Skip to main content

विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे फार कठीण

लेखक तिमा यांनी गुरुवार, 04/08/2016 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या भ्रष्टाचारात बुडालेल्या देशांत, विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे, हे फार कठीण आहे. उदाहरणे देऊनच ह्या वाक्याचे स्पष्टीकरण देतो. समजा, तुम्हाला तातडीने दुसर्‍या गांवी जायचे आहे. वाटेत अनेक पूल आहेत. ते सरकारी यंत्रणांनी तपासून वाहतुकीला खुले ठेवले आहेत. सामान्यतः तुम्ही ठरवल्याप्रमाणे इच्छित स्थळी पोचणारच. पण भ्रष्टाचारी देशात अनेक प्रश्न उदभवतात. आता ते तपासणार्‍या यंत्रणांमधील इंजिनियर्स हे खरोखरच ज्ञानी आहेत की कुठल्यातरी कोट्यातून अ‍ॅडमिशन मिळून पास झालेले आहेत ? तसेच ते ज्ञानी असले तरी कामाशी प्रामाणिक आहेत का नाही ? त्यांच्यावर वरुन दबाव आला आहे का ? या सर्व शक्यतांवर तुमचा प्रवास सुरक्षित आहे का नाही हे ठरते. पावलोपावली भ्र्ष्टाचाराचा अनुभव असल्यामुळे, तुम्ही जास्तीतजास्त काय काळजी घेणार ? म्हणजे शेवटी देवावर्/दैवावर भरवसा ठेवूनच तुम्ही प्रवासाला निघणार! हाच प्रवास रेल्वेने करायचा झाला तरी वरीलप्रमाणेच प्रश्न उदभवतात. आरोग्यासाठी हिरव्या भाज्या, ताजी फळे खावी असे सांगतात. त्याप्रमाणे तुम्ही आहारात बदल केलेत. तुमच्या खाण्यात शुद्धच भाज्या फळे येतील की रंगवलेली, मेण लावलेली येतील याची काय खात्री ? म्हणजे पुन्हा देवावर, नशिबावर भरवसा ठेवणे आले. तुम्हाला चर्चगेटहून बांद्रयाला जायचे आहे, वेळ कमी आहे म्हणून तुम्ही विरार फास्ट पकडली आहे. पण दरवाज्यातल्या टोळक्याने तुम्हाला उतरुनच दिले नाही किंवा वाद घातल्याबद्दल चालत्या गाडीतून ढकलून दिले तर तुम्ही इच्छित स्थळी, वेळेत पोचाल याची खात्री काय ? पुन्हा नशिबावर भरवसा. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ?

वाचने 26836
प्रतिक्रिया 169

प्रतिक्रिया

In reply to by गवि

तालियाँ. .. संपादित व्यक्तिगत टिपणी टाळावी. .......... व्यवस्थेला निव्वळ नावं ठेवण्यापेक्षा व्यवस्थेमध्ये उतरून सुधार करावा.

In reply to by उडन खटोला

....व्यवस्थेमध्ये उतरून सुधार करावा." आपण बहूदा असे करायचा प्रयत्न केला असावा किंवा करणार असाल. मी प्रयत्न केला.अपयश आले आणि माघार घेतली. तितका वेळ आणि पैसा आणि श्रम माझ्याकडे नाहीत.

In reply to by उडन खटोला

व्यवस्था चालकांना हेही जमत नाही का?

In reply to by गवि

पण.... जी जी शहरे मी दर १०-१२ वर्षांनी पाहतो, ती ती शहरे (मग ते डोंबोली असो, की बदलापूर किंवा ठाणे किंवा कल्याण, विदर्भातल्या वर्धा, नागपूर, इथलीही परिस्थिती काही वेगळी नाही.) दिवसेंदिवस अधिकाधिक बकाल झालेलीच आणि सामाजिक सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेलीच दिसतात. कदाचित आमच्या नजरेचा दोष असेल.

In reply to by गवि

उत्तम प्रतिसाद गवि! भारत आणि अमेरिका या दोन देशांत वास्तव्यानंतर सर्व जन्मांचं उत्तमात उत्तम फळ म्हणूनच भारतात जन्म मिळाला असंच मलाही म्हणावंसं वाटतं. काळासोबत हे मत अधिकाधिक पक्कं होत गेलं आहे. गेल्या साठ वर्षात भारताची चांगली प्रगती झाली आहे. उत्तरोत्तरही प्रगतीच होणार आहे असा मला विश्वास वाटतो.

कोणताही देश परफेक्ट कधीच नसतो. त्याला परफेक्ट बनवावं लागतं. सगळंच काही राजकारण्यांवर सोपवुन शिव्या देत बसण्यात काही अर्थ नसतो. नाम सारख्या लोकसहभागातुन साकारलेल्या संस्थांनी हे दाखवुन दिले आहे.

In reply to by मोहनराव

नाम बीम या सगळ्या राजकारणी लोकांच्या दृष्टीतून "निरुपद्रवी" संस्था आहेत. त्याच्यातून बाकी काहीही सध्या होणार नाहीए. व्यवस्थेत काहीही बदल होणार नाहीएत हे सत्य आहे. जर का व्यवस्थेत बदल करायचा , अगदी व्यवस्थे विरुद्ध एखादा प्रश्न विचारायचा प्रयत्न जरी केलात ना तर इथे भारतात तुमचा सतीश शेट्टी ( भ्रष्टवादी च्या राज्यात ) / सत्येंद्र दुबे ( भाजपच्या राज्यात ) होतो. अशी शेकडो उदाहरणे इथे भारतात मिळतील. अमेरिकेत असे होत नाही. फक्त माफिया ला नादाला तर शक्यता आहे .. नाहीतर बहुतेक वेळा नाहीच. फॉक्स वॅगन चा झोल शोधला गेला. इथे असा कोणी शोधायला गेला असता तर कधीच वर पोचला असता.

मागच्या जन्मी मुविंनी वेडीवाकडी पापे केलीत. या जन्मात सरळ पापं करा ;) नेक्ष्ट जन्म वेगळ्या देशात मिळेल

In reply to by आनंदी गोपाळ

होना... एक साधे चालणे पण ह्या देशांत स्वस्थपणे उपभोगू देत नाहीत. एका देशात, मी कधी सलग ५-६ किमी चालत असतांना ना फूटपाथ मध्ये खड्डा आला ना कुणी हॉर्न वाजवला ना फेरीवाले आडवे आले. असो, प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या. तसेच, वैयक्तिक आणि सामाजिक जाणीवेच्या कल्पना पण वेगळ्या-वेगळ्या. एखाद्याला हॉस्पीटलच्या खाली सुरु असलेला बँड म्हणजे आनंद वाटत असेल, (आमचा सण आहे, आम्ही वाजवणारच, हे उत्तर ऐकलेले आहे.) तर दुसर्‍याला त्या हॉस्पीटल मधल्या रोग्यांविषयी कणव वाटत असेल.

इंजिनिअर कोणत्या कोट्यातून आला त्यावर पुलाचे भविश्य ठरते हे लॉजिक पटले नाही.आणि आजकाल खाऊजा धोरणामुळे pwd ला काही काम नसते .सगळे पुल ,सार्वजनिक बांधकामं खाजगी कंपण्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन बांधली जातात,अश्या कंपण्यात ' जात्यात हुशारचा ' टेंभा मिरवणारेच अधिक आहेत हेवेसांनल.परवा जो पुल पडला तो १९२८ साली बांधला होता व त्यावरचे विंजेनिअर त्याकाळानुसार 'जात्याच हुशार' कॅटेगरीतले होते.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

पुलाचे भविष्य ठरवायला इंजिनिअरची कॅटॅगरी काढायची गरज नाही हे पटले. पण हे सांगताना १९२८ सालच्या इंजिनिअरची कॅटॅगरी काढणेदेखिल तितकेच हास्यास्पद. बादवे १९२८ सालच्या ईंजिनिअरने आपले काम चोख केले आहे. आजच्या स्ट्रक्चरल ऑडीट करून या पुलाला पास करणार्‍याबद्दल विधान असते तर एकवेळ समजू शकतो.

काय झालं तिमा? निराश होण्यासारखं काही तात्कालिक घडलंय का? तुम्ही निराश वाटताय. तुम्हालाच यातून बाहेर यावे लागेल. मध्यंतरी अशा काही दुर्दैवी घटना एकामागून एक कानावर आल्या की रोज सकाळी आपण उठून श्वास घेतो आणि उद्याचा विचार करतो हाच मोठा चमत्कार वाटायला लागला. खरंच माणूस म्हणून जन्माला येणं हे मोठं नशीबच म्हटलं पाहिजे. मग ते मिळालेलं किंवा घडलं/बिघडलेलं आयुष्य बरंवाईट कसंही असो. त्याचा विज्ञाननिष्ठ असण्या नसण्याशी काही संबंध नाही. आपण मेलो की श्वासाबरोबर सगळंच संपणार आहे. तेव्हा आपल्यासाठी देव नशीब आणि ज्ञान विज्ञानासकट सगळंच संपलेलं असेल. नका जास्त विचार करू. आला तो दिवसच काय क्षण सुद्धा आपला म्हणायचा. उद्या कोणी बघितलाय?

In reply to by पैसा

तिमांचा मुद्दा फार वेगळा आहे. इतरांनी केलेल्या चुकीसाठी, सामान्य माणसाने आपले आयुष्य पणाला का लावावे? आणि त्या चुकी साठी हे असे बळी का जावेत?

In reply to by मुक्त विहारि

चूक कोणाची कसे ठरवणार? आपण सगळेच त्या सिस्टीमचा भाग आहोत. दुसर्‍याकडे बोट दाखवून मोकळे होता येत नाही. आणि खरंच सांगा, आपण माणूस म्हणून जन्मलो नसतो तर हे सगळे असेच वाटले असते का? तुम्ही विज्ञाननिष्ठ रहा की पोथीनिष्ठ, पुढच्या क्षणी आपण जिवंत असू अशी काय गॅरेंटी आहे? तरी आपण उद्या सकाळी उठून काय करणार याचा विचार करतोच ना!

In reply to by पैसा

असे नसते हो. साधारणतः प्रत्येक आस्थापनांत, अपघातांची पुनरावृत्ती परत घडू नये म्हणून प्रयत्न केले जातात. त्यासाठी योग्य ती उपाय=योजना पण केली जाते. एखाद्या व्यक्तीचे नैसर्गिक मरण वेगळे आणि एखाद्या गटाचे सामुहिक अपघातात मरण ओढवणे वेगळे. हलगर्जी पणामुळे घरी असतांना गॅसच्या सिलिंडरचा स्फोट होवून अपघात होणे आणि हलगर्जी पणामुळे एखाद्या हॉटेलमधील गॅसचा स्फोट होवून अपघात होणे वेगळे. काही आस्थापनात काही वर्षे डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काम केलेले असल्याने, भारतात सामाजीक सुरक्षेला अद्यापही म्हणावे तसे स्थान नाही, हे खेदपुर्वक म्हणावे लागते. ------- "आपण माणूस म्हणून जन्मलो नसतो तर हे सगळे असेच वाटले असते का?" कधी-कधी वाटते की, ह्या जगांत माणूस जितका स्वार्थी, तितका कुणीही स्वार्थी नाही.त्यामुळे इतर कुठल्याही प्राण्यांच्या रुपात जन्मलो असतो तरी, बहूदा माणसांच्या बाबत असेच मत आज तरी झाले असते. घरातील पाळीव प्राणी पण ह्या ना त्या रुपात त्यांना दिलेल्या अन्नाची परतफेड करत असतात, पण मनुष्य प्राणी मात्र, जिथे खाईल तिथेच घाण करेल.

In reply to by मुक्त विहारि

भारतात सामाजीक सुरक्षेला अद्यापही म्हणावे तसे स्थान नाही, हे खेदपुर्वक म्हणावे लागते.
सहमत ! बहुधा जास्त लोकसंख्या असल्याने ( अपघातात) माणूस मरणे ही घटना सामाजिकरीत्या संवेदनशील राहिली नाही.

In reply to by पैसा

मी निराश वगैरे अजिबात झालो नाहीये. या देशांत जन्म घेतल्याचा मला आनंद आणि अभिमानच आहे. आपल्या देशावर प्रेम आहे म्हणूनच महाड सारख्या घटना घडल्या की दु:ख होते. वरवर पहाता ती नैसर्गिक आपत्ती वाटली तरी त्यामागे आपल्या सडलेल्या सिस्टिमचाही सहभाग आहेच. जे आज एकमेकांवर दोषारोप करत आहेत, त्यांना जर आधी त्या पूलाची माहिती होती तर दोन वर्षे स्वस्थ का बसले ? गेलेल्यांविषयी कुणालाच दु:ख नाही, उलट त्यातून राजकीय कुरघोडी सुरु झाल्यात. मी फक्त राजकारण्यांना दोष देत नाही. या देशातल्या प्रत्येक माणसाला, 'मी करीन ते प्रत्येक काम परफेक्ट करीन' असे वाटेल तो सुदिन. बाकी या निमित्ताने ज्या प्रतिक्रिया आल्या व येत रहातील त्या सर्वांचे आभार.

In reply to by तिमा

'मी करीन ते प्रत्येक काम परफेक्ट करीन' असे वाटेल तो सुदिन.... असे होणे शक्य नाही. ह्या देशात बर्‍याच व्यक्ती घरात व्यवस्थित असतात, पण घराबाहेर पडल्या, की मग बेशिस्त होतात. आमचे एक बुजुर्ग म्हणायचे ,"शिस्तबद्ध लोकांचा बेशिस्त देश, म्हणजे भारत." सध्या ते इंग्लंडला असतात. "वरवर पहाता ती नैसर्गिक आपत्ती वाटली तरी त्यामागे आपल्या सडलेल्या सिस्टिमचाही सहभाग आहेच.जे आज एकमेकांवर दोषारोप करत आहेत, त्यांना जर आधी त्या पूलाची माहिती होती तर दोन वर्षे स्वस्थ का बसले ? गेलेल्यांविषयी कुणालाच दु:ख नाही, उलट त्यातून राजकीय कुरघोडी सुरु झाल्यात." ते तर फार पुर्वी पासून सुरु आहे.अगदी १०००-१२०० वर्षां पासून हीच स्थिती आहे.अगदी चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून.पण निदान त्यावेळी चाणक्य तरी होता, आता चुकुन एखादा चाणक्य झाला तर त्याला पण कुठल्या तरी लफड्यात अडकवतील. म्हणूनच म्हणालो की, हा देश अधोगतीच्या मार्गावर आहे आणि आता प्रगतीचा मार्ग ही फार दूर आहे.

In reply to by स्पा

मी अत्ता असाच विचार करत होतो , रेजविक, आईसलॅन्ड येथे जॉब मिळायला हवा आवडता देश, जगापासून दूर असतो :)

In reply to by आदूबाळ

मला अ‍ॅक्चुअली तसे आवडेल :) शिवाय नॉरदन अटलान्टिक उष्ण प्रवाहामुळे वातावरण कायम उबदार असते म्हणे. जसे अलास्का , नॉर्वे वगैरेत कच्या काई निगेटीव्ह २०, ३० ४० असते तसला काही प्रकार इथे होत नाही म्हणे ! शिवाय लोकसंख्या केवळ साडेतीन लाख आहे म्हणजे आमच्या सातार्‍यापेक्षा कमी !! हे म्हणजे बेस्टच की हो !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बघा, सीरियसली विचार करत असाल तर सांगा. माझी एक मैत्रीण आईसलँडिक आहे - रेकयेविकच्या जवळ त्यांच्या कुटुंबाचा घोड्याचा तबेला आहे.

In reply to by आदूबाळ

बेस्टच की ! तुम्हाला सविस्तर व्यनि करतोय ;) बाकी घोड्यांच्या तबेल्याचा रेफरन्स कळाला नाही , आम्ही आपले ब्यंकर आहोत , एक्सेल वर्ड मधे कागदी घोडे नाचवणारे !!

In reply to by आदूबाळ

हा हा हा.. लय भारी ..!! "मार्कुस घोड्यांच्या तबेल्यात घोड्यांना खरारा करताना आणि लाल केसांची एक (टंच, मादक इ.इ.) तरुणी तबेल्याच्या दारातून नेत्रपल्लवी करताना ... " असं दृश्य समोर आलं राव. (स्वगत : आदूबाळच्या जबरा वळखी दिसत्यात ब्वॉ. मालक लक्ष असू द्या. ;) )

In reply to by अस्वस्थामा

लाल केसांची एक तरुणी
लाल केस , अरेरे , रेकयेविक मध्ये जाऊन लाल केसांचे काय कौतुक ? आम्ही प्लॅटीनम ब्लाँड केसांची स्वप्ने पहात आहोत ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

मला माहीतए तुम्ही कोण आहात. :) आईसलँडच्या बँकांच्या लफड्यानंतर आता तिथे एक्सेलीय घोडे नाचवण्यासारखं काही उरलेलं नाही. प्लॅटिनम ब्लाँड केसांची आकांक्षा पूर्ण होईल. आईसलँडिक लोकं व्हायकिंग लोकांचे वंशज आहेत. त्यांनी आपल्या स्वार्‍यांत सगळ्या सुंदर सुंदर तरूणी पळवून नेल्या अशी एक ऐतिहासिक बोलवा आहे ;)

अगोदर " विज्ञाननिष्ठ " रहाणे याची व्याख्या तर स्पष्ट करावयास हवी. मी कोणतेही औषध घेतो, त्यावेळी ते औषध कशा पध्दतीने बनविले आहे ? त्यात कोणकोणते घटक मिसळलेले आहेत ? त्याचा माझ्या शरीरावर नेमका परिणाम कसा होणार आहे ? मी आजारातून बरा होणार की माझे काहीतरी " बरें वाईट " होणार ? ज्याने औषध बनविले,ज्याने लिहून दिले,ज्याने विकत दिले , त्या सर्वांचीच पात्रता मी तपासतो कां ? माझा त्यावेळी उद्देश असतो की मी आजारातून लवकरात लवकर मुक्त व्हावे. बरं, एका डॉक्टरचा गुण आला नाही, तर मी लगेच दुसर्‍या डॉक्टरकडे जातो, त्यावेळी त्याही डॉक्टर ची गुणवत्ता अगोदर तपासतो कां ? नाही ना ? म्हणजे प्रत्येक घटनेमागे अशी विज्ञाननिष्ठा लावत गेलो तर जगणे कठीण होईल, असे नाही कां वाटत ? त्या साठी अगदी देश वा शहर बदलावयाचे, इतक्या टोकाला जाण्याची गरज काय ? याबाबत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेला विचार मला अधिकच आश्वस्त करतो, त्यांनी लिहून ठेवले आहे की " वाईटात वाईट काय घडेल, त्याचा विचार करुन , प्रत्येक पाऊल टाकावे. इंग्रज सरकार जास्तीत जास्त काय करील , मला फाशी देईल, यापेक्षा अधिक काय करु शकेल ? " याचा अर्थ मी घरातून बाहेर पडतांना, म्रुत्युपत्रच खिशात ठेवून बाहेर पडावे असेही नाही. थोडं तारतम्यानं जगायला शिका, अगदीच निराशा पदरी बाळगणे बरं नव्हे.

In reply to by हेमन्त वाघे

https://www.youtube.com/watch?v=kwY2iWBYYT0 https://www.youtube.com/watch?v=T1WbCBVGCHg https://www.youtube.com/watch?v=jmJt9CtaWaU&spfreload=10 https://www.youtube.com/watch?v=Y8O_t5_mfLQ https://www.youtube.com/watch?v=Ob-zIOJz3A0 https://www.youtube.com/watch?v=o-3K7TtECZQ https://www.youtube.com/watch?v=UuO61eJ-NJM जमल्यास ह्या गणपती उत्सवाच्या वेळी डोंबिवलीत या. आणि ध्वनी प्रदूषणाचा मस्त आनंद घ्या. मी नसेन. कारण ते १०-१२ दिवस आणि नवरात्र मी डोंबिवलीच्या बाहेर असतो.

¥}÷¤\♥£¤£》£♡€¡▼☆▼☆:-(▪▪☆▼:'(▲☆▼:'(▶☆▼♣▲:-(▶▼▼:-(▼☆☆▼☆▼:O•◆▼☆▼☆▼:O▼:-(•★▶:'(:'(•:-(▼→▪☆▶☆▶:-(▼☆▼☆▶:O▶:'(▶☆▶☆▶☆▼:-(▶☆▼☆▼:'(▼☆:-)☆▶:'(▶☆○☆:-):'(◀:O→;-)♧○→▶:'(:-):O▶♧•←:-):'(▪:O▼♧▶:'(:-):'(▶:O▶☆▼:-(:-):-)☆▶:O•♧▶→:-):-(▶☆▶★•→◇◀:-):'(:-):'(:O▼•♧◀♧:-):'(▼☆•♣◀□▼♧°♣○:'(:-)☆▶♣▼:'(▶:'(:-)☆▶♧•→▶:-(:-)→▼☆•★

धाग्याच्या आशयाशी आणि मुविंच्या प्रतिसांदाशी सहमत आहेत. त्याचं असं आहे, माझं पण माझ्या देशावर प्रेम आहे,याचा अर्थ असा नाही कि देशाबद्दल काही नकारात्मक बोलायचचं नाही. 1) अन्न - सर्वांना मिळत नाही,कुठे सडून नष्ट होते तर कुठे लोक कुपोषित होतात. 2) वस्त्र - अनेक अर्धनग्न लोक्स भीक मागताना इकडेतिकडे/सार्वजनिक ठिकाणी पाहिले आहेत.तर काहीजण 10 लाखाचा कोट घालतात. 3)निवारा - बरेचजण बेघर आहेत,तर काहीजणांची एकापेक्षा अधिक घरे असतात. तर अशी सगळी विषमता पसरली आहे. या देशात माणसाला किंमत नाही,इतर प्रगत देशांत माणसाला किंमत आहे,तिथे कामगार सुद्धा कामावर कार घेवून येतात आणि इकडे मालक लोन काढून कार घेतो.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

विषमतेच्या तीनही मुद्द्यांबद्दल सर्वच देशात समानता आहे, वेळ मिळाला की अधिक लिहितो, बाकी सर्वांना, अजून मुद्दे येऊ द्यात...सविस्तर समाचार घेईन म्हणतो ☺

दिल्लीत सलूनमध्ये ३०० रुपये देऊन केस कर्तन करणारे अमेरिकेत स्वत:चे केस स्वत: कापतात. खिश्यात डॉलर नसेल तर गुंड लोक तुम्हाला गोळी घालू शकतात. गोळ्या तर कुणीही कुठे हि चालवू शकतो. शिवाय इराक, सिरीया यमन कदाचित पाताळलोकातून हि भारतीय लोकांना हाकलले तर शेवटी या मायभूमीतच याचे लागेल. पाळणार्या लोकांना सतत पाळावेच लागते.

अजुन शतक नाही? आमच्या वेळचे मिपा राहिले नाही हेच खरे.

लेखनातली कळकळ आणि आसपास दिसणाऱ्या अव्यवस्थेमुळे होणारी अगतिकता भिडते. मात्र मला विज्ञाननिष्ठ या शब्दाबद्दल थोडंसं कोडं आहे. मला जो अर्थ माहीत आहे त्यानुसार विज्ञाननिष्ठ म्हणजे आसपासच्या घटनांचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अर्थ लावतो आणि भावनांऐवजी तर्कावर आधारलेले निर्णय घेतो असा. हा लेख तर्कापेक्षा भावनेवर आधारलेला दिसतो. याचं कारण खालीलप्रमाणे. 'आसपास दुरवस्था आहे आणि त्यामुळे माझं जीवन धोक्यात आहे' हे विधान सत्य आहे, मात्र या धोक्याचा अंदाज घेणं, आणि आपल्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता किती आहे याची मोजमाप करण्याची प्रवृत्ती लेखात दिसली नाही. तो प्रयत्न केला असता तर असं लक्षात येईल की आपल्याला वाटणाऱ्या अनेक प्रकारच्या भीती या गरजेपेक्षा जास्त फुगलेल्या असतात, तर काही प्रचंड धोकादायक गोष्टी आपण बिनधास्त करतो. उदाहरणार्थ - पूल पडून किंवा बांधकाम पडून होणारे मृत्यू किती? अचूक आकडेवारी माझ्याकडे नाही. पण सदृढ पुलावर कारच्या अॅक्सिडेंटमध्ये मरणारांचं प्रमाण यापेक्षा कितीतरी जास्त आहे. अमेरिकेत साधारणपणे दहा लाख प्रवासांमागे एक मनुष्य मरतो. भारतातही हा आकडा साधारण याच आसपास असावा. पुलांवरून रोज कोट्यवधी माणसं जातात. मात्र पूल पडल्याची बातमी होते. रोजमर्रा शेकडो माणसं अपघातात मेल्याची बातमी होत नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळा प्रवास करण्यासाठी कारमध्ये किंवा बसमध्ये बसताना भीती वाटत नाही. विज्ञाननिष्ठ राहून जगणं कठीण ऐवजी तुम्हाला नियतीवादी असल्याशिवाय जगणं कठीण असं म्हणायचं आहे का? पण तेही पटत नाही, कारण गेली कित्येक दशकं माणसाचं जीवन नियतीवर कमी कमी आधारित होत गेलेलं आहे. पेशव्यांकडे त्याकाळच्या सर्वोत्तम सुविधा होत्या, पण त्यांचा मृत्यू २९ व्या वर्षी टीबीने झाला. आज सामान्य माणूस आपला टीबी बरा करून घेऊ शकतो. काही वेळा डोळ्यासमोर घडणाऱ्या प्रसंगांमुळे उद्विग्न व्हायला होतं हे खरं आहे. मात्र जग प्रचंड सुधारलं आहे यात समाधान मानण्यासाठी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन खरं तर खूप उपयोगी पडतो.

In reply to by राजेश घासकडवी

प्रत्येकवेळी न पाहिलेल्या भूतकाळाशी तुलना करुन बळंच आनंदी राहणे हीसुद्धा विज्ञाननिष्ठता नाही. तेव्हा माणसे पटापटा मरायची म्हणून जिवंत असलेल्यांना किंमत होती. तेव्हाच्या टीबी न झालेल्या माणसाची आनंदाची पातळी आणि आजच्या टीबी न झालेल्या माणसाची आनंदाची पातळी यात काही फार फरक नसावा. पण आजच्या माणसाचं विविध गोष्टींवरचे अवलंबित्व बघता हतबलतेची भावना येणे स्वाभाविक आहे.

