Skip to main content

भन्साळीचा बाजीराव मस्तानी

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 21/12/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
भन्साळीच्या बाजीराव मस्तानी ह्या सिनेमाबद्दल बराच गदारोळ, ह्या सिनेमाचे 'पिंगा' हे गाणे रिलीज झाल्यावर, झाला होता. आंतरजालावर आणि सोशल मीडियावर तर वादळच उठले होते.पेशवेकुलीन स्त्रियांचे आणि एकंदरच इतिहासाचे विकृतीकरण केले गेले असल्याच्या वावड्या उडल्या होत्या किंवा उडवल्या गेल्या होत्या. टीव्हीवर तथाकथित 'मान्यवर, अभ्यासक, इतिहास संशोधक' यांना बोलावून चर्चासत्रांचे रतीब घातले गेले होते. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडणार (पुण्या-मुंबईत) हे निश्चित होते. तसे झालेही. बऱ्याच व्हॉॅटसअॅप ग्रुप्सवर सिनेमावर बहिष्कार टाका अशा आवाहनांचेही रतीब चालू होते. ह्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून, काल 'बाजीराव-मस्तानी' पाहिला. प्रचंड आवडला! काय आवडले? तर, पहिला बाजीराव, राऊ म्हणून, मनापासून आणि बेहद्द आवडला. पहिल्या बाजीरावाबद्दल, तो एक जिगरबाज आणि अपराजित लढवय्या जो मोहिमेवर असताना घोड्यावरच कणसे तळहातावर मळून खायचा असे आणि मस्तानी ही यवनी पदरी बाळगून असलेला अशी प्रतिमा माझ्या मनात लहानपणापासून होती. सलग ४० लढाया जिंकणारा बाजीराव हा रांगडा आणि धडाडीने निर्णय घेणाराच असावा असे मनापासून वाटायचे. त्या प्रतिमेला नुसतेच मूर्त रूप भन्साळीने दिले नाहीयेय तर बाजीराव कसा 'पुरोगामी' होता हे ही त्याच्या व्यक्तीरेखाटनातून सार्थ उभे केले आहे. काही काही वेळा राऊ काहीसा बेफिकीर, आततायी आणि भडक वाटण्याची शक्यता आहे पण चित्रपटाच्या कथानकाच्या प्रवाहात एक रांगडा योद्धा काळाच्या पुढे कसा होता याचेच ते प्रतीक वाटते. कथानकाच्या नाट्यउभारणीसाठी लागणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, कथानकात 'सिनेमॅटीक लिबर्टी'च्या नावाखाली, सढळ हाताने वापरले आहे वापरले आहे, त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण झाले असे वाटूही शकते. पण हा एक सिनेमा आहे व त्यात ठराविक वेळात एका ऐतिहासिक कालखंडातली बरेच गुंतागुंतीचे पदर असलेली प्रेम-कथा बसवायची आहे हे ध्यानात घेतले की सिनेमॅटीक लिबर्टी तितकीशी जाचक न वाटता कथानकाच्या प्रवाहात बसून जाते. बहुतेक बखरींमधून मस्तानीबद्दलचे उल्लेख जवळजवळ टाळलेले असल्याने तिच्याबद्दलची आणि तिच्या बाजीरावाशी असलेल्या नात्याबद्दल दंतकथा आणि वंदताच जास्त असल्याने ती 'तवायफ' की पत्नी ह्याबद्दल बरेच समज आणि अपसमज आजही असावेत. तिच्याबद्दल असणारे हे समाज अपसमज हे प्रामुख्याने तिचे मुसलमान असणे ह्यामुळे होते. पुण्यातला त्यावेळचा समाज आणि पेशवे घराणे यांचा तिच्याबद्दलचा दुःस्वास आणि तिला 'गाणी बजावणी' करणारी ह्या दर्जाला आणून बसवणारी विचारसरणी ही ती यवनी असल्यामुळे व तिची पर्शियन आई गाणारी असल्यानेही होती. पण ह्यात ती छत्रसाल राजाचे रक्त धमन्यांमध्ये खेळवणारी, शस्त्रपारंगत राजकन्या होती ह्याकडे दुर्लक्ष केले गेले होते. ह्या सिनेमाच्या कथानकात, तिच्यावर 'तवायफ' ढंगाची राहणी लादली गेल्यावर तिने ज्या राजनैतिक मुत्सद्दीपणे ते ते प्रसंग हाताळले ते जर कोणाला इतिहासाचे विकृतीकरण वाटणार असेल तर वाटो बापडे! ते ज्या पद्धतीने सिनेमात मांडले आहे ते मस्तानीला योग्य ती उंची प्रदान करणारे आहे. आणि ते तसे होण्यास भाग पाडणारा राऊ म्हणूनच मग आद्य पुरोगामी वाटतो. सर्व कलाकारांनी आपापली पात्रनिवड सार्थ ठरवत समरसून भूमिका केल्या आहेत. रणवीर अक्षरशः भूमिका जगाला आहे. त्याने बेफिकिर, रांगडा, हळवा, प्रेमात बुडालेला भावनाप्रधान योद्धा सार्थ उभा केला आहे. मराठी शब्द्पेरणी असलेला, भाषेचा एक बेफिकीर लहेजा जो त्याने चित्रपटभर पकडला आहे तो बहुतेक प्रसंगात भाव खाऊन जातो. विशेषतः जेव्हा निजामासमोर बसून बोलणी झाल्यावर त्याच्या पुढ्यात जातो तो प्रसंग रणवीर आणि भन्साळीचे चित्रपटाबद्दलचे बाकीचे गुन्हे क्षम्य करून जातो. दीपिका मस्तानी वाटते आणि तिने ती यथायोग्य वठवली आहे. प्रियांका,मिलिंद सोमण, यतीन कारेकर, तन्वी आझमी इत्यादींनी झोकून काम केले आहे. भव्य-दिव्य न् महागडे सेट्स, चकचकीत व भरजरी पोशाख आणि प्रचंड कॅन्व्हास ही भन्साळीची खासियत आहे (अलीकडे तेवढेच राहिले आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये). ह्या सिनेमात तो पुणेरी, पेशवाई थाटाचा भव्य आणि ग्लॉसी कॅन्व्हास उभा करण्यात यशस्वी ठरला आहे. राहता राहिले 'पिंगा' आणि 'मल्हारी' ह्या वादग्रस्त गाण्यांबद्दल. मल्हारी हे गाणे निजामासोबतच्या अतिशय तणावग्रस्त प्रसंगानंतर येते त्यात बाजीरावाची 'तडफदार आणि धडाकेबाज' भूमिका अधोरेखित झालेली असते, त्यानंतर लगेच ते गाणे येते. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. कथानकाबाहेर, संदर्भरहित गाणे बघितल्यास ते चुकीचेच वाटेल. पिंगा गाण्याचेही तसेच. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. मस्तानी तेव्हा शनावारवाडयावरच राहत असते आणि त्या गाण्याच्या आधीच्या दृश्यात काशीबाई तिच्याकडे हळदीकुंकवाला जाऊन तिला शालू देऊन आलेली असते जो ती नेसून पिंगा घालायला येते. दोन्ही गाण्यांचा उगाच बाऊ केला गेला आहे. बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेला एका आदरणीय स्तरावर नेणारा आणि राऊच्या पुरोगामी रांगडेपणाला नेमके टिपणारा भन्साळीच्या बाजीराव मस्तानी सिनेमा आवडून गेला!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33512
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

In reply to by हेमंत लाटकर

शिवराय नाही पण संभाजी महाराज असे नाचलेले नक्की चालले असते, चिकदेवराया वरील युद्धानंतर किंवा गोव्याच्या युद्धानंतर. थोरले बाजीराव आणि छत्रपती संभाजी राजांचा बाणा हा पराक्रमी सेनानीचा वाटतो, त्यामुळे असा नाच त्यांना शोभूनही दिसला असता. अनुपुराण वगैरे मध्ये तर त्यांची तुलना तांडव करणाऱ्या शिवा शी केली आहेच. आणि हो वाट लावली वगैरे शब्दांना हि आक्षेप घेतला नसता हो, कारण संभाजी राजे त्यांच्या एका पत्रात एका गद्दाराला म्हणतात "ऐसी हरामखोरी पुन्हा कराल तर चौरंग करून नामजाद करू (म्हणजेच वाट लावू)"

शिवाजी महाराज व संभाजी महाराजांना पिक्चर मध्ये डान्स करायला लावणे चालले असते का महाराष्ट्रीयानां.

In reply to by हेमंत लाटकर

हे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काही आयडींनी सांगितलय ना?नाचले तर चालेल म्हणून. अशा प्रतिक्रिया देऊन काय मिळतं? . . Global and liberal व्हायला शिका थोडं.

आम्हाला चालले नसते. थोरले बाजीरावांनी सरदार व सैनिकांना बक्षीसी देऊन गौरविले असते तर शोभले असते.

ओप्टिमिस्ट: पेला अर्धा भरलेला आहे पेसिमिस्ट : पेला अर्धा रिकामा आहे विचारवंत टीकाकार : काचेच्या पेल्यावरची कलाकुसर अगदीच सामान्य आहे. नक्षीवर बहुधा सोन्याचा फक्त लेप दिलेला आहे. जुन्या काळात अशा पेल्यांवर माणिक देखील जडवले जात असत. तसेच हा पेला पेशव्यांच्या बाजूला ठेवण्यात आलेला आहे परंतु त्यातल्या द्रव्याच्या रंगावरून ते सरबत नसून मदिरा असण्याची शक्यता जास्त वाटत आहे. यामुळे इतिहासाचे विकृतीकरण, निर्मात्याचे उदरभरण, सरबताचे मदिराकरण आणि वादासाठी सरपण होत आहे! :P

बाजीराव पेशवे यांच्याशी संबधित काही म्हणी ,शब्दप्रचार आहेत. जसे की - "खिशात नाही आणा,आणि मला बाजीराव म्हणा ". "फुकट्ची बाजीरावकी" . फक्त हे बाजीरव १ले की २रे हे इतिहासाला माहित नाही .

सिनेमा उत्कृष्ठच आहे. पण बाजीराव च्या आईला थोडा अजुन सकारात्मक रोल हवा होता असे वाटते. सिनेमा पाहिल्यानंतर त्या एकदम विलन च्या पंगतीत बसल्यागत भासतात. अजुन ५ वर्षानी जी पिढी सिनेमा बघणार ते त्यांना नक्कीच विलन समजणार.

In reply to by गुल्लू दादा

तन्वी मुळची महाराष्ट्रीयन हे ह्या निमित्ताने कळले, सर्वोत्तम सपोर्टिंग एकट्रेस तिलाच मिळणार तिची नुसतीच मुलाखत पाहिली, ह्या भूमिकेसाठी किती मेहेनेत घेतली ते दिसून येते मेहेता बाईंच्या घराण्यातील तन्वी ची भूमिका कसदार आहे, तिचे डोळे बोलतात . महेश वैभव , मराठे , यतीन सगळ्या मराठी कलाकारांनी उत्तम काम केले आहे. गाणी नसती तरी चालले असते पण एक सिनेमा म्हणून त्याकडे पहिले तर थेटर मध्ये अमराठी प्रेक्षक सुद्धा बाजीरावच्या कर्तुत्व , शौर्य त्याचे जातीविरहित राजकारण त्यांचे विजन , हिंदू पातशाही दिल्लीच्या तख्तावर स्थापन करण्याचे शिवार्याचे स्वप्न साकारण्यासाठी झटणे सगळेच डोळ्यासमोर येते, धर्मांध टिपू सेक्कुलर दाखवणे किंवा राजनैतिक विवाहास पुढे प्रेमकथा म्हणून प्रेक्षकाच्या माथी मारणे हे इतिहासाचे विकृतीकरण त्यामानाने सिनेमातील गाणी चुकीची आहेत पण विकृतीकरण नक्कीच नाही बहुतांशी प्रेक्षकांनी काशीबाई ची व्यक्तिरेखा आवडली असल्याचे सांगणे हे सिनेमाचे यश आहे मस्तानी व काशीबाई प्रसंगात बॉलीवूड च्या भाषेत सांगायचे तर प्रियांकाने अक्षरशः खाल्ले आहे. रेवती ताई अमेरिकेत थेटरात नक्की जाऊन हा सिनेमा पहा सिनेमाच्या शेवटी डोळ्यातील असावे पुसत प्रेक्षक टाळ्यांचा गडगडात करतात त्या प्रसंगाचा साक्षीदार होण्यास तरी नक्की जा, हे भाग्य जोधा व अकबर च्या नशिबी नव्हते चुकी आशुतोष ची नाही आहे सदर सिनेमातून हिंदवी स्वराज्यास मारून मुटकून सेक्युकर बनवू पाहणाऱ्या लोकांना सणसणीत चपराक दिली आहे.

काल पाहिला बाजीराव मस्तानी... चित्रपट " राऊ " कादंबरीवर आधारीत आहे. ही ऐतिहासिक कादंबरी आहे इतिहास नाही. आणि चित्रपटात राऊ मधे नसलेले देखिल काही प्रसंग आहेत. एकूण "लिबर्टी" खूपच घेतली आहे. पण चित्रपट म्हणजे इतिहास नाही... त्यामुळे अक्षेप नाहीच. सर्व कलाकारांची कामे चांगली झाली आहेत. आणि त्यांची वेशभूषा, वातावरण निर्मिती उत्तमच आहे.