ते...
शेवटी तो गावी पोचला होता. बरोब्बर २३ वर्षांनी. त्याच्या मनातला ध्यास आता पूर्णत्वाकडे जाण्याची चिन्हे त्याला स्पष्ट दिसू लागली होती. तेरा वर्षात अफ्रिकेच्या जंगलातून त्याने जी विद्या घासून पुसून आणली तिच्या वापराने त्याचा सूड पूर्ण होणार होता.
लहान चणीचा तो तरूण आपल्याच विचारात हरवून वेशीपर्यंत पोहोचला. त्याच्या लहानपणी चांगली धडधाकट असणारी वेस आता मोडकळीला आली होती. पण अजून होती. वाटेतल्या बर्याच गावातल्या वेशींसारखी पार पुसली गेली नव्हती. त्याने शांतपणे जवळच्या थैलीतून राख काढली आणि वेस बांधून घेतली. मग त्या राखेचे दोन फटकारे दोन दिशांना मारून तो तेथून निघाला. अजून बरेच अंतर कापायचे होते. तो आल्याची वर्दी गावात जायच्या आत. दक्षिणेतला भुत्याचा टिळा, उत्तरेतली वाघजाईची गुहा आणि पश्चिमेतली जाईची कोंड अशीच बांधून घेतल्यावर तो गावात प्रवेश करता झाला.
तो पारावर पोहोचला तेव्हा चंद्र हातभर वर आला होता. पारावर चार नेहमीची तोंडे सोडली तर गावात फक्त भांड्यांचे आवाज आणि गायी म्हशींचे हंबरणे ऐकू येत होते. मध्येच कुठेतरी नांगराच्या फाळाची ठोकाठोक. चुलींवर धगधगत्या कालवणांच्या वासांचे अर्थ लावत तो त्याच्या मोडकळीला आलेल्या घरात तसाच बसून राहिला. अन्नपाण्याची शुद्ध आली तेव्हा लक्षात आले की आता त्यालाच काहीतरी करावे लागेल. अकाली कॅप्लाटा झालेल्या त्याला दिमतीला कुणी नसायची सवयचं नव्हती. त्याच्या दिमतीला नेहमीच झाँबी असायचे. आता मात्र तो उठून स्मशानाकडे चालू लागला. तिथे आज कुणीच नव्हते. पण तो पोचता पोचता त्याला एक चुकार कुत्रे दिसले. त्याने झटक्यात त्याच्या पोतडीतून पुन्हा राख काढली आणि त्या कुत्र्यावर टाकली. कुत्रे निमूट बसले...त्याने बाजूनी लाकडे रचून ते भाजेपर्यंत!
दुसर्या दिवशी सकाळी तो चावडीवर गेला. रात्री त्याला भेटलेल्यांनी तो आल्याची वर्दी फिरवलेलीच होती. चार वाकड्या तोंडांशिवाय त्याला काही पहायला मिळणारही नव्हते. पण तिथे त्याने सांगितले की तो आजपासून माळावर जाऊन रहाणार आहे. येवढे गावात सांगणे त्याला बास होते.
भर दुपारी तो माळावर पोचला तेव्हा ऊन चांगले तापले होते. पायातल्या सावलीकडे क्षणभर बघत त्याने माळाच्या मधोमध खड्डा खणायला सुरुवात केली. ३ फूट खडडा खणून झाल्यावर तो तिथे जाऊन बसला. मग त्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली..
पक्षी अचानक किंचाळून उडाले. टिटव्यांनी ओरडायला सुरुवात केली. दूर..जंगलात भर दुपारी कोल्हेकुई ऐकू येऊ लागली. माकडे बुभु:कार करू लागली. पडलेल्या वार्याने अचानक जोर धरला. येवढा की त्या वार्याच्या आवाजात सगळे बुडून गेले. आणि अचानक, एक क्षण तिथे सगळीकडे भयाण शांतता पसरली...क्षणभरच..आसमंत सगळा अंधारून आला..गवताची पाती तशीच लवलेली थांबली होती..पाण्यावरच्या लहरीसुद्धा...
ते आलं होतं..........
त्यानी बोलावल्याप्रमाणे. आदिम, प्राचीन! आपल्या मितीतलं नसलेलं. त्याच्या हाकेला ओ देऊन स्वतःची आणि त्याची रक्ताची तहान भागवायला. पहिला बळी नेहमी बोलावणार्याचा अशी रीत असणार्या त्या विखारी अस्तित्वापासून स्वतःचे संरक्षण करायचे म्हणूनच त्याने स्वतःचे स्थान सुरक्षित करून घेतले होते. रोंरावत, घोंघावत तो हिडीस आकार सगळ्या गावकुसाला धडका देऊन आला. पण सर्व दिशा त्याने आधीच बांधून ठेवल्या होत्या. आता ते त्याच्यासमोर उभं राहिलं...त्याच्या आदेशाची वाट बघत! त्याने शांतपणे त्याच्या स्वतःच्या रक्ताची वाटी समोर केली..एक कानाच्या पडद्यांवर ओरखडे आणणारा मिटक्या मारण्याचा आवाज करून ते त्या वाटीवर झेपावलं.
त्याच्या मंत्रचक्षूंना जरी ते दिसत असलं तरी तो सतत काही त्या स्थितीत राहू शकत नव्हता. त्याने त्याला पहिली आज्ञा केली...रूप घे!
त्याच्यासमोर एक मत्त गवा उभा राहिला..पण तो गवा साधा नव्हता! त्याच्या आकारात सतत बदलणारे असे काहीतरी होते..त्याच्या सीमा जणू प्रकाश शोषणार्या अंधाराने बनल्या होत्या. हे बघूनच कळत होते की हा आकार फसवा आहे. नजर ठरू न देणारा आहे. धडकी भरवणारा आहे.
ठीक! असे त्याने म्हणताक्षणी त्या माळरानावर अचानक एक आगीचा डोंब उसळला. सर्व दिशा थोड्याश्या अंधारल्या. गावातल्या देवळाचा पहिला पायरीचा दगड तडकला!
सगळे शांत झाले तरी वादळात सापडल्या प्रमाणे आसमंत धुमसायला लागले. अचानक त्याच्या लहान, पण काळजाचे पाणी पाणी करणार्या हास्याची एक किनरी लकेर उमटली! तो जिंकला होता. आता त्याला कुणीच थांबवू शकणार नव्हते! नरांजोच्या तावडीतून कुणीचं सुटत नसे!
ध्यानात मग्न असलेल्या परशुरामशास्त्र्यांचे डोळे खाडकन उघडले.. ते घामाघूम झाले होते! कपाळावरची शीर ताड ताड उडत होती! अंग घामाने डंवरून आले होते..येणारा काळ बरेच अमंगळ घेऊन येणार आहे ह्या जाणिवेने ते अस्वस्थ झाले होते..
क्रमशः
Book traversal links for ते...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
मस्त, पुढचे लवकर लवकर लिहा :-
मस्त वातावरण निर्मिती। लवकर टाका पुढचा भाग
काहितरी भन्नाट वाचायला मिळणार
आवडले. पुढला भाग लवकर लिहा.
पांडू कथा उत्तरार्ध!
सुरुवात जबराट झाल्याली आहे .
पुभाप्र.
जबराट . सुष्ट आणि दुष्ट
सर्वांचे प्रतिसादांबद्दल आभार
धन्यवाद ! आणी शुभेच्छा !
खतरनाक!!!!!
स्पाचा नवीन अवतार का??
जबराट! पुभाप्र!
मस्त!
पहिलाच भाग जोरदार...
वा!
खुपच छान
जबरा
कथा आवडली
लवकर टाका पुढचा भाग
जबराट !