'कोसला'सोबत एक दिवस
"कोसला"विषयी खूप काही ऐकून होतो. विकत घ्यायचे मनात होते. पण शनिवारी (दि. ११-जून-२०१६) दुपारी माझ्या मोठ्या भावाच्या घरी पोहोचलो. तिथे सोफ्यावर कोरेकरकरीत "कोसला" दिसले. दादाने नुकतेच मागवले होते. शनिवारी संध्याकाळपर्यंत काही कामांमुळे वेळ मिळाला नाही. संध्याकाळी "कोसला" हातात घेतलं. रात्रीचं जेवण घेतल्यानंतर थोड्या गप्पा झाल्या आणि "कोसला"वर झडप घातली. त्याआधी दादाला 'कसे आहे' म्हणून विचारले. त्याने सुरुवातीची काही पाने वाचली होती आणि नंतर त्याला वेळ मिळाला नाही. तो म्हणाला "तू वाच आणि ठरव. वाटल्यास घरी घेऊन जा. वाचून संपलं की परत आणून दे." मी शनिवारी रात्री सुरुवात केली आणि रविवारी संध्याकाळी पाच पर्यंत वाचवून संपवलं. रविवारी जरा एक-दोन कामांनिमित्त बाहेर जायला लागलं. थोडा वेळ गप्पांमध्ये गेला. अन्यथा अजून थोडं आधी संपलं असतं. असो.
"कोसला" हे भालचंद्र नेमाडे या 'ज्ञानपीठ पुरस्कार' विजेत्या लेखकाचं पहिलं पुस्तक. कादंबरी खरं तर. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी हे पुस्तक १९६३ मध्ये जेमतेम पंधरा दिवसात लिहून पूर्ण केलं. देशमुख आणि कंपनीने हे पुस्तक प्रकाशित केलं तेव्हापासून या पुस्तकाच्या चोवीस आवृत्ती आणि अनेक पुनर्मुद्रणं प्रकाशित झाली आहेत. मराठी साहित्यात "कोसला" हे मैलाचा दगड ठरलं आहे. "कोसला"वर पीएचडी करणार्यांची संख्या लक्षणीय आहे. शिवाय "कोसला"चा साहित्यिक धांडोळा घेणारी आणि त्याचं साहित्यिक मुल्य मोजू पाहणारी जवळपास १०० पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. देशमुख आणि कंपनीने नेमाडेंना त्याकाळी त्यांची ही पहिलीच कादंबरी असूनदेखील वि. स. खांडेकरांना मिळायचे तेवढे मानधन दिले होते. "कोसला"ने त्याकाळी वाचकांना वेडं केलं होतं. अजूनही प्रकाशनानंतर त्रेपन्न वर्षांनी "कोसला"ची मोहिनी पूर्णपणे उतरलेली नाही.
या माहितीपैकी बरीचशी माहिती मी आधी ऐकलेली होती आणि म्हणूनच मी शक्य तितक्या लवकर "कोसला" वाचून संपवलं. मला "कोसला" कसं वाटलं याला खरं म्हणजे काहीच अर्थ नाही. "कोसला"ने जो इतिहास रचायचा होता तो कधीच रचला आहे. तरीही इतक्या गाजलेल्या कलाकृतीचा अनुभव कसा होता हे सांगीतल्याशिवाय चैन पडणार नाही म्हणून थोडं धाडस करतोय. मला "कोसला" कसं वाटलं हा या लेखातला एक भाग आहे. "कोसला"ची निर्मितीप्रक्रिया आणि त्यामागची कारणमीमांसा ही मला जास्त आवडली. तीदेखील विशद करण्याचा थोडा प्रयत्न करतो.