In reply to by नगरीनिरंजन

भूतकाळ कसा होता याचा विचार केल्याशिवाय सध्याची परिस्थिती बघितली तर 'परिस्थिती बिघडत चाललेली आहे' अशी उद्विग्नता येणं सहज शक्य आहे. पण जवळपास प्रत्येक बाबतीत गेली काही दशकं-शतकं परिस्थिती सुधारते आहे हे समजून घेतलं तर ती उद्विग्नता कमी होऊ शकते.
तेव्हाच्या टीबी न झालेल्या माणसाची आनंदाची पातळी आणि आजच्या टीबी न झालेल्या माणसाची आनंदाची पातळी यात काही फार फरक नसावा.
यावर विश्वास बसणं कठीण आहे. शंभरेक वर्षांपूर्वी - किमान साठ-सत्तर टक्के लोक अतीव दारिद्र्यात खितपत होते. - दलित आणि अस्पृश्य लोकांना शिवाशीव विटाळ यापायी पाणी मिळण्याचीही ददात होती. - जवळपास प्रत्येक दांपत्याने आपल्या एक किंवा दोन मुलांना पाच-दहा वर्षांच्या आत अग्नि दिलेला होता. - टीबीपलिकडे अनेक रोगांच्या साथी लाखो-कोट्यवधी लोक मारून जात. देवीचे व्रण, पोलियोची अपंगता आणि कुष्ठरोग घेऊन अनेक लोक वावरत होते. - सरंजामशाही आणि वसाहतवादाने आख्खं जग ग्रासलेलं होतं. लोकशाहीचा नामोनिशाणाच फक्त होता. - शिक्षण मोजक्याच लोकांना उपलब्ध होतं. ही यादी अजून वाढवता येईल. माझा मुद्दा असा आहे की सुधारणा होत आहेत. अजून बरंच अंतर जाणं शिल्लक आहे. पण सुधारणा चालू आहेत हे ध्यानात घेतलं तर उद्विग्नता कमी होऊन आशावादाला जागा निर्माण होईल.

In reply to by राजेश घासकडवी

जे मिळालयं ते पचून जाते व विसरायला होते. जे मिळालेले नाही त्याची मात्र सदैव उजळणी होते. माणसाच्या प्रगतीला हे जरी हे आवश्यक असले तरी.. कित्येक वेळेस ही उजळणी नैराश्य वाढवते. आणि तिथेच स्वत:ला सांभाळायचे असते. असो.

In reply to by राजेश घासकडवी

उद्विग्नता ही देखील मानवी भावना आहे आणि हळूहळू सुधारणा होत असल्यातरी आपल्या हयातीत आपल्याला हवे तसे आयुष्य जगायला मिळणार नाही म्हणून उद्विग्नता येते आणि ते पूर्णतः स्वीकारार्ह आहे. साठ-सत्तर वर्षांपूर्वी साठ-सत्तरटक्के लोक दारिद्र्यात खितपत होते असे म्हटल्याने मला त्या दारिद्र्यातून सुटल्याचा प्रत्यक्ष आनंद थोडीच मिळणार आहे? उलट आत्ता ह्या क्षणी युरोपात लोक कसे जगतात हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मुळात समकालीन सोडून भूतकाळातल्या लोकांशी तुलना का करावी? आत्ता जर्मनीत राहणार्‍या माणसांशी तुलना का करायची नाही? तिमांनी उद्विग्नता मांडली म्हणजे त्यांच्या इतर सगळ्या भावना करपल्या असे नाही. किंवा आता विज्ञान सोडून ते देवदेव करायला लागणार असेही नाही. भारतात विकसित देशांच्या तुलनेत उद्विग्नता येण्यासारखी परिस्थिती आहे. पूर्वी काय होतं आणि भविष्यात काय होणार त्याने वर्तमान बदलत नाही. आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीत अब्जावधी लोक आहेत हे माहित असूनही उद्विग्नता येते आणि ते नॉर्मल आहे.

In reply to by नगरीनिरंजन

अर्धा ग्लास कसा बघितला जातो त्यावर अवलंबून आहे, चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या देशात असतात, प्रत्येकाचे प्रश्न त्यांच्यासाठी महत्वाचे असतात , आज अमेरिकेचं कौतुक वाटत असला तरी २००८-२०१२ पर्यन्त तिकडे नोकऱ्यांची भयंकर परिस्थिती होती, असं प्रत्येक देशाचं काहीतरी असतंच, कोणत्याही काळात निव्वळ चांगले किंवा निव्वळ वाईट घडत नसते, परस्पर दोन्ही सुरूच असते,

In reply to by राजेश घासकडवी

>>>पूल पडून किंवा बांधकाम पडून होणारे मृत्यू किती? अचूक आकडेवारी माझ्याकडे नाही. असं नाही बाबा करायचं. बनवता की आकडेवारी तुम्ही. मस्त आलेख वगैरे काढता रंगीत. करा ना गडे. ;) १.सर्वसामान्य लोकांच्या बेजबाबदारपणामुळे होणारे अपघात २. सर्वसामान्यांमधल्या काही ठराविक लोकांमुळे होणारे बलात्कार आणि मृत्यू, ३. सर्वसामान्यांमध्ये होणाऱ्या भ्रूण हत्या ४. सर्वसामान्यांमध्ये दिसणारं व्यसनाधीन व नंतर दीन होण्याचं प्रमाण ५. बेशिस्त वागणं, चोऱ्या या सगळ्याला नक्की कोण जबाबदार आहे? पुलाचं ऑडिट करुन त्याला वापरास योग्य असा शेरा देणारा माणूस सरकारी आहे म्हणून आपण सरसकट श्या देतो (द्यायला पाहिजेतच) पण त्याबरोबर असंच मरणारे लोक अनेकानेक आहेत. त्यांचं काय?

अवांतर धाग्याच्या मजकुरापासून थोडे दूर जाऊन, पण काही प्रतिसादांमध्ये दिसलेल्या देशान्तर म्हणजे देशद्रोह किंवा 'छे छे' (नो नो) गोष्ट, या मुद्द्यावर लिहावेसे वाटते. चांगल्या (इथे 'चांगले' म्हणजे काय, यावर मतान्तर होऊ शकते.) भविष्याची हमी देणार्‍या ठिकाणी स्थलान्तर ही खरेच जन्मभूमीशी प्रतारणा होऊ शकते काय? समृद्धी-संपत्तीच्या आशेने भारतात अनेक लोक आले त्यांनी त्यांच्या भूमीशी प्रतारणा केली काय? शक, हूण, आयोनियन्स्, तुर्क, झोराश्ट्रियन्स, मुघल, ब्रिटिश हे सर्व त्यांच्या त्यांच्या देशाचे द्रोही होते काय? उलट बाजूने, ज्या दक्षिण भारतीयांनी स्रि लंका, इन्डोनीशिया, मलेशिया येथे, किंवा मौर्यांनी अफ्घानिस्तानात साम्राज्यवर्धन केले तो सर्व भारतवर्षाशी द्रोह होता काय? (अफ्घानिस्तान तेव्हाही वेगळा प्रदेश म्हणूनच ओळखला जात असे, जरी सोयरिकी होत होत्या तरी.) किंवा सत्यनारायणकथेतला साधुवाणी दूरदेशी गेला, वरसईकर गोडसे भटजी द्रव्याच्या आशेने आर्यावर्ती गेले , नशीब काढायला अनेक जण परदेशी जातात, किंवा अगदीच जवळचे म्हणजे कोंकणातले लोक दोनशे वर्षांपूर्वीपासून मुंबईत आले, सध्या बिहारी, ओडिया लोक येतात हा त्यांच्या जन्मभूमीशी द्रोह ठरतो का? जन्मभूमी म्हणजे काय? देश म्हणजे काय? की चतु:सीमांचे सध्याचे वास्तव म्हणजे देश? राष्ट्र आणि देशमधल्या अर्थातल्या फरकाची गुंतागुंत सोडून देऊ. पण समजा उद्या विदर्भाचे राज्य झाले तर वैदर्भीयांची महाराष्ट्राशी निष्ठा भूमिद्रोह ठरेल काय? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मारल्या गेलेल्या १०५ लोकांना त्यांनी 'हुतात्मा' म्हणणे आवश्यक असेल काय?

आनंदात जगणे हा जनरली सर्वांचा जगण्यामागे मुख्य हेतू असतो. आनंदाची व्याख्या व्यक्तीपरत्वे बदलते आणी असते हे मान्य करायला हवे. उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी 'बेस्ट फिट' शोधून तो स्विकारणे कधीही योग्यच. जर कुणाला (त्याच्या मते)दुसर्‍या देशात आनंदी आणी समाधानी आयुष्य जगण्याचा पर्याय उपलब्ध असेल आणी तो ती व्यक्ती स्विकारत असेल तर ईतर कुणालाही त्यात आक्षेप असू नये आणी ते चूक की बरोबर हे ठरवण्याचाही अधिकार असू नये. (अर्थात अमूक देश खराब आहे असे म्हणण्यापेक्षा, मला सुटेबल नाही किंवा मला हा जास्त सुटेबल आहे असे म्हंटले की वाद होणार नाहीत. जसं एखादी नोकरी/कंपनी खराब आहे पेक्षा मला ती सुटेबल नाही म्हणून बदलली असे कारण तीच नोकरी दुसर्‍या कुणाला परमोच्च आनंद देणारी ठरू शकते) बर्‍याच जणांना हा पर्याय उपलब्ध नसतो, किंवा काहींना असूनही तो बेस्ट फिट नसतो. परफेक्ट लाईफ कुठेच नसावे. प्रत्येक देशात्/शहरात अधिक उणे असतेच पण मला/माझ्या गरजा/ईच्छांना कोणता सुट होतो ते मीच ठरवावे. भारताला पाणी, वाहतूक, प्रदूषण, लोकसंख्या, भ्रष्टाचार आणी अश्या अनेक समस्यांनी घेरले आहे आणी त्या वाढत आहेत हे मान्य आहे, पण काही लोकांना ह्या समस्या दुय्यम वाटू शकतात. आपला निर्णय किंवा विचार दुसर्‍यांवर लादण्याचा प्रकार म्हणजे 'आद्यगाढवपणा' ;) आहे असे मला वाटते. ('मला डॉक्टरने या लक्षणांवर हे औषध दिले म्हणून तुही तेच घे' प्रमाणे). अवांतर :परफेक्शनिस्ट मानसिकतेच्या लोकांना सध्या भारतात असलेल्या समस्यांना सामोरे जाणे फार कठीण असते असे निरिक्षण आहे.)

जन्माला यायचच नाही हा पर्याय असतो का? कुणाच्या पोटी जन्माला यायच हा पर्याय असातो का ? ? मातृभूमी हि कितीही वाईट असली तरी मातृभूमीच आहे. चुकीचे संस्कार असतील कदाचित पण आपली स्वताची आई आवडली नाही म्हणून घर सोडून दुसऱ्या कुणाच्या आईकडे जाण्यातला प्रकार आहे हा..

In reply to by नावातकायआहे

मान्य.... पण एखादी आई आपल्या मुलांवर अन्याय होवू देत नाही. "आपली स्वताची आई आवडली नाही म्हणून घर सोडून दुसऱ्या कुणाच्या आईकडे जाण्यातला प्रकार आहे हा.." तुम्हाला कदाचित "चोर आणि चोराच्या आईची" कथा आठवत असेल. आई-वडील-भावंडे-नातेवाईक-धर्म-मातृभाषा आणि देश जन्मण्या पुर्वी निवडता येत नाहीत. पण, समजा जर तुमचे आणि त्यांचे पटत नसेल तर त्यांना सोडून स्वतःला जिथे समाधान वाटेल तिथे जाण्यात काहीच वावगे नाही.असे माझे मत. एखाद्या व्यक्तीने, जर आयुष्यभर इमाने इतबारे इनकम टॅक्स भरला असेल, तर त्याला सर्व प्रकारच्या सार्वजनिक सुविधा योग्य त्या दरांत मिळाल्याच पाहिजेत...आणि आपला देश इथे कमी पडत होता, कमी पडतो आणि कमी पडणार. आज मला किंवा माझ्या घरच्यांना ही चिंता नाही,(सुदैवाने आमची आर्थिक आणि कौटुंबिक बाजू ह्या बाबतीत बक्कम आहे.) ह्याचा अर्थ असा नाही की मी इतर गरीब लोकांची चिंता करू नये. आज तुम्ही नौकरी करत असाल, इनकम टॅक्स ही वेळेवर आणि कायदेशीर भरत असाल. मग तुमच्या अतिसामान्य अपेक्षा पण हा देश पुर्ण करतो का? ह्याचे उत्तर जर होकारार्थी असेल तरी ठीक आणि नकारार्थी असेल तरी ठीक. एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या नजरेने त्या बाजू कडे बघतो. तुम्ही तुमच्या जागी सुखी आणि मी माझ्या जागी.

In reply to by मुक्त विहारि

एखाद्या व्यक्तीने, जर आयुष्यभर इमाने इतबारे इनकम टॅक्स भरला असेल, तर त्याला सर्व प्रकारच्या सार्वजनिक सुविधा योग्य त्या दरांत मिळाल्याच पाहिजेत...
सगळ्या सार्वजनिक सुविधा योग्य दरातच मिळतायेत की.

एखाद्या व्यक्तीने, जर आयुष्यभर इमाने इतबारे इनकम टॅक्स भरला असेल, तर त्याला सर्व प्रकारच्या सार्वजनिक सुविधा योग्य त्या दरांत मिळाल्याच पाहिजेत...आणि आपला देश इथे कमी पडत होता, कमी पडतो
हे मान्य. पण उम्मिद पे दुनिया कायम आहे साहेब! Have faith!!
>तुम्ही तुमच्या जागी सुखी आणि मी माझ्या जागी.

In reply to by नावातकायआहे

एके काळी म्हणजे १९८० पर्यंत आम्हाला पण हेच वाटत होते.... पण पुढे हर्षद मेहता घोटाळा, राखीव जागेच्या जागी आलेली बांधकामे आणि इतरही बर्‍याच गोष्टी बघण्यात आल्या. स्वातंत्र्य मिळून भारताला जितकी वर्षे झाली जवळपास तितकीच वर्षे द.कोरियाला पण झाली. पण, आज भारतातील जपानची आणि द.कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स आणि गाड्यांची बाजारपेठ जवळपास सारखीच आहे. असो, देशा विषयी फार कटू सत्ये बोलण्यात अर्थ नाही.

वाईट वाटलं हा लेख वाचून. मागच्या काही वर्षात भारतात काही गोष्टी बिघडल्या असतील, पण बऱ्याच गोष्टी सुधारल्या पण आहेत. विविध जाती, धर्म, भाषा आणि 'बॅकग्राऊंड' असणाऱ्या 125 कोटी लोकांना सांभाळणे गम्मत नव्हे. इथे तर छोट्या छोट्या लोकल organisations सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात. leadership चा अनुभव असलेल्यांनी खरे खोटे ते सांगावे. भारतापेक्षा बाहेरील/प्रगत देशातील जीवन सुकर आहे - असं सरसकटीकरण आपण करू शकत नाही. बरीच लोकं प्रगत देशात स्थायिक होतात आणि तेवढीच लोकं स्वइच्छेनी भारतात परत पण येतात. कोणाला तरी भारतातलं जीवन आवडत नाही म्हणून भारताला नावं ठेवणं योग्य नव्हे.(मुवि काकांचा आदर ठेवून बोलतोय) माझ्या मते - मला माझा देश आवडत नाही म्हणून मी बाहेर देशात स्थायिक झालो तर 'घर का ना घाट का' अशी अवस्था माझी होऊ शकते. तिथे पण समस्या आहेतच. त्यामुळे आणि पाहुण्यासारखं राहण्याची फीलिंग येत असल्यामुळे, माझी येणारी पिढी कदाचित मलाच नावं ठेवेल. मुवि काका इतकं छान लिहितात. त्यांच्या लेखणीची ताकद या देशाला अधिक चांगलं बनवायला नक्कीच मदत करू शकेल. (मला कामानिमित्त देशात आणि देशाबाहेर राहावं लागत बरेचदा. हवेत बोलत नाही. लिहिण्याची सवय नाही. चूकभूल माफ करावी.)