Skip to main content

पानिपतची पहिली लढाई

रविवार, 05/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
बाबराचा बाप उमर शेख मिर्झा याला परंपरागत पद्धतीने काबुल चे राज्य मिळाले होते. काही कारणाने ते त्याच्याकडून जाऊन त्याला फरहाना (सध्याचे उझबेकिस्तान) (सिर्दार्या नदीच्या उगमाजवळचा प्रांत-राजधानी आदिजान) प्रांत मिळाला.बाबराला बापाकडून हे राज्य मिळाले. हा संपूर्ण प्रदेश डोंगराळ आहे. हे राज्य स्थिर राज्य नसून मुख्यतः लुटमारी हाच यांचा मुख्य धंदा होता. एकंदरीत अंदाज यावा म्हणून एक नकाशा एकंदरीत अंदाज यावा म्हणून एक नकाशा बाबर बापाकडून तैमुरलंगचा वंशज ,तर आई कडून चंगीझ खानचा वंशज होता. बाबर मुघल नव्हता त्याला स्वतःला तुर्की म्हणवून घेणे आवडत असे. [image ref-3] [image ref-3] बाबरच्या बापाला १० भाऊ होते. यांपैकी समर्कद चे राज्य करणारा राज्यकर्त्याचा मृत्यु झाल्याने त्यावर बाकी वंशजांनी हल्ले केले, यामध्ये बाबर पण होता. समर्कदचे राज्य जिंकून त्याच्यां नावाने खुद्बासुद्धा पढला गेला पण शत्रूंनी आदीजान या राजधानीच्या शहरावर हल्ले सुरु केले. बाबराने समर्कद सोडले असता त्याच्या चुलत भावाने (सुलतान आली)ने समर्कद घेतले आणि भाऊ जहागीर मिर्झा याने लष्करात फितुरी माजवून आदिजान घेतले. बाबर राज्यभ्रष्ट झाला. पण परत लहान लहान टोळ्या एकत्र करून त्यांने राजधानी मिळवली. बाबराला मुख्य वेध समर्कद शहर जिंकण्याचे लागले होते. पण त्याचा शाबयानी खानने (चंगीज खानाचा वंशज -चंगेज खानाचे वंशज तैमुरच्या राज्या पलीकडे पूर्वेस आणि उत्तरेस राज्य करत होते) पराभव केला, याला सुद्धा समर्कदच्या राज्य मध्ये विशेष रस होता. कारण म्हणजे अमुदर्या आणि सिर्दर्या या नद्याच्या मध्ये असलेला हा भाग अत्यंत सुपीक होता, याला एखाद्या सुंदर बागेची उपमा देता येईल. येथील फळांचे वर्णन बऱ्याच ठिकाणी केलेले आढळते. तर शाबयानी खानने आक्शिच्या लढाईमध्ये बाबर आणि त्याच्या भावाचा पराभव केला. शाबयानी खानने राज्य खूप वाढवले,ताश्कंद प्रदेश सुद्धा जिंकून घेतला. या वेळी काबुलचे राज्य बाबरच्या चुलत्याच्या हातात होते, त्याच्या मृत्यू नंतर अल्पकाळ वजीराने राज्य केले पण त्याच्या खून करण्यात आला. या राजकीय घडामोडींचा फायदा घेत बाबराने हे राज्य मिळवले आणि काही दिवसातच कंदाहार शहर घेतले . बाबर काबुल वर राज्य करत असताना शाबयानी खान इराणच्या बादशाह (इस्माईल- 1) बरोबरच्या लढाई मध्ये मारला गेला.या लढाई मध्ये matchlock या प्राथमिक स्वरूपाच्या बंदुका वापरल्या गेल्या होत्या.बाबर नवीन शस्त्रास्त्रे आपल्या फौजेत वापरण्यास बराच उत्सुक असे. त्याने लगोलग आपल्या सैन्यात marchlocksचा समावेश करून घेतला आणि उस्ताद आली याला त्याचे प्रशिक्षण देण्या साठी नेमले. बाबर आणि इराणचा सत्ताधारी इस्माईल शाह बाबर आणि इराणचा सत्ताधारी इस्माईल शाह बाबराचा समर्कद चा मोह सुटला नव्हता त्याने एकाएकी हल्ला करून हे शहर ताब्यात घेतले. काबुलचे राज्य भाऊ नसीर याच्या ताब्यात देऊन बाबराने समर्कद चे राज्य चालवण्याचा निर्णय घेतला, काही काळ पर्शियाच्या शहा बरोबर मैत्री करून त्याने राज्य चालवले .पण समर्कद चे राज्य बाबराच्या नशिबात नव्हतेच. शिया-सुन्नी दंगली होऊन हे राज्य परत बाबराच्या हातातून गेले याच काळात चलदिरन(chaldiran)ची लढाई होऊन त्यात इस्माईलचा-बाबरच्या मित्रपक्षाचा पराभव झाला. बाबर आता काबुलला आला आणि राज्य विस्तार आणि धन दौलत या दृष्टीने हिंदुस्तान हे त्याचे लक्ष्य बनले. नंतरच्या काळात तो म्हणत असे कि समर्कद मिळवण्यात आलेले अपयश ही अल्लाह ने दिलेली सगळ्यात मोठी भेट आहे. पानिपतच्या निर्णायक लढाई आधी बाबराच्या हिंदुस्तान च्या दिशेने ४ मोहिमा केलेल्या होत्या. या वेळी भारत वर लोदी घराण्याचा अंमल होता. इब्राहीम खान हा सिकंदर खानचा सर्वात लहान मुलगा होता.लोदी घराण्यात अंतर्गत बंडाळ्या होत्या. इब्राहीमच्या मोठ्या भावाला (जलालुद्दीन)जौनपुर आणि इब्राहीमला दिल्ली अशी प्रथम वाटणी झालेली होती. जलालुद्दीन हा इब्राहीम चा मोठा भाऊ(रियासतकार याचा उल्लेख अल्लाउद्दीन असा करतात_मुसलमानी रियासत खंड २ प्रकरण २१)*२. इब्राहीमने अफगाणांना सोडून स्वतःच्या विश्वासातल्या लोकांना मुख्य पदे द्यायला सुरुवात केली. त्या मुळे त्याला असलेला अफगाणी लोकांचा पाठिंबा कमी होऊ लागला होता. त्यांनी जलालुद्दीनला आपला नेता मानायला सुरुवात केली होती. अंतर्गत राजकारणाचा परिणाम म्हणजे इब्राहीमने सैन्याच्या जोरावर जलालुद्दीनला मारले. आता जलालुद्दीनला पाठीबा देणाऱ्या अफगाणी लोकांचा पाठिंबा बिहारकडे राज्य करत असलेल्या दरिया खान याला झाला. आता पंजाबच्या सुभ्यावर दौलतखान तर दिल्लीवर इब्राहीमखान लोदी राज्य करत होते.  [image ref5] आलम खानने*2(इब्राहीम च्या काकाने ) बाबरला इब्राहीम खान विरुद्ध मदत मागितली*१. त्याच्याच आधी दौलत खानने आपला मुलगा दिलवर खान याला काबुलला पाठवून बाबराला हिंदुस्तानचे आमंत्रण दिले. बाबरने बागेत बसून हिंदुस्तानच्या मोहिमेसाठी शुभसंकेत मागण्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली तो आंबे/खरबूज/द्राक्षे इत्यादी फळाची अपेक्षा करत होता [३](वाईट भाषांतरासाठी माफ करावे)तेव्हा त्याला दौलत खानने पाठवलेले मधामध्ये साठवलेले आंबे मिळाले. हा शुभ संकेत मानून त्याने पुढची तयारी चालवली . हिंदुस्तान वर नजर ठेवून असलेल्या बाबराला हि सुवर्ण संधी वाटली असणार यात शंकाच नाही. तातडीने त्याने सैन्य पाठवले. १५२४ मध्ये बाबरने पंजाब प्रांत मिळवला. आपल्याला पूर्णपणे पदभ्रष्ट करून हिंदुस्तानची गादी बाबर बळकावेल असा संशय दौलत खानास आला त्यामुळे प्रारंभी बाबरा बरोबर असलेला दौलत खान डोंगरी भागात पळाला. दौलतखान डोंगरी भागात राहून लपून छपून हल्ले करायला लागला त्यामुळे बाबरला पुढे सरकता येईना. या वेळी बाबर आलंम खानला पंजाब प्रांतात व्यवस्थेसाठी ठेवून परत काबुल ला परतला. आलम खानने परत मदत मागितली असताना बाबर स्वतः ने येता काही प्रमाणात लष्करी मदत पाठवली. या मदती वर आलंम खानने सुरुवातीला विजय मिळवले पण दिल्ली जवळ इब्राहीम च्या सैन्याने त्याचा पराभव केला त्याला पंजाब प्रांतात पळून जावे लागले. या घटनेनंतर बाबर स्वतः अजून कुमकेसह पंजाबात पोहोचला. दौलत खानाशी झालेल्या युद्धात बाबरास विजय मिळाला आणि दौलत खान आणि त्याचा मुलगा गाजी खान शरण आला. बाबरच्या कैदेत लवकरच दौलत खानचा मृत्यू झाला. असे असताना दिल्लीमध्ये दरबारात प्रचंड गोंधळ माजला होता. बाबराचा पुढचा हल्ला इब्राहीम खानवर होणार होता. त्याने पंजाबचा प्रदेश परंपरेने तैमुरच्या वंशजांकडेकडे आलेला आहे तो परत करावा असा इशारा दिल्लीवर पाठवला. war elephant बाबर १२ हजार निवडक सैन्यासह भारताच्या दिशेने निघाला. पुढे पुढे सैन्य वाढत गेले. इब्राहीमने पण युद्धाची तयारी सुरु केली त्याने हमीद खान या हिस्सारच्या सरदाराला मदतीसाठी बोलावले. बाबरने हमीदखान विरुद्ध १७ वर्षांच्या तरुण हुमायूनला काही तुकड्या घेऊन पुढे पाठवले. हुमायून बरोबर ख्वाजा कलन,मुहम्मद दुलदै, बेग अमीर अझीझ,मुहम्मद आली जंग वगैरे सरदार होते. हुमायूनची स्वतंत्र अशी ही पहिली लढाई होती. २६ फेब्रु १५२६ ला हुमायूनच्या फौजा हमीद खानला भिडल्या. हुमायून आणि हमीद खान च्या काही चकमकी झाल्या त्यात हुमायूनने विजय मिळवला. १००च्य जवळपास युद्धकैदी आणि ८ हत्ती मिळवले. ५ मार्च ला हुमायून बाबरला परत मिळाला. तिथेच युद्धकैद्यांचे शिरछेद करण्यात आले. battle of hissar हिस्सारची लढाई २ एप्रिलला लोदिच्या काही तुकड्या (हातीम खान) आणि बाबराची दुआबच्या जवळपास किरकोळ चकमक झालेली दिसते. यात सुद्धा बाबर जिंकला आणि ६०/७० कैदी मिळाले.इब्राहीम खान एक लक्ष फौज आणि सहस्त्र हत्ती घेऊन संथ गतीने युद्धासाठी निघाला (यात लढाऊ फौज ४० ते ५० हजार असावी,हत्तींची संख्या सर्वत्र १०० ते १००० अशी वेगवेगळी दिसते ). २ मैल ४ मैल प्रवास करावा आणि २ ते ३ दिवस मुक्काम करायचा अशा पद्धतीने इब्राहीम पुढे सरकत होता. बाबराकडे याच्या पेक्षा बरीच कमी फौज(२५००० च्या जवळपास ) होती. बाबराच्या फौजेला हत्ती असलेल्या फौजे बरोबर लढण्याचा अनुभव नव्हता. या हत्तींची त्यांना बरीच भीती होती. शहाबाद वरून बाबरसुद्धा सैन्यासह जमुनेच्या किनाऱ्यापर्यंत आला होता. त्याने तिथून ख्वाजा खानच्या काही लोकांना हैदर क़ुलिच्या नेतृत्वाखाली बातम्या आणण्यासाठी नेमले. बाबरने सैन्य मोजणी केली असता ती अपेक्षेपेक्षा कमी भरली. त्याने पुढच्या मुक्कामात प्रत्येकाला तोफा ठेवण्यासाठी गाडे (मुळ शब्द araba)बनवण्याचे आदेश दिले. ७०० गाडे बनवण्यात आले, उस्ताद आली याच्या कल्पनेप्रमाणे हे ottoman* पद्धतीने एकत्र जोडायचे त्या मधली अंतर ५ ते ६ लोकांना उभे राहता येईल इतपत असेल आणि त्यामागे संरक्षक कवच लावून त्यामागे तोपची आणि matchlocks उभे करावेत अशी योजना बनवली गेली .या प्रकारात बाबरने मुक्काम ६ दिवस लांबवला.दोन्ही फौजा पानिपतच्या प्राचीन युद्धभूमीवर जमल्या. इब्राहीम बरोबर मोठी फौज असली तरी मुख्य सरदार किंवा मुत्सद्दी असे नव्हते. त्याने राज्यकारभार करताना बऱ्याच लोकांना दुखवून ठेवले होते. त्याने प्रचंड पैसा असूनही मदतीला कोणते सैन्य अथवा मोठ्या सरदाराला बोलावले नाही. संथ गतीने पानिपतवर आल्यावर पण त्याने काहीच निर्णय घेतला नाही. ७ ते ८ दिवस त्याची फौज नुसती पडून होती. तर दुसरीकडे बाबरच्या फौजेत खंदक बनवणे आणि इतर उयोग चालूच होते. बाबराने इब्राहीम हालचाल करत नाही म्हणल्यावर छोटे छोटे हल्ले करायला सुरुवात केली. छोट्या तुकड्या पाठवायच्या जमेल तशी लुटालूट करायची आणि परत यायचे असे प्रकार चालले होते. त्याने काही हिंदुस्तानी सल्लागारांच्या सल्ल्यानुसार ४ ते ५ हजार सैन्यासह रात्री हल्ला करण्याचे ठरवले. अंधार आणि पसरलेल्या सैन्यामुळे हा हल्ला फसला पण यात दोन्ही बाजुन् मध्ये कोणालाच फारसे नुकसान झाले नाही . battle of panipat पानिपतची लढाई २० एप्रिल शुक्रवारी इब्राहिमची फौज युद्धाच्या पवित्र्यात पुढे सरकत आहे अशी बातमी बाबरला मिळाली.त्याने तत्काळ आपली फौज युद्धासाठी सज्ज करण्याचे आदेश दिले .उजवीकडे हुमायून,मुहम्मद दुल्दै,हिंदू बेग इत्यादी तर डावीकडे मीर ख्वाजा ,शाह हुसेन, जान बेग वगैरे सरदार ठेवले.मुस्तफा आणि उस्ताद अली हे तोफखान्याचे प्रमुख होते. बाबरने सैन्य डावीबाजू ,उजवी बाजू आणि मध्य अश्या ३ भागात विभागले होते. या तीन भागांचे सुद्धा पुढचा आणि मागचा असे २ भाग केले गेले होते (या पद्धतीने सैन्याचे सोयीनुसार वेगवेगळे भाग करण्याला tulughma असे म्हणतात )या खेरीस त्याने डाव्या आणि उजव्या टोकाला अत्यंत वेगवान हालचालीसाठी काही तुकड्या ठेवल्या होत्या. खंदक आणि इतर अडथळे देखील तयार करण्यात आले होते. राखीव सैन्याची तुकडी वेगळी ठेवण्यात आली होती. बाबराच्या सैन्याच्या उजव्या बाजूला पानिपतची लोकवस्ती, डावीकडे खंदक अशी रचना झाली होती. भारतातील युद्धामध्ये या पूर्वी तोफांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला नव्हता. इब्राहिमच्या सैन्याने सरळ येउन बाबरच्या उजव्या बाजूवर हल्ला केला, त्याने तिथे कुमक करण्यासाठी राखीव सैन्याला पाठवले.आता डाव्या बाजूला मेहदी ख्वाजा समोर हत्ती असलेली मोठी तुकडी आली. त्याच्या मदतीला साठी बाबरने अहमदी,तरदि बेग यांना पाठवले. यांनी बाणांचा मारा करून समोरच्या सैन्याला जेरीस आणले. यानंतर त्याने टोकाच्या तुकड्यांचा वापर करून इब्राहिमला घेरण्याचा प्रयत्न केला. उजवीकडून आणि डावीकडून इब्राहीमच्या सैन्याला अंगठा आणि तर्जनी मधल्या चिमटीमध्ये पकडल्यासारखे घेरले गेले. मध्यभागातील तोफांचे नियंत्रण मुस्तफा आणि उस्ताद अली करत होते. या तोफांच्या आवाजामुळे हत्तीनी बिथरून इब्राहीमच्याच सैन्याची हानी करायला सुरुवात केली .सैन्य आता घेरले गेले असल्यामुळे आणि संख्येने मोठ्या प्रमाणात पायदळ असल्याने ते वेगवान हल्ले पण करू शकत नव्हते आणि पळून पण जाऊ शकत नव्हते. जोरदार तोफांच्या माऱ्यामुळे इब्राहीमचे सैन्य गडबडले. दुपारपर्यंत इब्राहीम जवळचे १६ हजार लोक मारले गेले होते. आणि दुपारी इब्राहिम मारला गेला आणि युद्धाचा निकाल लागला. लढाई झाल्या झाल्या बाबराने हुमायुनच्या नेतृत्वा खाली एक तुकडी आग्र्यावर तर एक तुकडी दिल्लीकडे पाठवली.आणि ही दोन्ही शहरे ताब्यात घेतली.दिल्लीमध्ये विजय मिळाल्या नंतर त्याने प्रचंड प्रमाणात उधळपट्टी केली यात त्याने बरोबर असलेल्या प्रत्येक शिपायाला इनाम दिलेच ,त्यावर काबुल मध्ये असलेल्या बऱ्याच लोकांसाठी द्रव्य पाठवले. यावरूनच त्याला कलंदर म्हणजे उधळ्या फकीर हे नाव मिळाले. आवडत असेल तर क्रमशः, पुढच्या भागात राजपुतान्यातील राणा संग आणि बाबर यांची लढाई संदर्भ – १)मुसलमानी रियासत, खंड २,प्रकरण २०,२१ गो.स.सरदेसाई २)THE MUGHAL EMPIRE FROM BABAR TO AURANGZEB BY S. M. JAFFAR, ३)Memoirs of Babur(The Babur-nama)by ANNETTE SUSANNAH BEVERIDGE part 1 & 2(pp 439 onwords) ४)WARRIORS OF THE CRESCENT.by DAVENPORT ADAMS,PP 139 onwords ५)आंजाविविप all paintings form walters art musium * =तुर्क पद्धत ज्याच्या मध्ये गाडे एकत्र बांधून कवच वापरले जाते जेणेकरून शत्रूला मध्ये घुसता येणार नाही ottoman साम्राज्यात या साठी चेन वापरल्या जायच्या, बाबरने चामडी दोरखंड वापरले *१ = (येथे रियासतकार देसाई यांनी जलालुद्दीनने,म्हणजे इब्राहिमच्या भावाने मदत मागितली असे लिहिले आहे पण बाकी संदर्भांमध्ये असे दिसत नाही) *2= याचे नाव अल्लाउद्दीन आलंम खान आहे असे दिसते [३ PP 441]
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22521
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

एका आव्हानात्मक ऐतिहासिक घटनेवर बर्‍यापैकी सुटसुटीत लिहिले आहे. विषयाचा आवाकाच इतका मोठा आहे की तपशिलवार लिहायला गेले तर ग्रंथच बनेल अन थोडक्यात लिहिले तर त्रोटक वाटेल. पु.भा.प्र.

In reply to by पक पक पक

श्रीजो,मुवि,यशोधरा,प्यारे१,वल्ली,आदूबाळ,पक पक पक, लै लै धन्स :) पकपकशेठ, प्रतीक्षा कशी काय हो?? संमं एक लिन्क हुकली आहे तिकडे तेव्हडं बघा अन् https://lh5.googleusercontent.com/-SUj9u7EIc48/UJVy2abzyYI/AAAAAAAAArU/… लढाई पानिपतची

छान! या युद्धात बाबराच्या तोफखान्याने निर्णायक भूमिका बजावली तर. पानिपतच्या तिसर्‍या युद्धात मराठ्यांच्या तोफखान्याला काही सरदारांच्या उतावळेपणामुळे प्रभावी भूमिका बजावता आली नव्हती.

आवडत असेल तर क्रमशः
युद्धस्य कथा रम्यः ... असे काहीसे बोलतात ना... येऊ दे..

तथ्यांसहित दिलेली सुटसुटित माहिती आवडली. थोडी वेगळी माहिती मजकडे आहे, ती देतो. बाबर भारतात आला तो फक्त दौलतखान - इब्राहिम लोदी ह्यांच्या कलहामुळे नाही. त्याला खुद्द मेवाडचा राणा सांगा (संग्रामसिंग) ह्यानेही आमंत्रित केले होते. राणा संगा ह्याचा प्लॅन सोपा होता. "माझे राज्य मेवाड आहे. अखिल राजपुतान्यातील(मेवाड, मारवाड, जोधपूर, अंबर्/जयपूर), अजमेर ह्यापैकी सर्वात प्रबळ राज्य माझे आहे. राजपुत आघाडीचे नेतृत्व मेवाड करु शकते.(जसे ग्रीक नगरराज्यांची आघाडी बनवून त्याचे नेतृत्व मॅसिडोन्याने केले अलेखांडर द गेट ह्याच्या काळात,तसेच.) . ह्याचे फायदे बरेच. सर्वच राज्यांशी लढाया करण्याचे काम नाही. मैत्री तह जे मान्य करतील त्यांच्याशी युती करावी, त्यांना सोबत घेउन विरोधकांना झोडपावे आणि एकत्रित राजपूत शक्ती पुन्हा एकदा पूर्वीसारखी उत्तर भारतीय मैदानात पसरून द्यावी. " ह्या व्हिजननुसार त्याचेही लक्ष दिल्ली-आग्रा ह्या महत्वाच्या आणि सुपीक प्रदेशकडे होते. त्याचे गणित साधे होते. "माझ्या राज्याचा विस्तार करुन साम्राज्य करायचे असेल तर आधी इब्राहिम लोदीचे राज्य पूर्ण जिंकून घ्यावे लागेल. पण हे एक्ट्याने करण्यापेक्षा alliance बनवावी. पश्चिम्-उत्तरेकडून बाबर व व दक्षिण पश्चिमेकडून मी लोदीवर हल्ला केला तर काम सोपे होइल. तसेही मंगोल वंश एका ठिकाणी राहून राज्य करण्यात उत्सुक नसतोच. लूट घेउन बाबर परत जाइल, तैमूरलंगाप्रमाणे!" असे त्याचे गणित. त्यामुळे, बाबराला "तुम्ही तिकडून हल्ला करा, आम्ही इकडून चढाई करतो लोदीच्या राज्यावर" असा निरोप राणा सांगाने पाठवला. पण प्रत्यक्षात जेव्हा बाबर पंजाबपर्यंत चालून आला, तेव्हा त्याचे इरादे वेगळेच असल्याचे, इथेच ठाण मांडून बसण्याचे असल्याचे मेवाडच्या लक्षात आले, नि पानिपत संग्राम होइपर्यंत त्यांनी प्रत्य्क्षात काहिच हालचाल केली नाही. ही सगळिच माहिती तुमच्या पुढील अंकात येण्याची शक्यता असल्याने इथे करड्या रंगात देत आहे.

पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे... इतर विचार न करता सर्व भाग लवकर टाकावे.

खर सांगु? पानिपत हे नाव वाचुनच लेख वाचायला मन कचरत होतं. तरीही आख्यान बर्‍याच आधीपासुन सुरु करता आहात. आवडला अस अजिबात म्हणणार नाही पण माहीतीपूर्ण.

उत्तम, अजुन येउदे, लगेच फडशा पाडू

मधातील आंब्याची पाककृती मिळेल का?