✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

निखारा

ज
जव्हेरगंज यांनी
Fri, 02/19/2016 - 23:15  ·  लेख
लेख
कधीमधी पाऊस यायचा. मग जरा अडचणच व्हायची. लाकडं पेटत नसायची. पत्र्याचं शेडपण गळकं. वाऱ्याच्या झोतानं पाऊस आत यायचा आन पाण्याचा फवारा शिपडून जायचा. येवढी मेहनत करुन पेटवलेली लाकडं मग विझायची. राकेलचा आख्खा ड्रम मग उपडा करावा लागायचा. रातभर तसंच बसून राहावं लागायचं. पाऊस उघडला की मग पुन्हा सुकी लाकडं आणून पेटावायला लागायची. रात गेली तरी चालंल पण मढं समदं जळलं पाहीजे. त्याशिवाय सुट्टी न्हाय. थंडीवाऱ्यानं हाडं खिळखीळ करायची. मग गांज्या मारावा लागायच्या. त्याच्या नशेत सगळं स्मशान डोक्यात घुमत राहायचं. अनंतकाळ. येरवाळी बरं असायचं. राती नऊ-दहालाच सराण पेटवून देऊन खोपट्यात निवांत पडायला मिळायचं. आख्खी संत्रा नीट मारुन रात झिंगून जायची. आम्लेट पावाशिवाय तिथं खायला बी काय मिळायचं न्हाय. न्हाय म्हनायला एक घोंगडं पांघरलेला माणूस तिथं येऊन मक्याची कणसं विकायचा. या वैरान जागी मी एकटाच त्याचं गिऱ्हाईक होतो. पण तरीही यायचा. कित्येक रात्री तशा शांतच असायच्या. प्रेताची धग घेऊन गुरफटून जायच्या. कुणी आलाच एखादा नातलग तर त्याच्या गगणभेदी आक्रोशाला सलाम ठोकायच्या. मुक्कामाच्या गावाला जाता जाता मला मात्र त्या आपल्याच वाटायच्या. त्यादिवशी मी सकाळी उठलो. ऊन जास्तच होतं. नेहमीच असतं. सुर्य उगवायच्या आत मला एकदा ऊठून बघायचयं. पहाटेचा गारठा डोळ्यात साठवायचाय. तांबूस किरणांची रांगोळी मी कधी बघितली नाही. पण कितीबी वेळा जाग आली तरी ऊठणं झालं नाही. लिंबाच्या दोन-चार काड्या तोंडात टाकून नदीकडं गेलो. आंघोळ केली. गार पाण्यात रातीची ऊतरती. पापंसुद्धा. सोन्यानाण्याचं किडूकमिडूक काढून घेणं हिच आमची पापं. त्या पापात आम्ही जगणं शोधतो. मरणाला चार दिवस पुढं ढकलतो. हे अखंड बेवारशी मृत्यू आमच्या जगण्याचं साधन आहे. पोलिस कधीमधी शे-दोनशे देतात. ती मजूरी आहे. आंघोळ करुन टेरिकोट चा डगला घातला. कोस दोन कोस चालत जाऊन महुदाच्या टपरीवर एक कप चहा कसाबसा पोटात ढकलला. आणि माझा दिवस सुरु केला. मग डांबरीवरच्या फळकुटावर ऊगंच बसून राहिलो. या आडवळणाच्या जाग्यावर म्हटलं तर वर्दळ तशी नव्हतीच. सकाळपासून भरतीसाठी थांबलेलं एक जिपडं निघायच्या तयारीत ऊभं होतं. काय मनात आलं आन मी पण जाऊन बसलो. डायवर म्हणाला, " काय रे बेवड्या, लय कमाई झालीय वाटतं तुझी?" मी गप बसून राहिलो. धातूरीला आधनंमधनं चक्कर व्हायची पण आजकाल जरा कमीच. ह्या डायवरनं मला बरोब्बर वळाखलं हुतं. पंधरादिवसाखाली याच्यासारखाच एकजण आला होता तिकडे. त्याची बायली हमसून हमसून रडत होती. मोठ्या पोरानं जेव्हा अग्नी दिला तेव्हा त्याची दातखिळ बसली होती. समदी निघून गेल्यावर राखेत काळवंडलेलं बदाम मी शोधून काढलं होतं. तेव्हा या डायवरनं बघितलं होतं. कधीकधी काहीतरी अतर्क्य घडतं. माणसाला कळतच नाही की तो मेलाय. हा डायवर ही यातलाच असावा. पंधरादिवसाखाली यालाच अग्नी दिला होता. मात्र हा अजुनही भटकतोय. अगदी माणसासारखा राहतोय. हा माझा भ्रम आहे की मनातले गोधळलेले विचार. असे विचार मी लगेच झटकून टाकतो. नाहितर मी वेडा होऊन जाईन. धातूरीला ऊतरुन किडूकमडूक विकलं. पाचशे आलं. खिशातले शंभर. म्हणजे सहाशेची बेरीज लागली. बऱ्याच दिवसांनी खिसा फुगल्यासारखा वाटला. मग आण्णाच्या खानावळीत जाऊन वशाड खाल्लं. दारु मात्र पिलो नाही. येताळबाबाच्या पाठीमागं मग झाडाखाली आंग टाकून दिलं. पार ऊन्हं उतरोस्तर झोपलो. पैसं आलं की जीवाची चैन होते. जेव्हा जाग आली तेव्हा आकाशात तांबूस किरणांची रांगोळी दिसली. पहाटेची नाही किमान संध्याकाळची तरी पाहिली. येता येता बाजारात फिरुन पावशेर तंबाकू आन दोन बिंडेल बीड्या घेतल्या. दारुतर महूदातबी मिळंल. गांजा शिल्लक होता. परत यायला जरा ऊशीरंच झाला. बरीच रात झाली होती. त्यात पाऊस सुरु झाला. पाऊस आला की जरा अडचणच होते. लाकडं भिजून जातात. मढ लवकर जळत नाही. मग रात टाकावी लागते. भुतं दिसायला लागतात. त्यात त्या ताज्या प्रेताचं भुत मानकुटीवरच बसलेलं असतं. मग गांज्याशिवाय झोप लागत नाही. पाय ऊचलत घाईघाईनं खोपट्यात शिरलो. कधीही एखादं प्रेत इथं येऊ शकतं. लाकडं फारीनं झाकून ठेवायला लागतील. कसंबसं माचीस शोधलं अन दिवा पेटवला. अन बघतोय तर काय एक म्हातारा कुडाला लागून अस्ताव्यस्त पडलाय. माझ्याच पोतडीवर. गतप्राण. मी हताश होऊन त्याच्याकडे पाहत राहिलो. पुढे काय आणि कसं करावं हेच मला कळेना. त्याच्या अंगात टेरिकोटचा डगला होता. ही रात जीवेघेणी. त्यात पाऊस आलेला. आन लाकडंही भिजलेली....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
8398 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

जव्हेरटच जव्हेरटच तो हाच !

उगा काहितरीच
Fri, 02/19/2016 - 23:29 नवीन
जव्हेरटच जव्हेरटच तो हाच ! आवडली कथा . शेवटच्या धक्का तंत्राची गरज नव्हती . रच्याकने अण्णा भाऊ साठे यांचा भीमा आठवला.
  • Log in or register to post comments

ड्रायव्हर आणि म्हातारा,

एस
Fri, 02/19/2016 - 23:29 नवीन
ड्रायव्हर आणि म्हातारा, दोघंही! खल्लास लिहिलंय. असा ट्विस्ट अपेक्षितच होता असं वाटलं पण.
  • Log in or register to post comments

खल्लासच , ट्विस्ट कळलेलाच

स्पा
Sat, 02/20/2016 - 00:00 नवीन
खल्लासच , ट्विस्ट कळलेलाच पण गोष्ट खुलवण्याची हातोटी क्या बात दंडवत घ्या जव्हेरभाव
  • Log in or register to post comments

काय पण म्हणा जव्हेरभाव.

अभ्या..
Sat, 02/20/2016 - 00:27 नवीन
काय पण म्हणा जव्हेरभाव. नाद केल्यास बाद केले जाईल असल्या कथा असतेत तुमच्या. पार डोस्कं कामातून जातंय. च्यायला काय दुनिया बघितली तुम्ही आन शब्दात काय उतरवली तुम्ही. ख त र ना क. आइच्यान सांगतो. फिदा भौ तुमच्या लेखणीवर आपण. जियो. लिखते रहो.
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
Sat, 02/20/2016 - 06:46 नवीन
हेच म्हणतो. जव्हेरभाऊंचा नादच खुळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

दंडवत

नाखु
Sat, 02/20/2016 - 08:37 नवीन
लेखणी जोरदार आणी टोकदार ही! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१

कपिलमुनी
Sat, 02/20/2016 - 23:34 नवीन
डायरेक्ट तितं पोचवलतं की ओ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

वा!

आनंद कांबीकर
Sat, 02/20/2016 - 00:39 नवीन
जव्हेरभौ लै दिसानी काय तरी झक्कास वाचाय मिळालं. जाम आवडली कथा.
  • Log in or register to post comments

कसदार कथा

अर्धवटराव
Sat, 02/20/2016 - 00:41 नवीन
.
  • Log in or register to post comments

ज ब रा ट

एक एकटा एकटाच
Sat, 02/20/2016 - 03:58 नवीन
ज ब रा ट
  • Log in or register to post comments

आवडली.

यशोधरा
Sat, 02/20/2016 - 06:19 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

खत्तरनाक प्रतिमासृष्टी...

विजय पुरोहित
Sat, 02/20/2016 - 08:05 नवीन
खत्तरनाक प्रतिमासृष्टी... अफाट कल्पनाशक्ती... जव्हेरभौ __/\__
  • Log in or register to post comments

मध्येच एकदा शंका आली होती पण

रेवती
Sat, 02/20/2016 - 08:44 नवीन
मध्येच एकदा शंका आली होती पण कथेचा वेग भारी असल्यानं वाचतच गेले. लेखनशैली आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 02/20/2016 - 09:19 नवीन
मस्त कथा फारच आवडली. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

हत्ती एकदाच येतो अन् धुराळा करून जातो!

तुषार काळभोर
Sat, 02/20/2016 - 09:27 नवीन
जियो जव्हेरभाऊ!
  • Log in or register to post comments

कथा आवडली..

जेपी
Sat, 02/20/2016 - 09:58 नवीन
कथा आवडली..
  • Log in or register to post comments

जव्हेरदस्तं लिहिलिये जव्हेरभौ

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 02/20/2016 - 11:20 नवीन
जव्हेरदस्तं लिहिलिये जव्हेरभौ.
  • Log in or register to post comments

कडक

टवाळ कार्टा
Sat, 02/20/2016 - 12:11 नवीन
कडक
  • Log in or register to post comments

वो मामा

बाबा योगिराज
Sat, 02/20/2016 - 12:12 नवीन
मायला येक नंबर किती येळला देऊ? जव्हेर भौ एकदा भेटाचं. ____/\____
  • Log in or register to post comments

माणसाला कळतच नाही की तो मेलाय

बोका-ए-आझम
Sat, 02/20/2016 - 12:54 नवीन
माणसाला कळतच नाही की तो मेलाय.
हे चर्र करणारं वाक्य आहे जव्हेरभौ! जबरदस्त! _/\_
  • Log in or register to post comments

आवडली

प्रदीप
Sat, 02/20/2016 - 13:34 नवीन
.
  • Log in or register to post comments

जव्हेरगंज भौ...खल्लास लिहीलय.

चिनार
Sat, 02/20/2016 - 14:43 नवीन
जव्हेरगंज भौ...खल्लास लिहीलय... मिपाकर असल्याचा अभिमान वाटतोय....
  • Log in or register to post comments

जबरदस्त कथा!

किसन शिंदे
Sat, 02/20/2016 - 20:35 नवीन
जबरदस्त कथा!
  • Log in or register to post comments

भन्नाट !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 02/20/2016 - 23:30 नवीन
भन्नाट !
  • Log in or register to post comments

मस्त लिखाण!

चांदणे संदीप
Sun, 02/21/2016 - 02:40 नवीन
आण्णा भाऊ साठे-बाबा कदम-सुहास शिरवळकर-जव्हेरगंज! ___/\___ घ्या! Sandy
  • Log in or register to post comments

+१०००

तर्राट जोकर
Sun, 02/21/2016 - 04:06 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

एक नंबर कथा!

आदूबाळ
Sun, 02/21/2016 - 02:59 नवीन
एक नंबर कथा!
  • Log in or register to post comments

जबरी

चाणक्य
Sun, 02/21/2016 - 08:05 नवीन
मस्त जव्हेरभाऊ.
  • Log in or register to post comments

भारी.

नाव आडनाव
Sun, 02/21/2016 - 08:34 नवीन
भारी.
  • Log in or register to post comments

!

रातराणी
Sun, 02/21/2016 - 13:48 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

...

जव्हेरगंज
Sun, 02/21/2016 - 15:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

जरा निरखून बघत होतो हाताकडे,

अभ्या..
Sun, 02/21/2016 - 15:49 नवीन
जरा निरखून बघत होतो हाताकडे, हालल्यासारखे वाटले हो. अगदी तुमच्या कथेप्रमाणे. आणि मजा पाहा की, हेच चित्र ९० डिग्रीला फिरवले की आकाशाच्या आरशावर ठेवलेल्या हाताचे प्रतिबिंब वाटतेय. तुमच्या कथांचा येडा फॅन हायच मी. व्हिज्युअलायझेशन बद्दल परत एकदा त्रिवार दंडवत. लिखते रहो जव्हेरभौ, तुमच्या कथा म्हणजे जवाहिरांनी रचलेली गंज हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

+१

तुषार काळभोर
Sun, 02/21/2016 - 21:59 नवीन
शेम आरसाच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वर सगळ्यांनी जी प्रशंसा केली

यशोधरा
Sun, 02/21/2016 - 16:13 नवीन
वर सगळ्यांनी जी प्रशंसा केली आहे, त्याच्याशी सहमत आहेच पण आता थोडे काही वेगळे येऊ द्या की भौ. मला आता तुमच्याकडून काही वेगळ्या विषयावरील कथा वाचायची आहे.
  • Log in or register to post comments

मला जव्हेरभाऊंच्या शीतलीच्या

अभ्या..
Sun, 02/21/2016 - 16:28 नवीन
मला जव्हेरभाऊंच्या शीतलीच्या कथा वाचायच्यात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

शीतलीच्या म्हणजे?

यशोधरा
Sun, 02/21/2016 - 16:31 नवीन
शीतलीच्या म्हणजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

भा.रा.भागवतांचा कसा बनेश फेणे

अभ्या..
Sun, 02/21/2016 - 16:46 नवीन
भा.रा.भागवतांचा कसा बनेश फेणे, तशी जव्हेरभौंची शीतली/शीतल. कुनाची ओ? धायगुडे का पायगुडेची ना? तर असो. ते कॅरेक्ट्रर लै बेणे हाय. त्याच्या कथा. सुरुवातीला एकदोन उडाल्या पण भौतेक.......... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वोक्के.

यशोधरा
Sun, 02/21/2016 - 16:47 नवीन
वोक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

क्या बात! दमच घेऊ देत नाही

सटक
Mon, 02/22/2016 - 19:19 नवीन
क्या बात! दमच घेऊ देत नाही वाचताना.. मस्तच! तुमच्या छोटेखानी वाक्यांचा बाज सुंदर!
  • Log in or register to post comments

मस्त.... अगदि एक नंबर कथा!!!!

शित्रेउमेश
Tue, 02/23/2016 - 11:11 नवीन
मस्त.... अगदि एक नंबर कथा!!!!
  • Log in or register to post comments

बाकी लेख आवडला.

एकप्रवासी
Tue, 02/23/2016 - 21:24 नवीन
आयुष्याला खूप जवळून बघितलय तुम्ही अस वाटत…. ! तुमच्या लेखावरून शाळेतल्या पुस्तकातील धडा आठवला '' स्मशानातील सोन '', बाकी लेख आवडला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा