✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पटलं तर व्हय म्हणा ! !

स
सस्नेह यांनी
Wed, 12/24/2014 - 13:11  ·  लेख
लेख
आमच्या कोल्हापूरकडे एक भारी म्हण आहे, ‘पटलं तर व्हय म्हणा, न्हाईतर सोडा !’ कालचा प्रसंग. एका परिचितांच्या घरी गेले होते. मुलीच्या शाळेची वेळ. रिक्षावाला दारात थांबून हॉर्न वाजत होता. गृहपाठाचं पुस्तक सापडत नव्हतं. मुलगी युनिफॉर्म घालून पळापळ करतेय आणि बाबा आरडओरडा. आई गोंधळलेली. बाबा : असं कसं सापडत नाही ? सापडलंच पाहिजे. आई : अहो, शाळेला उशीर होतोय, जाऊदे तिला. उद्या दाखवेल गृहपाठ. बाबा : केलाय ना खपून काल ? मग न घेता का जायचं ? तूही शोध. सापडल्याशिवाय जायचं नाही ! आता आईपण शोधू लागली. मुलगी : ‘बाबा, राहूदे, ना, मी सांगते शाळेत, उद्या देईन म्हणून.’ पण बाबा ठाम. ड्रायव्हरला उशीर झाल्याने आधीच त्यांचे डोके तापलेले. ‘तू आणि तुझी आई, दोघी आळशी आहात . यूसलेस ! काय ग, तुझं लक्ष आहे का मुलांवर ? पहिल्यापासून सांगतोय मी ...’ माझ्यासारख्या परक्याच्या पुढ्यात हा कौटुंबिक समरप्रसंग चालल्याने आई कानकोंडी. ...अखेर एकदाचे पुस्तक मिळाले ! मुलगी गेली. मग आई बाबांवर तुटून पडली. 'काय हो, तुम्ही किती लक्ष देता मुलांकडे ? मीच सगळीकडे मरायचं का ? लग्न झाल्यापासून पाहतेय , सारखा नुसत पाणउतारा ...’ इ. इ. मग मुसमुसणे. एव्हाना बाबांचा पारा खाली आलेला. ते निमूटपणे ऐकत असलेले. अखेर मी म्हटले, ‘एक गोष्ट आहे. एका माणसाने एकदा गांधीजींना खूप शिव्या दिल्या आणि निघून गेला. गांधीजींनी त्या शांतपणे ऐकून घेतल्या, हे पाहून शेजारचा माणूस म्हणाला, काय हो, त्याने इतक्या घाण घाण शिव्या दिल्या तरी तुम्ही शांत कसे ? गांधीजी हसून म्हणाले, त्याने पुष्कळ दिल्या असतील, मी कुठे घेतल्या ? ... तर तुम्ही दोघांनी आता जे काही ऐकलं, ते स्वीकारू नका म्हणजे झालं !पटलं तर व्हय म्हणा, न्हाईतर सोडा !' दोघेही हसू लागले..! सांगायची गोष्ट, आपण प्रसंग इतक्या सिरिअसली का घेतो बरं ? मनुष्यस्वभाव आहे, माणूस रागाला येतो, त्या भरात मनात नसलेलंसुद्धा बोलून जातो. ऐकणाऱ्यानं थोडं ऐकून घेतलं, तर काय बिघडतं ? रागाचा भर ओसरल्यावर रागावणाऱ्याला चूक समजते. अपराधी वाटतं. पण ते तो कबूल करत नाही, क्षमा मागत नाही. ऐकणारा क्षमा करत नाही. तेढ वाढत जाते. का बरं आपण छोट्या छोट्या गोष्टीना प्रतिष्ठेचे बनवतो ? मनात नसताना दुरावा धरतो ? तेढ वाढवतो ? आज इथे मुविंचा धागा वाचला आणि वाटले, इथेही तेच आहे. जे पिंडी ते ब्रम्हांडी ! ...आपण इथे संवादासाठी येतो. रमतो. कधी वाद होतो. कधी मिटतो, कधी विकोपाला जातो. मिपावरच काय, या जगातसुद्धा उद्या आहे की नाही याची गॅरंटी नसताना आज आपण शत्रुत्वाची ओझी का वाहत राहतो ? तीनेक वर्षे झाली मिपावर येऊन. प्रत्येक सदस्याप्रमाणे मलाही सुरुवातीला टवाळीला तोंड द्यावे लागले आहे. एक स्टेज तर अशी आली की मिपा सोडल्यातच जमा होते. गणपाभौने समजूत दिली. ‘टिकून राहा आणि लिहित राहा. आपोआप इथे मित्र होतील.’ मी उत्तर दिले, ‘पुन्हा इथे काही लिहीन असे वाटत नाही’ ..पण काही दिवसांनी पुन्हा वाचू लागले. वाचत राहिले. प्रतिसादातून व्यक्त होत राहिले. एक दिवशी पुन्हा लिहावेसे वाटले. लिहिले, आणि सर्वांनी भरभरून दाद दिली. ..आणि मग इथे कधी रुळून गेले समजलंच नाही ! नंतर वाद शक्यतो नाहीच झाले. इथलं वातावरण खेळीमेळीचं. पण तरीही कधी कधी ‘ओझी’ निर्माण होतात. माझ्या ध्यान-गुरूंनी एक वेगळा ध्यान-प्रकार सांगितला होता. ‘क्षमा-ध्यान’ ! दैनंदिन जीवनात वादावादी, मतभेद, आरोप-प्रत्यारोप यांच्या भरात बरेचदा मनात असताना आणि नसतानाही कटू शब्द जातात. काट्याचा नायटा होऊन वाद विकोपाला जातात. ..काही वेळाने भान आल्यावर चुका समजतात, पश्चात्तापही होतो. पण क्षमा मागावी तर ‘अहं’ आडवा येतो. , कधी संकोच आडवा येतो तर कधी भिडस्तपणा. म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी हे क्षमा ध्यान करायचं. काही नाही, डोळे मिटायचे आणि दिवसभरातले असे प्रसंग स्मरायचे, की ज्यात आपण कुणालातरी दुखावलं आहे, कुणीतरी आपल्याला दुखावलं आहे. आणि ते जणू समोर आहेत असं समजून मनातल्या मनात त्यांची क्षमा मागायची. आणि ज्यांनी आपल्याला दुखावलंय त्यांनाही क्षमा करायची ! बघा आता किती शांत झोप लागते ! मलाही आज इथे हे क्षमा ध्यान करावसं वाटलं. इथल्या सगळ्या सुहृदानी, ज्यांना मी कळत नकळत जर कधी दुखावले असेन, तर मला क्षमा करा ! आणि ज्यांनी मला कळत नकळत दुखावले होते, त्यांना मी स्नेह-पूर्वक क्षमा केली आहे, आणि करत राहीन...! आमेन...! कसं काय, मग, पटलं तर व्हय म्हणा ! !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
18100 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

नाही उलट जास्त सोपे आहे अशांना क्षमा करणे

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 12/27/2014 - 16:58 नवीन
पण जे जाणुन बुजुन वागतात.. बोलतात. त्यांच्या बाबतीत जमणे कठीण
नाही उलट अशा लोकांच्या बाबत तर क्षमा करणे अजून सोपे आहे. चिखलात लोळणारे डुक्कर जर आपल्या दिशेने यायला लागले तर आपण त्याच्याशी लगेच कुस्ती खेळायला जातो का? उलट डुकराला हसून त्याची कीव करत आपण आपला रस्ता बदलतो. अशा प्राण्यांच्या बाबतीतही तेच करायचे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

चिखलात लोळणारे डुक्कर जर आपल्या दिशेने यायला लागले तर....

मुक्त विहारि
Sun, 12/28/2014 - 06:18 नवीन
....आपण त्याच्याशी लगेच कुस्ती खेळायला जातो का? उलट डुकराला हसून त्याची कीव करत आपण आपला रस्ता बदलतो. अशा प्राण्यांच्या बाबतीतही तेच करायचे. खरोखरच अमूल्य सल्ला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

व्हय

इरसाल
Sat, 12/27/2014 - 17:02 नवीन
व्हय जी व्हय !!
  • Log in or register to post comments

छान विचार..पटल अगदि.

