✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डबल डेकर बस

उ
उल्का यांनी
Wed, 05/04/2016 - 13:58  ·  लेख
लेख
1
. माझ्या लेकीचा एक लाडका छंद म्हणजे फ्रीज वर लावायला वेगवेगळी Magnets जमवणे. सुरुवात झाली ‘मदर्स डे’ ला मलाच एक भेट म्हणून देऊन. मग आम्ही साउथ आफ्रिका मधून एक आणले. असे करत करत बऱ्याच आठवणीना ह्यात गुंफत गेलो खरे तर फ्रिजवर लावत गेलो. अशीच एक आठवण आपल्या मुंबईची तिने आणली – ‘डबल डेकर बस’. मला ‘बेस्ट’ कायमच द बेस्ट वाटत आली आहे. त्यातही ‘डबल डेकर’ खास प्रिय! घरात मला चिडवतात सुद्धा की मी जर राजकारणात असते आणि माझा एक पक्ष असता तर त्याचे चिन्ह मी ‘बेस्ट’ची बस हेच ठेवले असते. (पण मग शंका आली की मी बसने फिरले असते का?) लहान असताना मी खूप फिरले ह्यातून. आई, बाबा, मावशी आणि दादा (म्हणजे मावशीचे यजमान) ह्यांनी माझे खूप लाड केले. त्यातीलच डबल डेकर मधून मला फिरवणे हा एक कौतुकाचा प्रकार असे. ह्या बस मध्ये बसायला तमाम दुनियेचे म्हणजे प्रवाशांचे लक्ष वरील डेकच्या पुढच्या दोन सीटकडे असे. इतके लक्ष राजकारणी पुढाऱ्यांचे पण त्यांच्या खुर्चीकडे नसावे. अगदी पहिल्या थांब्यावर जाउन बस पकडायची. नेमकी पहिली बस सिंगल डेकर यायची. मी हिरमुसले की मला सांगितले जायचे “अग, सगळी गर्दी गेली बघ. आता आपला पहिला नंबर आहे. म्हणजे तुला पुढची सीट नक्की मिळणार.” (असा कॉमन सेन्स माझ्याकडे लहानपणापासूनच नव्हता तर!) थोड्या वेळाने संथ गतीने माझी लाडकी बस यायची. आता डबल डेकरला बघते तेव्हा वाटते जणू… डोक्यावर घागर घेऊन जशी हळुवार चाल असेल अगदी तशीच ही बस हळू हळू चालते. पण मला मात्र त्या हळुवार चालीचा आनंदच वाटायचा कारण खूप वेळ बस मधून प्रवास घडायचा. तर अशी ही बस आली की मी सुसाट पायऱ्या चढायचे. माझ्या मागे मागे “अग हळू हळू, सावकाश, पडशील” असे संवाद चढायचे. पण मला मात्र कधी एकदा ती सीट पकडते असे व्हायचे. कंडक्टरला सवय असावी अशा बाल हल्ल्यांची. तो कौतुकाने बघत असे. मग बसल्या बसल्या तिथून दिसणाऱ्या ‘पॅनोरामिक व्यू’चा अंदाज घेतला जाई. टिंग टिंग… बस सुरु झाली की आपण डौलात चाललो आहोत असे वाटे. एरवी मी चिटुकली पिटुकली वाटणारी एकदम उंचच उंच भासे. आम्ही बरेचदा मरीन ड्राईव, चौपाटी, वरळी सी फेस, जुहु बीच अशा ठीकाणी जात असू. त्यामुळे खुपसा भन्नाट वारा फुकट खायला मिळत असे. शिवाय बोनस असेच बर्र का. आइसक्रीम, शेंगा असे इतरही काही बाही खायला मिळेच मिळे. (म्हणजे माझ्या खादाडीचे लक्षण तेव्हाच लहानपणी दिसले होते तर.) थोड्याच वेळात मी अगदी मोठ्या मनाने माझ्या सीटचा त्याग करे. (अच्छा, म्हणूनच मी राजकारणी होऊ नाही शकले का?) आणि पुढे येउन उभीच राहत असे. आता लिहिताना पण जगतेय मी त्या गोड आठवणी. असं वाटतंय तो वारा अजूनही घुमतोय कानात. छेडतोय माझ्या केसांना. आणि मग डोळे बंद करून मोठ्ठा श्वास घेते अगदी तेव्हा घ्यायचे तसाच. ह्या डबल डेकरचे दोन प्रकार होते. एक ज्यात ड्रायवरची केबिन बसला वेगळी जोडलेली असे आणि एक ज्यात ती बसचाच एक भाग असे. हा दुसरा प्रकार आमचा लाडका. पहिल्या प्रकारात दोन तोटे होते. एक तर वरून रस्त्याऐवजी ती केबिनच दिसत राही आणि सतत भीतीचे भूत मानगुटीवर असे की ही केबिन बसपासून वेगळी झाली तर बस कोसळेल. एकंदरीत लहानपणापासूनच जिकडे तिकडे ही ‘भीती’ नामक भुताची वेगवेगळी भावंडे माझ्या मानगुटीवर असत बहुदा. डिसेंबर मध्ये मुलांबरोबर मरीन ड्राईवला गेले होते. तेव्हा ‘ओपन डेक’ डबल डेकर पहिली – ‘निलांबरी’. खास मुंबई पर्यटनासाठी असलेली MTDC ची भेट. ही भेट अनुभवायचा मानस नक्की आहे. DD गेली जवळजवळ ८० वर्षे बेस्ट डबल डेकर बस मुंबईत आहे. आता त्यांची संख्या निम्यावर आली आहे. मध्यंतरी वाचनात आले होते की ह्या बसेस आता बंद होणार आहेत. २०२० पर्यंत नक्की असतील. पण त्यानंतर काय? मी ही मोठी झाले आहे आणि आता माझा पाठलाग करणारे संवादही थकले आहेत. काही काळाच्या पडद्या आड गेले आहेत. ह्या आठवणीतून त्यांचाही स्पर्श अनुभवला. आज जर मी त्या सीट वर बसले तर बहुदा हेच गाणे ओठी असेल. ‘मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या गंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे का होते बेभान, कसे गहिवरते’ – उल्का कडले
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास

प्रतिक्रिया द्या
24484 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

छान..

अनिरुद्ध प्रभू
Wed, 05/04/2016 - 14:55 नवीन
चांगलं लिहीलय आपण...
  • Log in or register to post comments

छान

बाबा योगिराज
Wed, 05/04/2016 - 15:05 नवीन
पुलेशु. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

NILAMBARI BUS

रुस्तम
Wed, 05/04/2016 - 15:07 नवीन
https://www.maharashtratourism.gov.in/nilambar-bus
  • Log in or register to post comments

८४ आणि ४

सुनील
Wed, 05/04/2016 - 15:31 नवीन
लहानपणी आम्ही अंधेरीहून बोरीबंदरला बरेच वेळा जात असू. दोन मार्ग होते (तेव्हा), एक म्हणजे ८४ आणि दुसरा ४. दादरपर्यंत दोन्हीचा मार्ग एकच असे. पण पुढे ८४ पेडर रोड, केम्प्स कॉर्नर अशी राजेशाही मार्गाने जाई तर ४ लालबाग, भेंडी बाजार अशी आम आदमी मार्गाने! पण आमची पसंती ४ लाच. कारण ८४ सिंगल डेकर तर ४ डबल डेकर!! चांगले दीड-दोन तास लागत पण मज्जा येई!
  • Log in or register to post comments

मलाही आठवतेय.

बबन ताम्बे
Wed, 05/04/2016 - 16:19 नवीन
८४ आणि ४ ला अंधेरी स्टेशन जवळ त्यावेळी (१९८०) पण खूप लाईन असायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

वा! पुण्यातल्या भूतकाळ

एस
Wed, 05/04/2016 - 17:12 नवीन
वा! पुण्यातल्या भूतकाळ झालेल्या डबलडेकर आठवल्या! चित्र काढताना फेव्हरिट सब्जेक्ट असे!
  • Log in or register to post comments

हेच लिहायला आलो होतो...

तुषार काळभोर
Wed, 05/04/2016 - 17:41 नवीन
मला तर कधी पाहिलेल्या पण आठवत नाहीत. (पुण्यात/मुंबईत डबलडेकर बंद करण्याची कारणे काय असतील?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

पुण्यात बंद झाल्या त्याचे कारण,

बबन ताम्बे
Wed, 05/04/2016 - 18:58 नवीन
मला आठवते त्याप्रमाणे सतत ब्रेक डाऊन आणि मेंटेनन्स कॉस्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

नवीन Flyover Design मुळे डबल

राघवेंद्र
Wed, 05/04/2016 - 19:27 नवीन
नवीन Flyover Design मुळे डबल डेकर बसच्या उंचीवर बरेच निर्बंध येतात. त्यामुळे बंद होत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

ड्बल डेकर

शिखरे
Sun, 07/31/2016 - 15:15 नवीन
पुण्यात १११ नबर् हडपसर ते म.न.पा. बस होति. खुप वेळा बसलोय पण. आम्हि माजरीला राहत होतो , शाळोत पुण्यत होतो पण डबल डेकर पक्डुन हडपसरला यायचो मग नतर चालत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

हां! एकशेसोळा नंबरची मनपा ते

आदूबाळ
Wed, 05/04/2016 - 20:22 नवीन
हां! एकशेसोळा नंबरची मनपा ते खडकी बाजार डब्बल डेकर बस आठवली. वरच्या मजल्यावर बसायला मिळेपर्यंत थांबायची माझी तयारी असे, पण आजोबा मात्र कंटाळून जात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

माझ्या

नाखु
गुरुवार, 05/05/2016 - 09:26 नवीन
स्मरणशक्तीनुसार सन १९९७ पर्यंत मनपा-पाषाण्,मनपा-हडपसर्,मनपा-चिंचवड्,मनपा-निगडी डबलडेकर होत्या त्या पुर्वी भोसरी साठी आणि कोथरूडसाठी असायच्या. भोसरीतील बस, आधी खालचा भाग वळून ( एकसंध नसलेली डबलडेकर) एमाय्डीसी ष्टॉपवरील अपघाताने बंद झाली (९० अंशात वळण) नोकरीनिमित्त पाषाण ते भोसरी एमाअय्डीसी ३ वर्षे सायकल प्रवास केल्याने ह्या बसेस बद्दल माहीती आहे, तपशीलातील दुस्रुस्ती चू भू देणे घेणे. काही काळ पुणे अहमदनगर अशी ड्बलडेकर असताना त्यातही प्रवास केला. (पुढे एक्दा दरवाजा नस्याले कुणीतरी आगारातून बस पळवली आणि शिरूरपाशी सोडून दिली.) नंतर या मार्गावरची डबलडेकर बंदच झाली. स्मरणशील नाखु डब्बल ढेकरवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

+१

राघवेंद्र
गुरुवार, 05/05/2016 - 19:14 नवीन
नवीन माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

(पुढे एक्दा दरवाजा नस्याले

शाम भागवत
Sun, 05/08/2016 - 19:56 नवीन
(पुढे एक्दा दरवाजा नस्याले कुणीतरी आगारातून बस पळवली आणि शिरूरपाशी सोडून दिली.)
हो. असे काहीतरी सकाळ पेपरमधे वाचल्याचे आठवतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

धन्यवाद!

उल्का
Wed, 05/04/2016 - 17:57 नवीन
m indicator वर पहायला हवे अजून ४ आहे का ते. :) बंद होण्यात वेग कमी, प्रवासी क्षमता कमी आणि कर्मचारी एक जास्त अशी कारणे वाचल्याचे आठवते. पण नक्की माहित नाही.
  • Log in or register to post comments

सिटी बसेस मधील सगळ्यात आवडती बस म्हणजे डबल डेकर.

मुक्त विहारि
Wed, 05/04/2016 - 18:02 नवीन
त्यातही पुढली सीट मस्ट. कित्येकदा त्या पायी २-३ बसेस सोडल्या आहेत.
  • Log in or register to post comments

छान लिहीलंय... खरं सांगायचं

उगा काहितरीच
Wed, 05/04/2016 - 19:20 नवीन
छान लिहीलंय... खरं सांगायचं तर अजून एकदाही बसलो नाही डबलडेकर बसमधे.
  • Log in or register to post comments

छान मुक्तक आहे...

