'चार नगरांतले माझे विश्व' - जयंत विष्णु नारळीकर
(मी कधी कोणत्या पुस्तकाचे समीक्षण लिहिले नाही आहे. हा पहिलाच प्रयत्न आहे. आजच हे पुस्तक वाचून संपवले. ते मला खूप भावले आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावेसे वाटले, म्हणुन लिहायचा प्रयत्न करतेय. पुस्तकाचा आवाका प्रचंड आहे. मी मला जितकं झेपेल तितकंच लिहू शकेन. बघा जमलंय का?)
एखादे पुस्तक एकदा वाचले की पुरेसे ठरते तर एखादे पुस्तक पुन्हा एकदा अभ्यासपूर्वक वाचावेसे वाटते.
जयंत विष्णु नारळीकर यांचे आत्मचरित्र 'चार नगरांतले माझे विश्व' हे एकदा वाचून पुरेसे ठरत नाही. ह्या पुस्तकासाठी त्यांना २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. हे ५३३ पानांचे जाडजूड पुस्तक लेखकाचे जीवन आपल्यापुढे उलगडून ठेवते. बरं! लेखक तरी कोण? जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ! त्यामुळे ह्या आत्मकथनाचा गाभा प्रामुख्याने त्यांचे वैज्ञानिक संशोधन आहे. घरगुती प्रसंगाचा उल्लेख कालानुरूप व प्रसंगानुरूप जितका यावयास हवा तितका येतो. त्यांचा जीवन प्रवास ज्या चार नगरांतून झाला ती नगरे म्हणजे बनारस, केम्ब्रिज, मुंबई आणि पुणे. पुस्तक ह्या चार भागात विभागले आहे पण अखंडित आहे.
जयंत विष्णु नारळीकर - जन्म १९ जुलै १९३८
मूळचे ते कोल्हापूरचे. एका सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित, मध्यमवर्गीय अशा घरात त्यांचा जन्म झाला. ते वडिलांना तात्यासाहेब म्हणत तर आईला ताई म्हणत. तात्यासाहेब स्वत: केम्ब्रिज मधून रँगलरची पदवी धारण केलेले आणि बनारस विद्यापीठात गणित शिकवत असत. त्यामुळे नारळीकरांची सुरवातीची वर्षे बनारस येथे गेली. ताई संस्कृतच्या एम. ए. होत्या. तात्यासाहेबांचे संस्कृतही उत्तम. त्यामुळे मुलावर संस्कृत श्लोक पठण, स्पष्ट शब्दोच्चार यांचे संस्कार लहानपणी अगदी सहज झाले. पहिला भाग वाचताना वयाने लहान पण बुद्धीने महान अशा लेखकाची ओळख होते. त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील एकेक स्कॉलर पाहून अचंबित व्हायला होते. आणखी एका गोष्टीचे कौतुक वाटते ते म्हणजे शालेय शिक्षण हिंदीतून, उच्चशिक्षण इंग्रजीतून पण आत्मकथन मात्र मराठीतून. त्यांचे मातृभाषेविषयिचे प्रेमच ह्यातून दिसून येते.
मग प्रवास सुरु होतो केम्ब्रिजचा. ह्यात त्यांची शिष्यवृती, बोटीचा प्रवास, सुरवातीचे दिवस जसे आहेत तसेच तिथे रुळतानाचे, तिथे फिरातांनाचे आलेले अनुभवही आहेत. केम्ब्रीजमधील वास्तव्यात त्यांचे दोनाचे चार हात झाले. त्यांची पत्नी मंगला गणित विषयातील मुबई विद्यापीठाची चँसलर सुवर्णपदकाची मानकरी! लग्नाच्या वेळी टी. आय. एफ. आर. येथे त्या संशोधन करीत होत्या. लग्नानंतर त्याही केम्ब्रिजला गेल्या. त्याही आठवणी आहेत. शिवाय मुख्य भर हा त्यांच्या संशोधनावर असल्यामुळे हा भाग मोठा आहे. त्यांचे गाईड आणि मित्र फ्रेड हॉएल अगदी शेवटच्या भागापर्यंत सोबत करतात. त्यांच्या शेजारच्या खोलीत राहणाऱ्या साहित्यिक एडवर्ड फॉस्टर यांच्या आठवणी देखील रंजक आहेत. केम्ब्रिजला असताना ताई आणि तात्यासाहेब यांना ते कायम सविस्तर पत्रे लिहित. त्या पत्रांच्या आधारे ह्या आठवणी ठळकपणे जाग्या करता आल्या असा ओझरता उल्लेखही ते करतात. त्यांचा विनम्रपणा संपूर्ण कथनात पदोपदी जाणवतो. आणि आपला आदर दुणावत जातो.
तिसरा भाग म्हणजे केम्ब्रिज सोडून मुंबईला स्थायिक झाल्यावरचा प्रवास. टी. आय. एफ. आर येथील संशोधन, जबाबदारीची पदे, वाढलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचे सविस्तर वर्णन ह्यात वाचावयास मिळते. टी. आय. एफ. आर. मधली वर्षं ते 'मध्य पर्व' म्हणून उल्लेखतात. मुंबईत आल्यावर त्याना ताई तात्यासाहेब यांच्यासमावेत रहायला मिळाले हाही आनंदाचा भाग होताच.
चौथा भाग हा प्रामुख्याने आयुका मधील वास्तव्याचा आहे. आयुकाचे प्रमुख म्हणून ते आले आणि पंधरा वर्ष ती जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडून वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त झाले. आयुकाचे बस्तान बसवतानाचे अनुभव वाचण्यासारखे आहेत. आयुकाचे वर्णन तर अहाहा! ते वाचून कधी आयुकाला भेट देईन असे झालेय मला. (जागतिक विज्ञान दिवशी सामान्य नागरिक आयुकला भेट देऊ शकतात ही माहिती त्यांनीच दिली.) ह्या भागातील शेवटचे प्रकरण म्हणजे 'मागे वळून पाहताना'. आपण आयुष्याच्या विविध टप्प्यांवर मागे वळून पाहत असतो. काय मिळवलं, काय गमावलं, काय हुकल ह्याचा हिशोब मांडत असतो. पण इथे त्याव्यतिरिक्त त्यानी कृतज्ञता आणि काही जनतेच्या मनातील महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. त्या उत्तरांमधून त्यांची मते सुस्पष्ट होतात. मातृभाषेतून शालेय शिक्षण घेणे असो किवा बुवाबाजी असो ते ठामपणे आपले मत मांडतात. आपले मतही तसे असेल तर वाचताना एक वेगळाच आनद मिळतो.
त्यांचा हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. मन भरत नाही आणि आपण परत एकदा तो प्रवास त्यांच्यासोबत अनुभवायचे ठरवूनच पुस्तक मिटतो. (निदान मी तरी ह्या विचाराने मिटले आहे.)
पुस्तकाची माडणी आणि बांधणी उत्कृष्ट! मधोमध अनेक छायाचित्रे आहेत. प्रस्तावना व मनोगत दिले नाही आहे पण काही बिघडत नाही. शेवटचे प्रकरण मनोगतच वाटते.
काही खटकलेच असेल तर ते म्हणजे संशोधनविषयी लिहिताना कंसात इंग्रजी प्रचलित शब्द द्यावयास हवे होते. काही ठिकाणी समजण्यास सोप्पे पडले असते. अतिशुद्ध मराठीत लिहिले आहे. पण हे खटकणे म्हणजे पुस्तकाला दृष्ट लागू नये म्हणून लावलेली तीट समजायला हरकत नाही.
पुस्तक वाचून पहाच तुम्ही. नक्की आवडेल!
- उल्का कडले
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
सुंदर परीक्षण. लवकरच पुस्तक
नारळीकर अत्यंत आवडते
'आकाशाशी जडले नाते' लहानपणीच
सुंदर ओळख.
धन्यवाद
सर्वांना धन्यवाद!
हे परिक्षण आवडले. शाळेपासूनच
ह्या पुस्तकाबरोबर
सुंदर पुस्तकओळख !
Great!
मनमोहक ओळख
सर्वान्चे आभार!
छान
मस्त ओळख करून दिलियेत
वाचलेले आहे
घेईन हे पुस्तक. धन्यवाद.
छान अभिप्राय .....
सर्वाना धन्यवाद!
ह्या साध्या माणसाला सुदैवाने मी दररोज भेटतो.
छान ओळख
रँग्लर
@ हर्षद - खूप छान किस्सा
मस्त ओळख. धन्यवाद. आता हे