पाठलाग - कथा - ( काल्पनीक ) - भाग १
पाठलाग - कथा - ( काल्पनीक ) - भाग २ -- पुढे चालु
आज अजित आतुरतेने आपल्या मित्राची, रवीची वाट पाहात होता . थोड्याच वेळात रवी त्या हॉटेलमध्ये आला . तोही नुकताच एक प्रोजेक्ट संपल्यामुळे एकदम निवांत मुडमध्ये होता . अजितने लगेच दोघांसाठी चहा आणी काहितरी खाण्यासाठी मागवले . चहा आणी खाणे होईपर्यंत दोघांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या . नंतर अजितने मुख्य विषयाला सुरुवात केली .
"रवी , तुला तर माहितच आहे . बरेच दिवस मी चित्रपट बनवण्याचा विचार करतो आहे . माझ्या मनात एक चित्रपटाचे कथानक घोळत आहे . माझी इच्छा आहे की आपण दोघांनी मिळुन या कथेवर आणी चित्रपटावर काम करावे . कथा , पटकथा , संवाद , दिग्दर्शन या सगळ्याच बाबतीत मला तुझी मदत लागेल ."
"जरुर . तु काहितरी नवीन करु पाहतो आहे तर मी तुझ्या पाठीशी आहेच . आता तर मला दुसरी कुठलीच असाईनमेंट नाही . तेव्हा माझा पुर्ण वेळ मी नक्कीच या प्रोजेक्टला देउ शकेन ." रवीने त्याला हसत हसत पाठिंबा दिला .
"थँक्स रवी . आज मी तुला या चित्रपटाची कथा ऐकवायलाच बोलावले आहे . या कथेची गंमत म्हणजे जवळपास सहा महिन्यांपुर्वी मी इथेच .. आत्ता आपण जिथे बसलो आहोत इथेच बसलो असताना अचानक सुचत गेली . जसं काही कुणीतरी माझ्या कानात हि कथा सांगत आहे असंच मला वाटत होतं "
"असं ... कमाल आहे . " रवीलाही आश्चर्य वाटले . तो अजित पुढे सांगत असलेले कथानक ऐकु लागला .
"या चित्रपटाचे थोडक्यात कथानक असे आहे .. एक लहानसे गाव .. त्या गावामध्ये असलेला सावकारांचा भव्य वाडा .. सावकारांचा बिघडलेला मुलगा साहेबराव ..हा साहेबराव गावातील चार रिकामटेकड्या गुंडांना हाताशी धरुन गावभर टगेगिरी करत फिरत असतो . गरिबांना दमबाजी करत असतो . गावातीलच एका गरीब कुटुंबातील शहरात शिकत असलेला मुलगा किस्ना हा एकदा गावात येतो . साहेबरावाच्या गुंडगिरीला तो अनेकदा प्रतिकार करतो . चिडलेला साहेबराव एकदा किस्ना बेसावध असताना त्याला पकडुन गुंडांकडुन बेदम मारहाण करतो . किस्ना कसाबसा वाचतो . सुडाने पेटुन उठलेला किस्ना साहेबरावला जाब विचारण्यासाठी एका रात्री सावकारांच्या वाड्यामध्ये येतो . पण साहेबरावाला एका चमच्याकडुन याची आधीच खबर मिळालेली असते . त्यामुळे तोही सावध असतो . संधी साधुन तो किस्नावर गोळीबार करतो . जखमी झालेला किस्ना तशाही अवस्थेत साहेबरावाशी दोन हात करतो . आणी आपला सुड पुर्ण करतो ."
अजितने आपले कथानक ऐकवले . तो रवीच्या प्रतिक्रियेची वाट बघत होता . थोडा विचार करुन रवी म्ह्णाला .
"कथेचा आराखडा चांगला आहे . तरिही प्रेक्षकांना दोन अडीच तास गुंतवुन ठेवण्यासाठी आपल्याला कथेवर बरेच काम करायला हवे . पण ते आपण दोघे मिळुन नक्की चांगल्या रितीने करु . आपले निर्माते सुनीलभाई हि कथा ऐकुन खुश होतील . आजच आपण त्यांना भेटायला जाउ ."
रवीची प्रतिक्रिया ऐकुन अजितला बरे वाटले . त्याला खुप धीर आला . रवीला एक फोन करायचा होता म्हणुन तो बाहेरील फोनबुथवर गेला . बिल पेमेंट करुन आता अजितही निघायच्या बेतात होता . तेवढ्यात अचानक त्याच्या कानावर शब्द पडले .
"नमस्कार साहेब . माफ करा . मी या मागच्याच टेबलवर बसलो होतो . त्यामुळे तुम्ही सांगत असलेली कथा माझ्या कानावर पडली . तुमची कथा खुप छान आहे . मला खुप आवडली ."
एक हसतमुख तरुण अजितशी बोलत होता . मुळचा तरतरीत असलेला त्याचा चेहरा थोडा दमल्यासारखा दिसत होता. त्याच्या अंगावरचे कपडे किंचीत मळलेले , जुनाट वाटत होते . तो तरुण उत्साहाने पुढे बोलु लागला .
"साहेब , तुमचे हे कथानक ऐकुन मला माझ्याच गावाची , धाकसगावाची आठवण आली . आमच्याही गावात असाच एक सावकारांचा मोठा वाडा आहे . योगायोग म्हणजे त्यांचेही नाव साहेबरावच आहे . तुम्हाला जर कधी मोकळा वेळ असेल तर नक्की धाकसगावला भेट देउन या . सावकार साहेबांचा वाडा पाहुन या . अगदी तुमच्या मनात असलेल्या वाड्यासारखाच तो असेल अशी मला खात्री आहे . एकदा नक्की धाकसगावला भेट देउन या . ते गाव इथुन जवळच आहे . "
त्या अनोळखी तरुणाचे बोलणे ऐकुन अजितला मनातुन आनंद झाला . या अनोळखी तरुणाला जर आपली कथा आवडली तर या कथेवरचा चित्रपट लोकांनाही नक्कीच आवडेल असा विश्वास त्याला वाटु लागला . त्या तरुणाचे आभार मानुन तो निघाला . हॉटेलच्या दारातुन बाहेर पडताना त्याने सहज तो तरुण जिथे बसला होता त्या टेबलकडे पाहिले . पण आश्चर्य म्हणजे तिथे कोणीच नव्हते . ते टेबल रिकामे होते . तेवढ्यात आपले फोनवरचे बोलणे संपवुन रवी तिथे आला , त्यामुळे त्या अनोळखी तरुणाचा विचार त्याच्या मनातुन निघुन गेला .
अजित आणी रवी , दोघेही त्यांचे चित्रपट निर्माते सुनीलभाईंना भेटले . रवीच्या अंदाजाप्रमाणे त्यांनाही हे कथानक आवडले . अजित आणी रवी यांच्याबरोबर पुर्वीही काम केले असल्याने त्यांचा दोघांवरही विश्वास होताच . त्यांनी पुढील एक , दोन दिवसांतच दोघांनाही चांगली रक्कम देउन करारबद्ध केले . आणी पटकथेवर लवकर काम चालु करण्याचा सल्लाही दिला .
दोघेही खुश होउन तिथुन बाहेर पडले . अचानक अजीतला त्या हॉटेलमधे भेटलेल्या तरूणाची आठवण झाली . त्याने रवीला घडलेला प्रसंग सांगीतला . रवीलाही त्या तरुणाने दिलेले मत ऐकुन तो एक शुभशकुनच वाटला .
"रवी , तो अनोळखी तरुण म्हणजे आपल्या चित्रपटाच्या कथेचा पहिला श्रोता . कथा आवडली सांगतानाच का कुणास ठाउक .. तो मला परत परत त्याच्या गावाला ..धाकसगावाला भेट द्या ..तिथला सावकार वाडा पाहुन या असे कळकळीने सांगत होता . मला तर वाटते आहे की त्याच्या इच्छेला मान देउन आपण आपले काम सुरु करण्यापुर्वी एकदा धाकसगावला भेट देउन येउ . "
"जरुर . तेवढीच आपलीही एक ट्रिप होउन जाइल . बरेच दिवस बाइकवरुन कुठे फिरलो नाही . आपण उद्याच धाकसगावला जाउ . मलाही आता तो सावकार वाडा बघायचा आहे. " रवीनेही उत्साहाने अजीतच्या बेताला मान्यता दिली .
पुढल्याच दिवशी सकाळी दोघेही बाईकवरुन धाकसगावकडे निघाले . वाटेत एक चांगले हॉटेल बघुन त्यांनी खाणे पिणे उरकुन घेतले . धाकसगाव तसे दोन अडीच तासांवर असले तरी दोघेही रमत गमत प्रवास करत असल्यामुळे , ते गावात पोचले तेव्हा दुपारचा एक वाजला होता .
---------------------- काल्पनीक ------------- क्रमशः-----------------------
प्रतिक्रिया
1 Aug 2016 - 10:19 pm | लालगरूड
येउद्या भुतं....
1 Aug 2016 - 11:05 pm | ज्योति अळवणी
आणि चा णि हृस्व आहे हो! बाकी कथानक हळू हळू पकड घेत आहे. पुढचा भाग येउद्या
2 Aug 2016 - 12:04 am | अमितदादा
पुभाप्र...
2 Aug 2016 - 12:07 am | अभ्या..
मस्त जमलीय सिरुसेरीजी, येऊ द्या पटप्पटा पुढील भाग.
2 Aug 2016 - 12:53 pm | सिरुसेरि
धन्यवाद .
2 Aug 2016 - 1:42 pm | स्पा
सुरुवात दमदार झालीये
2 Aug 2016 - 7:04 pm | एस
अरे वा! थरारकथा दिसतेय. पुभाप्र.
2 Aug 2016 - 11:28 pm | अभिदेश
तुम्ही जर हे कथानक 1960 म्हणताय , पण पात्रांची भाषा मात्र आजची वाटतीये.