भाषांमधले साहित्य सिनेमे गाणी यांचा संग्रह, घरच्या इंटरनेटचेही भारताच्या मानाने असलेले प्रचंड स्पीड आणि माझ्याकडे हाताशी वेळ असणे या गोष्टी माझ्या चांगल्याच पथ्यावर पडल्या. मग अशी जुनी वेगवेगळी गाणी, त्यांचे बोल समजून घेणे, त्यावर चर्चा करणे यात माझा बराच वेळ सत्कारणी लागला. नंतर ऑर्कुटवर त्या कम्युनिटीज असायच्या त्यात गुलजारांची जॉइन केली, मग इतर लोकांबरोबर त्याबद्दल चर्चा "जिहाले-मस्की" गाण्याचा अर्थ समजून घेतला होता, "एकसो सोलह चांद की रांते.." मागची कल्पना समजली होती. "नाम गुम जायेगा", "मेरा कुछ सामान" अशी कितीतरी गाणी किती वेळा ऐकली त्याची गणतीच नाही. मुलांना आता "टप टप टोपी टोपी" आणि "टकबक टकबक" शिकताना तर काय मजा येते! त्यांच्या गाण्यांबद्दल मी इथे वेगळं काय लिहिणार, या सगळ्या बाबतींत मला अजूनही फार काही गती नाही. पण गुलजारांबद्दल आणखी माहिती शोधताना, वाचताना, त्यांच्याबद्दलचा आदर वाढतच गेला. त्यांना मी "शिष्ट" म्हणून लावलेले लेबल किती बालिश होते आणि माझा राग किती पोकळ होता हेही समजून गेले. काही वर्षांपूर्वी एकदा इथल्या भारतीय सामानाच्या दुकानातून बाहेर पडताना, माईक, कॅमेरा लावून एका ग्रुपमधले काहीजण येणार्‍या जाणार्‍या काही लोकांची मुलाखत घेत होते. चौकशी केल्यावर कळले की गुलजारांच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ बनवणार आहेत, आणि या मुलाखती त्यात असतील. मग नवर्‍यानेही मला प्रोत्साहित केले. मुलाखत घेणार्‍याला बहुतेक मी लहानपणी कशी होती ते माहीत असावे, कारण तो आम्हांला गुलजारांची ओळख सांगू लागला आणि त्यात फक्त "बिडी जलाईले", "कजरारे" याच गाण्यांबद्दल सांगू लागला. मग आम्ही त्याला आमच्याकडची जास्तीत जास्त माहिती त्या दोन मिनिटांत द्यायचा प्रयत्न केला. तोही प्रभावित झाला असेल. याचा व्हिडीओ १८ ऑगस्टला अमुकअमुक वेबसाईटवर टाकण्यात येईल अशी माहिती त्याने आम्हांला दिली. १८ तारखेला आठवणीने मी व्हिडिओ पाहायला लिंक उघडली. व्हिडीओ होता, पण इथल्या एका हिंदू मंदिराबाहेर घेतलेल्या मुलाखतींचा. त्यांनी दोन ठिकाणी मुलाखती घेतल्या होत्या, पण व्हिडिओ बहुतेक एकाच ठिकाणच्या मुलाखतींचा बनवला! गुलजारांचा विषय निघाला की ही आठवण येते आणि त्याचे हसूही येते. त्या साहित्य संमेलनाला आता दोन दशके होत आली. आता कधी संधी मिळाली तर मी सही मागण्याआधी गुलजारांना नमस्कार करेन. कशीही असो, त्यांची प्रत्यक्ष भेट झाली याचा आनंद आहेच, आणि त्यांची जादू मनावर जी आहे ती कमी होण्याऐवजी वाढतच जात आहे. या असाधारण गीतकाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शुभेच्छा
आस्वाद
अनुभव

प्रतिक्रिया द्या
17421 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

या चित्रपटाबद्दल सर्वच अतिशय

पद्मावति
Fri, 08/26/2016 - 00:30 नवीन
या चित्रपटाबद्दल सर्वच अतिशय सुंदर आहे
..खरंय रूपी. या चित्रपटात उर्मिला मातॉंडकर ने सुद्धा वागण्या-बोलण्याचा पंजाबी लहेजा मस्तं उचललाय. चरखा हे गाणं अमृता प्रीतम यांचे आहे हे माहीत नव्हतं मला. सुंदर गाणं. हाथ छूटे भी तो...हे सुद्धा गुलज़ारांचे आहे का? ते तर माझं ऑल टाइम फेव गाणं आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

लेख तर भारीच, आणि प्रतिसाद

पिशी अबोली
Wed, 08/24/2016 - 09:36 नवीन
लेख तर भारीच, आणि प्रतिसाद सुद्धा भारी!
  • Log in or register to post comments

मस्त...

वेदांत
Wed, 08/24/2016 - 09:47 नवीन
मस्त... जग घूमेया थारे जैसा ना कोई ...............
  • Log in or register to post comments

छान लेख. आम्हीसुद्धा गुलझार

अंतु बर्वा
गुरुवार, 08/25/2016 - 01:02 नवीन
छान लेख. आम्हीसुद्धा गुलझार साहेबांचे फॅन... जुण्या गाण्यांबद्दल वर बरच काही आलयं. माझी थोडी भर नवीन गाण्यांमधुन.. कमीने चित्रपटातलं, टायटल: क्या करे जिंदगी इसको हम जो मिले, इसकी जां खा गये रात दिन के गिलें कभी जिंदगीसे मागा, पिंजरे में चांद ला दो किंवा इश्किया मधलं, दिल तो बच्चा है जी असो नाहीतर हैदर मधलं झेलम (किस से पूछे कब तक सहते जाना है, अंधी रात का हाथ पकडकर कब तक चलते जाना है) किंवा ओमकारा मधलं नमक इस्क का असो, गुलजारच लिहू जाणे...
  • Log in or register to post comments

मस्त लेख, सुरेख प्रतिसाद...

माधुरी विनायक
गुरुवार, 08/25/2016 - 15:17 नवीन
गुलजार माझेही प्रचंड आवडते कवी.. कतरा, कतरा माझं विशेष आवडतं... कतरा कतरा मिलती है कतरा कतरा जीने दो ज़िंदगी है, बहने दो प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो तुमने तो आकाश बिछाया मेरे नंगे पैरों में ज़मीन है देखे तो तुम्हारी आरज़ू है शायद ऐसे ज़िन्दगी हसीन है आरज़ू में बहने दो प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो कल भी तो कुछ ऐसा ही हुआ था नींद में थी तुमने जब छुआ था गिरते गिरते बाहों में बची मैं सपने पे पाँव पड़ गया था सपनों में रहने दो प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो...
  • Log in or register to post comments

वाचताना सुद्धा आशाचा आवाज ऐकू

यशोधरा
गुरुवार, 08/25/2016 - 15:23 नवीन
वाचताना सुद्धा आशाचा आवाज ऐकू आला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माधुरी विनायक

पाके भी तुम्हारी आरज़ू है

सानझरी
गुरुवार, 08/25/2016 - 17:13 नवीन
पाके भी तुम्हारी आरज़ू है शायद ऐसे ज़िन्दगी हसीं है या गाण्यातले हे माझे सगळ्यात आवडते बोल. दुरुस्त केल्या शिवाय रहावलं नाही. आणि हे आणखी एक कडवं हलके हलके कोहरे के धुए में शायद आसमां तक आ गयी हूँ तेरी दो निगहों के सहारे देखो तो कहाँ तक आ गयी हूँ कोहरे में बहने दो.. प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो रहने दो ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माधुरी विनायक

क्षमस्व सानझरी...

माधुरी विनायक
Sat, 08/27/2016 - 20:57 नवीन
आणि योग्य ओळी दिल्याबद्दल आभार... गुलजार खरंच वेड लावतात... मासूम मध्ये तुझसे नाराज नही जिंदगी लिहिणारे गुलजार त्याच चित्रपटात हुजुर इस कदर भी सारखं गाणंही देतात... दोन्ही गाणी आवडती, हे वेगळं सांगायला नको ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

अगदी खरं.. जीने के लिये सोचा

सानझरी
Sat, 08/27/2016 - 23:09 नवीन
अगदी खरं.. जीने के लिये सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे.. मुस्कुरायें तो, मुस्कुराने कर्ज उतारने होंगे... हे असं गुलजारच लिहू जाणे. त्यांची ही आणखी एक सुंदर कविता.. आदतें भी अजीब होती हैं साँस लेना भी कैसी आदत है जीये जाना भी क्या रवायत है कोई आहट नहीं बदन में कहीं कोई साया नहीं है आँखों में पाँव बेहिस हैं, चलते जाते हैं इक सफ़र है जो बहता रहता है कितने बरसों से, कितनी सदियों से जिये जाते हैं, जिये जाते हैं आदतें भी अजीब होती हैं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माधुरी विनायक

गुलजारजींचं हे गीत माझं अतिशय आवडतं आहे.

बोका-ए-आझम
गुरुवार, 08/25/2016 - 20:24 नवीन
वेगळ्याच वातावरणात नेणारं गीत आहे. गूढ, गहन, गंभीर शब्द. अवाक करणारं संगीत. खिळवून ठेवणारं नृत्य. लता, आशा आणि स्वतः संगीतकार डाॅ.भूपेन हजारिका या तिघांनीही गायलेलं आहे पण मला वैयक्तिकरीत्या आशाजींनी गायलेलं आवडतं. मी जास्त काही लिहित नाही. प्रत्यक्षच पाहा. https://youtu.be/kyIqnKT9ciY
  • Log in or register to post comments

ओहोहो.. आज जीव घ्यायचा दिवस

संदीप डांगे
गुरुवार, 08/25/2016 - 20:39 नवीन
ओहोहो.. आज जीव घ्यायचा दिवस आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

शिकोड़

बहुगुणी
Fri, 08/26/2016 - 01:33 नवीन
नादखुळा: एखादी मालीका किमान फाळणीवरील्/सम्कालीन विषयावर करायला पाहिजे होती असे राहून राहून वाटते. फाळणीवर आधारित मालिका गुलज़ारांनी दिग्दर्शित करावी या इच्छेला +१. त्यांनी दूरदर्शनसाठी दिग्दर्शित केलेल्या 'किरदार' या कथामालिकेतील 'शिकोड़' (मूळं) ही पश्चिम बंगाल आणि पूर्व पाकिस्तान यांत रहाणार्‍या मित्रांची कथा आठवली. खास गुल़ज़ार टच!
  • Log in or register to post comments

अरे आओ ना, की जां गयी

जव्हेरगंज
Sat, 08/27/2016 - 00:09 नवीन
अरे आओ ना, की जां गयी जहां गया, सो जाओ अरे आओ ना, के थक गयी है ज़िन्दगी, सो जाओ ना श्याम ना सवेरा, अँधेरा ही अँधेरा है रूहों का बसेरा, सो जाओ -हैदर
  • Log in or register to post comments

हे तर एक नंबर आहे!!

पिलीयन रायडर
Sat, 08/27/2016 - 01:07 नवीन
हे तर एक नंबर आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा