Skip to main content

माझी भाजीवाली – सखी, शिक्षिका!

लेखक उल्का यांनी गुरुवार, 31/03/2016 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
रोजचीच धावपळ, लगबग असते. परंतु आज मात्र निवांत वेळ होता आणि मुख्य म्हणजे मी उशीरा गेल्यामुळे आज तिच्याकडे गर्दी नव्हती. मला उशीर झाला की तिच्या कडची भाजी संपलेली असते. आज तशी बरीच शिल्लक होती. तेच खरे निमित झाले आजच्या संवादाला आणि उलगडला एकां कष्टकरी स्त्रीचा रोजचा दिवस. माझ्यासाठी ती ‘ए ताई’ आणि तिच्यासाठी मी ‘अहो ताई’. दोघीनाही एकमेकींचे नाव माहीत नाही. अर्थात, त्यावाचून काही अडलेही नाही. गेल्या कित्येक दिवसांचा शुद्ध व्यवहार आमचा. भाजी घ्यायची आणि रोख पैसे द्यायचे. तेसुद्धा घासाघीस न करता. तरीही त्या व्यवहाराला देखील एक अदृश्य अशी भावनिक झालर असतेच. नकळत जोडलेली. भाजी घेता घेता ती मन मोकळे करणार आणि मी तिचे म्हणणे ऐकून घेणार. अतिशय प्रसन्न, हसतमुख अशी ती माझी भाजीवाली, माझ्याशी मनमोकळा संवाद साधणारी एक प्रकारे सखीच नाही का माझी? आजचा संवाद मात्र मला थक्क करून गेला. मी : काय ग ताई, आज तुला उशीर झाला का? भाजी संपली नाही तुझी. ती : हो ना! आज ट्रेन लेट होती. मी : कुठून येतेस तू? ती : ‘सफाळे’ माहित आहे का? तिथून आत माझे गाव आहे. ‘दातिवरे खार्डी’ ह्या नावाचे. स्टेशन पासून वाहनाने साधारण तासभर आत असेल. टमटम (मोठी रीक्षा) केली तर २५ रु रोजचे. आणि ती करावीच लागते. रिक्षातून उतरल्यावर पंधरा-वीस मिनीटे चालावे लागते. मी : आणि आमच्या इथे येताना पण तुला रिक्षा करावी लागत असेल ना? त्याचे ३० रु. शिवाय ट्रेनचे भाडे. म्हणजे रोज तुझे दीडशे रुपये प्रवासात जात असणार. (हा माझा आगाऊपणा). किती वाजता निघतेस ग घरातून? ती : मी सकाळी दोन वाजता उठते. मी : सक्काळीss? अगं मध्यरात्री म्हण गं. सगळे गाढ झोपेत असतात तेव्हा तू उठून करतेस काय? ती : सकाळी उठून मुलांसाठी डबा भरायचा, आंघोळ, कपडे-भांडी धुणे, पाणी भरणे ही रोजची कामं करून मी चार वाजता घर सोडते. पाच पर्यंत स्टेशनला पोहोचते. मग फाटक ओलांडून पलीकडे भाजी विकत घ्यायची. आणि ट्रेन पकडून इथे यायचे. वेळेत आले तर सकाळी फिरायला येणारे भाजी घेऊन जातात. भाजी लौकर संपली तर दोन वाजेपर्यंत घरी जाते नाही तर मग तीन चार पण वाजतात. मी : झोपतेस किती वाजता? ती : संध्याकाळचे जेवण आणि इतर कामं करून झोपायला साडेदहा अकरा वाजतात. मी : धन्य आहे गं तुझी! खातेस काय मधल्या वेळेत? ती : येताना घरून चहा, चपाती खाउन निघते आणि मग घरी गेल्यावर जेवते. कधीतरी उशीर झाला तर ट्रेन मध्ये विकायला आलेले पण खाते. मी : बाप रे! किती कष्टाचा दिवस असतो तुझा आणि तोही गेली कित्येक वर्षे. ती : ताई, मी पण कधी कधी विचार करते की कसे काय निभावले सगळे? मुलं लहान असताना… पण ह्या भाजीमुळे माझी दोन्ही मुलं शिकू शकली. मी : मला तुझे खूप कौतुक वाटते आहे आज. इतके कष्ट करूनही रोज सगळ्यांशी हसून बोलतेस. दमत असलीस तरीही दाखवत नाहीस तू कधीही. मला तू कायम हसत असतेस ते खूप आवडतं. ती : हो, माझ्या शेजारच्या बायका पण मला असंच सांगतात. (हे सांगताना गोड लाजली ती) ही माझी भाजीवाली खंर तर अशा अनेक कष्टकरी स्त्रियांची प्रतीनिधी आहे. आपल्या सभोवताली ती रोजचा दिवस अमाप कष्टाने साजरा करत असते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख, समाधान शोधून आनंदाने रहात असते. एकार्थी ती शिक्षिका पण आहे. कष्टाने, आनंदाने आणि स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्र शिकविणारी शिक्षिका! – उल्का कडले
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5748
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

अशी साधी माणसे जीवनाबद्दल किती गोष्टी शिकवून जात असतात आपल्याला. Indian Express मध्ये मागे पुण्यातील कसबा गणपती मंदिराबाहेर फुलांचे दुकान लावणाऱ्या इंदू कृष्णा नलावडे आजींची गोष्ट छापून आली होती. १०3 वर्षांच्या आजी ७० वर्षांहून अधिक काळ दुकान लावत आहेत.

बापरे! किती कष्ट! मुद्दाम वाखु साठवलीय. आता कधी कितेते काम आहे अशी कुरकुर करावी वाटेल, तेव्हा हा लेख वाचून चूपचाप बसेन.

किती हे कष्ट? नाही तर शहरातील स्वतंत्र कुटुंबातील स्त्री सगळ्या कामाला बाई तरी किर किर करतात किती करावे लागते.

सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार!

छान लेख आवडला.

या लेखाच्या निमित्ताने कष्टकरी व्यक्ती, विशेषतः महिलांच्या काही प्रश्नांवर विचार करावासा वाटला. एक म्हणजे असंघटित श्रमजीवी वर्गाला भेडसावणारी अनिश्चितता व रोजचा संघर्ष. दुसरे, महिलांना घरकामातूनही जराही सवलत न मिळणे. तिसरे, त्यांच्या आरोग्याची होणारी हेळसांड. चौथे, भविष्याची तरतूद अपुरी वा अजिबात नसणे. पाचवे, स्त्रियांना आर्थिक बाबींमध्ये निर्णयस्वातंत्र्य तरीही कमी असणे. या सर्व परिप्रेक्ष्यातून वरील लेख निश्चितच वेगळा वाटतो.

यातच दारुडे नवरे हाही घटक महत्त्वाचा आहे.अनेक कष्टकरी स्त्रियांची कमाई या कुंकवाच्या धन्याला रिकामा पोसण्यात जाते.अशी अनेक उदाहरणे आम्हाला आमच्या कामात आढळतात.त्यांच्या हालाला अंत नाही.

In reply to by अजया

काम करून घर चालवून, दारूचा खर्च भागवून वर त्या दारुड्या नवऱ्यांचा मार खाणाऱ्या महान माताही आजूबाजूलाच आहेत.

In reply to by अजया

आमच्या ओळखीतल्या एका अशाच आजींनी नवरा दारुपायी गमावला.आता दारुड्या मुलाला सांभाळताहेत. काय म्हणावं त्यांच्या नशिबाला?

लेख आवडला. एकूण किती तास कामाचे झाले??? शिवाय घरकामाचे आणि इतर काम कुठे मोजले जाणार नाहीच आहे.

या साध्यासुध्या(?!) कष्टकरी ताईशी गप्पा मारल्याबद्दल तुमचं अभिनंदन. लेखनशैली साधी, सरळसोपी, भाषा नेहमीच्या वापरातली.. त्यामुळे खूप आवडली. आपल्या रोजच्या जीवनातले असे छोटे छोटे अनुभव आपल्याला समृद्ध करत असतात. तुम्ही असाच एक अनुभव साध्या सोप्या परिणामकारक शब्दांत मांडला आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा. खूप अलंकारिक भाषेत लेख लिहिला, किंवा एखाद्या विवादास्पद / गूढगहन विषयावर काहीबाही लिहिलं तरच ते चांगलं लेखन असतं असं नाही, तर आपल्या नेहमीच्या भाषेत, कोणताही अभिनिवेश न बाळगता जीवनातल्या रोजच्या अनुभवांवर आधारित प्रांजळ प्रामाणिक लेखनसुद्धा छान असतं, हे तुमच्या या लेखातून दिसतं. असंच लिहित राहा.

In reply to by सुधांशुनूलकर

खूप अलंकारिक भाषेत लेख लिहिला, किंवा एखाद्या विवादास्पद / गूढगहन विषयावर काहीबाही लिहिलं तरच ते चांगलं लेखन असतं असं नाही, तर आपल्या नेहमीच्या भाषेत, कोणताही अभिनिवेश न बाळगता जीवनातल्या रोजच्या अनुभवांवर आधारित प्रांजळ प्रामाणिक लेखनसुद्धा छान असतं, हे तुमच्या या लेखातून दिसतं.
हे अवतरण चोरणार आहे सांगून (पुढे कायम उपयोगी पडेल अशी नितपट्टीका (टेम्प्लेट या अर्थाने) बनवून घ्यावी म्हणतोय. परवानगी इच्छुक नाखु

पुन्हा एकदा सर्वान्चे आभार! @ सुधान्शुनूलकर मी लिहायला अगदी हल्लीच दोन महिन्यान्पूर्वी सुरु केले आहे. त्यामुळे अलन्कारिक भाषेत लिहिणे मला कुठले जमणार? :)