
'डायरी ऑफ अॅना फ्रँक 'ची पारायणं केल्यापासून म्हणजे शालेय वयापासूनच तिच्याविषयी एक सुप्त उत्सुकता होती.त्यामुळे अॅमस्टरडॅमला गेलं की 'अॅना फ्रँक हाऊस'ला भेट द्यायची हे मी युरोपमध्ये राहण्याची सुतराम शक्यता नव्हती तेव्हाच ठरवून टाकलं होतं. माझ्या अनेक सोनेरी स्वप्नात तेव्हा अजून एक भर पडली होती.पुढे अनेक वर्षांनी जर्मनीला आल्यावर अॅना फ्रँकची डायरी परत खुणावायला लागली. जेव्हा आम्ही अॅमस्टरडॅमला जायचा बेत आखला तेव्हा गुप्ता, शर्मा, वर्मा, चावला आदी मित्रमंडळीनी "अभी उधर जाके क्या है देखनेको?हम ट्यूलिप्स के सिजनमे जाएंगे.." असा फतवा काढला. "अॅना फ्रँक? ये कौन है?" असे प्रश्न ऐकल्यावर आम्ही त्यांच्याशिवायच जाण्याचा सूज्ञ निर्णय घेतला.

(अॅना फ्रँक चे घर पाहण्यासाठी आलेल्यांची रांग)
अॅमस्टरडॅमच्या अगदी मध्यवर्ती भागात वेस्टरकेर्कच्या जवळ गेलं की अॅना चा पुतळा दिसतो आणि दिसते ते अॅनाचे लाडके चेस्टनटचे झाड! (सन २०१० मध्ये वादळी वार्याने ते १७० वर्षांहूनही पुरातन झाड पडले.) प्रिन्झनग्राक्ट येथे 'ते' तिमजली घर आहे. हे घर म्हणजे फ्रँक कुटुंबाचा कठिण काळातला आसरा होता.


१९४५ च्या एप्रिल महिन्यात छ्ळछावणीत अडकवून ठेवलेल्यांची सुटका झाली त्याच्या काहीच आठवडे आधी अॅना आणि मार्गोटचा काळाने घास घेतला तर त्यांची आई एडिथ जानेवारीतच उपासमारीने छळछावणीत मरण पावली. सगळ्या कुटुंबाची वाताहात झाली. ह्या युध्दात वाचला तो फक्त ऑटो फ्रँक, ह्या दोन गोंडस मुलींचा कमनशिबी बाप! त्याची सहकारी मिप गिसं हिने अॅनाच्या डायरीचा हा जीवापाड जपलेला ठेवा त्याच्या सुपूर्त केला आणि ऑटो ती डायरी वाचताना स्तिमित झाला. आपलीच चिमुरडी त्याला त्या डायरीतून उलगडत, भेटत गेली. मग त्याने १९४७ मध्ये तिची ही 'किटी' पुस्तकरुपाने जगासमोर आणली.
'त्या' घराजवळ अॅनाच्या पुतळ्यापाशी पोहोचता पोहोचता 'डायरी' आठवायला लागतेच. तळमजल्यावरील हॉलमध्ये मूळ घर आणि फ्रँक कुटुंब तेथे आसऱ्यासाठी आल्यावर केलेले बदल अशी दोन्ही मॉडेल्स ठेवली आहेत. जसजसे आपण घर पाहत जातो, तसतसे संदर्भ लागत जातात, तिथल्या भिंतींवर, जिन्यामधील जागेत अॅनाच्या डायरीतली वाक्ये उद्धृत करून ठेवली आहेत. त्याचाही परिणाम मनावर आपोआप होत राहतो. 'बुकरॅक'चे दार उघडून आत शिरलो की आपण दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच पोहोचतो. अॅना आणि मार्गोटने (तिची बहिण) पोस्टर्स आणि फोटो लावून सजवलेल्या भिंती, त्यांच्या उंचीच्या पेन्सिलीने केलेल्या खूणा, त्यांचे खेळ, त्यांच्या अभ्यासाच्या वह्या सगळे जसेच्या तसे जपून ठेवले आहे. त्यांच्या खोल्यांना लावलेला टॅनकलरचा वॉलपेपर आणि पलंगावर बसल्यावर भिंतीला टेकल्यावर पडलेले डोक्याच्या तेलाचे डागही तसेच आहेत. बुकरॅक उघडल्यावर सगळ्यात प्रकर्षाने जाणवतात ते अरुंद आणि स्टिप जिने. ज्या जिन्यातून चढता उतरताना फार जपून जावे लागते अशा ह्या जिन्यातून सामान कसं आणलं असेल? ते ही लपत छपत.. हा प्रश्न डोक्यात घेऊनच आपण पुढच्या दालनात जातो.

मसाल्याच्या कारखान्याच्या मागे लपण्यासाठी केलेला हा आसरा, तिथल्या बंद खिडक्याआड दडलेली वेदना डायरीच्या रुपाने जगासमोर आली. ही काही फक्त फ्रँक कुटुंबाची वेदना राहत नाही, तर त्या काळात असले दुःख भोगावे लागलेल्या साऱ्यासाऱ्यांची ती वेदना होते. तिथल्या पडद्यावर दाखवण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या चित्रफितीतून तो काळच समोर उभा राहतो आणि सुन्न व्हायला होतं. तिची डायरी तिच्या बाबांना कशी मिळाली, त्यातून त्यांना आपलीच मुलगी कशी समजत गेली, याची ह्रद्य मुलाखत आहे. या कुटुंबाला मदत करणाऱ्या सुह्रदांच्या मुलाखती आहेत, अॅना छळछावणीत गेल्यावर आपला जीव धोक्यात घालून तिला बाहेरुन मदत करणाऱ्या मैत्रिणीची मुलाखत आहे.
एका भव्य दालनामध्ये अॅनाच्या या डायरीच्या जगभरातील भाषांमध्ये भाषांतरीत झालेल्या पुस्तकांच्या प्रती मोठ्या कलापूर्ण रीतीने मांडल्या आहेत.भारतीय भाषांमध्ये मंगला निगुडकरांची मराठी डायरी आणि एक बंगाली डायरी आहे. छोट्या,छोट्या नावही न ऐकलेल्या देशांच्या भाषांमध्ये अॅनाची डायरी आहे आणि एवढ्या मोठ्या खंडःप्राय देशातल्या फक्त दोनच भाषांमध्ये तिचे भाषांतर? असा एक विचार आला क्षणभर मनात आणि मी पुढच्या दालनात गेले. एक अतिशय अरुंद आणि स्टिप जिन्याने वर चढून गेलं की बंद काचेमध्ये 'ती' दिसते, किटी! ज्या डायरीची आपण पारायणं केली ती अशी मूळ स्वरुपात जेव्हा भेटते तेव्हा तिला बघण्या भेटण्याच्या ओढीने तिथे आलेले सगळेच भावूक होतात. खुद्द अॅनाच्या अक्षरातली ती 'किटी' पाहताना मग मनातले भावनांचे कल्लोळ डोळ्यातल्या पाण्यातून वाहू लागतात.


अॅमस्टरडॅमला किटीला, अॅना च्या डायरीला भेटून आले पण ती फ्रांकफुर्ट मध्ये जन्मली आणि ती दोन वर्षांची असताना नाझींच्या भीतीने फ्रँक कुटुंब फ्रांकफुर्ट सोडून आधी आखन आणि मग अॅमस्टरडॅम मध्ये गेले हे काही डोक्यातून जात नव्हते. फ्रांकफुर्ट मधलं तिचं जन्मस्थान ते घर, तो परिसर आता कसा असेल? हे पाहण्याची ओढ होती. मग जालावर शोध घेतला तेव्हा समजले डॉर्नबुश ह्या उपनगराजवळ तिचं घर आहे. ट्रामने गेलं असता Fritz-Tarnow-Straße ह्या स्टॉपच्या रस्त्यावर अॅना फ्रँक हाउस असं एका फलकावर लिहून एक बाण काढलेला दिसला. तेथे उतरून मग त्या बाणाच्या दिशेने गेले. Jugendbegegnungsstätte Anne Frank e.V. असं लिहिलेल्या एका सरकारी दिसणार्या आधुनिक इमारतीपाशी आले. तिथे विचारच करत होते की आत कसं जाऊ? कुणाला विचारू? अशा विचारात असतानाच एक ताई त्याच इमारतीत आत शिरत होत्या. त्यांनाच हटकलं असता, या ना आत, इथेच मिळेल तुम्हाला माहिती असं म्हणून त्यांनी आतच बोलावलं तर तिथे कचेरीच असलेली दिसली. तिच्या घराचं हे आधुनिक रूप, त्यातही तिच्या, फ्रँक कुटुंबाच्या अशा कोणत्याच खुणा दिसेनात. निराश मनानेच त्या ताईंना विचारलं इथेच होतं का तिचं घर? तर हसून त्या म्हणाल्या नाही, नाही.. हे अॅनाफ्रँक युथमिटिंगप्लेस आहे.

तिचं घर इथून जवळ आहे पण सांगायला जरा अवघड आहे. ती विचारात पडली कसं सांगावं? मग तिने चक्क एक नकाशा आणून दिला,कसं जायचं ते समजावून सांगितले आणि मी तिथून निघाले. रस्ता ओलांडून पलिकडे जायचं आणि डावीकडे सरळ चालत रहायचं. तिच्या सूचना आठवत नकाशात पाहत चालायला सुरूवात केली, मारबाखवेग नावाचा रस्ता लागला की उजवीकडे वळायचं हे डोक्यात ठेवून.. मारबाखवेग आला तशी उजवीकडे वळले. आता ह्याच रस्त्यावर तीन गल्ल्या सोडल्या की नंतरच्या कोपर्यावर तिचं घर आहे. पावलं भरभर उचलू लागली, गल्ल्या मागे पडू लागल्या आणि एका कोपर्यावरच्या घराबाहेर मोठा फलक, त्यावर लहानग्या अॅना, मार्गोटचा फोटो पाहून एकदम थबकायला झालं. हेच तिचं घर! न राहवून मी फाटकाकडे वळले तर तिथे दुसर्याचं कोणाची तरी नांवं.. आता त्या घरात ३-४ बिर्हाडे राहतात आणि 'त्या' काळच्या कोणत्याच खुणा तेथे दिसत नाहीत. इथून गाशा गुंडाळताना तिथल्या सगळ्या खुणा पुसून गेल्यात जणू!


(अॅनाचे फ्रांकफुर्टमधील घर- पूर्वी आणि आता)
तो फलकावरचा फोटो ही एकमात्र खूण त्या घराशी नाते सांगत असते. बाहेरूनच ते घर पाहिले. त्या घराभोवती चक्कर मारली. तिथे असलेल्या झाडांच्या सावलीत कधीच्या काळी इवली अॅना आणि मार्गोट खेळत असतील असं मनानेच पाहिलं, त्यांचा तिथला वावर मनानेच जाणवून घेतला आणि जड पावलांनी परत ट्रामकडे वळले.


(काही प्र. चित्रे आं जा वरून साभार)
मस्त
पुन्हा एकदा अॅना
खूप सुंदर
आणखी थोडं पाहिजे होतं असं
छान लेख. वाचलंय याचं मराठीतील
सुरेख लेख!
या डायरीवर आधारीत एक नाटक
छान लेख. आणखी तपशिलात हवा
छान लेख
अॅन फ्रँकची डायरी वाचलं होतं
अॅन फ्रँकची डायरी वाचलं होतं
In reply to अॅन फ्रँकची डायरी वाचलं होतं by खेडूत
चांगलं लिहिलं आहेस स्वातीताई.
लेख आवडला...
निशब्द
छान
तेथे फिरताना विषण्ण करणारा
डोळे भरून आले अश्रूंनी...
डोळे भरून आले अश्रूंनी...
In reply to डोळे भरून आले अश्रूंनी... by विजय पुरोहित
नाहि,अति नाही होतय।.उलट कमी
In reply to डोळे भरून आले अश्रूंनी... by मितभाषी
=)) =))
In reply to नाहि,अति नाही होतय।.उलट कमी by किचेन
डायरी ऑफ अॅन फ्रँक वाचल्यावर
सुरेख लेख.अॅमस्टरडॅमला जेव्हा
लेख आवडला.
लेख आवडला.
+१
In reply to लेख आवडला. by इशा१२३
लेखन आवडले. त्या काळाची
+१ तंतोतंत
In reply to लेखन आवडले. त्या काळाची by रेवती
मराठी
In reply to +१ तंतोतंत by नाखु
धन्यवाद
In reply to मराठी by सुमीत भातखंडे
सुरेख लेख!
सुरेख लिहिलंस!
महितिपर लेखन
सुंदर लेख.
मी हे पुस्तक एका बैठकीतच
छळछावण्या
In reply to मी हे पुस्तक एका बैठकीतच by प्रमोद देर्देकर
अॅना फ्रँकची डायरी वाचली
डायरी ऑफ अॅन फ्रॅन्क वाचले
लेख आवडला
...
लेखन आवडलं
वाचली होती डायरी. बाकी ठिकाणं
लेखन आवडलं.
:(
धन्यवाद