✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग ४)

A
Anand More यांनी
Wed, 01/06/2016 - 11:48  ·  लेख
लेख
भाग १ भाग २ भाग ३ ______________________________________________________________________________________ जेंव्हा जेंव्हा मी जी एंची ऑर्फिअस वाचतो, तेंव्हा तेंव्हा मला त्यातून काहीतरी नवीन सापडल्यासारखे वाटते. आता वाचत असताना जाणवले की आपण सगळे ऑर्फिअस आणि युरीडीसीचे अवतार आहोत. आणि थोड्या फार प्रमाणात प्लुटो व पर्सिफोनचे देखील. इथे एक लक्षात ठेवायचे की कुणीही कायमचा एक अवतार म्हणून जन्माला येत नाही. आपण ह्या सगळ्या भूमिका आपल्याच नकळत आलटून पालटून घेत असतो. किंवा अजून सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आपण झाड असतो आणि वेगवेगळ्या वेळी ऑर्फिअस, युरीडीसी, प्लुटो आणि पर्सिफोनचे गुणावगुण आपल्याला पकडत असतात, आपल्या अंगात येतात, आपल्याला पछाडून टाकतात. आजकालच्या शहरी जगात जिथे प्रेमविवाह फार मोठ्या प्रमाणात होतात, कुटुंबाचा आकार फार छोटा असतो आणि नवरा बायको पैसा कमाविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत असतात, तिथे घरोघरी अनेक ऑर्फिअस आणि अनेक युरीडीसी वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या वेळी घेत असतात. सारखे एकमेकांच्या पुढे मागे होत असतात. कधी कधी एखादा जोडीदार आयुष्याच्या प्रचंड गतीमध्ये पुढे पुढेच जात राहतो आणि त्याचा जोडीदार मात्र त्या वेळी ते अनुभव घेऊ न शकल्याने मागे राहतो. मग केवळ शरीराने जिवंत म्हणून आणि कायद्याने नाते तोडता येत नाही म्हणून असा प्रत्येक ऑर्फिअस आणि प्रत्येक युरीडीसी, पुढे गेलेल्याची घुसमट आणि मागे राहिलेल्याची ओढाताण सहन करीत राहतात. असा विचार करीत असताना मला एकदम जाणवलं की आपण तर ऑर्फिअस आणि युरीडीसीने न जगलेले जीवन जगत आहोत. जी एंची युरीडीसी म्हणते त्याप्रमाणे मृत्यू हा एक असा बिंदू आहे की जो एकदा ओलांडला की पुन्हा मागे फिरता येत नाही. ती एक बिंदू ओलांडते आणि मग तिची आणि ऑर्फिअसची कायमची ताटातूट होते. पुन्हा संधी मिळूनही ते दोघे तिचा वापर करीत नाहीत. त्यांचे सहजीवन अपूर्ण राहते. ते प्रत्यक्षाच्या पातळीवर येतच नाही आणि त्यांची झाकली मूठ सव्वा लाखाची बनून अजरामर प्रेमकथा बनते. युरीडीसीने केलेली, 'ओलांडून परत न येत येण्यासारखा बिंदू' अशी मृत्यूची व्याख्या मान्य केली तर प्रत्येक अनुभव एकदा घेऊन झाला की त्या अनुभावापुरते आपण मृत झालेलो असतो हे देखील मान्य करावे लागेल. आणि मग प्रत्येक अनुभवानंतर न येणारा शारीरिक मृत्यू, आपल्याला सहजीवनाची, ऑर्फिअस आणि युरीडीसीने नाकारलेली संधी पुन्हा पुन्हा देत असल्याने, आपल्या आयुष्याच्या कथेला जी एंच्या ऑर्फिअसच्या कथेचे परिमाण लागू होत नाही हे देखील मान्य करायला सोपे