१६ डिसेंबर, मंगळवार.. सकाळी ७ चा सुमार, पारा मायनसकडे झुकलेला.. सूर्याची लेट ड्यूटी.. उजाडायला अजून चिकार अवकाश.. दिनेश बूट घालत असताना फोन खणाणला. आत्ता एवढ्या सकाळी कोणाचा फोन? म्हणत त्याने फोन घेतला आणि बापरे..बरं .. म्हणत ठेवलाही. कोणाचा फोन होता?ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी अंगातला ओव्हरकोट काढून त्याने सोफ्यावर फेकला. "अरे,काय झालं? कोणाचा फोन होता? " "बाबा गेले." तो सुन्नपणे म्हणाला.
"बाबा गेले? कोणाचे?"
"अग, आपले..सुधीरचा फोन होता."
"शक्यच नाही. परवाच तर बोललो की आपण त्यांच्याशी.."
लगेचच परत भारतात घरी फोन लावला.अशा बातम्या दुर्दैवाने कधीच खोट्या ठरत नाहीत.
फोनवर तेच परत ऐकूनही स्वत:च्या कानांवर विश्वास बसेना.सुन्न व्हायला झालं. लगेचच भारतात यायला निघतो आहोत एवढंच कसंबसं बोलता आलं.दिनेशने काकाला सांगितलं आम्ही लगेच निघतो आहोत,पण तुम्ही आमच्यासाठी थांबू नका.परत एकदा मी जे ऐकलं त्यावर माझा विश्वास बसेना. थांबू नका? मला न भेटता कसे जातील बाबा? मला त्यांना पहायचं आहे. माझ्या मनात विचारांची गर्दी दाटली. लगेच निघालो तरी तिथे पोहोचायला रात्रीचे २ तरी वाजतील हे लक्षात घेऊन तिथे असलेल्या सगळ्यांना आणि बाबांनाही माझ्यासाठी किती त्रास द्यायचा? हे विचार मनात आणून मग डोळ्यातलं पाणी आवरत तिकिटांची व्यवस्था करायला निघालो.
नाताळच्या सुट्या सुरु झाल्याने तिकिटं मिळेनात. मला आत्ताच्या आत्ता जायचं आहे भारतात, कोणत्याही एअरलाइनचं, कोणत्याही क्लासचं तिकिट द्या हो मला.. माझं मन आक्रंदू लागलं.त्या दिवशीचं तिकिट नाहीच मिळालं, शेवटी दुसर्या दिवशीचं एकच तिकिट कन्फर्म झालं,दुसरं तिकिट अजूनही वेटिंगवरच होतं.
घरी फोन करुन तिकिटाचं सांगितलं. असं कसं झालं? ह्या खेरीज दुसरा विचार मनात नव्हता आणि जाता येत नसल्यानं हतबल.. अगदी हेल्पलेस वाटत होतं. फोनावर फोन करण्याखेरीज दुसरं काय करु शकत होते? त्सेंटा आजीला फोन लावला. आजीही माझ्याइतकीच हादरली.आईबाबा जर्मनीत येऊन गेल्याने आजीआजोबांशी त्यांची छान दोस्ती झालेली होती. त्यांनाही धक्का बसणं स्वाभाविक होतं, तरीही त्यांचा आम्हाला खूपच आधार होता. अशा वेळी कोणीतरी मोठं आधाराला हवं असतं आणि आजीआजोबांनी बळंबळं ब्रेडचा स्लाइस आणि कॉफी घ्यायला लावली, तुला तिथे जाऊन उभं रहायचं आहे. धीराने घ्यायला हवं असं सांगत धीर दिला.अजून रात्र फ्रांकफुर्टातच काढायची होती पण ही वाईट बातमी कळल्यावर आमच्या सुहृदांनी इमेल,फोन, चॅटवरुन संपर्क साधून एकटेपणा वाटू दिला नाही.
आठवणी, आठवणी आणि असंख्य आठवणी..मन तर कधीच आईच्या कुशीत जाऊन पोहोचलं होतं.लहानपणी मला खांद्यावर घेऊन जाणारे बाबा, प्रियाला हिरकणीची गोष्ट सांगणारे बाबा, काका,तुझे केस सोनेरी हवे होते म्हणजे एकदम युरोपियन दिसला असतास असं मृणालने म्हटल्यावर मिश्किलपणे हसणारे बाबा,वास्तुशांतीच्या वेळचे सोवळं नेसलेले बाबा,आमच्या सगळ्यांच्या लग्नातले बाबा, सारिकाला सुपारी आवडते म्हणून तिच्या रुखवतात किलोभर सुपारी ठेवणारे बाबा,जर्मनीला आलेले, ख्रिस आणि सुझनचे लग्न एन्जॉय करणारे, त्सेंटा आकिम आणि मार्सेलाशी गप्पा मारणारे बाबा.. असंख्य आठवणींनी रात्र उसवून गेली.
कसाबसा दुसरा दिवस उजाडला.आकिमआजोबा विमानतळावर सोडायला आले होतेच.दिनेशचे तिकिट कन्फर्म झाले नाही, ४ दिवसांनंतरचे तिकिट त्याला मिळाले.पण तो एकटा नाही त्याच्या पाठीशी आजीआजोबा आहेत ह्याची कल्पना असल्याने पुढे गेले. विमानाने आकाशात झेप घेतली आणि मनही धावू लागलं. प्रवासाचे ते ८ तास किती मोठे वाटले. वेळ जाता जाईना.. परत आठवणींचे कढ यायला लागले.
एकदाचे विमान मुंबईला पोहोचले.बाहेर पडण्यासाठी ही गर्दी.. एस.टी स्टँडच्या वरताण दृश्य! सामान तर काही नव्हतंच पण बाहेर जाण्यासाठी रांगेत तर उभं राहणं प्राप्त होतंच. हताशपणे रांगेत उभी राहिले. पाचेक मिनिटात एका कस्टम अधिकार्याने सामानाची विचारणा केली. हातातली पर्स दाखवल्यावर त्याने एनी प्रॉब्लेम? असं विचारत माझ्या उत्तराचीही वाट न पाहता रांगेतून बाहेर काढून दुसर्या दाराने मला बाहेर सुध्दा काढले. निखिल,सुधीर बाहेर वाट पाहतच होते.
घरी पोहोचलो. अंगणात गाडी लावताना मात्र बांध फुटला. बाबांशिवाय घर..कल्पनाच सहन होईना.घर सगळ्या नातेवाईकांनी भरलेलं होतं पण बाबाच नव्हते. त्यांच्याऐवजी टोपलीखालचा तो अशुभ दिवा फक्त होता. आई आणि प्रियाच्या कुशीत शिरले. नेमकं काय झालं त्यांना हे मला अजूनही कळलेलं नव्हतं.
सकाळचा पेपर वाचून ,दुसरा चहा घेऊन नेहमीसारखे ते आंघोळीला गेले.रंगाचं काम सुरु करायचं म्हणून कामगार आलेले होते.बाबा आंघोळ करुन,बादल्या आवरुन ,कपडे मशिनमध्ये टाकून,सूर्याला नमस्कार करुन जिना उतरत होते. ४/५ पायर्या उतरल्यावर एका पायरीवर बसले.कसला आवाज नाही, व्हिवळणं नाही, आधाराला काही घेतलेलं नाही. शांतपणे एका पायरीवर बसून दुसर्या पायरीवर पाय सोडलेले,डोळे मिटलेले आणि डोके खाली झुकलेले.. प्रियाने त्यांना असं बसलेले पाहताच ती धावतच वर गेली.बाबांना सावरत तिने आईला, रंगार्यांना हाका मारल्या.त्यांच्या मदतीने खाली आणून त्यांना कांदा हुंगवला, ब्रँडी चोळली,तोंडात सॉर्बिट्रेट चुरुन घालत एकीकडे डॉ़क्टरना ,काकाला फोन लावले. दुसर्या मिनिटाला नरेन आणि काका धावतच आले. नरेन आणि प्रियाने कार्डिऍक मसाज,माऊथ टू माउथ रेस्पि. द्यायला सुरुवात केली.एवढ्यात डॉक्टर आलेच.त्या परिस्थितीत प्रियाने आणि आईने दाखवलेलं ध्यैर्य खरोखरच कौतुकास्पद होतं.
कार्डिऑलॉजिस्ट तांबेंचं हॉस्पिटल आमच्या दारात आहे.ऍम्ब्युलन्सची सुध्दा वाट न पाहता आपण काकांना गाडीतूनच नेऊया, नरेन म्हणाला. पण बीपी शूट व्हायला तयार नाही, नाडी लागेना.. कार्डिऍक ऍरेस्ट झाले होते. आता कशाचाच उपयोग नव्हता.क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं.त्यांना मधुमेह होता ,हाय बीपी होते पण दोन्हीही कंट्रोलमध्ये होते. मधुमेह्यांना पेनलेस ऍटेक येतो. वेदना जाणवत नाहीत. बाबांना मॅसिव्ह ऍटेक आला पण त्यांना वेदना जाणवल्या नाहीत आणि कार्डिऍक झाल्याने काहीच करायला अवधी मिळाला नाही. माझा डॉक्टर भाऊ सांगत होता.मन तरीही अजून हे सत्य मानायला तयार नव्हतं.जेव्हा आपलं कोणी आजारी पडतं ,आयसीयुत ऍडमिट करतो तेव्हा मनाविरुध्द का होईना त्या शेवटच्या आजाराची मनाला तयारी करावी लागते पण बाबांनी कसलाच अवधी न देता एकदम एक्झिटच घेतली.प्राजक्ताच्या झाडावरुन फुलं ओघळून पडावित तसे निघूनच गेले एकदम!
मागच्याच वर्षी ७५ पूर्ण केल्यावर आम्ही सगळ्यांनी आनंदाने एकत्रितपणे ते साजरं केलं. त्यांच्याकडे पाहून ते ७५चे आहेत हे खरं वाटत नसे इतके ते तरुण दिसत,मनाने तर ते तरुण होतेच. त्यामुळेच ते असे एकदम अनंताच्या प्रवासाला निघून जातील हे स्वप्नातही आलं नव्हतं.पण जितके ते डेअरिंगबाज होते त्याच निडरपणे ते यमालाही म्हणाले असतील, "तुझ्याबरोबर यायचं म्हणतोस? चल.. आलोच.."
जवळ्जवळ प्रत्येकाची अशी इच्छा असते. संसारातल्या सार्या जबाबदार्या पूर्ण व्हाव्यात, लोळतघोळत न पडता, चालतं बोलतं असताना यमाजीकडून निमंत्रण यावं,शेवटचा दिस गोड व्हावा. पण सार्यांचीच ही इच्छा पूर्ण नाही होत. बाबा त्या काही भाग्यवंतापैकी एक होते. त्यांच्या संपन्न जीवनाची ही यशस्वी अखेर होती.
वाचने
7493
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाबा रे
स्वातीताई,
काय बोलू? काय लिहू?
हेच म्हणतो
In reply to काय बोलू? काय लिहू? by चतुरंग
सलाम
स्वातीताई,
स्वाती ताई
In reply to स्वातीताई, by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुझ्या दु:खात सहभागी आहोत..
स्वातीताई.
स्वातीताई,
आपल्या
भाग्यवंत!
जीवन मरण सगळ काही त्याच्या हाती
परमेश्वर
स्वातीताई,
स्वातीताई,
छ्या वाईट
स्वाती
तात चरण ते
स्वातीताई,
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हळवा
+१
स्वातीजी,
धूसर शब्द
भावपूर्ण
कल्पवृक्ष कन्येसाठी.
माझ्या
In reply to कल्पवृक्ष कन्येसाठी. by रामदास
स्वातीताई,
स्वातीताई,
सदगदित
काही सुचत
स्वातीताई,
पोकळी
आपण
चालती बोलती उत्साहाने....
.
त्यांच्या विचारांचे जतन करावे.
स्वातीताई,
माझीही आदरा॑जली
१६ डिसेंबर....
१६ डिसेंबर....