Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by समीरसूर on गुरुवार, 06/02/2016 - 15:30
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
तुम्हाला होतं का कधी असं? भूतबाधा व्हावी तशी गीतबाधा होते मला. एखादं गाणं कचकचून चावतं आणि त्याची बाधा होते. मग ते गाणं मला बरेच दिवस सोडत नाही. कित्येक दिवस मी फक्त तेच गाणं ऐकतो, म्हणतो, ओरडतो, कोकलतो, पुटपुटतो. शेवटी बायको वैतागून ते गाणं बंद करायला सांगते. तरी ते गाणं मला सोडत नाही. संपूर्ण गाणं त्यातल्या संगीताच्या एक-एक तुकड्यासकट तोंडपाठ झाल्याशिवाय मीदेखील त्या गाण्याला सोडत नाही. आधी गाणं मला बाधतं, मग मी गाण्याला बाधतो. एका वेळेस १५-२० वेळा आणि असं किमान ८ ते १० वेळा मी ते गाणं ऐकतो. फारसं चांगलं गाणं येत नसलं तरी मनाचं समाधान होईल इतपत सुरात ते गाणं नरड्यातून येईपर्यंत ते गाणं मी ऐकतो आणि म्हणतो. मग अचानक दुसरं गाणं उगवतं. म्हणून मी आधीच्या गाण्याला वाऱ्यावर सोडत नाही. ते माझ्या मनाच्या एका सुरक्षित कुपीत अलगद ठेवून देतो. अशा प्रत्येक गाण्यासाठी मी एक-एक खास कुपी मनात तयार करून घेत असतो. या कुपीला कुलुप-किल्ल्या नसतात. उघड्याच असतात या कुप्या. एखाद्या कुपीनुरूप माहौल बाहेरच्या जगात तयार झाला की मग त्या विशिष्ट कुपीतून आराम करत असलेलं गाणं सुगंध पसरावा तसं बाहेर पडतं. क्वचित ओठांवरही येतं आणि आसमंत आणि पुन्हा एकदा माझं मन भिजवून जातं. या मनातल्या कुपीची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. गाण्याच्या चालीच्या भिंती असतात. गायक-गायिकांच्या आवाजांचे छप्पर असते. आशयाचे सुंदर रंग असतात. आणि गाण्याच्या मला भिडलेल्या भावाचे, भूतकाळातील आठवणींशी नातं सांगू पाहणाऱ्या किंवा सांगणाऱ्या रेशीमधाग्यांचे सुगंधी पडदे असतात. कधी गाणं बाहेर पडलं तर हा सगळा लवाजमा बाहेर घेऊनच पडतं. आणि हो, या गीतबाधेला गाण्यांचं कुठलंच बंधन नसतं. फक्त रफीची किंवा सज्जाद हुसेनची किंवा वसंतरावांची किंवा सुधीर फडक्यांची किंवा फक्त अशी क्लासिक वगैरे गाणीच मला बाधतात असे अजिबात नाही. किंबहुना जास्त संख्या साध्या गाण्यांचीच आहे कारण खूप जास्त क्लासिकल मला फारसं झेपत नाही. त्यामुळे बेगम अख्तरचं "वो जो हममे तुममे करार था..." एका कुपीत असेल तर त्याच्या लगतच्या कुपीत "तेरे बदन में तुंफा उठा तो साडी हवा हो गयी" हे 'मवाली'चं तडका गाणंदेखील असू शकतं. कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही. हा सिलसिला कधी सुरु झाला आठवत नाही पण खूप वर्षे झाली हे नक्की. "सलाम-ए-इश्क मेरी जां जरा कबूल कर लो..." हे बहुधा माझ्या आठवणीतलं पहिलं चावलेलं गाणं. अमिताभ किशोरच्या आवाजात "हां.......इसके आगे की अब दासता मुझसे सुन, सुनके तेरी नजर डबडबा जायेगी..." असं गायला सुरुवात करतो आणि अजूनही रोमांच उभे राहते. अमिताभ, किशोर, आणि लाजवाब चाल! दिल में छेद कर दिया इस गाने ने! अजूनही "हां..." करून भ्रष्ट नक्कल करायचा प्रयत्न करतो पण साला अपनी औकात धोखा दे जाती हैं. तर इतक्या लहानपणापासून हे गाण्यांचं गारुड चकित करत आलंय. त्यानंतर असा गानदंश कित्येकवेळा झाला पण लहानपणीचे असे बरेच दंश कालौघात बरे झाले. लहानपणी 'पाताल भैरवी'मधले "चुम्मा चुम्मा चुम्मा चुम्मा, मुझको बना ले प्रियतम्मा..." हे डिंपलवर चित्रीत झालेलं गाणंदेखील थोडं चावण्याच्या मूडमध्ये आलं होतं. त्यात डिंपलच्या मादक नृत्याचा जास्त भाग होता हे वेगळं सांगायची गरज नाही. हे गाणं लगेच उतरलं. 'सल्तनत'मधलं "नजर ने नजर से क्या कहा, मेरी जां मेरी जां ये बाता..." हे गाणं त्याकाळी आवडलं आणि नंतर कित्येक वर्षे गायब झालं. हे गाणं मी मागच्या वर्षी खणून काढलं आणि खूप वेळा ऐकलं. बरं वाटलं. पण बाधलं नाही. 'शक्ति'मधलं "जाने कैसे कब कहां इकरार हो गया...." हे मात्र लहानपणापासूनच बाधलं. त्याकाळी इतकं ऐकता आलं नाही; त्याची कसर नंतर भरून काढली. अप्रतिम चाल! स्लो मोशनमध्ये अमिताभ स्मिताला उचलतो त्यावेळेस जो अफलातून तुकडा वाजतो, तो अट्टल रोमांटिक! नंतर केव्हातरी 'मंजिल मंजिल'मधलं "हे बाबा हे बाबा मिलते है एक दिन हे बाबा, रे बाबा रे बाबा मर गये तुम बिन रे बाबा...." हे गाणं ऐकलं. वेगळीच चाल बांधली होती आरडीने. आणि आशाबाईंनी काय नखरेल आवाजात गायलं होतं, वा! आणि मधले मधले झिंगालाला तुकडे...मजा आ गया. पाठ करून टाकलं. अजूनही पाठ आहे बहुतेक. अशी बरीच गाणी पाठ झाली. बरीच जुनी गाणी मी गेल्या १०-१२ वर्षात उकरून काढली. जवळपास १३-१४ वर्षांपूर्वी 'बसेरा'मधलं "जहां पे सवेरा हो, बसेरा वहीं हैं..." हे गाणं अवचित ऐकायला मिळालं. नंतर शक्य झालं तेव्हा अनेकदा ऐकलं. दिदींचा अशक्य वर जाणारा आवाज, मखमली काव्य, आणि आरडीची कुरतडणारी, मनाला हुरहूर लावणारी चाल. गाणं ऐकतंच रहवासं वाटतं. त्याच्या काही वर्षे आधी 'उंबरठा'मधल्या "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या..." ने भुरळ घातली. साधारण २०००-२००१-२००२ मध्ये मित्रांसोबत "सुन्या सुन्या"चा आग्रह व्हायचा आणि २-३ वेळा गाऊन झालं की पोरं खुश व्ह्यायची. आता दोन-तीन महिन्यांपूर्वी मुळशीच्या एका रिसोर्टवर गेलो होतो. सगळे जुने दोस्त! जीवाभावाचे! परत 'सुन्या सुन्या' झालं. मन एकदम १४-१५ वर्षे मागे गेलं. अगदी तेव्हा जेव्हा सगळं सुनं सुनंच होतं. नकळत मन हळवं झालं. त्याच सुमारास गुलाम अलीचं "चमकते चांद को टुटा हुआ तारा बना डाला..." ऐकलं. त्याकाळातल्या माझ्या परिस्थितीशी इतकं सुसंगत गाणं तोपर्यंत मी ऐकलं नव्हतं. नोकरी नाही. आणि नोकरी नाही म्हणून सगळीकडून झेलावा लागणारा तिरस्कार, ती अगतिकता, काय करायचं हे काळंकुट्ट प्रश्नचिन्ह..."चमकते" हृदयात रुतून बसलं. अगदी तोंडपाठ झालं. मग "मी कात टाकली" ने झपाटलं. हृदयनाथांची अप्रतिम चाल आणि दिदींचा किंचित आक्रमक तरी हताश स्वर! जादू आहे हे गाणं. नंतर गुलाम अलीने झपाटलं. "आवारगी", "चुपके चुपके", "वो कोई और न था...", "कैसी चली है अब के हवा…", "हंगामा है क्यू बरपा…"...खूप गजला. अक्षरश: शंभर-शंभर वेळा ऐकून तोंडपाठ झाल्या. अगदी सगळ्या संगीतासहित! गुलाम अलीच्या गजलांमधला मधाळपणा खूप आवडला. नंतर मित्रांसोबत कित्येक वेळा या गजला गायल्या. मित्रदेखील खुशफ़हम आणि खुशमिजाज! त्यांनी ऐकल्या, पुन्हा पुन्हा ऐकल्या, अजूनदेखील ऐकतात आणि मग गातांना आणखी मजा येते. मागे रिसोर्टला गेलो होतो. पहाटे ३ पर्यंत गाणी चालली होती. खडकवासल्याचे गडद पाणी आणि त्याशेजारी आम्ही बसलो होतो. एकामागून एक गजल बाहेर येत होती. माहौल रंगीन होत होता. "वो तेरा कोठे पे नंगे पाव आना याद हैं". कुणी कधीच असं आलं नाही पण आलं असतं तर जिंदगी ने और क्या क्या हसीन गुल खिलाये होते या विचारात आम्ही पहाट जागवली. नंतर "बिखरती झुल्फ की, परछाईयां मुझे दे दो, तुम अपनी शाम की तनहाईयां मुझे दे दो..." झालं. अशा वेड लावून जाणाऱ्या झुल्फांची आठवण जागवून झाली. प्रत्येकाच्या आठवणीत अशी झुल्फे मुबलक होती. काही महिन्यांपूर्वी "कोई नही हैं कही, सपनों में क्यू खो गयी" ऐकलं. खूप वर्षांनंतर ऐकलं. नंतर सलग ८-१० दिवस मग हेच गाणं ऐकलं. भूपेंद्र सिंगचा आवाज काय लागलाय म्हणून सांगू! हेमा अंध असते आणि स्टेजवर नाचते. जितेंद्र बाजूला उभं राहून तिला या गाण्यातून सांगतो "कुणीच नाहीये सोबतीला, सगळ्यांचा असे मार्ग एकला". अडचणीत असतांना मार्ग बंद होतात. काय करावं कळत नाही. मार्ग सापडत नाही. कुणीच काही मदत करू शकत नाही. तरीही धीर ठेवावा लागतो; मार्ग आपला आपणच शोधावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये हे गाणं चपखल बसतं. हे गाणं ऐकतांना अशी काही आठवण आली तर डोळ्यात टचकन पाणी आल्यावाचून राहत नाही. त्यानंतर 'गुंडे' मधलं "तुने मारी एंट्री" जाम आवडलं. काय बीट्स! सुरेख चाल आणि नीती मोहनचा खटकेबाज आवाज. सकाळी चालतांना हे गाणं भारी वाटतं. तालात आणि वेगात पाऊले पडतात. शब्द मात्र आजकाल वळसेदार, गेय नसतात त्यामुळे ह्या गाण्याचे शब्द सहजासहजी ओठांवर येत नाहीत. अशाच पठडीतलं प्रियांकावरच चित्रीत झालेलं 'शूटआऊट एट वडाळा' मधलं "बबली बदमाश हैं" आहे. एकदम झकास गाणं. सुनिधीचा झोकदार आवाज आहे. हे पण चालतांना ऐकण्याचं गाणं. "युं तो प्रेमी पचत्तर हमारे" (एजंट विनोद), "तम्मा तम्मा लोगे" (थानेदार), "आज रपट जाये तो" (नमक हलाल) ही गाणी अशीच धमाल! मला विशेष आवडतं 'तेजाब'मधलं अलकाच्या आवाजातलं "एक दो तीन". काय ओर्केस्ट्रा आहे! मधले काही काही तुकडे तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेउन जातात. एकदा अगदी फोकस करून ऐका हे गाणं. बडी गंमत हैं उस गाने में. मागे थायलंड्च्या सहलीला गेलो होतो. अर्थातच, बायको होती सोबत. ('त्या' प्रकारचा मसाज घेतला नाही हे आधीच सांगून ठेवतो.) आमच्या गटात एक सुरेख मुलगी होती. सहलीमध्ये असं कुणी असलं की सहलीची मजा चौपट होते हा माझा अनुभव! हर पल हवा में एक अलग सी खुशहाली रहती हैं. काय सुंदर गाणं गायची. तिने 'फेशन' सिनेमातलं "कुछ खास हैं, कुछ बात हैं..." म्हटलं. निव्वळ अप्रतिम! मग ते गाणं शोधून काढणं आलंच. खूप वेळा ऐकलं पण प्रोब्लेम तोच, शब्दांच्या नावाने बोंब! पण गाणं ऐकलं मात्र खूप वेळा. नंतर अहमद हुसेन - मोहमद हुसेन या बंधूंचं "मैं हवा हूं कहां वतन मेरा, दश्त मेरा ना ये चमन मेरा" असंच १०-१२ दिवस ऐकलं. अजूनही मन सैरभैर झालं की हे गाणं ऐकतो. छान वाटतं. मग बेगम अख्तर यांचं "वो जो हममे तुममे करार था, तुम्हे याद हो के ना याद हो"वर काही दिवस जगलो. मदहोश करणारे सूर! कधी काळी "सो गया ये जहां, सो गया रासता.." (तेजाब), "सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं" (कुली), "जब हम जवां होंगे, जाने कहां होंगे" (बेताब) अशा गाण्यांनीदेखील वेड लावलं होतं. अशी बरीच गाणी अजूनही बऱ्यापैकी पाठ आहेत. मित्रांच्या आग्रहास्तव शब्बीर कुमार आणि मोहम्मद अझीझ या महान गायकांच्या रेचक गायनवैशिष्ट्यांची आठवण जागवण्यासाठी या गाण्यांचीदेखील फर्माईश होते आणि ही गाणी गायलादेखील तितकीच मजा येते. नुकतंच मेहदी हसन यांचं "रंजीशही सही, दिल ही दुखाने के लिये आ..." संपवलंय. हे ही रात्रीचं गाणं. रात्र अधिक तरुण करणारं गाणं. काय शायरी आहे! दिल ना दुखा दे तो जाने! सध्या 'सनम रे' चित्रपटातलं अरिजित सिंगच्या आवाजातलं "भीगी भीगी सडकों पे मैं तेरा इंतजार करू, धीरे धीरे दिल की जमीं को तेरे ही नाम करूं, खुद को यूं खो दू के फिर ना कभी पाऊं, होले होले जिंदगी को मैं तेरे हवाले करूं...सनम रे...सनम रे...तू मेरा सनम हुआ रे, करम रे करम रे, तेरा मुझ पे करम हुआ रे...सनम रे..." हे गाणं ऐकतोय. सुंदर चाल आहे. गाणं म्हणजे जरा ट ला फ जोडल्यासारखंच आहे पण चाल धुंद करणारी आहे. गेले ३-४ दिवस रोज सकाळी ८-१० वेळा हे गाणं ऐकतो. अशी अजून बरीच गाणी आहेत. आता पुढचं गाणं कुठलं मला माहिती नाही पण एखादं असणार हे नक्की. एखाद्या मैफिलीत मनाच्या असंख्य कुप्यांमधून एकामागोमाग ही गाणी बाहेर पडतात. माहौल चिंब होऊन जातो.
  • Log in or register to post comments
  • 20446 views

प्रतिक्रिया

Submitted by वेदांत on गुरुवार, 06/02/2016 - 16:03

Permalink

फारच सुंदर लेख. एकदम माझ्या

फारच सुंदर लेख. एकदम माझ्या मनातले बोललात. मैं रहूँ या ना रहूँ तुम मुझ में कहीं बाकी रहना मुझे नींद आये जो आखिरी तुम ख्वाबों में आते हि रहना|| सध्या या गाण्याने वेड लावलय.....
  • Log in or register to post comments

Submitted by mandarbsnl on Sat, 06/04/2016 - 02:07

In reply to फारच सुंदर लेख. एकदम माझ्या by वेदांत

Permalink

मस्तच...☺

अप्रतिम आहेत याचे बोल... अत्यंत सुंदर चाल सुद्धा... माझंही आवडतं गाणं... विडिओ पाहिलाय का गाण्याचा??? सुरेख आहे...पहा जरूर...
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प्रभू on गुरुवार, 06/02/2016 - 16:17

Permalink

राजे....

मी सुद्ध याच प्रकारात मोडतो बर का.......साला एखाद्या गाण्यानं पिच्छा पकडला कि झालं....आम्ही अडकलो ...तिथेच...!!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 06/02/2016 - 16:24

Permalink

सध्या फक्त "खीच्च मेरी फोटो,

सध्या फक्त "खीच्च मेरी फोटो, तू खीच्च मेरी फोटो, पियाआआआ" ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 06/02/2016 - 16:28

Permalink

मस्त लेख

नोकरी नाही. आणि नोकरी नाही म्हणून सगळीकडून झेलावा लागणारा तिरस्कार, ती अगतिकता, काय करायचं हे काळंकुट्ट प्रश्नचिन्ह..."चमकते" हृदयात रुतून बसलं

. माझंही आव्डत गाणं पण नरड (अश्या) गाण्यालायक नसल्याने आम्ही फक्त जहां चार यार, आणि मुकासि गाण्यांपर्यंतच धावू शकतो. मला आवडणारी (काळजात रुतलेली) चार-पाच गाण्यात "नैनोमें बदरा छाये + तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया आणि त्रिशूलमधईल हर तरफ हुस्न है जवानी है त्यातला अमिताभचा भाग ही अग्रभागी आहेतच. मराठीत पिंजरा मधील हे गाव लई न्यार आणि झुंजमधील एक दोन गाणे तोंडपाठ झाली होती अता (रियाज(?) की सराव) नसल्याने म्हणन्याचा चानस कमीच असतो. मस्त लेख, अगदी तब्येतीत लिहिलेला. स्मरणशील नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on गुरुवार, 06/02/2016 - 23:17

In reply to मस्त लेख by नाखु

Permalink

नैनोमे बदरा छाये

हे अशक्य आणि अफाट गाणं आहे. मदनमोहन आणि लता हे त्यात पूर्ण सुटलेले आहेत असं माझं मत आहे. असंच अजून एक म्हणजे - जहांआरा मधलं वो चुप रहे तो मेरे दिल के धागा जलते है आणि अनुपमा मधलं कुछ दिल ने कहा. त्यात ऐसी भी बाते होती है हे फक्त लताच्याच आवाजात ऐकू शकतो. तसंच बहारों के सपने मधलं - क्या जानूं सजन. ही बाप, आई वगैरे काय म्हणाल ती गाणी आहेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 06/02/2016 - 23:55

In reply to नैनोमे बदरा छाये by बोका-ए-आझम

Permalink

बोकेशा, तुमच्यामुळे क्या जानू

बोकेशा, तुमच्यामुळे क्या जानू सजन पहिल्यांदा शोधून पाह्यलं, मला तेच गाणे दिलविल प्यारव्यार मुळे माहीत. राजेश खन्ना काय हँडसम होता राव. लता अर्थात निर्विवाद दैवी आवाज. थोडा कोरस ने रसभंग वाटला पण मला आवडले प्रचंड. नवीन गाणे चित्रा कि कविताच्या आवाजातले पण आवडते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 06/02/2016 - 23:57

In reply to बोकेशा, तुमच्यामुळे क्या जानू by अभ्या..

Permalink

असेच लताचे हसते जख्म मधील

असेच लताचे हसते जख्म मधील बेताब दिल कि तमन्ना पण डोक्यात लै बसलेले गाणे.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री कुलकर्णी on गुरुवार, 06/02/2016 - 17:52

Permalink

सेम पिंच मधे मोह मोह के धागे

सेम पिंच मधे मोह मोह के धागे चावलेल. आता सध्या सजणं दारी ऊभा. ..चा किडा चावलाय.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on गुरुवार, 06/02/2016 - 19:23

Permalink

मी सध्या 'प्रेमऋतू' (मि अँड

मी सध्या 'प्रेमऋतू' (मि अँड मिसेस सदाचारी) आणि सावर रे (मितवा) मध्ये अडकलोय. प्रेमऋतू मधली 'स्पर्शाचा वणवा का शब्दांशी अडला' ही ओळ फारच दिलखेचक वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 06/02/2016 - 19:42

Permalink

सध्या

फक्त याड लागलंय!
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 06/03/2016 - 12:03

In reply to सध्या by तुषार काळभोर

Permalink

बाकी

ही माझ्या लहानपणापासूनची मला याड लावणारी गाणी: (नुसतं रिपीट..रिपीट..रिपीट.......) सगळ्यात आधीचं आठवतंय ते ८०च्या दशकाच्या शेवटची गाणी रामलखनचं एजी ओजी (त्यातलं रमपमपम रमपमपम रमपपपम रमपम :) ) तेजाबचं १-२-३ (अगदी सुरुवातीच्या मोहिनी..मोहिनीच्या गजर पासून) थानेदारचं तम्मा तम्मा (यातला जो वेगवान म्युजिक पीस आहे, तो एका आफ्रिकी गाण्यावरून "प्रेरित" आहे :) बाप्पीदा आहेत ना!) आंखेमधलं (गोविंदा अन् चंकी पांडे) - बडे काम का बंदर जान तेरे नाम मधलं ये आख्खा इंडिया जानता है, हम तुमपे मरता है. शाहीर साबळेंच्या महाराष्ट्राची लोकधारा च्या २-३ कॅसेट्स होत्या. त्यातलं मल्हारी मल्हारी (देवाचं ठाणं जेजूरीला अन दख्खन मुलखाला.. अशी एक ओळ होती त्यात), जेजुरीच्या खंडेराया जागराला या या आलिशा चिनॉयचं मेड इन इंडिया काही काळ दलेर मेहेंदीचं पण वेड होतं (नव्वदीच्या अखेरीच्या वर्षांमध्ये) त्याआधी २-३ वर्षे सोनू निगमचीगाणी (तू... ए बी सी.. दिवाना..) नव्वदीच्या सुरुवातीचं बेवफा सनम (सोनू निगमची पदार्पणाची गाणी) इश्क में हम तुम्हे क्या बताये आणि अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का नव्या शतकात येता येता दिल चाहता है चं तनहाई धडकनचं ना ना करते प्यार मैं तुझसे कर गयी..
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 06/03/2016 - 12:23

In reply to बाकी by तुषार काळभोर

Permalink

मराठी

संत ज्ञानेश्वर-लता मंगेशकर-हृदयनाथ मंगेशकर > >> मोगरा फुलला >> अवचिता परिमळु >> रंगा येई वो शारद सुंदर चंदेरी राती येऊ कशी प्रिया प्रितीचं झुळझुळ पाणी निसर्गराजा ऐक सांगतो (त्यातला मधला एक प्रश्नोत्तराचा तुकडा अजूनपन लई आवडतो) (निसर्गराजा मालिकेच्या ४-५ कॅसेट्स होत्या. त्यातली बहुतेक सगळी गाणी परत परत ऐकून तोंडपाठ होती) जानकी मधली: झुलतो बाई रास झुला आणि विसरू नको श्रीरामा मला एक शिवजन्माच्या पोवाड्याची कॅसेट होती. त्यात सुरुवातीला शाहीर जे काही म्हणत, त्यात आवेश असा असे की ते तल्लीन होऊन ऐकत राहावसं वाटे. अष्टविनायका तुझा महिमा कसा.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on गुरुवार, 06/02/2016 - 23:11

Permalink

अशी बाधा करणारी अनेक गाणी आहेत.

सावर रे उंच उंच झुला हे एक असंच गाणं आहे. त्यात ' मिटले मी माझे डोळे हात हाती दिला ' हे ऐकताना अजूनही अंगावरून शहारा जातोच जातो. आशाबाईंनी ' शारद सुंदर चंदेरी राती' मध्ये आवाजाच्या अशक्य करामती केल्या आहेत. मुकेशच्या आवाजातलं दोस्त दोस्त ना रहा ऐकताना शेवटी ' जिंदगी हमे तेरा ऐतबार ना रहा ' हे ऐकताना अजूनही जीव कातर होतोच. शराबी मधलं मुझे नौलखा मंगा दे रे हे आशा-किशोरचं द्वंद्वगीत पण लय भारी आहे. त्यात किशोर सुरु होतो - किसीपे हुस्न का गुरुर जवानी का नशा आणि मग त्याचा आवाज टिपेला जातो - नशेमे कौन नही है मुझे बताओ जरा किसे है होश मेरे सामने तो लाओ जरा लिहितानाही शहारा येतोय अंगावर!
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Fri, 06/03/2016 - 10:01

In reply to अशी बाधा करणारी अनेक गाणी आहेत. by बोका-ए-आझम

Permalink

शराबीची गाणी खासच होती.

शराबीची गाणी खासच होती. "नशे में कौन नही हैं मुझे बताओ जरा..." जबरदस्त आवाज, धून, आणि भाव!
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Fri, 06/03/2016 - 15:59

In reply to शराबीची गाणी खासच होती. by समीरसूर

Permalink

+१

"नशे में कौन नही हैं मुझे बताओ जरा..." जबरदस्त आवाज, धून, आणि भाव!
  • Log in or register to post comments

Submitted by सुंड्या on गुरुवार, 06/02/2016 - 23:39

Permalink

तुम्हाला होतं का कधी असं?

समीर भौ एकदम होतं...२००% होतं....एखादं गीत कचकचून दंश करतं आणि त्याचे अक्षरशः विष भिनते/कैफ चढतो (ह्या 'विषाचे' तीन घटक- गायक,गीताचे शब्दं आणि संगीत) आणि बहुतेक वेळेस पूरक अशी स्वत:च्या मनाची अवस्था, पण कधी कधी एकदम खुश असतांना सुद्धा तलतचं "जिंदगी देनेवाले सून, तेरी दुनिया से दिल भर गया...." नांगी मारतं, कधी निराशेत रफीचं "हमको तुमपे प्यार आया..(जब जब फुल खीले) डंख मारतं...आणि मग त्याच्या धुंदीतच एक दोन दिवस कधी आठवडा जातो....२००५ च्या आसपास मधुशाला ने जहाल चावा घेतला होता, तीन- चार महिने सकाळ-संध्याकाळ 'मदिरालय जाने को चलता है पीनेवाला...' काय तो मन्ना डे चा आवाज, ते हरिवंशरायांचे लिखाण अनं जयदेवचे संगीत सगळं अगदीच जहाल...अशी भरपूर गीतं आहेत त्यापैकी गेल्या काही दिवसांत या गीतांनी मला कैफ चढवला: #.आपकी याद आती राही रातभर-(गमन), #.अजीब सनेहा मुझपर-(गमन) {हरिहरनचे चित्रपटासाठी गायलेलं पहिलेच गीत म्हणे.}, #.मला वेडं लागले प्रेमाचे (टाईमपास), #.पैलतोगे काऊ कोकताहे, #.दिवाना मै चला (प्या.की.तो.ड.क्या) #.कसम पैदा करनेवाले की (ग्यांग्स ऑफ वास्सेपूरमुळे आठवले..विजय बेनेडिक्टचा आवाज...;)) #.हैराण गल्ली सारी (आनंद शिंदे..याच्या शोधातच मला मिपाचा शोध लागला...थोडं डोकं खर्ची करून mp३ मोब्ल्या मध्ये उतरवीलीच पाहिजे असल्यास व्यनी करा)....लिस्ट संपवितो. हा प्रतिसाद लिहित असतांना तलतच्या रेशमी स्वरातील 'जलते है जिसके लिये -(सुजाता)' चा कैफ चढलाय...
  • Log in or register to post comments

Submitted by सुंड्या on गुरुवार, 06/02/2016 - 23:53

In reply to तुम्हाला होतं का कधी असं? by सुंड्या

Permalink

हे राहूनच गेलं

'ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी' याने माज्या आजोबांना डंख मारला होता...'विष' माझ्या पर्यन्त पोहोचले...आणि चिरंजीव (वय वर्ष २) सुद्धा हे ऐकतांच मान डोलावतात.
  • Log in or register to post comments

Submitted by palambar on Fri, 06/03/2016 - 00:24

Permalink

रोजा मधलि गाणि कुणाला आवड्त

रोजा मधलि गाणि कुणाला आवड्त नाहित? आश्चर्य आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Fri, 06/03/2016 - 10:57

In reply to रोजा मधलि गाणि कुणाला आवड्त by palambar

Permalink

मला फक्त 'ये हसी वादिया'

मला फक्त 'ये हसी वादिया' आवडतं. बाकीची पुर्वी आवडली होती पण आता नाही आवडत..
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 06/03/2016 - 07:38

Permalink

वाखू साठवलीय. बेगम

वाखू साठवलीय. बेगम अख्तरांबद्दल लिहिल कोणी? आणि फरीदा खानुम? आबिदा?
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Fri, 06/03/2016 - 10:03

In reply to वाखू साठवलीय. बेगम by यशोधरा

Permalink

वो जो हममे तुममे करार था

बेगम अख्तार्बद्दल लिहिलंय ना लेखात..."वो जो हममे तुममे करार था...". पाठ आहे गाणं. :-) फरीदा खानुम माहिती नाही. कोणती गाणी आहेत यांची? आबेदा परवीन का? यांची पण गाणी माहित नाहीत. :-(
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 06/03/2016 - 10:08

In reply to वो जो हममे तुममे करार था by समीरसूर

Permalink

त्यामुळे बेगम अख्तरचं "वो जो

त्यामुळे बेगम अख्तरचं "वो जो हममे तुममे करार था..." एका कुपीत असेल तर >> हे? इत्तासाच? :( फरीदा खानुम माहिती नाही. >> लाहौलविलाकुवत वगैरे! कृपया गूगल करावेच आणि गजलाही ऐकाव्यातच. प्लीजच. हे झाले की आबेदा.
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Fri, 06/03/2016 - 10:39

In reply to त्यामुळे बेगम अख्तरचं "वो जो by यशोधरा

Permalink

लाहौलबिलाकुवत वगैरे झेलायला अगदी तयार आहे

हो, बेगम अख्तर फिलहाल इत्तासाच. :-) एक-दोन अजून ऐकल्या होत्या पण तितक्या आवडल्या नाहीत म्हणून विस्मृतीत गेल्या. नंतर जास्त शोध घ्यायला सवड मिळाली नाही. फरीदा खानुम खरंच माहित नाही. लाहौलबिलाकुवत वगैरे झेलायला अगदी तयार आहे. प्रायश्चित्त म्हणून लेखदेखील मागे घ्यायला तयार आहे. :-) व्यासंग तितका दांडगा नाही. शोधतो बरं जरा त्यांच्या गजला. शोधायचं म्हटलं की जीवावर येतं. एकदम अंगावर पावसाची सर पडावी तसं गाणं हृदयावर आदळलं पाहिजे. मग मजा जास्त येते. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 06/03/2016 - 10:44

In reply to लाहौलबिलाकुवत वगैरे झेलायला अगदी तयार आहे by समीरसूर

Permalink

बापरे! ओके.

बापरे! ओके.
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Fri, 06/03/2016 - 10:51

In reply to बापरे! ओके. by यशोधरा

Permalink

टेंशन नका घेऊ

गमतीनं म्हणालो हो; टेंशन नका घेऊ. :D उलट नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 06/03/2016 - 10:57

In reply to टेंशन नका घेऊ by समीरसूर

Permalink

टेंशन काय घ्यायचं, गाने गाने

टेंशन काय घ्यायचं, गाने गाने पे लिख्खा हैं सुननेवाले का नाम आपका नामच लिख्या नै होगा तो कोई कुछ नहीं कर सकता.
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Fri, 06/03/2016 - 11:03

In reply to टेंशन काय घ्यायचं, गाने गाने by यशोधरा

Permalink

सही बात!

सही बात! पर हम हमारा नाम लिखवायेंगे जरूर... :-) फिलहाल तो मोहम्मद अझीझ के "कितने मौसम, कितने सावन, कितने सावन बीत गये, तुम हो वही या और कोई तुम लगने लगे नये...." पे नाम लिखा हैं. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by महामाया on Sat, 06/04/2016 - 15:54

In reply to लाहौलबिलाकुवत वगैरे झेलायला अगदी तयार आहे by समीरसूर

Permalink

अप्रतिम लेख।

बेगम अख्तरचं उल्टी हो गईं सब तदबीरें, कुछ न दवा ने काम किया। देखा इस बीमारिए दिल ने आखिर काम तमाम किया।। अाणि खुशी ने मुझको ठुकराया तो रंजो गम ने पाला है गुलों ने बेरूखी की है, तो कांटों ने संभाला है...। ऐका, मग सांगा।
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Fri, 06/03/2016 - 16:33

In reply to वो जो हममे तुममे करार था by समीरसूर

Permalink

आबेदा परवीन

आबेदा परवीन सुफी गाण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचं कोक स्टुडीओ सिझन ३ मधले रोहिल हयात सोबतची गाणी नक्की ऐका.
छाप तिलक सब छीनी
सुद्धा अप्रतिम आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेदांत on Fri, 06/03/2016 - 10:54

Permalink

बेगम अख्तरhttps://www.youtube

बेगम अख्तर https://www.youtube.com/watch?v=2fhCUh2hZNo
  • Log in or register to post comments

Submitted by वेदांत on Fri, 06/03/2016 - 10:57

In reply to बेगम अख्तरhttps://www.youtube by वेदांत

Permalink

गझल्स

गझल्स https://www.youtube.com/user/saregamaghazal/videos
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Fri, 06/03/2016 - 10:59

Permalink

SEL चं संगीत असलेला पहिला चित्रपट

मिशन काश्मीर , यातलं "चुपकेसे सून" ...Evergreen
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Fri, 06/03/2016 - 11:01

Permalink

ये कैसी अजब दास्तांन हो गयी है

रुस्तम सोहराब मधलं सुरैय्याचं गाणं ...कुणी चाहता आहे का याचा इथे ?
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 06/04/2016 - 00:02

In reply to ये कैसी अजब दास्तांन हो गयी है by मराठी कथालेखक

Permalink

मी आहे ना!

मला त्यातलंच तलतचं माजंदरान पण खूप आवडतं. मला वाटतं हा सज्जादसाहेबांचा शेवटचा चित्रपट.
  • Log in or register to post comments

Submitted by महामाया on Sat, 06/04/2016 - 16:08

In reply to ये कैसी अजब दास्तांन हो गयी है by मराठी कथालेखक

Permalink

अक्षरश: ढोल दिसलीय

पण तीच अदा। लाजवाब, अशीच। पृथ्वीराज राजकुमारी ने दिलेला रूपया बोटांनी वाकवून फेकून देतो। तो रूपया राजकुमारी साहेबा बोटांत आंगठी सारखा घालतात। मग पृथ्वीराज साठी हे गाणं म्हणते। खूप सुंदर पिक्चराइजेशन। लिहितांना या गीत गातांना सुरैयाचं ते खट्याळ हसूं आठवलं।
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Fri, 06/03/2016 - 11:20

Permalink

काय प्रत्ययदर्शी लिहिता हो

काय प्रत्ययदर्शी लिहिता हो समीरसूर ! खरोखर अशा अनेक गाण्यांनी आजवर अगणित दंश केलेत. बोका-ए-आझम नि दिलेल्या सर्व गीतांबरोबरच लता-आशा यांची अगणित गीते, तलत किशोर रफी यादी फार मोठी आहे. तरी काही नमुने देतेच. जयोस्तुते श्री महन्मंगले तुझे गीत गाण्यासाठी असा बेभान हा वारा कशी येऊ शारद सुंदर चंदेरी राती येऊ कशी प्रिया बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती घन तमी शुक्र बघ राज्य करी शोधू मी कुठे कशी प्रिया तुला इष्काची इंगळी डसली श्रावणात घन निळा जिथे सागरा धरणी मिळते आला आला वारा संगे पावसाच्या धारा माझे माहेर पंढरी गोमू संगतीनं माझ्या तू आणि हिंदी....... कांची रे कांची रे गुम है किसीके प्यारमे फिर तेरी कहानी याद आई फिर तेरा चढ गयो पापी बिछुआ लग जा गले अजीब दास्ता है ये दो हंसोंका जोडा बाहोमे चले आओ चूप चूप खडे हो गोरे गोरे ओ बांके छोरे ओ तुमको पिया डील दिया इतना ना मुझसे तू प्यार बढा ... बस्स, टंकाळा आला...!
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Fri, 06/03/2016 - 16:12

In reply to काय प्रत्ययदर्शी लिहिता हो by सस्नेह

Permalink

वा, मस्त यादी!

वा, मस्त यादी! तुमसे बढकर दुनिया में - कामचोर अगर तुम ना होते - अगर तुम ना होते मैं बेनाम हो गया - बेनाम दूर रहकर न करो बात, करीब आ जाओ - अमानत (जुना) मेरी मोहब्बत पाक मोहब्बत - एप्रिल फूल रात के हमसफ़र थक के घर को चले - एन एविनिंग इन पेरिस वो भुली दासता लो फिर याद आ गयी - संजोग यार इलाही मेरे यार इलाही - कट्यार काळजात घुसली घेई छंद - कट्यार काळजात घुसली बगळ्यांची माळफ़ुले - वसंतराव खुदा गवाह - खुदा गवाह बहुत प्यार करते है तुमसे सनम - साजन मी वार्याच्या वेगाने आले - शुक्रतारा अपनी धून मी राहता हू - गुलाम अली एक तरफ उसका घर एक तरफ मयकदा - पंकज उधास चुमकर मदभरी आंखो से - पंकज उधास जखम-ए-तनहाई में, खुशबू-ए-हीना - गुलाम अली रेतपार लिखकर मेरा नाम ना मिटाया करो - गुलाम अली वोह कभी मिल जाये तो - गुलाम अली कल चौदहवी की रात थी - गुलाम अली एकटे जगू - संदीप खरे आयुष्यावर बोलू काही - सलील, संदीप रुक जा ओ दिल दिवाने - दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Fri, 06/03/2016 - 16:18

In reply to वा, मस्त यादी! by समीरसूर

Permalink

सह्ही...

सह्ही...
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 06/04/2016 - 00:16

In reply to वा, मस्त यादी! by समीरसूर

Permalink

लागा चुनरी मे दाग

लागा चुनरी मे दाग गुमनाम है कोई या दिल की सुनो दुनियावालो अगर मुझसे मुहोबत है सारी सारी रात तेरी याद सताऐ चैन से हमको कभी है कहीपर शादमानी न मिलता गम तो ये जिंदगी उसीकी है (यातली सुरुवातीची लकेर या जगाबाहेरची आहे) नुक्ताची ऐ गमे दिल बाबुल मोरा (हे सैगलने अफाट गायलंय.) नवीन गाण्यांमध्ये मै तैनु समझावां की जहेनसीब किसी बंजारे को घर बेकदर बेखबर बेवफा बालमा (अनुराधा पौडवाल यांचं प्री-गुलशनकुमार दिवसांमधलं गाणं) आणि सर्वात अफाट - प्यार किया तो डरना क्या सुरूवातीचा कोरसच्या बुलंद आवाजातला तराणा. मग लताचा चिरत जाणारा आवाज - इन्सान किसीसे दुनिया मे इक बार मुहोबत करता है! इस दर्द को लेकर जीता है इस दर्द को लेकर मरता है आणि मग शेवटचं कडवं - पर्दा नही जब कोई खुदा से, बंदोंसे पर्दा करना क्या! शकील, नौशाद, लता, मधुबाला, दिलीपकुमार आणि पृथ्वीराज कपूर यांनी हे गाणं सोडून दुसरं काही केलं नसतं तरी ते अजरामर झाले असते असं माझं प्रामाणिक मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 06/03/2016 - 11:21

Permalink

अत्ता

गुलामीतल्या गाण्याचा दंश अनुभवलाय, दोन दिवस झाले. पुर्ण गाणे इथे जिहाले मिस्कीन विविध भारती पंखा नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by दा विन्ची on Fri, 06/03/2016 - 11:26

Permalink

आज जाने कि जिद न करो

फरीदा खानुम ची "आज जाने कि जिद न करो" ऐकावेच
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Fri, 06/03/2016 - 11:43

In reply to आज जाने कि जिद न करो by दा विन्ची

Permalink

अरे हे गाणं माहिती आहे

अरे हे गाणं माहिती आहे; ऐकलं आहे. मला माहित नव्हतं फरीदा खानुमचं आहे म्हणून. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Fri, 06/03/2016 - 21:46

In reply to आज जाने कि जिद न करो by दा विन्ची

Permalink

येस्स!!

आशा भोसलेंच्या आवाजात पण ऐकलंय पण फरिदा खानुम च्या ' आज जाने की..' ला तोड नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 06/03/2016 - 11:45

Permalink

:)

लेख आवडला. बर्‍याच गाण्यांबद्दल लिहिलेत. यातली अगदी नवीन गाणी माहीत नाहीत. मी इतके दिवस एकाच गाण्याने झपाटली जात नाही. मात्र सकाळी उठून जे गाणं डोक्यात येतं ते दिवसभर आठवत रहातं.
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Fri, 06/03/2016 - 15:30

In reply to :) by पैसा

Permalink

सुंदर लेख. छान लिहिलंय.

मी इतके दिवस एकाच गाण्याने झपाटली जात नाही. मात्र सकाळी उठून जे गाणं डोक्यात येतं ते दिवसभर आठवत रहातं.
सेम हियर. माझ्या बाबतीत कधी कधी तर अगदी न आवडणारं गाणं सुद्धा तोंडात येत राहतं.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प्रभू on Fri, 06/03/2016 - 12:27

Permalink

सद्ध्या दोन दिवसांपासुन

' कैवल्याच्या चांदण्याला...' या भैरवीनं वेड लावलय...
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Fri, 06/03/2016 - 15:57

Permalink

सुरेख लिहीलेय !!

लेखातील बरीच गाणी आवडीची आहेत, जहां पे सवेरा हो, बसेरा वहीं हैं, सुन्या सुन्या.. सलाम-ए-इश्क.. अमिताभ किशोरच्या आवाजात "हां.... बाबत सेम भावना आहेत, ते हां.. अगदीच जीवघेणे. सध्या ह्या गाण्याचे वेड आहे... लता मंगेशकरांच्या आवाजातील गाणे अप्रतिम आहेच, पण मदनमोहन यांनी गायलेले व्हर्जनही सुरेख आहे. माई री मैं कासे कहूं पीर अपने जिया की माई री.. आँखों में चलते फिरते रोज मिले पिया बावरे बैयाँ की छैयाँ आके मिलते नहीं कभी सावरे दु:ख ये मिलनका लेके काह करूं, कहाँ जाऊ री आँखों में चलते फिरते रोज मिले पिया बावरे पाकर भी नहीं उनको मैं पाती, माई री..
  • Log in or register to post comments

Submitted by सुंड्या on Fri, 06/03/2016 - 20:42

In reply to सुरेख लिहीलेय !! by नीलमोहर

Permalink

मदनमोहन व्हर्जन

अहो, गीत नाही हे......विरहणीच्या हृदयाची आर्त आहे....आजपर्यंत पूर्ण गीत गाऊ शकलो नाही, चारचौघांत हे गीत ऐकत नाही....खास 'पी की डगर मे बैठे मैला हुआजी मोरा आंचरा....लट मी पडी कैसी बिरहा की माटी' ह्या ओळी जितक्यावेळ ऐकल्या तितक्याचवेळा डोळे ओलावले....
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Fri, 06/03/2016 - 16:39

Permalink

* आपकी आंखो मे कुछ

* आपकी आंखो मे कुछ *मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है ( गुलजार अप्रतिम आहे *हाय रामा- रंगीला *सायबा- गुजारीश ( हे ऐकताना अगदी गोव्यात गेल्याचा फील येतो ). * घर - पियुष मिश्रा ( एका वेगळ्या टाईप चा गाण आणि गाणारा पण तसाच) नक्की ऐकाव असं * mtv अन्प्ल्गड मधलं पापो चे 'कौन मेरा , आणि रंजिश च वर्जन पण नक्की मोहवणार
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com