Skip to main content

हमखास हिट - दाल बाटी!

लेखक पिलीयन रायडर यांनी शनिवार, 30/07/2016 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी माणसाला साधी सोपी पोळी-भाजी सोडून सुखाचा जीव भयानक कटकटीच्या गोष्टीत गुंतवायची हुक्की येते. आज तसाच एक दिवस होता.. दाल बाटीचा! तर त्याचं असं झालंय की माझ्या आईच्या वडीलांकडुन, अण्णांकडुन, माझ्याकडे असंख्य गुण आलेत. त्यातला एक म्हणजे दाल बाटीची आवड! जगात अ‍ॅक्चुअली दालबाटी एका पद्धतीने करतात, माझी आई दुसर्‍या पद्धतीने करते, सासुबाई तिसर्‍या पद्धतीने करतात आणि मी... अंदाजपंचे करते! लोक निखार्‍यात वगैरे भाजुन कसल्या कसल्या जीवघेण्या बाट्या करतात. आपल्याला तसलं काही येत नाही. कारण आपल्याला एका लेकराला सांभाळून स्वयंपाक करायचा असेतो किनई.. मग असले टाईमपास परवडत नसतेत! तर अंदाजपंचे थोडी कणिक, मक्याच पीठ आणि रवा घ्या. त्यात चवीपुरतं मीठ टाका आणि घ्या तिंबुन. तिंबलेल्या पीठाचे गोळे करुन घ्या. एका गोळ्याला तेल लावुन त्याची लंबुळक्या आकाराची पोळी लाटा. ह्या पोळीला तेल लावुन तिचा रोल करुन घ्या. रोलची दोन टोके एकत्र आणुन त्याची घडी घाला. ही झाली बाटी! (पहा फोटो!) ही बाटी करण्याची आमच्या माहेरची पद्धत. सासरी डायरेक्ट गोळाच बाटी म्हणुन घेतात. काही ठिकाणी बहुदा त्याला बाफले म्हणतात. kanik bati 1 आता इथुन पुढे तुमच्याकडे दोन पर्याय आहेतः- हेल्दी किंवा सेक्सी...! हेल्दी रेसेपी आमच्या मातोश्रींची आहे. ह्यात बाट्यांना कुकरमध्ये उकडुन घ्या. आणि मग तुपात परतुन घ्या. कमी तेला/तुपात केलेली सात्विक डाएट बाटी! सेक्सी रेसेपी आमच्या सासुबाईंची आहे. ह्यात काय करायचं की बाट्या डायरेक्ट उकळत्या पाण्यात टाकायच्या. नीट शिजल्या आहेत हे कसं कळणार? तर त्यात सुरी खुपसुन उचलुन पहायची. बाटी त्यावरुन निसटून खाली पडली आणि सुरीवरही बाटी लागलेली दिसली नाही तर शिजली म्हणायची. पण हा त्याचा सेक्सीनेस कोशंट नाहीये!! cooking bathi cooling ह्या बाट्यांना चांगलं निथळुन घ्यायचं. मग थंड करुन त्यांचे तुकडे करुन घ्यायचे. आणि हे तुकडे कुरकुरीत "तळुन" घ्यायचे. ही झाली सेक्सी बाटी! frying हा सगळा उद्योग चालु असताना बाजुला चिंच गुळाचं आंबट वरण करुन घ्यायचं. (आणि तळलेल्या बाट्या खायला आलेल्यांना हाकलुन लावायचं!) ह्या बाट्या वडा सांबार सारख्या वरणात डुंबत टाकुन खायला मजा येते! माहेरी साध्या वरणासोबत खातात. किंवा गुळ तुपात कुस्करुनही खातात. Daal Bati कशाही खा, बाट्या कधीच चुकत नाहीत हे माझ्यासाठी महत्वाचं! ;)

वाचने 49664
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

शेवटचा फोटो आकर्षक आहे. हा प्रकार आमच्या बाजुला होत नाही. कधी खाल्ला ही नाही. कणकेचे गोळे बाफुन (आमच्यकडे बाफणे म्हणजे उकडणे) कसे लागतील याची कल्पना नाही. बोलव एकदा. :) जाता जाता.. धागा वाचत असताना काही शब्द असे दाता खाली आले की क्षणभर चुकुन मी पल्याडच्या संस्थळावर तर नाही ना पोहोचलो असे वाटून गेले. ;)

अच्छा ! असं कनेक्शन आहे तर... चांगला प्रकार. सालं हा प्रकार आमच्या चिकुल्याच्या जवळचा वाटतो. पुपाशु. -दिलीप बिरुटे

In reply to by कंजूस

चकोल्या म्हणजे लाटलेली पोळी शंकरपाळी सारखे किंवा अगदी छोट्या गोल बिस्किटाएवढे तुकडे करुन उकळत्या आमटीत टाकायचे आणि शिजवायचे. बाटी किंवा बट्टी आक्खा कणकेचा गोळा उकडणे/भाजणे/ तळणे वगैरे ना???

In reply to by उडन खटोला

चकोल्या चौकोनी कापून वरणात शिजवतात. बाटी चुलीत भाजतात.. शिजवुन फ्राय करणे हे त्याचे मॉडर्न वर्जन आहे. दाल वेगळी शिजवतात

In reply to by चंपाबाई

>>>>>चकोल्या चौकोनी कापून वरणात शिजवतात चंपाबै, चकोल्या नुस्त्या उकड़ून घेतात राव. वरण कुठून आलं यात...... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चपातीच्या गोलाचे चकोल्या कापून घेतात. तुरीचे वरण शिजत ठेवतात , घोटतात . त्यात चकोल्या सोडुन ते वरण शिजवुन त्यात ते तुकडे शिजवतात

In reply to by कंजूस

थांबा ! आमच्याकडच्या चिकुल्या लवकरच टाकतो. कब है नाग पंचमी ? उस दिन हमारे पास चिकुल्या बनत्या है. इनके व्हर्जन में मक्याचं पीठ और रवा होता है हमारा पीव्वर गेहू के आटे के होते है. आवं पाकृ लेखिकेचा अभ्यास कमी पड़तोय. उदा. शी सेज "लोक निखार्‍यात वगैरे भाजुन कसल्या कसल्या जीवघेण्या बाट्या करतात" अरे भाऊ त्याला वरिजनल शब्द आहे, रोडगा. त्याला बाफल्या (ळ) म्हणतात. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सत्वर पावगे मला, मरीआई रोडगा वाहीन तुला. ह्येच्यातला रोडगा असा असतोय व्हय. धन्यवाद मरीआई, धन्यवाद प्राडो सर.

In reply to by अभ्या..

हो हे ऎकलंय आधी. बहुतेक एकनाथांचं भारूड ना? बाकी भारूड प्रकार आपल्याला लय आवडतो. सर काय म्हणता? धागा येवूद्या यखादा भारूडावर..

In reply to by किसन शिंदे

देवा, नाथांच्या गवळणी आणि भारुडावर कोणी तरी लिहिलं पाहिजे सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥१॥ सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥ सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥३॥ जाऊ माझी फडाफडा बोलति । बोडकी कर गं तिला ॥४॥ नणंदेचं पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥ दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥६॥ एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥७॥ सासु, सासरे,जाऊ, नंदेचं पोर, हे काम, क्रोध ,मोह, मत्सर आहेत या सर्वांना जाऊ दे, असा त्याचा अर्थ. नाथांच्या काळात रोडगे होतेच तर....असो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह्ह्ह्ह्ह सरजी. भारीच आहे हे. चंदाताई तिवाडींचे भारुड ऐकलेले. एक वारीत पारंपारिक ऐकलेले. जास्त नाही पण हा साहित्याचा प्रकार जब्बरदस्त आहे. भारुंड (केएसआर्टीसी चा लोगो वरचा दोन तोंडाचा पक्षी) वरुन आलेले ना भारुड?

In reply to by अभ्या..

या शब्दांचा अपभ्रंश भारूड असा झालेला आहे. भारुंड पक्ष्याबद्दल माहित नाही.

In reply to by अभ्या..

त्यो रोडगा वायला, बाजरीच्या जाड भाकरीलापण रोडगा म्हणतेत, आमच्याकडे रोडगा म्हणजे इमू/शहामृग अंड्याचे आकाराचा असतो, गोवरीच्या आरात (विस्तुत) भाजलेला, जबरदस्त तिखट वांगे भाजी सोबत तुरीचे वरण सलाद अन भात असा बेत शेतांत झडतो हिवाळ्यात

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

>>>>>बाजरीच्या जाड भाकरीलापण रोडगा म्हणतेत... बापू ही माहिती मात्र माझ्यासाठी नवीन आहे. पण बाजरीची भाकर खूप जाड नाय होऊ शकत, कारण ती जाड्सर भाकरी तव्यावर पोहोचायच्या आधी कोलमडून जाईल, असं वाटतं.माझी आज्जी परातीत धपं धपं थापायची. तव्यावर पाणी मारलं की तव्यावर टाकायची. तिथुन काढली की चुलीच्या तोंडाला ठेवायची. माय गॉड कसली कड़क भाकर अन तो पापड़ लागायचा माय गॉड. आज्जी गेली अन तशा भाकरीही गेल्या. :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जाडसर भाकरीसमान असतो आणि आकाराने अंमळ भाकरी पेक्षा लहानच असतो. गजानन महाराजांचे जयंती निमित्त याचा प्रसाद वाटला जातो त्यामुळे माहीत आहे. रोडगा, वरणफळे उर्फ चकोल्या उर्फ डाळफळे (हे सर्व घरी) आणि डालबाटी (बाबा राम्देव ढाब्यात,मिपा प्रभुतींसमवेत) खाल्लेला रोकडा नाखु

In reply to by अभ्या..

भवानी आइ रोडगा वाहीन तुला मुळ भारुडात मरि आई नसुन भवानि आई आहे. 'नन्डेचे कार्ट किर्किर कर्ते खरुज होउ दे त्याला भवानी आइ रोडगा वाहीन तुला' अशी त्यातली पुढ्चि ओळ आहे.

In reply to by कंजूस

काका, तुम्ही तरी बाट्यांना सेक्सी वगैरे शब्द नका हो वापरु, सेक्सी शब्दाची आपली एक खासियत आहे, आम्हा तरुणांना त्याचा त्रास होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाट्यांना चिकुल्यांच्या जवळपास म्हणताय तर "सेक्सी"च्या आपल्या डेफिनिशन नक्कीच वेगवेगळ्या आहेत बिरुटे काका!

In reply to by पिलीयन रायडर

सेक्सी या एका कल्पक शब्दाने पिरा काकुंची पाक्रु शतक गाठेल कल्पकता हवी तर अशी ;)

In reply to by स्पा

मग क्रेडिट नवर्‍याला द्यावं लागेल. मला हेल्दीवाल्या करायच्या होत्या. "पण.... तळलेल्या "सेक्सी" लागतात!" ह्या त्याच्या अर्ग्युमेंटपुढे शब्द तोकडे पडल्याने अशा केल्या. बाकी शतकाला आमची ना नाही! ;)

In reply to by स्पा

पाकृ हेल्दी आणि सेक्सी असेल तर मला हेल्दी पाकृ आवडते. मला कोणी विचारलं नै पण आपलं सांगून ठेवलेलं बरं...! -दिलीप बिरुटे (हेल्दी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>आता इथुन पुढे तुमच्याकडे दोन पर्याय आहेतः- हेल्दी किंवा सेक्सी...!>> या वाक्याला धरूनच मी प्रतिसाद दिलाय हो.काय म्हणतात ना ज्ञानेश्वरीतले शब्द कळले नाहीत तर पुढचा जन्म घ्यावा लागतो तसे आहे. दुसरी एक शक्यता - पाहुणे लोक कधीकधी पाककृतीवरून गृहिणींची स्तुती करताना जन्क्शन उपमा देतात.मग त्याच नावाने प्रसिद्धी होते.आता आमच्या तब्येतीला धरून काल एक मिसळीची वानगी खफवर टाकली होती आणि तुम्ही खफ सोडायला एकच गाठ पडली.

In reply to by त्रिवेणी

कशी करतात वांग्याची घोटलेली भाजी?? डाळ-बाटी ओव्हन मध्ये बेक करून पहा, छान होते.

In reply to by मोदक

गुळासोबत कुस्करुन खायच्या असतील तर ठेवतो. फोडणीच्या वरणासोबत असतील तर वरणात भिजव्तो, वरुन तुप सोडतो.

चित्रात तीनपैकी एक पीठ पिवळे आहे. ते कोणते ?

In reply to by चंपाबाई

ओ नाही.. ते म्हणजे मैद्यासारखे असते. मला वाटतं कॉर्न स्टार्च. (चु.भु.दे.घे.). ते चिकट असते. शिजवले की घट्ट होते. सुप वगैरे मध्ये वापरतात. हे सरळ मक्याचे पीठ आहे. गिरणीतुन वाळवलेला मका दळुन आणता येतो किंवा सरळ मिळते बाजारात.

अग्गायायाया!! पिराबाई तुम्ही हिते पाकॄ मधे कशाकाय कडमडलात? आणि कं लिवलंय! मजा आली. तुझ्याइथे येऊन चव बघितल्यावर पुढचा प्रतिसाद लिहीण्यात येईल.

तशी सोपी दिसते. फक्त वेळखाऊ आहे ! बाकी ते सेक्सी बिक्सी आपल्याला काय समजत नाय. उचल की हाण्ण ....!

In reply to by साती

पण ही पाककृती तशी दिसत नाही. ओढून ताडुन म्हणायचं असेल तर मग ठीक आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by साती

असं कसं म्हणता? सरळ गोळे न करता लांबुडकी पोळी,त्याची वळकटी,त्याचे मुटके करायचे म्हणजे सेक्स अपील वाढलाच की.

सकाळीच इच्छा झाली म्हणून वरणफळं (पुणेरी), चकोल्या, चिखोल्या (खानदेशी) ची तयारी करून ठेवली, इथे येऊन पाहिलं तर हे, पण ते तळून बिळून काही करावसं वाटत नाहीये त्यामुळे नेहमीच्या पध्दतीने डाळीत शिजवून करणार. आमचे एक अकोलेकर मित्र आणि वहिनीने खास टेरेसवर चूल तयार करून चुलीवर भाजून बाट्या आणि दाल केली होती त्याची आठवण झाली, सोबत वांग्याचा मसालेदार रस्सा, एक नंबर टेरेस पार्टी झाली होती ती !!

सध्या इथेच हा झब्बू घ्या. वर दिली आहे ती मारवाडी/राजस्थानी पद्धतीची 'बाटी' आहे. खाली देतोय, ती आहे ऑथेंटिक खानदेशी बट्टी. जाड दळलेली कणीक, नसेल तर घरातल्या कणकेत सुमारे एक पंचमांश प्रमाणात रवा मिक्स करून घट्ट भिजवणे. भिजवताना त्यात थोडं तेल, मीठ, हळद व ओवा टाकाव्यात. वर तयार केल्या तशाच बट्ट्या हातानेच तयार करून मग त्या गोवर्‍यांच्या निखार्‍यात भाजाव्यात. भाजून बाहेर काढलेल्या बट्टीची राख झटकून तिला साजुक तुपात आंघोळ घालावी, व बट्टी कुस्करून घट्ट साधे वरण, व तिखटजाळ वांग्या-बटाट्याच्या रश्शासोबत बेत बसवावा.

In reply to by आनंदी गोपाळ

वरच्या फोटोत बट्टी सोबत दिसताहेत त्यातला जास्त लालसर पापड नागलीचा आहे, पांढुरकी आहे ती ज्वारीची बिबडी. आयता निखारा तयार असल्यावर पापड भाजलेच पाहिजेत. नाही का?

In reply to by आनंदी गोपाळ

अहाहा!! कसली जबराट दिसतेय ही आॅथेन्टीक खानदेशी बाटी..शेक्शी एकदम.

In reply to by आनंदी गोपाळ

ह्या बाट्या किती नाजुक, किती सुघड, कसा टॅन्ड गहू वर्ण, कशा सुस्नात. (तुपात) अति मेदक, अति मादक. या पाहताच बाट्या कलिजा खलास झाला!.

In reply to by आनंदी गोपाळ

हेच शोधत होतो राव ! आमच्या विदर्भातील पानगे ! डिट्टो हेच. फक्त शेवटी ते तुपाचे लाड पानग्यांवर नाही, तसाठी असते ते घट्ट तुरीच्या डाळीचे वरण. वर धो धो तुप. व सोबत मस्त तर्रीवाली वांग्याची भाजी ओरपायला.. अहाहा ... बाकी तूप येथे अनिवार्य आहे, नाहीतर दुस-या दिवशी जळजळ नुसती.. :)

In reply to by टामोलीयन

अजून गोंधळ! आमचे पानगे म्हणजे पानात भाजलेली तांदुळाच्या पिठाची भाकरी. कधी गोड असते तर कधी तिखट. 1

In reply to by कंजूस

आमची आई हळदीच्या पानात करते आणि तिला आम्ही पानगी म्हणतो. गरम गरम पानगी तूप आणि गुळाबरोबर लहानपणी नाश्त्याला खात असू. परत आईला सांगायला हवे पानगी कर म्हणून. ( बायको देशस्थ असल्याने तिला हा प्रकार माहित नाही).

In reply to by सुबोध खरे

केळ्याच्या पानात पानगी. हळदीच्या पानात पातोळे. असं आहे. -(कोंकणी) गवि