घमघम घमघम
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
येश्या आजपन त्या मॉलच्या फाटकासमोर हुबा ह्रायला. गेले कितीतरी दिस त्यो रोज असा थितं थांबयचा.पन आजचा दिस येगळा व्हता. त्याच्या छातीतले ठोके व्हाडले हुते. हातपाय थरथरू लागले हुते.
येश्या एका झोपडपट्टीत ह्रायचा. आय आन् बा संगं. आय, बा बांधकामावर मजुरी करायचे. येश्या वस्तीतल्या इतर पोरांबरुबर ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागायचा.
त्यादिवशी सिग्नलला आशीच येक गाडी थांबली हुती. येश्या पैकं मिळण्याच्या आशेनं गाडी पुसू लागला. सिग्नल सुटता सुटता गाडीची काच खाली झाली. कसलातरी घमघमाट येश्याच्या नाकात शिरला. तेवढ्यात खिडकीतून भायेर आलेल्या हातानं त्येला धा रुपयाची नोट दिली आन् गाडी भुर्कन् निघून ग्येली.येश्या पार चक्रावला. कसला तो वास! घमघम घमघम ! जसं काही हज्जार गुलाब तोडून बनिवला हुता. त्येच्या हातातल्या नोटेलाही तोच वास येत हुता. त्येन पुन्ना पुन्ना त्यो वास घ्येतला.
त्यानंतर कितीतरी दिस त्योच वास त्येच्या नाकात भरुन ह्रायला हुता. "आरं शिर्मंत मानसं आंगाला आत्तर लावत्यात. त्या मॉलमंदी भेटतं." त्येच्या सौंगड्यांनी त्येला सांगितलं हुतं. "केल्विन क्लाईन आसतं त्ये. एक हज्जार रुपयाची येवढीशी कुपी येतीया." कुनीतरी त्येला ह्ये ज्ञान बी दिलं हुतं.
बास्.. यकदातरी या आत्तराची बाटली आपुन घेयाची. त्येच्या मनानी घेतला. "आरं येडा का खुळा तू! आत्तर घिऊन काय करनार?" "आरं आसंच रं..फक्तं यकदा आपलं आंगं आसं घमघम घमघम कराया पायजे." "आन् पैकं कुटुन आननार?"
येश्या हिशेब करु लागला.आयशीकडं पैकं मागनं शक्यच न्हवतं. रोजच्या भिकेतून त्योच तर तिला ५० रुपये द्याचा. आन् उरलेल्या पाच-धा रुपयांचा भजी-पाव चहा खायचा त्येच्या मित्रांबरुबर. " ठरलं. आजपासून भजी-पाव बन्द! मंग रोजचे वाचले ५ रूपये. म्हैन्याचे झाले दीडशे..तरी सा-आठ म्हैनं लागतीलंच एक हजार जमवायला."
त्या दिसापासून त्यानं सौंगड्यांबरुबर भजी-पाव खाणं बंद क्येलं. सगळ्यांनी त्येला येड्यात काडलं. "यडा झाला का भौ! काय खूळ डुक्यात घिऊन बसलाय."
पन येश्याचं ठरलं हुतं. त्यो रोज त्या मॉलच्या भायेर जाऊन हुबा ह्रायचा. सा म्हैन्यांनी तो आत जानार हुता आन् ते केल्विन क्लाईन आत्तर घेनार हुता. नुसतं घमघम घमघम..
आज त्यो दिस आल हुता. पैैकापैका जमवून १००० चे बंदे करून नोट आनली हुती. सकाळीच त्यानं नळावरती स्वच्छं आंघोळ केली. त्येच्याकडचा ब्येस शर्ट घातला. केस इंचरले आन् निघाला. "कुनाच्या लग्नाला निघाला रं भौ?" मित्र हासत हुते. पन येश्याचं लक्ष आज कुनीकडच न्हवतं.
थोडं धावत थोडं चालत त्यो मॉलपाशी आला. गेले सा म्हैनं त्यो थितं यायचा. कुनाला समजनार न्हाई आसं पाहून आत कुटनं सटकायचं त्ये त्यानं पाहून ठिवलं हुतं. येवडासा तर हुता त्यो. यका घोळक्यातून हळूच आत शिरला.
आत गेल्याबरुबर तरंगायलाच लागला.आतली गारगार हवा..गुळगुळीत फरशी..सटकनारच हुता..पटकन्. हाताला कायतरी लागलं त्ये पकडून ठिवलं. ती एका बाईंची पर्स हुती. "कुठून कुठून येतात" आसं कायतरी पुटपुटत त्या निगुन गेल्या. पन येश्याचं कुटं लक्षच न्हवतं.
आसं काही त्यानं कदी पह्यलच न्हवतं. फिरत फिरत तो आत्तरांच्या ठिकानी आला. फुडं काय करावं सुचंना तसं उगाच हिकडं-तिकडं करायला लागला.
तेवड्यात मागनं आवाज आला "माझ्या पर्समधले हजार रुपये कुठे गेले? आत्ता तर मी ती नोट पाहिली होती." त्याच मगाच्या बाई..त्यांनीही येश्याकडे पाह्यलं. "यानंच चोरली. पकडा याला." येश्या घाबरुन पळाया लागला. दोघाचौघांनी त्येला पकडलं आन् त्येच्या खिशात हात घातला. एक हजार रुपये.."माजं हायेत त्ये" "तुज्याकडं कुटुन आले रं xxxxच्या.." येकानी त्येला कानाखाली ठिऊन दिली आन् त्येला धरुन मॉलच्या भायेर हाकलून दिलं.
येकदम येश्याच्या चेहय्रावर हासू पसरलं. आतमदी झटापटीत पळताना कुनाचा तरी धक्का लागून केल्विन क्लाईनची एक बाटली फुटलेली आन् त्येच्या आंगावर सांडली हुती. आंगं नुसतं घमघम घमघम करत हुतं आन् येश्याच्या चेहय्रावरचं हासू काही लपत न्हवतं.
प्रतिक्रिया
मस्त
काळं पांढरं.......किती किती
:)
चांगला प्रयत्न !