Skip to main content

भन्साळीचा बाजीराव मस्तानी

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 21/12/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
भन्साळीच्या बाजीराव मस्तानी ह्या सिनेमाबद्दल बराच गदारोळ, ह्या सिनेमाचे 'पिंगा' हे गाणे रिलीज झाल्यावर, झाला होता. आंतरजालावर आणि सोशल मीडियावर तर वादळच उठले होते.पेशवेकुलीन स्त्रियांचे आणि एकंदरच इतिहासाचे विकृतीकरण केले गेले असल्याच्या वावड्या उडल्या होत्या किंवा उडवल्या गेल्या होत्या. टीव्हीवर तथाकथित 'मान्यवर, अभ्यासक, इतिहास संशोधक' यांना बोलावून चर्चासत्रांचे रतीब घातले गेले होते. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडणार (पुण्या-मुंबईत) हे निश्चित होते. तसे झालेही. बऱ्याच व्हॉॅटसअॅप ग्रुप्सवर सिनेमावर बहिष्कार टाका अशा आवाहनांचेही रतीब चालू होते. ह्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून, काल 'बाजीराव-मस्तानी' पाहिला. प्रचंड आवडला! काय आवडले? तर, पहिला बाजीराव, राऊ म्हणून, मनापासून आणि बेहद्द आवडला. पहिल्या बाजीरावाबद्दल, तो एक जिगरबाज आणि अपराजित लढवय्या जो मोहिमेवर असताना घोड्यावरच कणसे तळहातावर मळून खायचा असे आणि मस्तानी ही यवनी पदरी बाळगून असलेला अशी प्रतिमा माझ्या मनात लहानपणापासून होती. सलग ४० लढाया जिंकणारा बाजीराव हा रांगडा आणि धडाडीने निर्णय घेणाराच असावा असे मनापासून वाटायचे. त्या प्रतिमेला नुसतेच मूर्त रूप भन्साळीने दिले नाहीयेय तर बाजीराव कसा 'पुरोगामी' होता हे ही त्याच्या व्यक्तीरेखाटनातून सार्थ उभे केले आहे. काही काही वेळा राऊ काहीसा बेफिकीर, आततायी आणि भडक वाटण्याची शक्यता आहे पण चित्रपटाच्या कथानकाच्या प्रवाहात एक रांगडा योद्धा काळाच्या पुढे कसा होता याचेच ते प्रतीक वाटते. कथानकाच्या नाट्यउभारणीसाठी लागणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, कथानकात 'सिनेमॅटीक लिबर्टी'च्या नावाखाली, सढळ हाताने वापरले आहे वापरले आहे, त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण झाले असे वाटूही शकते. पण हा एक सिनेमा आहे व त्यात ठराविक वेळात एका ऐतिहासिक कालखंडातली बरेच गुंतागुंतीचे पदर असलेली प्रेम-कथा बसवायची आहे हे ध्यानात घेतले की सिनेमॅटीक लिबर्टी तितकीशी जाचक न वाटता कथानकाच्या प्रवाहात बसून जाते. बहुतेक बखरींमधून मस्तानीबद्दलचे उल्लेख जवळजवळ टाळलेले असल्याने तिच्याबद्दलची आणि तिच्या बाजीरावाशी असलेल्या नात्याबद्दल दंतकथा आणि वंदताच जास्त असल्याने ती 'तवायफ' की पत्नी ह्याबद्दल बरेच समज आणि अपसमज आजही असावेत. तिच्याबद्दल असणारे हे समाज अपसमज हे प्रामुख्याने तिचे मुसलमान असणे ह्यामुळे होते. पुण्यातला त्यावेळचा समाज आणि पेशवे घराणे यांचा तिच्याबद्दलचा दुःस्वास आणि तिला 'गाणी बजावणी' करणारी ह्या दर्जाला आणून बसवणारी विचारसरणी ही ती यवनी असल्यामुळे व तिची पर्शियन आई गाणारी असल्यानेही होती. पण ह्यात ती छत्रसाल राजाचे रक्त धमन्यांमध्ये खेळवणारी, शस्त्रपारंगत राजकन्या होती ह्याकडे दुर्लक्ष केले गेले होते. ह्या सिनेमाच्या कथानकात, तिच्यावर 'तवायफ' ढंगाची राहणी लादली गेल्यावर तिने ज्या राजनैतिक मुत्सद्दीपणे ते ते प्रसंग हाताळले ते जर कोणाला इतिहासाचे विकृतीकरण वाटणार असेल तर वाटो बापडे! ते ज्या पद्धतीने सिनेमात मांडले आहे ते मस्तानीला योग्य ती उंची प्रदान करणारे आहे. आणि ते तसे होण्यास भाग पाडणारा राऊ म्हणूनच मग आद्य पुरोगामी वाटतो. सर्व कलाकारांनी आपापली पात्रनिवड सार्थ ठरवत समरसून भूमिका केल्या आहेत. रणवीर अक्षरशः भूमिका जगाला आहे. त्याने बेफिकिर, रांगडा, हळवा, प्रेमात बुडालेला भावनाप्रधान योद्धा सार्थ उभा केला आहे. मराठी शब्द्पेरणी असलेला, भाषेचा एक बेफिकीर लहेजा जो त्याने चित्रपटभर पकडला आहे तो बहुतेक प्रसंगात भाव खाऊन जातो. विशेषतः जेव्हा निजामासमोर बसून बोलणी झाल्यावर त्याच्या पुढ्यात जातो तो प्रसंग रणवीर आणि भन्साळीचे चित्रपटाबद्दलचे बाकीचे गुन्हे क्षम्य करून जातो. दीपिका मस्तानी वाटते आणि तिने ती यथायोग्य वठवली आहे. प्रियांका,मिलिंद सोमण, यतीन कारेकर, तन्वी आझमी इत्यादींनी झोकून काम केले आहे. भव्य-दिव्य न् महागडे सेट्स, चकचकीत व भरजरी पोशाख आणि प्रचंड कॅन्व्हास ही भन्साळीची खासियत आहे (अलीकडे तेवढेच राहिले आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये). ह्या सिनेमात तो पुणेरी, पेशवाई थाटाचा भव्य आणि ग्लॉसी कॅन्व्हास उभा करण्यात यशस्वी ठरला आहे. राहता राहिले 'पिंगा' आणि 'मल्हारी' ह्या वादग्रस्त गाण्यांबद्दल. मल्हारी हे गाणे निजामासोबतच्या अतिशय तणावग्रस्त प्रसंगानंतर येते त्यात बाजीरावाची 'तडफदार आणि धडाकेबाज' भूमिका अधोरेखित झालेली असते, त्यानंतर लगेच ते गाणे येते. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. कथानकाबाहेर, संदर्भरहित गाणे बघितल्यास ते चुकीचेच वाटेल. पिंगा गाण्याचेही तसेच. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. मस्तानी तेव्हा शनावारवाडयावरच राहत असते आणि त्या गाण्याच्या आधीच्या दृश्यात काशीबाई तिच्याकडे हळदीकुंकवाला जाऊन तिला शालू देऊन आलेली असते जो ती नेसून पिंगा घालायला येते. दोन्ही गाण्यांचा उगाच बाऊ केला गेला आहे. बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेला एका आदरणीय स्तरावर नेणारा आणि राऊच्या पुरोगामी रांगडेपणाला नेमके टिपणारा भन्साळीच्या बाजीराव मस्तानी सिनेमा आवडून गेला!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33512
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भालजी पेंढारकरांचा राजा शिवछत्रपती पाहिला नाही का? की त्यातही छत्रपती शिवाजी महाराज "वाट लावली" म्हणत नाचलेले बघायचे होते?

In reply to by पैसा

पेशव्यांच्या काळात मराठी राज्याचे स्वराज्याचे साम्राज्य झाले होते. पराक्रमाबरोबर वैभवही वाढत गेले म्हणूनच शिवकाळात असलेला साधा सरळ गद्यसाद्रश पोवाडा मागे पडला आणि त्याची जागा पूर्वपेशवाईत लावणीने पटकावली. स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर झाल्यामुळेच दरिद्री मराठ्यांच्या हातात पहिल्यांदाच हातात पैसा खुळखुळत होता. त्यामुळे त्यांची राहणी वृत्ती सुखवस्तूपणाची होती आणि ते सर्वच करमणुकीकडे झुकले होते. शाहुसारखा विलासी राजा आणि रसिक पेशवे यांच्यामुळे साहजिकच नाच तमाशे यांना उत आला होता. चित्रकथा, गोंधळी,भराडी,भांड इत्यादी धंदेवाईक लोककवींबरोबर शिंपी,गवळी,व शिकलगा इत्यादी पेशांतील कवींनीही लोकरंजनाची वाट धरली व त्यामुळेच रावबाजीच्या रंगेल कारकिर्दीत नखरेल लावणीला प्रचंड माज आला होता. उत्तर पेशवाईत तर मराठी लावणीला तर बहर आलेला होता. नाच, गाणे,तमाशे, जलसे, याची बेधुंद उधळण होत होती. इतिहासकार लिहितात, मराठी कविता,मंदिर मठातून बाहेर आली. तिच्या डोईवरचा पदर खांद्यावर घसरला. पायात चाळ दिसू लागले.एवढेच नव्हे तर रामकृष्ण हरीच्या गजराऐवजी 'कुणा ग सुभगाची मदनमंजिरी ' म्हणुन कानाला हात देऊन तिने पायाच्या ठेक्यासरशी इश्काची लकेर छेडली. हे घडण्याचं कारण सामाजिक पार्श्वभूमी त्यामुळे पोवाडे मागे पडुन नाच गाणे, लावणीला मोठं भाग्य याच काळात लाभलं. मराठी फौजा पावसाळा संपत आला की की नर्मदा ओलांडुन उत्तरेस जात येतांना सैन्याला उशीर व्हायचा. सैनिकांना आपल्या बायका प्रेयसीच्या आठवणी यायच्या. विरहाच्या वेदना सुरु झाल्या की त्यांची पावलं नाचगाण्याकडे वळायची. म्हणुन भन्साळीनं नाचगाण्याचं एक प्रातेनिधिक चित्रण अगदी योग्य रेखाटलं आहे. शुरविरांचे कौतुक करणारे पोवाड्यावाले रंगेल बनले होते म्हणुन हहपुवा झाली बाकी कै नै. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणूनच शिवकाळात असलेला साधा सरळ गद्यसाद्रश पोवाडा मागे पडला आणि त्याची जागा पूर्वपेशवाईत लावणीने पटकावली.
ह्याला काही आधार, विदा? - (साशंक) सोकाजी

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाहुसारखा विलासी राजा आणि रसिक पेशवे यांच्यामुळे साहजिकच नाच तमाशे यांना उत आला होता.
कोणत्या आधाराने म्हणताय, शाहू छत्रपती आणि त्यांचे सुरुवातीचे दोन पेशवे बाळाजी विश्वनाथ आणि बाजीराव थोरले यांच्या काळात तमाशा अस्तित्वात होता का? आजच्या तमाशाचे स्वरूप हे १८०० नंतरचे आहे. दौलतजादा , सवालजवाब, लावणी हे प्रकार १७९० पासून च्या नंतर चे आहेत. शाहीर हैबतराव चा पहिला उल्लेख तमाशाशी संबंधित १७९४ चा आहे. शिवकाळात, शंभूकाळात आणि अगदी शाहूंच्या काळात सुद्धा (शिवकालातीलअज्ञानदास सारखे) वीररस गाणारे शाहीर होते. शाहू १७०८ ला छत्रपती झाले, त्यानंतर १७१९ पर्यंतचा काळ प्रचंड धामधुमीचा होता,मराठे माळवा,गुजरात,कोकण , उत्तर महाराष्ट्र , निजामविरुध्द, सय्यद विरुध्द, कोल्हापूरकर, बंडखोर सरदार,पोर्तुगीज अश्या अनेक आघाड्यांवर लढत होते. स्वतः शाहूंना अनेकदा रणांगणात उतरावे लागले होते. यात विलासी जीवन जगण्यास वेळ कुठून मिळाला असावा हे जाणून घेण्यास नक्कीच आवडेल.

In reply to by मालोजीराव

मी वाचलेले आठवते त्याप्रमाणे पट्ठे बापूरावाची पवळा ही तमाशातील लिखित उल्लेख असलेली पहिली महिला नर्तकी. त्याआधी (१७९० च्या आसपास) शाहिरी तमाशात तरुण मुलगे बाईचा वेष करून नाचत असत. लोकशाहीर रामजोशी या राजकमल च्या सिनेमात रामजोशीसोबत बया दाखवली आहे ती गदिमांच्या कल्पनेची निर्मिती असावी. बाजीरावानंतर माधवराव पेशवे हे अतिशय शिस्तीचे होते. त्यानंतरच्या नारायणराव आणि बारभाईच्या काळातही तमाशाला अनुकूल वातावरण नव्हतेच. तमाशा हा तुलनेने आधुनिक असल्यामुळेच बहुधा इतर प्रांतातल्या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या भरतनाट्यम, कथक, ओडिसी, मोहिनीअट्टम यासारखा महाराष्ट्रात स्वतःचा असा शास्त्रीय नृत्याचा प्रकार नाही. गोव्यातल्या देवदासींमधूनही गाणार्‍या उत्तमोत्तम कलाकार पुढे आल्या. मात्र कोणी नर्तिका असल्याचे माहीत नाही.

