Skip to main content

शृंगापत्ती

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 19/08/2016 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
शृंगापत्ती रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता. मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता. माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं. सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले. आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली. एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले. काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी. सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय" गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.

वाचने 92930
प्रतिक्रिया 413

प्रतिक्रिया

एकदम फिल्मी स्टोरी! पण ते त्यांच्या मित्राला भेटायला जात असतील तर तितकेच भेटून यावे, इतरांकडे दुर्लक्ष्य करावे. किंवा बाहेरच बोलावून भेटावे. व्यावसायिक नीतिमत्ता सर्वात महत्वाची.

तुमच्या मित्राला व्यावसायिक नीतीमत्तेची बर्‍यापैकी चाड असावी असे दिसते. त्यांनी त्या कुटुंबियांना काही सांगितलेले नाहीये म्हणून. तुम्हांला सांगितले नसते तरी चालले असते.

In reply to by यशोधरा

यशोधरा ताई माझ्या मित्राने हि गोष्ट कदाचित "मन मोकळे" करण्यासाठी मला सांगितली असावी मला सांगितले नसते तरी चालले असते.हे मान्य.

In reply to by यशोधरा

हे विचारते म्हणजे मलाही हे प्रश्न पडलेत की ह्या लेखात जी मुलीच्या स्वभावाची, वागण्याची, निर्णयांची चिकित्सा झालेली आहे हे तुमच्या मित्राचे मत की तुम्ही केलेले जजमेंट? अगदी त्या मुलीने तुमच्या मित्राला सांगितले आहे असे धरुन चालले तरी तुमच्यापरेंत येईपरेंत आणि तुमच्याकडून मिपावर पोहोचेपरेंत त्याला सांगोवांगीचे स्वरुप आले आहे, तेव्हा त्याला अर्थ नाही. तुम्हां दोघांपैकी कोणी खोटे बोलत आहे असेही म्हणायचे नाहीये, पण तरी मिपाकरांपरेंत ते सांगोवांगीच्याच स्वरुपात येत आहे. आपण दोघे डॉ आहात, शरीरसंबंध दोघांनी ठेवले, मग फक्त मुलीचे वागणे/ खानदान/ विचार ह्याबद्दल्च उहापोह का करावासा वाटला? त्या मुलाविषयी ना तुमच्या मित्राच्या मनात काही शक्यता आल्या, ना तुमच्या - असे निदान लेखावरुन तरी वाटते आहे - असे का? .. असो.

In reply to by यशोधरा

ह्या लेखात जी मुलीच्या स्वभावाची, वागण्याची, निर्णयांची चिकित्सा झालेली आहे हे तुमच्या मित्राचे मत की तुम्ही केलेले जजमेंट? तेव्हा त्याला अर्थ नाही. तुम्हां दोघांपैकी कोणी खोटे बोलत आहे असेही म्हणायचे नाहीये, पण तरी मिपाकरांपरेंत ते सांगोवांगीच्याच स्वरुपात येत आहे. त्या मुलीची सोनोग्राफी मी दोनदा केली. सोनोग्राफी करण्यापूर्वी सरकारी फॉर्म "एफ" भरावा लागतो आपलं नाव, गाव, पत्ता, नवऱ्याचं ( अविवाहित असेल तर बापाचं) नाव हे सर्व त्यात मुलीला भरावं लागतं. त्याला (फॉर्म एफ ला) सोनोग्राफीसाठी पाठवणाऱ्या डॉक्टरने सोनोग्राफीसाठी का पाठवलं ते प्रिस्क्रिप्शन जोडावं लागतं.( यात काही चूक झाली तर रेडियोलॉजिस्टची मान्यता रद्द होऊन त्याला तुरुंगात जावे लागते (या उफराट्या कायद्यात बदल करण्यासाठीच रेडियोलॉजिस्ट संपावर गेले होते). गर्भपात करून घेणाऱ्या मुलीने गर्भपात का केला( गर्भलिंग जाणून घेतल्यावर केला कि कसे इ) यावर नजर ठेवण्यासाठी हा फॉर्म ऑनलाईन भरला जातो. त्यामुळे त्या मुलीची सर्व माहिती मला कळून येतेच. या शिवाय एक मोठा मुद्दा असा आहे कि लग्न न झालेल्या स्त्रीची (कुमारिकेची) तपासणी आतून ( transvaginal) करता येत नाही. बऱ्याच वेळेस गर्भाचा आकार आणि वय हे आतून तपासणी केल्याशिवाय नीट दिसत नाही. परंतु ती स्त्री कुमारिका आहे कि नाही हे ठरवणे शक्य नाही म्हणून लग्न न झालेली हि कुमारिका आहे असे "समजण्यात" येते. तिच्या दोन सोनोग्राफी मी केल्यामुळे लग्नाआधी ती गर्भार राहिली होती हे मला १०० % माहिती होते आणि याचा लिखित पुरावा त्या मुलीच्या हस्ताक्षरात लिहिलेला माझ्याकडे सरकारी नियमाप्रमाणे पुढचे तीन वर्षे मला जपून ठेवावा लागणार आहे. यानंतरचा भाग त्या डॉक्टरांनी मला सांगितला तसा मी शब्दशः लिहिला आहे यात माझा एक पैशाचाही सहभाग नाही. सांगोवांगीचे रूप आले म्हणजे आपले काय म्हणणे होते कि मी त्या डॉक्टरचे म्हणणे खरे खोटे शहानिशा करून पाहायला हवे होते?कि त्याला "मला तुझ्या मित्राकडे घेऊन चल" असे सांगायला पाहिजे होते. आपले म्हणणे मी मिपावर "लिहूच नये" असे असेल तर तो भाग निराळा आहे. पण ते मी मान्य करेन असे नाही. राहिली गोष्ट मुलीचे वागणे यावर उहापोह का केला? याचे कारण ती मुलगी आमच्या कडे "गर्भपात" करण्यासाठी आली होती. त्या मित्राच्या मुलाचे चरित्र तपासून का पहिले नाही? कारण त्याला काळा कि गोरा मी पाहिलेला नाही. मित्राने आपल्या मित्राच्या मुलाच्या बद्दल माझ्याशी कशावरून चर्चा करावी? आपले म्हणणे फारच ओढून ताणून लिहिलेले आहे किंवा पूर्वग्रहदूषित आहे असेच मी म्हणतो.