विजय पुरोहित
Wed, 05/04/2016 - 19:39 नवीन
छान मुक्तक आहे...
  • Log in or register to post comments

कधी काळी दिल्लीत हि अश्या

विवेकपटाईत
Wed, 05/04/2016 - 19:43 नवीन
कधी काळी दिल्लीत हि अश्या बसेस होत्या. आठवण झाली.
  • Log in or register to post comments

लहानपणी सोलापुरात डबलडेकरात

जेपी
Wed, 05/04/2016 - 19:44 नवीन
लहानपणी सोलापुरात डबलडेकरात बसल्याच पुसटस आठवत.. बाकी लेख आ वडला.
  • Log in or register to post comments

जेप्या तू लेख का वडलास? अशी

विजय पुरोहित
Wed, 05/04/2016 - 19:51 नवीन
जेप्या तू लेख का वडलास? अशी ओढाओढी करू नकोस हं! तुला संपादक करुया पाहिजे तर हं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

सोलापुरात रूट नंबर ७ आणि ८ वर

राघवेंद्र
Wed, 05/04/2016 - 20:03 नवीन
सोलापुरात रूट नंबर ७ आणि ८ वर एक-एक डबल डेकर बस होत्या. संध्याकाळी तीच स्कूल बस असायची. मुले -मुली वेगवेगळ्या डेक वर असायची. लहानपणीची आठवण :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

सोलापूरला

टिनटिन
Wed, 05/04/2016 - 20:56 नवीन
सोलापूरला २ - ३ वर्षापूर्वी विमानतळसाठी डबल डेकर बघितली होती. फोटो डकवता आला तर बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

7 नंबर विजापूर रोड सैफुल

अभ्या..
गुरुवार, 05/05/2016 - 11:05 नवीन
7 नंबर विजापूर रोड सैफुल पर्यंत. 8 नंबर कारखाना. आता स्कुल बस म्हणून वापरतात. नवीन व्होल्वो आणि जनबस आल्याने डबल डेकर आकर्षण नाहि. बर्याचदा बंद पडते रस्त्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिनटिन

डबलडेकरच्या आठवणी ताज्या

खटपट्या
Wed, 05/04/2016 - 21:10 नवीन
डबलडेकरच्या आठवणी ताज्या झाल्या. लहानपणी वरच्या मजल्यावरील पहील्या सीटवर बसल्यावर मीच गाडी चालवतोय असे वाटत असे. वरच्या मजल्यावर धक्केही कमी बसायचे आणी आवाजही कमी यायचा. काही नतद्रष्ट माणसे समोरची खीडकी बंद करायला सांगायचे तेव्हा राग यायचा...
  • Log in or register to post comments

मस्त आठवण करून दिलीत

एक एकटा एकटाच
Wed, 05/04/2016 - 22:16 नवीन
मस्त आठवण करून दिलीत लेख आवडला
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Wed, 05/04/2016 - 22:27 नवीन
छान ल्हिलंय!
  • Log in or register to post comments

माझ्या लहानपणी आर्टिक्युलेटेड

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 05/04/2016 - 22:31 नवीन
माझ्या लहानपणी आर्टिक्युलेटेड आणि नॉन आर्टिक्युलेटेड अश्या दोन्ही प्रकारच्या डबलडेकर बस असायच्या ते आठवतयं. संचेती ब्रिजवरुन डावीकडे वळुन हायवेला लागताना ड्रायव्हरचा जीव निघत असे.
  • Log in or register to post comments

मस्त, जुन्या आठवणी ताज्या झाल्या !!

नीलमोहर
Wed, 05/04/2016 - 22:48 नवीन
पुण्यात लहानपणी डबलडेकर बसमध्ये बसल्याचे आठवतेय, खूप आवडायच्या या बस, तो जिना चढून वर जायचे, चुकूनही कधी खाली बसायचो नाही, नेहमी वरच बसायला हवे असायचे. तेव्हा वरच्या बसला ड्रायव्हर कसा काय नसतो हा प्रश्न कायम पडायचा :)
  • Log in or register to post comments

बडोद्यातल्या डडे

गामा पैलवान
गुरुवार, 05/05/2016 - 00:36 नवीन
बडोद्यात कोणे एके काळी ट्रेलर दुमजली बशी होत्या. त्याने खूप फिरलोय. मुंबईपेक्षाही जास्त. मुंबईत भटकणे होत नसे. बशीचा प्रवास अपरिहार्यतेकडे झुकत असे. पण सुट्टीत बडोद्यास गेलं की तिथे निरुद्देश भटकणं खूप होई. -गा.पै.
  • Log in or register to post comments

जोड बसेस

सिरुसेरि
गुरुवार, 05/05/2016 - 10:00 नवीन
छान माहिती . डबलडेकर बसप्रमाणेचप, अनेक ठिकाणी जोड बसेस / जोड गाडी वापरत असत असे आठवते.
  • Log in or register to post comments

बेळगावसारखी का?

असंका
गुरुवार, 05/05/2016 - 10:23 नवीन
बेळगावसारखी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

सांगलि मिरज रूट वर चालायच्या

संजय पाटिल
Fri, 05/06/2016 - 11:59 नवीन
सांगलि मिरज रूट वर चालायच्या त्या.. जोड बस म्हणुन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

आम्ही

तिमा
गुरुवार, 05/05/2016 - 10:27 नवीन
आम्ही, वयस्क आणि जुने मुंबईकर असल्यामुळे, ट्राम,डबलडेकर ट्राम, जोड ट्राम, व्हिक्टोरिया, डबल डेकर, जोड बस, ट्रॉली बस, डॉज टॅक्सी वगैरे सर्व प्रकारच्या वाहनांतून प्रवास केला आहे.
  • Log in or register to post comments

हायला! कधीतरी मुंबईतल्या

आदूबाळ
गुरुवार, 05/05/2016 - 21:11 नवीन
हायला! कधीतरी मुंबईतल्या ट्रामविषयी लिहा ना. (म्हणजे तुमच्या आठवणी...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

मुंबईतील ट्राम

प्रदीप
Sun, 05/08/2016 - 10:41 नवीन
मला आठवते त्यानुसार लिहीतो आहे. ट्राम तेव्हा किंग्स सर्कल ते म्युझियम अशी धावायची. तिचा मार्ग किंग्स सर्कल, दादर, परळ, लालबाग, भायखळ,,अलेक्झांड्रा टॉकिज (नागपाडा), फोरास रोड, हरकिसनदास हॉस्पिटल, प्रार्थना समाज, गिरगाव रोड, धोबी तलाव, व्ही. टी, फ्लोरा फाउंटन (आताचे हुतात्मा चौक), म्युझियम असा होता. बहुधा सर्व ट्रामी दुमजली असत, पण काही सिंगल डेकरही होत्या असे आठवते आहे. क्वचित ह्या सिंगल अथवा डबल डेकर्स एकमेकांना अशा दोन जोडलेल्या असत असेही अंधुक आठवते आहे. ट्राममध्ये मागून, टर्न्स्टाईलमधून प्रवेश करावयाचा व पूढून उतरायचे. दोन्ही मजल्यावर कंडक्टर्स असत. बाके लाकडी असत (ती स्विंगीग पाठीची असत की नाही हे आता आठवत नाही). ड्रायव्हरला हॉर्न म्हणजे पायाने वाजवायची घंटी असे. किंग्स सर्कलच्या शेवटच्या स्थानकानंतर नेहमीचा थ्री- पॉइंट टर्न- अराउंड नव्हता, तर ट्रॅक एका मोठ्या गोलाकाराने एकमेकांशी जोडलेले होते. म्हणजे दक्षिणेकडून आलेली ट्राम तशीच पुढे त्या गोलाकार ट्रॅकवरून फिरून पुन्हा दक्षिणेच्या दिशेने तोंड, येतांना होते तसेच ठेऊन जाण्यास तयार होई. अर्थात हा गोलाकार ट्रॅक इतका मोठ्ठा होता, की त्याच्या मधोमध एक बरेच विस्तीर्ण, पण पत्रे टाकून केलेले मार्केटच उभे होते. त्याचे नाव गांधी मार्केट. नुकतेच पाकिस्तानातून परागंदा होऊन आलेले सिंधी बांधव तिथे दुकाने टाकून असत. ही दुकाने बहुधा कापडांची व कपड्यांची असत. १९६० साली मुंबईतील ट्राम गेली, हे ट्रॅक्स काढण्यात आले. तेव्हा ते मार्केटही तिथून उठवून दुसरीकडे, तेव्हा नवीन होत असलेल्या षण्मुखानंद हॉलच्या समोरील स्वतःसाठी मुंबई महानगरपालिकेने खास बांधलेल्या जागेत नेले. ते तेव्हापासून तिथेच आहे. ********* आता मी जिथे राहतो, तिथेही ट्राम्स आहेत, सर्वसाधारण व्यवस्था त्या ट्राम्स्सारखीच आहे (मागून टर्नस्टाईलमधून चढणे, पुढून उतरणे इ). अर्थात विकसित देश असल्याने काही तपशिलांचे फरक आहेत-- कण्डक्टर्स इथे बसेस व ट्राम्समधे नसतोच. उतरतांना ड्रायव्हरच्या शेजारी ठेवलेल्या पेटीत पैसे टाकायचे (किंवा डेबिट कार्ड स्वाईप करायचे). खालच्या मजल्यावरील बाके खिडकीकडे पाठ करून आहेत, ज्यायोगे बर्‍याच व्यक्तिंना उभे राहता येईल. वरील मजल्यावरील व्यवस्था मात्र दोन्ही बाजूंस बाके व मधोमध आईल अशी आहे. ही बाकेही जवळजवळ सर्वच ट्राम्समधे लाकडी आहेत. आणि विशेष म्हणजे ही ट्रामसेवा अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ज्यावेळी ट्रामवे वरुन ट्राम