In reply to by मालोजीराव

शाहुंच्या काळात तमाशा होता का याचा लिखित पुरावा असा सापडत नाही पण म्हणुन तमाशा नव्हता हे म्हणायला मी जरा कचरतो आहे. अनंतफंदी(१७४४-१८१९)  नावाचा शाहिरांमधे जेष्ठ असलेला शाहीर याने उत्तान शृंगाराच्या लावण्या लिहुन तमाशाचे फडही चालविल्याचे उल्लेख आहेत. पुढे अहिल्याबाई होळकर यांच्या उपदेशामुळे तमाशाचा धंदा सोडुन देऊन ते किर्तन करु लागले.

दुसरा उल्लेख परशराम (१७५४-१८४४) या शिंपी शाहिराने पहिल्यांदा तमाशातून स्त्रीने पुरुषाचा व पुरुषाने स्त्रीचा वेश घेऊन काम करण्याची प्रथा पाडली.  
                      पोट भराया उभारिला ना तमाशाचा धंदा
                      महालमोकासे, जहरी वळसे करतील आपुला धंदा
                      सुई दोर्‍याला हयात असू द्या तोची इमान मोकासा
                      निजकर्मी नर रत झाल्यावर काय उणा त्य पैसा
असे उत्तर पेशव्यांना ऐकवून पेशव्यांची वतनदारी त्याने नाकारली आहे. वरील दोन्ही उदाहरणातून जरी काळ हा सतराशे पन्नासच्या पुढे जातो, तरी एकदम तमाशा तेव्हाच अवतरला असे म्हणता येत नाही त्याहीपूर्वी रात्रीच्या वेळी 'गोंधळ' आणि तत्सम कार्यक्रमात असे तमाशावजा  कार्यक्रम सादर होत असावेत असे म्हणायला वाव आहे. शाहीरांचे पोवाडे वीररसाऐवजी अधिक शृंगारपूर्ण वर्णन शाहु आणि पेशव्यांच्या काळातच असलेल्या शाहिरांच्या कवनातून दिसतात तशी  असंख्य उदाहरणे आहेत.

होनाजीबाळा (१७५४-१८४४) सगनभाऊशी कलगी तुर्‍याचे सामने करणारा होनाजी हा कवी. बैठकीच्या लावणीत रागदारीचे सूर असावेत ही बाजीरावांची इच्छा होनाजीने पूर्ण केली. होनाजीनेच  पहिल्यांदा वेगवेगळ्या रागदारीच्या चालींवर लावण्या रचुन तमाशाला बैठकी गाण्याची प्रतिष्ठा करुन दिली. होनाजी बाळाने बाजीवार पेशव्यांच्या जीवनावर पोवाडे न लिहिता बर्‍याच लावण्या लिहिल्या. या होनाजीला तर सरकार वाड्यासमोर तमाशा करण्याबद्दल सालाना तीनशे रुपयाचे मानधन मिळत असे .३

शिवकाळ सोडला तर शाहुंच्या काळापासून पुढे जवळ जवळ संत व पंडित कवींच्यावर असलेले अध्यात्माचे जोखड शाहिरांनी झुगारुन दिल्यामुळे शृंगाराचा अतिरेक होईपर्यंत कोणत्याच मर्यादेचं पालन शाहिरांनी केलेलं नाही. बाकी पोवाड्याचे विषयही होतेच होते. युद्ध, सैन्यप्रकार,तहनामे, दुष्काळ, सण, व्रते, शहर, लोकाचार.इ.इ.  जसे. सांगायचा मुद्दा पुन्हा असाच की सतराशे पन्नासच्या पुधे जरी तमाशाबाबत लिखित पुरावे येत असले तरी त्याही पूर्वी पाच पंचवीस वर्ष अगोदर तमाशा होता असे म्हणता येते.

शाहुमहाराज औरंगजेबाच्या मृत्युनंतर दक्षिणेत परतले तेव्हा एक तर मराठे सरदार औरंगजेबाच्या सत्तेशी युद्ध करुन करुन कंटाळुन गेले होते. शाहुंना हे सर्व कंटाळलेले  मराठे सरदार लाभलेत म्हणन्यापेक्षा शाहुंनी विनंतीकरुन पत्र पाठवून आपण एकत्र राहु आणि इतर आमिशे दाखवून त्यांना एकत्र केलं, तसेही बाकी मराठे सरदार राजे संभाजीच्या मृत्युनंतर खवळुन उठलेच होते त्याचाही फायदा शाहु महाराजांना झाला. रियासतकार लिहितात ' शाहुला जरी प्रारंभी लष्करी बळ फारसे मिळाले नसले तरी महाराष्ट्रच्या नैतिक सहानुभूतीचा पूर त्याजवर लगेच लोटला. हा पाठिंबा नुसता हिंदूचा नसून मुसलमानांचाही होता. औरंगजेबाच्या कारभाराने देशाची कशी नासाडी झाली ही सर्वांस चक्क दिसत होती. मराठ्यांचे पराक्रम व कैक वर्षांचे कष्ट लोकांच्या डोळ्यापुढे होते. बादशहाने यांचा नाहक छळ चालविला आहे अशी सामान्य समजूत प्रचलित होती., तिचा फायदा शाहूस मिळाला ; आणि तो परत निघताच पुष्कळ्से जमीनदार व सेनानायक त्यास अनुकूल झाले."

शाहुंचे कतृत्व अजिबात कमी करायचे नाही, पण परिस्थिती शाहुंच्या दृष्टीने अतिशय जमेची होती. स्वतःस छत्रपती म्हणवून घेणे वगैरे इत्यादी या सर्व गोष्टी त्यांना सहज मिळत गेल्या. शुर बाजीरावासारख्या सेनापतीने त्यांना सर्व आघाड्यांवर विजय मिळवून दिला.  शाहु महाराज अनेकदा युद्धावर आणि तहासाठी गेलेही असतील पण त्यांच्या आयुष्यात इतर मराठे  सरदारांमुळे स्वस्थ आणि आरामदायी आयुष्यही होतं, इतर राजांच्या दरबारात गायन, नृत्य हा जसा  भाग होता तसे त्याचे चित्रण मात्र  तपशीलवार येत नाही, हे तितकेच खरे आहे. 


-दिलीप बिरुटे

संदर्भ.
१. रा.श्री.जोग -मराठी वाड्:मयाभिरुचीचे विहंगावलोकन पृ. १०१
२. श.तु. शाळिग्राम - परशराम कवीच्या लावण्या. पृ. ५
३. श.तु. शाळिग्राम  - होनाजीबाळाकृत लावण्या पृ.१०
४. गो.स.सरदेसाई -मराठी रियासत खंड तीन. पृ.क्र. ३७.

          


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाजीरावाचा मृत्यू १७४० मधे आणि शाहू महाराजांचा १७४९ मधे झाला. हे सगळे शाहीर त्यानंतरच्या काळातले आहेत. दुसर्‍या बाजीरावाशी संबंधित असू शकतात. हे सगळे शाहीर कवने लिहून प्रसिद्ध व्हायला मालोजीराव म्हणतात तसा १७९० चा काळ नक्कीच उजाडला असणार. तुम्ही म्हणताय तो नाच गोंधळात असतो का? गोंधळ घालणारे गोंधळी वेगळे असतात आणि जागरण घालणारे वाघ्या मुरळी. खंडोबाच्या नावाने जागर, जागरण करतात त्यात मुरळीचा नाच पूर्वापार आहे. पण त्याचा उद्देश लोकांना उद्दीपीत करणे हा नसतो तर जास्त धार्मिक असतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, पास म्हणून कसे चालेल? संदर्भ देऊन दिलेल्या मेगाबायटी प्रतिसादात मूळ प्रश्न अनुत्तरीतच राहताहेत. त्यांची उत्तरं देईपर्यंत पास म्हणून कसे चालेल? - (अजुनही साशंक) सोकाजी

In reply to by सोत्रि

या पेक्षा माझ्याकडे अजुन माहिती नाही. माझ्या मर्यादा. म्हणून माझा पास. :) -दिलीप बिरुटे।

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर नृत्याबद्दल आक्षेप नाहीच, तमाशा सदृश गोष्टी त्याकाळात नव्हत्या इतकेच. गणिका, बटकी विकत मिळत असत त्यामुळे हे शक्य असे.तसेच बाबूजी जोशी या कारकुनाने मस्तानीने गोकुळअष्टमीच्या उत्सवात नृत्य केल्याचे लिहिले आहे, पण ती राजदरबारात नाचत नसे (द ग गोडसे शोध निबंध)
परिस्थिती शाहुंच्या दृष्टीने अतिशय जमेची होती. स्वतःस छत्रपती म्हणवून घेणे वगैरे इत्यादी या सर्व गोष्टी त्यांना सहज मिळत गेल्या.
मोगली कैदेतून सुटून येताना फक्त ४ माणसांनिशी लाम्बकानी येथे महाराष्ट्राच्या सीमेवर उभ्या असलेल्या शाहूला खेड येथे येईपर्यंत ३५००० हजार सैन्य येऊन मिळाले. मराठी लोकांनी स्वतःचा छत्रपती गेली १८-२० वर्षे पाहिला नव्हता कदाचित म्हणूनच इतका प्रतिसाद त्यांना मिळाला असावा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणत्याही कलेचा उगम होउन लोकप्रियता मिळून तिचा प्रसार व्ह्यायला आणि तसे नवीन नवीन कलाकार तयार व्हायला बराच कालखंड जावा लागतो. त्या काळचा विचार करता तर जास्तच. शा. रामजोशांचा कालखंड (1762–1812) पाहता ते दुसर्‍या बाजीरावाला समकालीन जरी असले तरी त्यानी शाहीरी सोलापुरात सुरु केलेली. ह्या कलेचा प्रसार पुण्यापासून सोलापूरपर्यंत होण्यासाठी काही पूर्वइतिहास असलाच पाहीजे. दृष्य स्वरुप जरी वेगळे असले तरी ह्या कलेची परंपरा पूर्वापार लोकाश्रय असलेली असणार हे निश्चित.

In reply to by अभ्या..

अभ्या, मी वर प्रतिसादात शाहिरांच्या जन्म आणि त्यांच्या कलाप्रकाराचा काळ तेवढ्याचसाठी उल्लेख केला. की या कला प्रसिद्धीला येण्यापूर्वी तो कलाप्रकार अस्तित्वात असावा असे म्हणायला खुप वाव असतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तमाशा शिवकाळापासून अस्तित्वात असावा असे म्हणायला नक्कीच वाव आहे. समकालीन कवी नागेश ह्याच्या काही रचना त्याची साक्ष पटवतात असे मला वाटते. अधिक माहिती ' महाराष्ट्र सारस्वतात' बघून सांगतो.

In reply to by सोत्रि

लोकदैवतांचे विश्व मधे रा चिं ढेरे काय म्हणतात? तमाशा हा खेळे प्रकारातल्या राधेच्या नाचावरून सुरू झाला. खेळ्यांमधे पुरुष बाईचे सोंग आणून नाचतात. तीच प्रथा तमाशात पेशवाईअखेरपर्यंत सुरू राहिली एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर 'उघड्या मांडीचे कसब जाणणार्‍या' वर्गांचा तमाशाशी संबंध आला आणि नाच्याची जागा नाचीने घेतली. पट्ठे बापूरावासोबतची पवळा ही तमाशातली पहिली ज्ञात नर्तकी. खेळ्यातही तमाशाप्रमाणे गण गवळण असते. फक्त तिथे पुरुष स्त्रीवेष घेऊन नाचतात. ही पुरुषाने स्त्रीवेष घेऊन नाचायची पद्धत "नाच्या" च्या रूपात तमाशातही टिकून राहिली आहे. या मूळ खेळाला डफगाण्याचा फड अशा नावाने "राधा नाचवणे" या स्वरूपात जत्रांतून राधेचे खेळ पुरुष सादर करत असत. त्यात कलगीतुरा वगैरे प्रकार असत. हा प्रकार कर्नाटकातही "राधान आट" म्हणून प्रचलित आहे. हा खेळ करणारे जे "गाण" लोक होते त्याना फारशी भाषेच्या संसर्गाने शाहीर उपाधी मिळाली. तसेच "खेळ्यांचा खेळ" होता त्याला फारशीमधे "खेळतमाशा" आणि मग फक्त "तमाशा" हे नाव मिळाले. या नाच्या लोकाना एकनाथकालीन शेखमहंमदाने "नट्या" नावाने उल्लेखले आहे. "नट्या देखोनी इश्वराते ध्यातु| ऐसा विरळा कोणी पुण्यवंतु||" असे ते एका ठिकाणी म्हणतात. एकोणिसाव्या शतकातील रामसुत असे म्हणातात की राधा म्हणजे स्त्रीचा वेष| देऊनिया पुरुषास| तयाकडून नृत्यास| करवुनी वाद्यास वाजविणे| या रामसुतानी शिमग्यातल्या राधा नाचवण्याच्या खेळाचा समावेश डफगाण्याच्या फडात केला आहे. त्यांच्या एका पदात कृष्णाला राधेचा विरह असह्य झाल्याने त्याने राधेचा वेष घेतला आणि त्या प्रसंगाची आठवण म्हणून पुरुषाने स्त्रीचा वेष घेतलेला पौर्णेमेपासून ५ दिवस शिमग्याच्या काळात पहावा अशी लोकांना आज्ञा केली. तेव्हापासून खेळे प्रकार सुरू झाला, असा उल्लेख आहे. तमाशाचा उगम हा असा शिमग्याच्या खेळात आहे.

In reply to by प्रचेतस

धन्स वल्लीसेठ. माहिती वाचायला आवडेल. शिवकाळात एक वर्ग पंडित कवी रामकृष्णाच्या कथा गात होते तर एक शाहिरांचा वर्ग शुर शिपायांच्या पराक्रमाचे व राजाच्या गुणगानाचे पोवाडे गात होते. याच शाहिरांचे आधीचे स्वरूप गोंधळयाचे होते. शिवकाळात अशा मंडळीनी शत्रुच्या मुल्खात जाऊन राजकीय हेतूने गोंधळ उडवून देण्याचे काम केले. डफ तुणतुण्याच्या तालावर अंबाबाईचा उदो उदो करत थकल्या भागल्या सैनिकाच्या मनाची करमणुकही करत होते. त्याच बरोबर वीररस पोषक पोवाडा म्हणून सैनिकांच्या पराक्रमाला तेजोमय करीत होते तर कधी परकीय सैन्याला गाफील ठेवण्याचा कुटील डावही ही मंडळी करत होती. वल्ली, तमाशातलं सुरुवातीचं वाद्य तुणतुणे डफच होते. या गोंधळीचे तमाशाशी जवळचे नाते आहे. लावणी आणि पोवाडे हे पेशव्यानच्याच काळात भरभराटीला आले, पण त्याची पहाट शिवकाळातही असू शकते ! आपल्याकडील माहिती वाचण्यास उत्सुक आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाहिरी परंपरा आधीपासून होतीच.शिवकाळातील अज्ञानादासाचा पोवाडा प्रसिद्धच आहे. नागेश कवी हा १६ व्या शतकचे शेवटी होऊन गेला. त्याच्या काव्याचा एक मासला देतो. रूळत चंचल अंचल भूवरी | उसळतो वलयध्वनि अंबरी|| मदभरे मग गौळणी चालती | थरथरां स्तनमंथर हालती || बाकी लावणी व पोवाडा पेशव्यांचे काळात भरभराटीला आले असे म्हणण्यापेक्षा शाहूमहारांजाचे काळात भरभराटीस आल्या असे म्हणणे संयुक्तिक ठरावे. ह्या कलांना राजाश्रय सातारा व कोल्हापूर संस्थानात मिळाला. पुण्यात जवळपास नाही. नानासाहेबाच्या काळात नाटकशाळांचे प्रस्थ वाढले होते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अंदाजापेक्षा प्रत्यक्ष आधार पाहण्यास आवडेल, जेव्हा तमाशाला राजाश्रय होता तेव्हा तमाशा अगदी पाटील,इनामदार यांच्या वाड्यातील चौकात व्हायचा पण याचे उल्लेख नंतरनंतर चे आहेत. आमच्या घराण्याच्या कागदात तर अगदी अंगवस्त्र म्हणून विकत घेतलेल्या बटक्यांचे पण उल्लेख आहेत, पण शृंगारिक लावणी/तमाशाचे (शिवकालीन ते शाहूकालीन ) नाहीत. नागेश कवी प्रमाणे कवनांची उदाहरणे अनेक आहेत, छत्रपति संभाजी राजांचे नायिकाभेद याहून शृंगारिक आहे - रीती तजी विपरीत सजी I रसना वजी मंजूळ अंकके रासतें II दो उर बीच उरोज दबे ' नृपशंभू ' I बचे है अनंगके सासतें II खालील चित्रे मराठा कालीन आहेत, काही तंजावूर भागातील आहेत. त्यावरून तरी हे नृत्यसंगीत अध्यात्मिक कार्यक्रमास जोड म्हणून होते असे म्हणता येईल. तत्कालील शाहिरी/ पोवाडे हे अध्यात्मिक कलगीतुरे अथवा वीररस असलेले आहेत असे तुलसीदास,अज्ञानदास यांच्या पोवाड्यांवरून दिसते. s p

In reply to by मालोजीराव

आधार अजूनतरी काहीच मिळालेला नाही. सारस्वतात डोकावण्यास वेळ झाला नाही. संध्याकाळी बघतो. नवनीतात काही मिळू शकेल पण ते मजकडे नाही. बाकी तू दिलेली चित्रे लै भारी आहेत.

In reply to by प्रचेतस

बरीच आहेत पेंटींग्ज, सापडली कि टाकतो , हे एक आहे बघ सर्भोजीराजे भोसले यांच्या दरबारातले t

In reply to by अभ्या..

कपाळावरची भरुन इबित्ती (विभूती) हा विचार करण्याजोगा पार्ट है. सध्या फक्त वीरशैवात स्त्री व पुरुष दोघात ही प्रथा दिसते.

In reply to by पैसा

आले का शिवाजी महाराज, छान! :) मला नीटसे आठवत नाहीये पण त्यात शिवाजी महाराज घोड्यावरून जाताना कोणते तरी गाणे आहे बहुधा... आज जर कोणी सिनेमा बनवला तर तर काय सांगावे तसेच एखादे जोशपूर्ण गाणे बनविले देखील जाइल... आणि आक्षेप घेणारे आक्षेप घेतीलच! जुन्या ऐतिहासिक साहित्यात जणू काही उद्दात्तीकरण अथवा अतिशयोक्ती नसेलच असे मानून चालायचे असेल तर विषयच मिटला. काही वर्षांपूर्वी सम्राट अशोक वरती सिनेमा आला होता त्यातही गाणी वगैरे होती, काही लोकांनी थोडाफार विरोधही केला होता त्याबद्दल आपले काय मत? कारण कोणता इतिहास "आपला" म्हणायचा याची काही मार्गदर्शक तत्त्वे असतील तर सांगा म्हणजे बरे पडेल! उगीच कोणत्याही कलाकाराला त्याने व्यक्त कसे व्हायचे हे सांगणारा नवीन सेन्सोर बोर्ड हल्ली आजूबाजूला दिसतो

In reply to by शब्दबम्बाळ

>>>>उगीच कोणत्याही कलाकाराला त्याने व्यक्त कसे व्हायचे हे सांगणारा नवीन सेन्सोर बोर्ड हल्ली आजूबाजूला दिसतो १०० टक्के सहमत. या सेन्सार बोर्डाचे कुठेही चालले की आपापले चष्मे काढून यांचं सुरु होतं हे असं पाहिजे होतं अन हे तसं पाहिजे होतं. अरे, आवरा राव यांना. -दिलीप बिरुटे

In reply to by शब्दबम्बाळ

शिवाजी महाराज घोड्यावरून जाताना पार्श्वभूमीला गाणे असणे वेगळे आणि शिवाजी महाराज स्वतः वाट लावली म्हणून नाचताना दाखवणे वेगळे. ते तुम्हाला चालले असते कदाचित. ज्याना विकृत इतिहास चालत नाही त्यांना नाही चालणार. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर अशोकाचे विकृतीकरण केलेले सिनेमेही आमच्यासारखे लोक बघत नाहीत. ऐतिहासिक व्यक्तीच काय रामायण महाभारताच्या सीरियलीही मी बघत नाही हे लिहिले आहे ते सोयिस्करपणे वाचले नाही वाटते तुम्ही. असो. पुन्हा तेच, झोपलेल्याला जागे करता येते. सोंग घेतले तर घ्या मनसोक्त. इतिहास हा आपला किंवा परक्यांचा असा वेगवेगळा नसतो. तो फक्त असतो. काही लोक तो आहे तसा स्वीकारतात. काही लोक आपल्याला पाहिजे तसा विकृत करतात. तुम्ही तुमच्या अजेंड्यावर चाला. आम्ही आमच्या रस्त्याने जाऊ. आपले मत मांडण्याला सेन्सॉर म्हणायचे असेल तर म्हणा. मला काही प्रॉब्लेम नाही. सेन्सॉर करायचा असता तर मोर्चे काढून सिनेमे बंद पाडले असते. मला असल्या गाण्यांचा मूर्खपणा आवडत नाही, तो सिनेमा मी बघत नाही. माझ्यापुरता विषय संपला. ते लिहिले तर तुम्हाला त्याची एवढी भीती का हो वाटते?

In reply to by पैसा

पैसातै, इतिहास कोणता व कसा खरा मानायचा ह्यात जाम गोची आहे खरतरं. कारण ते सर्जन असते सृजन नसते. म्हणजे इतिहास हा नेहमी रचित असतो. जेत्यांनी किंवा सत्ताधीशांनी लिहीलेला. आपण आपापल्या श्रद्धास्थानांच्या विश्वासानुसार घ्यायचा असतो तो. आपल्या श्रद्धास्थानाला धक्का पोहोचला की विकृतीकरणाची भावना प्रबळ होते. मनुष्यस्वभावच तो, त्याला औषध नाही :) पण नाण्याच्या दोन बाजू ही जशी वस्तुस्थिती तशीच इतिहासाचीही दुसरी बाजू असतेच. आपल्यासाठी शिवाजी महाराज दैवत असले तरीही सुरतच्या व्यापाऱ्यांची भावना त्यावेळी 'सुरतेचा लुटारू' अशी झाली असून त्यांच्या पिढ्या दर पिढ्या तशीच छबी जर प्रवाहित होत राहिली असेल तर ते विकृतीकरण मानायचे का? आपल्या परसेप्शननुसार ते चुकीचेच असेल म्हणून सुरती व्यापाऱ्यांची बाजू व भावना कवडीमोल ठरतात का? अस्मिता असाव्यातच, जगण्याचा आधार असतात त्या! पण त्यांची बांडगुळं न करण आपल्या हातात असतो! असो, इत्यालम्! - (जे पटेल त्याला इतिहास मानणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

सोत्रि, भापो. तू म्हणतो आहेस तो "त्यांचा आणि आमचा इतिहास" याचं उदाहरण झालं. यातलं शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हे ऐतिहासिक सत्य आहे. ते कोणीही कोणत्याही चष्म्याने बघू देत. मात्र "सुरतेची लूट करतानी शिवाजी महाराजांनी मशिदी पाडल्या, किंवा बायकांना त्रास दिला" असे जर कोणी काही वाईट हेतूने म्हटले तर ते इतिहासाचे विकृतीकरण आहे. आलं लक्षात?

In reply to by पैसा

बराच झोंबला वाटत प्रतिसाद! :) बाकी आपल्या प्रतिसादात "आमच्यासारखे लोक" आणि "आम्ही" आमच्या रस्त्याने जाऊ असे काही वाचून करमणूक झाली... संघटना वगैरे आधीच काढलेली दिसतीये. "आम्ही" म्हणजे शहाणे, सगळे काही समजणारे आणि बाकीचे बिचारे भरकटलेले... स्पष्ट शब्दात सांगायचे तर, तुम्ही सिनेमा बघा अथवा बघू नका कोणालाही काडीचा फरक पडत नाही. सिनेमाला परवानगी देण्यासाठी सेन्सोर बोर्ड अस्तित्वात आहे. आणि विरोध करायला मोर्चे वगैरे निघाले होते बर का, अगदी भन्सालीचा पुतळा पण जाळला होता. आता ते करणारे "तुमच्या सारखे" लोक होते का ते मात्र मी अज्ञानी सांगू शकत नाही. आणि हो, मला हा सिनेमा बघण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता पण जेव्हा टिममेट्स सोबत बंगलोरला हा सिनेमा पहिला त्यावेळी एका गोष्टीचा आनंद झाला कि सिनेमागृहात उत्साही लोक "हर हर महादेव"च्या आरोळ्या देत होते. महाराष्ट्राबाहेर अशा आरोळ्या ऐकण्याची गम्मत काही वेगळीच आहे! मला कसली भीती वाटतीये असे तुम्हाला वाटले काही कळाले नाही. कसय ना, मला माहितीये तोच आणि तसाच इतिहास पडद्यावर दिसला पाहिजे अशा मताचा मी नाहीये. त्याशिवाय, चित्रपट हे इतिहास संशोधनाचे साधन नाही हे हि मला माहित आहे त्यामुळे चिंता नसावी... आणि या चित्रपटाच्या सुरुवातीला सुमारे ३-४ मिनिटे सूचना आहे कि हा फक्त कादंबरीवर आधारित चित्रपट आहे आणि त्यात काही कलात्मक बदल देखील केले गेले आहेत. हे ऐकून देखील कोणी जर हाच आणि असाच इतिहास आहे असा समाज करून घेणार असेल तर ती त्या व्यक्तीची चूक आहे.

In reply to by शब्दबम्बाळ

न लिहिलेले बरेच काही वाचता की हो तुम्ही! फक्त लिहिलेले तेवढेच नीट वाचत नाही! आम्ही म्हणजे हे असले मूर्ख प्रकार आवडत नाहीत म्हणणारे अनेक लोक जे मिपावर सुद्धा आहेत ते. कुठच्या संघटनेचे नाव मी घेतले नाही बरं का! तुमच्यासारख्या एकांनी दुसर्‍या एका संघटनेचा उल्लेख केला होता. तुमची संघटना कुठची ते पण सांगून टाका एकदाचे! चित्रपट हे इतिहास संशोधनाचे साधन नाही हे मला पण कळते बरं का! फक्त कोणी इतिहासाताली पात्रे घेऊन काही कलाकृती तयार करणार असेल तर जे इतिहासात नाही ते त्याने दाखवू नये हे साधे लॉजिक आहे. त्यावर स्वामी, छावा, श्रीमान योगी यातली कोणतीच कलाकृती खरी उतरत नाही. काढा की सिनेमे. मग त्याला बाजीराव पेशवे कशाला म्हणायला हवे? बाजीराव सिंंघम म्हणा की! त्यातल्या त्यात भालजींनी असे यडचाप प्रकार न करता सिनेमे काढले एवढेच मी बोलले. तर सेन्सॉर काय आणि काय काय लिहित आहात. लिहा लिहा बिनधास्त. मी सिनेमा बघितला नाही म्हणून भन्साळीचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असा माझा समज आहे असं तुम्हाला खरंच वाटतंय की काय? =))