In reply to by सुबोध खरे

आपण मिपावर लिहू नये असे माझे मुळीच म्हणणे नाही, असे कुठे माझया प्रतिसादातून ध्वनितही होत नाहवे. तुमच्या मताशी ना जुळणारे लिहिले वा तुमच्या बाजूने लिहिले नाही की पूर्वग्रहदूषित? म्हणजे मी मत मांडूच नये की काय? ;) मला हे नककीच म्हणायचे आहे की आपळता मिटाकडून किंचित का होईना व्यावसायिक नीतीमत्ता पाळली गेली नाही. त्याने पेशंटबद्दल तुमच्याशी चर्चा केली. तरी एक वेळ त्यांची मानसिक आणि भावनिक उलघाल मी समजू शकते. त्यांना टी मुलगी तुमच्याकडेहीले तपासायला आली होती हे माहीत होते का? असेल वा नसेल, डॉक्टर म्हणून नाही तर मिटी म्हणून त्यांनी आपली बोच, काही एका विश्वासाने आपल्याकडे बोलून दाखवली असणं शक्य आहे, की गोष्ट तुमच्याकडेच राहील, तिला पंख फुटणार नाहीत. पण तुम्हीं तर अख्ख्या मिपावर जाहीर करून टाकले की हो! अलबत्ता नाव बदललेत, पण इतके डिटेल्स दिलेत की ज्याचा संबंध आहे त्याला कदाचित समजूनही जाईल. आणि तुमचीही पेशंट होती तर मग तुमच्याकडून तर व्यावसायिकतेचेही उल्लंघन झालेय की. मित्राचे नाव पुढे केलेत तरी. जे रिपोर्ट्स तुम्हाला जपून ठेवावे लागतील, ते गोपनीय असायला हवेत ना? माहिती तुंगाला डॉ म्हणून कळणं आणि तुम्हीच टी मिपाजाहिर करणं ह्यात फरक नाही का? मला काहीही म्हणा, वस्तुस्थिती अशी आहे. लिहायचं म्हणाल तर अजूनही विषय आहेत की लोकांचा आयुष्य चव्हाट्यावर ना मांडताही लिहिता येण्यायोगे. नाही का? आणि हो, तुमच्या मताविरुद्ध काही लिहिणे म्हणजे तुमच्याबद्दल आकस असणे, पूर्वग्रह असणे, असा होत नाही.

In reply to by यशोधरा

काहीही.... उगाच बाळ कि खाळ काढणं सुरु दिसतंय. इथं स्त्रीवादी किंवा कौटुंबिक दृष्टीकोन सोडा. ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने बघा. रुपाली पाटील ऐवजी क्ष असं नाव टाकायला हरकत नव्हती. (अज्ञाती सोडणावे चालू शकलं असतं)

In reply to by यशोधरा

आपण मिपावर लिहू नये असे माझे मुळीच म्हणणे नाही, असे कुठे माझया प्रतिसादातून ध्वनितही होत नाहवे. मग ते तिथवरच रहायला हवे होते ना? इथे मिपावर मांडायचा उद्देश्य काय? मला हे नककीच म्हणायचे आहे की आपळता मिटाकडून किंचित का होईना व्यावसायिक नीतीमत्ता पाळली गेली नाही हा निकाल आपण कोणत्या आधारावर करीत आहात? एक मुलगी लग्नाअगोदर गरोदर झाली तिचा गर्भपात केलेलय डॉक्टरांच्या मित्राच्या मुलाशी तिचे लग्न झाले आणि लग्नात डॉक्टरांनी तिला पाहून ते चमकले आणि आता आपल्या व्यावसायिक नीतीप्रमाणे गप्प बसायचे कि नाही या दोलायमान परिस्थितीत ते आहेत यात काय गोपनीयता आहे कि जी मी इथे मांडून व्यावसायिक नीतिमत्ता पाळली नाही. तिला पंख फुटणार नाहीत. पण तुम्हीं तर अख्ख्या मिपावर जाहीर करून टाकले की हो! अलबत्ता नाव बदललेत, पण इतके डिटेल्स दिलेत की ज्याचा संबंध आहे त्याला कदाचित समजूनही जाईल. काय काय डिटेल दिलेत हो ?आणि मित्राला किंवा त्याच्या मुलाला कसे समजेल कि आपल्या सुनेने लग्नापूर्वी गर्भपात करून घेतला आहे. मिपा वाचून? उगाच डोगर पोखरून झुरळ काढू नका त्याने पेशंटबद्दल तुमच्याशी चर्चा केली. तरी एक वेळ त्यांची मानसिक आणि भावनिक उलघाल मी समजू शकते. त्यांना टी मुलगी तुमच्याकडेहीले तपासायला आली होती हे माहीत होते का? आपण लेख नीट न वाचता प्रतिसाद देता याचे हे उघड आणि धडधडीत उदाहरण आहे. लेखात काय लिहिले आहे ते आपल्यासाठी शब्दशः देतो आहे एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. एकदा वाचा आणि मग प्रतिक्रिया देत जा. म्हणून मी लिहिले आहे कि आपला प्रतिसाद पूर्वग्रह दूषित आहे त्याची खात्रीच पटत आहे

In reply to by सुबोध खरे

अहो डॉक्टर, मी माझ्या मनात आलेल्या शक्यता लिहितेय, तुम्हाला आणि तुमच्या मित्रालाही benefit of doubt देतेय, हे लक्षात घेताय का? असो :)

In reply to by यशोधरा

त्यांनी तसं काही गुन्हा केल्याचं दिसलं नाही. त्यामुळे benefit of doubt सोडून द्या. बाकी मनाच्या विषम अवस्थेत जगणारांनी इतरांना असं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं बघून मौज वाटते.

अरे बापरे फारच कोंडी झाली आहे तुमच्या मित्राची. आधी कळलं असतं तर गोपनियतेचे नियम पाळूनही मित्राच्या मुलाला वाचविता आले असते. कोणाच्या भल्यासाठी, आयुष्य वाचविण्यासाठी केलेले गोपनियता मोडण्याचे पापही पाप ठरू नये. जशी, स्वसंरक्षणासाठी हातून झालेली हत्या, कायद्याच्या चौकटीत, 'खून' समजली जात नाही. इथे आपण मित्राच्या मुलाला धुतल्या तांदूळा सारखा मानत आहोत. पण खरंच तो तसा आहे का? हाही कळीचा मुद्दा आहे. कित्येक शांत, सभ्य आणि सुसंस्कारी दिसणार्‍या मुलांच्याही बाहेर 'भानगडी' असतात. पण त्यांना डॉक्टरकडे जावे लागत नाही. त्यामुळे झाकली मुठ सव्वा लाखाची. माझा एक मित्र होता. (होता म्हणजे हल्ली कुठे असतो हे माहित नाही, म्हणून) त्याला 'तशा' बायकांच्या वस्तीत जायची सवय होती. पुढे त्याच्या आई-वडीलांनी त्याचेही लग्न लावून दिले. आम्ही वहिनीला थेट बोहल्यावरच पाहिले. अत्यंत शांत, सुस्वभावी आणि गुणी अशी मुलगी. आम्ही सर्व मित्रच हळहळलो. बिच्चारी, असा विचार मनांत आला. पण काही करू शकलो नाही. त्या मुलीचे आईवडील आमच्या बरोबर बोलताना म्हणाले, 'मुलाचे आईवडील खुप साधे आणि सुस्वभावी आहेत. घराणं चांगलं आहे.' आम्ही नुसत्या माना डोलावल्या. काय करणार? आई वडील खरोखरंच खुप साधे आणि सुस्वभावी होते पण मुलगा.....? आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगी होती. दिसायला सुंदर वगैरे. पण तिचे आमच्या ऑफिसमधल्याच एका, वयाने ज्येष्ठ अशा ऑफिसर बरोबर प्रेमसंबंध होते. तो विवाहित होता. माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलाला ती मुलगी सांगून आली होती. तेंव्हा त्यांनी, मी त्याच कंपनीत नोकरीला असल्यामुळे, माझ्या वडिलांना माझ्याकडे तिच्याबद्दल चौकशी करायला सांगितली. वडिलांनी मला विचारलं तेंव्हा मी एव्हढेच म्हणालो की 'तुमच्या मित्राला, त्यांच्या मुलासाठी, दुसरी मुलगी शोधायला सांगा.' असो.

डॉक्टरसाहेब, तुम्ही व्हॅल्यु जजमेंटल झाला आहात असे दुर्दैवाने नमुद करावेसे वाटते. त्या मुली चे लग्ना आधी एकाशी शाररीक संबंध होते, ह्या गोष्टीवरुन तुम्ही/तुमचा मित्र तिच्या बद्दल/ तिच्या स्वभावाबद्दल / कॅरेक्टर बद्दल जजमेंट पास करत आहात. मुळात ते संबंध लग्ना आधी होते , तिने ते लग्न करायचे ठरवल्यावर संपवले असतील. लग्न केल्यावर / ठरल्यावर जर ती असे संबंध ठेवत असेल तर थोडेसेच जजमेंटल होयला हरकत नाही. पण कोणाचे कोणाशी लग्नाआधी संबंध होते म्हणुन तोच काळीमा असल्यासारखे आयुष्यभर वागवायचे का?

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब, लेख वाचुन तरी असे वाटतय की तुमच्या डॉक्टर मित्राला टोचणी लागली आहे. टोचणी कसली तर तुमच्या डॉक्टर मित्रानी त्याच्या मित्राला रुपाली बद्दल ची माहीती अगोदर दिली नाही ह्याची. म्हणजे कुठेतरी रुपाली चे वागणे ( लग्ना आधीचे ) चुक आहे असे वाटतय . मित्राला सावध करायला पाहिजे होते असेही वाटतय कारण काय तर रुपाली चांगली मुलगी नाही. तुम्ही तुमच्या खालच्या प्रतिसादात हे नमुद पण केले आहे की लग्न पूर्व संबंध चुक वाटत होते, ह्यालाच जजमेंट पास करणे म्हणतात ना.
तेंव्हा आजच्या पिढीचे मापदंड त्याच्या सारख्या बाळबोध मनाला पटणे कठीण आहे. त्या पिढीत लग्न पूर्व संबंध हे चुकीचे मानले जात

In reply to by गंम्बा

तुम्ही जे वाक्य कोट केलंय, ते जजमेंटल वाटत नाही. एखादा समाज /काळ, काय मानतो/ काय नाही याबद्दलचं माझं मत हे त्या मान्यतांबद्दलचं माझं मत असत नाही. जरी मी त्या समाजातला, काळातला असलो तरी.

In reply to by असंका

गम्बा साहेब मी माझे कोणतेही मत या पूर्ण लेखात मांडलेले नाही. माझ्या मित्राच्या असलेल्या विचारसरणी वर आपण मला जजमेंटल ठरवता आहेत हि मुळात चूक आहे. आपण १०. ५३ च्या रुपतिसादात जजमेंटल असल्याचे म्हणता आणि १३. ३७ च्या (मी "नंतर" दिलेल्या) प्रतिसादातील वाक्य उधृत करून आपले म्हणणे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहात. हे चूक आहे.

हल्ली झी मराठी टीव्हीवर एक सिरियल चालू आहे त्यात तर अशी लग्नाआधी प्रेग्नंट असलेली सून डॉक्टर नवर्‍याच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन सगळ्यांच्या डोक्यावर मिरे वाटताना दिसते. तेव्हा हे जरा जास्तच दाखवतात असे वाटले होते! तुमच्या मित्राला कानकोंडे व्हायची गरज नाही. जे काय व्हायचे होते ते झाले. आधी न कळल्यामुळे ते थांबवता आले नाही यात त्याची काही चूक नाही. त्याने त्याची व्यावसायिक नीतीमत्ताही व्यवस्थित पाळली आहे. त्या सुनेकडे संपूर्ण दुर्लक्ष करावे. तिच्याशी बोलायला किंवा भेटायला तर तो जात नाही. त्याचा मित्र आणि मित्राची बायको यांच्याबरोबरची इतक्या वर्षांची नाती तिसर्‍याच कोणामुळे गमावायची गरज नाही. मित्राची सून आपणहोऊन काही सांगायला आली तर सामंजस्याने बोलणे शक्य असेल तर सांगून पहावे. नाहीतर दुर्लक्ष करावे. फारतर आपण तुझ्यासारखे नाही हे सांगून तिला एकदाच झटकून टाकावे. मित्राच्या मुलाने कदाचित सगळे माहीत असताना तिला स्वीकारलेले असू शकेल. कोणाला माहित!

In reply to by पैसा

"हल्ली झी मराठी टीव्हीवर एक सिरियल चालू आहे त्यात तर अशी लग्नाआधी प्रेग्नंट असलेली सून.......हे जरा जास्तच दाखवतात असे वाटले होते!" जरा जास्तच? असा नवरा जगात कोठे असेल तर मी पैसे खर्च करून त्याला बघायला जायला तयार आहे! खरे तर मराठी TV मालिकांवर काही लिहावे एवढी त्यांची लायकी नाही (काही अपवाद असतील तर मला ते माहीत नाहीत.) प्रत्येक मालिकेबरोबर हे चॅनेलवाले अधिकाधिक खालची पातळी गाठताहेत. (हे बोलूनही काय होणार म्हणा; बघणारे बघतातच आणि चॅनेलवाले पैसे कमावतातच. प्रेक्षकांची अभिरुची हळूहळू पण निश्चितपणे खाली जात आहे ह्याचीच फक्त खंत.) BTW , सुबोध खरेंची गोष्ट निश्चितपणे संभाव्य - घडू शकेल अशी - आहे.

In reply to by रविकिरण फडके

This is possible in world - not in India. In my office in USA - a lady became grandma and she got married in the same month.

जर तर च्या गोष्टी... जर मुलाची प्रेमप्रकरण असतील तर? जर लग्नानंतर मुलांनी विवाहबाह्य संबंध ठेवले तर? जर लग्नानंतर मुलींनी विवाहबाह्य संबंध ठेवले तर? माझं मत.. विष आहे हे माहित असेल तर चव बघू नये. पूर्ण चौकशी करून लग्न करावे. हि झाली आपली( माझीही) भारतीय सुंस्कृती. मागे एक यूरोपीय कस्टमर भेटला होता. वयाच्या पंचेचाळिसावाय वर्षी पहिल लग्न करतोय. म्हणतो कसा " तीन तिचं लाईफ एंजॉय केलाय मी माझं ( त्या अर्थी) आता आम्ही लग्न करतोय ". आता बोला..

रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता
हे तिने स्वतः सांगितले का? नसेल तर कशावरून हा तर्क काढला?
मित्राला फसवले गेल्याची भावना
सर्वात पहिले फसवणूक कशी झाली आहे हे स्पष्ट करा. मुलगी आणि मुलाने एकमेकांना सगळं खरं सांगून (आई वडीलांना न कळू देता) लग्न केलं असेल तर? आणि आधी चुका केलेले/झालेले लोक कधीच सुधारत किंवा बदलत नाहीत असा दावा करत आहात का? किंवा आधी अशी चूक केली म्हणून लग्नासाठी तशाच चुका केलेला जोडीदार निवडायचा असा कायदा आहे? म्हणजे एखाद्या विधवेने विधूरच जोडीदार शोधयचा असे काही? बाकीचे नंतर.....

In reply to by मराठमोळा

हा पैलूही विचारात घ्यावा एखाद्या प्रथमवराने विधवेशी लग्न करताना समाज (अर्थात आई वडील-नातलग आणि जवळचे मित्र) मोकळ्या मनाने स्वीकारतो का? जितका उदारपणा आणि पुढारलेपणा आंतरजातीय्/धर्मीय विवाहात आला आहे त्याच्या एक दशाम्शही अश्या प्रकरणात नाही. ममोंचे प्रश्न मार्मीक आहेत खरे !

In reply to by नाखु

जितका उदारपणा आणि पुढारलेपणा आंतरजातीय्/धर्मीय विवाहात आला आहे त्याच्या एक दशाम्शही अश्या प्रकरणात नाही.
असहमत नाखुकाका. Honour killing च्या बहुतांशी घटनांमध्ये आंतरधर्मीय/आंतरजातीय विवाहांची पार्श्वभूमी असते. अगदी शहरांमध्येही. एका प्रसिद्ध गिर्यारोहकाला आंतरजातीय विवाह केला म्हणून पूर्ण गावाने वाळीत टाकण्याची घटना महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात मुंबईपासून काही किमी अंतरावरच घडलेली आहे. त्यामुळे आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांत उदारपणा आणि पुढारलेपणा आलेला आहे हे पटत नाही. जोपर्यंत आंतरजातीय/धर्मीय विवाहांचा वेगळा उल्लेख होणं थांबत नाही, तोपर्यंत पुढारलेपणा आलाय असं म्हणणं चुकीचं आहे.

In reply to by बोका-ए-आझम

आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांत उदारपणा आणि पुढारलेपणा आलेला आहे हे पटत नाही.
जो काही आला आहे (अगदी २-५%) त्याबाबत फक्त निरिक्षण होते,म्हणजे शहाण्णव कुळी मान्य/स्वीकार करीत नसतीलही पण इतर उच्च वर्णीय (सामाजीक उतरंडीमधील, माझ्या मतानुसार नाही) स्वीकारण्याचे प्रमाण वाढत आहे. जैन-मराठा, ब्राह्मण-मराठा,ब्राह्मण-मराठा-पंजाबी-केरळी) माझ्या नातेवाईकांमध्ये मामेभावाच्या मुलीने केरळीयन मुलाशी ल्ग्न केले आहे, तीला मल्याळम इल्ले,त्याला मराठी येत नश्शे. तितक्या सहजपणे/मोकळेपणाने विधुर्/विधवा/घटस्फोटीत यांना प्रथमवर्/वधू स्वीकारत नाहीत आणि स्वीकारले तरी त्या प्रथमवर्/वधू यांच्या घरच्या/मित्र-आप्तेष्टांच्या सामाजीक दडपणाचा अद्रुश्य प्रभाव असतोच.

In reply to by नाखु

सहमत माझ्या पाहण्यात घरच्यांच्या संमतीने (ते ही आनंदाने दिलेली संमती) आंतरजातीय/धर्मीय विवाह अनेक (मी स्वतःही) आहेत. पण प्रथमवराने विधवा/घटस्फोटितेशी लग्न केल्याचे एकच उदाहरण आहे. नात्यातील एका मुलाचे अशा प्रकारे लग्न तेही ठरवून झाले आहे. पण त्याची अडचण अशी होती की त्याचे लग्न जुळतच नव्हते. तो सामान्यपेक्षा किंचित कमी बुद्धीमत्तेचा मुलगा आहे (अगदी गतीमंद नाही म्हणता येणार), त्यामुळे जेमतेम दहावी झालाय (बर्‍याच प्रयत्नांत) , भावाच्या मदतीने व्यवसाय कसाबसा करत आहे बोलण्या वागण्यात हळूहळू सफाई / स्मार्टनेस येत आहे.

In reply to by मराठमोळा

हे तिने स्वतः सांगितले का? होय. कारण आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञ मित्राने गर्भपात कशासाठी करायचा आहे हे विचारले असताना रुपालीने त्यांना हे सांगितले. आमचा मित्र ५५ + आहे. तेंव्हा आजच्या पिढीचे मापदंड त्याच्या सारख्या बाळबोध मनाला पटणे कठीण आहे. त्या पिढीत लग्न पूर्व संबंध हे चुकीचे मानले जात आणि या वयात आपली विचारसरणी बदलणे कठीण आहे. त्याच्या मित्राचा मुलगा हा त्याला आपल्या मुलासारखाच वाटत असावा. समजून उमजून लग्नापूर्वी शरीर संबंध ठेवणारी मुलगी मागच्या पिढीतील कुणीही स्वतःला सून म्हणून करून घेही असे वाटत नाही. तयातून या मुलीने मित्राच्या मुलाशी "त्याच्या पैशासाठी" लग्न केले हि भावना त्याच्या मनातून जात नसावी. अर्थात हे सर्व तर्क आहेत. कारण या प्रकरणात जेवढे मला माहित आहे तेवढेच मी लिहू शकतो. शिवाय कुणी कसा विचार करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

In reply to by सुबोध खरे

हा प्रतिसाद तुम्ही तुम्हाला या धाग्यावर जेव्हा लोकांनी प्रश्न विचारले, तेव्हा स्पष्टीकरण म्हणून दिलाय. जर हा उल्लेख तुम्ही तुमच्या मूळ धाग्यात केला असता, तर असले प्रश्नच उद्भवले नसते. Any way, जर रूपाली आणि तिचा नवरा सुखात असले तर बाकीच्यांना (ज्यात तुम्ही-आम्ही सगळे आलेच) का चौकशा? त्यांच्या घरचा किराणा आपण भरतोय का?

In reply to by बोका-ए-आझम

बोका साहेब आपल्या "स्वतःच्या घरचा" सोडून इतर कुणाचाच किराणा आपण भरत नाही. मग इतर कोणत्याही व्यक्तीबद्दल नाव घेऊन काहीच बोलायचं आपल्याला अधिकार नाही. येथे तर कुणालाच "रुपाली"चे खरे नाव माहित नाही. आणि ती व्यक्ती एक प्रातिनिधिक स्वरूपात आहे. या लेखाचे उद्दिष्ट मी शेवटी टाकत आहेच.

In reply to by मराठमोळा

अगदी हेच्च मनात आलेलं. जर मुलीने मुलाला ऑनेस्टली सांगितलं असेल तर? आणि याहून पुढे, विवाहपूर्व संबंध ही चूक कशी?

ज्याने केले त्याला डर नाही. पण ज्याने सोडवले तोच घाबरायला लागलाय. मित्राचे भले विचार करत असाल तर हळु हळू त्याच्या घरी जाणे थांबवा.

पण आता मापदंड बदलले आहेत ना ? हाच विषय -- लग्नाशिवाय शरीर संबंध - चर्चेत असताना पुढील गोष्ट सांगण्यात आली रोज उशिरा घरी येणाऱ्या मुलीला आई म्हणाली '' तुझे बाबा हे एकमेव पुरुष ज्यांच्या बरोबर मी लग्नाआधी फिरले . तुझ्या मुलीला तू असं सांगू शकशील ? '' मुलगी म्हणाली यात अभिमानाने सांगण्यासारखे काय आहे ? लग्नाच्या बाबतीत माझ्या कायदेशीर सज्ञान वयात [ १८ ते ७५ ] मी पहिले ते असे १] बायकोला किंवा नवऱ्याला सोडले जायचे पण घटस्फोट घेत नसत २] लग्नानंतर सोडलेल्या बायकोने किंवा नवऱ्याने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करणे ३] लग्नाच्या बंधनाखेरीज एकत्र राहणे आताचे जेष्ठ नागरिक १ आणि २ पचवून बसले त्यांना ३ पचवणे मात्र कठीण जात आहे

समजा तुमच्या स्त्रीरोगतज्ञ मित्राने रुपालीचं दुसरं कुठलं operation केलं असतं तर त्याला असं वाटलं असतं का? जिने केलं तिला काही वाटत नाहीये आणि ज्याने operation करुन डाॅक्टरचं कर्तव्य पार पाडलं तो घाबरतोय. हा विपर्यास आहे.
तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता.
हे कशावरून? तिचं त्याच्यावर मनापासून प्रेम अाहे आणि तरीही तिला गर्भ नकोय असं असू शकतं की.

In reply to by बोका-ए-आझम

बोका साहेब दुसरा कुठलंहि ऑपरेशन करण्यासाठी निर्माण होणाऱ्या परिस्थितीला ती मुलगी बहुतांशी जबाबदार नसते. उदा. गर्भाशयात मोठा फायब्रॉईड असेल तर त्याला ती मुलगी जबाबदार नाही. पण नको असलेली गर्भधारणा झाली तर त्याला ती मुलगी (कदाचित १०० % नाही पण) "थोड्याफार प्रमाणात" तरी जबाबदार "असू शकते" तिचं त्याच्यावर मनापासून प्रेम अाहे आणि तरीही तिला गर्भ नकोय असं असू शकतं की. अमान्य असं होतं तर तिने दुसर्याशी लग्न का केलं?

सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो सुनेच्या दृष्टीत तिरस्कार का दिसतो म्हणे? उलटे सुनेने वरमुन पाहिले पाहिजे ना? हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा झाल्या. असो. एकुणच लेखच पटला नाही आणि तुमच्या मित्राचा दृष्टीकोनही नाही. सगळे वाचले असता "तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म राधासुता" या धर्तीवर डॉक्टारच्या मानसिकतेबद्दल प्रश्न विचारायला हवा. दुसरी गोष्ट म्हणजे मुलीने तिच्या गत आयुष्याला मागे सोडुन पुढे कूच केले असेल तर मुलीच्या लग्ना आधी च्या खाजगी आयुष्यावद्दल तुमच्या मित्रालाच काय तर तिच्या नवर्‍याला देखील काही प्रॉब्लेम असायचे काही कारण नाही. नवरा बायकोच्या नात्यात दोघांनीही एकमेकांशी प्रतारणा करु नये मात्र आधी जे काही मात्रासेल ते नजरेआड करावे अश्या मताचा मी तरी आहे. शिवाय तुमच्या मित्राला सांगा की त्यांच्या मित्राच्या मुलाच्या आणि त्याच्या बायकोच्या नात्यात किती पारदर्शकता आहे हे तुमच्या मित्राला कदाचित माहितीही नसेल. कदाचित मुलीने सगळे सांगितलेही असेल. कदाचित दोघांनी संमतीने गत आयुष्याबद्दल विचार न करण्याचा निर्णयही घेतला असेल. कदाचित मुलाचे त्याच्या बायकोवर निरातिशय प्रेम असेल अश्या केसमध्ये तिचे पुर्वायुष्य त्याच्या दृष्टीने (त्या अर्थाने) कदाचित गौणही असेल. या सगळ्या प्रकरणात एकच गोष्ट खटकली ती म्हणजे केवळ पैशाखातर एखाद्या मुलीने एखादे नाते किंवा एखाद्दा संबंध नाकारणे. तिचा दॄष्टीकोन जर खरेच तसा असेल तर मला तिची कीव वाटते आणि तिच्या नवर्‍याबद्दल वाईट वाटते.

In reply to by मृत्युन्जय

शिवाय तुमच्या मित्राला सांगा की त्यांच्या मित्राच्या मुलाच्या आणि त्याच्या बायकोच्या नात्यात किती पारदर्शकता आहे हे तुमच्या मित्राला कदाचित माहितीही नसेल. कदाचित मुलीने सगळे सांगितलेही असेल. कदाचित दोघांनी संमतीने गत आयुष्याबद्दल विचार न करण्याचा निर्णयही घेतला असेल. कदाचित मुलाचे त्याच्या बायकोवर निरातिशय प्रेम असेल अश्या केसमध्ये तिचे पुर्वायुष्य त्याच्या दृष्टीने (त्या अर्थाने) कदाचित गौणही असेल. हे सर्व शक्य आहे. परंतु साठीच्या जवळ आलेल्या माणसाची विचारसरणी आपण बदलू शकत नाही. लग्न बाह्य आणि लग्न पूर्व संबंध चूक आहेत असे मानणाऱ्या पिढीचा माणूस आपले विचार आता बदलू शकेल असे वाटत नाही.

जास्त खोलात जाऊन विचार केलातर एखाद्या मुलीला पैसेवाला नवरा मिळवावासा वाटत असेल तर त्यात काय नैतिक चुक आहे. आपल्यापेक्षा जास्त शिकलेला, जास्त उंच, शरीरयष्टी चांगली असलेला मुलगा नवरा म्हणुन शोधला तर चालते. मग कोणी जास्त पैसेवाला नवरा शोधला तर काय चुक आहे.

In reply to by गंम्बा

मग एखाद्या विवाहपुर्व संबंध नसलेल्या मुलाने विवाहपुर्व संबंध नसलेली मुलगी हवी अशी अपेक्शा केली की लोक्स धावतत त्याच्या मागे बुरसटलेल्या विचारांचा म्हणुन.!

हायला, नॉर्मल तर आहे. मला एका शंकाय, मी स्वतः तर काय लै पैसेवाला नाही पण एखाद्या मुलाला एखाद्या मुलीने मी फक्त तुझ्या पैशासाठी लग्न करतेय असे सांगितल्यावर काय रिऍक्शन असेल मुलाची? इतके दिवस मजबूत कमावल्याबद्दल कृतार्थता वगैरे? किंवा बापाचा पैसा असल्याबद्दल लै भारी वगैरे?

In reply to by अभ्या..

एखाद्या मुलीने मी फक्त तुझ्या पैशासाठी लग्न करतेय असे सांगितल्यावर काय रिऍक्शन असेल मुलाची?
ही गोष्ट मुलाच्या तोंडावर सांगण्याइतक्या मुली मूर्ख असतात असे वाटते का तुम्हाला अभिजीत.

१. मुळात रुग्णाची स्थिती अशी एका डॉक्टरने दुसरी कडे डिस्कस करणे योग्य वाटले नाही. किंबहुना, अशा प्रकारची माहिती, कुठल्याही रोगाच्या बाबतीत दुसरीकडे नेणे योग्य नव्हे. अर्थात त्यामुळे आपल्याला थोडा त्रास होतोच. २. वर बर्‍याच प्रतिसादांमध्ये लिहिल्याप्रमाणे इथे एक गोष्ट क्लियर नाहिये की ही बाब मुलीने मुलापासुन लपवुन ठेवलीय. त्यामूळे आता जे लग्न झालेय त्यात काही प्रॉब्लेम येत नसेल तर काय प्रॉब्लेम नसावा. बाकि विवाहपुर्व/विवाहबाह्य संबंध त्या दोन व्यक्तिंचा मामला असे समजुन सोडुन द्यावे. मिया बिवि राजी तो क्या करे?

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

त्या डॉक्टरनी गोपनीय माहिती कोणालातरी सांगितली असे नव्हे, तर ती मुलगी डॉक्टर खरे यांच्याकडे सोनोग्राफीसाठी आली होती, म्हणजे ती त्यांचीही पेशंट होती. केस हिस्ट्री घेताना इतर काही माहिती त्याना मिळाली ती त्यानी नाव उघड न करता कथनाची पार्श्वभूमी म्हणून सांगितली. यात त्यांची किंवा त्यांच्या डॉक्टर मित्राची काही चूक झालेली नाही. मामला मुलगी आणि तिचा नवरा या दोघातला असेल त्याबद्दल डॉक्टर खरे काही टिप्पणी करत नाहीयेत. ते नवराबायको तिकडे काहीही करू देत. डॉक्टर खरे इथे त्यांच्या मित्राचा प्रॉब्लेम, धर्मसंकट सांगत आहेत. तेव्हा त्यांच्या मित्राच्या प्रॉब्लेमबद्दल आपण बोलण्यातही काही चूक आहे असे मला वाटत नाही.

लग्नाआधीच्या संबंधांमुळे मुलगी व्यभिचारी ठरत नाही. जर का तिच्यावर गर्भपाताची वेळ आली नसती तर कळलं तरी असतं का कुणाला ? मला वाटतं more than anything else भारतीयांची मानसिकता मोठा problem आहे. मुलं सर्वकाही करुन नामानिराळे राह्तात natural advantage मुळे. हेच लग्न केलेल्या मुलाच्याबद्द्ल (लग्नापूर्वीच) काही समजल असतं तर तुमच्या मित्राला वाईट वाटलं असतं का इतकं मुलीबद्दल ? Time to grow up. - श

In reply to by शरभ

लग्न केलेल्या मुलाच्याबद्द्ल (लग्नापूर्वीच) काही समजल असतं तर तुमच्या मित्राला वाईट वाटलं असतं का इतकं मुलीबद्दल ह्याच उत्तर त्यांना वाईट वाटलं असत अस देउ शकतो, कारण त्यांना विवाहपुर्व / बाह्य संबंध मान्य नाहित!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

हो का ? पण त्या केसमध्ये अगदी श्रूंगापत्ती वगैरे मुळीच आली नसती अस मी तुम्हाला सांगतो ! Theory of relativity ! - श

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मुलाबद्दल समजलं असतं तर वाईट वाटल असत हे नक्की का? कारण इथे ह्या कथानकातही एक मुलगा आहेच की असा, पण त्याच्या विषयी काहीही शंका आलेल्या लिहिलेल्या तरी नाहीयेत.

In reply to by यशोधरा

होतेयं का? प्रश्न मुलीबाबत उभा राहिला कारण त्या मुलीने त्यांच्या ओळखीतल्या मुलाशी लग्न केले. ओळख हा मुद्दा गोष्टीस पर्स्नल करतो असे मला वाटते. एखाद्या मुलीने विवाहपुर्व संबंध ठेवलेल्या मुलाशी लग्न केले तर हे प्रीमाय्सेस लागु होईल असे वाटते. ओव्हरॉल डॉक्टरांची पहिल्यावेळेची (जेव्हा अबॉर्शन केले)रिअ‍ॅक्शन समजु शकली नसल्याने हे सगळे शक्यतांवरच राहते.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

ओळख हा मुद्दा गोष्टीस पर्स्नल करतो असे मला वाटते.
करु नये. मुलगी डॉ कडे गेली ते पेशंट म्हणून, तिचे डिटेल्स डॉ ना माहिती आहेत ते व्यावसयिक कपॅसिटीमध्ये. ते पर्सनल लेव्हलला आणायला निदान नकोत तरी.

In reply to by यशोधरा

यशोधरातै, जोपर्यंत त्यांचे संबध डॉ. आणि पेशंट असे होते तोपर्यंत हे ठीक होते. पण आता संबंध पर्सनल लेव्हल ला आलेले आहेत, तेव्हा आता हे पेर्सनल लेव्हलला आणू नका असे म्हणण्यात काय अर्थ आहे? समजा तुम्ही डॉ आहात आणि तुमचा मुलगा तुमच्या अश्या पेशंटशी योगायोगाने लग्न करणार आहे असे तुम्हाला कळले तर तुम्ही काय कराल?

In reply to by आनन्दा

समजा तुम्ही डॉ आहात आणि तुमचा मुलगा तुमच्या अश्या पेशंटशी योगायोगाने लग्न करणार आहे असे तुम्हाला कळले तर तुम्ही काय कराल?
त्यापेक्षा असे समजा. तुमच्या मुलाचे/मुलीचे लग्ना आधी दुसर्‍यांशी संबंध आहेत/होते ( आणि हे तुम्हाला माहीती आहे ), आता त्यांचे लग्न ठरवायची वेळ आली, तर तुम्ही काय करणार? दुसर्‍यांच्या मुला/मुलींबद्दल बोलायच्या आधी स्वता कडे बघा, मग कॉमेंट करा इतकेच नम्रतेनी सांगु इच्छितो.

In reply to by आनन्दा

माझा मुलगा जर लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकतो तर कोणाशी लग्न करावे हाही निर्णय घेऊ शकतोच की. मी काही करण्याचा प्रश्न कुठे आला? त्यांच्या लग्नात वरमाय म्हणून मिरवेन आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. हे अगदी मनापासून सांगते आहे.

विवाहपूर्व संबंध, त्यातनं उद्भवलेली गर्भधारणा ,नंतर दुसर्या मुलाशी लग्न करणे यात नक्की चूक काय समजायचे आहे? या गोष्टी काही नविन नाहीत कुठल्याच काळात. गायनॅक लोक हजार तर्हेच्या गोष्टी रोजचे बघत असतात.ते एवढे अपसेट कसे होतात याचेच आश्चर्य वाटले. विवाहपूर्व बाॅयफ्रेंड आहे.त्याच्याशी संबंध आहेत पण तो लग्न करुन कायम राहण्यालायक नसेलही वाटला तिला.तर तिने का ते ओझे बाळगावे. उगाच आपले नैतिक मापदंड दुसर्याला लावण्यात काय अर्थ आहे? डाॅ असे वागून उगाचच काॅम्प्लिकेशन तयार करत आहेत असे वाटतेय.

In reply to by अजया

गायनॅक लोक हजार तर्हेच्या गोष्टी रोजचे बघत असतात.ते एवढे अपसेट कसे होतात याचेच आश्चर्य वाटले. अशा गोष्टींकडे त्रयस्थ पणे तुम्ही जेंव्हा बघत असता तेंव्हा तुम्हाला त्याचे काहीही वाटत नाही पण हीच गोष्ट तुमच्या जवळच्यांच्या बाबतीत होते तेंव्हा तुम्ही अपसेट होता"च". आपण रोज जर तोंडाच्या कर्करोगाच्या केसेस पाहता तेंव्हा त्यात आपली भावनिक गुंतवणूक नसते. पण हीच गोष्ट आपल्या मित्राच्या बाबतीत होते तेंव्हा त्याचा आपल्याला प्रचंड त्रास/ धक्का बसू शकतो. हि मी प्रत्यक्ष अनुभवलेली गोष्ट आहे.(माझ्या डेंटिस्ट मित्रालाच तोंडाचा कर्करोग झाला होता सिगरेट तंबाखू न खाता )

In reply to by सुबोध खरे

गायनॅक लोक हजार तर्हेच्या गोष्टी रोजचे बघत असतात.ते एवढे अपसेट कसे होतात याचेच आश्चर्य वाटले. अशा गोष्टींकडे त्रयस्थ पणे तुम्ही जेंव्हा बघत असता तेंव्हा तुम्हाला त्याचे काहीही वाटत नाही पण हीच गोष्ट तुमच्या जवळच्यांच्या बाबतीत होते तेंव्हा तुम्ही अपसेट होता"च". >> अनुमोदन. हेच म्हणतोय!

लग्नाआधी काय झालं होतं याचा पुढे संबंध नाही हे वरच्या अनेक प्रतिसादांत आलं आहे. त्याला खच्चून अनुमोदन. त्याबरोबरचः व्यावसायिक नीतिमत्ता पहिली, दुसरी, शेवटची. डॉक्टर, वकील, बँकर, सीए वगैरे लोकांकडे त्यांचे क्लायंट अतिशय विश्वासाने आपल्या गोपनीय गोष्टी सोपवतात. त्यात काही बेकायदेशीर नसेल, तर व्यावसायिकाने ती गोष्ट दुसर्‍या कोणाला सांगायचा काही संबंधच येत नाही.