Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by समीरसूर on Mon, 05/09/2016 - 14:35
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा
'सैराट'वर सध्या बरीच चर्चा होतेय. माझे मत नोंदवण्याचा मोह आवरत नाहीये म्हणून हा लेख-प्रपंच! आता हा विषय चघळून कंटाळा आला असल्यास क्षमस्व. लेख उडवला तरी नो हरकत! काल 'सैराट' पाहिला. काही लोकांकडून अफाट स्तुती ऐकली होती तर काहींनी बेक्कार नाके मुरडली होती. अतिशय टोकाची मते 'सैराट'विषयी ऐकायला मिळत होती. 'सैराट'ने मराठी चित्रपटाच्या उत्पन्नाचे सगळे विक्रम मोडले असं ऐकलं होतं. चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात जोरात चालू आहे. इतकंच नव्हे तर अमेरिकेतदेखील काही चित्रपटगृहात 'सैराट' प्रदर्शित झालेला आहे आणि तुफान गर्दी खेचतो आहे असे दिसते. एका अमेरिकास्थित मित्राने फेसबुकवर तिथल्या चित्रपटगृहातील दृश्याचा फोटो टाकला होता. ऑन पब्लिक डिमांड, 'झिंगाट' त्या चित्रपटगृहात दोनदा वाजवण्यात आले होते आणि जनता बेभान होऊन नाचत होती. 'सैराट'ने एक निराळीच जादू तमाम महाराष्ट्रावर केली आहे हे नक्की. 'सैराट'ने दुष्काळात होरपळून निघणार्या महाराष्ट्राला तीन तासाचे सज्जड मनोरंजन देऊन रणरणता मे महिना थोडा का होईना सुसह्य करण्याचे पुण्य कमावले आहे हे निश्चित. मी गेल्या आठवड्यातील मंगळवारपासून (ता. ३ मे २०१६) 'सैराट'च्या तिकिटांसाठी प्रयत्न करत होतो. कामाच्या दिवशीदेखील 'सैराट' संपूर्ण पुण्यातल्या चित्रपटगृहांमध्ये (मोजकी कॉस्मो भागांतली चित्रपटगृहे वगळता) सगळ्या खेळांना हाऊसफुल चालू होता. या आठवड्यातदेखील तशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. शेवटी कसेबसे मला माझ्या आवडत्या नीलायमचे दुपारच्या ३;१५ च्या खेळाचे तिकिट मिळाले. नीलायमला अभूतपूर्व अशी गर्दी होती. चित्रपट बहुजन समाजाच्या पार्श्वभूमीचा असल्याने आणि दिग्दर्शक स्वत: त्या समाजाचा असल्याने ९५% जनता बहुजन समाजाची होती. जवळच्या निम्नस्तरीय वसाहतीमधून येणारी जनता मोठ्या प्रमाणावर होती. 'सैराट' मला बघायचाच होता. १ जानेवारी २०१६ (शुक्रवार) या दिवशी मी 'नटसम्राट' पाहिला होता आणि मध्यंतरामध्ये 'सैराट' ची झलक दाखवली होती. भन्नाट चित्रीकरण, मधुर संगीत, रांगडा नायक आणि तिखट तरीही मोहक अशी अर्ची - 'सैराट' बघणे मस्ट होते. 'सैराट' मला आवडला. अगदी मनापासून आवडला. नागराज मंजुळेचं दिग्दर्शन आणि कथा असलेला 'सैराट' प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्यात कमालीचा यशस्वी होतो आणि माझ्या मते हेच 'सैराट'चं यश आहे. सुरुवातीपासून 'सैराट' वास्तवाला धरून चालतो. ग्रामीण महाराष्ट्रात रंगणारे क्रिकेटचे सामने, तिथलं राजकारण, तिथल्या तरुणांच्या जीवन जगण्याच्या संकल्पना, जातीच्या उतरंडीवर आधारलेले समाजजीवन, शाळा-महाविद्यालयात मुला-मुलींना एकमेकांविषयी वाटणारे नैसर्गिक आणि गोड असे आकर्षण, त्यातून जन्माला येणार्या प्रेमकहाण्या, त्यातून निर्माण होणारे सामाजिक प्रश्न, आणि संबंधित कुटुंबांनी अशा कहाण्यांची आपापल्या सामाजिक, आर्थिक, वैचारिक कुवतीनुसार आणि सोयीने लावलेली भली-बुरी तड हे वास्तव आपल्यासाठी नवीन नाही. आपल्या आसपास आपण नेहमीच हे वास्तव बघत असतो. मंजुळेंनी मोठ्या हुशारीने आणि कल्पकतेने हे वास्तव मांडले. कुठेही जातीचा उल्लेख न करता केवळ वास्तववादी चित्रणातून मंजुळेंनी 'सैराट'मध्ये जाती-जातींमधल्या भक्कम भिंती अतिशय प्रगल्भपणे अधोरेखित केल्या. ऊस, कुटुंबाचे आडनाव, त्या कुटुंबाचे राजकारणमधले महत्वाचे स्थान, घरात असणारी आमदारकी, घराच्या भिंतीवर असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी तसबीर, कुटुंबातल्या पुरुष सदस्यांची मग्रुर वागणूक, स्वत:च्या ऐश्वर्याची आणि सत्तेची वागण्या-बोलण्यातून ओसंडून वाहणारी धुंदी अशा कित्येक डिटेल्समधून मंजुळे एका सुस्थापित आणि राज्यकर्त्या असणार्या कुटुंबाची ओळख करून देतात. त्याचबरोबर खोपटासारखे घर, उन्हातान्हात मासेमारी करणारे कुटुंब, चेहऱ्यावरचे दीन भाव यातून मंजुळे शोषित जातीचे आणि त्यांच्या डळमळीत अस्तित्वाचे चित्रण करतात. बहुजन समाजाला कितीतरी दशकांपासून महाराष्ट्रातल्या या सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक दरीचा प्रचंड राग आहे आणि तो रास्तही आहे. 'सैराट'शी ही जनता लगेच कनेक्ट होऊ शकली. 'सैराट'चा सुरुवातीचा एक-सव्वा तास हा धमाल मनोरंजनाचा आहे. नुकतीच महाविद्यालयात जाऊ लागलेली पोरे आणि त्यांचे रेशमी भावविश्व या भागामध्ये दाखवले आहे. कुठल्याही प्रेक्षकाने छातीवर हात ठेवून सांगावं की 'सैराट'मधल्या पर्श्यासारखं किंवा अर्चीसारखं त्यांना त्यांच्या शाळा-महाविद्यालयातल्या दिवसांत वाटलं नाही. असा प्रेक्षक असणं जवळ-पास अशक्य आहे. चित्रपटाचा हा भाग पाहतांना मला माझ्या शाळेतले दिवस आठवत होते. आपल्याला आवडणार्या मुलीला बघण्यासाठी पायपीट करणं, वाट्टेल ते बहाणे शोधणं...हे मी शाळेत असतांना केलं होतं. नंतर महाविद्यालयात गेल्यानंतर त्या मुलीला दुसऱ्या गावात जाऊन भेटून आलो होतो आणि नंतर एक भेट-कार्डदेखील पाठवलं होतं. त्या भेट-कार्डामुळे पुढे रामायण झालं आणि आमची ती एकतर्फी प्रेमकहाणी अस्थिविसर्जनाचा एखादा कलश डुबूक करून नदीत बुडावा तशी जगरहाटीच्या विशाल नदीत बुडाली. नंतर बराच काळ वर बुडबुडे येत राहिले पण तोपर्यंत समोरच्या पार्टीला एका थर्ड पार्टीने टेक ओव्हर करून टाकलं होतं. हे सारं 'सैराट'चा पहिला तास-दीड तास बघतांना आठवत होतं. एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात जर आकर्षण निर्माण झालं तर ते (कितीही चुकीचं असलं किंवा वाटत असलं किंवा त्रासदायक वाटत असलं किंवा खरोखर समस्या निर्माण करणारं असलं तरी) मोहकच वाटतं. ते चोरटे कटाक्ष, एकमेकांना बघण्याची ओढ, चिठ्ठ्या-चपाट्या, मुलाने मुलीच्या मागे फिरणं...नैसर्गिकच असतं हे सगळं. आणि म्हणूनच हजारदा बघूनदेखील ताजं वाटतं, गोड वाटतं. 'सैराट'मध्ये हा भाग रंगला आहे. आजचा मराठी तरुण या भागाशी लगेच कनेक्ट होऊ शकला. नंतरचा जग आणि वास्तव प्रखरपणे समोर आल्यानंतरचा प्रवास वास्तवावर आधारलेला असला तरी श्वास रोखून धरायला लावणारा आहे. प्रेक्षक नकळत नायक-नायिकेच्या बाजूने उभे राहतात. काही प्रसंगांमध्ये डोळ्याच्या कडा हलकेच ओलावतात. शेवट माझ्या मते एका खर्या घटनेवर आधारित आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी बहुधा सातारा की कुठल्याशा जिल्ह्यात अगदी अशीच घटना घडली होती. तो प्रसंग जसाच्या तसा चितारला आहे. अभिनयाच्या बाबतीत सगळेच अव्वल आहेत. पण जीव ओवाळून टाकावा अशी एकच आणि ती म्हणजे अर्ची म्हणजेच अकलूजची रिंकू राजगुरू! काय जबरदस्त अभिनय केलेला आहे या मुलीने म्हणून सांगू! मी तर पंखाच झालो. आणि दिसते पण सुरेख! प्रत्येक फ्रेममध्ये जो अभिनय रिंकूने केलेला आहे त्याला तोड नाही. पाटलाच्या घरची पोरगी कशी असावी? बिनधास्त, तिखट, झणझणीत, ठसकेबाज, देखणी, बेडर...अर्ची अशीच आहे. पाहताक्षणी आवडणारी, हृदयावर राज्य करणारी, जीव लावतांना जीव ओवाळून टाकण्याची तयारी ठेवणारी, प्रेमासाठी जीव घ्यायलादेखील तयार असणारी, धाडसी अशी ही अर्ची रिंकूने अविस्मरणीय करून ठेवलेली आहे. तिची कॅमेराची समज अफलातून आहे. तिचं स्मित कातिल आहे. तिचे डोळे विशाल आणि बोलके आहेत. टपोर्या डोळ्यांमधून ती लज्जा, प्रेम, संताप, लाचारी, खोडसाळपणा लीलया व्यक्त करते. ती सहजपणे बुलेट आणि ट्रेक्टर चालवते. मोठ्या विहिरीत धाडकन उडी टाकते. अवघ्या महाराष्ट्राला अर्चीनं याड लावलंय ते उगीच नाही. अर्ची हा 'सैराट'चा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. परश्या पण काही कमी नाही. परश्या म्हणजेच आकाश ठोसर कोवळा आहे, बुजरा आहे पण धाडसी आहे. एका उच्च घराण्यातल्या मुलीवर प्रेम करण्याची आणि तिच्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी आहे. आकाश ठोसरने नीट समजून अभिनय केला आहे. त्याचे मित्र प्रदीप (तानाजी गलगुंडे), सल्या ऊर्फ़ सलीम (अरबाज शेख) यांनी शंभर नंबरी अभिनय केलेला आहे. अगदी १००% खरे वाटावेत असे हे मित्र यांनी वठवले आहेत. अर्चीच्या मुजोर भावाच्या म्हणजेच प्रिन्सच्या भूमिकेत सूरज पवारने दृष्ट लागण्याजोगे काम केले आहे. राजकारणी घराण्यातला, सत्तेचा, पैशाचा, जमीनदारीचा अशक्य कोटीतला गुंठामंत्री-छाप माज असलेला प्रिंन्स सूरज पवारने पुरेपूर उतरवला आहे. अर्चीचा बाप एक नंबर जमला आहे. नागराज मंजुळेंचा अभिनय दाद देण्यासारखा आहे. अजय-अतुल यांचे संगीत चांगले आहे. गाणी नीट प्रवाहात येतात. झिंगाट गाणे खूप हिट झालेले आहे. चित्रपट्गृहात या गाण्यावर प्रचंड शिट्ट्या होत होत्या आणि बर्याच प्रेक्षकांनी हे गाणे सुरु झाल्यावर आपले पारंपारिक (पतंग, नागीन, गणपती वगैरे शास्त्रोक्त नृत्य) नृत्य करण्याचा मनसोक्त आनंद लुटला. 'सैराट' मधून दिग्दर्शक एका महत्वाच्या सामाजिक विषयाला हात घालतो परंतु त्यावर मत देण्याचं टाळतो. आणि मत देण्याचं टाळलेलं असतांना आजच्या वाढलेल्या जातीभेदावर एक घणाघाती आघात करण्याचं मात्र दिग्दर्शक विसरत नाही. ऑनर किलिंग ही गेल्या वीस वर्षातली संकल्पना. काळ जसा जसा पुढे सरकतो तसे तसे समाजाने अधिकाधिक प्रगल्भ आणि खेळकर होणं अपेक्षित असतं. दुर्दैवाने महाराष्ट्रात हा प्रवास उलट्या दिशेने सुरु आहे. महाराष्ट्राच्या मातीतून ऑनर किलिंगसारख्या हिडीस प्रकारावर चित्रपट निघेल असं कधी स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. दुर्दैवाने तशी वेळ आज येऊन ठेपलेली आहे. बोधामृत, मेसेज, योग्य-अयोग्य वगैरे भानगडीत न पडता जे सत्य आहे ते दिग्दर्शकाने अतिशय समर्थपणे आणि रंजक पद्धतीने समोर ठेवलं आहे. कुणाला काय धडा घ्यायचा तो ज्याने त्याने घ्यावा. अशा प्रकारचे स्फोटक प्रेम करून समस्या निर्माण करायच्या की धाडसाने प्रेम करून समस्यांना तोंड देऊन आपले प्रेम सिद्ध करून दाखवायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. हा निर्णय सर्वस्वी प्रेक्षकांचा. अशा प्रेमाला समाजाने कसे रिएक्ट व्हायचे हे देखील विचारपूर्वक ठरवण्याची नितांत गरज दिग्दर्शक ठासून सांगतो. बर्याच लोकांनी चित्रपटावर आक्षेप घेतले. हा चित्रपट बघून मुले बिघडतील असाही आक्षेप मी ऐकला. या विधानात काही तथ्य आहे असे मला वाटत नाही. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. जे समाजात घडते ते चित्रपटात दाखवतात. आणि चित्रपट नव्हते तेव्हादेखील अशी प्रेमप्रकरणे होतच असत. पालकांच्या मार्गदर्शनाखाली मुले या चित्रपटाचा आस्वाद नक्कीच घेऊ शकतात. त्यांना त्यातून नक्कीच शिकायला मिळेल. आणि शेवटी चित्रपट हे मनोरंजनाचे साधन आहे. त्याचा वाईट परिणाम मुलांवर होणार नाही असे संस्कार मुलांवर असणे आवश्यक आहे. आज घरोघरी टीव्हीवर पाहिले जाणारे कार्यक्रम किती सोवळे असतात हे आपण सगळेच जाणतो. मोबाईल, इंटरनेट, व्हिडिओ गेम्स या माध्यमांमधून मुले काय बघतात आणि शिकतात आणि यावर पालकांचे किती नियंत्रण आहे हादेखील एक प्रश्न आहेच. अर्थात कुठले चित्रपट बघायचे आणि कुठले टाळायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे तितकेच खरे! मला मात्र एक गंभीर विषय रंजक पद्धतीने हाताळणारा सशक्त चित्रपट म्हणून 'सैराट'चे कौतुक वाटते. अगदी काहीच नाही तर आपापल्या मनातली रेशमी आठवणीत जपून ठेवलेली अर्ची किंवा आपापल्या मनातला सुगंधी कुपीत जपून ठेवलेला परश्या पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी तरी 'सैराट' बघा असे सांगावेसे वाटते. अर्चीच्या डोळ्यातील मस्ती पाहून हा शेर मनात रुंजी घालतोय: मैं तेरी मस्त निगाही का भरम रख लुंगा होश आया भी तो कह दुंगा मुझे होश नही ये अलग बात हैं साकी के मुझे होश नही वरना मैं कुछ भी हूं एहसान फरामोश नही
  • Log in or register to post comments
  • 24665 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 05/09/2016 - 17:51

In reply to सिविल वाँर भारीये बाकी by स्पा

Permalink

वाचू हं आम्ही परीक्षण

दिग्दर्शक एंथोनी रूसो कोणत्या जातीचा आहे तेवढा कळवा, ते पाहुन औरंगाबादची पब्लिक थेट्रात घेऊन जाईन म्हणतो... ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Mon, 05/09/2016 - 19:59

In reply to सिविल वाँर भारीये बाकी by स्पा

Permalink

+१

सिव्हील वॉर म्हणजे सिव्हील वॉर! #TeamIronMan :D
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 05/09/2016 - 17:36

Permalink

कदाचित सिनेमा बघणार नाही....पण....

परीक्षण मात्र आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Mon, 05/09/2016 - 17:52

Permalink

मस्तच परीक्षण. चित्रपट न

मस्तच परीक्षण. चित्रपट न आवडता परीक्षणं आवडली हे पहिल्यांदाच अनुभवते आहे!
  • Log in or register to post comments
Profile picture for user एकनाथ जाधव

Submitted by एकनाथ जाधव on Mon, 05/09/2016 - 18:19

In reply to मस्तच परीक्षण. चित्रपट न by अजया

Permalink

अजया तै

अजया तै का नाय आवदला ते नय सान्गिटल ते?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 05/09/2016 - 21:55

In reply to मस्तच परीक्षण. चित्रपट न by अजया

Permalink

चित्रपट न आवडता परीक्षणं आवडली.....

हे आमच्या बाबतीत बर्‍याच वेळा घडते. क्लर्क, मोहबते, फरिश्ते सारखी परीक्षणे पण आवडली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Mon, 05/09/2016 - 20:02

Permalink

माझे मत माझ्यापाशी!

माझे मत माझ्यापाशी!
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 05/09/2016 - 22:23

In reply to माझे मत माझ्यापाशी! by अजया

Permalink

द्या ओ द्या

इथं मतं मागायला आणि द्यायलाच सगळे येत असतात ! तुमचं मत काय कोहिनूर आहे काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 05/10/2016 - 18:18

In reply to द्या ओ द्या by सस्नेह

Permalink

चित्रपट संगीत चित्रं या

चित्रपट संगीत चित्रं या स्वानंदासाठी घ्यायच्या गोष्टी आहेत.माझे मत दुसर्याला पटवून ते आवडवुन घेणे हे कलेबाबत कसे होऊ शकते? म्हणून माझे मत माझ्यापाशी. त्याच्या कारणांचा चिवडा करायची अजिबात इच्छा नाही! माझे मत कोहिनूरच मग;)
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Mon, 05/09/2016 - 22:15

Permalink

मस्त परीक्षण...(चित्रपट पाहून

मस्त परीक्षण...(चित्रपट पाहून केलंय हे विषेश.) बाकी सीवील वॉर वर न बघता एक परीक्षण लीवीन म्हन्तोय...उगाच आपला नाय आवडला म्हणून.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 05/09/2016 - 22:18

In reply to मस्त परीक्षण...(चित्रपट पाहून by खटपट्या

Permalink

सीवील वॉर वर न बघता एक परीक्षण लीवीन म्हन्तोय...

बिंधास्त लिहा...
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Mon, 05/09/2016 - 22:25

In reply to सीवील वॉर वर न बघता एक परीक्षण लीवीन म्हन्तोय... by मुक्त विहारि

Permalink

आधी सैराटसारखी ऐकीव माहीती

आधी सैराटसारखी ऐकीव माहीती कानावर तर येउदे की... हवा बनली पायजे ना. तरी पन मला नाय जमनार वो. तुमी लीवा. मी पन विंग्रजी पीच्चर चा फॅन हायेच. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 05/10/2016 - 13:20

In reply to आधी सैराटसारखी ऐकीव माहीती by खटपट्या

Permalink

चित्रपट परीक्षण....

....किंवा एखाद्या कलाकृतीचे रसग्रहण, हा माझा प्रांत नाही....त्यामुळे आपला पास.... सध्या हेरॉल्ड लॉइडचा अभ्यास सुरु आहे. चॅप्लिन आणि हेरॉल्ड यांची नकळत तुलना होत आहे. भारतात म्हणावा तसा हेरॉल्डला प्रतिसाद मिळाला नाही. कधी कंटाळा आला तर हेरॉल्ड लॉइडचे "सेफ्टी लास्ट" आणि "व्हाय वरी", हे सिनेमे मात्र आवर्जून बघा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता श्रीपाद on Tue, 05/10/2016 - 11:47

Permalink

समीर बर्याच दिवसानी तुझं मस्त

समीर बर्याच दिवसानी तुझं मस्त परीक्षण वाचायला मिळालं... चित्रपटाचे प्रोमो आणि गाणी अतिशय म्हणजे अतिशय आवडली आहेत...पण अजुन चित्रपट पहायला वेळ नाही मिळाला... पण लवकरात लवकर पाहीनच... मलासुद्धा अर्ची अतिशय सुन्दर वाटली....एक मस्त गावरान सौदर्य आहे तिच्यात..बोलके डोळे हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट....आणि आकाश ठोसर पण एकदम मस्त....
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Tue, 05/10/2016 - 12:10

In reply to समीर बर्याच दिवसानी तुझं मस्त by स्मिता श्रीपाद

Permalink

बरोब्बर!

बरोब्बर! तिच्या डोळ्यात एक अशी निराळीच हवीहवीशी वाटणारी, नाजूक बेफिकीरी आणि मग्रुरी आहे. परश्या पण मस्त आहे. गाणं चालू असतांना शेतात स्लो मोशनमध्ये तो जो डान्स करतो तो फारच सही वाटतो. त्याचा कोवळेपणा, भांबावलेपणा, नंतरचा टिपीकल पुरुषी अहंकार हे सगळं आकाशने मस्त दाखवले आहे. येत्या वीकेंडला पाहून टाका बरं सैराट! महत्वाची कामं अशी वार्यावर सोडू नये...
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Tue, 05/10/2016 - 12:11

Permalink

हा प्रतिसाद रिंकूसाठी..

मी 'सैराट' पाहीला नाहीये. कदाचित टिव्हीवर येईल तेव्हाच बघता येईल, किंवा Official CD आल्यावर.. पण रिंकूनं महाराष्ट्राला वेड का लावलंय, हे कळलं जेव्हा 'येड लागलं' चा व्हिडीयो पाहीला युट्युबवर तेव्हा.. काय जबरा अ‍भिनय करते पोरगी!! व्वा !! त्या गाण्यात जेव्हा परश्या विहरीत उडी टाकून पायर्‍यांवर तिला क्रॉस करतो, तेव्हा आर्ची त्याला मागून हलकेच वेडावते. मानेच्या आणि डोळ्यांच्या अगदी नाजूकश्या हालचालीतून रिंकूनी तो वेडावण्याचा आणि अ‍ॅप्रिशीएट करण्याचा अभिनय केलाय. एवढया नाजूकपणे की मला प्रतिसाद देण्यापूर्वी पुन्हा एकदा व्हिडीओ बघावा लागला कि मला भास नाही झालाय.. मानलं ह्या पोरीला.. डोक्यात हवा न जाऊ देता जर असाच अभिनय करत राहिली तर ही पोर मोठ्यामोठ्यांना पाणी पाजणार, हे नक्की..
  • Log in or register to post comments

Submitted by धनावडे on Tue, 05/10/2016 - 12:47

In reply to हा प्रतिसाद रिंकूसाठी.. by चिगो

Permalink

आता ग बया ह्याचा पण व्हिडीवो

आता ग बया ह्याचा पण व्हिडीवो बघा वेड लावते पोर आणि त्यायला वर्गाच्या बाहेरचा सीन तर अभ्या भाऊ म्हणतात तस हजार टेक घेतले तरी जमणार नाय
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 05/10/2016 - 12:51

In reply to हा प्रतिसाद रिंकूसाठी.. by चिगो

Permalink

आर्ची तुम्हाला पण आवडली का ?

आर्चीचा अभिनय, लंबर एकच झाला आहे. संपूर्ण चित्रपट तिच्याच भोवती पिंगा घालतो, बाकीची पात्रं कथानकाला हवी असतात म्हणुन दिग्दर्शकाला टाकावी लागली आहेत, असे वाटावे इतकी ती चित्रपटात भाव मारते. खरं सांगू का, रिंकु राजगुरु यांनी आता चित्रपटात काम करु नये. कारण आपल्या डोक्यात सैराट शिवाय दुसरं काही उमटू शकत नाही, समीक्षक पुढे सतत म्हणत राहतील की सैराट चित्रपटात जो अभिनय झाला आहे, तो नव्या चित्रपटात जमलाच नाही. नागराज मंजुळेला नेहमीच नव्याचा सोस असतो, मला वाटत नाही तिला अजून संधी मिळेल आणि मिळाली तरी ती तितकी यशस्वी होईल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 05/10/2016 - 12:56

In reply to आर्ची तुम्हाला पण आवडली का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Tue, 05/10/2016 - 13:31

In reply to आर्ची तुम्हाला पण आवडली का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

तिला डॉक्टर व्हायचं आहे,

तिला डॉक्टर व्हायचं आहे, अभिनित्री न्हाय म्हणं.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 05/10/2016 - 13:37

In reply to तिला डॉक्टर व्हायचं आहे, by तर्राट जोकर

Permalink

तिला डॉक्टर व्हायचं आहे, अभिनित्री न्हाय म्हणं.

अच्छा म्हणजे आधी डॉ. आणि मग अभिनेत्री की आधी अभिनेत्री आणि मग डॉ. डॉ.श्रीराम लागू, डॉ.काशीनाथ घाणेकर, डॉ.गिरीश ओक हे पण डॉक्टरची पदवी घेवून मग अभिनेते झालेच की. हे सिनेमाचे जगत फार वेगळे, आमची बॉबी डिंपल पण नंतर सागरमध्ये आलीच की.....
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Tue, 05/10/2016 - 14:04

In reply to तिला डॉक्टर व्हायचं आहे, अभिनित्री न्हाय म्हणं. by मुक्त विहारि

Permalink

वो कुच्छ हमको मालूम नही. आगे

वो कुच्छ हमको मालूम नही. आगे आगे देखो होता है क्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 05/10/2016 - 17:31

In reply to वो कुच्छ हमको मालूम नही. आगे by तर्राट जोकर

Permalink

यशाची हवा एकदा डोक्यात गेली की.....

भले भले गठाळतात.... "कबूतर का बदला" उर्फ "मैं ने प्यार किया" मधली भाग्यश्री पण नंतर सिनेमांत आलीच. गेला बाजार, धक धक फेम माधूरी दिक्षित-नेने पण इथे आलीच. जावू दे हो..... ह्या कलाकारांवरून वाद-विवाद करण्यात काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 05/10/2016 - 14:36

In reply to तिला डॉक्टर व्हायचं आहे, by तर्राट जोकर

Permalink

अरे वा !

प्रा.डॉ. व्हायचंय का ? अरे वा छान. तिचं एम. ए. होईपर्यन्त आपल्या काही फ्यान क्लब सदस्यांच्या गोवऱ्या पुढे गेल्या असतील ! नववी नंतर पीएच. डी. करता येते का ? चौकशी करा भो ! ;) ( अवांतर : हुशार, थोर, गंभीर, तज्ञ लोकांनी आमच्या प्रतिसादापासून दूर राहावे, ही नम्र विनंती) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 05/10/2016 - 14:38

In reply to अरे वा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अवांतर : हुशार, थोर, गंभीर,

अवांतर : हुशार, थोर, गंभीर, तज्ञ लोकांनी आमच्या प्रतिसादापासून दूर राहावे, ही नम्र विनंती
उदाह्रणार्थ?
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 05/11/2016 - 00:38

In reply to अरे वा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

तीला इंजेक्शन मारणारा/(री?)

तीला इंजेक्शन मारणारा/(री?) डॉक्टर व्हायचं असेल तर ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 05/10/2016 - 14:24

Permalink

कोणी राहिलं का भो सैराट वर लिहायचं ?

सैराट चित्रपटावर कोणी परीक्षण लिहायचं असेल तर प्लीज लिहा, उगा संकोच करू नका. फूल हवा हाय आपल्या सैराटची. -दिलीप बिरुटे (मिपा सैराट मित्र मंडळ सदस्य) :)
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Tue, 05/10/2016 - 14:35

In reply to कोणी राहिलं का भो सैराट वर लिहायचं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

चित्रपट न पाहता लिहिलं तर

चित्रपट न पाहता लिहिलं तर चालेल का ? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 05/10/2016 - 14:48

In reply to चित्रपट न पाहता लिहिलं तर by सस्नेह

Permalink

नो नाय नेव्हर. :)

चित्रपट पाहुन काही लिहिलं तर कसं त्याला एक वजन येतं. चित्रपट कुठे भिडला, छप्पर कुठे डोक्याला लागलं, आर्ची ज्या विहिरीत पोहोली ती विहीर कोरडी का पडली, परशाच्या अंगावर टी शर्ट भारी होते, महाग दिसत होते, वडील एका छोट्या बोटीचे मालक होते तर परशा हजार दोन हजाराचा मोबाइल का घेत नै ? आर्ची ट्र्याक्टर कोणत्या गेर मधे चालवते ? भाऊ दोन तीन वर्षांनी बहिनीला भेटायला येतो, त्याला बहिनीबद्दल प्रेम वाटलं नाही, त्या कारणाचा एक मानशास्रीय अभ्यास करता येतो, उत्तम चर्चा करता येते म्हणून चित्रपट पाहुन चित्रपटाबद्दल बोलावं अशी आमच्या फ्यान क्लबची मागणी आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Tue, 05/10/2016 - 15:04

In reply to नो नाय नेव्हर. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

वोक्के, मागणी मान्य करण्यात

वोक्के, मागणी मान्य करण्यात येत आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Fri, 05/13/2016 - 18:07

In reply to वोक्के, मागणी मान्य करण्यात by सस्नेह

Permalink

पाहिला बाॅ आज सैराट.

पाहिला बाॅ आज सैराट. भल्याभल्यांनी परीक्षण सही लिहिलय तेवढं काही जमणार नाही पण माझं मत म्हणून चार ओळी खरडाव्या वाटल्या खर्या ! लिहावं का ?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 05/13/2016 - 18:19

In reply to पाहिला बाॅ आज सैराट. by सस्नेह

Permalink

लिवा की, त्येला काय हुतंय!!

लिवा की, त्येला काय हुतंय!!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 05/16/2016 - 17:07

In reply to लिवा की, त्येला काय हुतंय!! by सूड

Permalink

काल

बघीतला इकडे वाढविला (उंचावला) तितका मोठा वाटला नाही आणि अगदी चिल्लरीत काढण्याइतका सानाही वाटला नाही. शेवट काहीसा डोक्यात ठेऊन केलेल्या चित्रपट (स्वातंत्र्य व तडजोडी) दिसल्या तरी संगीताबाबत उजवा आहे नि:संशय अगदी माझ्या ८ वर्षाच्या मुलीला गाणी आवडली (थोरल्याला कट्यारची गाणी आवडली आणि तोंडपाठ झालीत). हिरोचे कपडे गरीबीतले नाहीत (फक्त स्वभावाने गरीब हाये). जे दाखावायचं आहे ते बिन्धास आणि खोट्या खोट्या लोकेशनवर दाखविले नाही ही मोठ्ठी जमेची बाजू.अभ्याने साम्गीतलेल्या द्रुश्य परिणाम अस्सल ग्रामीण बाजाबाबत सहमती. बाकी मी माझ्या मगदूरानुसार लिहिले.कुणी फार मनाला लावून घेऊ नै. पिटातला नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 05/10/2016 - 17:16

In reply to चित्रपट न पाहता लिहिलं तर by सस्नेह

Permalink

चित्रपट न पाहता लिहिलं तर चालेल का?

न चालायला काय झाले? लोकं सौदी अरेबियाला किंवा गल्फला न जाता पण, तो विभाग कसा आहे, हे सांगतातच ना? ते जावू दे, आमच्या गांधी बाबांची पुस्तके किंवा चर्चिल वरील, हिटलरवरील लेख न वाचता पण त्यांच्याविषयी पोट-तिडिकेने लिहितातच ना? ते पण राहू दे, फार कमी लोक चंद्रावर गेले आहेत, तरी पण मानव चंद्रावर गेलाच नाही, ह्यावर पण उहापोह करतातच. मग तुम्हीच कशाला मागे हटत आहात?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Tue, 05/10/2016 - 14:51

In reply to कोणी राहिलं का भो सैराट वर लिहायचं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

जौ द्या हो बिरुटेसर, लोक आता

जौ द्या हो बिरुटेसर, लोक आता गेमऑफथ्रोन च्या त्या सिंहासनावरची सगळी हत्यारं नै तर सिविल वॉरमधी वापरलेल्या सगळ्या सुप्पर पावर घेऊन मागं लागतील... =))
  • Log in or register to post comments

Submitted by पथिक on Tue, 05/10/2016 - 18:01

Permalink

आवडले ! सहमत.

आवडले ! सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by लालगरूड on Fri, 05/13/2016 - 18:49

Permalink

पिंपरी : पडत्या काळात कष्ट

पिंपरी : पडत्या काळात कष्ट करून साथ दिली; मात्र ज्यांच्यामुळे यश मिळाले त्यांनाच नागराज मंजुळे यांनी दूर लोटले, अशी कैफियत नागनाथ मंजुळे यांच्या पत्नी सुनीता यांनी व्यक्त केली आहे. सध्या चिंचवड येथील रामनगर झोपडपट्टीत वडिलांच्या घरी राहत असून, धुणी- भांडी करून उदरनिर्वाह करीत आहे. मला बाकी काही नको. केवळ पत्नी म्हणून त्यांनी पुन्हा नांदवावे, असे सुनीता यांचे मागणे आहे. याबाबत नागनाथ मंजुळे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. चिंचवड येथील रामनगर झोपडपट्टीतील राहत्या घरी ‘लोकमत’शी बोलताना सुनीता म्हणाल्या, ‘‘१९९७मध्ये नागराज यांच्याबरोबर विवाह झाला. विवाहानंतरही त्यांचे शिक्षण सुरू होते. मला शिकायचे आहे, काही अपेक्षा बाळगू नको, मूलही नको, असे सांगून त्यांनी माझ्याबरोबर १५ वर्षे काढली. नागराज, भारत, शेषराज, भूषण ही चार भावंडे. त्यातील शेषराज, भूषण अगदी छोटे. त्यांना आईच्या मायेने वाढवले. शिक्षण झाले, यश मिळत गेले, तशी त्यांची माझ्याबरोबर वागण्याची पद्धत बदलली. पत्नीचा दर्जा न देता, तू अल्पशिक्षित आहेस, तुझ्या आई- वडिलांकडे जा, असे म्हणू लागले. त्यांचे वडील मला मुलीसारखे सांभाळायचे. त्यांचे २००७ मध्ये निधन झाले. त्यानंतर नागराज यांच्याकडून वाईट वागणूक मिळू लागली. २०११ मध्ये त्यांच्या ‘पिस्तुल्या’ या लघुपटाला राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. त्या वेळी मला एकटीला घरात सोडून, ते पुरस्कार घेण्यास गेले. ही गोष्ट माझ्या मनाला क्लेशदायक होती. पत्नी म्हणून ज्या घरात आले, त्या घरात मोलकरणीची वागणूक माझ्या वाट्याला आली. पत्नीचा दर्जा कधीच मिळाला नाही. इतकी वर्षे मी त्यांच्याकडे नांदले. सारे काही सोसले. बिकट परिस्थितीत साथ दिली. आता त्यांनी मला पत्नी म्हणून स्वीकारावे, एवढीही अपेक्षा मी का बाळगू नये? चार वर्षांपासून मी रामनगरला आई-वडिलांकडे राहत आहे. धुणी-भांडी अशी कामे करून जगत आहे. आई-वडील आता वृद्धापकाळाचे जीवन जगत आहेत. त्यांची साथ किती दिवस मिळणार, त्यानंतर पुढे काय, असा प्रश्न मला सतावत आहे. घरची परिस्थिती बिकट असताना पडत्या काळात अर्धांगिनी म्हणून साथ दिली. कसलीही अपेक्षा बाळगली नाही. हालअपेष्टा सोसल्या. त्यांनी मोठे व्हावे, यश मिळवावे, यासाठी मनाला, इच्छा-आकांक्षांना मुरड घातली. ज्यांनी जिवाचे रान केले, त्यांचाच विसर नावलौकिक मिळविलेल्या नागराज मंजुळे यांना पडला आहे. त्यांच्या सैराट चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या दोन आठवड्यांत ४० कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडला. त्यातील काही तरी मिळावे, ही अपेक्षा नाही, तर ज्यांचा खऱ्या अर्थाने त्यांच्या यशात वाटा आहे, त्यांनाच यशाच्या शिखरावर आरूढ झाल्यानंतर दूर लोटावे, हे मनाला क्लेषदायक वाटते, अशी कैफियत त्यांनी मांडली. > सैराट चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे नागराज मंजुळे यांचे नाव चर्चेत आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील मुलाखती आणि अन्य कार्यक्रमात ते जेव्हा मनोगत व्यक्त करतात, त्या वेळी यशात कोणाचा वाटा आहे, हे सांगताना त्यांना माझ्याबद्दल काहीच सांगावेसे वाटत नाही. नागराज मंजुळे या नावाला जेव्हा काहीच वलय नव्हते, तेव्हा त्यांना ज्यांनी साथ दिली. त्यांच्याबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करू शकत नाहीत, याबद्दल खेद वाटतो. - सुनीता मंजुळे > नवऱ्याने सोडले, आम्ही कसे टाकणार? नागराज मंजुळे यांनी सुनीताला घराबाहेर काढले. आई, वडील या नात्याने आम्हाला तिला सांभाळण्याची वेळ आली. चार मुली; त्यातील सुनीता ही दुसऱ्या क्रमांकाची मुलगी. तिचा विवाह नागराज मंजुळे यांच्याबरोबर लावून दिला. सोलापूरला जेऊरला ती गेली. पुढे तिच्या आयुष्यात असे काही घडेल, असे वाटले नव्हते. नागराज यांनी कृतघ्नता दाखवली. समाजात दाखवायचा चेहरा एक आणि प्रत्यक्ष वागणूक वेगळीच याचा प्रत्यय आला. उशिरा का होईना, जाणीव व्हावी, एवढीच अपेक्षा आहे
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Sat, 05/14/2016 - 00:52

In reply to पिंपरी : पडत्या काळात कष्ट by लालगरूड

Permalink

कुठल्या जातीच्या पेपरमध्ये

कुठल्या जातीच्या पेपरमध्ये आलंय म्हणे हे?
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Mon, 05/16/2016 - 11:52

In reply to पिंपरी : पडत्या काळात कष्ट by लालगरूड

Permalink

सैराट

सैराट इतका हिट्ट झाल्यावर आणि त्याची उड्डाणे पार ५५ कोटींच्या पल्याड गेल्यावरच हा वाद कसा काय निघाला? अचानक इतका पैसा येतोय म्हणून थोडे आपलेदेखील हात ओले करून घ्यावेत असा विचार तर नाही ना यामागे? आणि एनीवे, तो त्यांचा पर्सनल मामला आहे. नट-नट्या, सिनेमावाले वैयक्तिक आयुष्यात काय करतात, कुठे जातात हे जाणून घेण्याइतकं महत्व त्यांना द्यायची गरज नाही. मागे एकाने मला सांगीतलं की मलैकाचा घटस्फोट होणार आहे म्हणून. म्हटलं होऊ दे...आपल्याला काय करायचंय. असल्या बातम्या चवीने वाचून आपला वेळ का व्यर्थ दवडा?
  • Log in or register to post comments

Submitted by धनावडे on Mon, 05/16/2016 - 19:50

In reply to पिंपरी : पडत्या काळात कष्ट by लालगरूड

Permalink

लोकमतमध्येच दोन दिवसानंतर

लोकमतमध्येच दोन दिवसानंतर बातमी होती की घटस्पोट कायदेशीर आणि परस्पर संमतीने पोटगीची ७ लाख रुपये घेउन झाला आहे
  • Log in or register to post comments

Submitted by anilchembur on Mon, 05/16/2016 - 19:54

In reply to पिंपरी : पडत्या काळात कष्ट by लालगरूड

Permalink

अरेरे काय हे !

बायकोला सोडुन नवरे प्रधानसेवक बनतात. तुझा नवरा षिनिमावाला झाला तर लगेच पेप्रात बातमी ?
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश भिडे on Tue, 05/17/2016 - 10:35

Permalink

सैराट बघितला. (कसा बघितला हे

सैराट बघितला. (कसा बघितला हे नका विचारु) तेलुगू चित्रपट बघणारांना अजिबात च नवा वाटणार नाही. अगदीच सामान्य (कॉमन या अर्थाने) वाटला.... यशामध्ये मार्केटिंग आणि संगीत याचा जास्त भाग आहे असं वाटतंय. अर्थात कॅमेरा बोलतो , दिग्दर्शन छान भाष्य करतं वगैरे आहे यात वाद नाही. याच्या पेक्षा fandry कितीतरी उजवा, खरा आणि टू द पॉईंट होता. माझ्या मते आकाश ठोसर (परश्या) जास्त कॅलिबर वाला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 05/17/2016 - 10:57

In reply to सैराट बघितला. (कसा बघितला हे by रमेश भिडे

Permalink

बरं !!

बरं !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 05/17/2016 - 11:10

In reply to सैराट बघितला. (कसा बघितला हे by रमेश भिडे

Permalink

ब्वारं.

ओके. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 05/17/2016 - 11:05

Permalink

नक्की कोणत्या धाग्यावर लिहावे

नक्की कोणत्या धाग्यावर लिहावे हे कळेना म्हणुन अक्कड बक्कड बंबे बो.. करुन हा निवडला.. सैराट पाहिला. बरा आहे. संथ आहे. लांबी कमी केली असती तर जास्त परिणामकारक वाटला असता. स्लो मोशनचा वापर जास्त झालाय. दोन्ही कलाकार गुणी आहेत. पण राष्ट्रिय पुरस्कार मिळण्यासारखा अभिनय वाटला नाही. शेवट माहिती असल्याने धक्का बसला नाही पण वाईट वाटले. एकंदरित जेवढी हवा आहे तेवढं काही भारी वाटलं नाही. गाण्यांबद्दल मत कायम आहेत. चांगली असली तरी नाविन्य नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Tue, 05/17/2016 - 11:49

In reply to नक्की कोणत्या धाग्यावर लिहावे by पिलीयन रायडर

Permalink

२ तास ५४ मिनिटांचा आहे 'सैराट'

२ तास ५४ मिनिटांचा आहे 'सैराट'. लांबी जरा जास्त आहे हे खरं. १५-२० मिनिटे नक्कीच कमी करता आला असता. दोन्ही नवखे आहेत आणि शिवाय ग्रामीण भागातले आहेत. चित्रपटांशी अगदी दुरान्वयेही संबंध नसतांना त्यांनी चित्रपट या मोठ्या माध्यमाची जी समज दाखवली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. कदाचित या पार्श्वभूमीवर रिंकूला 'विशेष दखल' मिळाली असावी. तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाहीये; स्पेशल मेंशन मिळालं आहे. अर्थात तो ही मोठा मान आहेच. संथ असला तरी कथानक पुढे सरकत राहतं आणि उत्सुकता वाढत राहते. शेवट माहित असला तरी त्या वळणापर्यंत चित्रपट कसा पोहोचतो हे जाणून घेण्याची उत्सुकता जाणवते. सैराट मध्ये नेमकं काय आवडलं हे तपासून बघायला मी सैराट पुन्हा बघणार आहे. :-) बरंच काही सापडतं पुन्हा पाहिला की. मी तलाश, परिंदा, बीपी, जॉनी गद्दार, सरफरोश आणखी असे बरेच चित्रपट लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहिले होते. मला वाटतं एक असं काहीतरी असतं ज्याला चित्रपट भिडला की मग तो चित्रपट मजबूत आवडतो. चित्रपटात उणीवा असतील तरी असा चित्रपट आवडतो. पुन्हा पुन्हा बघायला आवडतो. माझी सोपी चाचणी आहे. जर एका आठवड्याच्या आत जर मी एखादा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये जाऊन पाहू शकलो तर तो चित्रपट मला आवडला आहे असे मी बेलाशक समजतो. आणि हे दुसर्यांदा चित्रपट बघणं फक्त इमेजीन केलं तरी निर्णय मिळतो. तुम्ही काही दिवसांनी पुन्हा बघा सैराट किंवा तसे इमेजीन करून बघा. कदाचित आवडेल... :-) अर्थात तुमच्या आवडी-निवडीचा पूर्ण आदर आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 05/17/2016 - 11:56

In reply to २ तास ५४ मिनिटांचा आहे 'सैराट' by समीरसूर

Permalink

हं.. असा ट्राय करता येईल.

हं.. असा ट्राय करता येईल. पण फक्त जेवढा उदो उदो होत आहे तेवढं नक्की काय विशेष आहे हे समजले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Tue, 05/17/2016 - 12:10

In reply to हं.. असा ट्राय करता येईल. by पिलीयन रायडर

Permalink

रिंकू राजगुरू ऊर्फ़ अर्ची - ही आवडली नाही असं मला कुणीच भेटलं

माझ्या मते: १. रिंकू राजगुरू ऊर्फ़ अर्ची - ही आवडली नाही असं मला कुणीच भेटलं नाही. मराठी चित्रपटात अशी बिनधास्त डेअरिंगबाज पोरगी खूप वर्षांनंतर आली. तिचा रांगडेपणा, धष्टपुष्ट शरीरयष्टी, तरुणांना जसं आवडतं तसे विभ्रम करणं वगैरे भलतंच आवडून गेलं लोकांना. मलादेखील ती खूप आवडली. ती का आवडली याचं नेमकं उत्तर सांगणं अवघड आहे पण पुरुष प्रेक्षकांना ती जास्त आवडली आहे हे नक्की. २. गाणी तुफान हिट झालीत. वेड्यासारखी गाणी आवडली लोकांना. ३. साधी प्रेमकथा आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे तरुण - तरुणीमधली आंबट-गोड देवाण-घेवाण बघायला, ऐकायला आवडतेच. ४. अभिनय, चित्रीकरण, कथा-पटकथा, कलादिग्दर्शन, इत्यादी तांत्रिक बाबींवर चित्रपट नक्कीच उजवा आहे. एक-एक फ्रेम काय सुंदर आहे! ५. आपल्या आस-पासची कथा आहे असं वाटतं. कदाचित आपली स्वत:ची! रिलेट होणं खूपच सोप्प होतं. नीटनेटकी मांडणी, दमदार हिरोईन, सुरेल गाणी, सगळ्यांच्या जिव्हाळाचा विषय, आणि छान अभिनय अशी भट्टी जुळून आल्यावर चित्रपट हिट नसता झाला तरच आश्चर्य वाटलं असतं.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 05/17/2016 - 12:15

In reply to रिंकू राजगुरू ऊर्फ़ अर्ची - ही आवडली नाही असं मला कुणीच भेटलं by समीरसूर

Permalink

मुद्दे पटण्यासारखे आहेत. पण

मुद्दे पटण्यासारखे आहेत. पण तरीही अति हाईप झाली आहे असे मत आहे. इथेच किती धागे निघाले पहा ना. म्हणुन माझ्याही अपेक्षा फार उंचावल्या होत्या. अशानेही मला फार काही भारी वाटले नसेल. अर्थात माझ्यासारखे मत असणारेही अनेक आहेत. ज्यांना हा पिक्चर सामान्य वाटला. पण मायनोरिटी! मला असं राहुन राहुन वाटतंय की जे लोक गावात राहिलेले आहेत, ज्यांनी हे वातावरण पाहिले आहे, त्यांना जास्त आवडतोय. आम्च्या सारख्या जन्मल्यापासुन शहरातच राहिलेल्या लोकांना कदाचित एवढा नाही भावला. (अंदाज आहे..) पण असो.. तुम्हाला आवडला ना! गुड!
  • Log in or register to post comments

Submitted by धनावडे on Tue, 05/17/2016 - 13:00

In reply to मुद्दे पटण्यासारखे आहेत. पण by पिलीयन रायडर

Permalink

भाषेमुळे ही आवडला असेल

भाषेमुळे ही आवडला असेल लोकांना कारण उगाच जीभ वाकडी करुन कुणी ग्रामीण भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत नाय
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com