✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बावरे प्रेम हे - एक दिव्यपट

स
समीरसूर यांनी
Tue, 07/26/2016 - 17:06  ·  लेख
लेख
रविवारची संध्याकाळ भंकस असते. एकदम टुकार! दुसऱ्या दिवशी सोमवार नावाचा अजगर जबडा उघडून बसलेला असतो. रविवारी संध्याकाळी कुठे बाहेर जाण्याचादेखील हुरूप नसतो. उगीच मॉलला वगैरे जाऊन फिरून येण्यावर माझा विश्वास नाही. का कुणास ठाऊक रविवारी संध्याकाळी चित्रपटगृहात किंवा नाट्यगृहात जाऊन चित्रपट किंवा नाटक बघायला मला आवडत नाही. घरी सोफा खालून टोचत असतो. सगळी रविवार संध्याकाळ कुत्र्याने दोन्ही पायात तोंड खुपसून निपचित पडून रहावं तशी अर्थहीन पसरलेली असते. शुक्रवारची उत्साहाने सळसळणारी संध्याकाळ आणि शनिवारची सुखावह निवांत संध्याकाळ आठवून रविवारच्या संध्याकाळी मन अधिकच खिन्न होतं. टीव्हीवरही टुकार कार्यक्रम असतात. 'इंद्र द टायगर', 'खतरनाक खिलाडी', 'नंबर वन बिझनेसमन', 'मर्द का अटॅक' वगैरे फालतू चित्रपट सुरु असतात. इंग्रजी चॅनल्सवर 'अनाकोंडा', 'स्पायडरमॅन', 'नेशनल ट्रेजर', 'मिशन इंपॉसिबल' वगैरे चोथा चित्रपट सुरु असतात. परेशान आदमी करें तो आखिर क्या करें? गेल्या रविवारी मी असाच मद्दड अवस्थेत बसलेलो असतांना स्टार प्रवाहवर 'बावरे प्रेम हे' सुरु असलेला दिसला. नुकताच सुरु झाला होता बहुतेक. म्हटलं चला बघू या. तर या दिव्यपटात नायिका गोव्यात एका सुंदर घरात तिच्या दु:खी चेहऱ्याच्या आईसोबत राहत असते. नायक असाच, गल्लीतलं कुत्रं कसंही कुठेही बिनबोभाट फिरत असतं, तसा सहज तिच्या घरी येणं-जाणं करत असतो. नायिकेची सदादु:खी आई त्याच्याशी दु:खी दु:खी हसून गोड गोड बोलत असते. नायिका रिसर्चपण करत असते. कसला ते गुपित कुणालाच कळत नाही. मी आधीच वैतागलेले होतो. म्हटलं बघू अजून काय काय दाखवतात या दिव्यपटात. नायक हा तरुण, हसतमुख, उमदा, देखणा वगैरे असतो. नायिका ही नायिका नसतेच; ती साठ (की पन्नास?) किलो वजनाची साखरेने काठोकाठ भरलेली रेशमी, मुलायम अशी गोणी असते. डोळ्यांमध्ये गोड गोड भाव, जिभेवर साखरेच्या पाकाचे जिवंत झरे आणि चेहऱ्यावर सतत एक अतिप्रचंड गोड स्मित अशी नायिका बघून मला नायकाचा भयंकर झणझणीत असा हेवा वाटला. त्यांचं बोलणं किती गोड असतं म्हणून सांगू. "नाही रे, गंपू, काहीतरीच तुझं. असं नसतं रे राजा. कित्ती छान कविता करतोस तू. वेडा आहेस नुसता." "नाही गं, झंपे. तू किती सालस आहेस. तुझ्या डोळ्यात मला मी दिसतो. तुझ्या हृदयात किती प्रेम आहे..." "नाही रे, गंपू. काहीतरीच तुझं. तू कित्ती कित्ती मनकवडा आहेस. कसं जमतं तुला हे सारं..." हे असं बिनबुडाचं बोलणं चालू असतं. मध्ये मध्ये नायिकेची दु:खी दु:खी आई 'काहे दिया परदेस' मधल्या गौरीच्या आईसारखी दु:खाचे कढ पचवत या सगळ्या गोडगचक्यात अजून साखर ओतत असते. असेच एकदा नायक आणि नायिका काहीतरी बोलत असतात. कवितावाचनाची स्पर्धा असते आणि नायिका नायकाला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सांगते. नायक कवी असतो. नायिकाच स्पर्धेची परीक्षक असणार असते. कवितावाचनाच्या स्पर्धेचं परीक्षण करण्याइतकी ती मोठी कवयित्री असते का हे मात्र कळू शकलं नाही. मग नायक एका जिन्याजवळ बसून कविता खरडतो. आसपास कागदाचे बोळे पसरलेले असतात. तिथे नायिका येते. नायक तिला लक्ष विचलित होऊ नये म्हणून जिन्याने खाली पाठवतो. नायिका पुन्हा गोग्गोड हसून खाली जाते. स्पर्धेचा दिवस उजाडतो. संयोजक असाच एक दुसरा उमदा, देखणा वगैरे तरुण असतो. तो नायकाला सूत्रसंचालन करण्याची विनंती करतो. इतका वेळ नायिकेच्या घरात घुसून - घुसून कविता करणाऱ्या नायकाला ती स्पर्धेला येणार नाहीये याचा पत्ताच नसतो. शेवटी गोड आग्रहाला बळी पडून नायक गोडपणे सूत्रसंचालन करण्याची तयारी दर्शवतो. सात - आठ लोकांचा महाप्रचंड श्रोतृवृंद बघून आपली छाती दडपते. असं वाटतं नायक सगळं व्यवस्थित करेल ना! आता काय होईल या विचारानेच आपल्याला घाम फुटतो कारण 'आपल्याला सूत्रसंचालनाचा अनुभव नाही' असं नायकाने गोड हसून ठामपणे सांगीतलेले असते. आपण श्वास रोखून बघतो. तेवढ्यात बायको 'चहा घेणार आहेस का?' असा तथ्यहीन प्रश्न विचारते. मी 'शश्श्श..’असं खेकसून मान न वळवता हातानेच (माझ्या) बायकोला ‘गप’ राहण्याची सूचना करतो. नायक सूत्रसंचालन सुरु करतो पण हाय रे देवा, नुसतंच पार्श्वसंगीत सुरु असतं. एक एक कवी मंचावर येऊन कविता सादर करतो. कुणाचीच कविता ऐकू येत नाही कारण पार्श्वसंगीत सुरु असतं. मग नायकाची पाळी येते. पुन्हा माझ्या कपाळावर घर्मबिंदू जमा होतात. मी श्वास रोखून बघतो. आणि नायक अस्सल मराठी कविता (नुकतीच अंकुश चौधरीच्या एका गाण्यात मी 'माझ्या मनातील एहसास' अशी ओळ ऐकली. उद्या 'माझ्या दिलातील धडकन, द्यावी तुला कानाखाली खाडकन' असे गाणे ऐकू आले तर दचकू नका) सुरु करतो. त्याला नायिका समोर बसलेली दिसते. नायक कवितेतून गाण्यात घुसतो. एनीवे, त्याला इकडे - तिकडे घुसायची सवय असतेच. मग आपसूकच नायिकादेखील गाण्यात घुसते आणि तद्दन निरर्थक शब्द असलेले पांचट गाणे सुरु होते. स्पंदन, सांजवेळ, हृदय, अवचित, मन, मोहरणे वगैरे शब्द इकडून तिकडे गुंफले की आजकाल मराठी रोमँटिक गाणं तयार होतं. "तुझ्या स्पंदनात मोहरतो मी अन गाते माझे मन, सांजवेळी अवचित तुजसमवेत वेचतो मी धुंद क्षण" हे चित्रपटातलं गाणं नाही. अशाच गुळगुळीत छापाचं, निर्बुद्ध असं ते गाणं असतं. असले भरपूर निरर्थक शब्द गुंफून बनवलेलं ते गाणं संपल्यावर नायक होशमध्ये येतो. सात-आठ जणांचा तो अतिविशाल जनसमुदाय नायकाच्या काव्यप्रतिभेने वेडा झालेला असतो. टाळ्यांच्या कडकडाटात आसमंत बुडून जातो. नायक होशमध्ये आल्यावर त्याच्या लक्षात येतं की नायिकेने त्याला गंडवलेलं असतं. ती तिथे नसते आणि त्याच्या होपलेस गाण्यातही नसते. त्याला प्रश्न पडतो की आत्ता होती, गेली कुठं! बक्षीस ऑफ कोर्स नायकाला मिळतं. पण नायकाला त्या लाख - दोन लाख डॉलर्सच्या बक्षीसाची तमा नसते. तो नायिकेला शोधायला निघतो. नायिका उगीच एका सुंदर रस्त्यावरून झकपक कपडे घालून गोग्गोड स्मित-बित करत कुठेतरी जात असते. कुठे? ते माहीत नाही. का? विचारायचं नाही. मग नायक तिला गाठतो आणि एखादं शाळेतून घरी आलेलं पोरगं कसं आईला 'घ्यायला का नाही आलीस? शाळेत काय जम्माडीजम्मत झाली...' वगैरे बडबड करून भंडावून सोडतं तसा नायक नायिकेला भंडावून सोडतो. तेवढ्यात तिथे तो देखणा संयोजक कार घेऊन येतो. तेव्हा पहिल्यांदा नायिकेच्या चेहऱ्यावर कष्टी भाव येतात आणि ती निमूटपणे संयोजकांसोबत निघून जाते. नायक बावळटासारखा बघत बसतो. मध्येच नायिका आईच्या गळ्यात पडून 'माझा रिसर्च संपला' असं डिक्लेअर करते. कसला रिसर्च माहीत नाही. आईला पण बहुधा माहीत नसतं पण डोक्याला नसता ताप कशाला करून घ्या म्हणून ती 'अरे वा, गुणांची बाई माझी ती' असं काहीसं थातूर-मातूर पचकून प्रसंग निभावून नेते. आता या रिसर्चचा आणि कथेचा काय संबंध हे काही कळत नाही. नंतर (की आधी? आठवत नाही आणि ते महत्वाचंही नाही) नायक एक साधारण पाच मिनिटात प्रतिथयश कवी-लेखक होतो. तो मुंबईचा असतो आणि त्याच्या आईचा मोठठा बिझनेस असतो. नायकाच्या कादंबऱ्या धडाधड प्रकाशित होत असतात. सेकंदाला एक अशा रेटने नायक कादंबरी प्रकाशित करतो. मग एक दिवस त्याला नायिकेची आठवण येते. आपलं एक पुस्तक घेऊन नायक गोव्यात येतो आणि नायिकेच्या घरी जातो. नायिकेची आई काहीच बोलत नाही. नायक 'झंपी कुठे आहे' असा साधा प्रश्न विचारतो पण नायिकेच्या आईला बहुतेक तो प्रश्नच कळत नाही म्हणून ती गप्प बसते. नायक भंजाळतो. त्याच्या मेंदूला झिणझिण्या येतात. मग नायक संयोजकांच्या कार्यालयात जातो. तिथे तो बेंबीच्या देठापासून ओरडून विचारतो 'कुठे आहे झंपी?' पण संयोजक नुसताच कसनुसा चेहरा करून कार्यालायातून बाहेर पडून कारमध्ये बसून भुर्रर्र निघून जातो. नायकाचा मेंदू भेगाळतो. डोळे कासावीस-बावीस होतात. मग अचानक एक ख्रिश्चन माणूस नायकाला कुठेतरी घेऊन जातो. तिथे तो ख्रिश्चन माणूस अगम्य बडबड करतो आणि एकदम नायिका आटोपली असे जाहीर करतो. नायक चित्काळतो. असं कसं झालं? तो माणूस पुन्हा काहीबाही बडबडतो आणि नायकाला अचानक ती दिसते. नखशिखांत साखरेच्या पाकात अंघोळ करून आलेली नायिका पुन्हा तसलेच स्वीट टूथ दाखवत हसत असते. मग नायक तिच्याकडे जातो आणि अजून काहीतरी फालतूपणा घडून हा दिव्यपट संपतो. खरंच, रविवारची संध्याकाळ भंकसच असते...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
20285 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

=)) +)) खपल्या गेले आहे

स्पा
Tue, 07/26/2016 - 17:17 नवीन
=)) +)) खपल्या गेले आहे
  • Log in or register to post comments

नाव चुकलयं

मी-सौरभ
Tue, 07/26/2016 - 19:33 नवीन
हा कदाचित 'बावरे प्रेम हे' नावाचा चित्रपट असावा ळिन्कः http://marathistars.com/movies/baavare-prem-2014/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

शीर्षकात चुकून 'बावरे मन हे' झालंय

समीरसूर
Wed, 07/27/2016 - 10:39 नवीन
हो, माफ करा. शीर्षकात चुकून 'बावरे मन हे' झालंय. पहिल्या परिच्छेदात नाव बरोबर (बावरे प्रेम हे) आहे. अर्थात त्याने काही फरक पडत नाही. 'बावरे मन हे', 'बावरे प्रेम हे', 'बावरे हृदय हे', 'बावरे नयन हे', 'बावरे स्पंदन हे'....काहीही टाका; सगळं सारखंच! शेवटी बघणाऱ्याला 'बावरे गेम हे' असंच वाटतं. शीर्षक दुरुस्त करता आले तर बघा ना प्लीज सं. म. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

राजे....

अनिरुद्ध प्रभू
Wed, 07/27/2016 - 15:46 नवीन
याच चित्रपटाचा दिग्दर्शक श्री. अजय नाइक 'बावरे मन असे' नामक चित्रपट काढत आहे असे ऐकिवात आहे.....परिणामी बचके रहना रे बाबा........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

..

मी-सौरभ
Wed, 07/27/2016 - 17:14 नवीन
अर्थात त्याने काही फरक पडत नाही. 'बावरे मन हे', 'बावरे प्रेम हे', 'बावरे हृदय हे', 'बावरे नयन हे', 'बावरे स्पंदन हे'....काहीही टाका; सगळं सारखंच! शेवटी बघणाऱ्याला 'बावरे गेम हे' असंच वाटतं.
ख्या ख्या ख्या!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

हहपुवा !

सस्नेह
Tue, 07/26/2016 - 17:19 नवीन
माझ्या दिलातील धडकन, द्यावी तुला कानाखाली खाडकन'
हे खासच ! परीक्षण एकदम खंग्री !!
  • Log in or register to post comments

असा

नाखु
Tue, 07/26/2016 - 17:27 नवीन
सिनेमा आहे ? आणि हा सिनेमा आल्यानंतर साखरेचे भाव वाढलेत की काय? बाकी इतका वेळ सिनेमा पाहू शकल्याबद्दल घरच्यांनी सहनशक्ती वाढल्याची काही पावती वगैरे दिली की नाही? बरेच प्रश्न आहेत सध्या इतकेच... फर्मास चिरफाड दूर चित्रवाणी बंद करून विना वाहिनीचा प्रेक्षक नाखु
  • Log in or register to post comments

पहिला पॅरा

कपिलमुनी
Tue, 07/26/2016 - 17:28 नवीन
पहिला पॅरा तुफान आवडला :)
  • Log in or register to post comments

प्रत्येक परिच्छेद खंग्री आहे.

किसन शिंदे
Tue, 07/26/2016 - 17:38 नवीन
प्रत्येक परिच्छेद खंग्री आहे. =)) =)) असंच आणखी एका मराठी वाहिनीवर मी बेफाम कि बेधूंद असा खत्तरनाक मराठी सिनेमा पाह्यला होता.
  • Log in or register to post comments

१+ लेख

पगला गजोधर
Tue, 07/26/2016 - 17:54 नवीन
परीक्षणा ऐवजी, पहिला पॅरा, लेखं म्हणून सहज स्पर्धेत बक्षीस मिळवेल...
  • Log in or register to post comments

रवीवार संध्याकाळ बद्दल

स्मिता श्रीपाद
Tue, 07/26/2016 - 18:02 नवीन
रवीवार संध्याकाळ बद्दल लिहिलेलं अगदी अगदी मनातलं....पहिला पॅरा बेस्ट ... आणि बाकी परीक्शण तूफान..... >>माझ्या दिलातील धडकन, द्यावी तुला कानाखाली खाडकन>> ...एकच नंबर....पुढे सुचत असेल तर लिहुन काढ ;-)
  • Log in or register to post comments

बापरे तुमच्या सहनशक्तीची कमाल आहे

जगप्रवासी
Tue, 07/26/2016 - 18:04 नवीन
इतकं पाहून पण वेडे झाला नाहीत आणि परीक्षण लिहिलात, खरंच कमाल आहे
  • Log in or register to post comments

बेक्कार लिहीलं आहे.

सतिश गावडे
Tue, 07/26/2016 - 18:09 नवीन
हसून हसून फुटलो. पहिला परीच्छेद अतिशय वास्तवदर्शी =))
  • Log in or register to post comments

अहो, तुम्ही "हम ने जीना सीख

आदूबाळ
Tue, 07/26/2016 - 18:09 नवीन
अहो, तुम्ही "हम ने जीना सीख लिया" नावाचा प्रकार बघा. देवदयेने त्याची डिव्हीडी मिळत नाही.
  • Log in or register to post comments

शाळा ची भ्रष्ट कापी...???

संदीप डांगे
Tue, 07/26/2016 - 19:51 नवीन
शाळा ची भ्रष्ट कापी...??? बाकी लेख खुमासदार समीरसर... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हा बघितल्यानंतर

चतुरंग
Tue, 07/26/2016 - 22:07 नवीन
प्रेक्षकांना खरोखर "हमनें जीना सीख लिया" असे वाटत असणार! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

माझ्याकडे आहे. त्यात चक्क

अभ्या..
Tue, 07/26/2016 - 22:19 नवीन
माझ्याकडे आहे. त्यात चक्क मिलिंद गुणाजी हाय. लैच बोगस फिल्म. ह्या समीरला सुद्धा कुठे कुठे काय सापडतय कुणास ठाऊक. सॉल्लिड मापं काढलायस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

काय काय बघत बसता राव! :-P

एस
Tue, 07/26/2016 - 18:24 नवीन
काय काय बघत बसता राव! :-P शॉल्लेट!
  • Log in or register to post comments

हेहेहे..... भारी आहे हे..

पुंबा
Tue, 07/26/2016 - 18:33 नवीन
हेहेहे..... भारी आहे हे..
  • Log in or register to post comments

_/\_

मी-सौरभ
Tue, 07/26/2016 - 19:28 नवीन
पहिले दंडवत स्वीकारा
"तुझ्या स्पंदनात मोहरतो मी अन गाते माझे मन, सांजवेळी अवचित तुजसमवेत वेचतो मी धुंद क्षण" हे चित्रपटातलं गाणं नाही.
क्काय सांगता, माझ्या डोक्यात तर हे गाणे स्वप्निल बांदोडकरच्या अति गोड आवाजात वाजायला सुरुवात होत होती ;)
  • Log in or register to post comments

मी चार शब्द जुळवून

समीरसूर
Wed, 07/27/2016 - 11:06 नवीन
मी चार शब्द जुळवून ही ओळ खरडली (जिलबी). पण ते गाणं असंच निर्बुद्ध होतं. :-) नुसते शब्दांचे बुडबुडे! आठवणं या जन्मात शक्य नाही. :-) ही घ्या अजून एक जिलबी: तुज नयनी गुंफतो मी स्वप्ने मलमली तव रेशीमस्पर्शाने होते सांज ही मखमली स्पर्श तुझा होता मोहरती हृदयाची स्पंदने माझा स्पर्श होता नाजूक कळी ही उमलली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

हल्ली पाऊस किंवा तत्सम काही

उडन खटोला
Wed, 07/27/2016 - 11:16 नवीन
हल्ली पाऊस किंवा तत्सम काही असलं की 'झिम्माड' हा शब्द अस्तोच. नवोदित कवींचा शब्दसंग्रह प्रतिभेसारखाच् खुंटला आहे का? रच्याकने एखाद्या रविवारी 'मितवा' पण बघा. लेख लिहायला ताकद शिल्लक राहणार नाही याची खात्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

कोठार्‍यांच्या सूनबै असलेला

सूड
Tue, 07/26/2016 - 20:13 नवीन
कोठार्‍यांच्या सूनबै असलेला चित्रपट का हा?
  • Log in or register to post comments

होय

समीरसूर
Wed, 07/27/2016 - 11:07 नवीन
होय. उर्मिला कानिटकर, सिद्धार्थ चांदेकर, सुप्रिया विनोद, विद्याधर जोशी (तो ख्रिश्चन बाबा).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बेक्कार =))

टवाळ कार्टा
Tue, 07/26/2016 - 20:15 नवीन
बेक्कार =))
  • Log in or register to post comments

=))

पद्मावति
Tue, 07/26/2016 - 20:32 नवीन
=))
  • Log in or register to post comments

रविवारची संध्याकाळ भंकस असते.

चावटमेला
Tue, 07/26/2016 - 21:16 नवीन
रविवारची संध्याकाळ भंकस असते. एकदम टुकार! दुसऱ्या दिवशी सोमवार नावाचा अजगर जबडा उघडून बसलेला असतो. रविवारी संध्याकाळी कुठे बाहेर जाण्याचादेखील हुरूप नसतो. उगीच मॉलला वगैरे जाऊन फिरून येण्यावर माझा विश्वास नाही. का कुणास ठाऊक रविवारी संध्याकाळी चित्रपटगृहात किंवा नाट्यगृहात जाऊन चित्रपट किंवा नाटक बघायला मला आवडत नाही. घरी सोफा खालून टोचत असतो. सगळी रविवार संध्याकाळ कुत्र्याने दोन्ही पायात तोंड खुपसून निपचित पडून रहावं तशी अर्थहीन पसरलेली असते. शुक्रवारची उत्साहाने सळसळणारी संध्याकाळ आणि शनिवारची सुखावह निवांत संध्याकाळ आठवून रविवारच्या संध्याकाळी मन अधिकच खिन्न होतं हज्जार वेळा सहमत!!!
  • Log in or register to post comments

पूर्वी ऑनसाईट असताना रविवारी

आनन्दा
Wed, 07/27/2016 - 10:40 नवीन
पूर्वी ऑनसाईट असताना रविवारी संध्याकाळीच ऑफशोअरवाले चावायला लागायचे त्याची आठवण झाली. असो. तेव्हा रविवार संध्याकाळचे काय भजे व्हायचे ते सांगणे नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

झकास.

चित्रगुप्त
Tue, 07/26/2016 - 21:59 नवीन
एकदम झकास लेखन. (या नावाचा सिनेमा खरोखरच अस्तित्वात आहे का हे जालावर शोधले, पण मिळाला नाही).
  • Log in or register to post comments

पहिल्या परिच्छेदात नाव बरोबर (बावरे प्रेम हे)

समीरसूर
Wed, 07/27/2016 - 10:40 नवीन
हो, माफ करा. शीर्षकात चुकून 'बावरे मन हे' झालंय. पहिल्या परिच्छेदात नाव बरोबर (बावरे प्रेम हे) आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

खल्लास!! टिपिकल समीरसूर!! =))

चतुरंग
Tue, 07/26/2016 - 22:04 नवीन
तुम्हालाच या प्रकारचे सिनेमे बघायला मिळावेत याची विधात्याने (म्हणजे त्या "विधात्याने" बरंका नाहीतर तुम्हाला "विधाता" हा सिनेमा आठवायचा) खास सोय केलेली दिसते आहे! :) का म्हणाल तर सिनेमाला काही प्रतिसाद नसेनाका त्याच्या परीक्षणावरतरी भरभरुन प्रतिसाद यावेत आणि सिनेमा काढल्याचं सार्थक व्हावं अशी त्याची इच्छा असणार! ;) (बावरें)रंगा
  • Log in or register to post comments

लैच मस्त...यापेक्षा बाहेर

खटपट्या
Tue, 07/26/2016 - 22:31 नवीन
लैच मस्त...यापेक्षा बाहेर फीरुन आला असतात तर बरे वाटले असते. पण रवीवारी संध्याकाळी कैच करावेसे वाटत नाही...
  • Log in or register to post comments

अहो ते फिरायला गेले असते तर

चतुरंग
Tue, 07/26/2016 - 22:34 नवीन
हे परीक्षण हुकलं नसतं का मग? केवढी सोय केली त्यांनी आपल्या हसण्याची!! :) (जोहोताहैअच्छेकेलिएहोताहै)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

व्हय तर...

खटपट्या
Tue, 07/26/2016 - 22:57 नवीन
व्हय तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+1

जिन्गल बेल
Wed, 07/27/2016 - 12:40 नवीन
+1 फॉर "पण रवीवारी संध्याकाळी कैच करावेसे वाटत नाही..."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

महान! बघीतलाच पाहिजे आता!

रातराणी
Tue, 07/26/2016 - 23:40 नवीन
महान! बघीतलाच पाहिजे आता!
  • Log in or register to post comments

या रविवारी सकाळी दयाळू

उडन खटोला
Wed, 07/27/2016 - 00:11 नवीन
या रविवारी सकाळी दयाळू परमेश्वराकडे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना(बेहरे) करेन.
  • Log in or register to post comments

मस्त!

फारएन्ड
Wed, 07/27/2016 - 04:16 नवीन
धमाल लिहिले आहे! मजा आली :) टीव्हीवरही टुकार कार्यक्रम असतात. 'इंद्र द टायगर', 'खतरनाक खिलाडी', 'नंबर वन बिझनेसमन', 'मर्द का अटॅक' वगैरे फालतू चित्रपट सुरु असतात. >>> आणि तरीही रविवार संध्याकाळ बोअर होते तुम्हाला? :)
  • Log in or register to post comments

यातले बहुतांशी चित्रपट

मृत्युन्जय
Wed, 07/27/2016 - 12:14 नवीन
यातले बहुतांशी चित्रपट एव्हाना त्यांचे पाठ झाले असतील. इंद्रा द टायगर तर माझा पण पाठ आहे. नंबर वन बिझनेसमॅन आणी मर्द का अटॅक हे चित्रपट बघण्याचा योग अजुन आला नाही. सेट मॅक्स आणि स्टार गोल्ड चालु असतानाही हे २ चित्रपट कसे सुटले याचे आश्चर्य वाटते आहे. बाकी सुर्यवंशम चा उल्लेख नसल्याने ठाकुर भानुप्रताप सिंग आणि हीरा ठाकुर फॅन क्लब चा मानद सदस्य या नात्याने मी निषेध व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड

=)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 07/27/2016 - 04:57 नवीन
=)) =)) =)) असे पिक्चर बघत बसता, ते ही न विचारता मिळणार्‍या चहाला नाकारून, आणि वर, रविवारची संध्याकाळ भंकसच असते असं म्हणताय, यात त्या बिचार्‍या निर्मात्याचा काय बरे दोष ?! ;) :)
  • Log in or register to post comments

पार पंचनामा केलात राव !

स्रुजा
Wed, 07/27/2016 - 06:06 नवीन
Image removed. पार पंचनामा केलात राव ! चौफेर फटकेबाजी केलीत .. मजा आली.. असले टुकार सिनेमे काढणार्‍यांना आणि ते टिव्ही वर दाखवणार्‍यांना विनाचौकशी येरवड्याला पाठवायला पाहिजे खरं म्हणजे.
  • Log in or register to post comments

मजा आली वाचून. असही परीक्षण

ज्योति अळवणी
Wed, 07/27/2016 - 09:38 नवीन
मजा आली वाचून. असही परीक्षण असू शकत.... नाहीतर कुठल्या तरी चानेलवर काहीतरी चालू असत आणि ते आपण शून्य डोळ्यांनी बघत असतो... त्यानंतर लिहायला सुचण ही कमाल.
  • Log in or register to post comments

परीक्षण आवडले...

मुक्त विहारि
Wed, 07/27/2016 - 09:38 नवीन
एकदम खूसखूशीत.
  • Log in or register to post comments

साधु साधु...

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 07/27/2016 - 09:41 नवीन
रविवार संध्याकाळचे वर्णन फार आवडले. तुम्ही फार वरच्या पदाला पोचलेले महात्मा वगेरे दिसताय. एवढा तद्दन भिकार सिनेमा मन लाउन पहायचा, त्याचे डिटेल्स लक्षात ठेवायचे आणि वर त्यावर असा झणझणीत लेखही लिहायचा. या साठी फार मोठे तपोबल लागते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

+ १

मुक्त विहारि
Wed, 07/27/2016 - 11:31 नवीन
वाक्या-वाक्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पहिला परिच्छेद

निखिल निरगुडे
Wed, 07/27/2016 - 09:43 नवीन
पहिला परिच्छेद खरोखर अफलातून लिहिलाय....
  • Log in or register to post comments

जबराट परीक्षण !!

चिनार
Wed, 07/27/2016 - 10:27 नवीन
जबराट परीक्षण !! तुमच्या सहनशक्तीला सलाम !!
स्पंदन, सांजवेळ, हृदय, अवचित, मन, मोहरणे वगैरे शब्द इकडून तिकडे गुंफले की आजकाल मराठी रोमँटिक गाणं तयार होतं.
हेच्च म्हणतो !!
  • Log in or register to post comments

क्या बात है. हे 'बावरे'

अंतरा आनंद
Wed, 07/27/2016 - 10:51 नवीन
क्या बात है. हे 'बावरे' दिव्य हलाहल पचवून एवढा खुमासदार लेख लिहीलात. मजा आली वाचताना. तुमचा पुढचा रविवारही अश्याच टुकारपटाने साजरा होवो या शुभेच्छा ;)
  • Log in or register to post comments

भारी लेख. फक्त रैवारी सुट्टी

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 07/27/2016 - 11:35 नवीन
भारी लेख. फक्त रैवारी सुट्टी असलेल्या आमास्नी तर रैवार सकाळच फकस्त बरी वाटतीया.भारी लिवलायसा.
  • Log in or register to post comments

(No subject)

जव्हेरगंज
Wed, 07/27/2016 - 11:35 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा