✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन

त
तर्राट जोकर यांनी
गुरुवार, 05/05/2016 - 04:17  ·  लेख
लेख
झोपडपट्टीतले दिवस: भाग एक मला कळायला लागलं तेव्हाचं आठवतंय. आम्ही एका सुंदर कॉलनीत राहत होतो. मी जवळच्या प्लेगृपमधे जात होतो. ही कॉलनी किती सुधारलेली होती हे लक्षात येईल. कारण ८३-८४ च्या काळातच इथे प्लेगृप ही संकल्पना होती. छान खेळणी वैगरे असायची तिथे. गणवेषही होता. इंग्रजी पोएम्स होत्या. साडेचार वर्षाचा असतांना, गणवेषात १८-२० मुलांसोबत बाई मध्ये खुर्चीवर बसलेल्या अशा फोटोत मी चौथ्या नंबरला मागच्या रांगेत उभा होतो. माझा जीवलग मित्र खाली बसला होता. बरीच वर्षे जपून ठेवला होता तो फोटो. त्या कॉलनीत आमचं भाजीचं दुकान होतं. दुकान म्हणजे टिनाची शेड बांधलेली. दोन्ही बाजूंनी बांबूच्या चिपट्यांपासून बनवलेल्या तट्ट्या. रात्री समोरचा भाग झाकायला, बंद करायला आणखी एक तट्टी. मागची बाजू पक्कं बांधकाम असलेल्या दुकानांची रांग होती. आमचं भाजीचं दुकान कॉलनीच्या प्रवेशाच्या रस्त्याच्या ऐन चौकात होतं. त्या चार पक्क्या दुकानांच्या डाव्या भिंतीला आमचं दुकान आणि मागच्या भिंतीला अशाच तीन बाजुला तट्ट्या लावून तयार केलेली झोपडी. वरुन टीनपत्रे. चार माणसं जवळ जवळ झोपु शकतील इतकीच जागा होती ती. पुढे थोडसं अंगण होतं, न्हानी अशीच तट्ट्यांची बांधलेली. बाजूला कपडे धुवायचा दगड. ती जागा भाड्याची होती. दुकान आणि घराचे बहुतेक शंभर रुपये महिना भाडं होतं. भाजीचं दुकान चांगलं चालायचं, म्हणजे बर्‍यापैकी पैसा मिळायचा. खायला प्यायला उत्तम होतं. दूध, अंडी, ब्रेड आमच्याच दुकानात मिळायचे. शिवाय ताजा भाजीपाला. मला वरणभात खूप आवडायचा. बाबा कधीच खाण्यापिण्यात, कपडेलत्त्यात हयगय करत नसत. दिवाळीचे फटाके भरपूर. पण खेळणी मात्र कधीच आणायचे नाहीत. आयुष्यात माझ्यासाठी वडिलांनी खास आणलेलं एकमेव खेळणं म्हणजे एक चारचाकी गाडी. त्याआधी, त्यानंतर कधीच नाही. खाण्यापिण्याचे लाड करतो पण गुलाबी लाड नको असे त्यांचे ब्रीदवाक्य. त्यांचं लहानपण दुसर्‍यांनी दिलेले कपडे घालण्यात, मागून आणलेल्या भाकरी खाण्यात गेलेले. वडीलांचा जनसंपर्क चांगला, आमच्या जातीमधे वावरही चांगला, बोलण्यात फटकळ. का कुणास ठावूक त्यांना अचानक गावोगावी फिरण्याच छंद लागला.पहाटे मेन मार्केटात जाऊन भाजी घेऊन येणे, ती धुवून मांडणे. बोहणी झाली की आईच्या हाती दुकान सोपवून हिंडायला मोकळे. लग्नाच्या बोलणी करायला जाणे, लग्न जुळवून देणे यात बाबा तरबेज होते. मला आठवतं, १९९५ नंतर लोकं बिघडायला लागली तोवर म्हणजे सात-आठ वर्षात किमान शंभर दिडशे तरी संसार बाबांनी उभे करुन दिले असतील. नंतर काही घटनांमधे दोन पार्ट्यात विसंवाद होऊन काडीमोड झाला आणि 'बाबांनी नीट बघून स्थळ आणलं नाही' असे आरोप होऊ लागले तसे हे लष्कराच्या भाकर्‍या भाजण्याचे त्यांनी कमी केले. बाबांच्या फटकळ बोलण्याचे भारी किस्से आहेत. पण त्यानेच कित्येक लोकांना फायदा होत असे. म्हणुन अपमानित होतील असे बोलणे असून बाबांशिवाय कित्येकांचे पान हलायचे नाही. एकदा भर लग्नाच्या बैठकीत एक किस्सा घडला. एका स्थळ म्हणुन आलेल्या मुलाचे वडील बर्‍याच वर्षांआधी वारलेले. त्या मुलाचे घर इत्यादी बघायला मुलीकडून बाबा आणि काही जण गेले होते. तर तिथे बैठकीत एक आगंतुक व्यक्ती बसलेला होता. लग्नाच्या बोलणी करण्याच्या बैठकीत नातेवाईकांशिवाय कुणी असू नये असा दंडक असतो. मध्यस्थही जातवाले आणि सहसा नातेवाईकच असतात. हा तिर्‍हायित शेजारी असून, कुटूंबाशी कुठल्याही तर्हेने संबंधित नव्हता. बाबांनी भर बैठकीत त्याला विचारले. तुम्ही इथे काय करत आहात. तो म्हणाला "काही नाही. मी शेजारी आहे,आलो असाच." बाबा बोलले, "ह्या बैठकीत तुमचे तर काहीच काम नाही." हा संवाद सुरु असतांना मुलगा आणि त्याची आई यांची चलबिचल बाबांनी हेरली. आणि बॉम्बच टाकला. "ह्या बाईंशी तुमचे काही संबंध आहेत का?" झालं. संपलं. बाबा म्हणाले हे लग्न होऊ शकत नाही. पुढे बर्‍याच दिवसांनी कळलं, बाबांचा अंदाज अचूक होता. असे आमचे बाबा, अगदी जीवघेणे फटकळ, तोंडाला येईल ते कुणाचीही पर्वा न करता बोलून मोकळे. सगळ्या नातेवाईकांत बाबांना क्रॉस जाणे कुणालाच जमायचे नाही. कारण ते अखंड सत्य बोलायचे. लपवाछ्पवी, राजकारण शून्य. वडीलांचा आपल्या लहान भावांवर फार जीव. त्यांना कुठेतरी शहरात कामाला लावावे म्हणून बरीच खटपट करीत. एकाला उसाच्या रसाचे गुर्‍हाळ सुरु करुन दिले. मस्तपैकी एक बैल आणला, ते रस काढण्याचे यंत्र. खुर्च्या-टेबले. त्यात सुरुवातीला वडिलांनी लक्ष घातले तोवर चांगला पैसा मिळाला. मग त्या काकांनी दहा हजाराला फटका दिला. कर्ज काढून वीस सायकली विकत आणून भाड्याने सायकल देण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यातल्या बहुधा सात आठ सायकली चोरीस गेल्या. म्हणजे भाड्याने नेतो म्हणुन गेल्या त्या परत आल्याच नाही. मग काही विकल्या. एक राहिली होती बाबांच्या वापरासाठी. तीही एक दिवस अंगणातून चोरीला गेली. आईला चांगलाच धक्का बसलेला. एका काकाला बँकेत नोकरीस लावून दिले. सातव्या दिवशी साहेब टांग मारुन गावाला परत. म्हणे चपराशाची नोकरी नाही करणार. वडील बारावी झाल्यावर ह्या शहरात आले होते. तेव्हा साधारण दोनेक लाख लोकसंख्येचं हे शहर. त्यांनी बीकॉम ला प्रवेश घेतला. जवळच्या सरकारी आस्थापनात ठेकेदाराच्या हाताखाली मजुरांवर लक्ष ठेवणारे सुपरवायजर झाले. तिथेच एका माणसाने आपल्या जातीचा, गोरागोमटा, छान व्यक्तिमत्व असलेला हा पोरगा हेरला. आमचे वडील चतुर्भूज झाले. नंतर कुठल्याशा वादावरुन ती नोकरी सोडली. एकटेच मुंबईस गेले. तेव्हा मी सहा महिन्यांचा होतो - आईच्या पोटात. ८० साली माझा जन्म झाला आणि त्यांची दु:खे अपरिमित वाढली. शहरात कुठेतरी छोटीशी खोली होती दहा रुपये महिना भाड्याची. एक बारदाना होता, पोतं - गहु भरतात, साखर भरतात ते. त्याच्यावर आई-बाबा आणि मधे मी असे झोपायचो. अशा अनेक रात्री रडत घालवल्या त्या दोघांनी. कुठेतरी रोजंदारीवर काहीतरी काम कर, संध्याकाळी एक किलो पिठ आणि मिर्च्या-कांदा आण, मग स्वयंपाक. काही दिवस एमायडीसीतल्या तेलमिलमधे कामास होते. शेंगदाण्यापासून तेल काढल्यावर ढेप बनते. मशिनमधून ती ढेप खाली पडते ती पटापट उचलून पोत्यात भरून बाहेर काढायला लागते. ती भयंकर गरम असायची.बाबांचे हात भाजायचे. नंतर हमाली केली. रिक्षाही चालवली काही दिवस. भांड्यांच्या दुकानात पोर्‍या म्हणुन काम केलं. असे बरेच काय काय दिवस काढले. हे का होत होतं, शिक्षण होतं तर नोकरी का नाही केली असे प्रश्न मी त्यांना कधीही विचारले नाही. तुम्हीही विचारु नका. पुढे शहरातल्या सुस्थितीत असलेल्या कोण्या मानलेल्या बहिणीने हे भाजीचे दुकान टाकायची आयडीया दिली. भांडवल दिलं. हे दुकान सुरु झालं आणि दिवस पालटले. माझ्या बहिणीचा जन्म झाला आणि भरभराटीने वेग घेतला. दोन मुलांवर स्टॉप मारायचे ठरवले. काही लोकांना बुद्धीबळ खेळतांना चाली छान रचता येतात. पण जिंकायला आले की खेळ नीट संपवता येत नाही. बाबांचे असेच काही होत होते. माणूस मेहनती होता, हुशार होता, तेव्हाही. आजही. पण एका मर्यादेपुढे रिस्क घ्यायची, दुरगामी ध्येय बाळगायची दूरदृष्टी काहीशी कमी होती. काही संकटं हाताळता आली नसतील. त्यांना नोकरीचा प्रचंड तिटकारा होता. कोणाचेच बॉसिंग झेपत नसे. असो. त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या त्यांना ठावूक. सुमारे सात वर्षे हा भाजीचा धंदा नीट सुरु होता. थोडीफार बचतही होत होती. त्याच कॉलनीत एक छानसा प्लॉट बघून बाबा सौदा पक्का करुन आले. दुसर्‍या दिवशी पैसे द्यायला गेले तर मालकाने थोडे पैसे वाढवून मागितले. अशा शब्द फिरवणार्‍या माणसाशी व्यवहार नको म्हणुन तसेच निघून आले. श्याहेंशी साली तो सौदा फक्त पाचशे रुपयाने हुकला. आजही खंत राहते कारण आज त्या जागेची किंमत काही कोटींमधे आहे. मी मॉन्टेसरीत केजी वन केजी टू पर्यंत शिकलो. बा बा ब्लॅक्शिप, ट्वींकल ट्वींकल लिटल स्टार, हाऊ आय वंडर व्हाट यु आर. वन टु थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट. आमची मुख्याध्यापिकाबै आपल्या मुलांना सोडायला येणार्‍या पुरुषांसोबत फार लाडे लाडे बोलते ह्याबद्दल विचित्र वाटून मला त्या शाळेत जावेसे वाटत नव्हते. मी ती इंग्रजी शाळा सोडली. आईशप्पथ घरी हेच कारण सांगितले मी. सातव्या वर्षी मला झेडपीच्या पहिल्या वर्गात टाकले. पाटीवर अ आ ई ई सुरु झाली. बाबांनी फटके देऊन देऊन अक्षर वळणदार मोत्यासारखे करुन घेतले. त्यासाठी हजारो मोती डोळ्यांतून टपकले असतील. बरेच झाले म्हणा. वृत्तपत्रातून बातम्या गिरवायला लावत. वाचनाची सवय, आणि वेड्यासारखी सवय लागली. व्यसन झालं. आमच्या दुकानाची चलती बघून स्पर्धा उभी राहीली. नवा गडी स्वस्तात भाजी द्यायला लागला. धंद्यावर परिणाम व्हायला लागला. बचत संपत होती. त्यातच मूळ मालकाने जागा खाली करण्याबद्दल तगादा लावायला सुरुवात केली. अच्छे दिन संपत येत होते. धंदा बंद होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत होती. आता त्या कॉलनीत घर घेण्याइतके पैसे शिल्लक नव्हते व भावही वधारले होते. कोणाकडेही भाड्याने द्यायला जागा नव्हती. मग दुकान तिथेच ठेवून घर हलवण्याबद्दल हालचाली सुरु झाल्या. जगण्याची लढाई सुरुच आहे. ह्या सगळ्या घटनाक्रमाबद्दल मलाही नीट माहिती नाही. जेवढं आणि जसं माहित तेवढं वर लिहिलंय. वडिल नेहमी आपली कहानी सांगत असतात. पण सर्वच धागे जुळत नाहीत. काही निसटलेले आहेत. कायम राहतील. ---- क्रमशः

Book traversal links for झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन

  • ‹ झोपडपट्टीतले दिवस: भाग एक
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव

प्रतिक्रिया द्या
20576 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

तजोऱ्या, अतिशय उत्तम लेख.

पक्षी
Fri, 05/06/2016 - 11:20 नवीन
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
बाबांचा स्वभाव फटकळ होता
ह्म्म्म, आलं आमच्या लक्षात!!!
  • Log in or register to post comments

पक्षांची नजर खूपच तीक्ष्ण

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/06/2016 - 16:03 नवीन
पक्षांची नजर खूपच तीक्ष्ण असते असे ऐकून आहे... अगदी काही शे मीटर वरून उडतानाही खालचा चिमुकला प्राणीसुद्धा अचूक हेरतात ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्षी

वाचतोय.

सूड
Fri, 05/06/2016 - 14:49 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments

प्रांजळ आत्मकथन

बबन ताम्बे
Fri, 05/06/2016 - 15:22 नवीन
खूप आवडले. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

सरळसोट लेखन , आवडले

नाईकांचा बहिर्जी
Fri, 05/06/2016 - 15:48 नवीन
सरळसोट लेखन , आवडले
  • Log in or register to post comments

वाचतोय. छान लिहिताहात.

आदूबाळ
Fri, 05/06/2016 - 18:29 नवीन
वाचतोय. छान लिहिताहात.
  • Log in or register to post comments

साधं सरळ पण जबरी !

जव्हेरगंज
Fri, 05/06/2016 - 19:36 नवीन
साधं सरळ पण जबरी !
  • Log in or register to post comments

काही लोकांना बुद्धीबळ

इष्टुर फाकडा
Fri, 05/06/2016 - 20:16 नवीन
काही लोकांना बुद्धीबळ खेळतांना चाली छान रचता येतात. पण जिंकायला आले की खेळ नीट संपवता येत नाही. बाबांचे असेच काही होत होते. माणूस मेहनती होता, हुशार होता, तेव्हाही. आजही. पण एका मर्यादेपुढे रिस्क घ्यायची, दुरगामी ध्येय बाळगायची दूरदृष्टी काहीशी कमी होती. काही संकटं हाताळता आली नसतील. त्यांना नोकरीचा प्रचंड तिटकारा होता. कोणाचेच बॉसिंग झेपत नसे. असो. त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या त्यांना ठावूक.
--- बसुन बोलु :)
  • Log in or register to post comments

प्रामाणिक आणि सरळ लेखन. शैली

सुबोध खरे
Fri, 05/06/2016 - 20:17 नवीन
प्रामाणिक आणि सरळ लेखन. शैली छान आहे.
  • Log in or register to post comments

माझ्या मते हा नंतर लिहिला

वैभव जाधव
Fri, 05/06/2016 - 20:34 नवीन
माझ्या मते हा नंतर लिहिला असला तरी आधी लिहिलेल्या भागाची पार्श्वभूमी असल्याने हा आधी हवा. तसंच मत त जो यांनी प्रतिसादात व्यक्त केलं आहे. नाहीतर फ्लॅशबॅक असं काही लिहिलं जावं. जाणकार सांगतील च ;)
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलयं..

कौशी
Sat, 05/07/2016 - 01:45 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

लेखन शैली मस्तच आहे.

सिद्धार्थ ४
Wed, 04/25/2018 - 14:58 नवीन
पुढील भागाची लिंक मिळेल काय?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा