Skip to main content

भले तर देऊ...

लेखक चांदणे संदीप यांनी रविवार, 29/05/2016 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी, "अशा वेळी आपण काय कराल?" या कोंबडी प्रेमींच्या धाग्यावर कट्टर मिपाकर श्री मुवि यांनी प्रतिसादातून संत तुकारामांच्या अभंगवाणीतली एक ओळ टंकली आहे. निमीत्त मुवि असले तरी सर्रास ह्या ओळी चुकीच्या लिहिल्या जातात आणि चुकीच्या शब्दानिशी स्वीकारल्याही जातात! अर्थात अश्लील शब्दांचा वापर व प्रसार टाळण्यासाठी एखादा शब्द बदलून प्रचलित केला तर हरकत नाही पण अभंगातील एकापेक्षा जास्त शब्द बदलून किंवा शब्दक्रमच बदलणे हे चूक आहे. कवीत्वाशी विश्वासघात केल्यासारखेही आहेच! अर्थ जरी एकच असला तरी मूळ शब्दांना टाकून का द्यावे? हा माझा प्रश्न आणि चर्चेचा विषय आहे. तर मी ज्या अभंगाबद्दल बोलत आहे त्यातल्या प्रसिद्ध ओळी सर्वसाधारणपणे अशा प्रकारे जनमानसात लोकप्रिय आहेत: "भले तर देऊ कासेची लंगोटी| नाठाळाचे माथी हाणू काठी ||" आणि मूळ अभंग याप्रमाणे : "मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास | कठीण वज्रास भेदूं ऐसे || ध्रु || मेले जित असों निजोनिया जागे | जो जो जें जें मागे तें तें देऊं || १ || भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां || २ || मायबापाहूनि बहु मायावंत | करूं घातपात शत्रूहूनि || ३ || अमृत तें काय गोड आम्हांपुढे | विष तें बापुडें कडू किती || ४ || तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड | ज्याचें पुरे कोड त्याचेपरिं || ५ ||" संदर्भ : अभंग क्रं. ९८७, "श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा" , (संपादक) श्री विष्णु परशुराम शास्त्री पंडित, आवृत्ती प्रकाशनवर्ष इसवीसन १९५५

वाचने 16112
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

ह्याला गाथेची शुद्धी असे समजले गेले होते (म्हणे)... खाली चित्रगुप्त म्हणतात त्याप्रमाणे असे बदल योग्य नव्हेत असं मलाही वाटते.

'गांडीची लंगोटी' यात जो एक सच्चेपणा, जोम वटतो, तो 'कासेची' मधे हरपला आहे. थोर संतांच्या कथनात अशी ढवळाढवळ करणे योग्य नोहे. 'गांठी' म्हणजे 'काठी' का?

In reply to by चित्रगुप्त

गांठी हे विचार किंवा हेतू अशा अर्थाने आहे! अर्थात हे माझे इंटप्रिटीशन आहे. जाणकार व अभ्यासूंनी आधिक योग्य प्रकारे निरसन करावे. काकू काढायचे कारण म्हणजे, "गांठी" ह्या शब्दाचेच मला जास्त वाईट वाटते. काठी काय काठी?? काहीही!! Sandy

In reply to by चित्रगुप्त

अक्कलहुशारीने समोरच्याचा अर्थात नाठाळाचा बेत हाणून पाडू अशा अर्थाने असावे ते बहुधा. परंतु जिथे तिथे ती "काठी"च प्रचलित असल्याने ती माझ्याच माथ्यात कोणी घालायचे याच भीतीने आजवर कोणाला विचारले नाही! मुळात "नाठ्याळा चि गांठी देऊं माथां" ही "नाठाळाचे माथी हाणू काठी" पेक्षा सरस काव्यात्मक रचना आहे. माझ्या मते त्यात एक अजूनच वरच्या-वेगळ्या तीव्रतेची गर्भित चेतावणी आहे. कृपया मूळ अभंग कोणाला माहित असून त्यावर चिंतन झालेले असल्यास नक्की या ठिकाणी माझ्यासारख्या अज्ञानी माणसाच्या माथ्यातून तेवढी "काठी" बाहेर काढावी ही कळकळीची विनंती! ___/\___ Sandy