Skip to main content

रजा घेणे हक्क, पाप का गुन्हा ??

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 06/05/2016 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
पोलिसांच्या राजेबद्द्ल ची हि बातमी वाचून एक सलत असलेला विषय मांडावासा वाटतोय. आपल्या कडे एकूणच रजा घेणे हे काहीतरी चूक, पाप, अनैतिक किंबहुना अनावश्यक आहे ...नाईलाज म्हणून रजा हा प्रकार अस्तित्वात आहे अशी काहीशी मानसिकता आहे. रजा देणारा, स्वत:च्या खिशातून काहीतरी मेहेरबानी म्हणून दिल्यासारखी रजा देतो आणि घेणारा रजा मिळाली कि 'हुश्श' करतो असे सर्वसाधारणपणे दिसते. पुलंनी म्हटल्याप्रमाने (विनोदाने का होईना) "कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची १२०० सुलभ कारणे" वगैरे हे ह्याच मानसिकतेची अपरिहार्य परिणती आहे. आपल्याकडे आपण जनरली १ २ दिवस रजा घेतो पण ती घेतांना काहीशी चोरटे पणाची भावना असते... रजेवर गेलास तरी फोनवर उपलब्ध राहा अशी मूक आज्ञा बॉसच्या चेहेऱ्यावर स्वच्छ लिहिलेली असते ...आणि क्वचित वेळीप्रसंगी रजा रद्द करून परत यावे लागण्याची उदाहरणे पाहिलेली आहेत. पाश्चात्य जगात लोक २ -२/ ३- ३ आठवडे रजा वर्षातून एका पेक्षा जास्त वेळा अगदी सहज घेतांना दिसतात .. ...कामाची काही का आग लागेना रजा रद्द करून परत आलाय किंवा रजेवर गेलाच नाही ...असे मी कधीही पहिले नाही ... जे हक्काच्या रजेचे तेच सार्वजनिक/साप्ताहिक सुट्ट्यांचे, आपल्याकडे कुणीही कधीही कुणालाही फोन करून कामाचे बोलू शकतो, पाश्चात्य जगात सुट्टी सोडा कामाचे तास सोडून कुणी फोनवर एरवी प्रतिसाद सुद्धा देणार नाहीत (ह्याला अपवाद म्हणजे खरोखरीचे काहीतरी जबरदस्त कारण असते). ह्याच्यावर कडी म्हणजे रजा किती साठवता येते ह्यावर दिवसेंदिवस येणारी बंधने ...म्हणजे वरच्या रजांचे नं पैसे मिळणार नं त्या पुढे घेण्याची सुविधा मिळणार ...आणि त्या फक्त वाया जाणार म्हणजे पर्यायाने कर्मचार्याचे नुकसान ... माझा अनुभव खाजगी क्षेत्रातला आहे पण सार्वजनिक क्षेत्रात फार बरी परिस्थिती असेल असे वाटत नाही .. हे असे का ? बदलायला नको का ?काय करता येईल ? जाता जाता : माझ्यापुरते बोलायचे तर मी माझ्या टीम्स मध्ये रजेला कधीही नाही म्हणत नाही, कारणांची उलटतपासणी नाही किंबहुना रजा घेण्यासाठी उद्युक्त करतो ... जेणेकरून टीम मध्ये एक तणावरहित वातावरण निर्माण होते .. लोक एकमेकांची जास्त काळजी घेतात आणि एकमेकांच्या रजांमध्ये कामाची खोटी होऊ देत नाहीत ...आणि त्यातून काही खोटी झालीच तर मी जबाबदारी घेऊन कुणाला झळ बसू देत नाही आणि ह्यामुळे खरे तर उरला सुरला तणाव सुद्धा नाहीसा होतो ...

वाचने 36789
प्रतिक्रिया 139

प्रतिक्रिया

धाग्यातील आणि नीमो, मृत्युंजय इ. च्या प्रतिसादाशी १०० टक्के सहमत ! रजा ही केवळ कागदावरच हक्काची असते. प्रत्यक्षात ती बॉसची मेहेरबानी असते. प्रामाणिकपणे (नुसतेच) काम करण्यार्‍यांना ती क्वचितच मिळते. काम करून चलाखीने वागणाऱ्यांना ती दांड्या मारून मिळते. आणि (काम न करता नुसती) चमचेगिरी करणाऱ्यांना ती विनासायास मिळते.

सुंदर चर्चा चालली आहे. @ काळा पहाड, सुबोध खरे, नीलमोहर आणि मृत्युन्जय यांच्या बहुतेक मुद्द्यांना सहमती. याबाबतीत माझे म्हणणे थोडक्यात असे आहे... नोकरी असो वा व्यवसाय, सेवा देणारा (कर्मचारी / व्यावसायिक) आणि सेवा घेणारा (कंपनी / ग्राहक) यांच्या संबंधामधे कोणाला गमावण्याची कोणाला जास्त भिती वाटते हा कळीचा मुद्दा असतो (Who is afraid of losing whom, is the key.) दुसर्‍याला गमावणे ज्या बाजूला गैरफायद्याचे वाटते ती बाजू कमकुवत असते व तिचा विरुद्ध बाजू गैरफायदा घेऊ शकते. याचा सरळ अर्थ असा की, कर्मचारी किंवा व्यावसायिकाने आपली कामगिरी अशी ठेवली पाहिजे की तो सोडून गेला तर आपला सहजपणे न भरून काढता येण्याजोगा तोटा होईल असे कंपनी किंवा ग्राहकाला वाटले पाहिजे... हा तोटा जेवढा मोठा असण्याची शक्यता असेल व हे जितके सततपणे वाटत राहील, तितके जास्त चांगले. हे वरचढपणाचे समीकरण कर्मचारी-कंपनी / व्यावसायिक-ग्राहक संबंध बनणे, संबंध टिकणे, मान मिळणे, बढती/प्रिमियम मिळणे, शब्दाला वजन असणे, सुट्टी हवी तेव्हा / हवी तशी मिळणे, इ, इ, इ, सर्वच बाबतीत खरे असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ती बाजू कमकुवत असते व तिचा विरुद्ध बाजू गैरफायदा घेऊ शकते. हे वरचढपणाचे समीकरण कर्मचारी-कंपनी / व्यावसायिक-ग्राहक संबंध बनणे, संबंध टिकणे, मान मिळणे, बढती/प्रिमियम मिळणे, शब्दाला वजन असणे, सुट्टी हवी तेव्हा / हवी तशी मिळणे, इ, इ, इ, सर्वच बाबतीत खरे असते. याचा सरळ अर्थ असा की, कर्मचारी किंवा व्यावसायिकाने आपली कामगिरी अशी ठेवली पाहिजे की >> हा टिपिकल भारतीय मानसीकतेचा अ‍ॅवरेज आहे. त्यापेक्षा ताकदवान असलेल्याने, बॉसने, कंपनीने, अधिका-याने एथीकली वागुन माणूस म्हणुन जगावे व इतरांनाही माणूस म्हणुन बरोबरीची वागणुक द्यावी असे का नाही प्रत्येकजण म्हणत? त्याएवजी (त्या त्या परिस्थितीत) कमकुवत असलेल्यानेच झुकावे व अपमान + नुकसान सहन करतच जगावे हेच सगळे का म्हणतात?

In reply to by अभिनव

माझे म्हणणे जरा अजून स्पष्ट करून सांगतो... १. तुमचे म्हणणे नीतीमत्ता व उद्दात्त धोरणे जमेस धरून बरोबर आहे. पण, दुर्दैवाने हे जग त्या तत्वांवर ना कधी चालले, आताही चालत नाही आणि मनुष्यस्वभाव पाहता भविष्यातही चालण्याची शक्यता नाही. जेथे कोठे ते तसे चालले आहे असे वाटते तेथेही कायद्याच्या बडगा धाक/आदर/सवय ठेवून आहे म्हणून तसे होते *. तेथेही अनेक माणसे कायदा धाब्यावर बसवून किंवा अगदी समोरच्याला दाबाखाली ठेऊन मनमानी करता आली तर करतातच, हे काही गुपित नाही. कोणत्याही बाह्यशक्तीच्या दबावाविना स्वतःहून नीतिमान असणार्‍या माणसांचा या जगात सर्व जागी व सर्वकालीन मोठा तुटवडाच राहीला आहे. २. "मी सरळ आणि नीतिमान असले म्हणजे सर्व जग माझ्याशी तसेच वागेल." हे म्हणणे खरे असण्यापेक्षा नसण्याचीच जास्त उदाहरणे दिसतात. या वाक्यावर खरा विश्वास ठेवणार्‍या माणसाला आपण सज्जन आहोत असा सार्थ अभिमान वाटत असला तरी प्रत्यक्षात बहुतेक इतर त्याला बुळा समजून त्याचा फायदा घेतात, हे वस्तुस्थितीतले "विषारी सत्य" आहे. याला काही अपवाद असतीलही, पण अपवादांवर अवलंबून आपले जीवन आखले, तर यशही अपवादात्मक परिस्थितीतच मिळेल. ३. आपण काय करावे यावर आपला ताबा असतो. ४. इतरांनी काय करावे यावर आपला पूर्ण ताबा कधीच नसतो. मात्र, ४.अ) इतरांची कृती आपल्या विचारांप्रमाणे व्हावी यासाठी स्वयंप्रेरित (proactive) प्रयत्न करणे आपल्या हातात असते आणि / किंवा ४.आ) इतरांची कृती झाल्यावर त्याचे परिणाम/दुष्परिणाम पाहून आपली प्रतिक्षिप्त (reactive) क्रिया करणे आपल्या हातात असते. ५. गेलेला वेळ आणि परिस्थिती परत आणणे शक्य होत नाही आणि केवळ मानवी चांगुलपणाच्या भरवश्यावर प्रतिक्षिप्त राहिल्याने नुकसान होण्याचीच जास्त शक्यता असते. आता या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवरही, माझे इतकेच म्हणणे आहे की... अ) सगळे प्रयत्न वैध असावे असाच माझा सतत आग्रह होता/आहे/असेल. कोणतीही गैर अथवा अनैतिक गोष्ट करावी असे मी कधीच म्हणणार नाही. आ) दुसर्‍याने आपल्या बाबतीत कोणतीही अवैध अथवा अनैतिक गोष्ट करण्याअगोदर त्याला दहा वेळा विचार करायची गरज भासावी अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वयंप्रेरित (proactive) व वैध प्रयत्न करणे हे प्रत्येकाच्या १००% हातात असते, तसे करणे प्रत्येकाचा हक्क आहे, तो प्रत्येकाने केला पाहिजे आणि तसे करणे शहाणपणाचे आहे. इ) यात दर वेळेस यश मिळेलच असे नाही. पण, यात निदान आपल्या मनासारखे यश मिळण्याची खूपच जास्त शक्यता आहे... आणि महत्वाचे म्हणजे, आपले जीवन दुसर्‍याच्या चांगुलपणाच्या भरवश्यावर (? भ्रमावर) अवलंबून ठेवण्यापेक्षा स्वयंप्रेरित (proactive) व वैध प्रयत्न करणे खचितच जास्त सन्मानाचे आहे. =========================================== * : भारतात रस्ताभर कचरा करत फिरणारी माणसे सिंगापूरच्या चांगी विमानतळावर "उतरण्यापूर्वी" विमानातच आपल्या हातून काही कचरा नकळत खाली पडणार नाही ना याची खातरजमा करताना दिसतात. तीच माणसे भारतात परत आल्या आल्या आपल्या मूळ स्वभावावर उलटतात ! याबाबतीतली एक गम्मत अशी की, "सिंगापूरचा हा धसका माझ्याही मनात असतो" हे माझ्या एका जर्मन (ज्या लोकांचे शिस्त व स्वच्छतेच्या बाबतीत उदाहरण दिले जाते) दोस्तानेही बोलून दाखवले आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आता तुमच्या ध्यानात आले असेलच की मी म्हणतो तशी मानसिकता भारतियांमध्ये अजून नीट रुजली नाही. स्वतःच्या बळावर "सन्मानाने" आपले महत्व राखण्याऐवजी; काहीही करून "बॉसची मर्जी राखण्यावर व त्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या मर्जीने मिळालेल्या फायद्याला योग्य निर्णय म्हणण्यावर" लोकांचा भर दिसून येतो. हाच आपला सर्वात मोठा दुर्गुण आहे... आणि त्यामुळेच "हाजी हाजी करणे" व "माझी पात्रता वाढवणे यापेक्षा जास्त वरिष्ठांची मर्जी रखण्यावर भर देणे" अश्या वसाहतवादी / संरंजामशाहीवादी सवयी भारतियांच्या मधे स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही दिसतात. विकसित समाज / संस्था / देशाचे मूल्भूत लक्षण असे की ते वैध कायद्याप्रमाणे चालतात, एखाद्या माणसाच्या मेहेरबानीवर नाही. म्हणजेच, सर्वसामान्यपणे, योग्यता मिळवली की तिच्या स्तराचे योग्य ते वैध फायदे त्या व्यक्तीला मिळतात... बॉसच्या मर्जी अथवा गैरमर्जीवर नाही. यालाच कायद्याचे (rule based) राज्य म्हणतात. अर्थातच, तशी योग्यता मिळवणे प्रत्येकाच्या हातात असते, मग ती शिक्षणाच्या बाबतीत असो की अनुभवाच्या की कामगिरीच्या (performance) बाबतीत. माझा पहिला प्रतिसाद परत वाचलात तर असे दिसेल की, मी तर अजून एक पाऊल पुढे जाऊन तेथे म्हटले आहे की, उत्तम योग्यता आहे याच कारणानेच नाही तर आपल्या योग्यतेची दुसरी व्यक्ती शोधणेही कठीण आहे असा दबदबा निर्माण केल्यास त्या व्यक्तीचे स्थान बळकट झाले आहे असे समजावे (The person has arrived !). मग, त्या व्यक्तिला रजा, बढती, इत्यादी मर्त्य (mortal) गोष्टींची काळजी करावी लागणार नाही... त्या गोष्टी त्या व्यक्तीच्या मनात येण्याअगोदरच इतरेजन त्यांची पूर्तता करतील ! हुश्श्य ! जरा मोठा प्रतिसाद...खरे तर दोन प्रतिसाद... झाले. पण मूलभूत गैरसमज टाळण्यासाठी आवश्यक वाटले म्हणूनच हे लिहीले.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

स्वतःच्या बळावर "सन्मानाने" आपले महत्व राखण्याऐवजी; काहीही करून "बॉसची मर्जी राखण्यावर व त्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या मर्जीने मिळालेल्या फायद्याला योग्य निर्णय म्हणण्यावर" लोकांचा भर दिसून येतो.
एकदम पते की बात. अशा पध्दतीने मर्जी राखुन बाकीच्यावर अरेरावी करणार्‍यांचा सुळसुळाट झाला आहे.स्वबळावर सन्मानाने जगणर्‍यांची अशा वेळी खुप परवड होते.

In reply to by मराठी_माणूस

अशा पध्दतीने मर्जी राखुन बाकीच्यावर अरेरावी करणार्‍यांचा सुळसुळाट झाला आहे.स्वबळावर सन्मानाने जगणर्‍यांची अशा वेळी खुप परवड होते. याबाबत असे म्हणता येईल की... जशी कंपनी आपल्याला हव्या त्या चांगल्या कर्मचार्‍यांच्या शोधात असते, तसेच चांगले (पक्षी : आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास असणारे आणि सन्मानाने राहण्याची इच्छा व धमक असणारे) कर्मचारी आपल्याला हव्या त्या चांगल्या कंपनीच्या शोधात असतात. कमी जास्त वेळाने दोघे एकमेकाला सापडले तरच तोच संबंध "प्रेमाचा" होतो... अन्यथा किंवा तशी संधी मिळेपर्यंत "तडजोडीचा मामला" चालू ठेवणे ही खर्‍या जीवनातली तडजोड करावीच लागते :) मात्र, वरच्या चांगल्या कर्मचार्‍यांच्या व्याख्येत न बसणार्‍यांना ती तडजोड बहुदा जीवनभर करावी लागते. :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

छान प्रतिसाद. फक्त एक भर अशी की आपल्या योग्यतेची दुसरी व्यक्ती शोधणेही कठीण आहे असा दबदबा निर्माण केल्यास त्या व्यक्तीचे स्थान बळकट झाले आहे असे समजावे एखादी कंपनी एका विशिष्ट माणसावर इअतकी वलंबून राहत असेल तर ते त्या कंपनीचे व्यावसायिक अपयश आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

एखादी कंपनी एका विशिष्ट माणसावर इअतकी वलंबून राहत असेल तर ते त्या कंपनीचे व्यावसायिक अपयश आहे. १००% खरे. म्हणूनच वर म्ह्टले आहे की... नोकरी असो वा व्यवसाय, सेवा देणारा (कर्मचारी / व्यावसायिक) आणि सेवा घेणारा (कंपनी / ग्राहक) यांच्या संबंधामधे कोणाला गमावण्याची कोणाला जास्त भिती वाटते हा कळीचा मुद्दा असतो (Who is afraid of losing whom, is the key.) दुसर्‍याला गमावणे ज्या बाजूला गैरफायद्याचे वाटते ती बाजू कमकुवत असते व तिचा विरुद्ध बाजू गैरफायदा घेऊ शकते. दोन्ही बाजूंना आपले स्थान उंचावण्याची समज, गरज आणि संधी असली तरच स्पर्धा निरोगी राहते आणि मगच एकमेकाला एकमेकाची किंमत "नीट" समजणे आणि राखणे शक्य होते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून दोन तत्वे... १. वैयक्तीक आयुष्य असो वा कामाची जागा; कोणालाही मान दिला जात नाही, तो आपल्या कृतीने आणि कामगिरीने (परफॉर्मन्स) मिळवायचा असतो. (एखाद्या भोळ्या आईनस्टाईनला राबवून त्याच्या कामावर स्वतः नोबेल प्राईझ लाटणारे चलाख लोक जगभर सर्वत्र आहेत.) २. जेव्हा कर्मचार्‍याला खरी किंमत दिली जात नाही तेव्हा खालीलपैकी एक किंवा जास्त कारणे असू शकतात... ......(अ) कर्मचार्‍याला स्वतःची किंमत माहीत नाही ......(आ) कर्मचार्‍यामध्ये आपली किंमत वसूल करण्याची धमक अथवा व्यवहातचातुर्य (tact) नाही ......(इ) कंपनीमध्ये (पक्षी : बॉसमध्ये) कर्मचार्‍याची किंमत जाणण्याची समज नाही ......(ई) कंपनीमध्ये कर्मचार्‍याची किंमत जाणून तिचा योग्य सन्मान ठेवण्याची नियत नाही (अ) आणि (आ) कारणांमध्ये कर्मचार्‍याने स्वतःत योग्य ते बदल घडवून आणल्याशिवाय काही बदल होणे जवळ जवळ अशक्य आहे. (इ) किंवा (ई) या कारणांमध्ये कर्मचार्‍याने त्या कंपनीत कायम चिकटून राहणे त्याच्या दीर्घकालीन भविष्याच्या आणि (मानसिक व शारीरीक) आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. तडजोड करत चिकटून रहा, नवीन कंपनीच्या शोधात रहा आणि पहिल्या योग्य संधीचा फायदा घेऊन बाहेर पडा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रतिसादांशी सहमत! कॉर्पोरेट जगतात यशाची (किंवा सर्व्हायव्हलची) गुरुकिल्लीच आपण सांगितलीत! धन्यवाद!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक्का साहेबांचे दोन्ही प्रतिसाद एकदम चपखल आहेत. . "मी सरळ आणि नीतिमान असले म्हणजे सर्व जग माझ्याशी तसेच वागेल" हे म्हणणे म्हणजे "मी पूर्ण शाकाहारी आहे म्हणून सिंह मला खाणार नाही" असे म्हणण्यासारखे आहे.

मी आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ६ दिवस सुटी घेतली होती. मागच्या वर्षीदेखील एप्रिलमध्ये सलग ५ दिवस सुटी घेतली होती. पण मी या वर्षीच्या एप्रिल महिन्यातली शेवटच्या आठवड्यातली ६ दिवस सुटी जानेवारी २०१६ च्या पहिल्या आठवड्यात सांगून ठेवली हो. एक आऊट ऑफ ऑफीसचा ईमेल सेट करून ठेवला की मग सहसा कुणी त्रास देत नाही. इतक्या वर्षात आमच्या इथे मी एक गोष्ट शिकलो आहे. सुटी मागायची नाही; सरळ एक ईमेल टाकून द्यायची की मी या या दिवशी सुटीवर असणार आहे. सुटी घेऊ का असे आमच्या इथे कुणीच विचारत नाही. सरळ ईमेल टाकून द्यायची. अगदीच काही प्रोब्लेम असेल तर कुणीतरी विचारतं. मग अगदीच आवश्यक असेल तर सुटीचा प्लान थोडा बदलायचा; नाहीतर सरळ "माझे प्लान्स झालेले आहेत; सुटी रद्द करू शकत नाही" असे सुतकी चेहरा करून सांगायचे. बाकी दुसरे कुणी बिब्बा घालत नाही. आणि अप्रेजलवर वगैरे याचा काही परिणाम होत नाही. आणि झाला तरी मी विचार करत नाही. ;-) सुटी घ्यायची आहे तर घ्यायची आहे! कामाच्या वेळेला ऑफिसमधून आणि घरूनदेखील काम करावे लागते. तेव्हा तास मोजून नाही चालत. पण सुटीच्या वेळेला सुटीच! अगदीच अर्जंट असेल तर एखादा कॉल वगैरे....नाहीतर ऐश! :-)

शनिवार रविवार सुट्टी असून सुद्धा बद्दल रजां बद्दल चाललेली वरील आयटी हमालांची (!) तक्रारीच्या सुरातील चर्चा वाचून अंमळ मौज वाटली.

In reply to by अप्पा जोगळेकर

१२*६ = ७२ तास आणि तुमचा ९.५*५ = ४७.५ तास बघा आता किती फरक राहिला.

In reply to by गणामास्तर

आयटीत १२*५ = ६० आणि काम झाले नाही तर आणखि (२*१२)

In reply to by गणामास्तर

साहेब. माफ करा मगर आपको नही लगता के ये आपकी काबिलियत पर सवाल है. १२*६=७२ तास काम जर एखादा व्यावसायिक करत असेल तर ठीक आहे. पण जर एखादा कर्मचारी हे करतो आहे तर १. तो कार्यक्षम नाही किंवा २. त्याच्या साहेबाचे एफ़र्ट एस्टिमेट चुकीचे आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

साहेबाचे नाही विकणाऱ्याचे ....काहीही कमीट करून येतात आणि डिलिव्हरीची मातृभगिनी एक

मित्राच्या लग्नाला सुट्टी मिळत नसल्या कारणानं मोठ्या भावानं त्याच्या लहान भावाला ड्युटीवर पाठवलं त्याबद्दल आलेली ही म.टा. मधील बातमी. सुट्टी मिळाली नाही की मग लोकं असे बेकायदेशीर मार्गसुध्दा काढू शकतात ह्याचं हे उदाहरण. लेखाबद्दल अतिशय सहमत...बाकी विचारलेल्या प्रश्नाचं माझं उत्तर आहे "रजा घेणं हा आपल्या वरीष्ठांचा हक्क असतो पण आपल्यासाठी पाप/गुन्हा असतो".

पोलिस खात्यात स्वत:च्या लग्नासाठी रजा पाहिजे असल्यास लग्नपत्रिका जोडावी लागते. त्यामुळे पहिल्या पत्रिका छापायला टाकाव्या लागतात. पुरुष पोलिसांनाही रजा ’पाळी’प्रमाणे मंजूर होते.पोलिस नोटीस मधे तसे प्रसिद्ध होते.पाळी मोजण्याचे अधिकार अर्थातच वरिष्ठांचे. त्यासाठीही कारकुनांना चिरीमिरी द्यावी लागते. माझ्या लग्नाच्या वेळी मी ’विनाविलंब’ रजा मागितली. ती मंजूर झाली नाही. मग मी ’त्वरीत’ रजा मागितली मग कुठे ती मंजूर झाली. सगळ्या अर्जात मे सो जा व्हावे हे लिहिणे क्रमप्राप्त असते. अर्जित+ धनार्जित रजे ला ’शिलिंडर’ रजा म्हणतात. तुमच्या भाषेत सरेंडर्ड लिव्ह १५ + ३० पाळी प्रमाणे मंजूर ३० + ३० " पैशाची गरज असलेले लोक धनार्जित मिळण्यासाठी कागदावर अर्जित रजेवर पण प्रत्यक्षात कामावर येतात.( वरिष्ठांची समरी पॊवर) कारण सोडत नाही म्हटल्यावर पैशे पण गेले व रजा पण गेली. शेवटी काहीच नसेल तर ’शिकात’ जाण्याचा पर्यात असतोच. दाक्तरला पैशे द्यावे लागत्यात.

कर्मचार्‍यांच्या बाजुचे प्रतिसाद वाचले ! बर्‍याच अंशी सहमत आहे. मी देखील एका गावखात्यातल्या आयटी कंपनीमधे काम करत असतांना असेच अनुभव आले. आता मी स्वतः देखील एका छोट्या कंपनीचा मालक आहे. कंपनी कसली, पाच सात डोकी एकत्र करुन काम करतो म्हणून कंपनी. नाहीतर गावखात्याचाच कारभार. तर आमची कामाची पद्धत : काम असेल तर २४ तास काम करा. रविवार असला, सार्वजनिक सुट्टीचा दिवस असला तरी सुटका नाही. यात मी आणि माझे कर्मचारी सगळेच आले. काम नसेल तर सोमवार ते रविवार कोणताही दिवस असो, घरी तंगड्या पसरुन आराम करा. आमच्याकडे मेजॉरीटी कोकणी माणसं, तेव्हा चतुर्थीला आणि होळीला बोंबा मारत बसावं लागते पण एकमेकाच्या प्रेमापोटी सगळं अ‍ॅडजस्ट होते. आता एक सातारी, एक नगरी आणी बाकीचे कोकणी अशी भरती केलीये. त्यामुळे जास्त त्रास नाही. (कोणाला प्रादेशिक वादाचा वास येत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे) ८-१० दिवस सुट्टी हवी आहे, बिनधास्त घ्या. पण कमीतकमी १५ दिवस अगोदर कळवा म्हणजे पुढील नियोजन करणे सोप्पे होते. कालच एका कर्मचार्‍याने मला कळवले की मी ३१ ऑगस्ट २०१६ चे रेल्वे चे बुकींग केले आहे गणपतीसाठी. आता बोला !! ऑफीसमधे लेट आले तरी आणि घरी जायला उशीर झाला तरी घड्याळावर डोळा ठेवला जात नाही. बर्‍याच शेटजींनी तुम्ही युपी / बिहारी माणसं कामाला ठेवा. स्वस्तात काम होईल असे सांगीतले पण कंपनी पॉलीसी म्हणून यापासून कटाक्षाने दुर राहिलोय. अर्थात युपी / बिहारींबद्द्ल मला कोणताही आकस नाही. परीणाम काय तर गेल्या पाच वर्षात एकही कर्मचारी काम सोडून गेलला नाही. खोटं बोलून सुट्टी घेतलेली नाही. फोन बंद करुन ठेवत नाहित. कोणाचेही नातेवाईक अचानक आणि पुन्हापुन्हा मरत नाहीत. आय आणि माय कर्मचारी लव अवर कंपनी !

३ वर्षांपूर्वी.माझ्या लग्नासाठी मी १५ दिवस सुट्टीसाठी विनंती केली तर मला, तू कंपनीसाठी किती महत्वाचा वेगैरे आहेस, त्यामुळे कंपनीच खूप नुकसान होईल वेगैरे थापा मारून १५ दिवसाची सुट्टी १२ दिवसांवर मंजूर करत होते. मी १५ मिनिटांनी राजीनामा खरडून दिला. लगेच १५ दिवसांची सुट्टी मंजूर केली. त्याचा बदला म्हणून लग्नाच्या आदल्या रात्रीपर्यंत आणि लग्न झाल्याच्या दुसर्या दिवसापासून पुन्हा बॉसचे फोन चालू होते. (लग्नाच्या दिवशी मी फोन बंद ठेवला होता ). ती बॉस अश्या कामासाठी फोन करायची जे जास्त महत्वाचे न्हवते, आणि मी ते काम ऑफिसमध्ये आल्यावर देखील करू शकत होतो.शेवटी वैतागून बॉसशी फोनवर बोलत असतानाच जोरात कचकचून शिवी घातली, तुझ्या आयची XX, समजत नाही का ग XX.निघ इथून साली XXX. ती बॉस म्हणाली तू मला कसा काय शिव्या देऊ शकतोस.मी म्हटलं तुम्हाला नाही आमच्या इथल्या म्हशीला घालतोय.पिकात शिरली होती.ती काय समजायचे ते समजली. त्यानंतर बॉसचा फोन नाही आला. १५ दिवसांची सुट्टी १७ दिवसात संपवून मी ऑफिसला आलो आणि पुन्हा राजीनामा खरडला. मंजूर करत न्हवते, शेवटी बिनडोक लोकांसोबत मला काम करायचे नाही असे मोठ्या साहेबाला सांगून नव्या कंपनीत रुजू झालो.आजतागायत इथेच आहे. परंतु इथे कधीच सुट्टी साठी कटकट झाली नाही. एखादे दिवशी शनिवार रविवार चुकून एखादे तासाभराचे काम येते, इतकेच. आधीची कंपनी फार मोठी होती, त्यामानाने सध्याची लहान आहे.पण पगार आणि समाधान जास्त आहे. कुठेतरी वाचले होते, कि तुम्ही चांगली कंपनी निवडू नका, चांगला बॉस निवडा. म्हणजे सुखी राहाल.

लोकहो, एक अनुभव सांगावासा वाटतो. माझ्या बाबतीत घडलेला नसून ऐकीव आहे. मुंबईतल्या विक्रोळी येथील एका प्रसिद्ध आस्थापनातल्या एका कर्मशाळेतला (=कंपनीतल्या एका प्लांटमधला) एक महत्त्वाचा नळ फुटला. पाणी धोधो वाया जाऊ लागले. त्यामुळे पाणीपुरवठा तातडीने बंद केला. दुरुस्ती भीषण वेगाने पार पाडूनही चार दिवस लागले. पाणी नसल्याने हे चारही दिवस कर्मशाळा पूर्णपणे बंद होती. तर हे चार दिवस कामगारांना आणि इतर कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. ही रजेची चोरी म्हणावी का? कायदा काय सांगतो? आ.न., -गा.पै.

अर्थातच तुम्ही फोन स्विच ऑफ नाही करु शकत कारण मग समोर 'स्विच ऑफ केलेला आहे' असं कळतं महागडे स्मार्ट फोन चालू ठेवून बॅटरी काढणंही धोक्याचं वाटतं म्हणून एक मोठा अ‍ॅल्युमिनियम फॉईल घ्या त्यात मोबाईल चांगला दोनदा गुंडाळा म्हणजे तुमचा फोन (आऊट ऑफ कवरेज असेल स्विच ऑफ नाही)

In reply to by सुबोध खरे

मग समोरच्याला 'फोन स्विच्ड ऑफ आहे' अशा अर्थाचा संदेश ऐकू जातो. इथे आपण फोन मुद्दाम बंद ठेवत आहोत असे बॉसला भासू द्यायचे नसते. 'नेटवर्कच नव्हते, मी बिच्चारा काय करणार' हे चालू शकतं :)

सध्या एका प्रोजेक्ट वर काम करतोय ज्यात भारतातल्या नामांकित एम एन सीज इंवोल्वड आहेत. २० वर्षांपूर्वी या समीकरणाच्या दुसर्या बाजूला होतो. इथून मागे वळून बघताना मला फोन लाईन च्या पलीकडे बसलेला 'मी' दिसतोय. रजा, ऑन साईट, पहाटे ४ पर्यंत काम करणे, शनिवार-रविवार काम करायला लागणे (बरेच आठवडे/महिने), मनस्ताप, घरच्यांना काळजी वाटणे, शाळेत आणि कोलेज मध्ये अभ्यास न केलेले दिवस आठवून पश्चात्ताप वाटणे, आपणच 'रीसिविंग एंड' ला का असतो असे सगळ्याच बाबतीत वाटणे, इत्यादि......अगदी पुस्तक नाही पण चार ओळी नक्की खरडणार आहे या विषयावर.

बाकी सगळं जौ देत............. कोणती कंपनी सुट्ट्या फॉर्वड करू देतिये जरा कळवता का? ;) हा धागा शुक्रवारी काढण्याचे प्रयोजन काय? ;) निमो, फ्यामिली सोडून कंपनीला महत्व देण्याइतके वाईट दिवस येऊ देऊ नका हे सुचवते, निर्णय तुम्हीच घ्या.

In reply to by रेवती

मलापण ह्या कंपनीचे नाव सांगा प्लीज. आधीच्या कंपनीमधल्या साठलेल्या सुट्ट्या घेऊन यायला देईल का ही कंपनी?

माझ्या अॉफिसमधे माझा साहेब रजा द्यायला कटकट करतो पण हाफ-डे मात्र सहज देतो.

पोलीस खात्यात रजा घेणे दिव्य काम आहे. एक वेळ उसने पैसे देईल वरीष्ठ पण रजा नाही. इथे साप्ताहिक सुट्टी मिळत नाही रजा तर खुप दूरची गोष्ट. माझ्या बरोबरच्या सहकाऱ्याचा १ किस्सा आठवला आम्ही २ महिने घरापासून दूर डोंगरावर (पोलीसी भाषेत ट्याप) कर्तव्यासाठी होतो हा गडी नवविवाहित १५-२० दिवसांनी आठवण यायला लागली आणि सुट्टी तर शक्यच नाही. त्याने वरिष्ठांना विचारले सुट्टीचे साहजिकच सुट्टी मिळाली नाही. परत गप्पगार. ४ दिवसांनी परत एकदा वरिष्ठांकडे सुट्टीसाठी गयावया. वरिष्ठ खवळले कशाला पायजे सुट्टी. हा गडी वैतागलेला. ह्यांनी सरळ सांगितले साहेब बायकोची लय आठवण येतेय सुट्टी नसेल मिळत तुम्ही करता का काय सोय. यावर वरिष्ठांनी तात्काळ सोडले त्याला. चांगला विषय काढलाय रजेच्या हक्काविषयी चर्चा चाललीय अहो इथे पोलिसांना दसरा दिवाळीला रजा मिळत नाही हो.

In reply to by सत्याचे प्रयोग

दसरा दिवाळी डॉक्टर व सिस्टर लोकानाही कित्येकदा मिळत नाही. लोकम डॉक्टर अरेंज केल्याशिवाय सुट्टी मिळत नाही.

अमेरीकन कंपन्यांमध्ये खुपच उलट परीस्थीती आहे. सुट्टी न धेणार्‍या कर्मचार्‍याला HR कडुन सुट्टी ख्प साठल्याचे रीमाईंडर येते. त्याच्या बॉसला कॉपी जाते. आणी तरीही तो सुट्टीवर गेल नाही तर HR बॉसकडे स्पष्टीकरण मागतो. आमच्या कंपनीत दर दीड दोन वर्षांनी भारतात यायला ४ ते ५ आठेवड्यांची सुट्टी आरामात मीळते, कंपनीतील सर्व भारतीयांना. सुट्टीवरच्या कर्मचार्‍याला फोन करणे म्हणजे मॅनेजरने स्वतःचा कमीपणा दाखवणे समजले जाते. गेल्या १५ वर्षांत मला कधीही सुट्टीवर असताना फोन आलेला नाही. ईथे लोकांचे भयानक अनुभव वाचुन खरच वाईट वाटले.

In reply to by नेत्रेश

प्रतिसाद अगदी "नेत्रांजन" आहे इथल्या बॉसेस्,कंपनी मालक्,चालक यांच्या साठी. देव सर्वांना अशी कंपनी देवो यापेक्षा अशी धोरणे भारतीय कंपन्यांमध्ये येवो हीच ईच्छा !!! अस्सल गावठी एम एण सी कंपनीतला नाखु

In reply to by नेत्रेश

सुट्टीवरच्या कर्मचार्‍याला फोन करणे म्हणजे मॅनेजरने स्वतःचा कमीपणा दाखवणे समजले जाते. +१००० एखादा अतिशय विरळा अज्ञात अज्ञात (unknown unknown) प्रसंग सोडला तर सुट्टीवरच्या कर्मचार्‍याला कामाच्या निमित्ताने फोन करणे म्हणजे व्यवस्थापकिय भोंगळपणाचेच उदाहरण म्हणावे लागेल.

याआधी नोकरी करत असलेल्या ठिकाणी नोकरी सोडल्यावर बाकी २५ रजांचे पैसे देताना फक्त त्याचा महागाई भत्ता दिला होता. नोकरी सोडताना बहुदा शिल्लक रजांचे पुर्ण पैसे मिळतात असा माझा अंदाज होता. मला यातले नियम माहित नसल्याने भांडणाच्या भानगडीत न पडता मिळालेले पैसे घेतले. तेव्हापासुन कानाला खडा लावला. न विसरता आणि न चुकता दरवर्षी आजारपणातल्या सुट्टया सोडुन इतर सुट्टया संपवून टाकतो. रजा वाया जायला नकोत आणि त्याचे पैसेसुध्दा नकोत.

ह्यांना मे महिन्यात सुट्टी असते हे ह्या निमित्ताने आठवले.

एकंदरीत फार भयानक परिस्थिती दिसतेय सुट्ट्यांच्या बाबतीत. मी सध्या ज्या I.T कंपनीत आहे तिथे वर्षातून एकदा तरी सलग ५ दिवस सुट्टी घेणे बंधनकारक आहे. मी तर वर्षातून ४-५ वेळा तरी सलग ५ दिवस सोमवार ते शुक्रवार सुट्टी घेतो. शनिवार रविवार पकडून सलग ९ दिवस होतात. :) पण पूर्वीच्या 'powered by intellect driven by values ' कंपनीत खूप त्रास झाला सुट्ट्या घेताना. अगदी हनिमून ला असताना पण लोकांनी फोन केला होता शंका विचारण्यासाठी.

In reply to by मराठी कथालेखक

मी सध्या ज्या I.T कंपनीत आहे तिथे वर्षातून एकदा तरी सलग ५ दिवस सुट्टी घेणे बंधनकारक आहे. मी तर वर्षातून ४-५ वेळा तरी सलग ५ दिवस सोमवार ते शुक्रवार सुट्टी घेतो. शनिवार रविवार पकडून सलग ९ दिवस होतात. :)
आम्ही या कंपनीबद्दल विचारत होतो...जी वाईट आहे त्याबद्दल का विचारावे??

अधूनमधून रजा घेऊन पापा घेण्याचा हक्क बजावायचा आणि ...... तसं न केल्यास गुन्हा होतो.

महिनोंमहिने सुट्टी न घेत , रविवारी सुद्धा काम करण्याची वाईट सवय होती . पण गेल्या वर्षापासून एक नियम स्वतः ला लाऊन घेतलाय, तो म्हणजे महिन्यातून कमीत कमीत एकदा दांडी मारायची. अगदी ऐन वेळी मेसेज / मेल करून किंवा कधी कधी न सांगता सुद्धा , आणि गरज असेल तेव्हा सुद्धा सुट्टी "घ्यायची " . मागायची नाही. काही नियम हे आपण लावावे लागतात कंपनीला , जसं कि एकदा ऑफिसच्या आवारातून बाहेर पडल्यावर फोन उचलणार नाही . किंवा सुट्टी वर असताना तर अजिबात उचलणार नाही. मग सर्वर जाळून राख होवो किंवा राउटर मधून धूर येउदेत . नाहीतर च्यायला डोक्यावर चढून बसतात, रात्री हि फोन करून "पटकन उचलता येत नाही का" हे म्हणण्याची हिम्मत होते साल्यांची. अश्यावेळी येतील तेवढ्या भाषेत शक्य तेवढे मंत्रोच्चार म्हणून घ्यावेत. नोकरी दुसरी मिळते

महिना येणार पगार हेच सनातन सत्य, बाकी नोकरी वगैरे सगळ्या अंधश्रद्धा होत. धन्यवाद (आळशी तरी कामाचा) वांडो

खरंतर व्यवस्थापनाने रजे कडे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सच्या दृष्टीने बघितले पाहिजे. रोबोला देखील PM & BM असतो तेथे माणसाची काय कथा ! रजा घेऊन ताजेतवाने होऊन लोक्स जोमाने काम करतात त्यासाठी बऱ्याच ठिकाणी रजा घेणे अनिवार्य असते. या संदर्भात "आय रिक्रूटेड टू वर्किंग हॅन्ड्स हाऊएव्हर अ हयूमन बीइंग वॉक्ड इन" अशा आशयाची एक म्हण आठवते.