Skip to main content

पटलं तर व्हय म्हणा ! !

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 24/12/2014 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कोल्हापूरकडे एक भारी म्हण आहे, ‘पटलं तर व्हय म्हणा, न्हाईतर सोडा !’ कालचा प्रसंग. एका परिचितांच्या घरी गेले होते. मुलीच्या शाळेची वेळ. रिक्षावाला दारात थांबून हॉर्न वाजत होता. गृहपाठाचं पुस्तक सापडत नव्हतं. मुलगी युनिफॉर्म घालून पळापळ करतेय आणि बाबा आरडओरडा. आई गोंधळलेली. बाबा : असं कसं सापडत नाही ? सापडलंच पाहिजे. आई : अहो, शाळेला उशीर होतोय, जाऊदे तिला. उद्या दाखवेल गृहपाठ. बाबा : केलाय ना खपून काल ? मग न घेता का जायचं ? तूही शोध. सापडल्याशिवाय जायचं नाही ! आता आईपण शोधू लागली. मुलगी : ‘बाबा, राहूदे, ना, मी सांगते शाळेत, उद्या देईन म्हणून.’ पण बाबा ठाम. ड्रायव्हरला उशीर झाल्याने आधीच त्यांचे डोके तापलेले. ‘तू आणि तुझी आई, दोघी आळशी आहात . यूसलेस ! काय ग, तुझं लक्ष आहे का मुलांवर ? पहिल्यापासून सांगतोय मी ...’ माझ्यासारख्या परक्याच्या पुढ्यात हा कौटुंबिक समरप्रसंग चालल्याने आई कानकोंडी. ...अखेर एकदाचे पुस्तक मिळाले ! मुलगी गेली. मग आई बाबांवर तुटून पडली. 'काय हो, तुम्ही किती लक्ष देता मुलांकडे ? मीच सगळीकडे मरायचं का ? लग्न झाल्यापासून पाहतेय , सारखा नुसत पाणउतारा ...’ इ. इ. मग मुसमुसणे. एव्हाना बाबांचा पारा खाली आलेला. ते निमूटपणे ऐकत असलेले. अखेर मी म्हटले, ‘एक गोष्ट आहे. एका माणसाने एकदा गांधीजींना खूप शिव्या दिल्या आणि निघून गेला. गांधीजींनी त्या शांतपणे ऐकून घेतल्या, हे पाहून शेजारचा माणूस म्हणाला, काय हो, त्याने इतक्या घाण घाण शिव्या दिल्या तरी तुम्ही शांत कसे ? गांधीजी हसून म्हणाले, त्याने पुष्कळ दिल्या असतील, मी कुठे घेतल्या ? ... तर तुम्ही दोघांनी आता जे काही ऐकलं, ते स्वीकारू नका म्हणजे झालं !पटलं तर व्हय म्हणा, न्हाईतर सोडा !' दोघेही हसू लागले..! सांगायची गोष्ट, आपण प्रसंग इतक्या सिरिअसली का घेतो बरं ? मनुष्यस्वभाव आहे, माणूस रागाला येतो, त्या भरात मनात नसलेलंसुद्धा बोलून जातो. ऐकणाऱ्यानं थोडं ऐकून घेतलं, तर काय बिघडतं ? रागाचा भर ओसरल्यावर रागावणाऱ्याला चूक समजते. अपराधी वाटतं. पण ते तो कबूल करत नाही, क्षमा मागत नाही. ऐकणारा क्षमा करत नाही. तेढ वाढत जाते. का बरं आपण छोट्या छोट्या गोष्टीना प्रतिष्ठेचे बनवतो ? मनात नसताना दुरावा धरतो ? तेढ वाढवतो ? आज इथे मुविंचा धागा वाचला आणि वाटले, इथेही तेच आहे. जे पिंडी ते ब्रम्हांडी ! ...आपण इथे संवादासाठी येतो. रमतो. कधी वाद होतो. कधी मिटतो, कधी विकोपाला जातो. मिपावरच काय, या जगातसुद्धा उद्या आहे की नाही याची गॅरंटी नसताना आज आपण शत्रुत्वाची ओझी का वाहत राहतो ? तीनेक वर्षे झाली मिपावर येऊन. प्रत्येक सदस्याप्रमाणे मलाही सुरुवातीला टवाळीला तोंड द्यावे लागले आहे. एक स्टेज तर अशी आली की मिपा सोडल्यातच जमा होते. गणपाभौने समजूत दिली. ‘टिकून राहा आणि लिहित राहा. आपोआप इथे मित्र होतील.’ मी उत्तर दिले, ‘पुन्हा इथे काही लिहीन असे वाटत नाही’ ..पण काही दिवसांनी पुन्हा वाचू लागले. वाचत राहिले. प्रतिसादातून व्यक्त होत राहिले. एक दिवशी पुन्हा लिहावेसे वाटले. लिहिले, आणि सर्वांनी भरभरून दाद दिली. ..आणि मग इथे कधी रुळून गेले समजलंच नाही ! नंतर वाद शक्यतो नाहीच झाले. इथलं वातावरण खेळीमेळीचं. पण तरीही कधी कधी ‘ओझी’ निर्माण होतात. माझ्या ध्यान-गुरूंनी एक वेगळा ध्यान-प्रकार सांगितला होता. ‘क्षमा-ध्यान’ ! दैनंदिन जीवनात वादावादी, मतभेद, आरोप-प्रत्यारोप यांच्या भरात बरेचदा मनात असताना आणि नसतानाही कटू शब्द जातात. काट्याचा नायटा होऊन वाद विकोपाला जातात. ..काही वेळाने भान आल्यावर चुका समजतात, पश्चात्तापही होतो. पण क्षमा मागावी तर ‘अहं’ आडवा येतो. , कधी संकोच आडवा येतो तर कधी भिडस्तपणा. म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी हे क्षमा ध्यान करायचं. काही नाही, डोळे मिटायचे आणि दिवसभरातले असे प्रसंग स्मरायचे, की ज्यात आपण कुणालातरी दुखावलं आहे, कुणीतरी आपल्याला दुखावलं आहे. आणि ते जणू समोर आहेत असं समजून मनातल्या मनात त्यांची क्षमा मागायची. आणि ज्यांनी आपल्याला दुखावलंय त्यांनाही क्षमा करायची ! बघा आता किती शांत झोप लागते ! मलाही आज इथे हे क्षमा ध्यान करावसं वाटलं. इथल्या सगळ्या सुहृदानी, ज्यांना मी कळत नकळत जर कधी दुखावले असेन, तर मला क्षमा करा ! आणि ज्यांनी मला कळत नकळत दुखावले होते, त्यांना मी स्नेह-पूर्वक क्षमा केली आहे, आणि करत राहीन...! आमेन...! कसं काय, मग, पटलं तर व्हय म्हणा ! !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18252
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

'गांधीजी हसून म्हणाले, त्याने पुष्कळ दिल्या असतील, मी कुठे घेतल्या?'बद्दल माझी आई म्हणत असे "जाईची फुले जाई खाली."

मात्र क्षमा ध्यान हे ती व्यक्ति समोर नसतांना करणे खूपच सोपे आहे, अवघड आहे त्या व्यक्तिशी समोरासमोर, इगो आड न येऊ देता संवाद चालू ठेवणे.

In reply to by नीलमोहर

तरीही एकदा ध्यानातून क्षमा करून बघ. दुसऱ्या वेळी त्या व्यक्तीशी बोलताना मन स्वच्छ असेल !

साधा सोपा आणि अर्थपूर्ण लेख. पैजारबुवांचे विपश्यना एक्स्प्रेस मधील क्षमा प्रार्थना गीत पण जबरीच!!!