Skip to main content

श्री.जपे यांचा युक्तिवाद

लेखक यनावाला यांनी सोमवार, 01/02/2016 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
श्री.जपे यांचा युक्तिवाद आमच्या सहनिवासात (सोसायटीत) जपे आडनावाचे एक कुटुंब राहाते. दोन मुले आणि त्यांचे आई-वडील अशी चार माणसे. आई-वडील नामांकित कंपन्यांत उच्च पदावर. मुलगी बारावीत, मुलगा दहावीत. लगतचे दोन फ्लॅट जोडून केलेला चार बेड रूम आणि मोठा हॉल असा त्यांचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर आहे. सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. चारही माणसे चांगल्या स्वभावाची आहेत. श्रीमंतीचा गर्व नाही. प्रदर्शन नाही. जपे कुटुंब सज्जन, सुसंस्कृत आहे. कुटुंबातील माणसे धार्मिक वृत्तीची आहेत. सगळे सणवार साजरे करतात. कधी सत्यनारायण पूजा असते. होम-हवन तर प्रत्येक महिन्याला असते. सकाळी चार पुरोहित येतात. हॉलमध्ये होमकुंड पेटवतात. मोठमोठ्याने आरोह-अवरोह करीत संस्कृत मंत्र म्हणतात. अग्नीत आहुत्या टाकतात. हे हवन अडीच-तीन तास चालते. दार बंद असते . बाहेरच्या खिडक्या उघड्या असतात. त्यांतून धूर निघून जातो. कुणाला तसा त्रास होत नाही. एका रविवारी वृत्तपत्रात माझा लेख छापून आला. त्यात नास्तिक मत मांडले होते. कालबाह्य रूढी, निरर्थक कर्मकांडे यांवर टीका होती. त्या दिवशी श्री.जपे आमच्या घरी आले. "या! या ! ! बसा. आज इकडे येणे कसे झाले ?" मी स्वागत केले. "आजच्या पेपरात तुमचा लेख छापून आला आहे. तो वाचला." " तुम्हांला न आवडणारे विचार त्यांत आहेत." मी हसत म्हणालो. " लेख चांगला लिहिला आहे. तुमची मते तुम्ही मांडली आहेत. मला विचारायचे होते की आमच्याकडे जे कधी कधी होम-हवन चालते त्याचा तुम्हाला काही त्रास होतो का? तुम्ही सोसायटीच्या कार्यकारी मंडळावर आहात म्हणून विचारले. " "छे! छे! ! मुळीच नाही. त्यात त्रास होण्यासारखे काय आहे? तुमच्या विरुद्ध कोणी कधी तक्रार केलेली नाही. मला वाटते तुमच्याविषयी सर्वांचे चांगले मत आहे." "तुमचा आजचा लेख वाचून मला आपले वाटले." "छे! असा गैरसमज करून घेऊ नका. लेखात यज्ञासारख्या कालबाह्य कर्मकांडावर टीका अवश्य केली आहे. पण त्या लेखाचा तुमच्या होम-हवनाशी काही संबंध नाही. तसे माझ्या मनातही नव्हते. असे लेख मी लिहितच असतो." "ठीक आहे. या संदर्भातील माझ्या शंकेचे निरसन झाले. तुम्हांला राग येणार नसेल तर आणखी एक शंका विचारायची आहे." "राग ? अहो, राग कसला? अवश्य विचारा. काहीही विचारा. मी उत्तर देण्याचा प्रयत्‍न करीन. " "माणसाने सदाचारी, सद्वर्तनी असावे. सत्य बोलावे. कुणाला फसवू नये. अन्याय करू नये. कुणाचा अपमान होईल असे बोलू नये. आपल्या वागण्याने इतरांना त्रास होणार नाही हे पाहावे. हे सर्वमान्य आहे. आस्तिक माणूस असा असू शकत नाही काय ?" "असतात . अनेक आस्तिक असे सज्जन असतात. यांत शंका नाही. तुम्ही तसे एक आहातच." "धन्यवाद ! मग सर्वांनी देव-धर्माचा त्याग करावा. कर्मकांडे करू नयेत. कशावर श्रद्धा ठेवू नये. चिकित्सा करावी. सर्वांनी नास्तिक व्हावे. असा प्रचार का करावा ?आपले विचार दुसर्‍यावर लादण्याचा, त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्‍न का करावा? प्रत्येकाला आपल्या विचारसरणी अनुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे ना?" "हो. तसे घटनादत्त स्वातंत्र्य, किंबहुना अधिकार आहे. याविषयी दुमत नाही. तुम्ही मोजक्या शब्दांत चांगला युक्तिवाद केला. पण असे पाहा, धूम्रपान करण्याचे स्वातंत्र्य (काही नियम पाळून) सर्वांना आहे. असे असता "धूम्रपान करू नये. ते आरोग्याला घातक असते ." असा प्रचार समाजसेवक करतातच ना? किंबहुना शासनसुद्धा करते. ते समाजाचा हितासाठी असते. श्रद्धेमुळे माणसाची अतोनात हानी झाली आहे. होत आहे. अंत्यसंस्कार, बारावे, तेरावे, श्राद्ध अशा कर्मकांडांना किती खर्च येतो ? तो सर्व अनावश्यक असतो. त्याने काही साध्य होत नाही. आता तुमच्याकडे होणार्‍या होम-हवनाचे उदाहरण घेऊ. त्यात हवी म्हणून जाळले जाणारे उपयुक्त पदार्थ वाया जातात. ते सोडा. त्याचे प्रमाण नगण्य असेल. पण तुमच्याकडे कामासाठी चार बाया येतात. त्या हा हवनविधी पाहातात. मंत्रोच्चार ऐकतात. त्यांना वाटते की या साहेबांच्या घरात लक्ष्मी नांदत आहे त्याचे कारण हा होमविधी. आणि हे मंत्र. आपण असे काही केले तर आपल्यावरही लक्ष्मीची कृपा होईल. हा समज त्या वस्तीत सगळीकडे पसरतो. मोठ्या लोकांचे अनुकरण अशी माणसे करतातच. काही जण आपल्या घरात हवनविधी करून घेतात. दोन-चार हजार रुपये वाया घालवतात. ही त्यांच्या कष्टाची कमाई असते. देवा धर्माच्या नावाखाली अनेक जण श्रद्धाळूंना लुटत असतात हे स्पष्ट दिसतेच. आमचा विरोध आहे तो या फसवणुकीला. या लुबाडणुकीमुळे गरीब कुटुंबांची आर्थिक प्रगती होत नाही. त्यामुळे एकूण समाजाची प्रगती खुंटते." "तुम्ही म्हणता त्यात तथ्य असावे असे वाटते. मी यापूर्वी असा विचार कधी केला नव्हता. ऐकला/वाचला नव्हता. " " कल्पना आहे. मी पाहातो की तुम्ही उभयता दिवसभर कामाला जाता. व्यग्र असता. या चक्रात अशा अन्य विषयावर विचार करण्यास तुम्हाला उसंत मिळणे शक्य नाही. हे समजते. आज तुमची जी आर्थिक सुस्थिती आहे त्यामागे तुम्हा दोघांची शैक्षणिक पात्रता, बुद्धिमत्ता, कष्ट, तुमची संयत वागणूक, निर्व्यसनीपणा, ही कारणे आहेत. त्याच्याशी होम-हवनाचा काही संबंध नाही." "आमची देवावर श्रद्धा आहे. लहानपणापासून आहे. परंपरेने चालत आलेले सण-उत्सव आम्ही साजरे करतो. हिच्या माहेरी सत्यनायणाची पूजा बरेचदा होत असे. म्हणून आम्ही करतो. त्यामागे काही ठरलेला हेतू असतो असे नाही. खरे सांगायचे तर होम-हवन करतो ते मुलांच्या भल्यासाठी. त्यांचे आरोग्य चांगले राहावे. सवयी चांगल्या लागाव्या. त्यांनी सद्गुणी व्हावे म्हणून. लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून नव्हे." "तुमची चिंता मी समजू शकतो. पण तुमच्या मुलांना वाईट संगत लागणार नाही. ती सद्वर्तनी होतील. हा आशीर्वाद नव्हे. त्याने काही साधत नाही. केवळ मनाला बरे वाटते. माझ्या विधानामागे आधार आहे. पालकांच्या वर्तणुकीचा परिणाम अपत्यांवर होतोच. घरात मद्यपान होत असेल तर मुले व्यसनी होण्याची शक्यता अधिक असते. पण तुमच्या घरात तसे काही दिसत नाही. म्हणून मुले सद्वर्तनी होण्याचा संभव अधिक आहे. पण त्याचा होम-हवनाशी कांही संबंध नाही. होम-हवन केल्याने मुले सद्गुणी होतील ही तुमची आशावती श्रद्धा आहे. " "आपली चर्चा वेगळ्याच विषयाकडे वळली." "अहो, विषयाला धरून बोलायचे म्हणजे ही काय वादविवाद स्पर्धा आहे का परिसंवाद आहे ? तिथे व्यासपीठावरसुद्धा वक्ते विषय सोडून भरकटतात. हे आपले साधे बोलणे आहे. विषय निघेल तसे बोलायचे. असो. मघाशी तुम्ही म्हणालात की आपले विचार दुसर्‍यावर लादण्याचा प्रयत्‍न का करायचा ? तर तसे नव्हे. माझ्या बुद्धीला जे विचार पटलेले असतात आणि जे लोकांच्या हिताचे आहेत असे प्रामाणिकपणे वाटते ते विचार लेखात मांडतो. त्यांच्या समर्थनार्थ युक्तिवाद लिहितो. लोकांनी ते वाचावे. त्यांच्या बुद्धीला पटेल ते घ्यावे. अशी अपेक्षा असते. त्यात कुणावर काही लादण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा असे लेखात लिहिलेले असते. सर्वसामान्यपणे प्रत्येक माणसाला तर्कबुद्धी असते. बालपणापासून देवा-धर्माविषयी झालेल्या संस्कारांमुळे ती दूषित होते. पूर्व संस्कार प्रयत्‍नपूर्वक बाजूला सारून शुद्ध तर्काने विचार केला तर जे सत्य आहे, वास्तव आहे तेच माणसाला पटेल. असा विश्वास वाटतो." "तुमच्या या विचारसरणीची मला कल्पना नव्हती. " "विवेकवादी विचारसरणी अशीच असते. कोणतेही तत्त्व केवळ वेदांत आहे, पुराणांत आहे, गीतेत भगवंतांच्या मुखी आहे म्हणून ते सत्य असले पाहिजे असे मानू नये. जे बुद्धीला पटेल, आपल्या अनुभवांशी सुसंगत असेल , कॉमनसेन्सला खरे वाटेल तेच सत्य मानावे. तसेच माणसाच्या अधिकृत ज्ञानभांडारातील तत्त्वे नियम खरे मानावे." "माणसाचे अधिकृत ज्ञानभांडार म्हणजे काय ?" " भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, शरीर शास्त्र, आरोग्य शास्त्र, मानववंश शास्त्र, अशा विविध ज्ञानक्षेत्रांतील संशोधकांनी अथक प्रयत्‍न करून अनेक तत्त्वे शोधली. अनेक निसर्गनियम शोधले. ते पुन:पुन्हा तपासले. त्यात वेळोवेळीं सुधारणा केल्या. त्या सत्य नियमांचा, तत्त्वांचा संग्रह म्हणजे मानवी ज्ञानभांडार. त्यात सतत भर पडत असते. ते सर्वांना मुक्तपणे उपलब्ध असते. त्यावर कोणाचा एकाधिकार नसतो. आपण शाळा-कॉलेजांत जे ज्ञान म्हणून शिकतो ते या भांडारातील असते. जगभरातील सर्व अधिकृत शिक्षणसंस्थांत हेच ज्ञान शिकवतात. या ज्ञानसंचयातील नियम,तत्त्वे, विश्वासार्ह असतात." "आता लक्षात आले माझ्या. अद्यापि असा विचारच केला नव्हता. शेवटी एक प्रश्न विचारायचा आहे." "विचारा ना. प्रश्नांची उत्तरे देणे आवडते. इतकी वर्षे शिकवत होतो. तेव्हा अनेक विद्यार्थी प्रश्न विचारायचे. मेंदूत प्रश्न उद्भवणे आणि तो विचारणे ही चांगली गोष्ट आहे." "बहुसंख्य लोक देवाच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवतात. तुमची तशी श्रद्धा का नाही ?" "माझी कशावरच श्रद्धा नाही. अनेक जण देवावर श्रद्धा ठेवतात म्हणून मी ठेवावी असे नाही. ते असो. देवाच्या अस्तित्वाविषयीं सांगायचे तर त्या संदर्भात अनेक प्रश्न मेंदूत उद्भवतात. पण एकाचेही समाधानकारक उत्तर मिळत नाही. म्हणून देवाचे अस्तित्व सत्य मानत नाही. देव जर आहे तर आपले अस्तित्व सर्वांना नि:संदिग्धपणे पटेल असा पुरावा तो दाखवत का नाही ? तो इतका दडून, गुप्त का राहातो ? म्हणजे तो सर्वांना दिसायला हवा असे नव्हे. पण त्याचे अस्तित्व पटावे. त्याच्या ज्या गुणधर्मांचे वर्णन करतात त्यांचा प्रत्यय यावा. तो कधीच कसा येत नाही? देव सर्वज्ञ आहे. सर्वसाक्षी आहे. सर्वसमर्थ आहे. म्हणजे त्याला सर्व समजते. दिसते. तो काहीही करू शकतो. तसेच तो दयाळू आहे. अनाथांचा वाली आहे. न्यायी आहे असे सांगतात. मग:, * देवाच्या समोरील दानपेटी फोडून त्यांतील पैसे कसे चोरता येतात.? * देवाच्या अंगावरील दागिने, मुकुट चोरीला कसे जातात ? * निष्पाप, निरपराध बालिकेवर अत्याचार होतो तेव्हा देव काहीच करू शकत नाही हे कसे? * समाजात अनेक दुराचारी, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक असतात. त्यांचे देव निर्दालन का करत नाही ? मग देव न्यायी कसा? * देवदर्शनाला गेलेले भक्त कधी देवळातील गर्दीत चिरडून कसे मरतात ? देव आपल्या भक्तांना वाचवू शकत नाही हे कसे ? असे अनेक प्रश्न आहेत. पण सर्वांत गहन प्रश्न असा की हे सगळे धडधडीत सत्य दिसते त्यावर काही विचार न करता तुमच्यासारखे उच्चशिक्षित लोक देवाचे असित्व खरे कसे मानतात ? " "मी प्रश्न विचारायला आलो आणि तुम्हीच अनेक प्रश्न उपस्थित केले ! मेंदूत प्रश्न उद्भवले पाहिजेत. त्यांची उत्तरे शोधायला हवीत. हे तुमचे म्हणणे मला पटले. तुमच्या या सर्व प्रश्नांवर विचार करीन. बरे. आता तुमचा अधिक वेळ घेत नाही. येतो. " "अवश्य यावे. आपले सदैव स्वागत आहे." ..........................................................................

वाचने 23759
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

" भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, शरीर शास्त्र, आरोग्य शास्त्र, मानववंश शास्त्र, अशा विविध ज्ञानक्षेत्रांतील संशोधकांनी अथक प्रयत्‍न करून अनेक तत्त्वे शोधली. अनेक निसर्गनियम शोधले. ते पुन:पुन्हा तपासले. त्यात वेळोवेळीं सुधारणा केल्या. त्या सत्य नियमांचा, तत्त्वांचा संग्रह म्हणजे मानवी ज्ञानभांडार. त्यात सतत भर पडत असते. ते सर्वांना मुक्तपणे उपलब्ध असते. त्यावर कोणाचा एकाधिकार नसतो. आपण शाळा-कॉलेजांत जे ज्ञान म्हणून शिकतो ते या भांडारातील असते. जगभरातील सर्व अधिकृत शिक्षणसंस्थांत हेच ज्ञान शिकवतात. या ज्ञानसंचयातील नियम,तत्त्वे, विश्वासार्ह असतात." इतका जरी नीट समजला तरी फार मोठा बदल होइल. गोष्ट छोटी...... डोंगराएवढी.............

चांगला लेख , मला पटला. कर्मकांड करण्याचि जरुरि नाहि , पण मन ताब्यात ठेवण्यासाठि , मानसिक आधारासाठि काहितरि उपाय लागतो त्या साठि श्रद्धा हा एक सोपा उपाय आहे असे वाट्ते .

यनावाला सर, तुम्ही तोंड दाबून बुक्क्यांचा मार देता बुवा!!! म्हणजे कोणाला न डिवचता,सयंत भाषेत,छान छान

हार्दिक आभार सर्वश्री ...प्रचेतस, ...संदीप चंदने, ...रामपुरी, ...सतीश गावडे, ...आत्मबंध, ...नादखुळा, ...पगला पयोधर,...लंबूटांग,...आनंदा,...मारवा,...पलंबर,...यॉर्कर , तसेच ...अजया या सदस्यांनी "जपे...." लेखाला अनुकूल प्रतिसाद दिले आहेत. त्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! अन्य काही सदस्यांचे या लेखाविषयी प्रतिकूल मत आहे. ते त्यांच्या श्रद्धासरणी अनुसार स्वाभाविक आहे. त्याविषयी ना खंत ना खेद. "कोणी निंदा, कोणी वंदा । असे हा लोकहिताचा धंदा ।"

In reply to by यनावाला

:) पगला पयोधर हा शब्द अगदी काळजाला भिडला. :)

In reply to by प्रचेतस

श्री.पगला गजोधर यांचे नाव पगला पयोधर लिहिले ही माझ्या हातून मोठी चूक घडली. श्री.गजोधर यांची क्षमा मागतो. श्री.प्रचेतस यांनी ती चूक निदर्शनाला आणून दिली. त्यांचे आभार.

लेखाला अनुकूल प्रतिसाद दिले आहेत. त्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! अन्य काही सदस्यांचे या लेखाविषयी प्रतिकूल मत आहे. ते त्यांच्या श्रद्धासरणी अनुसार स्वाभाविक आहे. त्याविषयी ना खंत ना खेद. "कोणी निंदा, कोणी वंदा । असे हा लोकहिताचा धंदा ।"
काही सदस्यांचे या लेखाविषयी अनुकूल मत आहे. ते त्यांच्या श्रद्धासरणी अनुसार स्वाभाविक आहे. असे नाही वाटत का?

In reply to by तर्राट जोकर

@ तर्राट जोकर .......... काही सदस्यांनी अनुकूल प्रतिसाद दिले आहेत. ते त्यांच्या विचारसरणी अनुसार स्वाभाविक आहेच. तसेच त्या सदस्यांना धन्यवाद देणे हे सुद्धा स्वाभाविकच आहे..

बाकी यनावालांना मिपाचे "राहुल द्रविड" पुरस्कार द्यावयास काय हरकत आहे? मागचे २-३ महिने ते सलग बॅटिंग करत आहेत. चौकार षटकार न मारता संथपणे २ शतकी ३ शतकी ़हेळ्या केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात यावा असा प्रस्ताव मी मांडत आहे.

डिस्कवरी सारख्या चॅनेलवर पण आता प्रेतआत्मा/भूत वगैरेच्या खर्या घटना(?) दाखवतात,आणि तेही अमेरिकेमधल्या बर का!!! मग प्रेतात्मा असेल तर देवही असणार कि,

बाकी काही म्हणा, यनावाला यांची श्रद्धा वादातीत आहे. ती नास्तिपक्षावर आहे म्हणून त्यांना नास्तिक म्हणायचं. अन्यथा ते कट्टर आस्तिकाहून कोणत्याही प्रकारे कमी नाहीत! श्रद्धा असणं महत्त्वाचं. मग ती अस्तिपक्षावर असो वा नास्तिपक्षावर! कीप इट अप. -गा.पै.

श्री.गामा पैलवान लिहितात,
,"....यनावाला यांची श्रद्धा वादातीत आहे."
"माझी कशावरही श्रद्धा नाही" असे लेखात स्पष्ट म्हटले आहे.ते सत्य आहे. सर्वसाधारण बोलण्यात आपण "श्रद्धा, निष्ठा,विश्वास" हे तीन शब्द सामान्यपणे समानार्थी वापरतो. ते ठीक आहे. पण या तीन भिन्न संकल्पना आहेत. प्रत्येकाचा विशिष्ट अर्थ आहे, असला पाहिजे. श्रद्धा आख्यानात हे अर्थ स्पष्ट करण्याचा यथामती प्रयत्‍न केला आहे. त्यांतील श्रद्धाव्याख्या अशी: ....... "१: श्रद्धेची परिभाषा (व्याख्या) सर्वसमर्थ सर्व व्यापक । संकटमोचक अलौकिक । जगनिर्माता जगच्चालक । देव ऐसे नाम तया ॥१॥ आहे तो हे मानणे सत्य । पूजा-पाठ-प्रार्थना नित्य । करी विघ्नांचे पारिपत्य । जाणावी मूळ श्रद्धा ही ॥२॥ श्रद्धेची परिभाषा परिसा । जे कुठे न दिसे माणसा । जयाचा काही प्रत्यक्षसा । अनुभव न ये कधीही ॥३॥ ज्याच्या सत्यतेची शक्यता । तर्कबुद्धीने शोध घेता । युक्तिवाद काही करिता । निघे निष्कर्ष नकार। ॥४॥ ज्ञानक्षेत्रीं वैज्ञानिकांनी । निसर्गनियम संशोधुनी । पुन:पुन्हा ते तपासोनी । ज्ञानभांडार निर्मियले ॥५॥ मानवी ज्ञानसंचयीं या । नाही स्थान श्रद्धाविषयां । आत्मा-पुनर्जन्म-ब्रह्म-माया । आदि विषय श्रद्धेचे ॥६॥ हे सत्यज्ञानाचे भांडार । यांतील तत्त्वांचा आधार । घेवोनिया केला विचार । तरी बुद्धीस पटेना॥७॥ ऐसे तत्त्व सत्य मानणे । पूर्वसंस्कारांच्या कारणे । ही तर्कहीन वृत्ती जाणे । श्रद्धा नामे प्रसिद्ध ॥८॥ असत्य हे बुद्धीसी कळे । परी भावनेसी न वळे । ते मानणे भावनाबळें । सोपी व्याख्या श्रद्धेची ॥९॥

यनावाला, श्रत् म्हणजे ऐकलेले (वा अनुभवलेले) ते धा म्हणजे धारण करायची शक्ती अशी श्रद्धा या शब्दाची फोड आहे. साहजिकच श्रद्धा ही मनाच्या क्षमतेची निदर्शक आहे. हिचा विश्वासाशी थेट संबंध नाही. विश्वास नसलेले श्रद्धावान असू शकतात. याचं उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. ते नरेंद्र असतांना नास्तिक आणि ब्राह्मोसमाजी होते. मात्र असं असलं तरी देवासंबंधी काही ऐकलं तरी त्यावर मनन चिंतन केल्याखेरीज त्यांना चैन पडंत नसे. थोडक्यात तुम्ही ज्याला श्रद्धा म्हणता त्याला मी विश्वास म्हणतो. फक्त इतकाच फरक आहे. त्यामुळे तुमची नास्तिपक्षावरची श्रद्धा (= मनोक्षमता) तशीच राहू द्यावी. आ.न., -गा.पै.