इशा१२३
Sun, 12/28/2014 - 14:25 नवीन
छान विचार..पटल अगदि. जरूर प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

पटल

विवेक्पूजा
Tue, 12/30/2014 - 12:29 नवीन
व्हय म्हाराजा!!
  • Log in or register to post comments

धन्या

पैसा
Tue, 12/30/2014 - 21:59 नवीन
धन्याचा हा लेखही आठवला! http://www.misalpav.com/node/28477
  • Log in or register to post comments

मी बरेचदा हा प्रयत्न करुन पाहिला...

अर्धवटराव
Tue, 12/30/2014 - 23:56 नवीन
मिपाकरांसाठी नाहि, पण वैयक्तीक आयुष्यात. पण च्यायला दारु-शिग्रेट शंभरदा सोडावी त्याप्रमाणे परत परत बदले कि आग उफाळुन येते :) त्या महाभागांची गचांडी वळल्याशिवाय आपल्याला समाधान मिळणार नाय.
  • Log in or register to post comments

बदलेकी आग

सस्नेह
Wed, 12/31/2014 - 08:00 नवीन
ही अपराधी व्यक्तिऐवजी स्वतःलाच जाळू नये यासाठी क्षमाध्यान. समोरासमोर क्षमा मागितली नाही त्यामुळे अपराधी सोकावणार नाही पण आपली नजर स्वच्छ होऊन त्याला अपराधाची सरळ जाणीव होते. प्रत्येकाच्या मनात एक रामशास्त्री असतो. त्याला स्वतःलाच न्यायास प्रवृत्त करायचे. अनुभव आला आहे की It works !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

एक अवांतर प्रश्न.

अर्धवटराव
Wed, 12/31/2014 - 00:02 नवीन
असं क्षमा ध्यान केल्याने चुकीची पुनरावृत्ती व्हायचे चान्सेस जास्त नसतात का? पश्चात्ताप झाल्याशिवाय क्षमेला काहि अर्थ नसतो ना...
  • Log in or register to post comments

चुकीची जाणीव म्हणजेच

सस्नेह
Wed, 12/31/2014 - 08:07 नवीन
चुकीची जाणीव म्हणजेच पश्चात्ताप. ती झाली तर चुकीची पुनरावृत्ती कशी होईल ? उलट प्रज्ञा स्वच्छ झाल्याने पुन्हा चूक होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

शक्य आहे...

अर्धवटराव
Wed, 12/31/2014 - 23:27 नवीन
विचार करतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

कळते पण वळेल काय ?

पहाटवारा
Wed, 12/31/2014 - 04:52 नवीन
कळते पण प्रत्येक वेळी वळेल काय ? अवांतर : गाडी चालवताना बायको ज्या सूचना करत असते, त्याच सूचना ती स्वत: गाडी चालवताना अंमलात का आणत नाहि ? अती-अवांतर : स्वैपाक्-घरात लुड्बूड करून नव्-नवीन पदार्थ बनवताना, आपणच बायकोला दिलेल्या सूचना, स्वतः का अंमलात आणू शकत नाहि ?? क्योंकी .. कळेंगा .. पर वळेंगा इस्की गारंटी नहि :) -पहाटवारा
  • Log in or register to post comments

गाडी चालवताना बायको ज्या

सस्नेह
Wed, 12/31/2014 - 11:23 नवीन
गाडी चालवताना बायको ज्या सूचना करत असते, त्याच सूचना ती स्वत: गाडी चालवताना अंमलात का आणत नाहि ? अती-अवांतर : स्वैपाक्-घरात लुड्बूड करून नव्-नवीन पदार्थ बनवताना, आपणच बायकोला दिलेल्या सूचना, स्वतः का अंमलात आणू शकत नाहि ??
अगदी खरे आहे ! कारण चुका करणाऱ्यापेक्षा पाहणाऱ्याला नीट दिसत असतात ! *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पहाटवारा

अवांतर : गाडी चालवताना बायको

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/31/2014 - 16:02 नवीन
अवांतर : गाडी चालवताना बायको ज्या सूचना करत असते, त्याच सूचना ती स्वत: गाडी चालवताना अंमलात का आणत नाहि ? आणि बायको गाडी चालवायला शिकल्यानंतरही "तुम्हीच गाडी चालवा" असे म्हणून वर "आता मला पण गाडी चालवता येते" असे म्हणत अजून जोमाने सूचना करते... त्याचं काय ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पहाटवारा

याचं कारण

सस्नेह
Wed, 12/31/2014 - 16:13 नवीन
अज्ञानामधील ज्ञानाचा भास ! *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/31/2014 - 16:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

तेचं काये ना की, समोरचं मानूस

प्यारे१
Wed, 12/31/2014 - 13:18 नवीन
तेचं काये ना की, समोरचं मानूस कसं वागंल ते का आपल्या हातात हाय? सोत्ताची पोरंच कशाला, सोत्ता तरी सोत्ताचं आयकू शकत नाय आपन. उद्यापास्नं फाटंचं उटू म्हना की. नाय जमत आपलं आपल्याला. दुसर्याला कश्यापायी बोल लावाचा म्हन्तो म्या. आपन चुकतो म्हनलं की समोरचं मानूस बी चुकतं कदीकदी! हा आता कुनी बळंच अंगाला माती लावून घेत आसंन तर आपन पन दोन चार डाव हानतुच. त्यात कुनाबद्दल ना देश ना मच्चर ... हौ! जुन्या जमान्यात व्हायचं तसं. उगा कुनी पेटावला की उगा धुमसत बसा. पन मग लक्षात आलं च्यायला, पेटवनारा गेला पेटवून आनि आपन धुमसतोय. म्हनलं कह्याला? कोन सांगिटलंय? लग्गेच दोन टॅक्टर पानी आनून द्याचं वतून. येकदम झ्याक बगा!
  • Log in or register to post comments

छान लेख...

चेतन677
Wed, 12/31/2014 - 22:08 नवीन
प्रत्येक घरात असं जोडप्याचे भांडण होत असते त्यांच्यासाठी हे नक्की उपयोगी पडेल!!!
  • Log in or register to post comments

अहाहा!

पैसा
गुरुवार, 04/30/2015 - 16:01 नवीन
पुन्हा एकदा वाचला आणि तेवढाच आवडला!
  • Log in or register to post comments

अतिशय पटलं गं. पूर्वी हा लेख

नूतन सावंत
गुरुवार, 04/30/2015 - 16:29 नवीन
अतिशय पटलं गं. पूर्वी हा लेख वाचला तेव्हापासून क्षमा ध्यानाचे प्रयोग चालू आहेत.कधी जमतं कधी नाय जमत.
  • Log in or register to post comments

'गांधीजी हसून म्हणाले, त्याने

नूतन सावंत
गुरुवार, 04/30/2015 - 16:33 नवीन
'गांधीजी हसून म्हणाले, त्याने पुष्कळ दिल्या असतील, मी कुठे घेतल्या?'बद्दल माझी आई म्हणत असे "जाईची फुले जाई खाली."
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
गुरुवार, 04/30/2015 - 16:39 नवीन
छान म्हण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

व्हय! :)

प्राची अश्विनी
Sun, 05/03/2015 - 16:24 नवीन
व्हय! :)
  • Log in or register to post comments

व्हय व्हय व्हय

कविता१९७८
Wed, 04/27/2016 - 13:27 नवीन
व्हय व्हय व्हय
  • Log in or register to post comments

व्हय जी !! पटलंच की,

नीलमोहर
Wed, 04/27/2016 - 13:57 नवीन
मात्र क्षमा ध्यान हे ती व्यक्ति समोर नसतांना करणे खूपच सोपे आहे, अवघड आहे त्या व्यक्तिशी समोरासमोर, इगो आड न येऊ देता संवाद चालू ठेवणे.
  • Log in or register to post comments

खरंय,

सस्नेह
Wed, 04/27/2016 - 14:29 नवीन
तरीही एकदा ध्यानातून क्षमा करून बघ. दुसऱ्या वेळी त्या व्यक्तीशी बोलताना मन स्वच्छ असेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

साधा सोपा आणि अर्थपूर्ण लेख.

विजय पुरोहित
Wed, 04/27/2016 - 15:31 नवीन
साधा सोपा आणि अर्थपूर्ण लेख. पैजारबुवांचे विपश्यना एक्स्प्रेस मधील क्षमा प्रार्थना गीत पण जबरीच!!!
  • Log in or register to post comments

खर आहे

diggi12
Tue, 05/07/2024 - 00:00 नवीन
खर आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा