✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'कोसला'सोबत एक दिवस

स
समीरसूर यांनी
Mon, 06/13/2016 - 16:31  ·  लेख
लेख
"कोसला"विषयी खूप काही ऐकून होतो. विकत घ्यायचे मनात होते. पण शनिवारी (दि. ११-जून-२०१६) दुपारी माझ्या मोठ्या भावाच्या घरी पोहोचलो. तिथे सोफ्यावर कोरेकरकरीत "कोसला" दिसले. दादाने नुकतेच मागवले होते. शनिवारी संध्याकाळपर्यंत काही कामांमुळे वेळ मिळाला नाही. संध्याकाळी "कोसला" हातात घेतलं. रात्रीचं जेवण घेतल्यानंतर थोड्या गप्पा झाल्या आणि "कोसला"वर झडप घातली. त्याआधी दादाला 'कसे आहे' म्हणून विचारले. त्याने सुरुवातीची काही पाने वाचली होती आणि नंतर त्याला वेळ मिळाला नाही. तो म्हणाला "तू वाच आणि ठरव. वाटल्यास घरी घेऊन जा. वाचून संपलं की परत आणून दे." मी शनिवारी रात्री सुरुवात केली आणि रविवारी संध्याकाळी पाच पर्यंत वाचवून संपवलं. रविवारी जरा एक-दोन कामांनिमित्त बाहेर जायला लागलं. थोडा वेळ गप्पांमध्ये गेला. अन्यथा अजून थोडं आधी संपलं असतं. असो. "कोसला" हे भालचंद्र नेमाडे या 'ज्ञानपीठ पुरस्कार' विजेत्या लेखकाचं पहिलं पुस्तक. कादंबरी खरं तर. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी हे पुस्तक १९६३ मध्ये जेमतेम पंधरा दिवसात लिहून पूर्ण केलं. देशमुख आणि कंपनीने हे पुस्तक प्रकाशित केलं तेव्हापासून या पुस्तकाच्या चोवीस आवृत्ती आणि अनेक पुनर्मुद्रणं प्रकाशित झाली आहेत. मराठी साहित्यात "कोसला" हे मैलाचा दगड ठरलं आहे. "कोसला"वर पीएचडी करणार्यांची संख्या लक्षणीय आहे. शिवाय "कोसला"चा साहित्यिक धांडोळा घेणारी आणि त्याचं साहित्यिक मुल्य मोजू पाहणारी जवळपास १०० पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. देशमुख आणि कंपनीने नेमाडेंना त्याकाळी त्यांची ही पहिलीच कादंबरी असूनदेखील वि. स. खांडेकरांना मिळायचे तेवढे मानधन दिले होते. "कोसला"ने त्याकाळी वाचकांना वेडं केलं होतं. अजूनही प्रकाशनानंतर त्रेपन्न वर्षांनी "कोसला"ची मोहिनी पूर्णपणे उतरलेली नाही. या माहितीपैकी बरीचशी माहिती मी आधी ऐकलेली होती आणि म्हणूनच मी शक्य तितक्या लवकर "कोसला" वाचून संपवलं. मला "कोसला" कसं वाटलं याला खरं म्हणजे काहीच अर्थ नाही. "कोसला"ने जो इतिहास रचायचा होता तो कधीच रचला आहे. तरीही इतक्या गाजलेल्या कलाकृतीचा अनुभव कसा होता हे सांगीतल्याशिवाय चैन पडणार नाही म्हणून थोडं धाडस करतोय. मला "कोसला" कसं वाटलं हा या लेखातला एक भाग आहे. "कोसला"ची निर्मितीप्रक्रिया आणि त्यामागची कारणमीमांसा ही मला जास्त आवडली. तीदेखील विशद करण्याचा थोडा प्रयत्न करतो. "कोसला"ची कथा बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे. पांडुरंग सांगवीकर हा नायक खान्देशातल्या एका अगदी लहान खेड्यातून पुण्यात फर्गसन महाविद्यालयात बीएचं शिक्षण घ्यायला येतो. त्याची कौटुंबिक, सामाजिक, आणि वैचारिक पार्श्वभूमी फर्गसन महाविद्यालयाच्या एकूण संस्कृतीपेक्षा अगदीच निराळी! पुण्यातली जगण्याची पद्धत त्याच्या गावातल्या जगण्याच्या संकल्पनेपेक्षा अगदीच भिन्न! पांडुरंग सांगवीकर या बदलांना कसा सामोरा जातो; अपयशाचा शिक्का कपाळी बसल्यानंतर पुन्हा गावात जाऊन पांडुरंग काय काय अनुभवतो आणि त्या अनुभवांना कसा सामोरा जातो; आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक घटनेविषयी, परिस्थितीविषयी, विचाराविषयी त्याच्या मनात अगदी खोलवर कुठ्ल्याप्रकारचे सूक्ष्म तरंग उठतात आणि तो एक स्वतंत्र विचार करू शकणारी व्यक्ती म्हणून प्रत्येक प्रसंगात कसा वागतो याचं मनस्वी चित्रण म्हणजे "कोसला" ही कादंबरी होय. हे कथासूत्र आता बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे. मला व्यक्तीश: "कोसला" रटाळ वाटलं. अगदी मैलाचा दगड वगैरे माहित असूनदेखील माझ्या एकूण वाचण्याच्या प्रक्रियेवर फारसा फरक पडला नाही. कधी कधी एखाद्या कलाकृतीचं किंवा व्यक्तीचं नावाजलेपण मनात ठेवून आपण त्या कलाकृतीकडे किंवा व्यक्तीकडे पाहतो आणि अशा वेळेस त्या मनातल्या पूर्वकल्पनेमुळे आपण त्या कलाकृतीचा किंवा व्यक्तीचा आपल्याला वैयक्तिक पातळीवर आलेला अनुभव नीटपणे जोखू शकत नाही. शिवाय आधीच्या मोठेपणाचं ओझं असतांना "आपल्याला काय वाटलं हे खरं कसं सांगायचं? बाकी रसिक आपली मापं काढतील" वगैरे दडपण असतंच. अगदी अशा प्रलोभनांना बळी पडून आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची असं ठरवूनदेखील मला "कोसला" रटाळ वाटलं. विचारांचं मुक्त, जसं आहे तसं, विचार जसे मनात येतील तसे असं मुद्दाम म्हणून दिलेलं रूप म्हणून जरी "कोसला"कडे बघायचं म्हटलं तरी मला "कोसला" वाचतांना आनंद मिळाला नाही. "कोसला" माझ्या हृदयाचा ठाव घेऊ शकलं नाही. खरं म्हणजे मी देखील फर्गसन महाविद्यालयातच शिकलो; तिथल्या वसतिगृहात राहिलो; पुण्यातून माझ्या खान्देशातल्या गावाकडे जात राहिलो; अकरावी (विज्ञान) मध्ये नापास झालो; त्यानंतर एक वर्ष गावात राहिलो. "कोसला"मधले बरेचसे अनुभव मी देखील घेतले. मला "कोसला" खूप जास्त भावायला खूप जास्त वाव होता. तरीदेखील "कोसला" मला तितकं आवडलं नाही. "कोसला"ला कुठलाच सुसूत्र प्रवाह नाही. अर्थात, सुसूत्रता टाळणे हा लेखकाचाच विचार होता. "कोसला"मध्ये निश्चित अशी कथा नाही. त्यामुळे बरेच अनाकलनीय किंवा मूळ विषयाला धरून नसलेले संदर्भ खूप मोठ्या प्रमाणात येत राहतात. अर्थात हे ही ठरवूनच. कादंबरीचा आवाका आणि पोत मुद्दाम तसाच ठेवलेला आहे. हे मान्यच. पण मला कुठेतरी हे बेताल भरकटणे आणि भरकटल्यानंतर मूळ मुद्द्यावर लवकर न येणे किंवा अजिबातच न येणे हे कादंबरीचा रटाळपणा वाढवते असे वाटले. उदाहरणार्थ, चार-पाच पाने नायकाने फक्त उंदीर मारण्याच्या प्रयत्नांना वाहिलेले आहे. नायकाला उंदरांचा भयंकर राग असतो. हा राग समजू शकतो पण तो थोडक्यात प्रभावीपणे मांडता आला असता. डायरीची तारीखवार पाने तशीच अनाकलनीय. एका तारखेवर "बुंदीचे लाडू आणि रव्याचे लाडू" तर एका तारखेखाली फक्त अ ची बाराखडी आहे. तारखेखालचा बहुतांश सगळाच मजकूर उदाहरणार्थ अनाकलनीय वगैरे आहे. कित्येक घटनांच्या वर्णनातून लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे हेच कळत नाही. नायकाचे टोकाचे विचार अगदीच समजू शकतात पण घर जमीनदोस्त करून टाकण्याची इच्छा होणे, वडिलांना अरे-तुरे करून त्यांच्याशी भांडणे, त्यांचा खून करण्याची इच्छा होणे, वगैरे भाव कुठल्या कोनातून पटण्यासारखे किंवा समर्थन करण्यासारखे वाटतात हे कळत नाही. नायक सधन घरातला असतो. त्या काळात त्याला व्यवस्थित जगता येईल इतके आणि लागेल तेव्हा पाहिजे तितके पैसे वडील पाठवत असतात. मद्रास हॉटेलमध्ये जाऊन नायक खूप खाऊ शकत असतो आणि भकाभका सिगारेटी फुंकू शकत असतो. घरी आई-वडील, आजी, बहिणी असे सगळे असतात. एवढं सगळं व्यवस्थित असतांना हे अतिभयंकर टोकाचे विचार कशासाठी हा प्रश्न वारंवार पडत राहतो. जीवाची इतकी तगमग, घालमेल कशासाठी? मग केवळ सनसनाटी निर्माण करावी म्हणून तर लेखक असे लिहित नसेल असेही वाटून जाते. विचारांमध्ये आणि ते विचार निर्भीडपणे मांडण्यामध्ये इतका पारदर्शकपणा असतांना झगडू गड्याचे गायब होणे, त्याचे अपत्य नायकाच्या वडीलांनी सांभाळणे वगैरे यातून नायकाला नेमके काय म्हणायचे आहे हे मात्र गुलदस्त्यात राहते. कथेचं एक वेळ जाऊ द्या पण संपूर्ण कादंबरीत निरर्थक वाटणारे असंख्य उतारे आहेत. 'उदाहरणार्थ', 'वगैरे', 'हे एक थोरच', 'हे एक भलतंच' हे शब्द किंवा उद्गार असंख्य वेळा अकारण येत राहतात. लिखाणात उगीच घुसडलेले हे शब्द किंवा उद्गार काही काळानंतर 'भंपक' वाटायला लागतात. "उदाहरणार्थ हे कोसलाचं व्यवच्छेदक लक्षण आहे" असं काहीसं मलपृष्ठावर ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव लिहितात. म्हणजे नेमकं काय मला अजिबातच उदाहरणार्थ कळलेलं नाही. बाकी पाच वर्षाच्या बहिणीचा देवीमुळे झालेला करुण मृत्यू, त्यामुळे नायकाला झालेलं दु:ख, घरच्यांचा आलेला संताप, सिंहगडावर केलेली पायपीट, वेताळटेकडीवर दिव्याचे रहस्य शोधण्यासाठी केलेले धाडस, मेस सांभाळण्यात नायकाला आलेले अनुभव, गावातल्या गरीब लोकांची मानसिकता असे बरेचसे भाग बऱ्यापैकी अंगावर येतात. या व अशा अजून काही भागांमध्ये नायकाच्या हृदयाची तगमग भाषेचे कुठलेही अलंकार न वापरता अंगावर शहारा आणते. मी जे वाचलं त्या "कोसला"च्या शेवटी लेखकाचं २०१३ मध्ये लिहिलेलं परिशिष्ट आहे. त्यात "कोसला"च्या निर्मितीची कथा आहे. साठच्या दशकात लेखकाच्या म्हणण्यानुसार मराठी साहित्यावर ब्राह्मणी पद्धतीच्या लेखनाचा पगडा होता. अलंकारिक भाषा, कृत्रिम कथावस्तू, कृत्रिम कथामांडणी, अतिशय गोड किंवा अतिशय रडक्या लिखाणाचा तो जमाना होता. वाचकांना अशा प्रकारच्या लिखाणाचा कंटाळा आला होता. त्यातच लेखकाचे देशमुख आणि कंपनीच्या रा. ज. देशमुख यांच्याशी सख्य जुळते. घरगुती गप्पांमध्ये लेखक देशमुख आणि त्यांच्या पत्नी यांच्या जवळ "कादंबरी लिहिणं काही विशेष नाही; मी आरामात चांगली कादंबरी लिहू शकतो" असं म्हणतात. देशमुख लेखकाला आव्हान देतात की तू कादंबरी लिहून दाखवच. लेखक पेटून उठतो आणि एक अतिशय वेगळा आकृतीबंध असलेली कादंबरी लिहून काढतो. तीच ही "कोसला". झपाटल्याप्रमाणे सिगारेटी ओढत लेखकाने "कोसला" अक्षरश: पंधरा दिवसात पूर्ण केली. अलंकारिक भाषा, भावनिक वर्णनं, एका प्रवाहात बांधलेली कथा, कथेमध्ये नेहमी आढळणारी सुसूत्रता अशा रुढार्थाने कादंबरी यशस्वीरीत्या रचण्याच्या पद्धतीला छेद देत लेखकाने ही निराळीच कादंबरी रचली. एका अपयशी विद्यार्थ्याचे अगदी मनापासून आलेले हे प्रामाणिक आणि वास्तवदर्शी अनुभवकथन असे वर्णन लेखक "कोसला"चे करतात. नायकाच्या प्रश्नांना वाचक आपले प्रश्न समजतात. "कोसला"च्या जन्माची ही कहाणी सुरस आणि खूपच हृदयस्पर्शी आहे. एकंदरीत "कोसला"ने भारावून वगैरे जाण्याची जी माझी अपेक्षा होती ती मात्र फोल ठरली. अर्थात, वाचक "कोसला"शी कुठल्या पातळीवर आणि कसा जोडला जातो यावरदेखील "कोसला" आवडणं किंवा न आवडणं अवलंबून आहे. त्यामुळे "कोसला" आवडलेल्या वाचकांविषयी आदर आहेच. मी पुन्हा वाचेन का? शक्यता आहे. विशेषत: "कोसला"च्या जन्माची कथा (परिशिष्ट - ८-१० पाने) मला फारच आवडली. "कोसला"मधला काही भाग मला नक्कीच आवडला. एवढं तर मी दुसऱ्यांदा नक्कीच वाचू शकेन.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
21493 वाचन

💬 प्रतिसाद (122)

प्रतिक्रिया

परीक्षण छान.

सस्नेह
Mon, 06/13/2016 - 17:30 नवीन
'कोसला' वाचण्याचा प्रयत्न केला नाही अजून. आणि तुमचे मत वाचून प्रयत्न करेन असं वाटत नाही. तरीही चाळून बघेन. विद्रोही साहित्याची सुरुवात 'कोसला' पासून झाली असे समजायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments

एका प्रवाहात बांधलेली कथा,

आदूबाळ
Mon, 06/13/2016 - 17:31 नवीन
एका प्रवाहात बांधलेली कथा, कथेमध्ये नेहमी आढळणारी सुसूत्रता अशा रुढार्थाने कादंबरी यशस्वीरीत्या रचण्याच्या पद्धतीला छेद देत लेखकाने ही निराळीच कादंबरी रचली.
मलाही कोसला आवडली नाही. 'रुढार्थाने कथा' नसणं मला झेपलं नसावं बहुतेक.
  • Log in or register to post comments

कोसला......

शंतनु _०३१
Mon, 06/13/2016 - 17:44 नवीन
कोसला मधली मला आवडलेली ओळ " एक खानेसुमारी टळली " असली कोन्स्नट्रेटेड वाक्य परत वाचायला मिळतील म्हणुन बिढार, झूल वाचली पण निराशा झाली. हिंदू वाचायची हिम्मत होत नाहीये ,
  • Log in or register to post comments

उदाहरणार्थ, चार-पाच पाने

जव्हेरगंज
Mon, 06/13/2016 - 17:59 नवीन
उदाहरणार्थ, चार-पाच पाने नायकाने फक्त उंदीर मारण्याच्या प्रयत्नांना वाहिलेले आहे. खीखीखी, इथूनच तर कोसला खरी पकड घेतो. अगदी चवीचवीने हे पुस्तक मी पंधरा दिवसांत संपविले. कथानक गेलं खड्ड्यात! पण 'मांडणी' नावाची अद्भुत गोष्ट यात अनुभवली! 'शैली'चे तर आम्ही निस्सिम भक्त! एक ना एक चविष्ट ओळ अगदी फडश्या पाडून वाचली! 'कोसला'कारांचा विजय असो!!
  • Log in or register to post comments

याबद्दल मतमतांतरं अर्थातच असू

आदूबाळ
Mon, 06/13/2016 - 19:10 नवीन
याबद्दल मतमतांतरं अर्थातच असू शकतात, पण कादंबरी म्हटलं की कथानक घट्ट हवंच. कथानक ही कादंबरीची पोळीभाजी आहे. बाकी शैली, मांडणी वगैरे चटण्यालोणची आहेत. चव आणेल, पण पोट भरणार नाही. (हे आपलं माझं वै० मत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

आदुबाळ

मारवा
Tue, 06/14/2016 - 15:13 नवीन
पण कादंबरी म्हटलं की कथानक घट्ट हवंच. कथानक ही कादंबरीची पोळीभाजी आहे. अजिबात आवश्यक नाही माझा नको मकरंद साठेंचा संदर्भ देतो "कॉंप्लेक्सिटी किंवा व्यामिश्रता पूर्वीपासूनही होतीच. पण ती साधारणपणे द्विध्रुवीय, त्रिध्रुवीय इथपर्यंत असे. आता ती मल्टिपोलर म्हणजे अनेकध्रुवीय झालेली आहे. आतापर्यंत ज्या नाटकाच्या किंवा कादंबरीच्या कल्पना होत्या - विशेषतः नाटकाच्या - की मांडणी एकरेषीय व्हावी; त्यात काही एपिटोम (साररूप) यावा; मग क्लायमॅक्स असावा वगैरे -तलवार घुसल्यासारखं नाटक आतपर्यंत घुसलं पाहिजे, वगैरे - तर अशा प्रकारची मांडणी मला नाटकात आणि कादंबरीतही, दोन्हीकडे आता अशक्य वाटायला लागलेली आहे."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

या प्रतिसादाचे कुणी सुलभ

गणामास्तर
Tue, 06/14/2016 - 15:38 नवीन
या प्रतिसादाचे कुणी सुलभ मराठी भाषांतर दिले तर फार उपकार होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

कॉम्प्लेक्सिटी / व्यामिश्रता

आदूबाळ
Tue, 06/14/2016 - 15:54 नवीन
कॉम्प्लेक्सिटी / व्यामिश्रता असण्याबद्दल काही तक्रारच नाही. एकरेषीय मांडणी - साररूप/तात्पर्य/सामाजिक संदेश - क्लायमॅक्स वगैरेही असलंच पाहिजे असं नाही. माझा मुद्दा एकदम शिंपल आहे. जर सगळं लेखन स्वान्तसुखाय चालू असेल तर प्रश्नच मिटला. पण 'वाचकांसाठी लेखन' चालू असेल, तर त्या प्रक्रियेतला वाचकाचा सहभाग जमेस धरला पाहिजे. (इथे वाचक म्हणजे सर्वसामान्य किंवा मीडियन वाचक धरला पाहिजे.**) वाचकाला जर 'गोष्ट' आवडत असेल, तर सगळी व्यामिश्रता, मांडणीचे प्रयोग वगैरे त्या फ्रेमवर्कमध्येच आले पाहिजेत, तरच ते त्याच्यापर्यंत पोचतील. सगळ्या माध्यमांचं आणि कलाकृतींचं raison d'être हे 'आस्वादकापर्यंत पोचणं' हे आहे. ते करण्यात कलाकृती अपयशी ठरत असेल तर दोष कलाकृतीच्या निर्मात्याचा आहे. काहीतरी भन्नाट गहन तयार करायचं आणि समोरच्याला कळत नाही म्हणून बांगड्या फोडायच्या - याला काही अर्थ नाही. अवांतरः क्रिप्टॉलॉजीवरचं एक आर्टिकल मागे वाचलं होतं. "खरा क्रिप्टोग्राफर अनब्रेकेबल कोड्स लिहीत नाही, कारण आपला कोड / आपली कलाकृती जगाला समजावी अशी त्याची इच्छा असते." असं काहीसं प्रतिपादन त्यात होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

अहो

मारवा
Tue, 06/14/2016 - 16:04 नवीन
पण याला एक साध आर्ग्युमेंट करता येईल नेमाडे यांची कादंबरी कळली नाही, त्यांच्या कादंबरीतला अ‍ॅबसर्डीझम त्यांचा अ‍ॅन्टीहिरो पांडुरंग सांगवीकर कळला नाही, वा त्यांनी ज्या शैली वापरल्या फॉर्म वापरल्या तो कळलाच नाही. किंवा त्यांनी घेतलेला सामाजिक नेणीवेचा वेध डोक्यावरुन गेला. अस प्रत्येक कोसला वाचलेल्या वाचकाच मत आहे का ? अजिबात नाही. म्हणजे इथे बांगड्या फोडण विशीष्ट वाचकाच्या बाजुने झालेल आहे. अन्यथा इतक्या समीक्षा झाल्या नसत्या. अर्थहीन असते तर ग्रेस सर्वांनीच नाकारले असते. त्यापैकी जोपर्यंत बहुसंख्य आकलन होउन आनंद घेत आहेत व तक्रार करत नाहीत तोपर्यंत तरी एक बाजु लंगडीच नाही का माफ करा व्यक्तीगत नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हम्म. व्यक्तिगत नाही कसं?

आदूबाळ
Tue, 06/14/2016 - 16:19 नवीन
हम्म. व्यक्तिगत नाही कसं? व्यक्तिगतच आहे. म्हणूनच या धाग्यावरच्या माझ्या पहिल्या प्रतिसादात "'रुढार्थाने कथा' नसणं मला झेपलं नसावं बहुतेक." असं पष्ट लिहिलं आहे. असो.
अस प्रत्येक कोसला वाचलेल्या वाचकाच मत आहे का ?
"प्रत्येक वाचकाचं" असं मत असेल असं नाही. पण माझा दावा आहे की कोसला वाचलेल्या किमान ५०% लोकांना कोसला कळली / आवडली नसणार. (या धाग्यावरचे प्रतिसाद हा मासला आहेच.) ग्रेसबद्दल मी बापडा काय बोलणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

आजवरचा सर्व नम्रपणा पणाला लावुन

मारवा
Tue, 06/14/2016 - 16:29 नवीन
बाकी ५० % ज्यांना कळली लेखक त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास यशस्वी झाला याचा अर्थ आपण समजण्यात कमी पडलो असा कदाचित होऊ शकतो असे वाटत नाही का ? किंवा असे म्हणु त्याला जे आवश्यक परीश्रम होते किंवा पुर्वतयारी अपेक्षीत होती ती आपल्याकडुन झाली नसेल कदाचित एक शक्यता म्हणतोय कदाचित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हो. ही शक्यता आहेच. किंबहुना

आदूबाळ
Tue, 06/14/2016 - 17:32 नवीन
हो. ही शक्यता आहेच. किंबहुना "अमुकतमुकला समजण्यात वाचक कमी पडला" किंवा "अलाणाफलाणा काळाच्या पुढचा लेखक होता" हेच ठासठासून सांगितलं जातं. पण 'समजून घ्यायची' जबाबदारी वाचकावर का ढकलली आहे हे काही मला समजत नाही. ----- मला आज सकाळी एक मेल आली. माझंच नाव-आडनाव असलेला एक दूरचा भाऊ आहे. माझ्या मेल्स त्याला, त्याच्या मला होत असतं. तशी एक मेल आली. मी 'तो मी नव्हेच' हे सांगितलं. त्यावर त्या कन्यकेचा हा रिप्लाय आला: "Sorry its sent bymistake cause near by me same an email id. " आता वरची पूर्वकथा माहीत नसती तर तुम्हाला काय, मलाही काही अर्थबोध झाला नसता. कामाच्या ईमेल्स जाऊद्या, पण कादंबरीबद्दलही हेच खरं नाही का? आपल्याला नेमकं काय म्हणायचंय हे सांगण्याची प्राथमिक जबाबदारी लेखकाची नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

आहे ना मात्र फॉर्म स्टाईल तोच निवडेल ना

मारवा
Tue, 06/14/2016 - 18:00 नवीन
आहे ना मात्र फॉर्म स्टाईल तोच निवडेल ना एका मर्यादेनंतर जर त्याला "समजवण्याच्या प्रयत्नात" मुळ अभिव्यक्ती मार खातेय वाटल तर तो त्या त्या ठिकाणी तस तसा शैली निर्णय घेण्यास स्वतंत्रच आहे. तस तुम्हालाही स्वातंत्र्य आहेच ना सिलेक्शन च मग त्याला एक्स्प्रेशन च नाही देणार का ? आता रटाळपणाची कथानक नसल्याची एक तक्रार एक उदाहरण आठवते पटकन विलास सारंग यांची एक कथा आहे " खोली सोडणारा माणुस" आता सुडौल कथानक म्हणाल तर नाहीच यात. मनोरंजन शुन्यच काय आहे यात तर एक माणुस खोली सोडतोय ,आवरासावर करतोय, फार उदास वातावरण, एक माणुस येतो त्याच्याशी तो वरवरच बोलतो. तर ती एक आत्महत्या करत असलेल्या माणसाची शेवटच्या दिवसाच्या काही तासांची म्हणाल तर कहाणी आहे. पण त्या नुसत्या केवळ निरर्थक वाटणार्या शब्दांनी सारंग इतक घुसमटवुन टाकणारा अनुभव देतात की तुम्ही त्याच्या जग सोडण्याच्या मनोभुमिकेशी तीव्रतेने जोडले जाऊ लागतात. ही ताकद आहे लेखकाची तुम्हाला मोजक्या पानात मोजक्या शब्दात तो असा अभुभव देतो. तपशील बाबत स्वत" नेमाडे उदा. देतात. मला साध्या साध्या रोजच्या जीवनातल्या घटना महत्वाच्या वाटतात, एखादा मुलगा रोज साधासा राहणारा आज तेल चोपुन चांगला भांग पाडुन निघालेला आहे तर त्यामागे एक कारण आहे एक प्रत्येक वेळेस भव्यच होऊन मृत्यु, विवाह , युद्ध होउनच काहीतरी महत्वाच घडेल काहीतरी नाट्यमय च हव नॉट नेसेसरी तपशील एका भुमिक्तेतुन लिहीलेले असतात त्यामागे जरुरी नाही की नाट्य च असेल प्रत्येक वेळेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आहे ना मात्र फॉर्म स्टाईल तोच निवडेल ना

मारवा
Tue, 06/14/2016 - 18:01 नवीन
आहे ना मात्र फॉर्म स्टाईल तोच निवडेल ना एका मर्यादेनंतर जर त्याला "समजवण्याच्या प्रयत्नात" मुळ अभिव्यक्ती मार खातेय वाटल तर तो त्या त्या ठिकाणी तस तसा शैली निर्णय घेण्यास स्वतंत्रच आहे. तस तुम्हालाही स्वातंत्र्य आहेच ना सिलेक्शन च मग त्याला एक्स्प्रेशन च नाही देणार का ? आता रटाळपणाची कथानक नसल्याची एक तक्रार एक उदाहरण आठवते पटकन विलास सारंग यांची एक कथा आहे " खोली सोडणारा माणुस" आता सुडौल कथानक म्हणाल तर नाहीच यात. मनोरंजन शुन्यच काय आहे यात तर एक माणुस खोली सोडतोय ,आवरासावर करतोय, फार उदास वातावरण, एक माणुस येतो त्याच्याशी तो वरवरच बोलतो. तर ती एक आत्महत्या करत असलेल्या माणसाची शेवटच्या दिवसाच्या काही तासांची म्हणाल तर कहाणी आहे. पण त्या नुसत्या केवळ निरर्थक वाटणार्या शब्दांनी सारंग इतक घुसमटवुन टाकणारा अनुभव देतात की तुम्ही त्याच्या जग सोडण्याच्या मनोभुमिकेशी तीव्रतेने जोडले जाऊ लागतात. ही ताकद आहे लेखकाची तुम्हाला मोजक्या पानात मोजक्या शब्दात तो असा अभुभव देतो. तपशील बाबत स्वत" नेमाडे उदा. देतात. मला साध्या साध्या रोजच्या जीवनातल्या घटना महत्वाच्या वाटतात, एखादा मुलगा रोज साधासा राहणारा आज तेल चोपुन चांगला भांग पाडुन निघालेला आहे तर त्यामागे एक कारण आहे एक प्रत्येक वेळेस भव्यच होऊन मृत्यु, विवाह , युद्ध होउनच काहीतरी महत्वाच घडेल काहीतरी नाट्यमय च हव नॉट नेसेसरी तपशील एका भुमिक्तेतुन लिहीलेले असतात त्यामागे जरुरी नाही की नाट्य च असेल प्रत्येक वेळेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

तोंडी लावायला इको उंबर्तो चे मत घ्या

मारवा
Tue, 06/14/2016 - 16:26 नवीन
काही एको उंबर्तो सारखी मंडळी आहेत ज्यांचे असेही मत असते You are always shocked by how different critics' opinions are," he says. "I think a book should be judged 10 years later, after reading and re-reading it. I was always defined as too erudite and philosophical, too difficult. Then I wrote a novel that is not erudite at all, that is written in plain language, The Mysterious Flame of Queen Loana, and among my novels it is the one that has sold the least. So probably I am writing for masochists. It's only publishers and some journalists who believe that people want simple things. People are tired of simple things. They want to be challenged." इको उंबर्तो चा फोकाल्ट्स पेन्डुलम वाचकाला सोप करुन डायजेस्टेड पचण्यास हलके असे देत नाही. त्याहुन महत्वाच त्याचे वाचकही तो आग्रह करत नाही. फोकाल्ट्स पेन्डुलम सारख पुस्तक समजण्यासाठी वाचकाला प्रयत्नपुर्वक परीश्रम करावे लागतात. १०० नवे संदर्भ समजुन घ्यावे लागतात. पण तो वाचकालाच प्रगल्भ करणारा अनुभव असतो हे कृपया लक्षात घ्यावे. त्यानंत जो आनंद येतो तो अवर्णनीय असतो. इट इज वर्थ ट्रायींग एकदा खरच वाचुन बघावे असे सुचवितो. यातील पहीली किमान १०० पाने गरगरायला होत पण अगेन इट इज वर्थ ट्रायींग कृपया इको चे हे तीव्र टोकदार विधान तारतम्याने घ्यावे हि विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

मारवाजी,

बोका-ए-आझम
Tue, 06/14/2016 - 17:09 नवीन
तसं म्हटलं तर कुठलीही कलाकृती पूर्णपणे कळणं शक्यच नाही. देरिदा (Derrida) च्या मते लेखक काय म्हणालाय त्याच्याच बरोबरीने तो काय नाही म्हणालाय तेही महत्त्वाचं आहे. त्याचा अन्वयार्थ वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रकारे लागू शकतो. मग ती कलाकृती कोसला असो, गाॅन विथ द विंड असो, वासूनाका असो किंवा पानिपत असो. इंग्रजी कादंबऱ्या आपल्याला अफाट वाटण्यामागे हेही एक कारण असू शकेल, की त्यांचं अनुभवविश्व आपल्या संस्कृतीपेक्षा इतकं वेगळं आहे की ते कुठल्याही काळात वाचलं तरी त्याचा परिणाम होईलच. कोसला चं तसं होत नाही कारण त्या स्वरूपाचा अनुभव आपल्यासारख्या अनेकांना आला असेल. समीरसूर यांनी ते साधर्म्य दाखवलं आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

बोकोबा

मारवा
Tue, 06/14/2016 - 17:27 नवीन
प्रश्न इंग्रजी कांदबर्या अफाट वाटण्याचा नाहीच. कित्येक इंग्रजी कादंबर्या भिकार आहेत. प्रश्न एखाद्या कलाकृतीला कादंबरीला एक सब्ज्रेक्टीव्हीटी तर आहेच आहे. वाचक म्हणुन सामोर जाण्याची शैली काय हवी ? कशी हवी ? म्हणजे एक नविन फॉर्म एक नविन अनुभव माझ्या कक्षेत पहील्यांदा आला तर त्याला मी सामोरा कसा जातो हा आहे.? जे नविन आहे किमान त्याबाबतीत आपण स्वागतशील तर असल पाहीज किमान नम्रता किमान आपल्या बाजुने जोरदार प्रांमाणिक प्रयत्न यासर्वनंतर जरी आपला निष्कर्ष नकारात्मक असेल तरी काहीच हरकत नाही मात्र तो डिफेंड करता आला पाहीजे. पु.ल.देशपांडे आणि विजय तेंडुलकर दोन तुलनात्मक उदाहरणे छान आहेत. बेकेट च्या वेटींग फॉर गोदो च्या बाबतीत बघा एकीकडे पुल न्युनगंडातुन उद्धटपणे गोदुची वाट लिहीतात. दुसरीकडे तेंडुलकर त्याच वेटींग फॉर गोदो चे उत्कृष्ठ समजुन घेऊन विश्लेषण करुन दाखवतात. ( त्यांच्या स्तंभलेखनाच्या संग्रहात वेटींग फॉर गोदो वर उत्कृष्ठ विश्लेषण आहे ) इतकेच नाही एक अनुभव आहे तेंडुलकरांचा सांगितलेला ढसाळांच्या बाबतीत जेव्हा नामदेव ढसाळांच्या कविता त्यांच्या वाचनात आल्या तेव्हा अनेक नविन शब्द त्यात तेंडुलकरांना आढळले. तेव्हा ढसाळांशी मैत्रीपुर्ण संबंध होते तर तेंडुलकर त्यांच्या बरोबर त्या वस्तींमध्ये फिरत असत. एकेक शब्दाचा अर्थ विचारत असत. त्यांच जगण वेदना समजुन घेत असत. ती व्होकॅब्युलरी एका जेन्युइन मुमुक्षु सारखी त्यांनी आत्मसात केली. नविन वेगळ्या अपरीचीत साहीत्यकृतीला सामोरे जाण्याची ही शैली अधिक प्रगल्भ नम्र अभिनिवेशरहीत पुर्वग्रहरहीत नाही का ? आता नेमाडेंची विधाने व नेमाडेंची पुस्तके सर्वस्वी वेगळा विषय आहे. लेखकाल जे काय सृजनशील मांडायच असत तो ते त्या पुस्तकात ओतत असतो त्यानंतर तो रिक्त होतो. मग तो एक सर्वसामान्य माणुसच असतो. त्याचा संबंध त्याच्या साहीत्यात फार कमी प्रमाणात लावता येतो. आता तेंडुलकरांनी विधान केल एक बंदुक द्या गोळ्या घालतो वगैरे तर ते काय इसीस चे अतिरेकी होत नाहीत. माणुस समजुन घेतांना त्याच्यातला लेखक आणि लेखक कलाकृती समजुन घेतांना त्यातला माणुस मध्ये आणण्याची काहीच गरज नाही. मंद्र ही भैरप्पांची कादंबरी कलावंताच्या या दुहेरी जीवनाच्या एकमात्र बिंदु वर बेतलेली आहे जी याच उत्कृष्ठ विवेचन करते. तस तर अनेक महान लेखक जुगारी गुन्हेगार दारुडे होते म्हणून आता जुगारी झाला म्हणुन डोस्टोव्हस्की च्या कांदबरीच मुल्य कमी होत नाही किंवा वाढतही नाही. मला वाटत म्हणुन इतपतच आर्ग्युमेंट असेल तर काय विशेष नाही मला वाटत कारण,,,,१.२, ३ भुमिका असेल तर ते अर्थपुर्ण होत जात. १===
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

पु.लं.नी गोदूची वाट

बोका-ए-आझम
Tue, 06/14/2016 - 20:26 नवीन
हे विडंबन केलंय, पण ते उद्धटपणे केलंय असं मला तरी वाटलं नाही. मुळात Theater for the absurd ही संकल्पना आपल्याकडे रुजलीच नाही, कारण दुस-या महायुद्धातल्या भीषणतेला आपण सामोरे गेलोच नाही, ज्या भीषणतेमधून या संकल्पनेचा जन्म झाला आहे. पु.लं.चं हे विडंबन किंवा खुर्च्या हे विडंबनसुद्धा असा सांस्कृतिक फरक लक्षात न घेता ती नाटकं आपल्याकडे आणणा-या नाटककार आणि लेखकांची केलेली चेष्टा आहे. त्यात उद्धटपणा काय आहे ते समजलं नाही. असो. तेंडुलकरांनी गिधाडे किंवा शांतता... मध्ये आपले वैयक्तिक अनुभव किंवा vicariously घेतलेले अनुभव आणले आहेतच. त्यांच्या बेबी किंवा सखाराम बाईंडर मधल्या व्यक्तिरेखा या प्रत्यक्षात पाहायला मिळाल्या आहेत का हा प्रश्न त्यांना प्रकट मुलाखतीत कमलाकर नाडकर्णींनी विचारला होता. तेव्हा ते हो असंच म्हणाले होते. तुम्ही डोस्टोव्हस्कीबद्दल लिहिलंय. त्याला वधस्तंभावर जाऊन शेवटच्या क्षणी परत यायचा अनुभव होता. त्या अनुभवाचा उल्लेख किंवा त्याचा प्रभाव डोस्टोव्हस्कीने स्वतः मान्य केलेला आहे. त्यामुळे लेखक आणि माणूस हा overlap होणं स्वाभाविक आहे. लेखक समजून घेताना माणूस हा समजून घ्यावाच लागतो. कुठलाही लेखक हा त्याच्यावरचे भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय असे संदर्भ नाकारू शकत नाही. उदाहरणार्थ अरुण साधूंची डाव्या विचारांशी असलेली बांधिलकी समजल्यावर मग मुंबई दिनांक मधला डीकास्टा समजतो, ज्यूल्स व्हर्नच्या कडक शिस्तीच्या वडलांबद्दल समजल्यावर मग त्याचे नायक हे घराबाहेर पडून काहीतरी करु इच्छिणारे असे का असतात ते समजतं. टाॅलस्टाॅयच्या स्वतःच्या अनुभवातून अॅना कॅरनिना मधली रशियन स्तेप्स आणि तिथल्या सुगीच्या हंगामाची वर्णनं आलेली आहेत. तुम्ही तेंडुलकरांबद्दल बोललात - त्यांच्या ' गोळी मारावीशी वाटते ' या उद्गारांबद्दल बोललात. ज्यांनी त्यांच्या नाटकांमधली सूक्ष्म पातळीवरची हिंसा पाहिलेली आहे, त्याला हे ऐकून आश्चर्य वाटलं नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

उत्तम

नंदन
Tue, 06/14/2016 - 23:51 नवीन
मारवा आणि बोका-ए-आझमजी - अतिशय उत्तम चर्चा. वेळेअभावी सहभागी होता आलं नाही, पण हा संवाद संग्राह्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

पु.लं.चं हे विडंबन किंवा

मारवा
Wed, 06/15/2016 - 11:08 नवीन
पु.लं.चं हे विडंबन किंवा खुर्च्या हे विडंबनसुद्धा असा सांस्कृतिक फरक लक्षात न घेता ती नाटकं आपल्याकडे आणणा-या नाटककार आणि लेखकांची केलेली चेष्टा आहे. बेकेट च्या लेखनाशी जो पुर्णपणे अपरीचीत आहे. मात्र पु.ल. शी परीचीत आहे त्याला जर गोदुची वाट दाखवल तर त्याचा परीणाम काय होणार ? जी व्यक्ती एका विशीष्ट सांस्कृतिक स्थानावर आहे जिला एकुण साहीत्याची प्रगल्भ जाण आहे, त्या व्यक्तीने एका नव्या दमदार गंभीर विचारप्रवाहाचा परीपाक असलेली कलाकृती जेव्हा मराठीत पहील्यांदा आणतोय तेव्हा त्या विडंबनाचा काय संभाव्य परीणाम होऊ शकतो याचा किमान विचार करणे आवश्यक नाही का ? आता नेमक आठवत नाही मात्र विजया मेहता यांच्या आत्मचरीत्रात पुलंविषयी त्यांच्या कॉमेंट्स ने काय दुष्परीणाम झाला कुठल्यातरी एका नाटकावर यासंदर्भात लिहीलेलं आहे. ती संकल्पना आपल्याकडे रुजली नाही मान्य व तशी परीस्थीतीही नव्हती हे ही मान्य. मात्र म्हणुन ती रद्दबातल होते काय ? शिवाय यानंतर या ट्रीव्हीलाइज केल्याने जो डॅमेज होतो एक तुच्छतावाद जो निर्माण होतो तो नवप्रवाह समजुन घेण्यास आडकाठी निरुत्साह निर्माण करत नाही का ? नंतरचे किरण नगरकर , सारंग जे प्रयोग करत होते पाश्चात्य नवसंकल्पना आत्मसात करुन पचवुन अस्सल भारतीय जोड देऊन जी नवनिर्मीती करत होते त्याला फटका बसलाच ना. एक आत्मसंतुष्टतेची आमच्याकडे संतांनी हे अगोदरच सांगितलेल आहे टाइप किंवा ही नसती फॅड आहेत झाल अशी कृपमंडुक वृत्ती वाढली नाही का ? खुद्द नेमाडेही द्विभाषिक लेखकांवर रश्दी इ. वर तुटुन पडलेत. अरुण कोलटकरच्या कवितेची नेमाडेंनी केलेली चिरफाड याच धाटणीची होती. ही काय मराठी साहीत्याच्या साठी प्रगतीशील बाब नव्हती. मी वापरलेला उद्धट शब्द चुकला, हे माझ पुर्णपणे चुकल खरच तो मागे घेतो. माणुस म्हणुन जे अनुभव आहेत ते साहीत्यात उमटणारच व माणुस समजुन घेतल्याने एका मर्यादेपर्यंत कलाकृती समजु शकते पण टाइम अ‍ॅन्ड अगेन अनेक समीक्षाप्रवाहांनी यातील मर्यादेची जी फार मोठी मर्यादा आहे याची जाणीव करुन दिली आहे. इथे विशेषत: जे मी म्हणतोय ते केवळ नेमाडेंच्या विधानासंदर्भात पहावे. इथे नेमाडेंची त्यांच्या साहीत्यकृतीशी कुठलाही सरळ सबंध नसलेली विधाने त्यांच्या साहीत्यकृतीचा दर्जा ठरवण्यासाठी वारंवार वापरण्यात येतात आक्षेप नेमका त्यावर आहे. खरोखर त्यांच्या विधानांचा आणि साहीत्यकृतीचा काय संबंध ? एकवेळ लेखकही ठीक कवि समजुन घेतांना तर तो माणुस आणि कवि याचा संबंध लावण अधिकच कठीण होऊन बसत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

जाऊ द्या हो...

समीरसूर
Wed, 06/15/2016 - 11:23 नवीन
जाऊ द्या हो...पुलंनी केलेल्या त्या विडंबनाने (कशाच्या ते आठवत नाहीये आता; 'वेटिंग फॉर गोदो'चं आय गेस) एवढं काही महान नुकसान नाही झालंय आपलं. अगदी दुष्काळाने केलंय तसलं तर भयंकर नुकसान नाही ना झालंय! मग जे चाललंय ते झकास चालंलय की. आता इतक्या वर्षांनी आपण जीव जाळून आणि भांडण करून काय उपयोग? जाने दो...मुआफ कर दो उन सबको. :-) (कृ. ह. घे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

चविष्ट ओळ

शंतनु _०३१
Mon, 06/13/2016 - 18:13 नवीन
चविष्ट ओळ .... :))
  • Log in or register to post comments

कोसला पुर्ण वाचणार्या

जेपी
Mon, 06/13/2016 - 18:17 नवीन
कोसला पुर्ण वाचणार्या कोणत्याही व्यक्तीला मी पुर्ण सांष्टांग दंडवत करेन. भयकंर आहे.
  • Log in or register to post comments

कधी करणार दंडवत?का पायाचा

अजया
Wed, 06/15/2016 - 11:29 नवीन
कधी करणार दंडवत?का पायाचा फोटो पाठवु! * मी अनेकदा वाचलेली माझी आवडती कादंबरी आहे कोसला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

ज्या वेगाने तुम्ही कोसला वाचली व परीक्षण लिहीले त्यावरुन

मारवा
Mon, 06/13/2016 - 18:19 नवीन
वुडी अ‍ॅलन चे एक गमतीदार कोट आठवले. I took a speed-reading course and read War and Peace in twenty minutes. It involves Russia.
  • Log in or register to post comments

हाहाहा...भारी

समीरसूर
Tue, 06/14/2016 - 10:12 नवीन
भारी कोट आहे. "कोसला" अगदी अशीच वाचली (चाळली) असती तरी फारसं काही बिघडलं नसतं असं आता वाटतंय. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

कोसला खूप विसविशित कादंबरी

प्रचेतस
Mon, 06/13/2016 - 19:43 नवीन
कोसला खूप विसविशित कादंबरी आहे. अशाच उगाच काही गाजलेल्या कादंबऱ्या म्हणजे रणांगण, युगंधर, संभाजी, उत्सुकतेने मी झोपलो.
  • Log in or register to post comments

मौजे च्या श्री.पु भागवतांनी

मारवा
Mon, 06/13/2016 - 21:51 नवीन
"कोसला" चे साहीत्यीक महत्व आम्ही ओळखु शकलो नाही याविषयी खंत व्यक्त केली होती. सुरगाठ निरगाठ उकल क्लायमॅक्स याची सवय तेव्हाच्या वाचकांना झालेली होती. फडके सारखी मंडळी फॉरेन एलीमेंट टाकुन कांदबरी सजवत होते. स्वामी १९६३ या कोसलाच्या वर्षात प्रकाशित झाली होती. स्मरणरंजनात व क्लायमॅक्स उदात्त करण्यात गुंतलेली होती अशा वातावरणात हा एक कल्चरल बॉम्ब होता. पण त्याहुन महत्वाचं म्हणजे "अस्तित्ववाद" या निमीत्ताने दिमाखाने मराठी साहीत्यात प्रवेश करता झालेला होता. व जुन्या नाटकीपणा ला करकरीत आव्हान देत होता. पुढे अजुन मजा झाली "कोसला इफेक्ट" इतका भयंकर होता म्हणजे अस म्हणु अनुराग कश्यप ने एंट्री मारल्यावर गुलाल वगैरे उधळल्यावर करण जोहरला मागे मागे फरफटत जाव लागत तस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नवप्रवाहाचीच तुलना करायची तर

प्रचेतस
Mon, 06/13/2016 - 23:23 नवीन
नवप्रवाहाचीच तुलना करायची तर ह्याच काळात, किंबहुना कोसलाच्या आधीच श्री. ना. पेंडसे ह्यांनी एकाहून एक सरस कादंबऱ्या दिल्या. हद्दपार, गारंबीचा बापू, हत्या, कलंदर आणि १९६३ चीच रथचक्र. कोसलापेक्षा कथानकाच्या दृष्टीने ह्या कितीतरी सरस होत्या शिवाय त्याच वेळी ह्या कादंबऱ्या वेगळी वाटही चोखाळत होत्या ते ही नेमाड्यांसारखं असंबंद्ध न लिहिता. जयवंत दळवी ह्यांची चक्र, भाऊ पाध्ये ह्यांची राडा, वासूनाका, मधु मंगेश कर्णिक ह्यांची माहिमची खाडी ह्या इतरही मला येथे प्रकर्षाने आठवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

+1

आदूबाळ
Mon, 06/13/2016 - 23:55 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सुसंगती, सुलभता, सुगमतेचा किती तो सोस !

मारवा
Tue, 06/14/2016 - 15:30 नवीन
जर कुठलीही चांगली कादंबरी एक व्यामिश्र वास्तव उभ करत असेल. आणि ते वास्तवच मुळात टोकाच असंबद्ध असेल तर त्याचा झटीतीप्रत्यय देण्यासाठी लेखकाला तसाच फॉर्म वापरणे भाग नाही का ? प्रत्येक वेळेस ग्रेस ला सुलभीकरणाचा आग्रह का असावा ? प्रत्येक वेळी रीचर्ड बर्टनच्या वुइथ नोट्स नाइट्स ला " अरेबियन नाइट्स च्या सुरस व चमत्कारीक कथा " चा हट्ट का असावा ? अ‍ॅबसर्ड थिएटर ला याच न्युनगंडातुन विरोध करीत पु.ल.देशपांडे युजीन आयनेस्को व बेकेटच्या नाटकांचे "खुर्च्या" व "गोदुची वाट "सारखी थिल्लर टींगल ( जाणून घेण्याचा विश्लेषणाचा प्रयत्न न करता इजी वे ) मात्र त्याच वेळेस विजय तेंडुलकर सारखे ही होते जे वेटींग फॉर गोदो चा उत्तम वेध घेत विश्लेषण करतच होते. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

"कोसला"चा असंबद्ध फॉर्म एक प्रयोग म्हणून ठीक होता

समीरसूर
Tue, 06/14/2016 - 09:31 नवीन
@ मारवा, प्रचेतस म्हणतात ते अगदी खरं आहे. मी नुकतीच श्री. ना. पेंडसेंची "ऑक्टोपस" दुसऱ्यांदा वाचली (कादंबरीमध्ये चितारलेला कालखंड - १९७१ साल). कथा प्रवाही, सुसूत्र आणि व्यवस्थित बांधलेली आहे. कादंबरी खूप जुनी आहे पण वाचतांना अजूनही हृदयाला जबरदस्त भिडते. "कोसला"चा असंबद्ध फॉर्म एक प्रयोग म्हणून ठीक होता पण त्याचं तेवढंच महत्व. त्यापलिकडे "कोसला"ला फार काही साहित्यिक मुल्य वगैरे आहे असं खरंच वाटलं नाही. कदाचित त्याकाळी असे स्वैर लिखाण पहिल्यांदाच आलेले असल्याने आणि जो दिसेल त्याला (अगदी कुटुंबातील जवळच्या सदस्यांसकट) नायकाची झोडपून काढण्याची बेदरकार (आणि घमेंडी) वृत्ती "विचारांचा मुक्तपणा, उघडं-नागडं वास्तव" वगैरे नावाखाली शैली म्हणून अकारण लोकप्रिय झाल्याने हे पुस्तक लोकप्रिय झालं असावं. बाकी वाचाकांनी झपाटून जावं असं नायक काहीच करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

याच्याशी सहमत.. कोसला हा त्या

आनन्दा
Tue, 06/14/2016 - 19:00 नवीन
याच्याशी सहमत.. कोसला हा त्या काळाचा प्रयोग होता.. त्या अर्थाने ती खूपच पुढारलेली कादंबरी होती. आता ५० वर्षानंतर ते संदर्भ, आणि विशेषतः ग्राम्य/शिवराळ भाषेचे अप्रूप वाटायचे बंद झाल्यावर वेगळे मापदंड लावून त्या कादंबरीची समीक्षा करणे फारसे योग्य नाही.. पण बहुधा खुद्द नेमाडेंनादेखील जिथे हे फारसे पचनी पडले नसावे तिथे इतरांची काय कथा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

'भंपक'

समीरसूर
Tue, 06/14/2016 - 10:14 नवीन
अस्तित्ववाद, देशीवाद वगैरे या सगळ्या, नेमांडेंच्या भाषेत सांगायचं म्हणजे 'भंपक' संकल्पना आहेत. शून्य अर्थ असलेल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

अस्तित्ववाद भंपक ?

मारवा
Tue, 06/14/2016 - 14:59 नवीन
अस्तित्ववाद, देशीवाद वगैरे या सगळ्या, नेमांडेंच्या भाषेत सांगायचं म्हणजे 'भंपक' संकल्पना आहेत. शून्य अर्थ असलेल्या. इतक धाडसी विधान तुम्ही केल आहे या अर्थी सार्त्र पासुन थेट आपल्या विलास सारंग पर्यंत तुम्ही सर्वच लेखक तत्ववेत्ते उडवुन लावलेत.. नाही म्हणजे तुम्ही नक्कीच याहुन जास्त काहीतरी मौलिक विचार मांडत आहात. अधिक अर्थपुर्ण तुमच्याकडे म्हणण्यासारख असेलच नक्की.म्हणून एक कुतुहल म्हणुन विचारतोय फक्त की "अस्तित्ववाद" एक भंपक संकल्पना आहे या निष्कर्षापर्यंत तुम्ही कसे पोहोचलात जरा सांगाल का ? उदा. कुठली अस्तित्ववादी संकल्पना तुम्हाला फालतु भंपक वाटली व का वाटली याची कारणमीमांसा दयाल का? म्हणजे मला खात्री आहे तुम्ही "अस्तित्ववाद" अभ्यासुनच मग या निष्कर्षांवर आला असाल.आणि तुमच्याकडे नक्कीच गंभीर आक्षेप असतीलच. त्याशिवाय तुम्ही अस विधान करणार नाहीत तर किमान अस्तित्ववादा विरोधात तुमचे बेसीक आर्ग्युमेंट काय आहे? उदा. existence precedes essence bad faith hell is other people या अस्तित्ववादी संकल्पना भंपक आहेत या निष्कर्षापर्यंत आपण कसे आलात ? कुठली अस्तित्ववादावरील पुस्तके तुमच्या मते फेक आहेत ? आवडेल जाणुन घ्यायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

माझ्याजवळ कुठलीच कारणमीमांसा नाही

समीरसूर
Tue, 06/14/2016 - 16:50 नवीन
माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि अशा उच्च कोटीच्या संकल्पना समजण्याच्या दृष्टीने कमी बुद्ध्यांक असणाऱ्या वाचकांना (जे माझ्या मते संख्येने ९५% असतात) जे सहजरीत्या कळत नाही आणि कळत नाही म्हणून त्यातल्या तथाकथित सौंदर्याचा आस्वाद घेता येत नाही ते अशा सगळ्या वाचकांच्या दृष्टीने 'भंपक'च म्हणायला हवे. बाकी माझ्याजवळ कुठलीच कारणमीमांसा नाही. मी कुठलाच अभ्यास केलेला नाही. कारण अशा अगदी पराकोटीच्या abstract संकल्पनांचा अभ्यास करण्याची कधीच इच्छा झाली नाही. ते धाडस कधीच जमले नाही. सार्त्र माहिती आहे. त्याच्याविषयी थोडंफार वाचलेलं आहे. त्याच्या माणूस हळूहळू कीडा होत जातो अशा आशयाच्या एका कादंबरीविषयी वाचलेलं आहे. यापेक्षा अधिक माहिती नाही. अर्थात, आपल्या या विषयातील व्यासंगाचा आदर आहेच. मी आपलं नेमाडेंच्याच शैलीत वाक्य ठोकून दिलं हो. त्यांना अशीच सवय आहे ना! "इंग्रजी शाळा बंद केल्या पाहिजेत" किंवा "साहित्य संमेलने हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे" किंवा "कुसुमाग्रज आणि खांडेकर हे भिकार साहित्यिक आहेत" अशा नेमाडेंनी उधळलेल्या मुक्ताफळांना तरी काय अर्थ आहे? म्हणून त्यांच्या स्टाइलमध्ये एक विधान दिलं भिरकावून. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

समीर सुर जी

मारवा
Tue, 06/14/2016 - 17:06 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

धन्यवाद!

समीरसूर
Tue, 06/14/2016 - 17:16 नवीन
धन्यवाद! :-) किती तो टोकदार उपरोध ठासून भरला आहे प्रत्येक प्रतिसादात!!! मोजता मोजता आयुष्य जाईल. कठीण आहे... :-):-):-) (कृ. ह. घे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

असेच फ़क्त धन्यवाद नेमाडे ना

धनंजय माने
Tue, 06/14/2016 - 19:02 नवीन
असेच फ़क्त धन्यवाद नेमाडे ना दिले अस्तेत तर????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

नक्कीच हलक्यातच घेतो मी नेहमीच तुम्हीही घ्या ही नम्र विनंती

मारवा
Tue, 06/14/2016 - 19:14 नवीन
तुम्हाला मोकळेपणाने माझी मत सांगतो. १- कुठलाही लेखक शीर्षकाची निवड म्हणजे साधारण लेखकही असेल तरी विचारपुर्वक करतो एक संपुर्ण कादंबरीचा अर्क त्यात आणण्याचा प्रयत्न करत असतो. कोसला हे तर बर्यापैकी युनिक टायटल आहे. तर परीक्षण लिहीण्यापुर्वी आपणांस "कोसला" या शब्दाचा अर्थ जाणुन घ्यावासा नाही का ? म्हणजे किमान शीर्षकाचा अर्थ की हे का निवडल असाव ? याचा शब्दकोशात काय अर्थ आहे ? काय प्रयोजन असेल ? २- तुम्ही कोसला वर टीका करण याला माझा विरोध आहे असे वाटत असेल तर ते माझ्याकडुन स्पष्ट करतो की अजिबात नाहीच. उलट तुम्हाला कोसला वरची सर्वात प्रगल्भ टीका किंवा खर म्हणजे कोसला नाही पण एकुण नेमाडे व देशीवाद यावरची सर्वात प्रगल्भ व तार्कीक विलास सारंग यांची टीका वाचावयाची असल्यास ही लिंक नम्रपणे सुचवतो. http://scroll.in/article/720798/the-perils-of-nativism-an-essay-by-vilas-sarang-1942-2015 माझ्या प्रतिसादात उपहास जाणवला व तुम्ही दुखावलात याचा मनापासुन खेद वाटतो मात्र तुमचा तो प्रतिसाद हतबुद्ध करणारा होता आपण त्याच्या वरील जो प्रतिसाद दिला होता की भिरकावुन दिल विधान वगैरे त्याने तेव्हा ती उत्स्फुर्त प्रतिक्रीया उमटली त्यासाठी क्षमस्व कळावे लोभ असावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

"कोसला"चा अर्थ जाणून घ्यावासा नाही वाटला

समीरसूर
Wed, 06/15/2016 - 09:41 नवीन
"कोसला"चा अर्थ जाणून घ्यावासा नाही वाटला. मला वाटलं कादंबरी वाचल्यानंतर त्याचा अर्थ आपसूक कळेल पण ते काही झालं नाही. मी संपूर्ण कोऱ्या मनाने "कोसला" वाचायला घेतलं होतं. आणि वाचून संपल्यानंतर मी थोडा प्रयत्न केला पण मला "कोसला"चा १००% अचूक अर्थ कुणीच सांगू शकलं नाही. तो फारसा कुणाला माहित नाही. अर्थात त्यामुळे माझ्या कादंबरी वाचण्याच्या प्रक्रियेत काही अडथळा आला नाही. लेखकाला कादंबरीत काय म्हणायचं आहे ते मला व्यवस्थित कळलं. फार काही विशेष म्हणायचं नव्हतं आणि जे म्हणायचं होतं ते अगदीच रटाळ पद्धतीने लिहिलं होतं हेदेखील व्यवस्थित कळलं. उपरोधाबद्दल सांगायचं तर मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आपल्या अगदी पहिल्या प्रतिसादापासून प्रत्येक प्रतिसादात उपरोध ठासून भरलेला होता. म्हणजे "अरे हा किती सुमार दर्जाचा वाचक आहे; याला अस्तित्ववाद माहित नाही; याची काय लायकी आहे" अशा पद्धतीचा अदृष्य तरीही समोर येणारा उपरोध आपल्या प्रत्येक प्रतिसादात होता. मी प्रांजळपणे माझा या विषयातला अभ्यास शून्य आहे असं सांगीतलं. आणि "भिरकावलं" वगैरे मी जे म्हटलो ते थोडं लायटर व्हेनमध्ये म्हटलो. त्यात कुणालाच दुखावलं नव्हतं; वैयक्तिक असणारा उपरोध तर अजिबात नव्हता. उपरोध, टोमणे मारणं, काहीतरी "मार्मिक" वगैरे बोलून दुसऱ्याला कमी लेखणं हे फार जुनं झालं. ते मी सहसा टाळतो. मी उमेदीच्या काळात नोकरीसाठी मुलाखतीला जात असे. मुलाखत घेणारे महाज्ञानी 'साहेब' मला काय येतंय; माझी शिकण्याची कितपत तयारी आहे; माझ्याकडे बाकी कुठली कौशल्यं आहेत वगैरे न बघता मला काय येत नाहीये हेच शोधण्यात वेळ दवडायचे. आणि मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही की छद्मीपणे हसून "अरे, तुला एवढं साधं माहित नाही" वगैरे ठेवून द्यायचे. :-) उगीच तसल्या मुलाखतींची आठवण झाली. आपली टिपिकल भारतीय मनोवृत्ती, दुसरं काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

तो आपल्या चहाचा कप नाही.

आकाश खोत
Mon, 06/13/2016 - 20:17 नवीन
या लेखाच्या लेखकाची भावना समजली. कोसला मीसुद्धा वाचली. ती वाचण्या आधी त्याबद्दल बरेच लेख आणि उल्लेख वाचले होते. मलाही उत्सुकता होती. नोकरी लागल्यावर आपल्या पैशाने बरीच पुस्तके खरेदी केली त्यातले हे एक. अपेक्षा भंग. काही प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे तसे अनोखी शैली मला आवडली. पण निव्वळ शैलीच्या आणि वाक्यांच्या बळावर अक्खे पुस्तक ताणण्याचा प्रयत्न केला आहे. मला तरी असे वाटते त्या काळात हि शैली मराठी वाचकांना अचानक समोर आल्यामुळे आवडली असावी. पण आता इतक्या वर्षांनी मला केवळ शैलीमुळे पुस्तकाला इतके महत्व द्यावे वाटत नाही. पण तरी लोकांना आवडतेच. आपली आपली आवड शेवटी. काही कलात्मक म्हणून शिक्का बसलेल्या पुस्तकात, चित्रपटात लोक उगाच काय काय शोधून काढतात. कोसला बद्दलच म्हणून नाही पण काही समीक्षक कधी कलाकाराला सुद्धा माहित नसतील असल्या गोष्टी कलाकृतीत बघतात. काही तरी बघायचाच म्हटला कि काही न काही दिसतच. आपल्यावर काही सक्ती नाही त्यामुळे जाऊ द्या. तो आपल्या चहाचा कप नाही.
  • Log in or register to post comments

कोसला फार पुर्वी वाचली होती....

मुक्त विहारि
Mon, 06/13/2016 - 22:04 नवीन
आता तर फार काही आठवत पण नाही. आता परत एकदा वाचून मग प्रतिसाद देतो.
  • Log in or register to post comments

कोसला

बोका-ए-आझम
Mon, 06/13/2016 - 23:12 नवीन
पहिल्यांदा वाचली होती तेव्हा आवडली होती. अर्थात झपाटून जाणं वगैरे उदाहरणार्थ फालतू प्रकार झाले नव्हते. मुळात मला नेमाडे हेच overrated वाटतात. ते योग्य वेळी जन्माला आले एवढंच काय ते. बाकी त्यांचं कर्तृत्व काही खास नाही. त्यांचा काळ हा तसाही मूर्तिभंजनाचा आणि जे जे काही सुंदर ते बूर्झ्वा आणि कुचकामी अशी लेबलं लावायचा काळ होता. त्यामुळे त्यांनी जे लिहिलं ते खपून गेलं. पुढे प्रस्थापितांना शिव्या घालणाऱ्या नेमाड्यांनी प्रस्थापितांसाठी असलेला ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारला तेव्हा जरा मजा वाटली होती. असो.
  • Log in or register to post comments

मुळात मला नेमाडे हेच

सानिकास्वप्निल
Tue, 06/14/2016 - 07:44 नवीन
मुळात मला नेमाडे हेच overrated वाटतात
अगदी अगदी. बाकी कोसला फार काही आवडली नाहीच, त्यामुळे हिंदू वगैरे वाचण्याच्या भानगडीत पडलेच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सहमत

समीरसूर
Tue, 06/14/2016 - 16:54 नवीन
सहमत. नेमाडे किमान २००% ओवररेटेड आहेत यात शंकाच नाही. त्यांना "ज्ञानपीठ" मिळाल्याचं खरंच आश्चर्य वाटलं होतं. त्यांची विधानं, विचार करण्याची पद्धत यावरून हा एक थोर आणि प्रगल्भ विचार असलेला लेखक आहे असं वाटतच नाही. आणि म्हणून मेनस्ट्रीम साहित्याजागतात या माणसाला कधी जास्त भाव मिळाला नाही. खानदेशात साधा कुठे सत्कार झाल्याचं ऐकीवात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

पुरस्कार कसे मिळतात हे ठाऊक

अप्पा जोगळेकर
Wed, 06/15/2016 - 11:45 नवीन
पुरस्कार कसे मिळतात हे ठाऊक आहे ना साहेब. सैफ अली खानला पद्म पुरस्कार मिळू शकतात तर ह्यात काय एवढे. उगाच पु. लं चा 'तो' आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

हम्म वाचायची राहून गेलीये. पण

रातराणी
Mon, 06/13/2016 - 23:23 नवीन
हम्म वाचायची राहून गेलीये. पण आता इच्छाही नाही राहिली.
  • Log in or register to post comments

...

आनंद कांबीकर
Tue, 06/14/2016 - 00:15 नवीन
वाचक "कोसला"शी कुठल्या पातळीवर आणि कसा जोडला जातो यावरदेखील "कोसला" आवडणं किंवा न आवडणं अवलंबून आहे. 'उदाहरणार्थ'
  • Log in or register to post comments

पण हे कोणत्याही कलाकृतीबाबत

आदूबाळ
Tue, 06/14/2016 - 01:39 नवीन
पण हे कोणत्याही कलाकृतीबाबत खरं आहे ना? वरच्या वाक्यात कोसलाऐवजी शनिमहात्म्य घातलं तरी ते वाक्य तितकंच अर्थपूर्ण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद कांबीकर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा