लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आज तो सकाळी सहा वाजता उठला, डोळे उघडून खाटेवर पडल्यापडल्याच त्याने खिडकीतून बाहेर पहिले, शेजाऱ्याच्या लिंबाच्या झाडाच्या फांद्यांच्या पलीकडे नुकताच उगवलेला सुर्य लहान बाळासारखा दिसत होता, निरागस, सौम्य. ते पाहून तो कावला. रात्री अडीच पर्यंत जागून परत आज हा सकाळी उठायचा वैताग. बरं उठणं का होईना, पण आता पूर्ण दिवस कदाचित जागावे लागेल, बस स्टेशन वर जाउन अण्णा आणि आईला आणावे लागेल, म्हणजे आणखीनच वैताग. काम बरेच शिल्लक राहिलेय, रात्री कसेही करून पूर्ण करावेच लागेल, म्हणजे निदान तीन पर्यंत तरी जागावे लागेलच, परत अण्णा असल्यावर उद्या सकाळी सहाच्या पुढे झोप घेणे शक्यच नाही, परत उद्याचा पूर्ण दिवस तसाच धावपळीत जाणार, असा विचार करत करत, हळू हळू त्याचे डोळे परत झाकायला लागले. कशाचाच कशाला मेळ नाही अशी स्थिर स्वप्निक झोप प्रचंड वेगाने गरगरत त्याच्याकडे येऊ लागली, त्याला अलगद उचलून तिने स्वतःच्या मऊशार कुशीत घेतले. शांत, पांढरे शुभ्र, निर्मनुष्य ठिकाण डोळ्यासमोर येऊ लागले. कस्तुरीसारखा कशाचा तरी सुगंध वाऱ्याच्या आल्हाद आणि थंड झुळके बरोबर त्याला सुखावून जात होता, वरती ढगांची पांढरी चादर, आणि सुटे सुटे होत पुन्हा कायम गडद राहणारे आभाळ. निर्विकार शांतता, आणि तिथे हा एकटाच असाच पडलेला. पिढ्या न पिढ्यांचा थकवा गेल्यासारखे सुख, तिथे स्तब्ध होऊन पडलेले याचे शरीर.. तो पूर्ण गुरफटून, गोठून गेला होता..
"सुज्या, उठ, काय पडल्यास नारायणावनी, आट वाजलेत. सालं, आमाली पहाटपास्न झोपा नाहीती, अन हे पडलंय घोरत, उठतूस का कसा तू? " असं म्हणत रामदासने त्याच्या पाठीत जोरदार बुक्की घातली.
एकाएकी झालेल्या हल्ल्याने, हादरून सुजय थेट उठून मांडी घालूनच बसला.
"काय झालं राम्या, कशाला ताप द्यायला आलास सकाळ सकाळ?" सुजय प्रचंड संतापून बोलला.
"ताप द्यायला? धन्य हैस तू माह्या बापा, साल्या काल पास्न मनत हुतो हि समद्या घरात इस्कटलिली शिगारेटीची थोटक साप करून घी. बऱ झालं तिच्यामारी तुहा फोन बंद हुता म्हणून अण्णांनी मला लावला. नाहीतर काय खैर नवती तुही. एका तासात ते पव्ह्चयलेत ठेसनावर. अन तू आपला, हे समद तसच ठीउन झोपा काढतुयस. डायरेक घरीच आले असते म्हंजी काय करणार हुतास? " रामदास तावातावात बोलून जायला निघाला.
"चहा घेणार का?" सुजय खाटेवरून उठत उठत बोलला.
"आं? दुध हाय नव्ह? नाहीतर एका च्यासाठी पिटाळायचास मलाच" रामदास मागे वळून सुजय कडे संशयास्पद नजर टाकत बोलला.
"आहे रे, ये बस.. मी चहा टाकतो." असे म्हणून सुजय ने खाटेवर उशाशी ठेवलेल्या पाकिटातली एक सिगारेट काढून ओठात घातली आणि पाकीट रामदासच्या दिशेने भिरकावले व तो किचन कडे चालता झाला.रामदास ते ने अलगद झेलले आणि एक सिगरेट पेटउन तो झुरके मारत खाटेवर बसला व भिंतीवर लटकवलेल्या आइनस्टाइन च्या जीभ बाहेर काढलेल्या विक्षिप्त फोटोकडे पाहत वेळ घालवू लागला. हा फोटो म्हणजे त्याला भलताच विनोदी वाटायचा.
विशीतला रामदास म्हणजे किरकोळ शरीराचा, काळाभोर ईसम. तो दोन-तीन महिन्यापूर्वीच औरंगाबादला आला होता, बाप गावाचा सरपंच, शेतीवाडी, पैसा, गाड्या कांही कमी नाही. पण बापाशी पटत नव्हते म्हणून हा इकडे एकटाच राहत होता. बाकी त्याचा खास मित्र, लहानपणापासूनचा.
"हं, घे. आणि आता जरा मला हे साफ करू लाग सगळे.." सुजय खुर्चीत बसत बोलला.
त्या दोघांनी लगेच चहा संपवून घरातल्या बियर च्या मोकळ्या बाटल्या, सिगारेटची थोटक इत्याद्दी शोधून शोधून पिशव्यात भरून बाहेर नेउन फेकले. थोडा वेळानंतर रामदास सुजयकडून आणखी दोन सिगारेटी घेऊन चालता झाला. सुजयला अण्णांचा फोन येउन गेला, वीस मिनिटात स्टेशनवर पोहोचतोय म्हणून सांगितले. मग त्याची लगबग सुरु झाली. मळकट बर्मुडा-टीशर्ट चा अवतार बदलून त्याने स्वछ धुतलेले, इस्त्री केलेले कपडे चढवले.
आठ दिवसानंतर डोक्याला तेल लावले. केसातून कंगवा फिरवताना स्वतःचा संपूर्ण तेज उतरलेला, काळवंडलेला चेहरा, सिगारेटी ओढून ओढून कोळशासारखे काळे झालेले ओठ, जागरणामुळे डोळ्यांच्या खाली तयार झालेली काळी वर्तुळे, असले रूप आरश्यात पाहून त्याला खिन्न झाले. कधीतरी एके काळी आपल्याला आपले रूप आवडायचे हे तो पार विसरला होता. पाकिटातली शेवटची सिगरेट ओढून त्याने काळजीपूर्वक पाकीट व फिल्टरचा तुकडा वर माळ्यावर फेकून दिला. खिडक्या लावून घेतल्या. पायात स्लीपर अडकवून, दाराला व्यवस्थित कुलूप लावून घेतले. लिफ्ट न घेता दाणदान पावले टाकत तो तीन मजले उतरून खाली आला.
प्रयत्न करूनही त्याचा स्वतःचा आरश्यात पाहिलेला चेहरा नजरेआड जात नव्हता. वेगाने चालत चालत तो रिक्षा स्टेन्ड वर आला. रीक्षावाल्यासोबत कसलीच घासाघीस न करता तो "सिडको बस स्टेशन" असा हुकुम सोडून थेट आत घुसला. रिक्षावाला काहीसा ओळखीचाच निघाला, म्हणून सुजयला आणखीनच वैताग आला. तो रिक्षावाला सकाळच्या फसफसत्या उत्साहात भलताच चेकाळून काही तरी बडबड करत होता, सुजय त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून रिक्षाच्या बाहेर पाहत होता.
एक भिकारीण दिसली, चिमुरड्या पोराला घेऊन रस्त्याच्या कडेला बसली होती. रात्री तिथेच झोपली असावी बहुतेक. ते लेकरू मात्र गोड हसत होतं.
रिक्षावाल्याची अखंड बडबड चालूच होती. सिग्नलला थांबल्यावर, "वो देखो साब, हरियाली... हाहाहा" असे म्हणून त्या रिक्षावाल्याने रस्त्याच्या कडेने चाललेल्या दोन पोरींकडे बोटाने खुणावले.
पोरी! सुंदर!! जणू काही पऱ्याच आहेत. काहीतरी बोलत उभ्या होत्या. मधेच दोघीही गोड हसल्या. तंग कपड्यातून त्यांच्या टंच शरीराचे सगळे बारकावे दिसत होते. सगळे चढ उतारही स्पष्ट चित्र रेखाटल्यासारखे भासत होते. वरून त्यांचे बोलतानाचे स्त्रीसुलभ हातवारे आणि खिदळणे फार मोहक दिसत होते. खरच हरियाली! असा विचार करत असताना त्याला परत आपल्या हाताने कुरूप करून घेतलेल्या चेहऱ्याची आठवण झाली! मग तो "तेज चलो" असा रीक्षावाल्यावरच खेकसला. त्या दोन गोड पोरी फक्त पाठमोऱ्या जाताना त्याने पाहिल्या!
(क्रमशः)
[प्रथम प्रकाशन, मिसळपाव डॉट कॉम, १०/०३/२०१६]
प्रतिक्रिया
सुरुवात छान आहे. पुभाप्र.
छानच;
काही कथा वाचून हल्ली मिपा
ह्म्म!
मस्त
लवकरच..
वाचतोय ...
रंगवलय मस्त
मस्त पभाप्र. नेमाड्यांच्या
;-)
हम्म्म्म्म येवुदे पुढचा भाग
;-)