Skip to main content

प्रतिजैविके समज आणि गैरसमज.

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 06/07/2016 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिजैविके समज आणि गैरसमज. सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय? सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत. यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू. या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके. यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला. जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो. १) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही. २) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात. दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात. काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात. दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात. ३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा. ४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे. ५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही. ६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे. ७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते. दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला (आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो. या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात. ८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते. काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण? "अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच. ९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही. याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल. यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ" मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १ पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1 १०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल. बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे. प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे १) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते. आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते २) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो. ३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो. ४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात. हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.

वाचने 129857
प्रतिक्रिया 349

प्रतिक्रिया

उत्तम लेख. (फारच अवांतर - अशाच आमच्या फॅमिली डॉक्टरांनी गेली कित्येक वर्षे चालू असलेला दवाखाना बंद करून निवृत्ती स्वीकारली तेव्हा आता अशी सखोल व योग्य माहिती कोण देणार असे वाटून दु:ख झाले.)

संपादक, त्या आधीच्या धाग्याच्या (http://misalpav.com/node/36577) सुरूवातीला या धाग्याची लिंक देउ शकाल का? तो धागा वाचून चुकीचे समज व्ह्यायची शक्यता आहे ती टाळण्यासाठी?? धन्यवाद. टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

नेहमीप्रमाणेच उत्तम लेख. समांतर- (या निमित्ताने) डॉक्टर खरे यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि आयुष्यभर राहीन. निव्वळ मिपाच्या ओळखीवर डॉक्टर साहेबांनी माझ्या अवघड प्रसंगात आर्थिक रक्कम देण्याची तयारी दाखवली होती आणि आजवर त्याची कुठेही वाच्यता देखील केलि नाही. रात्री १२ वाजता देखील त्यांना मेसेज टाकले आणि त्यांनी त्याचं समाधान केलं आहे. निव्वळ वैद्यकीय नाही तर अनेक आर्थिक बाबतीत सुद्धा डॉक्टर साहेब योग्य ते सल्ले देत असतात. Thanks a tonne! U rock!!!

हा लेख आला हे बरे झाले . कारण सर्वसामान्य माणसाला मुळात विषाणू व जिवाणू यातील फरकच माहीत नसतो.इथे खरे साहेबानी म्हटल्याप्रमाणे एखादी समस्या जिवाणू मुळे झाली की विषाणूमुळे याची माहिती डॉ नाच असते. सबब आपल्याला डिसेन्ट्री झाली तर रोग्याने तिचे यथास्थित वर्णन डॉ कडे करणे गरजेचे आहे. काही वेळेस अति प्रॅक्टीसच्या घाईने डॉ जरा गडबड करीत असतील तरीही फार तपशीलवार लक्षणे रोग्याने वर्णिली पाहिजेत. आपल्याला अचूक निदानाचा लाभ हा आपल्यावर सर्वात जास्त अवलंबून असतो. कारण बाह्य लक्षणे सर्वानाच दिसत असतात.शौचातून शेंब पडणे, रक्त पडणे व फेस पडणे याचे अर्थ फार वेगवेगळे आहेत अशा गोष्टी लपवून ठेवून काय फायदा ? डॉ खरे -- या बरोबरच प्रोबायोटिक्स बद्द्ल काही सांगाल काय साहेब ?

नेहमीप्रमाणे ज्ञानवर्धक लेख. अत्यंत सोप्या भाषेत कठीण विषयाची माहीती. बाकी मानेंनी सांगीतल्याप्रमाणे आम्ही डॉ़कचा पंखा आहोतच...

डॉक साहेब, फार छान लेख. माझ्या काही शंका.... १. आपल्या शरीरात खूप सारे जीवाणू असतात जे आपल्याला मदत करत असतात जसे अन्न पचन, अजून काही चयापचय वगरे.... हे खरे आहे का? 2. असल्यास, antibiotics मुळे त्यांच्या कार्यक्षतेवर परिणाम होतो का? 3. बरेच डॉक antibiotics सोबत antacid prescribe करतात ते का? 4. काही संस्थळ(ऑनलाइन वाचलेले...सॉरी प्रत्यक्ष संस्थळ आठवत नाही) सांगतात कि अर्ध्यावर अँटिबायोटिक्स बंद केले तरी जीवाणू resistent होत नाहीत

In reply to by John McClain

John McClain साहेब हा विषय फारच मोठा आहे आणि इतके सविस्तर लिहिने शक्य नाही. खालील दुवा वाचून पहा https://en.wikipedia.org/wiki/Gut_flora थोडक्यात सांगतो. आतड्यात असंख्य तर्हेचे सहजीवी जिवाणू असतात. यात दुग्धजन्य जिवाणू (लॅकटोबॅसिलस) हे महत्त्वाचे आहेत. ते तेथे अन्नपचनापासून काही संप्रेरके आणि जीवनसत्त्वे तयार करण्यापर्यंत काम करीत असतात. ते रोगकारक जीवाणूंना तेथे सहज वस्ती करू देत नाहीत. जेंव्हा बरेच दिवस प्रतिजैविके घेतली जातात तेंव्हा या आतड्यातील सहजीवी जिवाणूंची वस्ती विस्कळीत होते आणि आपल्याला शौचाच्या तक्रारी सुरू होऊ शकतात. अशा वेळेस डॉक्टर वरील दुग्धजन्य जिवाणू (लॅकटोबॅसिलस) आणि इतर जिवाणू कॅप्सूल स्वरूपात देतात. किंवा याला साधा घरगुती उपाय म्हणजे जरासे आंबट झालेले ताक किंवा दही. प्रतिजैविकांबरोबर अँटासिड देण्यासाठी कोणतेच तर्कशास्त्र नाही. बरेच वेळेस सुदृढ प्रकृतीच्या बैठी कामे करणाऱ्या लोकाना( ही जमात आताशा फारच वाढलेली आहे) "अशीच" ऍसिडिटी होत असते त्यामुळे नंतर कटकट नको म्हणून आणि भरपूर औषधे दिली नाहीत तर लोकांना हा डॉकटर बरोबर नाही असेही वाटत असते त्यासाठी डॉक्टर सर्रास अँटासिड लिहून देत असतात. माझा एक अत्यंत हुशार, उत्कृष्ट असा हाडांचा डॉक्टर असलेला आणि नैतिक आणि प्रामाणिक व्यवसाय करणारा वर्गमित्र प्रत्येक रुग्णाला अँटासिड लिहून देतो. या मागे कोणतेही तर्कशास्त्र नाही. यावर चर्चच ही झाली आहे केवळ त्याचे वैयक्तिक मत.

धन्यवाद डॉक्टर या अतिशय माहितीपूर्ण लेखासाठी. मुळ विषयाबरोबरच तुम्ही Over-the-counter (OTC) drugs बद्दल अतिशय मोलाची माहीती दिली आहे.

