बावरे प्रेम हे - एक दिव्यपट
रविवारची संध्याकाळ भंकस असते. एकदम टुकार! दुसऱ्या दिवशी सोमवार नावाचा अजगर जबडा उघडून बसलेला असतो. रविवारी संध्याकाळी कुठे बाहेर जाण्याचादेखील हुरूप नसतो. उगीच मॉलला वगैरे जाऊन फिरून येण्यावर माझा विश्वास नाही. का कुणास ठाऊक रविवारी संध्याकाळी चित्रपटगृहात किंवा नाट्यगृहात जाऊन चित्रपट किंवा नाटक बघायला मला आवडत नाही. घरी सोफा खालून टोचत असतो. सगळी रविवार संध्याकाळ कुत्र्याने दोन्ही पायात तोंड खुपसून निपचित पडून रहावं तशी अर्थहीन पसरलेली असते. शुक्रवारची उत्साहाने सळसळणारी संध्याकाळ आणि शनिवारची सुखावह निवांत संध्याकाळ आठवून रविवारच्या संध्याकाळी मन अधिकच खिन्न होतं. टीव्हीवरही टुकार कार्यक्रम असतात. 'इंद्र द टायगर', 'खतरनाक खिलाडी', 'नंबर वन बिझनेसमन', 'मर्द का अटॅक' वगैरे फालतू चित्रपट सुरु असतात. इंग्रजी चॅनल्सवर 'अनाकोंडा', 'स्पायडरमॅन', 'नेशनल ट्रेजर', 'मिशन इंपॉसिबल' वगैरे चोथा चित्रपट सुरु असतात. परेशान आदमी करें तो आखिर क्या करें? गेल्या रविवारी मी असाच मद्दड अवस्थेत बसलेलो असतांना स्टार प्रवाहवर 'बावरे प्रेम हे' सुरु असलेला दिसला. नुकताच सुरु झाला होता बहुतेक. म्हटलं चला बघू या.
तर या दिव्यपटात नायिका गोव्यात एका सुंदर घरात तिच्या दु:खी चेहऱ्याच्या आईसोबत राहत असते. नायक असाच, गल्लीतलं कुत्रं कसंही कुठेही बिनबोभाट फिरत असतं, तसा सहज तिच्या घरी येणं-जाणं करत असतो. नायिकेची सदादु:खी आई त्याच्याशी दु:खी दु:खी हसून गोड गोड बोलत असते. नायिका रिसर्चपण करत असते. कसला ते गुपित कुणालाच कळत नाही. मी आधीच वैतागलेले होतो. म्हटलं बघू अजून काय काय दाखवतात या दिव्यपटात.
नायक हा तरुण, हसतमुख, उमदा, देखणा वगैरे असतो. नायिका ही नायिका नसतेच; ती साठ (की पन्नास?) किलो वजनाची साखरेने काठोकाठ भरलेली रेशमी, मुलायम अशी गोणी असते. डोळ्यांमध्ये गोड गोड भाव, जिभेवर साखरेच्या पाकाचे जिवंत झरे आणि चेहऱ्यावर सतत एक अतिप्रचंड गोड स्मित अशी नायिका बघून मला नायकाचा भयंकर झणझणीत असा हेवा वाटला. त्यांचं बोलणं किती गोड असतं म्हणून सांगू.
"नाही रे, गंपू, काहीतरीच तुझं. असं नसतं रे राजा. कित्ती छान कविता करतोस तू. वेडा आहेस नुसता."
"नाही गं, झंपे. तू किती सालस आहेस. तुझ्या डोळ्यात मला मी दिसतो. तुझ्या हृदयात किती प्रेम आहे..."
"नाही रे, गंपू. काहीतरीच तुझं. तू कित्ती कित्ती मनकवडा आहेस. कसं जमतं तुला हे सारं..."
हे असं बिनबुडाचं बोलणं चालू असतं. मध्ये मध्ये नायिकेची दु:खी दु:खी आई 'काहे दिया परदेस' मधल्या गौरीच्या आईसारखी दु:खाचे कढ पचवत या सगळ्या गोडगचक्यात अजून साखर ओतत असते.
असेच एकदा नायक आणि नायिका काहीतरी बोलत असतात. कवितावाचनाची स्पर्धा असते आणि नायिका नायकाला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सांगते. नायक कवी असतो. नायिकाच स्पर्धेची परीक्षक असणार असते. कवितावाचनाच्या स्पर्धेचं परीक्षण करण्याइतकी ती मोठी कवयित्री असते का हे मात्र कळू शकलं नाही.
मग नायक एका जिन्याजवळ बसून कविता खरडतो. आसपास कागदाचे बोळे पसरलेले असतात. तिथे नायिका येते. नायक तिला लक्ष विचलित होऊ नये म्हणून जिन्याने खाली पाठवतो. नायिका पुन्हा गोग्गोड हसून खाली जाते. स्पर्धेचा दिवस उजाडतो. संयोजक असाच एक दुसरा उमदा, देखणा वगैरे तरुण असतो. तो नायकाला सूत्रसंचालन करण्याची विनंती करतो. इतका वेळ नायिकेच्या घरात घुसून - घुसून कविता करणाऱ्या नायकाला ती स्पर्धेला येणार नाहीये याचा पत्ताच नसतो. शेवटी गोड आग्रहाला बळी पडून नायक गोडपणे सूत्रसंचालन करण्याची तयारी दर्शवतो. सात - आठ लोकांचा महाप्रचंड श्रोतृवृंद बघून आपली छाती दडपते. असं वाटतं नायक सगळं व्यवस्थित करेल ना! आता काय होईल या विचारानेच आपल्याला घाम फुटतो कारण 'आपल्याला सूत्रसंचालनाचा अनुभव नाही' असं नायकाने गोड हसून ठामपणे सांगीतलेले असते. आपण श्वास रोखून बघतो. तेवढ्यात बायको 'चहा घेणार आहेस का?' असा तथ्यहीन प्रश्न विचारते. मी 'शश्श्श..’असं खेकसून मान न वळवता हातानेच (माझ्या) बायकोला ‘गप’ राहण्याची सूचना करतो.
नायक सूत्रसंचालन सुरु करतो पण हाय रे देवा, नुसतंच पार्श्वसंगीत सुरु असतं. एक एक कवी मंचावर येऊन कविता सादर करतो. कुणाचीच कविता ऐकू येत नाही कारण पार्श्वसंगीत सुरु असतं. मग नायकाची पाळी येते. पुन्हा माझ्या कपाळावर घर्मबिंदू जमा होतात. मी श्वास रोखून बघतो. आणि नायक अस्सल मराठी कविता (नुकतीच अंकुश चौधरीच्या एका गाण्यात मी 'माझ्या मनातील एहसास' अशी ओळ ऐकली. उद्या 'माझ्या दिलातील धडकन, द्यावी तुला कानाखाली खाडकन' असे गाणे ऐकू आले तर दचकू नका) सुरु करतो. त्याला नायिका समोर बसलेली दिसते. नायक कवितेतून गाण्यात घुसतो. एनीवे, त्याला इकडे - तिकडे घुसायची सवय असतेच. मग आपसूकच नायिकादेखील गाण्यात घुसते आणि तद्दन निरर्थक शब्द असलेले पांचट गाणे सुरु होते. स्पंदन, सांजवेळ, हृदय, अवचित, मन, मोहरणे वगैरे शब्द इकडून तिकडे गुंफले की आजकाल मराठी रोमँटिक गाणं तयार होतं.
"तुझ्या स्पंदनात मोहरतो मी अन गाते माझे मन, सांजवेळी अवचित तुजसमवेत वेचतो मी धुंद क्षण"
हे चित्रपटातलं गाणं नाही. अशाच गुळगुळीत छापाचं, निर्बुद्ध असं ते गाणं असतं. असले भरपूर निरर्थक शब्द गुंफून बनवलेलं ते गाणं संपल्यावर नायक होशमध्ये येतो. सात-आठ जणांचा तो अतिविशाल जनसमुदाय नायकाच्या काव्यप्रतिभेने वेडा झालेला असतो. टाळ्यांच्या कडकडाटात आसमंत बुडून जातो. नायक होशमध्ये आल्यावर त्याच्या लक्षात येतं की नायिकेने त्याला गंडवलेलं असतं. ती तिथे नसते आणि त्याच्या होपलेस गाण्यातही नसते. त्याला प्रश्न पडतो की आत्ता होती, गेली कुठं! बक्षीस ऑफ कोर्स नायकाला मिळतं. पण नायकाला त्या लाख - दोन लाख डॉलर्सच्या बक्षीसाची तमा नसते. तो नायिकेला शोधायला निघतो. नायिका उगीच एका सुंदर रस्त्यावरून झकपक कपडे घालून गोग्गोड स्मित-बित करत कुठेतरी जात असते. कुठे? ते माहीत नाही. का? विचारायचं नाही. मग नायक तिला गाठतो आणि एखादं शाळेतून घरी आलेलं पोरगं कसं आईला 'घ्यायला का नाही आलीस? शाळेत काय जम्माडीजम्मत झाली...' वगैरे बडबड करून भंडावून सोडतं तसा नायक नायिकेला भंडावून सोडतो. तेवढ्यात तिथे तो देखणा संयोजक कार घेऊन येतो. तेव्हा पहिल्यांदा नायिकेच्या चेहऱ्यावर कष्टी भाव येतात आणि ती निमूटपणे संयोजकांसोबत निघून जाते. नायक बावळटासारखा बघत बसतो.
मध्येच नायिका आईच्या गळ्यात पडून 'माझा रिसर्च संपला' असं डिक्लेअर करते. कसला रिसर्च माहीत नाही. आईला पण बहुधा माहीत नसतं पण डोक्याला नसता ताप कशाला करून घ्या म्हणून ती 'अरे वा, गुणांची बाई माझी ती' असं काहीसं थातूर-मातूर पचकून प्रसंग निभावून नेते. आता या रिसर्चचा आणि कथेचा काय संबंध हे काही कळत नाही.
नंतर (की आधी? आठवत नाही आणि ते महत्वाचंही नाही) नायक एक साधारण पाच मिनिटात प्रतिथयश कवी-लेखक होतो. तो मुंबईचा असतो आणि त्याच्या आईचा मोठठा बिझनेस असतो. नायकाच्या कादंबऱ्या धडाधड प्रकाशित होत असतात. सेकंदाला एक अशा रेटने नायक कादंबरी प्रकाशित करतो. मग एक दिवस त्याला नायिकेची आठवण येते. आपलं एक पुस्तक घेऊन नायक गोव्यात येतो आणि नायिकेच्या घरी जातो. नायिकेची आई काहीच बोलत नाही. नायक 'झंपी कुठे आहे' असा साधा प्रश्न विचारतो पण नायिकेच्या आईला बहुतेक तो प्रश्नच कळत नाही म्हणून ती गप्प बसते. नायक भंजाळतो. त्याच्या मेंदूला झिणझिण्या येतात. मग नायक संयोजकांच्या कार्यालयात जातो. तिथे तो बेंबीच्या देठापासून ओरडून विचारतो 'कुठे आहे झंपी?' पण संयोजक नुसताच कसनुसा चेहरा करून कार्यालायातून बाहेर पडून कारमध्ये बसून भुर्रर्र निघून जातो. नायकाचा मेंदू भेगाळतो. डोळे कासावीस-बावीस होतात. मग अचानक एक ख्रिश्चन माणूस नायकाला कुठेतरी घेऊन जातो. तिथे तो ख्रिश्चन माणूस अगम्य बडबड करतो आणि एकदम नायिका आटोपली असे जाहीर करतो. नायक चित्काळतो. असं कसं झालं? तो माणूस पुन्हा काहीबाही बडबडतो आणि नायकाला अचानक ती दिसते. नखशिखांत साखरेच्या पाकात अंघोळ करून आलेली नायिका पुन्हा तसलेच स्वीट टूथ दाखवत हसत असते. मग नायक तिच्याकडे जातो आणि अजून काहीतरी फालतूपणा घडून हा दिव्यपट संपतो.
खरंच, रविवारची संध्याकाळ भंकसच असते...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट चिरफाड
रद्दी चित्रपटांची चिरफाड करण्यात.........
कसचं कसचं. आम्ही आपले
मी तर किस झाड की पत्ती
या लेखात एक किस्सा सांगायचा राहून गेला...
मूळ लेख
मूळ लेख
अरे ह्या बावरलेपणाचे कारण
_/\_ किती हसवाल! गेंगाना आवाज
जबराट, हहपुवा.
लोल..
जबरदस्त...
एकदम खूसखूशीत
ष ष्ठय ब्दी पू र्ति (जमला
मन झाले बावरे
:):)
बापरे काय लिवल्य लवल्य :)
बापरे !!
जबरीच.. हसून हस्सोन वेड लागलय
हे असले टिनपाट चित्रपट बघायला