जाईल. आपले सहजीवन प्रत्यक्षाच्या पातळीवर येत असल्याने आपली मूठ झाकलेली राहत नाही. त्यामुळे प्रेमामुळे असो किंवा रीतीप्रमाणे ठरवून, आपल्या जीवनातून प्रेमाने काढता पाय कधी घेतला ते आपल्याला कळत नाही. कयामत से कयामत तक चा उल्लेख केला होता मी या लेखमालेच्या दुसऱ्या भागात, त्याच्यावरून मग सगळ्या गाजलेल्या प्रेमपटांच्या कथा आठवल्या. एक दुजे के लिये वगैरे. मग प्रेमाच्या गाजलेल्या गोष्टी आठवल्या. हीर रांझा, शिरीन फरहाद, लैला मजनू, सलीम अनारकली वगैरे. अगदी आपल्या राधा कृष्णाची देखील. मग आठवल्या दोन कविता. एक कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत आणि दुसरी गोविंदाग्रजांची प्रेम आणि मरण. पहिलीत मनाने वरलेला प्रियकर आणि प्रेमगीत म्हणणारी प्रेयसी जिवंत रहातात पण भेटत नाहीत. आपापल्या कक्षेत फिरत राहतात. थोडेफार राधा कृष्णासारखे तर दुसऱ्या कवितेत ज्या क्षणी निग्रही प्रियकराला त्याची प्रेयसी भेटते त्याक्षणी त्याचा मृत्यू होतो. या सगळ्या चित्रपटात, प्रेमकथात, प्रेमकवितेत सूत्र एकच. या सगळ्या झाकल्या मुठी आहेत. सातत्याचे सहजीवन न जगता, केवळ एका क्षणाचे गुणगान करून प्रेमाची महती गाणाऱ्या रचना आहेत हे जाणवले. इतकेच काय पण राधा कृष्णाच्या जोडीतील, कृष्ण ज्यांच्याबरोबर सातत्य असलेले सहजीवन जगला त्या रुक्मिणी, सत्यभामा, जाम्बवती, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा या अष्टभार्यांपैकी एकीचेही सहजीवन आदर्श प्रेम म्हणून गायले जात नाही. म्हणजे जेंव्हा भगवंतांची झाकली मूठ उघडते तेंव्हा ती देखील प्रत्येक वेळी सव्वा लाखाची नसते हेच सिद्ध होते. विचारांची गाडी इथपर्यंत आल्यावर एकदम आठवली कुसुमाग्रजांची अजून एक कविता “प्रेम कुणावर करावं ?” एक गोष्ट जाणवली की भलेही यात कुसुमाग्रजांनी भिन्न गोष्टींवर प्रेम करायला सुचवलं असलं तरीही त्यांनी जितक्या स्पष्ट शब्दात सर्व पर्याय सुचवले आहेत तितक्या स्पष्ट शब्दात नवरा बायकोच्या नात्याचा, भारतीय संस्कृतीप्रमाणे सात जन्माच्या जोडीदारांचा, पर्याय सुचवलेला नाही आहे. त्यांनी सुचवलेले सर्व पर्याय हे मानवी आयुष्यातील विविध घटना, भावना किंवा त्यांचे प्रतीक असलेल्या व्यक्ती आहेत. खरं तर त्यांनी सांगितलेल्या अनेक पर्यायांना "वात्सल्य, अभिलाषा, आकर्षण, आदर, सहानुभूती, आत्मानुभव, कर्तव्य" अशी प्रेमापेक्षा अधिक समर्पक विशेषणे आहेत. पण कुसुमाग्रजांना कवितेतून व्यक्त करायचे होते ते आयुष्यावरचे प्रेम. त्यांच्या दृष्टीने प्रेम म्हणजे प्रचंड मोठा इतिहास असणाऱ्या संस्कृतीरूपी वाहनाला भविष्याकडे नेणारे इंधन, म्हणून त्यांनी आयुष्यातील मान-अपमान, आशा-निराशा, मैत्री-शत्रुत्व, जय-पराजय या सर्वांवर प्रेम करायला सुचवलंय. पण त्यात संस्कृतीचा सर्वात लहान एकक म्हणजे कुटुंब आणि त्यातील नवरा बायकोचे नाते, लग्न ही घटना आणि त्यानंतर येणारा संसार याचा कुठेही उल्लेख नाही. कदाचित कुसुमाग्रजांनादेखील या नात्यात होणाऱ्या प्रेमाच्या ओढाताणीची कल्पना आली असावी. मागे राहिलेल्या ऑर्फिअसचे आणि पुढे गेलेल्या युरीडीसीचे पण तरीही एकत्र राहाव्या लागणाऱ्या या जोडीचे दु:ख्ख त्यांना जाणवले असावे, म्हणून त्यांनी स्पष्ट शब्दात, प्रेम नवऱ्यावर करावं प्रेम बायकोवर करावं, असं सांगून आपल्यावर ही जबाबदारी टाकली नसावी. मग करायचे काय? प्रेमाचा भास होणारे पण त्याने आपल्या सहजीवनातून काढता पाय कधी घेतला ते न कळल्याने उरलेले रखरखीत सहजीवन तसेच जगत रहावे का? की दुसरा काही उपाय आहे? त्याचे उत्तर पण जी एंनी ऑर्फिअसच्या कथेत देऊन ठेवले आहे असे मला वाटते. "आपल्या मर्यादा ओळखणे याला कदाचित ज्ञान देखील म्हणता येईल" असे जी ए प्लुटोच्या तोंडून आपल्याला सांगतात. प्रत्येक अनुभवानंतर शारीरिक मृत्यू न येणे आणि एकाच जीवनात अनेक अनेक अनुभव जोडीदारापेक्षा वेगळ्या वेळी घ्यावे लागणे, सातत्य असलेले सहजीवन जगायला लागणे हीच आपली मर्यादा आहे याचे एकदा ज्ञान झाले की अश्या सहजीवनातून काढता पाय घेणाऱ्या प्रेमाला थांबवणे आपल्याला कदाचित थोडे सोपे जाईल. एक तर सहजीवनातील जोडीदाराला आपल्या बरोबर प्रत्येक अनुभवात सामील करून घ्यावे आणि ते शक्य नसेल तर वाट पाहण्यास तयार व्हावे, इतकेच आपण करू शकतो. दोन कनेक्टिंग ट्रेन मध्ये किंवा विमानाच्या फ्लाईटमध्ये जर अंतर असेल तर आपण मनाची तयारी करून तो मधला वेळ चांगला जावा म्हणून आधीच आवडते पुस्तक किंवा गेम किंवा अजून काहीतरी घेऊन ठेवतो आणि वाट पाहण्याचा आपला वेळ सुसह्य करतो तसेच काहीसे केल्यास जोडीदार त्याच्या स्वतःच्या वेगाने येत असताना आपला खोळंबा होतोय अशी भावना फार जाणवणार नाही. कधी कधी पुढील गाडी किंवा विमान यायचे जास्त लांबते हे खरे आहे पण मी आशावादी आहे की, मागे राहिलेल्या जोडीदाराला त्याच्या अंगात आलेल्या ऑर्फिअसच्या भूमिकेचे भान असेल आणि तो आपला वेग वाढवण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि पुढे गेलेली युरीडीसी त्याला या प्रयत्नात घाई न करता मदत करेल. युरीडीसी शारीरिक मृत्यूचा अनुभव घेते. म्हणून तो त्याच वेळी अनुभवणे ऑर्फिअसला शक्य नसते. आपल्या सहजीवनात आपण रोजच्या रोज शारीरिक मृत्यूचा अनुभव घेत नसून इतर अनुभव आपल्या जोडीदाराच्या आधी घेत असतो. हे अनुभव आपल्या मेंदूत नोंदले जातात आणि मग आपण ते व्यक्त करायला विसरतो, कंटाळतो किंवा असमर्थ असतो. त्यामुळे दोघांमधील अंतर वाढत जाते. परंतु आपण सध्या ज्या जगात राहतो त्या जगात विज्ञानाने, अनुभव मेंदूबाहेर पकडून ठेवण्यासाठी फोटो, व्हिडीओ सारखी अनेक साधने उपलब्ध करून दिली आहेत. त्याशिवाय, संपर्काच्या साधनांच्या आधारे हे पकडून ठेवलेले अनुभव आपण जवळपास त्याच क्षणी आपल्या जोडीदाराबरोबर शेअर करू शकतो आणि त्याचा आपल्या बरोबर राहण्याचा वेग वाढवू शकतो. याशिवाय संवाद तुटू न देणे ही जबाबदारी आपल्याला सजगपणे सांभाळावी लागेल. तर ही उघडलेली मूठ देखील सव्वा लाखाची ठरू शकेल. जसे जोडीदाराच्या बाबतीत आपण ऑर्फिअस किंवा युरीडीसी असतो तसेच, आपल्या मुलांच्या बाबतीत आपण प्लुटो असतो. जसा प्लुटो आपल्या आयुष्यातील मागे घडलेली घटना ऑर्फिअसच्या आयुष्यात घडवण्याचा प्रयत्न करतो. तसेच आपण देखील आपल्या आयुष्यातील पूर्ण न होऊ शकलेल्या शक्यता आपल्या मुलांच्या आयुष्यात घडवण्याच्या प्रयत्न करतो. छोटे कुटुंब सुखी कुटुंबच्या आपल्या जगात प्रत्येक कुटुंबात मुले कमी आणि त्यांच्या भविष्याच्या शक्यता अनंत आहेत. त्यामुळे आपण "मेरे बाद भी इस दुनिया में जिंदा मेरा नाम रहेगा, जो भी तुझको देखेगा तुझे मेरा लाल कहेगा" हे गाणे नकळत कायम आचरणात आणत असतो. पण एक गोष्ट विसरतो की प्लुटो ऑर्फिअस आणि युरीडीसीला निवडीचे स्वातंत्र्य देतो. आपला निर्णय त्यांच्यावर लादत नाही आणि त्यानी त्यांची निवड केल्यावर ती योग्य की अयोग्य यावर भाष्य न करता त्यांना त्यांचे सुखद किंवा दु:ख्खद परिणाम भोगायला मोकळे करतो. हे प्लुटोच्या भूमिकेतल्या आपल्याला कायम लक्षात ठेवायला हवे. त्याचवेळी, मुलांनी पूर्ण विचारांती घेतलेला निर्णय अयोग्य आहे असे म्हणणारी पर्सिफोन जर आपल्या अंगात आली तर तिला शांत करायची जबाबदारी देखील आपल्यावरच असते. मला वाटते प्लुटो आणि पर्सिफोनचे हे रूपक नोकरी व्यवसायातील कनिष्ठ किंवा नव्याने रुजू झालेले सहकारी या सगळ्यांच्या बाबतीत किंवा सासू-सासरे आणि सून-जावई यांच्या बाबतीत देखील तितकेच चपखल बसेल. या लेखमालेच्या सुरवातीच्या दोन भागात मी ऑर्फिअसची कथा आणि तिचे प्रचलित साहित्यातील इतरांनी लावलेले अर्थ लिहिले. तिसऱ्या भागात जी एंनी त्या कथेचा केलेला विस्तार आणि तिची मला लागलेली लागलेली संगती लिहिली. आणि या चौथ्या आणि अंतिम भागात जी एंच्या या मनोहारी रांगोळीचे आपल्या जीवनाशी साधर्म्य नसून देखील आपल्याला ती कशी मार्गदर्शन करते ते लिहिले. पण मला कल्पना आहे की हे माझे आजचे आकलन आहे. आणि ते अपूर्ण आहे. आयुष्याचे अजून जितके नवीन अनुभव घेईन तितके माझे आकलन अजून पूर्णत्वाला जाईल. पण, ‘जे आहे ते अपूर्ण असून ते अंतिम ज्ञान नव्हे’ हे मला कळले आहे, हेच जणू मला आता प्लुटोच्या विचाराने पछाडले असल्याचे लक्षण आहे. तुम्हाला जेंव्हा तुमचा ऑर्फिअस किंवा युरीडीसी किंवा प्लुटो किंवा पर्सिफोन पछाडेल तेंव्हा तुम्ही सजग असावे आणि त्या विचाराचा आनंद लुटावा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि जी एंनी मला या कथेतून जे दिले ते तुमच्यापर्यंत शब्दातून पोहोचवण्याचा माझा प्रयत्न थांबवतो. (समाप्त)

Book traversal links for ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग ४)

  • ‹ ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग ३)
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
साहित्यिक
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
लेख
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
5552 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

अप्रतिम.

अजया
Wed, 01/06/2016 - 12:09 नवीन
या मालिकेला स्टँड अोवेशन दिल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments

मन:पूर्वक धन्यवाद :-)

Anand More
Wed, 01/06/2016 - 12:13 नवीन
मन:पूर्वक धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

जबरी समारोप

गामा पैलवान
Wed, 01/06/2016 - 19:35 नवीन
आनंद मोरे, मालिका आवडली. विशेषत: जो समारोपाचा परिच्छेद आहे, तो खासकरून आवडला. प्रेम कोणावर करावं हा प्रश्नच आहे. कुणावरही करा, पण स्वत:वर करायला विसरू नका. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ते आ.

Anand More
Wed, 01/06/2016 - 19:42 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ते आ. न. म्हणजे (आपला नम्र ) असे काही आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

आ.न. = आपला नम्र

गामा पैलवान
गुरुवार, 01/07/2016 - 13:48 नवीन
आनंद मोरे, हो, आ.न. = आपला नम्र ! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

चांगलं लिहिलंय

पैसा
Wed, 01/06/2016 - 20:10 नवीन
चांगलं लिहिलंय. मला ऑर्फियस आणि युरिडिसचा जास्त भावलेला अर्थ म्हणजे प्रत्येकजण सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकटाच असतो. आपापले अनुभव आपणच घ्यायचे असतात.
  • Log in or register to post comments

आनंद जी

मारवा
Wed, 01/06/2016 - 20:18 नवीन
एक आक्षेप आहे तुमच्या लेखनावर जसा विलास सारंग एकुण मराठी साहीत्या संदर्भात नोंदवतांना म्हणतात मराठी साहीत्य हे "घरगुती" स्वरुपाचे आहे. त्याला चपखल उदाहरण ते देतात पु.ल. देशपांडे यांनी हेमिंग्वे ला देखील "एका कोळीयाने " लिहुन घरगुती खेळकर करुन टाकला. तसेच तुम्ही देखील जी.ए. ना वरील लेखातुन त्यांच्या उत्तुंग प्रतिभेच्या अविष्काराला "घरगुती" पातळीवर आणुन टाकले. असो.
  • Log in or register to post comments

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

Anand More
Wed, 01/06/2016 - 20:45 नवीन
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. विलास सारंग मोठे आहेत... आणि पुल महान आहेत... पुलंच्या प्रतिभेने हेमिंग्वे घरगुती होणे शक्य असेल पण मी जी एंना घरगुती करण्याइतपत प्रतिभा बाळगतो असे स्वप्न देखील मला पडू शकत नाही... आजच्या लेखात मी आॅर्फिअस ची कथा आपल्या घरगुती जीवनाला परिमाण म्हणून वापरली तर ते चूक ठरेल असेच म्हटले आहे... त्यामुळे जी एंचे घरगुतीकरण होत नाही असेच मला वाटते...
  • Log in or register to post comments

चारही भाग अगदी अप्रतिम झालेत

उगा काहितरीच
Wed, 01/06/2016 - 21:09 नवीन
चारही भाग अगदी अप्रतिम झालेत , अगदी मनापासून आवडले. वर मारवा यांनी घरगुतीकरण वगैरे म्हटले , ते त्यांचे वैयक्तिक मत ! जीए म्हणजे समुद्र ! कुणाला काठावर बसून रहा वाटते तर कुणाला त्यात खोल डुबकी मारावीसी वाटते. लेखकाला जशी ही कथा भावली तशी त्यांनी आपल्यापर्यंत पोचवली . आनंदभाऊ लिहीत रहा असेच !
  • Log in or register to post comments

घरगुतीकरण म्हणजे समुद्रातले जलमार्ग ....

गामा पैलवान
गुरुवार, 01/07/2016 - 13:55 नवीन
उका, तुम्ही जीएंना समुद्र म्हणालात ती चपखल उपमा आहे. तर त्याच धर्तीवर घरगुतीकरण म्हणजे त्यातले जलमार्ग असावेत. हे समुद्रात कसा संचार करावा ते समजावून सांगतात. मला प्रस्तुत मालिका 'जीए कसे वाचावे' अशी वाटते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

.

लॉरी टांगटूंगकर
Wed, 01/06/2016 - 22:15 नवीन
साहेब, लिहीत रहा.. संपूर्ण मालिका अप्रतिम झाली आहे.
  • Log in or register to post comments

.

लॉरी टांगटूंगकर
Wed, 01/06/2016 - 22:15 नवीन
साहेब, लिहीत रहा.. संपूर्ण मालिका अप्रतिम झाली आहे.
  • Log in or register to post comments

लेख तर सुंदर आहेच!

बोका-ए-आझम
गुरुवार, 01/07/2016 - 00:53 नवीन
यात तुम्ही व्यक्त केलेल्या प्रेमाच्या संकल्पनेपेक्षा माझ्या मनातली संकल्पना वेगळी असूनही मला हा लेख आवडला. मला स्वतःला प्रेम आणि भक्ती या भावना भीती या अत्यंत मूलभूत भावनेतून (basic instinct) स्फुरलेल्या किंवा विकसित झालेल्या अशा वाटतात.
  • Log in or register to post comments

कौतुकाबद्दल धन्यवाद. तुमच्या

Anand More
गुरुवार, 01/07/2016 - 14:54 नवीन
कौतुकाबद्दल धन्यवाद. तुमच्या कमेंटचा विस्तार केलात तर थोडी अजून कळेल. कधी कधी वाटतं, आपण खरं प्रेम फक्त स्वतःवरच करतो, बाकी सगळे इतरांच्या दृष्टीने प्रेम असलेले आपले अविष्कार म्हणजे खरे तर, वात्सल्य, आकर्षण, निष्ठा, सहानुभूती, संवेदना, कणव याच भावना असतात. आणि जेंव्हा प्रेम आणि भीती या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करतो तेंव्हा, प्रेम म्हणजे परिस्थितीचा स्वीकार आणि भीती म्हणजे परिस्थितीला नकार असे चित्र नजरेसमोर येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

भिती बेसिक इंस्टिंक्ट आहेच पण

अजया
गुरुवार, 01/07/2016 - 16:05 नवीन
भिती बेसिक इंस्टिंक्ट आहेच पण दरवेळी प्रेम भितीतूनच विकसित झालेले किंवा स्फुरलेले असेल असं का वाटतं बुवा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

झकास

स्पा
गुरुवार, 01/07/2016 - 14:06 नवीन
मस्तच लेखमाला आवडली, अजून लिहित राहा
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेखमाला!!

मोहनराव
गुरुवार, 01/07/2016 - 18:52 नवीन
अप्रतिम लेखमाला!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम, आनंद!

सतीश कुडतरकर
Mon, 02/08/2016 - 17:17 नवीन
अप्रतिम, आनंद! मी जीए अद्यापही वाचलेले नाहीत. तुमच्या मालिकेमुळे उत्सुकता चाळवली आहे आणि वाचण्याचा प्रयत्न नक्की करीन.
  • Log in or register to post comments

धन्यवाद... तुम्ही जीए नक्की

Anand More
Mon, 02/08/2016 - 20:10 नवीन
धन्यवाद... तुम्ही जीए नक्की वाचा... तो एक वेगळा अनुभव आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा