मायीवाली ग्लोबल कविता
'कविता वृत्तात हवी'
'हओ'
'कवितेला लय हवी'
'हओ
'कवितेत सुयोग्य यमक हवेत'
'हओ
'कविता जगातल्या कुठल्याही वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी हवी'
'मंजे?'
'म्हणजे कविता ग्लोबल हवी रे'
'अच्छा! हओ!'
त गुर्जि बोलले अना मी
ग्लोबल कविता कराले बसलो
एक कागज दोन कागज
सतराशेसाठ कागज फाड़लो
पर झाड़ीच्या बाहेरची दुनिया
नही पायलेल्या मले
ग्लोबल कविता काही जमे नही
पर मायातला नव्हाड़ा कवि
जल्दी हार माने नही
मंग गरीबी ग्लोबल रायते
त गरीबाईच्या हालावर
एक कविता बनली
पर सकारी भरपेट जेवलो
अना मूड बदलला
अना कविता फाड़लो
मंग सिलसिला चालु होऊन गेल्ता
कास्तकार, खुला व्यापार
प्रेमसिंगार, सांज-सकार
समताबंधुतामानवता
एकेक कविता करत जाऊ
अना टर्कन फाड़त जाऊ
होऊन गेल्तो हैरानपरेशान
विसय ग्लोबल रायला तरी
कविता ग्लोबल बने नही
नवा शोध लागून गेल्ता
मंग लिवाले बसलो मनमाना
मनात आला थेच लिहू
मायी दुनिया नवती झाडीबाहेर
लिवत गेलो झाडीच्या गोठी
नागझिरा-नवेगावबाँध
वाघ-हिरन-बन्दर-बद्द्या
अंजन-परस-टेंभ्रुन-मोहा
वैनगंगा-बाघ-बावनथड़ी
धानाचे पऱ्हे, गायबैलगोऱ्हे
अना कवितेत बांधलो
सायनीमायच्या कायन्या
मंग घेऊन गेलो कागजाचा गठ्ठा
गुर्जीले दाखवलो
त गुर्जी मनले, "अरे ही तर
ग्रामीण कविता झाली!
शुद्ध देशीवादी!
ग्लोबल कुठे आहे ही?"
तसाच गेलो धावतधावत
माड़गीच्या पुलावर उभा रायलो
फेकलो आपले सप्पा कागज़
वैनगंगेच्या पान्यात
ग्लोबल कविता आपल्या बसची बात नसे भाऊ!
आता पान्यात कागद डुलून रायले होते
जसे तऱ्याकाठी हिवरा गवत डुलते
जावून रायले होते सामोर सामोर
घडीच्या काट्यावानी लगातार..
आता पान्यासंग जात रायतीन
पुड़े भेटल चुलबन
मंग गाढवी भेटल..
खोब्रागडी कठानी
वर्धा पेनगंगा भेटतिन
मंग प्रानहिता बनून
माया कविता भेटतिन
गोदावरीले...
मंग गोदावरी भेटन
बंगालच्या उपसागराले
माये सब्द आता
करोडो अरबो लीटर
पान्याचा हिस्सा होतीन
हा पानी फिरल पूरा जगभर
सागरी प्रवाह मन्तत याले
अना फिरतीन माह्या कविता
बांग्लादेस श्रीलंका मालदिव्स
थायलैंड इंडोनेसिया ऑस्ट्रेलिया
जातीन प्यासीफिकात अटलांटिकात
यूरोप अमेरिकेच्या किनाऱ्यावर
मंग बरसतीन आफ्रिकेवर, एमेजॉनवर!
जगभर जई जई बरसल पानी
मायी कविता बरसल
भिजवल सप्पा लोकाइले!
आयफेल टावरवरुन
माया कवितेचे सब्द टपकतीन
ऑपेरा हाउसवर माया कवितेचा
टपकटपक आवाज येन
हूवर धरनामांगं साचल
माहीच कविता
मावाल्या कवितेवरुन झगड़तीन
इजिप्तसूडानइथियोपिया
तीसरा महायुद्ध बी
होउ सकते माया कवितेवरुन!
बांधीत मायी कविता
जंगलात मायी कविता
पहाड़ीत मायी कविता
मैदानात मायी कविता
नदीनाल्याइत मायी कविता
तलावबोड्याइत मायी कविता
गावात मायी कविता
सयरात मायी कविता
गुलाबजलात मायी कविता
गंद्या नाल्यात मायी कविता!
माया कवितेवर लिवतिन
जगभरचे कवी कविता!
माह्या कवितेवर भासन झाड़तिन
बड़ेबड़े ग्यानी लोक
तिचे महत्त्व लोकाइले सांगतिन.....
सांगा याच्या पैले झाल्ति का
कोन्त्या कविची कविता
येवड़ी ग्लोबल?
-- स्वामी संकेतानंद
अहा!
:)
+१
+१२२२१११११११
आवडली.
वा वा वा वा मस्तच!
वाह !! नाव बघून धागा उघडला,
भाषा समजली नाही पुर्ण थोड़ी
याले म्हनते ग्लोबल कविता !.
अफाट!
क्या बात!
अप्रतिम!! _/\_
खरी ग्लोबल कविता.
मस्तच. पुर्वी ऐकल्याने आता
स्वामींच्या नावाने कविता उघडली
एक राह्यलं
वैश्विक कविता झालेली आहे.
कुठे बाप्पा ते आळंदीवाले आणि
त्रैलोकात
काम बंद आहे उन्हामुळे!बाबांची
अप्रतिम.
वाह... सुंदर...
आवडेश ! लिहीत रहा!
मस्तं!