In reply to by पैसा

हाहा! माझ्यासारखा एक म्हणजे कोण हो? ;) कसय ना, तर चित्रपट बंद पाडला असता वगैरे तुम्ही बोललात. त्यावर मी लिहिले होते कि तसे प्रयत्न देखील करून झाले! कोणाला कसा चित्रपट काढायचाय ते जो तो ठरवेल. त्याला मान्यता द्यायची कि नाही हे सेन्सोर ठरवेल. आता तुम्ही टीका जरूर करू शकता पण ते करायला तुम्ही दुसर्या महापुरुषांचा आधार घेणार असाल तर तुमच्यात काही विशेष फरक म्हणता येणार नाही. शिवाजी महाराज नाचलेले पाहायचे होते का हे तुम्ही कोणत्या विचारांनी लिहिले हे तुम्हीच बघा. आपण टीका/स्तुती केल्याने "कोणत्याही" महापुरुषाचे इतिहासातील योगदान कमी/जास्त होत नाही आणि ते असलेले योगदान येणाऱ्या पुराव्यांनिशी बदलतदेखील राहते. मलातर कधी कधी वाटते इंग्रजांनी सगळे दफ्तरखाने जाळून टाकायला हवे होते म्हणजे भूतकाळाचा इतिहाससोडून भविष्यकाळात इतिहास घडविण्यासाठी इथला समाज एक तरी झाला असता. पण आता तरी ते होणे शक्य दिसत नाही.

In reply to by शब्दबम्बाळ

तुमचा आयडीच शब्दबंबाळ! तेव्हा कीस पाडायचं काम चालू ठेवा. मी कोणाबद्दल आणि काय लिहिले ते मलाही चांगले माहीत आहे आणि नीट वाचणार्‍यांनाही समजले आहे. तुम्हालाही समजले असेल बहुधा. पण ते कबूल कराच असा माझा आग्रह नाही. इतिहासाचे विकृतीकरण कोणाच्याही बाबत केले तर त्याला माझा आक्षेप आहे आणि राहील. मग ते शिवाजी महाराज असोत की बाजीराव पेशवे. शिवाजी महाराज आमचे आणि पेशवे तुमचे अशी कोणतीही वाटणी मी मानत नाही. तुमचे तुमच्या अजेंड्यावर आधारित वाचन आणि लिखाण चालू द्या. माझा त्याला काही आक्षेप नाही. _/\_

In reply to by पैसा

पैतै चे सगळे मुद्दे पटले. पण ताई मुळात तुझा मुद्दा समजुन घेण्यासाठी वाचला तर त्याचा उपयोग. फक्त प्रतिवाद करायला वाचले जात असतील तर वादच होऊ शकतो, चर्चा नाही. इतिहासाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन असु शकतो हे मान्य आहेच. पण त्यातही बेसिक मुद्दे असतात, जसे की पेहराव, बोलण्याची पद्धत इ. शिवरायांनी सुरत लुटली ते आपण पॉझिटिव्हली पाहु.. पण कुणी त्यांना लुटारु म्हणुन पाहिल. हे एकवेळ समजण्यासारखं आहे. पण म्हणुन शिवाजी महाराज वाट लावली म्हणुन नाचतील असं कुणीच म्हणणार नाही. बाकी ह्या सिनेमामुळे बाजीरावांबद्दल अमराठी लोकांना कळाले वगैरे मुद्दे आहेत. पण आपल्या लोकांना तोच इतिहास वाटतो हा जास्त मोठा प्रॉब्लेम आहे.

In reply to by पिलीयन रायडर

म्हणुन शिवाजी महाराज वाट लावली म्हणुन नाचतील असं कुणीच म्हणणार नाही
हीच ग्यानबाची मेख आहे. असं कुणीच म्हणणार नाही हे आपले आपणच आपल्या मनात ठरवायचे आणि कुणी तसं खरच म्हटलं की, "अरेच्चा, मी मनात ठरवलं होत ना की म्हणायचे नाही? मग कसं काय बोलताय? ऑ??" असा त्रागा करण्यात काय हशील आहे? नाही का? - ('संवाद' साधायला आवडणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

सोत्रि.. काशीबाई किंवा बाजीराव नाचलेच नसतील असं मला म्हणायचं नाहीचे.. पण बा़जीराव "वाट लावली" म्हणुन नाचले असतील का? काशीबाई पोट दाखवत ठुमके देत असतील का? ह्यात मी माझ्या मनात काय ठरवलय ह्याचा काय संबंध येतो? त्या हिशोबाने कलाकाराची अभिव्यक्ती आणि सिनेमॅटिक लिबर्टी वगैरे म्हणुन काशीबाई मस्तानी सारख्या पायघोळ कपड्यांमध्ये दाखवता येऊ शकतात का? दुनियादारी मध्येसुद्धा ह्याच अभिव्यक्तीच्या नावाखाली मुळ कादंबरीचा गाभाच बदलला होता. पण तेव्हा त्याला इतका विरोध झाला नाही कारण मुळात ती एक कथा होती. बाजीराव ही काही कवी कल्पना नाहीत ना? त्यांच्याविषयी आज एतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहेत. त्याकाळची बोली, रहाणी इ विषयी मत मांडता येईल इतपत पुरावे आहेत. ज्यावर पुढे राऊ सारख्या कादंबर्‍या तयार झाल्यात. ह्या कादंबर्‍यासुद्धा कलाकराची अभिव्यक्तीच होती की. पण त्यात तर्क सोडुन गोष्टी मांडलेल्या नव्हत्या. काय घडलं असेल ह्याचा शोध घेतला होता.. असा शोध घेणे वेगळे आणि कल्पनेचे वारु चौखुर उधळणे वेगळे. दोन्ही गोष्टी सरसकट "कलाकाराची अभिव्यक्ती" ह्या एकाच नावाखाली ठेवता येणार नाहीत.

In reply to by पैसा

मिपावरच्या सिनियर आयडीला देखील एखाद्याच्या सदस्य नामावरून टिप्पणी करण्याचा मोह टाळता येऊ नये हे पाहून एक मिपाकर म्हणून जे काही वाटायचं ते वाटल! मी लिहिलं कि शब्दांचा कीस काय? हे म्हणजे "आमच ते चुलीत आणि तुमच ते ललित" असे काहीसे झाले! आणि तुम्ही न्यायाधीश वगैरे होतात का हो? :P (का माजी संपादक असण्याचा प्रभाव म्हणायचा?) कारण डायरेक्ट निकालच सुनावालेत तुम्ही तर! १. मी कोणाबद्दल आणि काय लिहिले ते मलाही चांगले माहीत आहे आणि नीट वाचणार्‍यांनाही समजले आहे. (अहो ते वाचणारे ठरवतील कि! तुम्हीच कशाला ठरवताय?) २. तुमचे तुमच्या अजेंड्यावर आधारित वाचन आणि लिखाण चालू द्या. (बर! कोणता अजेंडा बरे आमचा? आणि तो पण तुम्हीच ठरवलात का? चालायचे, अधिकारच शेवटी तुमचा तो!) भारतामध्ये एका विशिष्ठ धर्मावर टिप्पणी केली कि तुम्ही जातीयवादी होता. पण मिपावर मात्र नुसते "काही आयडीच्या" विरुद्ध मत व्यक्त केले कि लगेच तुम्ही "त्यांच्या" आवडत्या संघटनेचे (ब्रिगेडच ना हो?) फुकटात सदस्य होता! पण त्यांनी तसे म्हटले तरी ते आयडी समानतावादीच असतात... मध्यंतरी बरेच आयडी गायब झाले मिपावरून, लवकरच माझ्यावर पण ती वेळ येईल असे दिसतेय! :)

In reply to by शब्दबम्बाळ

माझ्यासारखा एक म्हणजे कोण हो? ;)
तो मीच आहे बहुधा!!! बाकि,संघटनेचे नाव घेतल्याने कोणी त्या संघटनेचा होतो का? हे त्यांनाच माहित.

आज शेवटी काही जणांनी अगदी सिनेमा आधी पहा आणि मग बोल, असे च्यायलेंज (चहा पिताना दिलेले आवताण कम आव्हान) दिल्याने सिनेमा मोबाईलवर पाहिला. एकच शब्द, बेकार. प्रियांकाचा आचरटपणा आवडला नाही. पेशवा मधेच टपोरी वाटायला लागतो. दोघांच्या तुलनेने दिपिका बरीच बरी. आदित्य पांचोली, महेश मांजरेकर आणि मिसो उगाच तोंड दाखवायला होते. वैभव तत्ववादी ठीक. राजा छ्त्रसालाची भूमिका करणार्‍या नटाचे नाव आठवत नाहीये :( अख्ख्या सिनेमात तन्वी आझमीचे काम सगळ्यात उत्तम वाटले. बाकी बात कुच जमी नय. हाच धागा सापडल्याने इथेच लिहिले आहे.

In reply to by यशोधरा

गाणी भिकार होतीच, पण बाकी दिग्दर्शन पण फसलय रणवीरचे उठणे बसणे. यात रणवीरची काही चूक नहि. भन्साळीने माती खाल्ली आहे. प्रियांका तर सिनेमाच्या पुर्वार्धात वेडसर वाटते. दीपिका उत्तम. फक्त सिनेमाचा सेट चांगला आहे.

In reply to by पद्माक्षी

कालच पाहिला.सहमत आहे.बसणं उटणं बोलणं सर्वच सदोष असणारा बाजीराव बघवत नाही.गाणी तर सोडून दिलेला विषय आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मैय्या बहुतेक वाघवाल्या निजामाचा रोल केलेल्या रझा मुरादला पांचोली समजली. . रझा मुरादसारखा आवाज पांचोलीच्या दोन्ही सुर्यांना मिळून काढता येणार नै.

In reply to by अभ्या..

ए नाही काय! रझा मुराद वेगळा आणि पांचोली वेगळा :P पांचोलीने शाहू महाराजांच्या दरबारातील पेशव्यांविरोधातील मानकर्‍यांची भूमिका नेहमीप्रमाणेच ठोकळेबाजपणे केली आहे.

वाईट तितुके इथे चांगले भलेपणाचे भाग्य नासले पतिव्रतेच्या गळ्यांत धोंडा (पिंगा?) वेश्येला मणिहार अजब तुझे सरकार

बाजीराव मस्तानी चित्रपट पाहिला. बर्याच गोष्टी खटकल्या. 1. बाजीरावांचे बसणे, उठणे, नाचणे. 2. काशीबाईचे पोट दाखवत, कंबर लचकत नाचणे. 3. मस्तानीचे बाजीरावकडे दुत म्हणून येणे. 4. बाजीरावचे मस्तानीच्या प्रेमात इतके मशगुल असणे. 5. लढाई जिंकल्यावर पोवाडा दाखवला असता तर छान वाटले असते. 6. पिंगा डान्समध्ये नर्तकींना नाचवले असते तर ठीक दिसले असते. मस्तानी प्रकरणावरून पुण्यातील बाह्मणांनी, राधाबाई, चिमाजीअप्पा व नानासाहेबांनी बाजीरावांना मनस्ताप दिला. त्याकाळात दोन चार बायका असणे गैर नव्हते. दुसर्या बाजीरावांना अकरा बायका होत्या.

In reply to by हेमंत लाटकर

मस्तानी प्रकरणावरून पुण्यातील बाह्मणांनी, राधाबाई, चिमाजीअप्पा व नानासाहेबांनी बाजीरावांना मनस्ताप दिला.
आताही तेच होतयं

आज सिनेमा पहिला. कार्यालयात हि काही सहकर्मिनी पेशवा बाबत विचारपूस केली. निश्चित मराठा इतिहासाबाबत उत्तर भारतीय लोकांचे ज्ञान वाढेल. बाकी सिनेमा सिनेमा सारखा पाहावा. काशीबाईचे चरित्र जास्त उठून दिसले आहे.

लेख आवडला. सिनेमा सिनेमा म्हणून पाहावा आणि इतिहास सिनेमावरुन शिकू नये हे बर्‍याच लोकांना कळते. ज्यांना कळत नाही अशा निर्बुद्ध लोकांची पर्वा करायची गरज नाही. पण एकूणच भन्साळीचे चित्रपट आवडत नसल्याने हा पाहिला/पाहणार नाही.

सिनेमा पाहून लोक इतिहास शिकतात हे अनुमान का काढावेसे वाटले? लोकांना निर्बुद्ध ठरवणे किती सोपे झाले आहे! तसेही सिनेमावरुन इतिहास शिकण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो, पण एका ठराविक काळातील घटनांबाबत सिनेमा काढायचा असल्यास तेव्हा जे होते आणि जसे होते तसेच दाखवायला नको का? भन्साळीने जे सगळे आणि जसे दाखवलेय त्याला डोळे मिटून सिनेमॅटीक लिबर्टी म्हणणे काही पटत नाही. असो.

In reply to by यशोधरा

सहमत आहे. विशेषत: इतिहासावर आधारित एखादी कलाकृती बनवताना ती मूळ इतिहासाशी प्रामाणिक व समांतर जाणारी हवी.

In reply to by प्रचेतस

एवढेच म्हणणे आहे आमचे. इतिहासावर सिनेमा काढायचा असेल तर इतिहासाशी प्रामाणिक राहून काढा

In reply to by यशोधरा

ठीक आहे. -दिलीप बिरुटे

शिवाजी महाराज व संभाजी महाराजांना पिक्चर मध्ये डान्स करायला लावणे चालले असते का महाराष्ट्रीयानां.