ऊब [लघुकथा]
अंधार भीषण पसरला होता. भयाण वारा सुटला होता.
उंच उंच माडी
अन बाहेर मी उभा
मी दारावर टकटक केले. मंद दिवा जळत होता. त्याचा प्रकाश फटीतून बाहेर पडत होता. मी वाट बघितली.
कुंपनाजवळून जात खिडकीखाली उभा राहिलो. टाचा उंचावून आत बघितलं. काहीच हालचाल नाही.
मग पायरीवर बसून राहिलो. एक विडी शिलगावली. पुन्हा एकदा धुळीची वर्तुळं.
मी उठून पुन्हा टकटक केलं. यावेळी जरा भीतीच वाटली. मग उभा राहिलो तसाच. बोचऱ्या थंडीनं अंगावर शिरशिरी आली. पाऊस पडणार आज.
दार अजूनही बंदच. आता काय?
टपोरे थेंब कोसळत राहिले. गढूळ पाण्याचे झरे खळाळू लागले. माडीभोवती तळं साचलं. अंग चोरुन मी पायरीवर निजलो. अगदी दरवाज्याला खेटून. पाऊस केसात ओघळला. पांघरुनात झिरपला. मग चपलेत जाऊन विरघळला. जगणं चिंबाट झालं. आजही.
मी पुन्हा उठून टकटक करायच्या आतच दरवाजा करकरत उघडला.
"थोडीशी ऊब मिळंल काय?"
निथळता पाऊस घेऊन मी घरात गेलो.
"तिकडे" तिनं हात दाखवून बसायची खूण केली.
एक उबदार टॉवेल दिला केस कोरडे करायला.
"पाणी" मी मागितलं.
हुडहूडी भरली होती. तिनं धडाडून चुलकांड पेटवलं. दया आली असावी माझी. हात शेकल्यावर बरं वाटलं.
गिचगिच कपडे काढून टाकले एकदाचे, अन लवंडलो भुईवर चुलीच्या धगीत. निखारे जळत राहिले. अंधार भीषण पसरला.
मध्यरात्री तिनं एक गोणपाट आणून दिलं. अन पेटवून दिलं चुलकांड पुन्हा एकदा. ऊब मला भेटत राहिली रात्रभर.
पाऊस ओसरला होता. सकाळचं तापट उन अंगावर आलं. मग उठून बसलो पायरीवर. विडी शिलगावली. अन अचानक मागचा दरवाजा आठवला. मी उठून टकटक केलं. दरवाजा बंदच होता. मग चिखलातून पाय काढत मी त्या बंगल्याच्या बाहेर पडलो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वर्णन फार सुंदर करता तुम्ही!!
यात सर्व काही आल
कल्पनेने उब निर्माण करण्याची
कल्पना आवडली. बिरबलाच्या
काहीही बरं आठवतं?
सर, तुम्ही जर ती गोष्ट
छानच!
मस्तं!
सटीक
मस्त , मनी वसे ते स्वप्नी
सुरेख लिहिलंय...
खल्लास म्हणजे खल्लासचं लिहिता
जबरदस्त जव्हेरभौ!
थोडक्यात बरंच काही सांगणारया