Skip to main content

..तेव्हा मला तू फार फार आवडतेस..प्रवास ४

लेखक कानडाऊ योगेशु यांनी मंगळवार, 10/05/2016 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
तशी तू देवभोळी नाहीस पण नास्तिक नक्कीच नाहीस.. अन मी कुंपणावरच्या सरड्यासारखा... सोयीनुसार आस्तिक सोयीनुसार नास्तिक असा. कुठल्या टुरिस्ट स्थळी फिरताना माझे नेहेमीचे द्वंद्व.. देवळे टाळावीत का नको...? तू मात्र अश्यावेळी.. माहेरी आल्यागत... अन आईला वा बापाला भेटायला जाण्यागत उत्सुक... इथवर आलोच आहोत तर जाऊन येऊ... अन एरवी संपूर्ण प्रवास टी शर्ट-जीन्स अथवा सलवार सुट अश्या सुटसुटीत.. पोशाखात करणारी तू.. देवी दर्शनाला जाताना मात्र.. नखशिखांत पारंपारिक पोशाखात निघतेस.. साडी चोळी सोबत.. इतर दाक्षिण्यात स्त्रियांप्रमाणे. एक टनाचा गजरा केसात माळतेस.. खरेतर माझे देवीदर्शन तुला त्या परिपूर्ण पवित्र रूपात पाहील्यावरच होते.. पुढचा केवळ उपचार उरतो.. देवीच्या आजुबाजुला फिरणार्या नंदीबैलागत मी तुझ्या मागेमागे निघतो.. मंदीरात गर्दीत ही तु माझ्या पुढेच असते व गर्दी माफक असली तरीही.. तुझा गजर्याचा वास नेहेमीच.. माझ्या श्वासातुन अंगांगात भिनेल.. एवढे अंतर तू आपल्या दोघात ठेवतेच ठेवते.. गाभार्यासमोर आल्यावर.. समयांच्या मंद प्रकाशात तुझा चेहरा उजळुन निघतो.. (बाप रे काय सुंदर दिसतेस तु तेव्हा!) देवीचे प्रतिरूपच तू.. मी एकदा देवीकडे अन डोळे मिटुन शांत उभारलेल्या तुझ्याकडे आळीपाळीने पाहतो... अन मग पुढे आलेले हळद कुंकु तु कपाळावर लावतेस.. अलगदपणे.. माझ्याकडे पाहत.. डोळ्यात अन.. गालातल्या गालात हसत.. अन मुद्दामुन असे लावतेस कि थोडे तुझ्या सरळ नाकावर सांडेल.. अन पुढे आरती घेतल्यावर म्हणतेस.. चेहरा ठिक आहे ना... तुला माहीती आहे.. मला फार आवडते... माझ्या पांढर्याशुभ्र रूमालावर.. तुझा चेहरा साफ करताना... हळदी कुंकवाचे रंग उमटवुन घेणे... अन ते करताना मुद्दामुन गजर्यातल्या दोनचार कळ्या.. रूमालात सरकावतेस.. अन पुढे मागे वळून.. जरा गजरा ठिक करायला लावतेस.. मनाचा पूर्ण गाभारा सुगंधाने भरुन निघतो.. (हे होताना गाभार्यातली देवी मंद हसल्याचा मला भास होतो..) मंदीरातल्या पावित्र्यासोबतही प्रेम जपणारी तू. गाभार्यातल्या शांत पण खट्याळ समईसारखी तू. तेव्हा मला फार फार आवडतेस... - कानडाऊ योगेशु

वाचने 4589
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

मस्त! साडीसारखे सुंदर काही नाही! आणि त्यावर गजरा!! आणि खरंच अशा सणासमारंभाला, दर्शनाला, ई सजतात तेव्हा एकाचवेळी सुंदर + पवित्र वाटतात स्त्रीया.

In reply to by पथिक

कुणी काहीही म्हणो सौंदर्याचा साज-माज कम आदब आणि शालीनता जपूनही लोभस मुग्ध रूप साडी (व्य्वस्थीत पणे) आणि त्या नुसार केशरचना,दागीने यातच आहे. उगा नाही अगदी सत्तरीतल्या आजीही काठापदराच्या साडीत एक वेगळ्याच व्यक्ती वाटतात. हा भाग सर्वात उजवा आहे. नित वाचक नाखु

बहोत बढिया है यह. छान, भेष्ट, आवड्यास. पुलेशु. पुभाप्र.