"कोसला"ची कथा बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे. पांडुरंग सांगवीकर हा नायक खान्देशातल्या एका अगदी लहान खेड्यातून पुण्यात फर्गसन महाविद्यालयात बीएचं शिक्षण घ्यायला येतो. त्याची कौटुंबिक, सामाजिक, आणि वैचारिक पार्श्वभूमी फर्गसन महाविद्यालयाच्या एकूण संस्कृतीपेक्षा अगदीच निराळी! पुण्यातली जगण्याची पद्धत त्याच्या गावातल्या जगण्याच्या संकल्पनेपेक्षा अगदीच भिन्न! पांडुरंग सांगवीकर या बदलांना कसा सामोरा जातो; अपयशाचा शिक्का कपाळी बसल्यानंतर पुन्हा गावात जाऊन पांडुरंग काय काय अनुभवतो आणि त्या अनुभवांना कसा सामोरा जातो; आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक घटनेविषयी, परिस्थितीविषयी, विचाराविषयी त्याच्या मनात अगदी खोलवर कुठ्ल्याप्रकारचे सूक्ष्म तरंग उठतात आणि तो एक स्वतंत्र विचार करू शकणारी व्यक्ती म्हणून प्रत्येक प्रसंगात कसा वागतो याचं मनस्वी चित्रण म्हणजे "कोसला" ही कादंबरी होय. हे कथासूत्र आता बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे.
मला व्यक्तीश: "कोसला" रटाळ वाटलं. अगदी मैलाचा दगड वगैरे माहित असूनदेखील माझ्या एकूण वाचण्याच्या प्रक्रियेवर फारसा फरक पडला नाही. कधी कधी एखाद्या कलाकृतीचं किंवा व्यक्तीचं नावाजलेपण मनात ठेवून आपण त्या कलाकृतीकडे किंवा व्यक्तीकडे पाहतो आणि अशा वेळेस त्या मनातल्या पूर्वकल्पनेमुळे आपण त्या कलाकृतीचा किंवा व्यक्तीचा आपल्याला वैयक्तिक पातळीवर आलेला अनुभव नीटपणे जोखू शकत नाही. शिवाय आधीच्या मोठेपणाचं ओझं असतांना "आपल्याला काय वाटलं हे खरं कसं सांगायचं? बाकी रसिक आपली मापं काढतील" वगैरे दडपण असतंच. अगदी अशा प्रलोभनांना बळी पडून आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची असं ठरवूनदेखील मला "कोसला" रटाळ वाटलं. विचारांचं मुक्त, जसं आहे तसं, विचार जसे मनात येतील तसे असं मुद्दाम म्हणून दिलेलं रूप म्हणून जरी "कोसला"कडे बघायचं म्हटलं तरी मला "कोसला" वाचतांना आनंद मिळाला नाही. "कोसला" माझ्या हृदयाचा ठाव घेऊ शकलं नाही. खरं म्हणजे मी देखील फर्गसन महाविद्यालयातच शिकलो; तिथल्या वसतिगृहात राहिलो; पुण्यातून माझ्या खान्देशातल्या गावाकडे जात राहिलो; अकरावी (विज्ञान) मध्ये नापास झालो; त्यानंतर एक वर्ष गावात राहिलो. "कोसला"मधले बरेचसे अनुभव मी देखील घेतले. मला "कोसला" खूप जास्त भावायला खूप जास्त वाव होता. तरीदेखील "कोसला" मला तितकं आवडलं नाही. "कोसला"ला कुठलाच सुसूत्र प्रवाह नाही. अर्थात, सुसूत्रता टाळणे हा लेखकाचाच विचार होता. "कोसला"मध्ये निश्चित अशी कथा नाही. त्यामुळे बरेच अनाकलनीय किंवा मूळ विषयाला धरून नसलेले संदर्भ खूप मोठ्या प्रमाणात येत राहतात. अर्थात हे ही ठरवूनच. कादंबरीचा आवाका आणि पोत मुद्दाम तसाच ठेवलेला आहे. हे मान्यच. पण मला कुठेतरी हे बेताल भरकटणे आणि भरकटल्यानंतर मूळ मुद्द्यावर लवकर न येणे किंवा अजिबातच न येणे हे कादंबरीचा रटाळपणा वाढवते असे वाटले. उदाहरणार्थ, चार-पाच पाने नायकाने फक्त उंदीर मारण्याच्या प्रयत्नांना वाहिलेले आहे. नायकाला उंदरांचा भयंकर राग असतो. हा राग समजू शकतो पण तो थोडक्यात प्रभावीपणे मांडता आला असता. डायरीची तारीखवार पाने तशीच अनाकलनीय. एका तारखेवर "बुंदीचे लाडू आणि रव्याचे लाडू" तर एका तारखेखाली फक्त अ ची बाराखडी आहे. तारखेखालचा बहुतांश सगळाच मजकूर उदाहरणार्थ अनाकलनीय वगैरे आहे. कित्येक घटनांच्या वर्णनातून लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे हेच कळत नाही.
नायकाचे टोकाचे विचार अगदीच समजू शकतात पण घर जमीनदोस्त करून टाकण्याची इच्छा होणे, वडिलांना अरे-तुरे करून त्यांच्याशी भांडणे, त्यांचा खून करण्याची इच्छा होणे, वगैरे भाव कुठल्या कोनातून पटण्यासारखे किंवा समर्थन करण्यासारखे वाटतात हे कळत नाही. नायक सधन घरातला असतो. त्या काळात त्याला व्यवस्थित जगता येईल इतके आणि लागेल तेव्हा पाहिजे तितके पैसे वडील पाठवत असतात. मद्रास हॉटेलमध्ये जाऊन नायक खूप खाऊ शकत असतो आणि भकाभका सिगारेटी फुंकू शकत असतो. घरी आई-वडील, आजी, बहिणी असे सगळे असतात. एवढं सगळं व्यवस्थित असतांना हे अतिभयंकर टोकाचे विचार कशासाठी हा प्रश्न वारंवार पडत राहतो. जीवाची इतकी तगमग, घालमेल कशासाठी? मग केवळ सनसनाटी निर्माण करावी म्हणून तर लेखक असे लिहित नसेल असेही वाटून जाते. विचारांमध्ये आणि ते विचार निर्भीडपणे मांडण्यामध्ये इतका पारदर्शकपणा असतांना झगडू गड्याचे गायब होणे, त्याचे अपत्य नायकाच्या वडीलांनी सांभाळणे वगैरे यातून नायकाला नेमके काय म्हणायचे आहे हे मात्र गुलदस्त्यात राहते.
कथेचं एक वेळ जाऊ द्या पण संपूर्ण कादंबरीत निरर्थक वाटणारे असंख्य उतारे आहेत. 'उदाहरणार्थ', 'वगैरे', 'हे एक थोरच', 'हे एक भलतंच' हे शब्द किंवा उद्गार असंख्य वेळा अकारण येत राहतात. लिखाणात उगीच घुसडलेले हे शब्द किंवा उद्गार काही काळानंतर 'भंपक' वाटायला लागतात. "उदाहरणार्थ हे कोसलाचं व्यवच्छेदक लक्षण आहे" असं काहीसं मलपृष्ठावर ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव लिहितात. म्हणजे नेमकं काय मला अजिबातच उदाहरणार्थ कळलेलं नाही.
बाकी पाच वर्षाच्या बहिणीचा देवीमुळे झालेला करुण मृत्यू, त्यामुळे नायकाला झालेलं दु:ख, घरच्यांचा आलेला संताप, सिंहगडावर केलेली पायपीट, वेताळटेकडीवर दिव्याचे रहस्य शोधण्यासाठी केलेले धाडस, मेस सांभाळण्यात नायकाला आलेले अनुभव, गावातल्या गरीब लोकांची मानसिकता असे बरेचसे भाग बऱ्यापैकी अंगावर येतात. या व अशा अजून काही भागांमध्ये नायकाच्या हृदयाची तगमग भाषेचे कुठलेही अलंकार न वापरता अंगावर शहारा आणते.
मी जे वाचलं त्या "कोसला"च्या शेवटी लेखकाचं २०१३ मध्ये लिहिलेलं परिशिष्ट आहे. त्यात "कोसला"च्या निर्मितीची कथा आहे. साठच्या दशकात लेखकाच्या म्हणण्यानुसार मराठी साहित्यावर ब्राह्मणी पद्धतीच्या लेखनाचा पगडा होता. अलंकारिक भाषा, कृत्रिम कथावस्तू, कृत्रिम कथामांडणी, अतिशय गोड किंवा अतिशय रडक्या लिखाणाचा तो जमाना होता. वाचकांना अशा प्रकारच्या लिखाणाचा कंटाळा आला होता. त्यातच लेखकाचे देशमुख आणि कंपनीच्या रा. ज. देशमुख यांच्याशी सख्य जुळते. घरगुती गप्पांमध्ये लेखक देशमुख आणि त्यांच्या पत्नी यांच्या जवळ "कादंबरी लिहिणं काही विशेष नाही; मी आरामात चांगली कादंबरी लिहू शकतो" असं म्हणतात. देशमुख लेखकाला आव्हान देतात की तू कादंबरी लिहून दाखवच. लेखक पेटून उठतो आणि एक अतिशय वेगळा आकृतीबंध असलेली कादंबरी लिहून काढतो. तीच ही "कोसला". झपाटल्याप्रमाणे सिगारेटी ओढत लेखकाने "कोसला" अक्षरश: पंधरा दिवसात पूर्ण केली. अलंकारिक भाषा, भावनिक वर्णनं, एका प्रवाहात बांधलेली कथा, कथेमध्ये नेहमी आढळणारी सुसूत्रता अशा रुढार्थाने कादंबरी यशस्वीरीत्या रचण्याच्या पद्धतीला छेद देत लेखकाने ही निराळीच कादंबरी रचली.
एका अपयशी विद्यार्थ्याचे अगदी मनापासून आलेले हे प्रामाणिक आणि वास्तवदर्शी अनुभवकथन असे वर्णन लेखक "कोसला"चे करतात. नायकाच्या प्रश्नांना वाचक आपले प्रश्न समजतात. "कोसला"च्या जन्माची ही कहाणी सुरस आणि खूपच हृदयस्पर्शी आहे. एकंदरीत "कोसला"ने भारावून वगैरे जाण्याची जी माझी अपेक्षा होती ती मात्र फोल ठरली. अर्थात, वाचक "कोसला"शी कुठल्या पातळीवर आणि कसा जोडला जातो यावरदेखील "कोसला" आवडणं किंवा न आवडणं अवलंबून आहे. त्यामुळे "कोसला" आवडलेल्या वाचकांविषयी आदर आहेच. मी पुन्हा वाचेन का? शक्यता आहे. विशेषत: "कोसला"च्या जन्माची कथा (परिशिष्ट - ८-१० पाने) मला फारच आवडली. "कोसला"मधला काही भाग मला नक्कीच आवडला. एवढं तर मी दुसऱ्यांदा नक्कीच वाचू शकेन.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
परीक्षण छान.
एका प्रवाहात बांधलेली कथा,
कोसला......
उदाहरणार्थ, चार-पाच पाने
उदाहरणार्थ, चार-पाच पाने नायकाने फक्त उंदीर मारण्याच्या प्रयत्नांना वाहिलेले आहे.खीखीखी, इथूनच तर कोसला खरी पकड घेतो. अगदी चवीचवीने हे पुस्तक मी पंधरा दिवसांत संपविले. कथानक गेलं खड्ड्यात! पण 'मांडणी' नावाची अद्भुत गोष्ट यात अनुभवली! 'शैली'चे तर आम्ही निस्सिम भक्त! एक ना एक चविष्ट ओळ अगदी फडश्या पाडून वाचली! 'कोसला'कारांचा विजय असो!!याबद्दल मतमतांतरं अर्थातच असू
आदुबाळ
पण कादंबरी म्हटलं की कथानक घट्ट हवंच. कथानक ही कादंबरीची पोळीभाजी आहे.अजिबात आवश्यक नाही माझा नको मकरंद साठेंचा संदर्भ देतो "कॉंप्लेक्सिटी किंवा व्यामिश्रता पूर्वीपासूनही होतीच. पण ती साधारणपणे द्विध्रुवीय, त्रिध्रुवीय इथपर्यंत असे. आता ती मल्टिपोलर म्हणजे अनेकध्रुवीय झालेली आहे. आतापर्यंत ज्या नाटकाच्या किंवा कादंबरीच्या कल्पना होत्या - विशेषतः नाटकाच्या - की मांडणी एकरेषीय व्हावी; त्यात काही एपिटोम (साररूप) यावा; मग क्लायमॅक्स असावा वगैरे -तलवार घुसल्यासारखं नाटक आतपर्यंत घुसलं पाहिजे, वगैरे - तर अशा प्रकारची मांडणी मला नाटकात आणि कादंबरीतही, दोन्हीकडे आता अशक्य वाटायला लागलेली आहे."या प्रतिसादाचे कुणी सुलभ
कॉम्प्लेक्सिटी / व्यामिश्रता
अहो
हम्म. व्यक्तिगत नाही कसं?
आजवरचा सर्व नम्रपणा पणाला लावुन
हो. ही शक्यता आहेच. किंबहुना
आहे ना मात्र फॉर्म स्टाईल तोच निवडेल ना
आहे ना मात्र फॉर्म स्टाईल तोच निवडेल ना
तोंडी लावायला इको उंबर्तो चे मत घ्या
मारवाजी,
बोकोबा
पु.लं.नी गोदूची वाट
उत्तम
पु.लं.चं हे विडंबन किंवा
पु.लं.चं हे विडंबन किंवा खुर्च्या हे विडंबनसुद्धा असा सांस्कृतिक फरक लक्षात न घेता ती नाटकं आपल्याकडे आणणा-या नाटककार आणि लेखकांची केलेली चेष्टा आहे.बेकेट च्या लेखनाशी जो पुर्णपणे अपरीचीत आहे. मात्र पु.ल. शी परीचीत आहे त्याला जर गोदुची वाट दाखवल तर त्याचा परीणाम काय होणार ? जी व्यक्ती एका विशीष्ट सांस्कृतिक स्थानावर आहे जिला एकुण साहीत्याची प्रगल्भ जाण आहे, त्या व्यक्तीने एका नव्या दमदार गंभीर विचारप्रवाहाचा परीपाक असलेली कलाकृती जेव्हा मराठीत पहील्यांदा आणतोय तेव्हा त्या विडंबनाचा काय संभाव्य परीणाम होऊ शकतो याचा किमान विचार करणे आवश्यक नाही का ? आता नेमक आठवत नाही मात्र विजया मेहता यांच्या आत्मचरीत्रात पुलंविषयी त्यांच्या कॉमेंट्स ने काय दुष्परीणाम झाला कुठल्यातरी एका नाटकावर यासंदर्भात लिहीलेलं आहे. ती संकल्पना आपल्याकडे रुजली नाही मान्य व तशी परीस्थीतीही नव्हती हे ही मान्य. मात्र म्हणुन ती रद्दबातल होते काय ? शिवाय यानंतर या ट्रीव्हीलाइज केल्याने जो डॅमेज होतो एक तुच्छतावाद जो निर्माण होतो तो नवप्रवाह समजुन घेण्यास आडकाठी निरुत्साह निर्माण करत नाही का ? नंतरचे किरण नगरकर , सारंग जे प्रयोग करत होते पाश्चात्य नवसंकल्पना आत्मसात करुन पचवुन अस्सल भारतीय जोड देऊन जी नवनिर्मीती करत होते त्याला फटका बसलाच ना. एक आत्मसंतुष्टतेची आमच्याकडे संतांनी हे अगोदरच सांगितलेल आहे टाइप किंवा ही नसती फॅड आहेत झाल अशी कृपमंडुक वृत्ती वाढली नाही का ? खुद्द नेमाडेही द्विभाषिक लेखकांवर रश्दी इ. वर तुटुन पडलेत. अरुण कोलटकरच्या कवितेची नेमाडेंनी केलेली चिरफाड याच धाटणीची होती. ही काय मराठी साहीत्याच्या साठी प्रगतीशील बाब नव्हती. मी वापरलेला उद्धट शब्द चुकला, हे माझ पुर्णपणे चुकल खरच तो मागे घेतो. माणुस म्हणुन जे अनुभव आहेत ते साहीत्यात उमटणारच व माणुस समजुन घेतल्याने एका मर्यादेपर्यंत कलाकृती समजु शकते पण टाइम अॅन्ड अगेन अनेक समीक्षाप्रवाहांनी यातील मर्यादेची जी फार मोठी मर्यादा आहे याची जाणीव करुन दिली आहे. इथे विशेषत: जे मी म्हणतोय ते केवळ नेमाडेंच्या विधानासंदर्भात पहावे. इथे नेमाडेंची त्यांच्या साहीत्यकृतीशी कुठलाही सरळ सबंध नसलेली विधाने त्यांच्या साहीत्यकृतीचा दर्जा ठरवण्यासाठी वारंवार वापरण्यात येतात आक्षेप नेमका त्यावर आहे. खरोखर त्यांच्या विधानांचा आणि साहीत्यकृतीचा काय संबंध ? एकवेळ लेखकही ठीक कवि समजुन घेतांना तर तो माणुस आणि कवि याचा संबंध लावण अधिकच कठीण होऊन बसत.जाऊ द्या हो...
चविष्ट ओळ
कोसला पुर्ण वाचणार्या
कधी करणार दंडवत?का पायाचा
ज्या वेगाने तुम्ही कोसला वाचली व परीक्षण लिहीले त्यावरुन
हाहाहा...भारी
कोसला खूप विसविशित कादंबरी
मौजे च्या श्री.पु भागवतांनी
नवप्रवाहाचीच तुलना करायची तर
+1
सुसंगती, सुलभता, सुगमतेचा किती तो सोस !
"कोसला"चा असंबद्ध फॉर्म एक प्रयोग म्हणून ठीक होता
याच्याशी सहमत.. कोसला हा त्या
'भंपक'
अस्तित्ववाद भंपक ?
अस्तित्ववाद, देशीवाद वगैरे या सगळ्या, नेमांडेंच्या भाषेत सांगायचं म्हणजे 'भंपक' संकल्पना आहेत. शून्य अर्थ असलेल्या.इतक धाडसी विधान तुम्ही केल आहे या अर्थी सार्त्र पासुन थेट आपल्या विलास सारंग पर्यंत तुम्ही सर्वच लेखक तत्ववेत्ते उडवुन लावलेत.. नाही म्हणजे तुम्ही नक्कीच याहुन जास्त काहीतरी मौलिक विचार मांडत आहात. अधिक अर्थपुर्ण तुमच्याकडे म्हणण्यासारख असेलच नक्की.म्हणून एक कुतुहल म्हणुन विचारतोय फक्त की "अस्तित्ववाद" एक भंपक संकल्पना आहे या निष्कर्षापर्यंत तुम्ही कसे पोहोचलात जरा सांगाल का ? उदा. कुठली अस्तित्ववादी संकल्पना तुम्हाला फालतु भंपक वाटली व का वाटली याची कारणमीमांसा दयाल का? म्हणजे मला खात्री आहे तुम्ही "अस्तित्ववाद" अभ्यासुनच मग या निष्कर्षांवर आला असाल.आणि तुमच्याकडे नक्कीच गंभीर आक्षेप असतीलच. त्याशिवाय तुम्ही अस विधान करणार नाहीत तर किमान अस्तित्ववादा विरोधात तुमचे बेसीक आर्ग्युमेंट काय आहे? उदा. existence precedes essence bad faith hell is other people या अस्तित्ववादी संकल्पना भंपक आहेत या निष्कर्षापर्यंत आपण कसे आलात ? कुठली अस्तित्ववादावरील पुस्तके तुमच्या मते फेक आहेत ? आवडेल जाणुन घ्यायलामाझ्याजवळ कुठलीच कारणमीमांसा नाही
समीर सुर जी
धन्यवाद!
असेच फ़क्त धन्यवाद नेमाडे ना
नक्कीच हलक्यातच घेतो मी नेहमीच तुम्हीही घ्या ही नम्र विनंती
"कोसला"चा अर्थ जाणून घ्यावासा नाही वाटला
तो आपल्या चहाचा कप नाही.
कोसला फार पुर्वी वाचली होती....
कोसला
मुळात मला नेमाडे हेच
सहमत
पुरस्कार कसे मिळतात हे ठाऊक
हम्म वाचायची राहून गेलीये. पण
...
पण हे कोणत्याही कलाकृतीबाबत