तशी तू देवभोळी नाहीस
पण नास्तिक नक्कीच नाहीस..
अन मी कुंपणावरच्या सरड्यासारखा...
सोयीनुसार आस्तिक
सोयीनुसार नास्तिक असा.
कुठल्या टुरिस्ट स्थळी फिरताना
माझे नेहेमीचे द्वंद्व..
देवळे टाळावीत का नको...?
तू मात्र अश्यावेळी..
माहेरी आल्यागत...
अन आईला वा बापाला
भेटायला जाण्यागत उत्सुक...
इथवर आलोच आहोत तर
जाऊन येऊ...
अन एरवी संपूर्ण प्रवास
टी शर्ट-जीन्स अथवा
सलवार सुट अश्या
सुटसुटीत..
पोशाखात करणारी तू..
देवी दर्शनाला जाताना मात्र..
नखशिखांत पारंपारिक
पोशाखात निघतेस..
साडी चोळी सोबत..
इतर दाक्षिण्यात स्त्रियांप्रमाणे.
एक टनाचा गजरा केसात माळतेस..
खरेतर माझे देवीदर्शन तुला त्या
परिपूर्ण पवित्र रूपात पाहील्यावरच होते..
पुढचा केवळ उपचार उरतो..
देवीच्या आजुबाजुला फिरणार्या
नंदीबैलागत
मी तुझ्या मागेमागे निघतो..
मंदीरात गर्दीत ही तु माझ्या पुढेच असते
व गर्दी माफक असली तरीही..
तुझा गजर्याचा वास नेहेमीच..
माझ्या श्वासातुन अंगांगात भिनेल..
एवढे अंतर तू आपल्या
दोघात ठेवतेच ठेवते..
गाभार्यासमोर आल्यावर..
समयांच्या मंद प्रकाशात तुझा
चेहरा उजळुन निघतो..
(बाप रे काय सुंदर दिसतेस तु तेव्हा!)
देवीचे प्रतिरूपच तू..
मी एकदा देवीकडे अन डोळे मिटुन शांत उभारलेल्या
तुझ्याकडे आळीपाळीने पाहतो...
अन मग पुढे आलेले हळद कुंकु तु कपाळावर लावतेस..
अलगदपणे..
माझ्याकडे पाहत..
डोळ्यात अन..
गालातल्या गालात हसत..
अन मुद्दामुन असे लावतेस
कि थोडे तुझ्या
सरळ नाकावर सांडेल..
अन पुढे आरती घेतल्यावर म्हणतेस..
चेहरा ठिक आहे ना...
तुला माहीती आहे..
मला फार आवडते...
माझ्या पांढर्याशुभ्र रूमालावर..
तुझा चेहरा साफ करताना...
हळदी कुंकवाचे रंग उमटवुन घेणे...
अन ते करताना मुद्दामुन
गजर्यातल्या दोनचार कळ्या..
रूमालात सरकावतेस..
अन पुढे मागे वळून..
जरा गजरा ठिक करायला लावतेस..
मनाचा पूर्ण गाभारा सुगंधाने भरुन निघतो..
(हे होताना गाभार्यातली देवी मंद हसल्याचा मला भास होतो..)
मंदीरातल्या पावित्र्यासोबतही प्रेम जपणारी तू.
गाभार्यातल्या शांत पण खट्याळ समईसारखी तू.
तेव्हा मला फार फार आवडतेस...
- कानडाऊ योगेशु
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4589
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजून पार्ट हायेत?!
धन्यवाद रातराणी!
मस्तच....! :)
मस्त
धन्यवाद रुमानी आणि गणेशा.
मस्त! साडीसारखे सुंदर काही
तंतोतंत
In reply to मस्त! साडीसारखे सुंदर काही by पथिक
सहमत !
In reply to तंतोतंत by नाखु
आजचा भाग सर्वात बेस्ट आवडेस
+११
In reply to आजचा भाग सर्वात बेस्ट आवडेस by स्पा
+११११११
In reply to आजचा भाग सर्वात बेस्ट आवडेस by स्पा
+९९९९९९९
In reply to आजचा भाग सर्वात बेस्ट आवडेस by स्पा
आवडलं !!
अरे जियो भिया! बढिया...
हां, हे आवडलं.
1+
धन्यवाद मंडळी!
सुंदर वर्णन आणि लेखन !
मस्त!आवडल.
आवडले