१ हो.आपल्या आतड्यात आपल्या पचनाला मदत करणारे जीवाणू असतात.एखाद्या मोठ्या इंफेक्शनमध्ये प्रतिजैविक घ्यायला लागल्यास काही वेळा जुलाब होतात.त्याचे कारण प्रतिजैविकामुळे हे मदत करणारे जीवाणू पण कमी होतात.यासाठी काहीवेळा प्रतिजैविकासोबत हे बॅक्टेरिया देणारी औषधं ,पावडर असे दिले जाते उदा rinifol,vitagut etc असाच प्रकार अतिसारामुळेही होतो.तेव्हाही शौचाची तरलता कमी व्हावी यासाठी या बॅक्टेरियांची औषधे दिली जातात. वारंवार तोंड येणे हेसुद्धा काही वेळा या बॅक्टेरियांच्या कमतरतेने होते.तेव्हाही झींक आणि बॅक्टेरिया हे काँबिनेशन असणाऱ्या गोळ्या दिल्या जातात. २. अँटासिड हे बहुधा सोबत जी पेन किलर इ गोळी दिली आहे तिच्याने जळजळ होऊ शकते म्हणून तसेच काही गोळ्या उदा oflox ornidazole आदि काँबिनेशन असणार्या ,त्या घेतल्यावर मळमळते.त्यासाठी दिले जाते. ३.तुम्ही अॅंटिबायोटिक घेतले.की ते त्या बॅक्टेरियाला मारणे किंवा त्याची वाढ रोखणे हे काम करण्यासाठी ठराविक डोस जो तुमच्या इंफेक्शनची तीव्रता ,तुमचे वजन,तुमचे वय,अॅलर्जीज इ विचार करुन तसेच लहान मुलांचे तर सरळ वजनाचे गणित करुन विभागीत डोस मध्ये दिले जाते. कमी डोसमधले अॅन्टीबायोटिक सर्व बॅक्टेरिया मारणार पण नाहीच तर रेझिस्टंट बॅक्टेरिया तयार करणार जे दादच देणार नाहीत त्या औषधाला पुढच्या वेळी.त्यामुळे त्या त्या डोसमध्ये प्रशिक्षित MBBSव तत्सम डाॅ जे मेडिसिन शिकलेले आहेत(अन्य पॅथीबद्दल मी बोलत नाही) जेव्हा घ्यायला सांगतात,घेणे अत्यावश्यक आहे.

प्रतिजैविक औषधांबद्दल नेहमीच खूप प्रश्न पडायचे, त्यांची सोप्या भाषेत उकल केल्याबद्दल अनेक धन्यवाद.

सुंदर थोडक्यात चपखल माहिती असलेला लेख. (मात्र, हा लेख वाचूनही, वेळ आल्यावर लोकांनी शेजारी/मित्र-मैत्रिण-आजीबाई-काकूबाई/स्वयंघोषित तज्ञ/आंतरजाल वाचून तयार झालेला तज्ञ/'न'-आधुनिक वैद्यक तज्ञ/स्वतःचा 'अंदाज'/इत्यादींवर भरवसा ठेऊन कृती करू नये, हीच इश्वरचरणी प्रार्थना ! :) )

अतिषय माहीतीपुर्ण लेख ! मला पुढील काही प्रश्न पडले पडले: १. समजा अ‍ॅन्टीबायोटिक घेतले नाहीत तर एका नॉर्मली हेल्दी बॉडी नॅचरली रिक्वहर होवु शकते का ? २. समजा आपण शरीराला नॅचरली रिअव्हर होण्याची संधीच दिली नाही , छोट्या मोठ्ठ्या बॅक्टेरियल इन्फेशन्स वरही अ‍ॅ.बा. घ्यायला लागलो तर शरीराच्या नॅचरल रेसेस्टन्स पॉवर वर दुरगामी परिणाम पडेल का ? ३. हा परिणाम पुढे जेनेटिक होवुन भविष्यात( म्हणजे लै लै वर्षांनी) एकुणच मानव प्रजाती अशक्त होवु शकते का ? ४. होमिओपॅथीचे माहीत नाही पण आयुर्वेदिक औषधे घेवुन बॅक्टेरियल इन्फेक्शन बरे झाल्याचा अनुभव आहे , मग अशावेळेस आयुर्वेदिक मेडीसिन ट्राय करायला काय हरकत असु शकते ? ५. अ‍ॅ.बा. घेण्यापेक्षा शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढवण्याची औषधे ( वॅक्सीनेशन टाईप ) उपलब्ध्द आहेत का की जेणे करुन बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होणारच नाहीत ? ६.अ‍ॅ.बा. चा फार्मासुटिकल मार्केट मधील किति टक्के शेयर घेतात ? अशा प्रकारचा डेटा अंतर्जालावर कोठे उपलब्ध्द असु शकतो काय ? आपला विनम्र सीझर मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस् Vi Veri Veniversum Vivus Vici

In reply to by प्रसाद गोडबोले

१ ते तुमची प्रतिकारशक्ती, इंफेक्शनची तीव्रता ,डायबेटिस सारखा आजार नाही ना अशा घटकांवर अवलंबून आहे.तसंच अगदी छोट्या सर्जरीज किंवा दात काढणे इ व्यवस्थित स्टरिलाइज्ड हत्यारांनी केल्यास बारीक सारीक इंफेक्शन विना प्रतिजैविक बरी होऊ शकतात. पण उद्या एखाद्या माणसाला दात किडुन पू होऊन सूज आलीये.ताप आहे.घासही गिळता येत नाही.सूज पसरत चालली आहे.आणि तो मी अँटिबायोटिक वगैरे घेणार नाही.सगळी थेरं आहेत.असे करत बसला तर ते इंफेक्शन त्याच्या जीवावर बेतु शकते. २ उगाच प्रतिजैविके घेतल्यास आपण आपली स्वतःची इम्युनिटी वापरणारच नाही.पण प्रतिजैविक रेझिस्टन्स मात्र नक्की येईल.यासाठीच व्हायरल आजार उदा सर्दी, फ्लु यात प्रतिजैविकाचा काहीच रोल नाही.म्हणून घेऊ नयेत. ४ आयुर्वेदिकला पास ५आपण बिसिजी, टिटि इ लसी घेतो त्या याचसाठी.

In reply to by प्रसाद गोडबोले

मार्कस ऑरेलियस साहेब १)एक लक्षात घ्या जेंव्हा प्रतिजैविके नव्हती तेंव्हा सुद्धा माणसे १०० वर्ष "पर्यंत" जगतच होती याचा सरळ अर्थ असा आहे की आपली प्रतिकारशक्ती हा रोग बरा होण्यासाठी आवश्यक असा एक "सर्वात महत्त्वाचा" घटक आहे. एड्स होतो तेंव्हा ही प्रतिकारशक्तीच खच्ची होते म्हणून माणूस अनेक रोगांना बळी पडतो. तुम्हाला साधे कापले खरचटले तर कोणतेही औषध न घेता तुम्ही बरे होताच की. प्रत्येक पेशींच्या पृष्ठभागावर त्यांच्या आतील रासायनिक रचनेचा आलेख लिहिलेला असतो. हा आपल्या पासपोर्ट सारखा असतो. आपल्या शरीरात दर सेकंदाला असंख्य जंतू प्रवेश करत असतात. या येणाऱ्या प्रत्येक जंतू अथवा पेशीचा "पासपोर्ट तपासणे" हे पांढऱ्या पेशीतील काही विविक्षित तर्हेच्या पेशींचे काम असते. पेशी हा पासपोर्ट तपासून तुमची "स्व" आणि "परकीय" अशी विभागणी करतात आणि ज्या पेशी परकीय आहेत त्यांना दुसऱ्या सैनिक पांढऱ्या पेशींकडे सुपूर्द करतात. या सैनिक पेशी परकीय पेशींचा नाश करीत असतात. तेंव्हा शरीरात शिरलेले जंतू हे ताबडतोब नष्ट केले जातात. जेंव्हा शिरले जंतू हे पांढऱ्या पेशींपेक्षा संख्याबलाने "फारच जास्त" असतात तेंव्हा ते पटकन शरीरभर पसरतात आणि आपल्याला रोग होतो. या वेळेत तूमचे शरीर काही स्वस्थ बसलेले नसते, ते नवीन पांढऱ्या पेशी तयार करण्याचे काम जोमाने करत असतात. ज्यावेळेस नवीन मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागतात तेंव्हा नैसर्गिक रित्या रोग आटोक्यात येऊ लागतो. जेंव्हा पांढऱ्या पेशींचे वाढलेले प्रमाण सुद्धा जंतूंना अटकाव करू शकत नाही अशा वेळेस शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडते आणि माणूस मृत्युमुखी पडू शकतो. प्लेग, कॉलरा, विषमज्वर इ रोगांनी माणसे मरत असत ती या कारणाने. या मधल्या काळात शरीराला हानी पोचू नये म्हणून हे अतिरिक्त जंतू प्रतिजैविके देऊन मारले जातात आणि रोग पटकन आटोक्यात येतो. यामुळेच प्रतिजैविकांचा शोध लागला आणि लक्षावधी अपमृत्यू टाळता आले. जन्म मृत्यू चे हे प्रमाण संतुलित होते त्यामुळे १९५० पर्यंत जगाची लोकसंख्या आटोक्यात होती दुर्दैवाने मागच्या तीन पिढ्यानि सरासरी सात ते आठ मुलांना जन्म दिला आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने जगाची लोकसंख्या गेल्या साठ वर्षात तिप्पट झाली. कर्करोगाच्या पेशींचाही पासपोर्ट बदललेला असतो त्यामुळे अशा ९९ % कर्करोगाच्या पेशी आपोआप आपले शरीर नायनाट करीत असते. उरलेल्या १% पेशींचा पासपोर्ट आपल्या "स्व" पासपोर्टशी मिळताजुळता असल्याने त्या पेशींचे "परकीय" म्हणून निदान होत नाही आणि त्या पेशींपासून कर्करोग होतो. ऑटो इम्यून डिसीज मध्ये आपल्या प्रतिकारशक्तीत बिघाड होतो आणि "स्व" च्या पेशी परकीय समजून त्यावर हल्ला चढवला जातो. २) सतत प्रतिजैविके घेण्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती नीट विकसित होत नाही हे सत्य आहे. त्यातून आजकाल जरा काही झाले की डॉक्टरकडे बाळाला घेऊन जाणारे आणि लगेच प्रतिजैविक द्या असा आग्रह धरणारे "अति जागरूक" पालक फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. याची मुले " साजूक" असतात आणि जरा बाहेर काही खाल्ले किंवा पावसात भिजली की लगेच आजारी पडतात. आजारी पडला की एक दोन दिवस धीर धरा हे यांना समजतच नाही. दोन तास ताप आटोक्यात येत नाही म्हणून लगेच इंजेक्शन द्या म्हणणारे कित्येक पालक दिसतात. एक मूल आणि त्याची काळजी वाहायला दोन आई बाप आणि चार आजी आजोबा या मुळे हे सर्रास दिसत्ते आहे. नुसते तेवढेच नव्हे तर डॉक्टरकडे गेले की परत ताप येत कामा नये किंवा हगवण ताबडतोब थांबली पाहिजे हा आग्रह असतो. औषध दिले आणि त्यानंतर दोनदा शौचास झाले की डॉक्टर बदलणारे पालक आज काल भरपूर दिसतात. मुलाच्या आजारपणासाठी आज रजा काढली आहे उद्या रजा मिळणार नाही तेंव्हा आज संध्यकाळपर्यंत मूल खडखडीत बरे झाले पाहिजे हा आग्रह -कम- धमकी असल्यावर नवशिका डॉक्टर प्रतिजैविकांचा मारा करतो. ३) मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक आजारावर औषध/ प्रतिजैविक घेतलेच पाहिजे असे मुळीच नाही. बहुसंख्य आजार स्वतः हून बरे होतील मग आयुर्वेदिक औषध घ्या अथवा घेऊ नका. बाकी अनुभव म्हणाल तर लोकांना "बाहेरची बाधा" "भूत" "साक्षात्कार" यांचाही "अनुभव" येत असतोच. शास्त्रीय कसोट्यांवर टिकला तर तो पुरावा म्हणता येईल. आले, हळद, कांदा लसूण यात जंतुनाशक गुण आहेत परंतु त्यावर पूर्ण संशोधन होऊन त्याचे औषधात रूपांतर अजून तरी झालेले नाही. तोवर याचे जंतुनाशक गुण आयुर्वेदाला माहीत होतेच म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काय हशील आहे? १२ व्या शतकानंतर वाढ खुंटलेले आणि दुराग्रहामुळे आधुनिक विज्ञानाची कास न धरता आपल्या दैदिप्यमान इतिहासातच रमलेले ते एक जुने शास्त्र आहे एवढेच मी म्हणेन. बहुसंख्य आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी चे लोक आम्ही प्रतिकार शक्ती "वाढवतो" त्यामुळे रोग होणारच नाही असा दावा करतात. दुर्दैवाने यातील एकही दावा पुराव्याने अजून तरी शाबीत झालेला नाही. यांचे बहुसंख्य दावे राजकारणी लोकांच्या दाव्यांसारखे असतात आणि शास्त्रीय कसोटीला टिकत नाहीत.

In reply to by सुबोध खरे

दणदणीत प्रतिसाद, डॉक..
१२ व्या शतकानंतर वाढ खुंटलेले आणि दुराग्रहामुळे आधुनिक विज्ञानाची कास न धरता आपल्या दैदिप्यमान इतिहासातच रमलेले ते एक जुने शास्त्र आहे एवढेच मी म्हणेन.
खासकरून यासाठी +११११.. आजच बातमी वाचली की भारतातला "आयुष" प्रकल्प, जो आयुर्वेदातल्या औषधे, उपचार पद्धतींवर आधुनिक पद्धतीने संशोधन करून शास्त्रीय स्वरुपात संकलित करणार होता, तो पुरेश्या फंडीगच्या अभावामुळे गुंडाळण्यात आला आहे (भारतातली मूलभूत शास्त्रीय संशोधनाबद्दल उपेक्षा, अजून काय).

माझा मेडिकल क्षेत्राशी दूरान्वयाने देखील संबंध नाही (कन्झ्यूमर म्हणून क्वचित येतो ते जाऊ दे). पण आत्तापर्यंत जवळच्या अनेक लोकांना कळकळीनं मेडिकल सायन्स ने सांगितलेली च औषधं घ्या, सप्लिमेंटल / पॅरलल मेडिसीन च्या नादी लागू नका म्हणून सांगितलं आहे. आज तुमच्या लेखानं माझ्या विश्वासावर शिक्कामोर्तब झालं. अ‍ॅलोपॅथी असा शब्दच नाहीये आणी होमिओपॅथी वाल्यांनी मेडिकल सायन्स साठी तयार केलेलं एक हेटाळणीसदृश संबोधन आहे, हे बरोबर आहे का? "अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात." - ह्यावर थोडा प्रकाश टाकणार का? हे मान्य आहेच, पण विस्तृत माहिती द्याल का?

In reply to by फेरफटका

फेरफटका साहेब अ‍ॅलोपॅथी असा शब्दच नाहीये आणी होमिओपॅथी वाल्यांनी मेडिकल सायन्स साठी तयार केलेलं एक हेटाळणीसदृश संबोधन आहे, हे बरोबर आहे का? https://en.wikipedia.org/wiki/Allopathic_medicine हा दुवा पहा. "अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात." हा दावा "होमियोपाथ" करतात त्यांच्यापैकी एखाद्याला विचारा ते मोठ्या उत्साहात सांगतील.

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद डॉ. खरे. "हा दावा "होमियोपाथ" करतात त्यांच्यापैकी एखाद्याला विचारा ते मोठ्या उत्साहात सांगतील." - त्यांच्या अ‍ॅनालॉजीज ऐकुनच हा प्रश्न विचारला. ते सरळ उत्तर न देता उगाच काहीतरी एका खोलीत आग लागली तर आम्ही ती विझवतो, म्हणून वेळ लागतो. "अ‍ॅलोपॅथ्स" फक्त दार लावतात वगैरे शेंडीकाम करतात. मला ते कधीच पटलेलं नाही, म्हणून तुम्हाला विचारलं. पण जर दुसर्या शास्त्राविषयी बोलणं अन-एथिकल असेल, तर राहू द्या. मी आग्रह करणार नाही.

In reply to by फेरफटका

http://edzardernst.com/2015/03/the-final-verdict-on-homeopathy-its-a-pl… https://www.nhmrc.gov.au/guidelines-publications/cam02? ज्याला होमियोपॅथी बद्दल शास्त्रीय माहिती हवी आहे त्याने हे वरील दुवे वाचावे. असे असंख्य दुवे आहेत. आम्ही अमुक तमुकला बरे केले अशा तर्हेच्या "सुरस आणि चमत्कारिक गोष्टी" बरेच होमियोपॅथ आणि त्यांचे चाहते सांगत असतात. परंतु आतापर्यंत झालेली एकही शास्त्रीय चाचणी सज्जड पुराव्यानिशी हे सांगत नाही की होमिओपॅथी ही नक्कीच काम करते. बाकी मी म्हणतो तसे ज्याला जे पचते ते त्याने खावे आणि रुचते ते बोलावे. लोकांचा बाहेरची बाधा, नजर लागणे ( आणि यासाठी नजर सुरक्षा कवच) किंवा श्रीयंत्र इ ने जीवनातील सर्व दुःखे दूर होतील असा छातीठोक दावा असतो. तो त्यांच्या वैयक्तिकी श्रद्धेचा भाग आहे.

In reply to by सुबोध खरे

हत्या / आत्महत्या हा जसा कायद्यानं गुन्हा आहे (सोशल फॅब्रिक चं नुकसान होतं असं कायदा म्हणतो), तसंच ह्या वैय्यक्तिक श्रद्धेपोटी जेव्हा जीव जायची वेळ येते, तेव्हा तिच्याकडे वैय्यक्तिक श्रद्धा म्हणून बघवत नाही. एका कॅन्सर चं निदान झालेल्या जवळच्या नातेवाईकाने जेव्हा किमो टाळण्यासाठी वर्षभर आयुर्वेदिक/होमिओपॅथी ई. उपचार घेतले तेव्हा राग + दु:ख अशा मिश्र भावना होत्या. त्या अवधीत रोग आणखी बळावला आणी शेवटी किमो करावीच लागली. पुढचा हास्यास्पद भाग म्हणजे किमो चे 'साईड ईफेक्ट्स टाळण्यासाठी पुन्हा आयुर्वेदीक / होमिओपॅथी सुरू केलं तेव्हा मात्र हताश झालो. कुठल्याही शास्त्रीय कसोटीवर सिद्ध न झालेल्या औषधयोजनेला निदान सरकारमान्यता तरी नसावी असं माझं मत आहे.

In reply to by फेरफटका

साहेब, आपल्या विधानाचा पुनर्विचार करावा. कुठल्याही शास्त्रीय कसोटीवर सिद्ध न झालेल्या औषधयोजनेला निदान सरकारमान्यता तरी नसावी असं माझं मत आहे. याचा अर्थ काय ? आयुर्वेद किंवा होमिओपाथ यांना आपण बाबा, बुवा, भगत यांच्या रांगेत बसवणार का ? डॉ. खरे मॉडर्न मेडिसिनचे तज्ञ आहेत आणि त्यांनी पुराव्यानिशी लिहिले आहे. तुमच्याकडे पुरावे असतील तर लिहा अन्यथा फेकाफेकी बंद करा अशी विनंती आहे. जसे काही होमिओपाथ, वैद्य भोंदू असतात तसे काही मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टरही भोंदू असतात. मग मॉडर्न मेडिसिनलाही खोटे म्हणाल. 'प्रास' यांनी येथे सविस्तर प्रतिसाद दिला असता तर बरे झाले असते.

In reply to by अप्पा जोगळेकर

आयुर्वेद किंवा होमिओपाथ यांना आपण बाबा, बुवा, भगत यांच्या रांगेत बसवणार का ?
आयुर्वेद माहिती नाही पण होमिओपदी आणि बाबा बुवा भगत यांच्यात फरक नाही. इन्फॅक्ट जे बाबाबुवा चुकून माकून औषधी वनस्पती देतही असतील ते होमिओपदीपेक्षा बरे.

In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पा, शास्त्रीय कसोट्यांवर होमिओपॅथी सिद्ध झाली नाहीये, हे डॉ. खर्यांनी वर म्हटलेलच आहे. त्या पद्धतीत evidence based proof आहे. ही फेकाफेकी वाटत असेल, तर पुराव्याने खोडून काढा आणी मी ते मोकळेपणाने मान्य करीन. विषयातील तज्ञ नसताना त्या विषयात अधिकारवाणीनं बोलू नये हे मान्य. पण मत सुद्धा व्यक्त करू नये हा दावा पोकळ आहे. सध्या माझ्याकडून हे तीन आंतरजालीय दूवे घ्या. https://www.sciencebasedmedicine.org/reference/homeopathy/ https://www.sciencebasedmedicine.org/homeopathy-failing-randomized-cont… https://nccih.nih.gov/health/homeopathy प्रश्न प्रॅक्टीस करणार्यांच्या भोंदुगिरी चा नाहीये. तो वेगळा विषय आहे. प्रश्न त्या उपचार पद्धतीच्या validity चा आहे.

डॉ. तुम्ही सोप्या शब्दातील उपयुक्त माहिती दिलीत ...पण लेख वाचुन असं वाटलं कि हा फक्त एक हॅप्पी पाथ सिनॅरियो सांगितलात. अर्थात हे मान्य आहे कि व्यक्ती तितक्या प्रकृती, वेगळे पेशन्ट्स वेगळे उपचार. माझी लेक लहान असताना आम्ही अँटीबॉयॉटीक पुढे बाकी खरचं हात टेकले होते. सुरुवात तापाने झाली होती.. १०२ पर्यंत ताप झाल्यावर्च डॉ. कडे जायचं असा इथला नियम, तोपर्यंत नर्स ला सगळे सिम्ट्मस सांगुन ऑव्हर द काउंटर जे काही ताप कमी कराय्चे औषध मिळतात ते देउन बघायचे. तेव्हा लेक ११ महिन्यांची होती. ताप उतरेना म्हणुन मग डॉ कडे गेलो. निदान झालं इयर इंफेकश्न. सुरुवत अ‍ॅमॉक्सिसीलीन १० दिवसाचा कोर्स. ते १० दिवस बरे गेले. परत एक आठवड्यात तोच प्रकार..ताप, कान ठणकतोय, मग परत डॉ. तेव्हा अजुन जास्त तिव्रतेचं अँटीबॉयॉटीक दिलं...त्याचे १० दिवस गेले. परत २ आठवडे होत नाहीत तर इयर इंफेकश्न, ह्यावेळी डॉ ने अजुन जास्त तीव्रतेचं औषध दिलं... परत ५ का १० दिवस. अजुन एकदा इयर इंफेकश्न... आता डॉ. नी स्ट्रोंग डोस दिला व दवाखान्यात २ तास ठेउन घेतलं. त्यानंतर बाकि आम्ही हवालदिल झालो... नशिबाने बाळ बरं होतं. शेवटी बाकि आम्ही तिच्या कानात ट्युबस टाकुन घेतल्या. त्यानंतर इयर इंफेकश्न प्रकरण थांबलं. खूप वर्ष झाली ह्या गोष्टीला पण लेखाच्या निमित्ताने आठवण झाली एवढचं. तरी परत एकदा.. व्यक्ती तितक्या प्रकृती, वेगळे पेशन्ट्स वेगळे उपचार. --मयुरा

In reply to by मयुरा गुप्ते

तुमच्या बाळाला सिक्रीटरी ओटायटीस मिडिया. "ग्लू इयर" होत होता, तो कानात शिट्टी बसवून बरा झाला. याला कारणीभूत अँटीबायोटिक्स नव्हेत, तर तिच्या कानाची व कान घशाशी जोडणार्‍या युस्टॅशिअन ट्यूबची आकार/संरचना आहे. तिची सर्दी पटकन कानात पोहोचत होती. अशा वेळी हातात सुरी कात्री घेण्याआधी आम्ही औषध-गोळ्यांनी काम करायचा प्रयत्न करतो. त्याने जमत नसेल, तर सर्जन सुरी कात्री हातात घेतो. केलेल्या ऑपरेशनचे नांव myringotomy (मायरिंगॉटॉमी) ˌmɪrɪnˈdʒɒtəmi,-ˈɡɒtəmi/ अर्थः surgical incision into the eardrum, to relieve pressure or drain fluid. व ट्यूब = ग्रोमेट, अर्थात, http://www.kidshealth.org.nz/grommets-tympanostomy-or-ventilation-tubes तात्पर्य, "आम्हाला अँटिबायोटिक्सचा काहीच उपयोग झाला नाही हो! कित्ति वैट्ट नं अँटीबायोटिक्स!" अशी जर थॉट प्रोसेस असेल तर ती चुकीची आहे, असे नोंदवितो.

In reply to by आनंदी गोपाळ

मयुरा, असे शास्त्रशुद्ध एक्प्लेनेशन तुम्ही कोणा होमिओपाथ ला देताना बघितले आहे का? किंवा आयुर्वेदचार्याला? होमिओपाथ आणि आयुर्वेदाची प्रॅक्टीस करणार्‍यांना अंधश्रद्धा निर्मुलन कायदा लावायला पाहिजे, किंवा त्यांना आयुष्यात कधीही मॉडर्न मेडीसीन चा स्वतावर किंवा कुटुंबावर वापर करण्यास बंदी केली पाहिजे.

In reply to by गंम्बा

होमिओपाथ आणि आयुर्वेदाची प्रॅक्टीस करणार्‍यांना अंधश्रद्धा निर्मुलन कायदा लावायला पाहिजे, तुम्ही मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर आहात आणि तुमची प्रॅक्टिस चालत नाही असा प्रकार तर नाही ना ?

In reply to by अप्पा जोगळेकर

नाही हो आप्पा, मी डॉक्टर नाहीये. कुठल्याही औषध कंपनीशी संबंधीत नाहीये. कुठल्याही प्रकारचा फायदा मला होणार नाही होमिओ किंवा आयुर्वेद बंद केले तर. माझे जे मत आहे ते लिहीले, नसेल पटत तर सोडुन द्या.

सुरेख लेख. खास करून इतर चिकित्सापद्धतींबद्दल संयत प्रतिक्रिया देणे आवडले. प्रतिजैविकांचा थेराप्यूटीक इन्डेक्स इतर वर्गातील औषधी द्रव्यांच्या तुलनेत जास्तीत जास्त आहे. तसेच ती लाईफ सेव्हिंग आहेत या दोन बाबींबद्दल विवेचन दिले तर आवडेल.

In reply to by सुधीर कांदळकर

त्यांचे ते संयत प्रतिसाद माझ्यासारख्या नास्तिकाला अनेकदा जमत नाहीत. मी लै खडूस लिहून जातो. स्पेशली होम्योपदीबद्दल. थेरप्युटिक इंडेक्सबद्दल तुमचे बरोबर आहे. प्रतिजैविके, ही सर्वात सेफ औषधे आहेत, कारण मुळातच ती जंतूंच्या शरिरावर काम करतील अशी बनवलेली आहेत. अगदी डोकेदुखीची साधी गोळी , सर्वाधिक तीव्रतेच्या अँटीबायोटिकपेक्षा तुमच्या शरीरावर जास्त केमिकल मॉडिफिकेशन्स करते.

In reply to by आनंदी गोपाळ

थेरप्युटिक इंडेक्स म्हणजे त्याच्या मृत्यू होईल इतक्या डोस आणि एखाद्या औषधाचा गुणकारी डोस चे गुणोत्तर. मृत्यू होईल इतका डोस जितका जास्त तितके ते औषध जास्त सुरक्षित. https://en.wikipedia.org/wiki/Therapeutic_index उदा पेनिसिलीन V हे औषध २५० मिग्रॅ दिवसात ३ वेळेस दिले जाते आणि याचा लिथल डोस ४००० mg/kg आहे. म्हणजेच एखाद्या ७० किलो च्या माणसाला मरण्यासाठी त्याला २८० ग्राम( ११२० कॅप्सूल्स) औषध देणे आवश्यक आहे. उंदरांना २४०० mg/kg औषध १४ दिवस सतत दिले तरीही त्यांच्या वर कोणताही वाईट परिणाम दिसून आला नाही. http://www.pfizer.com/files/products/material_safety_data/00230796.pdf यास्तव साईड इफेक्ट्स चा हा प्रचार इतर लोकांनी चालवलेला आहे तो किती खोटा नि बिनबुडाचा आहे हे सिद्ध होईल.

In reply to by सुबोध खरे

थोडं अवांतर होईल पण आपल्या अनयत्र झालेल्या चर्चेच्या संबंधाने एक प्रश्न विचारु का ?
थेरप्युटिक इंडेक्स म्हणजे त्याच्या मृत्यू होईल इतक्या डोस आणि एखाद्या औषधाचा गुणकारी डोस चे गुणोत्तर.
गांजाचा थेरप्युटिक इंडेक्स काय आहे हो ? ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

गांजाचा थेरप्युटिक इंडेक्स बराच जास्त आहे १०००० ते ३०००० आहे म्हणजेच आपण दीड दोन किलो गांजा खाल्ला तरी त्यामुळे मरणार नाही. गांजाचे दुष्परिणाम त्याच्या विषारी पणामुळे नव्हे तर गांजा प्यायल्यावर माणूस ज्या "माकडचेष्टा" करतो त्यामुळे होतात. आम्हाला असलेला एक "सुपर" सिनियर( ए एफ एम सी मध्ये साडे चार वर्षात एम बी बी एस पूर्ण करण्याऐवजी "सात आठ" वर्षात पूर्ण करणाऱ्याला हे नामाभिमान होते) याने एकदा गांजा पिऊन I AM FLYING TO LADIES HOSTEL म्हणून तिसऱ्या मजल्यावरून हात पसरून उडी मारली. जे व्हायचे तेच झाले. पाठीचा कणा धरून चौदा हाडे मोडली.सहा महिने रुग्णालयात पडून होता मग तीन वर्षांनी आमच्या बरोबर एम बी बी एस ची परीक्षा दिली. अर्थातच लष्करात भरती होणे शक्यच नव्हते. यांच्या "चरसी गॅंगने" होस्टेलच्या मागच्या बागेत चरसचे झाडही लावले होते. परंतु टॉक्सिकोलॉजिचेच प्राध्यापक वार्डन होते त्यांनी एकदा राउंड मारताना ते पाहिले आणि झाड मुळापासून उपटून काढले. गांजा, चरस आणि हेरॉईन च्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा नौदलाच्या व्यसन मुक्ती केंद्रात ऐकायला आणि पाहायला मिळाल्या. त्याबद्दल परत केंव्हातरी.

.व्वा डॉक्टर साहेब.. अत्यंत आवश्यक अशा विषयावर तितकेच माहितीपुर्ण विवेचन केल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद..आपणासारखे अभ्यासु डॉ. प्रत्येक कुटुंबास, प्रत्येक रुग्णास मिळो.

In reply to by वेल्लाभट

पूर्वी करत नसे परंतु जशी वर्षे जाताहेत तसे अनेक रोग जे बरे होऊ शकले असते ते होमियोपॅथी च्या लोकांनी बरेच महिने "चोळल्या"मुळे हाताबाहेर गेलेले दिसून येत आहेत. केस वाढवण्याची खात्री देणाऱ्या मुकेश बात्रामुळे बीजांडकोषाचा कर्करोग( ovarian cancer) असलेल्या( मीच निदान केलेल्या) ४५ आनि ४७ वयाच्या दोन स्त्रिया डोळ्यासमोर मरताना पाहिल्या आहेत. "कॉन्स्टीट्युशनल डिसऑर्डर" म्हणून फेरम फॉस आणि फॉसम फेर देऊन सहा महिने चोळून झाले. या कालावधीत कर्करोग शरीरभर पसरला आणि पोटात पाणी झाल्यावर ते रुग्ण परत आले तोवर रोग हाताबाहेर गेला होता. साधारण महिना किंवा दोन महिन्यात एक या दराने मूत्रपिंडातील खडे काढून देतो सांगून चोळ्त बसल्याने मूत्रपिंड खराब झालेले रुग्ण मी पाहतो आहे. मुतखडा किंवा पित्ताशयातील खडा याचे काहीही फायदा न झालेले रुग्ण माझ्या रोजच्या पाहण्यात गेली २५ वर्षे आहेत. पुण्यातील प्रथितयश डॉक्टर हबू आणि इतरही प्रतिष्ठित डॉक्टर यांचे मुतखडा किंवा पित्ताशयातील खडा याचे लष्करातील ६० रुग्ण( ज्यांना शल्यक्रिया करायची नव्हती) मी ३ वर्षे पर्यंत सोनोग्राफी करून पाहिले आहेत एकही रुग्णाचा एकही खडा गेलेला मी पाहिला नाही. पण आम्ही हे रोग बरे करून देतो हे छाती ठीकपणे सांगतात आणि ते सुद्धा "साईड इफेक्ट् शिवाय" या मूलमंत्रासकट. बीजांडकोशातील साधी सिस्ट (follicular cyst) ला कर्करोग म्हणून रुग्णाला सांगायचे ( ही सिस्ट ३-४ महिन्यात स्वतःहून बरी होते) आणि सहा महिन्यात कर्करोग बरा केला म्हणून शेंडी लावायची. हे पण कित्येक दिवस पाहत आलो आहे. स्वमग्नता एकलकोंडेकर यांच्या धाग्यावर एक होमियोपाथचा अनुभव मी मांडला आहे. आमच्या वर राहत असलेल्या आता अमेरिकेत असलेल्या मुलाची मुलगी ऑटिझम या रोगाची शिकार आहे. त्याच्या औषधाचे ५०००/- रुपये सांगितले जेंव्हा बाप "एन आर आय" आहे हे समजले तेंव्हा फी ५००० डॉलर्स झाली. या बापाने संतापाने सांगितले मी ५००० रुपये देईन औषध द्यायचे तर द्या. डॉलर्स मिळवण्यासाठी आम्ही किती कष्ट करतो तुम्हाला माहीत नाही. गपचूप औषध दिले. दुर्दैवाने फायदा काही झाला नाहीच. छदम शास्त्र असूनही एथिक्स आणि प्रामाणिकपणाचा आव आणण्याचा हा प्रयत्न पचत नाही. पूर्वी मी गप्प राहत असे परंतु आता स्पष्टपणे बोलल्यामुळे काही रुग्णांचा फायदा झालेला पाहिला आहे म्हणून हे बोलतो.

In reply to by सुबोध खरे

वाईचे डॉ. शन्तनु अभ्यंकर आधी BHMS करुन त्यात तथ्य न आढळल्याने पुन्हा MBBS करुन (नंतर पीजी पण केलं बहुतेक)आता हॉस्पिटल चालवतात. (त्यांचे वडील सुद्धा डॉक्टर)

In reply to by सुबोध खरे

तुमची कळकळ कळते. परंतु विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, इतर औषधोपचार थकल्यावर होमिओपॅथी घेऊन पूर्ण बरे झालेली ही प्रच्चंड उदाहरणं आहेत. मी वादात पडत नाही, पण तुम्ही म्हणता त्यानुसार होमिओपॅथी थोतांड मुळीच नाही. गैरसमज 'त्या' बाजूने पसरले असतीलही, पण तुम्ही उलट पसरवू नका इतकी विनंती करेन. ज्याला जे लागू पडतं ते औषध त्याने घ्यावं. आणि तुम्ही नमूद केल्याप्रमाणे भोंदू (हाच शब्द वापरतो) डॉक्टर जे मशरूम सारखे उगवत असतात त्यांच्यापासून लांब रहावं असं सर्वांना सुचवेन. माझा एक मित्र आहे, तो आज हा ब्रँड ट्राय करू.... अशा प्रकारे डॉक्टर बदलत असतो. दोन डोसात बरं नाही वाटलं की त्याला ** ठरवून दुसर्‍याकडे जातो. असा अ‍ॅप्रोच ठेवू नये असं मनापासून सांगावंसं वाटतं; सगळ्यांनाच. बाकी डोक्टरांच्या म्हणण्याला चॅलेंज न करता सांगतो, आजवर होमिओपॅथीच घेत आलोय; रादर, फ्यामिली डॉक जे देतात ते घेत आलोय आणि त्यांच्या औषधाने म्हणा किंवा हातगुणाने म्हणा; बरा होत आलोय. होमिओपॅथीवर माझा तरी विश्वास आहे आणि अनुभव चांगला आहे. माझं शरीर त्याला उत्तम प्रतिसाद देतं.

In reply to by वेल्लाभट

गैरसमज 'त्या' बाजूने पसरले असतीलही, मुकेश बात्रा यांचा एक तरी लेख "साईड इफेक्ट् शिवाय" हे शब्द नसलेला दाखवून द्या. प्रत्येक होमियोपॅथ हेच रडगाणे गात असतो. तुम्ही तुमचे धुणे धुवा की आधुनिक वैद्यकशास्त्राला शिव्या दिल्याशिवाय यांना जेवण घशाखाली उतरत नाही. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही प्रवृत्ती शिसारी आणणारी आहे. अगोदर आम्ही सर्व रोग बरे करून देतो असा दावा करायचा. स्वतःला क्षयरोग झाला की मात्र आधुनिक औषधे घ्यायची. हे करणारे दोन होमियोपॅथ माझ्या आसपास व्यवसाय करीत आहेत. त्यांची परिस्थिती पाहून त्याना "साबुदाण्याच्या गोळ्या" घ्या असे सांगायचं मोह मी आवरला. बाकी ज्याचा अंगारे धुपारे यावर विश्वास आहे त्याने ते पण करावे. ज्याला जे पटेल त्याने ते करावे. सांगणारा मी कोण? अब्जावधी लोक प्लेग कॉलरा विषमज्वर यांना बळी पडले किंवा देवी रोगाचे बळी जात होते तेंव्हा होमियोपॅथी होतीच की पण प्रतिजैविके/ देवीची लस आल्यावर लोकांचे प्राण वाचले ही वस्तुस्थिती कशी नाकारणार? आजही हेच होमियोपॅथ "लस टोचून घेऊ नका" हे सांगताना पाहतो तेंव्हा मात्र संताप आणि हतबल झाल्याची मिश्र भावना येते.

In reply to by सुबोध खरे

"लस टोचून घेऊ नका"
असं सांगणं हा फौजदारी की काय गुन्हा आहे ना म्हणे ? ( आणि नसेल तर असं म्हण्णार्‍याचं डाक्टरकीचं लायसन रद्द करता येत असेल ना ) . बाकी मूळ धागा/लेख माहितीपर आहे, उपयुक्त आहेच. त्याबद्दल मनःपूर्वक आभार .

In reply to by वेल्लाभट

मी वैद्यकीय डॉक्टर नाही. पण विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती मला समजल्या आहेत, असं मला वाटतं. म्हणून डॉ. खरे आणि इतर डॉक्टरांच्या क्षेत्रात थोडी घुसखोरी.
इतर औषधोपचार थकल्यावर होमिओपॅथी घेऊन पूर्ण बरे झालेली ही प्रच्चंड उदाहरणं आहेत.
इतर औषधोपचार घेऊन थकल्यावर असं तुम्ही म्हणता. वर कुठेतरी डॉ. खऱ्यांनीही लिहिलेलं आहे की औषध घ्यायला लागल्यावरही एक-दोन जुलाब होणं, एखादा ताप चढणं अशा गोष्टी होऊ शकतात. थोडक्यात औषध घेतलं आणि दुसऱ्या क्षणाला फायदा झाला असं ताप, पोट बिघडणं ह्या तुलनेत कमी गुंतागुंतीच्या आजारांमध्येही होतं. जे आजार, विकार बरेच अधिक गुंतागुंतीचे असतात आणि शरीरावर मोठा परिणाम करणारे असतात, ते बरे व्हायला बराच जास्त वेळ जाऊ शकतो. इतर औषधोपचार प्रभावी आहेत हे दिसण्यासाठी जो अधिकचा वेळ लागतो, त्याच काळात बरोब्बर होमेपदी सुरू केली आणि रुग्ण खडखडीत बरे झाले, अशीही एक शक्यता असते. ह्याचा पूर्ण अभ्यास झाल्याखेरीज रोग नक्की कशामुळे बरा झाला हे सांगता येत नाही. 'मी बरेच रुग्ण होमेपदीने बरे झालेले बघितलेले आहेत', ह्याला विज्ञानात काहीही अर्थ नाही. ह्याला सांगोवांगीच्या गोष्टी (anecdotes) म्हणतात. लेखाबद्दल आभार.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'मी बरेच रुग्ण होमेपदीने बरे झालेले बघितलेले आहेत', ह्याला विज्ञानात काहीही अर्थ नाही. ह्याला सांगोवांगीच्या गोष्टी (anecdotes) म्हणतात.
असं की काय? तर मग
विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती मला समजल्या आहेत, असं मला वाटतं.
यालाही विज्ञानात काहीही अर्थ नाही. तेंव्हा राहू द्या तुमचं तुमच्याकडे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा प्रतिसाद फाऊल मानण्यात यावा. (ना कोई लिंक, ना और कुछ, ऐसी भी कभी अक्षरे होती है यार? ;) )

सोप्या भाषेत समजावून सांगणारा असा लेख मी पहिल्यांदा वाचला. मार्कस ऑरेलियस यांचे प्रश्नही तितकेच महत्वाचे. आयुर्वेद व होमिओपॅथी बद्दल काही लोकांच्या मते ते जर उपयुक्त नसते तर कालाच्या ओघात ते नामशेष झाले असते असा युक्तिवाद केला जातो. जो ज्योतिषाबाबतही असतो.

उत्तम माहितीपुर्ण लेख डाॅक साहेब्स. प्रि आणि प्रो बायोटीक हा काय प्रकार असतो? याने पचन संस्था सुधारते असे बरेच सायटीवर वाचण्यात आले

In reply to by स्पा

प्रोबायोटिक अन्न म्हणजे पोटातल्या, पचनात मदत करणाऱ्या जीवाणूंना पोषक किंवा असे जीवाणू असणारं अन्न. उदाहरणार्थ दही, ताक. वेगवेगळ्या संस्कृतींमधले पारंपरिक आणि आंबवलेले अन्नपदार्थ ह्या प्रकारात मोडतात. कोंबुचा, किमची असे पदार्थ अमेरिकन फार्मर्स मार्केटात हातोहात आणि प्रचंड किमतीला विकले जातात.

In reply to by स्पा

prebiotic प्रीबायोटिक हे एक तर्हेचे कार्बोहायड्रेट पदार्थ असतात जे आपल्या शरीरात पचन होत नाही(nondigestible fiber) की शोषून घेतले जात नाहीत परंतु आतड्यात पुढे गेल्यावर त्याचा उपयुक्त जिवाणू अन्न म्हणून वापर करतात आणि या जिवाणूंच्या संख्येत वाढ होते. यामुळे आपोआप अपायकारक जंतूंची वाढ थांबते आणि आपली पचनसंस्था सुधारते. यात कांदा,कांद्याची पात, लसूण, गव्हाचा कोंडा, कच्चं केळं, गव्हाचं पीठ इ. पदार्थ येतात. प्राथमिक संशोधनात याचे बऱ्याच रोगांमध्ये फायदे दिसून आले असले तरी थेट कार्यकारण भाव अजून दाखवता आलेला नाही. त्यावर अजून संशोधन चालू आहे. probiotic प्रोबायोटिक हे एक तर्हेचे जिवाणू आहेत ज्यांचे सेवन केले असता आतड्यात त्यांची वसाहत तयार होते. हे सर्वसाधारणपणे मानव शरीराला अपायकारक नसून या वसाहतीमुळे इतर अपायकारक जिवाणू आतड्यात वसाहत करू शकत नाहीत. या मध्ये आईच्या दुधातून बाळाला येणारे bifidobacteria आणि दुधाचे दही बनवण्यासाठी जबादार असलेले दुग्धजन्य जिवाणू lactobacillus हे येतात. पोट बिघडले असेल किंवा बराच काळ प्रतिजैविक घेतल्यामुळे पचनशक्तीत बदल होऊन वारं वर शौचास होत असेल( antibiotic induced diarrhoea) यासाठी हे उपयुक्त आहेत. रक्तदाब कोलेस्टिरॉल वाढणे ऍलर्जी एक्झिमा आणि इत्तर प्रतिकारशक्तीचे आजार यात थोडा फार फायदा दिसून आला आहे. परंतु याबद्दल अजूनही खात्रीलायक किंवा निर्णायक पुरावा सापडलेला नाही. तसा पुरावा सापडेपर्यंत अनुभवातून आलेले शहाणपण म्हणून पोट बिघडलेल्या किंवा पचनशक्ती कमी असणाऱ्या माणसांनी ताक भात किंवा दही भात घेण्याने फायदा होईल. शिवाय पहिले सहा महिने मुलाची प्रतिकार शक्ती विकसित होईपर्यंत मुलाला फक्त "आईचे दूध" पाजणे श्रेयस्कर ठरेल. इतर खडाजंगी मध्ये आपला प्रश्न पाहायचा राहून गेला याबद्दल क्षमस्व.

सोप्या भाषेतील अत्यंत उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद डॉक. काही मुद्द्यांबाबत लेखात नमूद केल्यापेक्षा विपरीत अनुभव आहे. १. पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक डॉक्टरांकडे अँटि-बायोटिक्स देण्याचा आग्रह धरतात. सर्वसामान्यत: पेशंट किंवा नातेवाईकांना अँटि-बायोटिक्स या उपचारपद्धतीची फारशी माहिती नसते. डॉक्टर देतील ते औषध प्रामाणिकपणे घेण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे असा काही आग्रह डॉक्टरांना पेशंट किंवा नातेवाईकांकडून होत असेल हे खरे वाटत नाही. आणि झाला तरी त्यांना समजावून/ दटावून योग्य ते औषध डॉक्टरांनी दिले पाहिजे. २. आतापर्यंत जेव्हा जेव्हा अँटि-बायोटिक्स घेण्याची वेळ आली तेव्हा सर्व डॉक्टरांनी सोबत न चुकता अँटासिड घेण्यास बजावले होते. एकदा घेतले नाही तेव्हा जबरदस्त रिअ‍ॅक्शन आली. जनरली कोणतेही औषध न घेता नुसत्या आहाराने मला आजवर कधीच अ‍ॅसिडिटि झालेली नाही. पण अँटि-बायोटिक्स घेतल्यावर हमखास होते, असा अनुभव आहे. ३. खरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पेशंटसाठी योग्य असा अँटि-बायोटिक्स डोस किती हा विचार करून डोस लिहून देणारे डॉक्टर आढळात नाहीत. चाइल्ड डोस आणि अ‍ॅडल्ट डोस असे सरसकट वर्गीकरण करूनच देतात. पर्टिक्युलरली माझी ड्रग-सेन्सिटिव्हिटी जास्त असल्यामुळे एक्सेस अँटि-बायोटिक्स डोसचा अनेकदा जबरी धक्का खाल्ला आहे.

In reply to by सस्नेह

१. पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक डॉक्टरांकडे अँटि-बायोटिक्स देण्याचा आग्रह धरतात. सर्वसामान्यत: पेशंट किंवा नातेवाईकांना अँटि-बायोटिक्स या उपचारपद्धतीची फारशी माहिती नसते. डॉक्टर देतील ते औषध प्रामाणिकपणे घेण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे असा काही आग्रह डॉक्टरांना पेशंट किंवा नातेवाईकांकडून होत असेल हे खरे वाटत नाही. आणि झाला तरी त्यांना समजावून/ दटावून योग्य ते औषध डॉक्टरांनी दिले पाहिजे.
त्यांनी, पेशंट लग्गेच, आत्ताच, तात्काळ "बरे" होण्याचा आग्रह धरतो, व हे होण्याची शक्यता, जहाल प्रतिजैविकांच्या मार्‍याने कमी होते, हीच फॅक्ट फक्त नोंदविलेलि आहे. नातेवाईक अ‍ॅंटीबायोटिक्स मागत नाही, इन्स्टन्ट रिझल्ट मागतो. माझ्या खुर्चीत बसून समजावू/दटावून योग्य ते औषध देण्याचे काम आपण सालग १ महिना करावे, ही नम्र विनंती करतो. ;) नंतर होणारे नुकसान (शारिरीक व आर्थिक, मी भरून देईन)
२. आतापर्यंत जेव्हा जेव्हा अँटि-बायोटिक्स घेण्याची वेळ आली तेव्हा सर्व डॉक्टरांनी सोबत न चुकता अँटासिड घेण्यास बजावले होते. एकदा घेतले नाही तेव्हा जबरदस्त रिअ‍ॅक्शन आली. जनरली कोणतेही औषध न घेता नुसत्या आहाराने मला आजवर कधीच अ‍ॅसिडिटि झालेली नाही. पण अँटि-बायोटिक्स घेतल्यावर हमखास होते, असा अनुभव आहे.
अ‍ॅसिडिटी हा अ‍ॅंटीबायोटिकचा सामान्य साईड इफेक्ट नसून, बहुदा त्यासोबत दिलेल्या पेन किलर/ सूजनाशक/ तापाच्या औषधाचा असतो.
३. खरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पेशंटसाठी योग्य असा अँटि-बायोटिक्स डोस किती हा विचार करून डोस लिहून देणारे डॉक्टर आढळात नाहीत. चाइल्ड डोस आणि अ‍ॅडल्ट डोस असे सरसकट वर्गीकरण करूनच देतात. पर्टिक्युलरली माझी ड्रग-सेन्सिटिव्हिटी जास्त असल्यामुळे एक्सेस अँटि-बायोटिक्स डोसचा अनेकदा जबरी धक्का खाल्ला आहे.
असे मूर्ख नक्कीच आधुनिक वैद्यकाचे पदविधर नव्हेत. तुमचे वय, वजन, लिंग, पूर्वेतिहास, सोबत लिहिलेल्या औषधांशी संभाव्य क्रॉस रिअ‍ॅक्शन याचा विचार न करता पेन कधीच चालत नाही. तसा तो चालत असेल, तर त्या सद्गृहस्थांनी डिग्री सरळ नेऊन चोरबाजारात विकावी, व तुमच्यासारख्या पेशंटांनी त्यांच्याकडे जाणे थांबवावे, हा सल्ला. माफ करा, हा तुम्हाला वैयक्तिक प्रतिसाद नसून, तुमच्या समजूतींना आहे.

In reply to by आनंदी गोपाळ

अज्ञानमूल व पूर्वग्रहदूषीत प्रतिसाद
???? सदर प्रतिसाद हे माझे 'ज्ञान' अगर समजूत नसून अनुभव आहे, आनंदी गोपाळसाहेब. एखादा पेशंट, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, 'लवकर बरे करा' असे डॉक्टरांना निश्चितच म्हणेल पण 'मला अँटिबायोटिक्सच द्या' असे म्हणेल, हे अतिज्ञानी पेशंटच्या बाबतीत खरे असेल कदाचित, पण सर्वसामान्य पेशंटबद्दल मी लिहिले आहे, त्या वर्गातले नक्कीच म्हणणार नाहीत.
असे मूर्ख नक्कीच आधुनिक वैद्यकाचे पदविधर नव्हेत. तुमचे वय, वजन, लिंग, पूर्वेतिहास, सोबत लिहिलेल्या औषधांशी संभाव्य क्रॉस रिअ‍ॅक्शन याचा विचार न करता पेन कधीच चालत नाही. तसा तो चालत असेल, तर त्या सद्गृहस्थांनी डिग्री सरळ नेऊन चोरबाजारात विकावी, व तुमच्यासारख्या पेशंटांनी त्यांच्याकडे जाणे थांबवावे, हा सल्ला.
डॉक्टर लोकांवरील प्रामाणिक टिप्पणीबद्दल धन्यवाद !!

अत्यंत उपयुक्त लेख. प्रतिजैविके विषाणू मारताना त्याबरोबर शरीरातील प्रथिनेही मारतात आणि त्यामुळे अशक्तपणा येतो हे खरे आहे का ? प्रथिन हे रसायन असते किंवा असावे. मग प्रथिने मरतात म्हणजे काय ? बाकी, ताप अंगावर काढणे चांगलेच असे वाटू लागले आहे.