अभ्या..
Sun, 05/08/2016 - 18:47 नवीन
ज्यावेळी ट्रामवे वरुन ट्राम जात नसते तेंव्हा त्यवरुन जाणे अलौड असते का? मुंबईत असायचे असे वाचल्याचे आठवते. म्हणजे त्या रुळांना खडी, स्लीपर्स वगैरे कैच नसायचे का? अगदी रोडलेव्हल? परदेशात पिक्चरमध्ये अगदी रस्त्यात दाखवतात ट्रामवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

ट्रामवे

प्रदीप
Sun, 05/08/2016 - 19:18 नवीन
रस्त्याचा एक भागच असतात, म्हणा ना. रेल्वेच्या रूळांप्रमाणे त्यांना खाली बॅलास्ट नसतो, ते रूळ आजूबाजूच्या काँक्रीट रस्त्यामधेच असतात. सर्वसाधारणपणे त्यांवरून ट्राम जात नसेल तेव्हा त्यांवरून इतर वाहने जाऊ शकतात, कारण ते रस्त्याच्या पातळीच्या वर आलेले नसतात, तर त्याच्याशी ते लेव्हल झालेले असतात, त्यांच्यासाठी केलेला चरा अगदी चिंचोळा असतो. तेव्हा इतर वाहनांना त्याजवरून जाण्यास काहीच तांत्रिक अडचण नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ओह्ह, धन्यवाद प्रदीपदा.

अभ्या..
Sun, 05/08/2016 - 19:22 नवीन
ओह्ह, धन्यवाद प्रदीपदा. सध्यस्थीत रस्त्याचा दर्जा आणि रस्त्यावरचा कचरा पाहता हे फारच मुश्कील वाटते ना? ती गॅप सुध्दा भरुन जाइल आपल्या इथे कचरा आणि प्लास्टीकने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

खरे आहे

प्रदीप
Sun, 05/08/2016 - 19:33 नवीन
पण 'आमच्या वेळी' (सुस्कारा........) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अभ्या, साधारण असा प्रकार

खटपट्या
Wed, 05/11/2016 - 03:28 नवीन
अभ्या, साधारण असा प्रकार असायचा. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ओह्ह धन्यवाद खटपट्या, आणि

अभ्या..
Wed, 05/11/2016 - 07:37 नवीन
ओह्ह धन्यवाद खटपट्या, आणि पावर ओव्हरहेड वायर्सची ना? मजेशीरच प्रकरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

मुंबईतली ट्राम फार पूर्वी बंद झाली.

बोका-ए-आझम
Sun, 05/08/2016 - 23:34 नवीन
तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. पण कलकत्त्यातली ट्राम अनुभवली आहे. अत्यंत स्वस्त आणि रमतगमत शहर पाहायला उपयोगी. पण तिथली प्रचंड गर्दी असल्या योजनेचा पूर्ण येळकोट करुन टाकते. पण अजूनही ती चालू आहे आणि कलकत्त्याचा मध्यवर्ती भाग त्यामुळे बराच जोडला गेलेला आहे. भारतातील पहिली मेट्रो आणि एकमेव ट्राम यांचं combination हे कलकत्त्यातच पाहायला मिळतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

कलकत्त्यातील अजब प्रवास

चलत मुसाफिर
Mon, 05/09/2016 - 00:58 नवीन
कलकत्त्याला गेलो होतो आणि बिहालाच्या दिशेला कुठेतरी रहायला होतो. मला वाटतं न्यू अलीपूर असावं (चू.भू.द्या.घ्या. नावं सारी लक्षात नाहीत). तिथे बेलूरचा रामकृष्ण मठ पहायचा बूट निघाला. तेव्हा, रहात्या जागेहून ट्याक्सीने मेट्रो स्टेशनला गेलो, तिथून मेट्रो पकडून, मला वाटतं श्यामबाजारला उतरलो. मग बाहेर पडून बस पकडली आणि दक्षिणेश्वर मंदिराला पोचलो. पुढे फेरीबोटीत बसून बेलूर गाठले. मजा आली. जाताना ट्रामही वाटेत कुठेतरी दिसली, पण प्रवास करावा लागला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

किंग्स सर्कल, दादर, परळ,

आदूबाळ
Mon, 05/09/2016 - 16:18 नवीन
किंग्स सर्कल, दादर, परळ, लालबाग...
म्हणजे ट्राम कधी रेल्वेचे रूळ ओलांडून पश्चिमेला (समुद्राच्या दिशेला) जातच नसे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

दादर टी.टी.

तिमा
Mon, 05/09/2016 - 18:03 नवीन
सध्याचे दादर टी.टी. म्हणजे दादर ट्राम टर्मिनसच होते. त्यामुळे ट्राम्स दादर सेंट्रलपर्यंत येत असाव्यात. वडिलांचे बोट धरुन ट्राममधे बसायचे वय असल्याने, रुटस कुठले होते, त्याचा कधी विचारच केला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

उत्तरे

प्रदीप
Mon, 05/09/2016 - 18:12 नवीन
आदूबाळ, भायखळ्याचा पूल वगळता, ट्राम कधीच रेल्वे ओलांडून पलिकडे गेली नाही. तिमा, तुमचे म्हणने खरे आहे, दादर टी. टी. म्हणजे ट्राम टर्मिनस. माझा अंदाज असा आहे की सुरूवातीस ट्राम तिथेच संपत होती; नंतर ती किंग्ज्स सर्कलला संपू लागली. दादर टी. टी. ला टर्मितेट झालेली ट्राम मी पाहिली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

लहानपण सायन ( शीव ) येथे

कंजूस
गुरुवार, 05/05/2016 - 10:41 नवीन
लहानपण सायन ( शीव ) येथे डोपोजवळच गेल्याने सर्व प्रवास डबलडेकरातूनच केलाय.८५, १६५,६३,६मर्या,८मर्या वगैरे त्यवेळी सायन ते म्युझिअम पाउणतासात प्रवास होत असे.नंतर ८० सालानंतर वरच्या मजल्यावर जाण्याचे प्रवासी टाळू लागले इतके आळशी होऊ लागले.युअरोपात मात्र टुअर असते डडेची.जर्मनीत अशी एक पाण्यातही जाणारी आहे त्याचे फार अप्रुप आहे.
  • Log in or register to post comments

@नाखू काका,

अभिजीत अवलिया
गुरुवार, 05/05/2016 - 11:35 नवीन
@नाखू काका, काही काळ पुणे अहमदनगर अशी ड्बलडेकर असताना त्यातही प्रवास केला. म्हणजे त्या वेळी पुण्याहून अहमदनगर पर्यंत सिटी बस जात असे?
  • Log in or register to post comments

नाही

नाखु
गुरुवार, 05/05/2016 - 12:08 नवीन
यष्टी महामंडळाचीच डबल डेकर होती, पुढे ती चम्त्कारिक कारणाने बंद करण्यात आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा