Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by यनावाला on Mon, 02/01/2016 - 21:51
श्री.जपे यांचा युक्तिवाद आमच्या सहनिवासात (सोसायटीत) जपे आडनावाचे एक कुटुंब राहाते. दोन मुले आणि त्यांचे आई-वडील अशी चार माणसे. आई-वडील नामांकित कंपन्यांत उच्च पदावर. मुलगी बारावीत, मुलगा दहावीत. लगतचे दोन फ्लॅट जोडून केलेला चार बेड रूम आणि मोठा हॉल असा त्यांचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर आहे. सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. चारही माणसे चांगल्या स्वभावाची आहेत. श्रीमंतीचा गर्व नाही. प्रदर्शन नाही. जपे कुटुंब सज्जन, सुसंस्कृत आहे. कुटुंबातील माणसे धार्मिक वृत्तीची आहेत. सगळे सणवार साजरे करतात. कधी सत्यनारायण पूजा असते. होम-हवन तर प्रत्येक महिन्याला असते. सकाळी चार पुरोहित येतात. हॉलमध्ये होमकुंड पेटवतात. मोठमोठ्याने आरोह-अवरोह करीत संस्कृत मंत्र म्हणतात. अग्नीत आहुत्या टाकतात. हे हवन अडीच-तीन तास चालते. दार बंद असते . बाहेरच्या खिडक्या उघड्या असतात. त्यांतून धूर निघून जातो. कुणाला तसा त्रास होत नाही. एका रविवारी वृत्तपत्रात माझा लेख छापून आला. त्यात नास्तिक मत मांडले होते. कालबाह्य रूढी, निरर्थक कर्मकांडे यांवर टीका होती. त्या दिवशी श्री.जपे आमच्या घरी आले. "या! या ! ! बसा. आज इकडे येणे कसे झाले ?" मी स्वागत केले. "आजच्या पेपरात तुमचा लेख छापून आला आहे. तो वाचला." " तुम्हांला न आवडणारे विचार त्यांत आहेत." मी हसत म्हणालो. " लेख चांगला लिहिला आहे. तुमची मते तुम्ही मांडली आहेत. मला विचारायचे होते की आमच्याकडे जे कधी कधी होम-हवन चालते त्याचा तुम्हाला काही त्रास होतो का? तुम्ही सोसायटीच्या कार्यकारी मंडळावर आहात म्हणून विचारले. " "छे! छे! ! मुळीच नाही. त्यात त्रास होण्यासारखे काय आहे? तुमच्या विरुद्ध कोणी कधी तक्रार केलेली नाही. मला वाटते तुमच्याविषयी सर्वांचे चांगले मत आहे." "तुमचा आजचा लेख वाचून मला आपले वाटले." "छे! असा गैरसमज करून घेऊ नका. लेखात यज्ञासारख्या कालबाह्य कर्मकांडावर टीका अवश्य केली आहे. पण त्या लेखाचा तुमच्या होम-हवनाशी काही संबंध नाही. तसे माझ्या मनातही नव्हते. असे लेख मी लिहितच असतो." "ठीक आहे. या संदर्भातील माझ्या शंकेचे निरसन झाले. तुम्हांला राग येणार नसेल तर आणखी एक शंका विचारायची आहे." "राग ? अहो, राग कसला? अवश्य विचारा. काहीही विचारा. मी उत्तर देण्याचा प्रयत्‍न करीन. " "माणसाने सदाचारी, सद्वर्तनी असावे. सत्य बोलावे. कुणाला फसवू नये. अन्याय करू नये. कुणाचा अपमान होईल असे बोलू नये. आपल्या वागण्याने इतरांना त्रास होणार नाही हे पाहावे. हे सर्वमान्य आहे. आस्तिक माणूस असा असू शकत नाही काय ?" "असतात . अनेक आस्तिक असे सज्जन असतात. यांत शंका नाही. तुम्ही तसे एक आहातच." "धन्यवाद ! मग सर्वांनी देव-धर्माचा त्याग करावा. कर्मकांडे करू नयेत. कशावर श्रद्धा ठेवू नये. चिकित्सा करावी. सर्वांनी नास्तिक व्हावे. असा प्रचार का करावा ?आपले विचार दुसर्‍यावर लादण्याचा, त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्‍न का करावा? प्रत्येकाला आपल्या विचारसरणी अनुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे ना?" "हो. तसे घटनादत्त स्वातंत्र्य, किंबहुना अधिकार आहे. याविषयी दुमत नाही. तुम्ही मोजक्या शब्दांत चांगला युक्तिवाद केला. पण असे पाहा, धूम्रपान करण्याचे स्वातंत्र्य (काही नियम पाळून) सर्वांना आहे. असे असता "धूम्रपान करू नये. ते आरोग्याला घातक असते ." असा प्रचार समाजसेवक करतातच ना? किंबहुना शासनसुद्धा करते. ते समाजाचा हितासाठी असते. श्रद्धेमुळे माणसाची अतोनात हानी झाली आहे. होत आहे. अंत्यसंस्कार, बारावे, तेरावे, श्राद्ध अशा कर्मकांडांना किती खर्च येतो ? तो सर्व अनावश्यक असतो. त्याने काही साध्य होत नाही. आता तुमच्याकडे होणार्‍या होम-हवनाचे उदाहरण घेऊ. त्यात हवी म्हणून जाळले जाणारे उपयुक्त पदार्थ वाया जातात. ते सोडा. त्याचे प्रमाण नगण्य असेल. पण तुमच्याकडे कामासाठी चार बाया येतात. त्या हा हवनविधी पाहातात. मंत्रोच्चार ऐकतात. त्यांना वाटते की या साहेबांच्या घरात लक्ष्मी नांदत आहे त्याचे कारण हा होमविधी. आणि हे मंत्र. आपण असे काही केले तर आपल्यावरही लक्ष्मीची कृपा होईल. हा समज त्या वस्तीत सगळीकडे पसरतो. मोठ्या लोकांचे अनुकरण अशी माणसे करतातच. काही जण आपल्या घरात हवनविधी करून घेतात. दोन-चार हजार रुपये वाया घालवतात. ही त्यांच्या कष्टाची कमाई असते. देवा धर्माच्या नावाखाली अनेक जण श्रद्धाळूंना लुटत असतात हे स्पष्ट दिसतेच. आमचा विरोध आहे तो या फसवणुकीला. या लुबाडणुकीमुळे गरीब कुटुंबांची आर्थिक प्रगती होत नाही. त्यामुळे एकूण समाजाची प्रगती खुंटते." "तुम्ही म्हणता त्यात तथ्य असावे असे वाटते. मी यापूर्वी असा विचार कधी केला नव्हता. ऐकला/वाचला नव्हता. " " कल्पना आहे. मी पाहातो की तुम्ही उभयता दिवसभर कामाला जाता. व्यग्र असता. या चक्रात अशा अन्य विषयावर विचार करण्यास तुम्हाला उसंत मिळणे शक्य नाही. हे समजते. आज तुमची जी आर्थिक सुस्थिती आहे त्यामागे तुम्हा दोघांची शैक्षणिक पात्रता, बुद्धिमत्ता, कष्ट, तुमची संयत वागणूक, निर्व्यसनीपणा, ही कारणे आहेत. त्याच्याशी होम-हवनाचा काही संबंध नाही." "आमची देवावर श्रद्धा आहे. लहानपणापासून आहे. परंपरेने चालत आलेले सण-उत्सव आम्ही साजरे करतो. हिच्या माहेरी सत्यनायणाची पूजा बरेचदा होत असे. म्हणून आम्ही करतो. त्यामागे काही ठरलेला हेतू असतो असे नाही. खरे सांगायचे तर होम-हवन करतो ते मुलांच्या भल्यासाठी. त्यांचे आरोग्य चांगले राहावे. सवयी चांगल्या लागाव्या. त्यांनी सद्गुणी व्हावे म्हणून. लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून नव्हे." "तुमची चिंता मी समजू शकतो. पण तुमच्या मुलांना वाईट संगत लागणार नाही. ती सद्वर्तनी होतील. हा आशीर्वाद नव्हे. त्याने काही साधत नाही. केवळ मनाला बरे वाटते. माझ्या विधानामागे आधार आहे. पालकांच्या वर्तणुकीचा परिणाम अपत्यांवर होतोच. घरात मद्यपान होत असेल तर मुले व्यसनी होण्याची शक्यता अधिक असते. पण तुमच्या घरात तसे काही दिसत नाही. म्हणून मुले सद्वर्तनी होण्याचा संभव अधिक आहे. पण त्याचा होम-हवनाशी कांही संबंध नाही. होम-हवन केल्याने मुले सद्गुणी होतील ही तुमची आशावती श्रद्धा आहे. " "आपली चर्चा वेगळ्याच विषयाकडे वळली." "अहो, विषयाला धरून बोलायचे म्हणजे ही काय वादविवाद स्पर्धा आहे का परिसंवाद आहे ? तिथे व्यासपीठावरसुद्धा वक्ते विषय सोडून भरकटतात. हे आपले साधे बोलणे आहे. विषय निघेल तसे बोलायचे. असो. मघाशी तुम्ही म्हणालात की आपले विचार दुसर्‍यावर लादण्याचा प्रयत्‍न का करायचा ? तर तसे नव्हे. माझ्या बुद्धीला जे विचार पटलेले असतात आणि जे लोकांच्या हिताचे आहेत असे प्रामाणिकपणे वाटते ते विचार लेखात मांडतो. त्यांच्या समर्थनार्थ युक्तिवाद लिहितो. लोकांनी ते वाचावे. त्यांच्या बुद्धीला पटेल ते घ्यावे. अशी अपेक्षा असते. त्यात कुणावर काही लादण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा असे लेखात लिहिलेले असते. सर्वसामान्यपणे प्रत्येक माणसाला तर्कबुद्धी असते. बालपणापासून देवा-धर्माविषयी झालेल्या संस्कारांमुळे ती दूषित होते. पूर्व संस्कार प्रयत्‍नपूर्वक बाजूला सारून शुद्ध तर्काने विचार केला तर जे सत्य आहे, वास्तव आहे तेच माणसाला पटेल. असा विश्वास वाटतो." "तुमच्या या विचारसरणीची मला कल्पना नव्हती. " "विवेकवादी विचारसरणी अशीच असते. कोणतेही तत्त्व केवळ वेदांत आहे, पुराणांत आहे, गीतेत भगवंतांच्या मुखी आहे म्हणून ते सत्य असले पाहिजे असे मानू नये. जे बुद्धीला पटेल, आपल्या अनुभवांशी सुसंगत असेल , कॉमनसेन्सला खरे वाटेल तेच सत्य मानावे. तसेच माणसाच्या अधिकृत ज्ञानभांडारातील तत्त्वे नियम खरे मानावे." "माणसाचे अधिकृत ज्ञानभांडार म्हणजे काय ?" " भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, शरीर शास्त्र, आरोग्य शास्त्र, मानववंश शास्त्र, अशा विविध ज्ञानक्षेत्रांतील संशोधकांनी अथक प्रयत्‍न करून अनेक तत्त्वे शोधली. अनेक निसर्गनियम शोधले. ते पुन:पुन्हा तपासले. त्यात वेळोवेळीं सुधारणा केल्या. त्या सत्य नियमांचा, तत्त्वांचा संग्रह म्हणजे मानवी ज्ञानभांडार. त्यात सतत भर पडत असते. ते सर्वांना मुक्तपणे उपलब्ध असते. त्यावर कोणाचा एकाधिकार नसतो. आपण शाळा-कॉलेजांत जे ज्ञान म्हणून शिकतो ते या भांडारातील असते. जगभरातील सर्व अधिकृत शिक्षणसंस्थांत हेच ज्ञान शिकवतात. या ज्ञानसंचयातील नियम,तत्त्वे, विश्वासार्ह असतात." "आता लक्षात आले माझ्या. अद्यापि असा विचारच केला नव्हता. शेवटी एक प्रश्न विचारायचा आहे." "विचारा ना. प्रश्नांची उत्तरे देणे आवडते. इतकी वर्षे शिकवत होतो. तेव्हा अनेक विद्यार्थी प्रश्न विचारायचे. मेंदूत प्रश्न उद्भवणे आणि तो विचारणे ही चांगली गोष्ट आहे." "बहुसंख्य लोक देवाच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवतात. तुमची तशी श्रद्धा का नाही ?" "माझी कशावरच श्रद्धा नाही. अनेक जण देवावर श्रद्धा ठेवतात म्हणून मी ठेवावी असे नाही. ते असो. देवाच्या अस्तित्वाविषयीं सांगायचे तर त्या संदर्भात अनेक प्रश्न मेंदूत उद्भवतात. पण एकाचेही समाधानकारक उत्तर मिळत नाही. म्हणून देवाचे अस्तित्व सत्य मानत नाही. देव जर आहे तर आपले अस्तित्व सर्वांना नि:संदिग्धपणे पटेल असा पुरावा तो दाखवत का नाही ? तो इतका दडून, गुप्त का राहातो ? म्हणजे तो सर्वांना दिसायला हवा असे नव्हे. पण त्याचे अस्तित्व पटावे. त्याच्या ज्या गुणधर्मांचे वर्णन करतात त्यांचा प्रत्यय यावा. तो कधीच कसा येत नाही? देव सर्वज्ञ आहे. सर्वसाक्षी आहे. सर्वसमर्थ आहे. म्हणजे त्याला सर्व समजते. दिसते. तो काहीही करू शकतो. तसेच तो दयाळू आहे. अनाथांचा वाली आहे. न्यायी आहे असे सांगतात. मग:, * देवाच्या समोरील दानपेटी फोडून त्यांतील पैसे कसे चोरता येतात.? * देवाच्या अंगावरील दागिने, मुकुट चोरीला कसे जातात ? * निष्पाप, निरपराध बालिकेवर अत्याचार होतो तेव्हा देव काहीच करू शकत नाही हे कसे? * समाजात अनेक दुराचारी, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक असतात. त्यांचे देव निर्दालन का करत नाही ? मग देव न्यायी कसा? * देवदर्शनाला गेलेले भक्त कधी देवळातील गर्दीत चिरडून कसे मरतात ? देव आपल्या भक्तांना वाचवू शकत नाही हे कसे ? असे अनेक प्रश्न आहेत. पण सर्वांत गहन प्रश्न असा की हे सगळे धडधडीत सत्य दिसते त्यावर काही विचार न करता तुमच्यासारखे उच्चशिक्षित लोक देवाचे असित्व खरे कसे मानतात ? " "मी प्रश्न विचारायला आलो आणि तुम्हीच अनेक प्रश्न उपस्थित केले ! मेंदूत प्रश्न उद्भवले पाहिजेत. त्यांची उत्तरे शोधायला हवीत. हे तुमचे म्हणणे मला पटले. तुमच्या या सर्व प्रश्नांवर विचार करीन. बरे. आता तुमचा अधिक वेळ घेत नाही. येतो. " "अवश्य यावे. आपले सदैव स्वागत आहे." ..........................................................................
  • Log in or register to post comments
  • 23562 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रचेतस on Mon, 02/01/2016 - 22:02

Permalink

सुसंवाद आवडला.

सुसंवाद आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by विजय पुरोहित on Mon, 02/01/2016 - 22:03

Permalink

श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री

श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय... शिरडी माझे पंढरपूर साईबाबा रमावर... बाबा रमावर साईबाबा रमावर... या हो या हो अवघे जन करा बाबांसी वंदन... साईंसी वंदन करा साईंसी वंदन... शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा... पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा...
  • Log in or register to post comments

Submitted by विजय पुरोहित on Mon, 02/01/2016 - 22:05

Permalink

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल....

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.... श्री ज्ञानदेओ तुकाराम.... बोला पंढरीनाथ महाराज की जय...
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Mon, 02/01/2016 - 22:28

Permalink

प्रचंड आवडला!

कडाडून टाळ्या आणि शिट्ट्या! यनावाला : हॅट्स ऑफ टू यू! ____/\____ (आता पहिल्या रांगेत खुर्ची पकडतो!) Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by विजय पुरोहित on Mon, 02/01/2016 - 22:35

Permalink

ज्ञानिनामपि चेतांसि देवी

ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति...
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on Mon, 02/01/2016 - 22:36

Permalink

"निष्पाप, निरपराध बालिकेवर

"निष्पाप, निरपराध बालिकेवर अत्याचार होतो तेव्हा देव काहीच करू शकत नाही हे कसे?" आणि तो सुद्धा देवळात, अगदी देवासमोर..
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 02/01/2016 - 22:40

Permalink

कोण यनावाला का? चालु द्या

कोण यनावाला का? चालु द्या
  • Log in or register to post comments

Submitted by विजय पुरोहित on Mon, 02/01/2016 - 22:42

Permalink

सगळी बोगस कथा वाटते..

सगळी बोगस कथा वाटते...महाफालतूगिरी.... चालू द्या निरर्थक आत्मकुंथन...
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Mon, 02/01/2016 - 22:57

Permalink

लेख आवडला...

तुम्ही असेच लिहित रहा. ज्याना तुमचे विचार पटतील ते स्विकारतील. ज्याना तुमचे विचार नाही पटणार ते स्विकारणार नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 02/02/2016 - 07:04

In reply to लेख आवडला... by सतिश गावडे

Permalink

+१

सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 02/02/2016 - 08:46

In reply to +१ by अजया

Permalink

+२

+२
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 02/02/2016 - 10:25

In reply to +२ by प्रचेतस

Permalink

+३

+३
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 02/02/2016 - 11:30

In reply to +३ by अत्रुप्त आत्मा

Permalink

+४

हा सगळ्यात संयुक्तीक आणि "म"कार मुक्त वाटला नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on गुरुवार, 02/04/2016 - 12:53

In reply to +४ by नाखु

Permalink

+५

+५
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Tue, 02/02/2016 - 09:30

In reply to लेख आवडला... by सतिश गावडे

Permalink

लेख आवडला...

तुम्ही असेच लिहित रहा. ...................तुम्ही असेच लिहित रहा. ..............................तुम्ही असेच लिहित रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नांची राणी on Fri, 02/05/2016 - 00:18

In reply to लेख आवडला... by सतिश गावडे

Permalink

+६...

+६...
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Mon, 02/01/2016 - 23:10

Permalink

माझ्याच धाग्याची जाहिरात

माझ्याच धाग्याची जाहिरात करायचा मोह आवरत नाहीये .
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Tue, 02/02/2016 - 00:40

Permalink

यनाजी, तुम्ही तेच ते लिहून काय साधतायं?

देव ही माणसाची कल्पना आहे इतकी उघड गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून उपयोग नाही. ज्याला समजली त्याच्या जीवनातून कर्मकांड, पूजा-अर्चा, तिर्थयात्रा संपल्या. तरी तुम्ही नशीबवान आहात, पूर्वी अशा लेखावर `तुम्ही शहाणे आणि उपासना करा सांगणारे थोर संत वेडे का?' अशा विचारणा झालेल्या आहेत. अर्थात, तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे (उदा. देवाच्या समोरील दानपेटी फोडून त्यांतील पैसे कसे चोरता येतात?...वगैरे) तर्काच्या दृष्टीनं तितकेच बाळबोध आहेत. कारण देव अशी कोणी अंमलबजावणी करणारी व्यक्ती नाही. कधी असाही विचार करुन पाहा, आपला श्वास कशामुळे चालू आहे? आपलं हृदय धडकतंय ते कशामुळे? सूर्य कशामुळे प्रकाशमान आहे? मुळात त्याच्या असण्याचं प्रयोजनच काय? पृथ्वी एवढ्या अनंत अवकाशात सूर्याभोवती, इतर ग्रह-तार्‍यांशी टक्कर न होता युगानं युगं कशी फिरते आहे?....मग तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्याचा अभिमान बाळगतायं त्या शास्त्रापलिकडे, तर्काच्याही पलिकडे, काही तरी अज्ञात आणि अतार्किक आहे. मग तुम्हाला ज्ञानाच्या मर्यादा उघड होतील. विचारांची दिशा विज्ञानाकडून अज्ञेयाकडे होईल....पुन्हापुन्हा तेच ते लॉजिक मांडून लेखन करणं कमी होईल, तुमच्या विचारांना एक नवा आयाम येईल. कदाचित या समग्र अस्तित्वाच तुम्हाला देवत्त्व दिसायला लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by राघवेंद्र on Tue, 02/02/2016 - 01:33

In reply to यनाजी, तुम्ही तेच ते लिहून काय साधतायं? by विवेक ठाकूर

Permalink

अरे वा सुरेख प्रतिसाद!!!

अरे वा सुरेख प्रतिसाद!!!
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Tue, 02/02/2016 - 01:41

In reply to यनाजी, तुम्ही तेच ते लिहून काय साधतायं? by विवेक ठाकूर

Permalink

क्या बात है ! मस्त प्रतिसाद .

क्या बात है ! मस्त प्रतिसाद . रच्याकने या आस्तीक नास्तीक च्या वादात डोक्याचं भजं होतंय . त्या यनावाला सरांचही म्हणणं पटतेय ! तुमचेही पटतंय सध्या आस्तीकता अन् नास्तीकतेच्या प्रचंड मोठ्या भोवर्यात सापडलोय. आता पहायचंय आस्तीक किनारा लाभतो का नास्तीक ते.
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Tue, 02/02/2016 - 07:40

In reply to यनाजी, तुम्ही तेच ते लिहून काय साधतायं? by विवेक ठाकूर

Permalink

अगागागा.

तुम्ही तरी प्रत्येक लेखात आपलीच थिअरी मांडून काय साधताय. त्यांनी देवाचे अस्तित्व खोडून काढायला ते उदाहरणे दिली कारण लोक देव असे करेल तसे करेल म्हणतात म्हणून. त्यांचे मुद्दे बाळबोध म्हणता आणि तुमचे मुद्दे काय?थोडक्यात शास्त्रज्ञांनी कैक दशकांपूर्वीच ज्या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत ह्या प्रश्नांची. गूगल केले तर ही काही सापडली.
आपला श्वास कशामुळे चालू आहे?
http://wonderopolis.org/wonder/why-do-we-need-to-breathe
आपलं हृदय धडकतंय ते कशामुळे?
http://my.clevelandclinic.org/services/heart/heart-blood-vessels/how-does-heart-beat
सूर्य कशामुळे प्रकाशमान आहे?
https://www.highlightskids.com/science-questions/how-does-sun-light http://www.universetoday.com/75803/how-does-the-sun-produce-energy/
पृथ्वी एवढ्या अनंत अवकाशात सूर्याभोवती, इतर ग्रह-तार्‍यांशी टक्कर न होता युगानं युगं कशी फिरते आहे?
गुरुत्वाकर्षण. ग्रह तार्‍यांशी टक्कर न होता काय. धूमकेतू येउन आदळले की इतके. उल्का पृथ्वीच्या वातावरणात येता येता जळून जातात म्हणून आदळत नाहीत. तार्‍यांशी टक्कर कशी होईल आणि? गुरुत्वाकर्षणाबद्दल वाचावे ही विनंती. बाकी सूर्याच्या असण्याचे प्रयोजन काय वगैरे प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. पण मग तसे कोणाच्याच किंवा कोणत्याही वस्तूचे असण्याचे प्रयोजन काय?
पुन्हापुन्हा तेच ते लॉजिक मांडून लेखन करणं कमी होईल
आपण काय वेगळे करत आहात का सर?
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 02/02/2016 - 08:51

In reply to अगागागा. by लंबूटांग

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Tue, 02/02/2016 - 09:26

In reply to अगागागा. by लंबूटांग

Permalink

ठीक आहे पण का ? पण का? असे

ठीक आहे पण का ? पण का? असे विचारत गेले तर निश्चितच एक वेळ अशी येते की विज्ञानाकडे याचे उत्तर नसते.एक साधा प्रश्न आहे, गर्भाशयात असतांना पाचव्या की सहाव्या आठवड्यात (नक्की माहीत नाही.)एकाएकी भृणाचे हृदयाचे स्पंदने चालू होतात. यामागे कोणाती प्रेरणा असते विज्ञान नेमकेपणाने सांगू शकत नाही. सूर्य का तापतो? हायड्रोजनचे हेलीयम मध्ये रूपांतर होताना...वगैरे वगैरे! पण असे का होते? याला विज्ञानात उत्तर नाही हे मान्य करावेच लागेल लंबुटांगजी!
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 02/02/2016 - 09:37

In reply to ठीक आहे पण का ? पण का? असे by उगा काहितरीच

Permalink

होय...

परंतू विज्ञान म्हणजे जादूची कांडी नव्हे किंवा कुणी ज्ञानी व्यक्ती नव्हे. विज्ञान म्हणजे निसर्गाच्या नियमांचे ज्ञान, त्यातील अद्भुत वाटणार्‍या गोष्टींमागील कार्यकारणभाव. आणि हे ज्ञान मिळवणारी, अद्भुताच्या मागील कार्यकारणाभाव शोधून काढणारी तुमच्या-आमच्या सारखीच माणसेच असतात. त्यांच्या अथक प्रयत्नाने आपल्या हे ज्ञान मिळते. तुम्ही जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आज जरी आपल्याला माहिती नसली तरी ती भविष्यातही मिळू शकणार नाहीत असेही नाही. कदाचित अगदी या क्षणी सुद्धा जगाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात कुणी झपाटलेला माणूस आपल्या प्रयोगशाळेत या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात मग्न असेल. मागील दोन शतकांपासूनचा काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे. आज आपल्याला ज्ञात असलेल्या गोष्टींपैकी किती गोष्टी आपल्या चार-पाच पीढयांपुर्वीच्या पुर्वजांना माहिती होत्या?
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Tue, 02/02/2016 - 11:53

In reply to होय... by सतिश गावडे

Permalink

तुम्ही जे प्रश्न विचारले आहेत

तुम्ही जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आज जरी आपल्याला माहिती नसली तरी ती भविष्यातही मिळू शकणार नाहीत असेही नाही. कदाचित अगदी या क्षणी सुद्धा जगाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात कुणी झपाटलेला माणूस आपल्या प्रयोगशाळेत या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात मग्न असेल.
काय सांगावे कदाचित अजून ५० वर्षांनी एखादा शास्त्रज्ञ देवाचेही अस्तित्व प्रयोगाने सिद्ध करूनही दाखवेल ! ;-) आजच्या घडीला ना आस्तीकांकडेही पूर्ण प्रश्नांची उत्तरे आहेत , ना नास्तीकांकडेही. आता हे तर मान्य करावेच लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 02/02/2016 - 22:46

In reply to तुम्ही जे प्रश्न विचारले आहेत by उगा काहितरीच

Permalink

काय सांगावे कदाचित अजून ५०

काय सांगावे कदाचित अजून ५० वर्षांनी एखादा शास्त्रज्ञ देवाचेही अस्तित्व प्रयोगाने सिद्ध करूनही दाखवेल ! ;-)
असं झालं आणि तोपर्यंत जगलो वाचलो तर आमच्या आत्मबंध गुरुजींकडून मी सत्यनारायण घालेन. :)
आजच्या घडीला ना आस्तीकांकडेही पूर्ण प्रश्नांची उत्तरे आहेत , ना नास्तीकांकडेही. आता हे तर मान्य करावेच लागेल.
हे वरच्याच प्रतिसादात मी मान्य केलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by विजय पुरोहित on Tue, 02/02/2016 - 09:44

In reply to अगागागा. by लंबूटांग

Permalink

@ लंबूटांग

@ लंबूटांग तुम्ही देताय ती उत्तरे "कसे" या स्वरुपाची आहेत तर वि.ठा. विचारताहेत "कशामुळे?" या दोन्हीत सूक्ष्म फरक आहे. वि.ठा. सरांना तो सूक्ष्म फरक अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Tue, 02/02/2016 - 10:39

In reply to @ लंबूटांग by विजय पुरोहित

Permalink

त्यांना नेमका मुद्दाच कळलेला नाही

आणि त्यांनी तितकीच बाळबोध उत्तरं शोधलीयेत : आपला श्वास कशामुळे चालू आहे? याला त्यांनी फिजिकल प्रोसेस काय आहे याची लिंक दिली आहे. मूळात ही फिजिकल प्रोसेस कशामुळे चालू आहे? आपल्या अस्तित्त्वाचं कारण काय ? आपलं हृदय धडकतंय ते कशामुळे? याला How Does the Heart Beat ची लिंक देऊन आणि सूर्य कशामुळे प्रकाशमान आहे? ला, How does the Sun light up? पुन्हा तीच चूक केलीये. प्रश्न प्रोसेसचा नाही, हाऊ नाही..., व्हाय? काय कारण आहे हृदय धडकण्याचं आणि सूर्यप्रकाशमान असण्याचं ? असा काय या अस्तित्त्वावर आपला उपकार आहे की आपण आहोत ? पण शेवटी त्यांच्या लक्षात आलंय : बाकी सूर्याच्या असण्याचे प्रयोजन काय वगैरे प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. पण मग तसे कोणाच्याच किंवा कोणत्याही वस्तूचे असण्याचे प्रयोजन काय? तोच तर खरा सूज्ञ प्रश्न आहे ! या इतक्या रहस्यमय अस्तित्त्वाचं प्रयोजन काय? आपण आत्ता जीवंत आहोत याचं कारण काय ? या दिशेनं विचार केला की माझ्या प्रतिसादाचा आणि प्रयत्नाचा अर्थ कळेल. चालू असलेल्या प्रोसेसचा उलगडा विज्ञान करेल आणि त्याची उपयोगीता आहे. पण मूळात हे सर्व रहस्यमय अस्तित्त्व असण्याचं प्रयोजन काय, याचा उलगडा विज्ञान आणि तर्काच्या पलिकडे आहे. आणि या रहस्यमयतेप्रती उत्सुकता जागृत झाली की मग अस्तित्त्वाच्या दैवत्त्वाचा साक्षात्कार होतो. कृतज्ञता दाटून येते. मग `देव आहे किंवा नाही' असे बाळबोध प्रश्न निव्वळ तर्कानं सोडवून किंवा प्रोसेसचा उलगडा करुन, आपण काही मोठा तीर मारत नाही हा उलगडा होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 02/02/2016 - 10:45

In reply to त्यांना नेमका मुद्दाच कळलेला नाही by विवेक ठाकूर

Permalink

जाउ द्या ठाकूरसाहे, ते

जाउ द्या ठाकूरसाहे, ते घासकडवीसर परत आपली लेखमाला सुरुवातीपासून टाकायला सुरुवात करतील...
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 02/04/2016 - 10:24

In reply to त्यांना नेमका मुद्दाच कळलेला नाही by विवेक ठाकूर

Permalink

या इतक्या रहस्यमय

या इतक्या रहस्यमय अस्तित्त्वाचं प्रयोजन काय? आपण आत्ता जीवंत आहोत याचं कारण काय ? या दिशेनं विचार केला की माझ्या प्रतिसादाचा आणि प्रयत्नाचा अर्थ कळेल. चालू असलेल्या प्रोसेसचा उलगडा विज्ञान करेल आणि त्याची उपयोगीता आहे. पण मूळात हे सर्व रहस्यमय अस्तित्त्व असण्याचं प्रयोजन काय, याचा उलगडा विज्ञान आणि तर्काच्या पलिकडे आहे.
सहमत.
पण मूळात हे सर्व रहस्यमय अस्तित्त्व असण्याचं प्रयोजन काय, याचा उलगडा विज्ञान आणि तर्काच्या पलिकडे आहे. आणि या रहस्यमयतेप्रती उत्सुकता जागृत झाली की मग अस्तित्त्वाच्या दैवत्त्वाचा साक्षात्कार होतो. कृतज्ञता दाटून येते.
जे माहीती नाही त्याला "अस्तित्वाचे दैवत्व" असे तरी लेबल का लावायचे? मग आस्तिकांचा "देव" आणि तुमचे हे "अस्तित्वाचे दैवत्व" यात फरक तरी काय राहीला? हा तुम्ही स्वतःपुरता एक नविनच देव तयार केला आहे असं नाही का वाटत तुम्हाला? आणि जर अस्तित्वाचे प्रयोजनच माहीती नाही तर त्याप्रती कृतज्ञता का वाटावी? वी आर हियर जस्ट बिकॉज वी आर हियर. व्हाय टू बी ग्रेटफूल अबाऊट इट?
मग `देव आहे किंवा नाही' असे बाळबोध प्रश्न निव्वळ तर्कानं सोडवून किंवा प्रोसेसचा उलगडा करुन, आपण काही मोठा तीर मारत नाही हा उलगडा होतो.
हाच युक्तीवाद तुमच्या प्रतिसादांसाठीही लावता येईल. :)
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 02/04/2016 - 11:38

In reply to या इतक्या रहस्यमय by सतिश गावडे

Permalink

मस्त प्रतिसाद, आवडला...!

मस्त प्रतिसाद, आवडला...!
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on गुरुवार, 02/04/2016 - 12:40

In reply to या इतक्या रहस्यमय by सतिश गावडे

Permalink

अस्तित्त्व समोर आहे

त्याला तुम्ही नांव काय देता यानं काही फर्क पडत नाही. आणि जर अस्तित्वाचे प्रयोजनच माहीती नाही तर त्याप्रती कृतज्ञता का वाटावी? वी आर हियर जस्ट बिकॉज वी आर हियर. व्हाय टू बी ग्रेटफूल अबाऊट इट? अतित्त्वाचं प्रयोजन नाही कारण त्याला स्वतःच्या असण्यातून काही साधायचं नाही. इट इटसेल्फ इज इनफ. अस्तित्त्वाचं असणं अमर्याद आहे पण आपण स्वतःच्या अस्तित्त्वाविषयी तसं म्हणू शकत नाही. हा देह केंव्हाही लयाला जाईल, कोणत्याही क्षणी आपला श्वास बंद पडू शकतो. तरीही, आत्ता या क्षणी आपण जीवंत आहोत, अस्तित्त्वा समवेत आहोत. जगायचा आणि उपभोगायचा आनंद घेऊ शकतो याबद्दल कृतज्ञता का नसावी? मग `देव आहे किंवा नाही' असे बाळबोध प्रश्न निव्वळ तर्कानं सोडवून किंवा प्रोसेसचा उलगडा करुन, आपण काही मोठा तीर मारत नाही हा उलगडा होतो....हाच युक्तीवाद तुमच्या प्रतिसादांसाठीही लावता येईल. प्रतिसादाचा अर्थ लक्षात आला तर फरक कळेल. आपलं जीवंत असणं ही इतकी महत्तम घटना आहे की आपण ती गृहितच धरुन जगतो. आपल्या असण्यामागे अस्तित्त्वाचा असलेला उपकार एखाद्या बुद्धालाच जाणवतो, जेंव्हा त्याला कळतं की `अरे, आपला श्वास चालू आहे, काहीही कारण नसतांना चालू आहे!' कृतज्ञतेनं त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहातात. आणि सामान्य माणूस काय करतो? निव्वळ तर्क आणि विज्ञानाची शेखी मिरवत, सगळ्या रहस्याचा उलगडा आज ना उद्या होईल अशा भ्रमात, अस्तित्त्वाची बदलणारी नित्यनूतन नवलाई, ऋतूंचे बदल, पक्ष्यांचे किलबिलाट, हवेची झुळूक, पावसाची रिमझिम, निसर्गानं निर्माण केलेल्या फळांचे स्वाद, त्याच्या अन्नाचा आस्वाद, त्यानं निर्माण केलेल्या सौंदर्यवती ललना, अनंत आकाशात रहस्यमयतेनं विहरणारे कोट्यावधी ग्रहतारे....याचा विस्मयच विसरुन जातो. अस्तित्त्वाच्या या निष्कारण आणि रहस्यमय, आत्ता, या क्षणी समोर असण्याला मी देवत्त्व म्हणतो... नाव काहीही द्या त्यानं फरक पडत नाही. आणि इतक्या प्रत्यक्ष आणि प्रकट असणार्‍या वस्तुस्थितीला आणखी पुरावा काय हवा? श्रद्धा अंधाला ठेवावी लागते, सूज्ञाला फक्त नजर पुरेशी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 02/04/2016 - 14:06

In reply to अस्तित्त्व समोर आहे by विवेक ठाकूर

Permalink

क्या बात विठा सो टकेकी बात

क्या बात विठा सो टकेकी बात
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 02/04/2016 - 14:28

In reply to अस्तित्त्व समोर आहे by विवेक ठाकूर

Permalink

श्रद्धा अंधाला ठेवावी लागते,

श्रद्धा अंधाला ठेवावी लागते, सूज्ञाला फक्त नजर पुरेशी आहे. बास... अचूक. मराठी ग्राफिटीसाठी एक जबरदस्त वाक्य दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on गुरुवार, 02/04/2016 - 22:13

In reply to अस्तित्त्व समोर आहे by विवेक ठाकूर

Permalink

अर्रेच्या!

आणि सामान्य माणूस काय करतो? निव्वळ तर्क आणि विज्ञानाची शेखी मिरवत, सगळ्या रहस्याचा उलगडा आज ना उद्या होईल अशा भ्रमात, अस्तित्त्वाची बदलणारी नित्यनूतन नवलाई, ऋतूंचे बदल, पक्ष्यांचे किलबिलाट, हवेची झुळूक, पावसाची रिमझिम, निसर्गानं निर्माण केलेल्या फळांचे स्वाद, त्याच्या अन्नाचा आस्वाद, त्यानं निर्माण केलेल्या सौंदर्यवती ललना, अनंत आकाशात रहस्यमयतेनं विहरणारे कोट्यावधी ग्रहतारे....याचा विस्मयच विसरुन जातो.
हा निष्कर्ष कसा काय काढलात बुवा? उलट असे म्हणता येईल की तुमच्या युक्तिवादाप्रमाणे पक्षी किलबील का करतात (Why?) ह्यातच गुंतून पडून त्याचा आस्वाद घ्यायचेच विसरायला होईल. सारखे सारखे सगळ्या गोष्टींना why विचारत बसण्यात कसली नवलाई?
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on गुरुवार, 02/04/2016 - 22:58

In reply to अर्रेच्या! by लंबूटांग

Permalink

व्हाय हा तुमचा प्रश्न आहे

विस्मय हे सूज्ञाचं लक्षण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on गुरुवार, 02/04/2016 - 23:42

In reply to व्हाय हा तुमचा प्रश्न आहे by विवेक ठाकूर

Permalink

तुम्हीच वर लिहीले आहे ना

प्रश्न प्रोसेसचा नाही, हाऊ नाही..., व्हाय?
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Fri, 02/05/2016 - 21:35

In reply to तुम्हीच वर लिहीले आहे ना by लंबूटांग

Permalink

व्हाय? हाच विस्मय आहे

प्रोसेस नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 02/04/2016 - 23:39

In reply to अस्तित्त्व समोर आहे by विवेक ठाकूर

Permalink

त्याला तुम्ही नांव काय देता

त्याला तुम्ही नांव काय देता यानं काही फर्क पडत नाही.
ठीक आहे.
अतित्त्वाचं प्रयोजन नाही कारण त्याला स्वतःच्या असण्यातून काही साधायचं नाही. इट इटसेल्फ इज इनफ. अस्तित्त्वाचं असणं अमर्याद आहे पण आपण स्वतःच्या अस्तित्त्वाविषयी तसं म्हणू शकत नाही. हा देह केंव्हाही लयाला जाईल, कोणत्याही क्षणी आपला श्वास बंद पडू शकतो. तरीही, आत्ता या क्षणी आपण जीवंत आहोत, अस्तित्त्वा समवेत आहोत. जगायचा आणि उपभोगायचा आनंद घेऊ शकतो याबद्दल कृतज्ञता का नसावी?
अस्तित्व आणि "स्वतःचं अस्तित्व" या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का? सश्रद्ध जसे परमात्मा आणि आत्मा मानतात तसे? "आपण अस्तित्वासमवेत असतो" असं तुमचं म्हणणं आहे. हे कोणतं अस्तित्व? नुसतंच "अस्तित्व" की "स्वतःचं अस्तित्व"? आणि हे अस्तित्वासोबत (ते कोणतेही असो) असणारे "आपण" कोण?
प्रतिसादाचा अर्थ लक्षात आला तर फरक कळेल. आपलं जीवंत असणं ही इतकी महत्तम घटना आहे की आपण ती गृहितच धरुन जगतो. आपल्या असण्यामागे अस्तित्त्वाचा असलेला उपकार एखाद्या बुद्धालाच जाणवतो, जेंव्हा त्याला कळतं की `अरे, आपला श्वास चालू आहे, काहीही कारण नसतांना चालू आहे!' कृतज्ञतेनं त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहातात.
आपलं जीवंत असणं हा अस्तित्त्वाचा आपल्यावर असलेला उपकार आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तसं असेल तर हे तुमची ही अस्तित्वाची संकल्पना सश्रद्धांच्या देवाच्या संकल्पनेहून वेगळी कशी? त्यांचे जीवन त्यांना देवाने उपकार म्हणून दिलेले असते. तुमचे जीवन तुम्हाला अस्तित्वाने उपकार म्हणून दिलेले आहे असाच याचा अर्थ नाही का?
निव्वळ तर्क आणि विज्ञानाची शेखी मिरवत, सगळ्या रहस्याचा उलगडा आज ना उद्या होईल अशा भ्रमात, अस्तित्त्वाची बदलणारी नित्यनूतन नवलाई, ऋतूंचे बदल, पक्ष्यांचे किलबिलाट, हवेची झुळूक, पावसाची रिमझिम, निसर्गानं निर्माण केलेल्या फळांचे स्वाद, त्याच्या अन्नाचा आस्वाद, त्यानं निर्माण केलेल्या सौंदर्यवती ललना, अनंत आकाशात रहस्यमयतेनं विहरणारे कोट्यावधी ग्रहतारे....याचा विस्मयच विसरुन जातो.
कशावरून हे सारे निसर्गाने "निर्माण केले" आहे? "आहे हे असं आहे" असं म्हणणं जास्त संयुक्तिक नाही का?
अस्तित्त्वाच्या या निष्कारण आणि रहस्यमय, आत्ता, या क्षणी समोर असण्याला मी देवत्त्व म्हणतो... नाव काहीही द्या त्यानं फरक पडत नाही. आणि इतक्या प्रत्यक्ष आणि प्रकट असणार्‍या वस्तुस्थितीला आणखी पुरावा काय हवा?
कसल्या पुराव्याबद्दल बोलत आहात तुम्ही? काही बोध होत नाही.
श्रद्धा अंधाला ठेवावी लागते, सूज्ञाला फक्त नजर पुरेशी आहे.
अप्रत्यक्षपणे तुम्ही सुज्ञ आहात त्यामुळे तुमच्यासाठी तुमची नजर पुरेशी आहे हेच सुचवायचे आहे ना तुम्हाला? :)
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 02/05/2016 - 03:14

In reply to त्याला तुम्ही नांव काय देता by सतिश गावडे

Permalink

आपलं जीवंत असणं हा

आपलं जीवंत असणं हा अस्तित्त्वाचा आपल्यावर असलेला उपकार आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तसं असेल तर हे तुमची ही अस्तित्वाची संकल्पना सश्रद्धांच्या देवाच्या संकल्पनेहून वेगळी कशी? त्यांचे जीवन त्यांना देवाने उपकार म्हणून दिलेले असते. तुमचे जीवन तुम्हाला अस्तित्वाने उपकार म्हणून दिलेले आहे असाच याचा अर्थ नाही का?
सहमत
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 02/02/2016 - 03:43

Permalink

भाष्य करण्याजोगी दोन विधाने

यनावाला, वरवर वाचू जाता तुमच्या लेखात भाष्य करावी अशी दोन विधाने सापडली. अधिकही सापडावीत. पण सध्या ही दोन बघूया. १. >> या ज्ञानसंचयातील नियम,तत्त्वे, विश्वासार्ह असतात. प्रचंड आक्षेप. शाळेत शिकवलेलं सगळं विज्ञान खरं नसतं. हवं असल्यास उदाहरण देऊ शकेन. २. >> देव जर आहे तर आपले अस्तित्व सर्वांना नि:संदिग्धपणे पटेल असा पुरावा तो दाखवत का नाही ? हाच नियम इलेक्ट्रॉनलाही लागू करता येतो. जर इलेक्ट्रॉन अस्तित्वात आहे असं मानलं तर त्याला वस्तुमान आहे. हे वस्तुमान स्थिर इलेक्ट्रॉनचं म्हणून मोजलं जातं. पण व्यवहारात इलेक्ट्रॉन कधीही स्थिर नसतो. मग स्थिरवस्तुमान ही केवळ काल्पनिक संज्ञा नव्हे काय? मग जोसेफ जॉन थॉमसन यांना नोबेल पारितोषिक उगीचंच दिलं का? इलेक्ट्रॉन अस्तित्वात असल्याचा कुठलाही नि:संदिग्ध पुरावा कुणालाही मिळालेला नाही. याचं कारण म्हणजे संदिग्धता हा सृष्टीचा नियम आहे. नेमक्या याच कारणासाठी देव स्वत:च्या अस्तित्वाचा नि:संदिग्ध पुरावा देत नसतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Tue, 02/02/2016 - 07:52

Permalink

इलेक्ट्रॉन

अस्तित्वात असण्याचा पुरावा मिळाला नाही तर तुम्ही दिलेल्या लिंकवरच जो cathode ray tubeचा प्रयोग दिला आहे तो काय? तसेच इलेक्ट्रॉनचं स्थिर वस्तुमान ही जरी काल्पनिक संज्ञा असली तरी तो कोणाच्या कल्पनेतून आलेला नाही तर काही समीकरणे वापरून शोधलेला अंक आहे. असा एक स्थिरांक (constant) आहे ज्यावर पूर्ण भौतिक आणि रासायनिक शास्त्रांचा डोलारा उभा आहे. आणि हा स्थिरांक वापरून बरीच इतर समिकरणे बनवली गेली आहेत ती सिद्ध करण्याजोगी आहेत. देव हा जर का असा स्थिरांक मानला तर मग ह्या संकल्पनेचे तसे सिद्धांत नाहीत जे नेहमीच सारखे रिझल्ट देतील. उदा. तुम्ही १०८ वेळा असे केलेत तर तुम्हाला देव यश देईल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Wed, 02/03/2016 - 03:08

In reply to इलेक्ट्रॉन by लंबूटांग

Permalink

भाकीतेय सृष्टी

लंबूटांग, १. >> देव हा जर का असा स्थिरांक मानला तर मग ह्या संकल्पनेचे तसे सिद्धांत नाहीत जे नेहमीच >> सारखे रिझल्ट देतील. उदा. तुम्ही १०८ वेळा असे केलेत तर तुम्हाला देव यश देईल. आहेत. श्रद्धेने साधना केली तर आत्मतत्त्वाची अनुभूती निश्चितच येते. असंख्य उपासकांनी अनेक वेळा अनुभूती घेतल्या आहेत. एकसमान रिझल्ट न मिळण्याचं कारण म्हणजे कुठल्याही दोन माणसांची मनं वेगवेगळी असतात. साधना हाही एक प्रयोगच आहे आणि तो बाह्य जगावर करण्यासाठी नसून प्रत्येकाने तो स्वत:च्याच शरीर आणि मनावर करायचा आहे. २. >> असा एक स्थिरांक (constant) आहे ज्यावर पूर्ण भौतिक आणि रासायनिक शास्त्रांचा डोलारा उभा आहे. >> आणि हा स्थिरांक वापरून बरीच इतर समिकरणे बनवली गेली आहेत ती सिद्ध करण्याजोगी आहेत. कर्रेक्ट ! म्हणजे इलेक्ट्रॉन नामक कल्पनेच्या सहाय्याने रोखठोक अनुभव आणून देणारं तंत्रज्ञान विकसित करता येतं. अगदी तस्संच आत्मतत्त्व ही एक कल्पना मानून त्यापासून योग, आयुर्वेद, इत्यादि तंत्रे उत्पन्न झाल्याचं प्रत्ययास येतंच की ! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Wed, 02/03/2016 - 07:42

In reply to भाकीतेय सृष्टी by गामा पैलवान

Permalink

ओक्के

मग जर त्याच माणसाने तीच साधना केली तर प्रत्येक वेळेस सारखाच रिझल्ट येतो?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 02/03/2016 - 10:08

In reply to ओक्के by लंबूटांग

Permalink

त्याच माणसाने तेवढीच दारु

त्याच माणसाने तेवढीच दारु प्रत्येक वेळेस घेतली तर सारखीच चढते का?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 02/03/2016 - 10:09

In reply to त्याच माणसाने तेवढीच दारु by संदीप डांगे

Permalink

सॉरी, प्रश्न चुकीच्या धाग्यात

सॉरी, प्रश्न चुकीच्या धाग्यात आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on गुरुवार, 02/04/2016 - 13:03

In reply to त्याच माणसाने तेवढीच दारु by संदीप डांगे

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on गुरुवार, 02/04/2016 - 22:16

In reply to त्याच माणसाने तेवढीच दारु by संदीप डांगे

Permalink

वेल वेल

दारूचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. देवाची साधना शरीर बळकट करण्यासाठी करतात का?
त्याच माणसाने तेवढीच दारु प्रत्येक वेळेस घेतली तर सारखीच चढते का?
उत्तर किती वारंवारितेने घेता यावर अवलंबून असावे. माझ्यासारख्या क्वचितच थोडीशी पिणार्‍याला प्रत्येक वेळेस तिच दारू तेवढ्याच प्रमाणात घेतली तर सारखीच चढते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 02/04/2016 - 13:15

In reply to ओक्के by लंबूटांग

Permalink

हो

लंबूटांग, साधनेचं अंतिम फलित आत्मबोध आहे. जो कोणी साधना करेल त्याला हा रिझल्ट मिळेलंच. हे माझे उद्गार नसून अनेक आत्मप्राप्त माणसांनी काढलेले आहेत. याची अनुभूती घेतलेले शेकड्याने सापडतील. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 02/04/2016 - 09:58

In reply to भाकीतेय सृष्टी by गामा पैलवान

Permalink

श्रद्धेने साधना केली तर

श्रद्धेने साधना केली तर आत्मतत्त्वाची अनुभूती निश्चितच येते. असंख्य उपासकांनी अनेक वेळा अनुभूती घेतल्या आहेत. एकसमान रिझल्ट न मिळण्याचं कारण म्हणजे कुठल्याही दोन माणसांची मनं वेगवेगळी असतात. साधना हाही एक प्रयोगच आहे आणि तो बाह्य जगावर करण्यासाठी नसून प्रत्येकाने तो स्वत:च्याच शरीर आणि मनावर करायचा आहे.
मला काही प्रश्न पडले आहेत. १. आत्मतत्व म्हणजे काय? २. साधना केल्याने आत्मतत्वाची अनुभूती येते म्हणजे नेमेके काय होते? ३. साधना स्वतच्या शरीरावर आणि मनावर करायची असते असं तुमचे म्हणणे आहे. तर साधना करणे म्हणजे नेमके काय करणे? मी रुढार्थाने निरिश्वरवादी असलो तरी श्रद्धेकडे मानवी अनुभव म्हणून पाहतो. त्यामुळे वरील प्रश्न वादासाठी नसून प्रामाणिकपणे उत्तरे मिळवण्यासाठी आहेत. त्यामुळे "त्याची प्रचिती ज्याची त्याने घ्यायची असते" अशा धाटणीची उत्तरे न दिलीत तर उत्तम.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com