खरंतर ह्या धाग्याला प्रतिसाद म्हणून लिहीत गेले परंतू ते लांबलं. म्हणून स्वतंत्रच टाकतेय. तरिही त्या धाग्याशी संबधीत असल्याने सुरुवात बदलत नाही.
एक डोंबिवलीकर म्हणून मुविंच्या उद्वेगाशी सहमत. पण एक नागरिक म्हणून या गोंधळाची जबाबदारी आपल्याकडेही येते असं मला तरी वाटतं. त्याबद्द्ल थोडंसं
(१) मी बर्याच वर्षांपासून कचरा वाटेत टाकणार्यांना थोडं सुनावते. त्यासाठीची भाषाही आवर्जून चांगली वापरते. कधी कधी कचरा टाकणारी व्यक्ती शरमेने गप्प बसते कधी "तुम्हाला काय करायचयं" म्हणत अंगावर येते. माझी शारिरिक,राजकिय, सामाजिक शक्ती मर्यादित असल्यानं मी प्रकरण वाढवत नाही. पण इतक्या वर्षात माझ्या बोलण्यात सहभागी होऊन कचरा टाकणार्याला सुनावणारी व्यक्ती मला भेटलेली नाही. आणि माझ्या आजूबाजूला सगळॆ सामान्यच लोक असतात. एका-दोघांनी जरी कचरा टाकणार्याला "काय चुकीचं सांगताहेत रे त्या? " असं म्हटलं तर पुढच्यावेळी तो माणूस विचार करेल पण हे कधीही झालेलं नाही. उलटं माझ्याचकडे "काय वेडी बिडी आहे का ही? कामधंदे नाही दिसत हिला" असे कटाक्ष टाकले जातात. पण तेच मी रस्त्यावर मुर्ती ठेवली आणि त्याला हार घातले तर चार दिवसांनी त्या मूर्तीला हारांचा खच पडलेला असेल किंवा रस्त्यावर जरी टाळ कुटत बसले तर लोक आदरानं बघतील.
(२) रस्त्यात वाटेत गाडी उभी करून गप्पा हाणणारी लोकं पाहिलीत ही सुद्धा सामान्यच असतात. आपल्याला गाडी पार्क करायला जागा नाही म्हणून रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करणारे लोकं सामान्यच असतात.
आता धाग्यातील विचाराबद्द्ल. एकूण व्यवस्थेचा जो बोजवारा उडालाय तो आपल्या सामाजिक जाणिवेचा निदर्शक आहे त्यात धार्मिक आणि विज्ञाननिष्ठ असण्याचा काय संबध? धार्मिक आणि विज्ञाननिष्ठ हे शब्द विरुद्धार्थी का वापरले जातात हे कळलेले नाही. बरं धार्मिक दृष्टीकोन किंवा नशीबावर हवाला ठेवणे या दोन्ही गोष्टी तरी कितपत मदतीला येतात तुमच्या? फक्त मनाचं समाधान होण्याइतपतच. विज्ञाननिष्ठ दृटीकोन बाळगल्याने नुकसान होतं नाही. तर जे नुकसान झालय ते धार्मिक दृष्टीकोन सामाजिक जाणिवांवर स्वार झाल्याने झालय. आणि एकदा का धार्मिकता वाढली की ते अपरिहार्यच असतं.
धार्मिकता बोकाळल्याने समाजाचे जास्त नुकसान झाले आहे. काही मासले....
(१) रस्त्यावर चालताना मध्येच कबुतरांचा थवा आडवा येतो. त्यांना दाणे घातलेले असतात. डोंबिवलीतल्या फडके रोडला तर एका प्रसिद्ध दाक्षिणात्य स्नॅक्स जवळच हा थवा असतो. आणि गाड्या वा माणसं आली की तो उडतो त्यावेळी किती पिसांचं त्या खाद्यपदार्थांवर प्रोक्षण होत असेल हे मनात येऊनच मळमळायला होतं. पण कोणाच्या तरी धर्मात सांगीतलेलं असतं "पक्षीयों को खिलाओ आर्थिक लाभ मिलता है " त्यामुळे आपला नाईलाज होतो.
(२) कुत्र्यांना पोळ्या, बिस्किटे टाकलेली असतात. पुन्हा वरचंच कारण " कुत्तोंको रोटी खिलानेसे दुश्मन का भय नही सताता"
(३) तुम्हाला चालायला जागा नसते मात्र रस्त्यावरच्या मंदीराजवळ गाई बांधलेल्या असतात. कारण "गाय को खिलानेसे ग्रडपीडा नष्ट होती है"
या भाकडकथांवर विश्वास ठेवणार्यांना सामाजिक दृष्टीकोन बाळगणारे धार्मिक का बरं समजावू शकत नाहीत?
(३) सत्संग हा प्रकार कुत्र्यांच्या छत्र्यांसारखा बोकाळलेला आहे. तो होऊन गेल्यावर ती जागा बघावी. उष्ट्या पत्रावळी, द्रोण, हार वैगेरेंचा खच असतो.
(४) गणपतींच्या मिरवणूका आहेतच मग आपण तरी मागे का रहावं असा विचार करून सगळ्याच प्रकारचे धार्मिक लोक मिरवणूका काढत असतात. जैन, अय्यपावाले,नमाजवाले सगळ्यानाच रस्ता अडवण्याचा आणि धर्माचं प्रदर्शन करण्याचा समान हक्क असतो.
(५) गणपती, नवरात्र, दहीहंडी, आताश्या माघी गणपती या सारखे विज्ञाननिष्ठ लोक न्यूटनबाबा, आईनस्टाईन वैगेरेंसाठी रस्त्यात खड्डे खणून रहदारीला आडवं लावत नाहीत. (थेट तुलना करायचा मोह आवरला नाही). या मंडपाचे कर्तेधर्ते जरी राजकिय वजनी मंडळी असली तरी देवभोळी जनता मंडपात गर्दी करते, वर्गणी देते म्हणून नियम मोडायची त्यांची हिम्मत होते. हे मंडप ओस पडू द्यात कोणी या फंदात पडणार नाही. धार्मिक कृत्यासाठी एखाद्याने वर्गणी द्यायला नकार दिला की ही साधीभोळी सामान्य माणसंच त्याला समजावतात "दे रे. एवढं काय? दुरुपयोग होतो हे खरय. पण आपण आपलं देवाच्या नावानं द्यायचं. ते जे करतात त्यांचं पाप त्यांच्या शिरावर". हे पाप त्यांच्या शिरावर टाकण्याचं काम धर्म करतो अशी सोईस्कर समजूत करून घेतल्याने माणूस सारासार विवेकाची किंवा त्या विवेकाचा आवाज मजबूत करण्याची शक्तीच स्वत:हून गमावून बसतो.
(६) धार्मिक सणांना आणि सत्संगांना जेवढं ध्वनीप्रदूषण होतं तेवढं कोणत्याही कार्यक्रमांना होत नाही. बोलायची सोय नाही कारण तक्रार करावी तर आपल्या आजूबाजूचे चार सामान्यही आपल्याबरोबर नसतात.
(७) नियमानं चालणार्यांसाठी या देशात स्थान नाही कारण इथली माणसं इथे असतानाची चिंता करतच नाहीत त्यांना मेल्यावरच्या जगाचं पडलेलं असतं त्यामुळे ते पुण्य गोळा करत असतात. बरं एवढं देवांचं करूनही देव काय गॅरन्टी देत नाही सगळं चांगलंच करण्याची. मग आहेच कर्माचा सिद्धांत मदतीला. मदतीला म्हणजे घटना घडून गेल्यावर कार्यकारण भावाची उठाठेव करायला.
माणसं स्वत:कडे धार्मिक दृष्टीकोनातून बघण्याऐवजी जबाबदार समाजाचा घटक म्हणून स्वत:कडे बघतील तर हे सगळे उद्वेगजनक प्रकार कमी होण्यास हातभार लागेल. माणूस स्वत:ची स्थिती सुधारण्यास दैवी तोडगे करण्यासाठी वेळ देऊ शकतो पण आपल्याला ज्या गोष्टींचा थेट त्रास होतोय त्याला विरोध करण्यासाठी थोडाही वेळ देत नाही. माणसं धार्मिक कार्याला एकत्र येतात पण साध्या आपल्याच हक्क कर्तव्यांना पूरक काम करण्यापासून फटकून रहातात. उदा. लोकांना देवळात जाण्यासाठी, घरी पूजा करण्यासाठी वेळ काढता येतो पण घरच्या कचर्याचं खत करण्यासाठी वेळ नसतो आणि मग रस्ते कसे कचर्याने भरलेत यावर चर्चा रंगतात.
'तुमच्या आजकालच्या ड्रेसपेक्षा आमची नऊवारी भारी', असं माझी आजी म्हणाली आणि मला ते पटलं तरीही मी नऊवारी नेसून ऑफिसला नाही जाऊ शकत. वाट्यावर वाटलेली चटणी किती स्वादिष्ट लागते ते पटलं तरी आपण मिक्सरवरच चटणी करणार. चालणार्याचं भाग्य चालतं यावर विश्वास असला तरी आपण वाहनच वापरतो. मोबाईल आल्यावर दोन दशकांपूर्वीच अपूर्वाईची गोष्ट असलेला पेजर आपण विसरूनही गेलो. अगदी आपण पाटी वापरली असली तरी मुलाच्या हातात आपण (किमान) कागद-पेन्सिल देतो. त्याला लॅपटॉप, मोबाईल हाताळू देतो, वापरायला देतो. कारण काळाप्रमाणे बदल हवा हे आपल्याला माहिती आहे. देवावर कितीही भरवसा ठेवला तरी आपण विमा काढतोच.
त्याचप्रमाणे धर्म ही मानवी इतिहासातली सुंदर गोष्ट आहे. पण ती ऐतिहासिक आहे. विज्ञान प्राथमिक अवस्थेत असताना आजूबाजूच्या घटनांची संगती लावायला उपयोगी पडलेली ती एक कल्पना आहे. ती इतिहासापुरतीच राहूदे. विज्ञानाकडे आजही सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीत हे खरय; पण ती आहेत असा भ्रम विज्ञान उत्पन्न करत नाही. खरंतर रोजच्या जगण्यात त्या उत्तरांची अशी काय गरज असते? पण प्रत्येक प्रश्नांची सोपी उत्तर धर्माकडे आहेत असा समज झाल्याने माणूस धर्माकडे वळतो आणि मग धर्माचे ठेकेदार, बाजारशरण अर्थव्यवस्था सगळेच धर्म सार्वजनिक करण्याला प्रोत्साहन देतात. सुबुद्ध समाजाचा घटक म्हणून प्रत्येकाने आपला धर्म वैयक्तिक ठेवला तर धर्म सार्वजनिक होण्याला आपोआप आळा बसेल आणि किमान रोजच्या जगण्यात ज्या गोष्टी आड येतात त्यांना थेट सामोरं जाता येईल. आणि तसं झालं तर आपलं जगणं बरंच सुसह्य होईल.
आताच्या सगळ्या सुविधा विज्ञानावर अवलंबून राहिल्यानेच मिळताहेत मग त्या उपभोगताना धर्मावर का अवलंबून रहायचं? ते रहावं लागतं कारण समाज म्हणून आपण प्रगल्भ नाही, कारण प्रत्येकजण आपल्या प्रश्नांची उत्तरे धर्म आणि नशीब यात शोधू बघतोय. समाज म्हणून प्रगल्भ होण्यासाठी त्यासाठी आपल्यातली धार्मिक बाजू थोडी आवरती घ्यावी. धर्म ही अंतर्वस्त्राएवढी खाजगी गोष्ट असावी. नशीबावर हवाला सोडण्यापेक्षा प्रत्येकानेच जबाबदार नागरीक बनावे, दुसर्याने तसे बनण्यासाठी आग्रह धरावा. तसा आग्रह धरणार्यांचे आणि त्याला पाठिंबा देणार्यांचे प्राबल्य समाजात असावे. धार्मिक असलं तरी जे समाजाचा घटक म्हणून त्रासदायक होत असेल त्याला विरोध करावा. असा सामूहिक दबाव आला तरच आपण चांगला समाज म्हणून जगू शकू. आपण ज्या हिरीरीने धार्मिक गोष्टींना गर्दी करतो त्या हिरीरीने एक नागरीक म्हणून आपल्या भल्यासाठी चालणार्या गोष्टींकडे लक्ष देऊ त्याला प्रोत्साहन देऊ, त्या गोष्टींच्या पाठीशी उभं राहू तर सिस्टीम सडण्याला आळा बसेल. शेवटी सिस्टिममधला माणूसही देवावर हवाला ठेऊन बसलाय, आणि धर्म त्याला तसं करण्यात काहिही नुकसान नाही असं सांगतो. धर्माने सांगितल्याप्रमाणे पारलौकिक जगाची चिंता करत देवदेव करत बसण्याऐवजी माझं ऐहिक जगणं सुखाचं होण्यासाठी मला ऐहिक नियमच लावून घ्यायला हवेत. देश भ्रष्टाचारात बुडतो कारण आपण करतो ते "समर्पयामि" करायची सोय आपल्याला धर्मानं दिलेली आहे, त्यामुळे बेजबाबदारपणे वागता येतं.
दैवावर,नशीबाबर हवाला ठेवायचं म्हणजेच जे सामोरं येईल त्याला स्वीकारायचं. हे तर मग विज्ञानही सांगतं की कोणाच्याही वाट्याला रँडमली काहिही येऊ शकतं. मग ते झेलण्यासाठी माझी मनोभुमिका तयार असायला हवी तर माझ्या आजूबाजूची व्यवस्था समाजासाठीच्या नियमांनी व्यवथित बांधलेली असावी तर माझा ताप कमी होईल. ही विज्ञाननिष्ठ भूमिका असेल तरच समाज म्हणून आपली प्रगती होईल. शेवटी समाज म्हणून सुधारण्यातच आपलं हित आहे. दुसर्याचं घर कितीही चांगलं असलं आणि माझं तिथे स्वागत होतं असलं तरी माझं घर मला स्वच्छ ठेवायलाच हवं कारण सगळ्यांनीच शेजार्याच्या घरात रहायचं ठरवलं तर अवघडच परिस्थिती होईल. आणि पुढच्या पिढ्यांनी पळपुटेपणाच शिकवल्याबद्द्ल जाब विचारला तर आपण निरूत्तर असू.
वाचने
14474
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
असं करु नका. आयडी उडेल ;)
In reply to ते स्वतः काही करत नाहीत पण by असंका
सर्वसामान्यांची श्रद्धा
In reply to ते स्वतः काही करत नाहीत पण by असंका
अम... मला काहीच कळलं नाही
In reply to सर्वसामान्यांची श्रद्धा by राही
तुम्ही हा खुलासा केला नसता तर
In reply to सर्वसामान्यांची श्रद्धा by राही
माझा भयंकर गोंधळ होतोय...
In reply to तुम्ही हा खुलासा केला नसता तर by सतिश गावडे
अगदी
In reply to तुम्ही हा खुलासा केला नसता तर by सतिश गावडे
तुमचं गणित चुकतंय. कदाचित.
तुम्ही चुकीचं उदाहरण देताय.
In reply to तुमचं गणित चुकतंय. कदाचित. by असंका
तुम्ही चुकीचं उदाहरण देताय.
In reply to तुमचं गणित चुकतंय. कदाचित. by असंका
प्रभू सरांच्या बाबतीत ती
In reply to तुम्ही चुकीचं उदाहरण देताय. by अंतरा आनंद
चर्चा भरकटत आहे असं नाही वाटत
आप 'मिपा'पर हो.
In reply to चर्चा भरकटत आहे असं नाही वाटत by संदीप डांगे
लेख पूर्ण भरकटला आहे असे मला
हेच!
In reply to लेख पूर्ण भरकटला आहे असे मला by गंम्बा
धन्यवाद.
In reply to लेख पूर्ण भरकटला आहे असे मला by गंम्बा
लेख पूर्ण भरकटला आहे असे मला
In reply to लेख पूर्ण भरकटला आहे असे मला by गंम्बा
लेख आवडला.
मिपा वर्तमानपत्रातील परिक्षण...(लेखाबाबत आणि प्रतिसादाबाबतही)