✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ऊब [लघुकथा]

ज
जव्हेरगंज यांनी
Sun, 06/12/2016 - 17:45  ·  लेख
लेख
अंधार भीषण पसरला होता. भयाण वारा सुटला होता. उंच उंच माडी अन बाहेर मी उभा मी दारावर टकटक केले. मंद दिवा जळत होता. त्याचा प्रकाश फटीतून बाहेर पडत होता. मी वाट बघितली. कुंपनाजवळून जात खिडकीखाली उभा राहिलो. टाचा उंचावून आत बघितलं. काहीच हालचाल नाही. मग पायरीवर बसून राहिलो. एक विडी शिलगावली. पुन्हा एकदा धुळीची वर्तुळं. मी उठून पुन्हा टकटक केलं. यावेळी जरा भीतीच वाटली. मग उभा राहिलो तसाच. बोचऱ्या थंडीनं अंगावर शिरशिरी आली. पाऊस पडणार आज. दार अजूनही बंदच. आता काय? टपोरे थेंब कोसळत राहिले. गढूळ पाण्याचे झरे खळाळू लागले. माडीभोवती तळं साचलं. अंग चोरुन मी पायरीवर निजलो. अगदी दरवाज्याला खेटून. पाऊस केसात ओघळला. पांघरुनात झिरपला. मग चपलेत जाऊन विरघळला. जगणं चिंबाट झालं. आजही. मी पुन्हा उठून टकटक करायच्या आतच दरवाजा करकरत उघडला. "थोडीशी ऊब मिळंल काय?" निथळता पाऊस घेऊन मी घरात गेलो. "तिकडे" तिनं हात दाखवून बसायची खूण केली. एक उबदार टॉवेल दिला केस कोरडे करायला. "पाणी" मी मागितलं. हुडहूडी भरली होती. तिनं धडाडून चुलकांड पेटवलं. दया आली असावी माझी. हात शेकल्यावर बरं वाटलं. गिचगिच कपडे काढून टाकले एकदाचे, अन लवंडलो भुईवर चुलीच्या धगीत. निखारे जळत राहिले. अंधार भीषण पसरला. मध्यरात्री तिनं एक गोणपाट आणून दिलं. अन पेटवून दिलं चुलकांड पुन्हा एकदा. ऊब मला भेटत राहिली रात्रभर. पाऊस ओसरला होता. सकाळचं तापट उन अंगावर आलं. मग उठून बसलो पायरीवर. विडी शिलगावली. अन अचानक मागचा दरवाजा आठवला. मी उठून टकटक केलं. दरवाजा बंदच होता. मग चिखलातून पाय काढत मी त्या बंगल्याच्या बाहेर पडलो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
4677 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

वर्णन फार सुंदर करता तुम्ही!!

बोलघेवडा
Sun, 06/12/2016 - 18:59 नवीन
वर्णन फार सुंदर करता तुम्ही!! पण शेवटी टोटल काही लागत नाही ब्वा !!!
  • Log in or register to post comments

यात सर्व काही आल

पीशिम्पी
Mon, 06/13/2016 - 22:01 नवीन
यात सर्व काही आल >> पाऊस ओसरला होता. सकाळचं तापट उन अंगावर आलं. मग उठून बसलो पायरीवर. विडी शिलगावली. अन अचानक मागचा दरवाजा आठवला. मी उठून टकटक केलं. दरवाजा बंदच होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोलघेवडा

कल्पनेने उब निर्माण करण्याची

प्रचेतस
Sun, 06/12/2016 - 19:10 नवीन
कल्पनेने उब निर्माण करण्याची कल्पना आवडली. :)
  • Log in or register to post comments

कल्पना आवडली. बिरबलाच्या

किसन शिंदे
Sun, 06/12/2016 - 20:37 नवीन
कल्पना आवडली. बिरबलाच्या खिचडीची गोष्ट आठवली.
  • Log in or register to post comments

काहीही बरं आठवतं?

स्पा
Mon, 06/13/2016 - 22:24 नवीन
काहीही बरं आठवतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

सर, तुम्ही जर ती गोष्ट

किसन शिंदे
Mon, 06/13/2016 - 22:31 नवीन
सर, तुम्ही जर ती गोष्ट लक्षपूर्वक वाचली असेल तर कल्पनेतली उब हा त्या कथेचाही मुख्य गाभा होता हे नक्कीच समजेल. आणि गोष्ट वाचलीच नसेल तर जाऊद्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

छानच!

रातराणी
Mon, 06/13/2016 - 13:46 नवीन
छानच!
  • Log in or register to post comments

मस्तं!

पद्मावति
Mon, 06/13/2016 - 14:04 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments

सटीक

नाखु
Mon, 06/13/2016 - 15:57 नवीन
उब (दारा)तली कथा ! नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments

मस्त , मनी वसे ते स्वप्नी

कविता१९७८
Mon, 06/13/2016 - 16:05 नवीन
मस्त , मनी वसे ते स्वप्नी दिसे
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिलंय...

निखिल निरगुडे
गुरुवार, 07/14/2016 - 03:10 नवीन
सुरेख लिहिलंय...
  • Log in or register to post comments

खल्लास म्हणजे खल्लासचं लिहिता

चिनार
गुरुवार, 07/14/2016 - 13:54 नवीन
खल्लास म्हणजे खल्लासचं लिहिता तुम्ही जव्हेरभौ !!
  • Log in or register to post comments

जबरदस्त जव्हेरभौ!

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/14/2016 - 13:59 नवीन
मस्तच आहे कथा! अशा अमूर्त कथा या तुमच्या कथा वाचून आवडायला लागल्या.
  • Log in or register to post comments

थोडक्यात बरंच काही सांगणारया

अंतरा आनंद
गुरुवार, 07/14/2016 - 14:38 नवीन
थोडक्यात बरंच काही सांगणारया तुमच्या कथा नेहमीच आवडतात. ही सुद्धा आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा