✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारतीय डावे आणि भारतीय उच्च मध्यमवर्ग

स
स्वामी संकेतानंद यांनी
गुरुवार, 03/03/2016 - 17:09  ·  लेख
लेख
कायप्पावर आमच्या एका ग्रुप मध्ये एका डाव्या काकांनी उच्च मध्यमवर्गीयांवर ताशेरे ओढले. ते उजवे असतात आणि आता खूप खूप बोलू लागले आहेत, निव्वळ जोक्स फॉर्‍वर्ड करतात हा त्यांच्या आक्षेप होता. त्यावर तिथे मी दिलेले उत्तर इथेही द्यावेसे वाटले. तिकडची धुणी इकडे धुवायची नसल्याने मी नामोल्लेख खोडले आहेत. मुद्दे स्वतंत्र आहेत, व्यक्तिगत काही नाही. तरी संपादक मंडळ धागा उडवायला स्वतंत्र आहे. >>>>>> 'अबक'च्या लेखातील एक बाब खटकली होती ती म्हणजे त्यांनी उच्च मध्यमवर्गीय म्हणजे सरसकट उजवे, मोदीसमर्थक, वाचनशून्य, उठवळ, फालतू जोक्स फॉरवर्ड करणारी, गुडी गुडी आयुष्य जगणारी जमात असे एक gross generalisation केले आहे. त्यात त्यांनी 'उच्च मध्यमवर्गीय उजवे' हा शब्द वापरलेला नाही तर 'उच्च मध्यमवर्गीय लोक' हा प्रयोग केला आहे. सरसकट generalisation कधीही चूकच! त्यांचा दुसरा आक्षेप आहे उच्च मध्यमवर्ग खूप खूप बोलतात('त्यांच्या त्यांच्या' व्हाट्सअप्प, फेसबुक खासगी कट्टे) ह्यावर! ह्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे कळत नाही! त्यांनी 'त्यांच्या त्यांच्या गटात' का बोलू नये? बाहेरसुद्धा का बोलू नये? त्यांना ते स्वातंत्र्य का नाही? किंवा त्यांनी प्रत्येक वेळी विद्वत्तापूर्ण चर्चाच करावी का? खासगी कट्टयांवर त्यांना हव्या त्या भाषेत हवे ते बोलायचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. सार्वजनिक नियम नक्कीच वेगळे असू शकतात. मुळात आपण उच्च मध्यमवर्गीय म्हणजे 'नवश्रीमंत' म्हणजे 'इतरांचे शोषण करून वर आलेले' किंवा 'नवशोषक वर्ग' असा काहीसा समज करून घेतला आहे. त्यामुळे सतत त्यांना अपराधीपणाची जाणीव करुन देत असतो. they are less equal अशी आपली समजूत असते.त्यांची वैचारिक चर्चा करण्याची बौद्धिक क्षमता किंवा अभ्यास नसतो असा आपला समज असतो. याच गैरसमाजातून मग आपण सरसकट या वर्गाला 'उजव्या'चा शिक्का मारून मोकळे होतो. एकदा का आपण त्यांच्यावर आपल्याला सोयीस्कर असा शिक्का मारला की मग आपण आपल्या जबाबदारीतून मोकळे होतो! त्याने विरोध व्यक्त केला तर ' तू उजवा, तू शोषक, तुला काय कळणार गरिबांच्या व्यथा, तुझा अभ्यास काय? तुला बोलायचा अधिकार काय? तुझी लायकी काय? तू फक्त संता बंता जोक्स फॉरवर्ड करू शकतोस' असे म्हणून आपण मोकळे व्हायचे!! मग हा वर्ग, जो आधी उजवा नसेलही, पण तो निव्वळ उच्च मध्यमवर्गीय असल्याने अशी वागणूक मिळताना पाहून उजवीकडे वळला तर त्यात त्याची काय चूक? अतिडाव्यांच्या 'आम्हालाच सर्वकाही कळते' ह्या अहंगंडाचाच ह्या वर्गाला जास्त राग आहे. इतकी वर्षे बोलायला व्यासपीठच मिळाले नाही या वर्गाला, कारण व्यासपीठावर बोलायची ह्यांची लायकी नाही, हे आपणच ठरवले होते. हे दाबले गेलेले आवाज आता उफाळून बाहेर पडत आहेत असे वाटते. त्यांना सार्वजनिक व्यासपीठ आधी मिळू दिले नाही, ते आता सोशल मीडियावर व्यक्त होताहेत. हे सर्व उजवे आहेत असा फार मोठ्ठा गैरसमज अबकचा झाला आहे. शिव्याशाप, फोटोशॉप मला सोशल मीडियावर सगळीकडून मिळताहेत. हे 'खूप खूप बोलणारे' सगळ्याच विचारधारांचे आहेत, कसलीही विचारधारा नसलेलेही आहेत. प्रत्येकाने व्यासंगी असावे, निश्चित विचारधारा असलेले असावे, उच्च अभिरुचीसंपन्न असावे वगैरे आपले गैरसमज आहेत, ते चूक आहेत. त्यांना चारचौघांसारखे, मौजमजेत जगावेसे वाटत असेल तर जगू द्यावे. ते त्यांचे आयुष्य आहे. डावी भूमिका जगणे म्हणजेच उत्तम आयुष्य असे का असावे? तसेच, उजवी राजकीय भूमिका वाईट्ट आणि डावी उत्तम असे का मनाशी गच्च बांधून ठेवावे? कारण जर हिटलर आणि मुसोलिनी उजवे असतील तर स्टालिन आणि पॉल पॉट डावे होते, अमेरिका भांडवलवादी क्रुरकर्मा असेल तर उत्तर कोरिया साम्यवादी क्रुरकर्मा आहे. म्हणजे कोणतीही विचारधारा, जर ताणून धरली तर वाईटच! अती तिथे माती. पण आपण, भारतात मात्र सातत्याने उजव्यांनाच vilify, victimize केले आहे असे नाही वाटत का? मी स्वतः उच्च मध्यमवर्गीय आहे( नव्वदोत्तर उदारीकरणानंतर उदयाला आलेला) आणि तरीही मी डावीकडे झुकलेला आहे, माझा व्यासंग कदाचित एवढा नसेल, पण मी वाचनशून्य नक्कीच नाही, मी विचार करतो आणि भरपूर विचार करूनच मी extreme left आणि extreme right ह्या दोन्ही विचारधारा नाकारून किंचित डावीकडे झुकलेली centre leftist विचारधारा स्वीकारलेली आहे, right of the centre नाही. पण जेव्हा डावे माझ्या सांपत्तिक आणि सामाजिक स्थितीकडे पाहून माझ्यावर थेट उजवा, संघी असे शिक्के लावतात तेव्हा मला वेदना होतात. हे एकदाच झालेले नाही तर सातत्याने होत असते. मी कधीही संघसमर्थक नव्हतो, कधीही नरेंद्र मोदी as a PM candidate मी समर्थन केले नव्हते ,तरीही मला न पटलेल्या डाव्यांच्या एखाद्या गोष्टीविषयी बोललो तर लगेच लेबल लावले जाते. एवढ्या victimizationनंतरही मी अजूनही माझ्या centre leftist भूमिकेशी चिकटून आहे, कारण त्याला विचारांचे अधिष्ठान आहे, पण सगळेच चिकटून राहत नाहीत. ते अखेर उजवीकडे वळतात. थोडक्यात काय तर डावे उजव्यांपेक्षा फार वेगळे नाहीत. डावेसुद्धा उजव्यांप्रमाणेच generalisation करतात, शिक्के मारून मोकळे होतात, इतरांना बोलू देत नाहीत, त्यांचा व्यक्त होण्याचा अधिकार नाकारतात, त्यांचे मनोबल खच्ची करतात; फरक हाच की डाव्यांची भाषा संयमित असते 'बरेचदा', 'well articulated rant' असे म्हणेन मी. उजव्यांची भाषा अनेकदा gross आणि आक्रमक असते. (पण उजव्यांची भाषा gross आणि आक्रमकच असते असे generalisation मी करणार नाही. अतिशय संयमित भाषेत, मुद्देसूद प्रतिवाद करणारे उजवे माझे मित्र आहेत.) मुद्दा हाच की सातत्याने एकाच गटाला vilify करू नये, कमअस्सल म्हणून हिणवू नये. दुसरी बाजू ऐकून न घेणारा अतिडावा 'विचारवंत' आणि दुसरी बाजू ऐकूण न घेणारा अतिउजवा 'uncivilized raccoon' कसा?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध

प्रतिक्रिया द्या
32334 वाचन

💬 प्रतिसाद (137)

प्रतिक्रिया

अंनिस?

बोका-ए-आझम
Tue, 03/15/2016 - 01:15 नवीन
ती सामाजिक संघटना आहे. तिचा राजकीय अजेंडा असल्याचं ऐकलेलं तर नाही. युक्रांदबद्दल फक्त ऐकलंय. मी काॅलेजमध्ये असताना युक्रांदचा प्रभाव ओसरला होता. प्रकाश आमटे किंवा नारायणमूर्ती या माणसांविषयी निरपेक्ष आदर आहे, मग त्यांची राजकीय विचारसरणी काहीही असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम

२३ मार्च १९३१

बोका-ए-आझम
Fri, 03/04/2016 - 21:39 नवीन
या दिवशी जेव्हा भगतसिंग शहीद झाले तेव्हा ते जेमतेम २३-२४ वर्षांचे (कम्युनिझमने प्रभावित होण्याच्या वयाचे)होते. त्यांचे सहकारी पंडित सुखदेव आणि शिवराम हरी राजगुरू हेही साधारण त्याच वयाचे होते. जर हे तिघेही १९३१ नंतर राहिले असते आणि सोविएत रशियाने पूर्व युरोपातल्या राष्ट्रांवर लादलेली कम्युनिस्ट हुकूमशाही त्यांनी पाहिली असती आणि नंतर क्रुश्चेवने केलेलं स्टॅलिनविरोधी भाषण ऐकलं असतं तर त्यांचं मत तेच राहिलं असतं का हा रोचक आणि वादाचा विषय आहे. ज्या काळात भगतसिंग मार्क्सवादाने प्रभावित झाले तो काळ भांडवलशाहीला पर्याय देणारी एक राज्यव्यवस्था उभी राहते आहे या कल्पनेने भारलेला होता. गुलाग, दडपशाही, केजीबीचं दमनसत्र या सगळ्या गोष्टी नंतर आल्या. भगतसिंग अतिशय हुषार आणि स्वतंत्र विचारांचे होते. त्यामुळे ते अजून २५-३० वर्षांनीही कम्युनिस्ट राहिले असते असं वाटत नाही. अर्थात हे मतच आहे. त्याला वस्तुस्थितीचा आधार नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम

मला वाटते सुखदेव ह्यांचे

नाना स्कॉच
Fri, 03/04/2016 - 22:31 नवीन
मला वाटते सुखदेव ह्यांचे पुर्ण नाव सुखदेव थापर होते अन पंडित सुखदेव म्हणजे पंडित सुखदेव राज (अल्फ्रेड पार्क मधे शेवटच्या गन फाइटच्या आधी चंद्रशेखर आझाद ज्यांना भेटले होते अन राजगुरु च्या मातुश्रीस निकड़ भागवायला पैसे पाठवले होते त्यांच्या मार्फ़त, पंडित सुखदेव राज ह्यांच्या नावे पुण्यात मॉडर्न कॉलेज ऑफ़ इंजीनियरिंग समोरून जो रस्ता जंगली महाराज रस्त्याला मिळतो त्या तिठ्याला त्यांचे नाव दिले गेले आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बरोबर.

बोका-ए-आझम
Fri, 03/04/2016 - 22:59 नवीन
पुणे जिल्ह्यातील खेडला राजगुरुनगर हे नाव राजगुरूंच्या स्मरणार्थ दिलेलं आहे. ते त्यांचं मूळ गाव (बहुतेक.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

शक्य आहे

गॅरी ट्रुमन
Fri, 03/04/2016 - 22:55 नवीन
भगतसिंग अतिशय हुषार आणि स्वतंत्र विचारांचे होते. त्यामुळे ते अजून २५-३० वर्षांनीही कम्युनिस्ट राहिले असते असं वाटत नाही. अर्थात हे मतच आहे. त्याला वस्तुस्थितीचा आधार नाहीये.
शक्य आहे. अनेकदा होते असे की उजव्या गटाचे लोक अनेकदा त्यांच्या विचारांशी अजिबात साधर्म्य नसलेल्या नेत्यांनाही आपल्यात ओढतात. भारतीय संदर्भात हे अनेकदा कुरूंदकरांनी म्हटल्याप्रमाणे "गांधीविरोधी ते सगळे हिंदुत्ववादी आणि सगळे हिंदुत्ववादी ते आपले" असा अनेकांचा दृष्टीकोन असतो. अनेकदा फेसबुक किंवा व्हॉट्सऍपवर अशा मंडळींकडून ’गांधीजींनी काय केले’ असा प्रश्न विचारतच खाली दिलेल्या चित्रांप्रमाणे चित्रे शेअर केली जातात. मुद्दा नुसती चित्रे शेअर करण्याचा नाही.तर सुभाषचंद्र बोस, भगतसिंग इत्यादींना आपल्या मार्गाविषयी काडीचेही ममत्व नव्हते (किंबहुना विरोधच होता) हे जाणूनच घेतले जात नाही. अनेकदा उजव्या गटाच्या लोकांना "मग भगतसिंगविषयी काय" हा प्रश्न तुम्ही हा विचार केला आहे का हे जाणून घ्यायला विचारला जातो. वर गुलाम यांनी भगतसिंगांचा उल्लेख केला त्यामागे त्यांचा उद्देश मला माहित नाही. कदाचित हा उद्देशही असेल.त्याला उत्तर हे-- "हो". Image removed. इन जनरल मला एक व्यवस्था ती वाईट म्हणून तोडायची हा दृष्टीकोन पटत नाही.ही व्यवस्था गेल्यावर नक्की कोणती पर्यायी व्यवस्था उभी करायची आहे याची कल्पना असल्याशिवाय--किमान सध्याची व्यवस्था गेल्यावर आणखी वाईट व्यवस्था येणार नाही एवढी पूर्तता केल्याशिवाय सध्याची व्यवस्था तोडू नये अन्यथा आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे होईल . मान्य आहे की स्वातंत्र्यलढ्यात सुरवातीला सगळ्या गोष्टी स्पष्ट असणे शक्य नाही. मला वाटते की गांधीजींची चळवळ आणि विविध कॉंग्रेसमध्ये पास होणारे ठराव लोकांना स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय, ते कशाकरता, त्याबरोबर नक्की जबाबदारी कोणती वगैरे गोष्टींची जाणीव करून ती स्पष्टता आणण्यासाठीचा एक प्रयत्न होता. आणि त्याच कारणासाठी ’अमुकअमुक कॉंग्रेसमध्ये तमुकतमुक ठराव पास झाला’ अशा पध्दतीचे वरकरणी निरर्थक वाटणारे पण आपल्या स्वातंत्र्यलढ्यातले महत्वाचे टप्पे होते. नाहीतर ब्रिटिश घालवायचे म्हणून जोशात लढायचे आणि त्यानंतर ब्रिटिश परवडले अशी अनागोंदी यायची. म्हणूनच "ब्रिटिशांना हाकलायचे आणि कम्युनिस्ट राज्य आणायचे" हे कोणाही क्रांतिकारकाचे ध्येय असेल तर माझा तरी त्याला पाठिंबा नाही. अर्थातच भगतसिंग आणखी जगले असते तर कम्युनिस्ट असते की नाही या जरतरच्या गोष्टी झाल्या.त्याविषयी स्पष्टपणे काहीच सांगता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

प्रतिसाद चुकून भलतीकडे पोस्ट झाला

गॅरी ट्रुमन
Fri, 03/04/2016 - 22:58 नवीन
अरे कुंभमेळ्यात बिछडलेल्या भाईप्रमाणे मला द्यायचा होता तो प्रतिसाद भलतीकडेच गेला आहे. बोकोबांना द्यायचा प्रतिसाद चुकून http://www.misalpav.com/comment/812804#comment-812804 वर पोस्ट झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सहमत,

भंकस बाबा
Fri, 03/04/2016 - 22:58 नवीन
कम्युनिझमचा सगळ्या दुनियेत बोर्या वाजलेला असताना भारतात आजही काही कम्युनिस्ट मॉस्कोला पाऊस पडला की इथे छत्री उघड़तात. (हुकुमशाही परवडली पण कम्युनिझम नको या मताचा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

असाच विचार डाव्यांकडून

गणामास्तर
Fri, 03/04/2016 - 12:23 नवीन
असाच विचार डाव्यांकडून उजव्यांप्रती अंमलात आणला जातो.
हेचं म्हणायचे होते म्हणून उपहासाने तसे लिहिले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

वैयक्तिक मत : कम्युनिस्ट

आनन्दा
Fri, 03/04/2016 - 11:09 नवीन
वैयक्तिक मत : कम्युनिस्ट दिसला कि त्याला पोत्यात घालून बुडवला पाहिजे ;)
म्हणूनच तुम्ही विचारवंत होऊ शकत नाही.. विचारवंत असे मत व्यक्तकरतील - कम्युनिस्ट दिसला कि त्याला डोक्यावर घेऊन बुडवला पाहिजे.. ह. घ्या,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

असहमत पोते का फुकट घालवायचे?

सुबोध खरे
Fri, 03/04/2016 - 23:27 नवीन
असहमत पोते का फुकट घालवायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

अवांतर : किती उत्पन्न

वगिश
Fri, 03/04/2016 - 10:53 नवीन
अवांतर : किती उत्पन्न असलेल्या कुटुंबास उच्च मध्यमवर्गीय म्हणतात?
  • Log in or register to post comments

आपल्या देशात हा प्रश्न सापेक्ष आहे.

बोका-ए-आझम
Fri, 03/04/2016 - 11:08 नवीन
मुंबईतला उच्च मध्यमवर्गीय भुवनेश्वरमध्ये कदाचित अतिश्रीमंत वगैरे समजला जाईल. बंगालमधील निम्न मध्यमवर्गीय महाराष्ट्रात गरीब समजला जाईल. जशी दारिद्र्यरेषेची संकल्पना आहे, तशी ऐश्वर्यरेषेची संकल्पना नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश

हल्ली सरकारनेच व्याख्या ठरवून

आनन्दा
Fri, 03/04/2016 - 11:12 नवीन
हल्ली सरकारनेच व्याख्या ठरवून दिलेली आहे - तुम्हाला शिलेंडर सबसिडी मिळते का? तर तुम्ही उच्च नाही. म्हणूनच मी अजूनपण सबसिडी सोडलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश

लेखन आवडले

ऋषिकेश
Fri, 03/04/2016 - 11:05 नवीन
लेखन आवडले
  • Log in or register to post comments

आवडले...

निशांत_खाडे
Fri, 03/04/2016 - 11:36 नवीन
संयत व स्पष्ट लिखाण..
...तरीही मला न पटलेल्या डाव्यांच्या एखाद्या गोष्टीविषयी बोललो तर लगेच लेबल लावले जाते
+1
  • Log in or register to post comments

अगदी परस्परविरोधी!!

सुनील
Fri, 03/04/2016 - 11:58 नवीन
डावे आणि उजवे एकमेकांच्या अगदी विरुद्ध असतात. विख्यात अर्थतज्ञ केन गाल्ब्रेथ म्हणतात, "भांडवलशाहीत माणूस माणसाचे शोषण करतो, साम्यवादात ह्याच्या अगदी उलट घडते" ;)
  • Log in or register to post comments

____/\_____ अगदी कोपरापासून.

आनन्दा
Fri, 03/04/2016 - 12:04 नवीन
____/\_____ अगदी कोपरापासून. अगदी लाखात एक बोललात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

डावे आणि भाषण स्वातंत्र्य

मित्रहो
Fri, 03/04/2016 - 12:44 नवीन
जर तुम्ही अमेरीकेत आहात, रशियात आहात, उत्तर कोरीयात आहात कुठे आहे जास्त भाषण स्वातंत्र्य. तरुणपणी डावा असतो आणि स्वार्थ कळायला लागल्यावर तो उजवा होतो हे पटत नाही. लादलेली समानता हीच मुळात चुकीची आहे. भांडवलशाहीत सारच उत्तम आहे असे नाही. अवांतर : काही दिवसांपूर्वी हा लेख वाचला होता. तसे हे भांडवलशाहीचे लमर्थक आहे. http://www.livemint.com/Opinion/K7BtzvPYmyO0KlDn21iixH/How-to-break-the-back-of-Indias-Leftwing-ecosystem.html
  • Log in or register to post comments

मुळात

नाखु
Fri, 03/04/2016 - 12:48 नवीन
निम्न मध्यमवर्गीय रोजच्या व्यवधान आणि समस्यांनी मेटाकुटाला आलेला असल्याने त्याला आपण डावे का उजवे हेच माहीत नसते आणि जाणून घेण्यासाठी वेळ-निकड नसते. ज्या क्षणी स्थैर्य्,सुबत्ता (तुलनात्मक) आणि अनुभवाची शिदोरी (अगदी ४-५ वर्षांचीही पुरेशी) तेव्हां तो हा शोध घ्यायचा प्र्यत्न करतो. संधीसाधूपणा (वेळ येताच आपल्या पोळीवर तूप ओढणे) आणि ढोंगीपणा (मी स्माजहिताचाच विचार+कृती करतो असे दाखविणे) हा यासाठी उच्च मध्यमवर्गीय,निम्न मध्यमवर्गीय,गरीब, शहरी,खेड्यातला असणे अनिवार्य नाही. तस्मात हे दावे पोकळ आहेत.
  • Log in or register to post comments

लेख

सुमीत भातखंडे
Fri, 03/04/2016 - 14:31 नवीन
आवडला.
  • Log in or register to post comments

उजवे असो वा डावे,काही फरक पडत

चेक आणि मेट
Fri, 03/04/2016 - 14:55 नवीन
उजवे असो वा डावे,काही फरक पडत नाही, फक्त राष्ट्रविरोधी काही करू नये म्हणजे मिळवलं.
  • Log in or register to post comments

दोघांच्या "राष्ट्र" या

मोदक
Fri, 03/04/2016 - 14:57 नवीन
दोघांच्या "राष्ट्र" या संकल्पनेत फरक असेल तर..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट

हम्म

चेक आणि मेट
Fri, 03/04/2016 - 15:28 नवीन
फरक आहेच,म्हणूनच खटके उडत आहेत. आणि हेच मोठं दुर्दैव आहे. निदान संविधानाचा तरी मान ठेवावा,असे वाटते. कन्हैयाला जामिन दिल्यावर कोर्टाने छान स्टेटमेंट दिलय. इन्फेक्शन जास्त होऊन शरीराचा एखाद्या भागाला गँगरींन झालं तर तो भाग छाटून टाकणे अनिवार्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

निदान संविधानाचा तरी मान

मोदक
Fri, 03/04/2016 - 15:43 नवीन
निदान संविधानाचा तरी मान ठेवावा,असे वाटते. ज्यांना देश ही संकल्पनाच मान्य नाही ते संविधानाचा काय मान ठेवणार? कन्हैयाला जामिन दिल्यावर कोर्टाने छान स्टेटमेंट दिलय. येथे देता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट

हम्म

चेक आणि मेट
Fri, 03/04/2016 - 16:30 नवीन
ज्यांना देश ही संकल्पनाच मान्य नाही ते संविधानाचा काय मान ठेवणार?
मग शरीराच्या त्या भागाचं ऑपरेशन केलेलंच बरं. . . कोर्टाने कायतरी तेवीस पानी स्टेटमेंट दिलय,पूर्ण सापडत नाहीये,तोपर्यंत हे दुवे चालवून घ्या. JNU row: Kanhaiya Kumar gets bail and a lesson on thoughts that ‘infect… (like) gangrene’
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

जल्लोष

गॅरी ट्रुमन
Fri, 03/04/2016 - 16:16 नवीन
इन्फेक्शन जास्त होऊन शरीराचा एखाद्या भागाला गँगरींन झालं तर तो भाग छाटून टाकणे अनिवार्य आहे.
आणि तरीही हे पुरोगामी विचारवंत कन्हय्याला जामीन मिळाला म्हणून 'जितं मया' म्हणत जल्लोष करत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट

लाल सलाम

अनुप ढेरे
Fri, 03/04/2016 - 15:27 नवीन
जेएनयूमध्ये लाल सलामच्या घोषणा चालू असताना, http://indianexpress.com/article/india/india-news-india/16-villagers-killed-by-naxals-in-chhattisgarh/

हे पोस्टरपण JNU मधलं आहे. :( Image removed.
  • Log in or register to post comments

उत्तम संतुलित लेख!!!

गुलाम
Fri, 03/04/2016 - 16:06 नवीन
उत्तम संतुलित लेख!!! सरसकटीकरण (gross generalisation), उथळ शिक्के मारु प्रवृत्ती आणि त्यातून होणारे राजकीय-सामाजिक ध्रुवीकरण हेच सध्याचे दुर्दैवी सत्य आहे. आणि त्याला डावे आणि उजवे दोघेही तितकेच जबाबदार आहेत.
  • Log in or register to post comments

डावलले गेलेले ते डावे

गामा पैलवान
Fri, 03/04/2016 - 19:54 नवीन
लोकहो, Capitalism is the unequal distribution of wealth. Socialism is the equal distribution of poverty. असं विन्स्टन चर्चिल म्हणून गेलेत. यावरून डावे उजवे म्हणजे काय ते ध्यानात यावं ! ;-) जोक्स अपार्ट, डावलले गेलेले ते डावे आणि उजवी वागणूक मिळणारे ते उजवे असं लहानपणी ठरवून टाकलं होतं. मात्र अगदी ऐन तारुण्यातही मी हिंदुत्ववादीच होतो. डावा विचार कधीच 'आपला' वाटला नाही. परंतु वडील मात्र कट्टर डावे होते. कोणे एके काळी युक्रांदचे कार्यकर्तेही होते. नंतर त्यांनी शिवसेना आपलीशी केली. पण वैचारिक फाटाफूट म्हणून दोनचार वर्षांतच सोडली. (अस्सल डावेगिरी यालाच म्हणावं का?) पुढे १९९१ साली सोव्हियेत साम्राज्य विलयास गेल्याने थोडे नाराज झाले. त्याच सुमारास भुजबळांनी शिवसेना सोडली. या दोहोंचा जणू परिणाम की काय, त्यांचा राजकीय चर्चांचा उत्साह मंदावला. आ.न., -गा.पै. अवांतर : त्या वेळेपावेतो अस्मादिकांना पंख फुटून स्वत: विचार करायची खाज सुटली होती. दत्ता सामंतांच्या संपाने गिरणी कामगारांची केलेली हालत दिसंत होती. डाव्या विचारांत काहीतरी जबरदस्त खोट आहे, असा संशय बळावला. त्यामानाने संघाची विचारसरणी बऱ्यापैकी गोटीबंद होती. पुढे गोळवलकरांचं 'राष्ट्र' नावाचं एक पुस्तकं हाती लागलं. त्यात आंतरराष्ट्रीय परिस्थितीचं केलेलं विश्लेषण पाहून चकित झालो. हे विश्लेषण युगोस्लाव्हियाच्या तत्कालीन परिस्थितीस चपखलपणे लागू पडंत होतं. १९९५ च्या परिस्थितीवर १९७५ पूर्वी अचूक भाष्य करणारा लेखक खरोखरंच महान असला पाहिजे, अशी धारणा झाली. तेव्हापासनं मी हिंदुत्ववादी आहे.
  • Log in or register to post comments

↓↓↓

चेक आणि मेट
Fri, 03/04/2016 - 20:05 नवीन
. Socialism is the equal distribution of poverty. →No Doubts
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

संघाची विचारसरणी बऱ्यापैकी

तर्राट जोकर
Fri, 03/04/2016 - 21:13 नवीन
संघाची विचारसरणी बऱ्यापैकी गोटीबंद होती.>> झापडबंद असा एक शब्द आहे. तो चपखल बसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

असू शकेल

गामा पैलवान
Fri, 03/04/2016 - 22:03 नवीन
तजो, झापडबंदही असू शकेल. म्हणूनच मी गोळ्वलकरांचा चाहता आहे. त्याव्यतिरिक्त संघाचं साहित्य फारसं वाचलं नाहीये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

कम्युनिस्ट विचारसरणीही

बोका-ए-आझम
Fri, 03/04/2016 - 23:07 नवीन
झापडबंदच आहे. रशिया आणि माओच्या चीनचे संबंध बिघडायचं एक कारण हे माओने शेतकऱ्यांना बरोबर घेऊन चीनमध्ये क्रांती केली हे आहे. अस्सल मार्क्सवाद शेतकऱ्यांना संपत्तीचा साठा करणारे म्हणून प्रतिगामी मानतो हे तुम्हाला माहित आहे का? १९७४ मध्ये माओने थोड्या प्रमाणात खाजगी शेतीला परवानगी दिल्यावर रशियन कम्युनिस्ट पक्षाने ' ही कम्युनिस्ट तत्वज्ञानाशी प्रतारणा असल्याचा ' ठराव वगैरे पास केला होता. डेंगने आर्थिक सुधारणा केल्यावर काय केलं होतं त्याची कल्पना नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

सगळे पोथीबाज झापडबंदच असतात.

तर्राट जोकर
Sat, 03/05/2016 - 00:45 नवीन
सगळे पोथीबाज झापडबंदच असतात. आपल्या विचाराबाहेरचे विचार मान्य करणे, विरोधी विचारास आदर देणे ज्या विचारसरनीला जमत नाही ते सगळे झापडबंदच. मग कम्युनिस्ट काय झियोनिस्ट काय फॅसिस्ट काय संघिष्ट काय इस्लामिस्ट काय, सब एक जैसे. आम्ही अशा झापडबंदांच्या विरोधात त्यांच्याच भाषेत बोलतो म्हणुन अतिरेकी दिसतो एवढंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

कम्युनिस्ट मूळ विचारसरणी

सुबोध खरे
Sat, 03/05/2016 - 11:22 नवीन
कम्युनिस्ट मूळ विचारसरणी कितीही आदर्शवादी वाटली तरी ती निसर्गाच्या विरुद्ध आहे म्हणून ती कालबाह्य फार पटकन(१०० वर्षात) झाली . कम्युनिस्ट राजवटीत उच्च तंत्रज्ञान असलेल्या इंजिनियरला सामान्य कामगाराच्या दीड पट पगार मिळत असे. त्याच्या बुद्धिमत्तेची कदर केली जात नसे.कलाकार गायक वादक यांना तर कुणीच विचारत नसे. मुक्त विचार करणारे लेखक फक्त सैबेरियात किंवा चीनच्या भिंतीच्या तळघरात सापडत असत. शेवटी आपण करीत असलेल्या प्रत्येक वेगळ्या गोष्टीचे चीज व्हावे हि माणसाची आंतरिक इच्छा पूर्णपणे दडपली जात असे. कपडे एकाच रंगाचे खाकी किंवा निळा. घरे ठोकळेबाज, कोणतेही घरगुती उत्पादन सर्वात स्वस्त आणि रंगहीन. अशा परिस्थितीत सरासरीकरणामुळे माणसाची निर्माणेच्छा मारली जाते. ८० च्या दशकात आमच्या वडिलांनी एक कम्युनिस्ट जोडपं दाखवलं होतं.. मुलं आणि स्त्रिया हि राष्ट्राची संपत्ती मानणारे पोथीनिष्ठ कम्युनिस्ट स्वप्नाळू विचारधारेत वाहून गेल्यामुळे मुलं होऊ दिली नव्हती. स्वतःची मालमत्ता पण फारशी नव्हती.पैसा कमावणे हे पाप आहे अशा मनोवृत्तीचे आणि आयुष्याच्या संध्यकाळी भकास चेहरा आणि भग्न स्वप्ने उराशी धरून रखडत जगत असलेलं. जीवशास्त्र आणि निसर्ग हा आदर्शवादी नसतो तर वास्तववादी असतो.निसर्गात सर्व समान मुळीच नसतात. त्यानंतर कम्युनिस्ट साहित्य वाचून त्यातील फोलपणा सहज लक्षात आला. असो
  • Log in or register to post comments

डाव्यांमधे कुणी श्रद्धा वगैरे

प्रकाश घाटपांडे
Sat, 03/05/2016 - 12:05 नवीन
डाव्यांमधे कुणी श्रद्धा वगैरे असे काही म्हटले की त्याला बूर्झ्वा बूर्झ्वा असे म्हणुन उजवीकडे फेकतात म्हणे!
  • Log in or register to post comments

सध्याच्या गदारोळाच्या दिवसात.

शाम भागवत
Sat, 03/05/2016 - 13:06 नवीन
सध्याच्या गदारोळाच्या दिवसात........ सुंदर व संयमित लेख वाचायला मिळाला. प्रतिक्रियाही संयत व वाचनिय. एकंदरीतच लेख व प्रतिक्रियांना अभ्यासाबरोबर मनन चिंतन व अनुभवाची जोड असल्याचे जाणवत होते. दुसऱ्यांचे मुद्दे खोडून काढण्यापेक्षाही आपल्याला जे पटलेय ते कारणासहित मांडायची इच्छा जास्त बलवत्तर वाटली. भगतसिंग उल्लेखानंतरही धागा भरकटला नाही हे विशेष. मिपा वाचक असल्याचा फायदा झाला.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: अभिशेक पाटिल 2
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 11:14
  • सदस्य: Abhishek C
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 11:05
  • सदस्य: देव@मिसलपाव
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 08:44
  • सदस्य: आम्ही कोण म्हण…
    नोंदणी: Fri, 03/20/2026 - 00:38
  • सदस्य: मिपाखरु
    नोंदणी: Fri, 03/20/2026 - 00:36
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा