Skip to main content

दंतकथा-प्रतिबंधात्मक उपाय-भाग १

लेखक अजया यांनी रविवार, 06/12/2015 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेली सतरा वर्षे मी डेंटिस्ट्रीची प्रॅक्टिस करत आहे. दर दिवशी घडणारे काही सवाल जवाब मात्र तेच आहेत! ते म्हणजे बापरे! एवढा खर्च? बापरे, दात काढावा लागणार? रूट कॅनाल फार दुखते का हो? सगळे दात खराब झाले, आता काहीतरी कराच! लवकर का आला नाहीत वर तर कायम एकच उत्तर असतं, दात दुखत नव्हता! पण किडताना दिसत होता ना! यावर सगळे निरुत्तर असतात. याहून वाईट गत लहान मुलांची करून आणतात लोक. दुधाचे दात यावर प्रचंड गैरसमज असल्याने ते अगदी तिसर्‍या वर्षापासून किडले तरी पडणार म्हणून मुलांची ट्रीटमेंट न करता तसेच राहू देणारे लोक असतात. तेही पोराची दाढ सुजून आली की डेंटिस्ट गाठतात तोवर नाही. या सर्व मोठा त्रास करून डॉक्टरकडे जाण्याने दुखणे आणि खर्च आपला वाढतो हे बर्‍याचदा अगदी सुशिक्षित लोकांच्याही ध्यानात येत नाही. दाताच्या अनारोग्याचा नुसताच चावण्यावर परिणाम होत नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्यावर होत असतो. एकाच वेळी अनेक दात किडके असले तर चावण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. चावता न आलेले अन्न नीटसे पचत नाही, त्यामुळे कुपोषण होत राहते. मुलं खूप हळू खाऊ लागतात किंवा खाणे टाळतात. तोडून खाण्याचे पदार्थ, फळं तर ते खाऊच शकत नाहीत. यातून शरीरात निरनिराळ्या जीवनसत्त्वांच्या कमतरता निर्माण होतात. किडून तुटून धारदार झालेले दात हे गाल, जिभेच्या कॅन्सरचे एक महत्त्वाचे कारण आहे. हिरड्या आणि दातावर साठणारे किटण हे हृदय किडनीच्या काही विकारांसाठी जंतू पुरवत असते. तरीही लोक अगदी दात दुखे पर्यंत डॉक्टरकडे जाणे टाळतात. कारणं मुख्यतः भीती, खर्च, दुर्लक्ष, अनास्था, अज्ञान! दाताचे जन्मजात असे फारच कमी आजार आहेत. मुख्यत्वे जे त्रास असतात ते चुकीचे ब्रशिंग, वेळेवर लक्ष न देणे यामुळे उद्भवलेले असतात.या लेखमालिकेचा उद्देशच त्यामुळे प्रतिबंधात्मक उपचार हा आहे. 'अ स्टिच इन टाइम सेव्ज नाईन' म्हणतात, ते दंत आरोग्याबाबत शब्दशः खरे आहे. ते कसे हे जाणून घेणे, विविध प्रतिबंधात्मक उपचार आणि निरनिराळ्या वयात दाताची काळजी कशी घ्यायची हे थोडक्यात सांगायचा हा प्रयत्न आहे. दात येण्याची सुरुवात गर्भावस्थेतच होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपचारांची सुरुवात प्रेग्नंसीपासूनच सुरू होते.म्हणूनच प्रथम प्रेग्नंसीमध्ये स्वतःच्या दाताचे आरोग्य कसे सांभाळावे हे बघूया. कारण आईच्या तोंडात जर मोठ्या प्रमाणात खराब मुख आरोग्यामुळे जंतूंचा प्रादुर्भाव असेल तर बाळाला आपोआपच ते वारसाहक्काने मिळतात! त्यामुळेच वेळीच काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रेग्नंसी लक्षात आल्यावर डेंटिस्टकडे एक रूटीन चेक अप जरूर करून घ्यावे. कारण त्यामुळे किडलेले दात वेळीच लक्षात येतात. त्यांना भरणे सुरुवातीच्या अवस्थेत असल्यास सोपे, कमी खर्चाचे आणि टिकाऊ होते. या काळात किडलेल्या दाताकडे दुर्लक्ष करून थेट सातव्या आठव्या महिन्यात गाल धरून सुजून येणार्‍या महिला बर्‍याचदा पाहण्यात येतात. सातव्या महिन्यापुढे दुखण्याच्या गोळ्या फारशा देऊन चालत नाही. दात काढायची वेळ आल्यास जास्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते आणि रूट कॅनालचे उपचार एक्सरेविना अंदाजाने करावे लागतात. हे सर्वच वेळेवर केलेल्या तपासणीमुळे टाळता येते. या तपासणीच्या वेळीच दात साफ जरूर करून घ्यावे. याचे एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे प्रेग्नंसी मध्ये होणारे हिरड्यांचे इन्फेक्शन. दातावर मोठ्या प्रमाणात किटण असल्यास या काळातल्या हार्मोन बदलांमुळे हिरडी सुजून येते, हिरडीतून रक्त येणे, दात हलायला लागणे असे त्रास सुरू होऊ शकतात. हे सर्व फक्त दात साफ करून घेऊन आपण टाळू शकतो!
  • प्रेग्नंसीमध्ये शरीराची कॅल्शियमची गरज वाढलेली असते. त्यासाठी गोळ्या दिलेल्या असतात, त्या नियमित घेणे जरूरी आहे.अन्यथा कॅल्शियमच्या कमतरतेने दात ठिसूळ होऊ लागतात.
  • अनेक स्त्रियांना प्रेग्नंसीमध्ये सकाळी उलट्या होणे(मॉर्निंग सिकनेस) चा त्रास होतो. अशावेळी खळखळून चूळ भरून दातांवर आलेले आम्ल दूर करणे जरूरी आहे.तसेच पेस्टच्या वासाने उलटी होत असल्यास पेस्ट बदलावी पण दात घासणे बंद करू नये.
  • खावेसे वाटते म्हणून अती गोड पदार्थ खाऊ नयेत.
  • खाण्यात वेगवेगळ्या प्रकारची फळं, दही, दूध, चीज जरूर असावे. हे सर्व बाळाच्या दात, हिरड्या यांच्या वाढीसाठी आवश्यक पदार्थ आहेत.
  • प्रेग्नंसीच्या सुरुवातीलाच चेक अप झाल्याने काही आवश्यक ट्रीटमेंट असतील तर त्या साधारण चौथ्या ते सहाव्या महिन्यात करता येतात.
  • प्रेग्नंसीमध्ये दाताच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊन अचानक कराव्या लागणार्‍या दातांच्या ट्रीटमेंट आपण नक्कीच टाळू शकतो.
प्रेग्नंसी सुखरूप पार पडून बाळ घरी येतं आणि लहान बाळाच्या दंत आरोग्याबाबत काळजी घेणे हा नवा अध्याय सुरू होतो! साधारण सहाव्या महिन्यापासून अडीच वर्षापर्यंत बाळाला वेगवेगळे दात येऊ लागतात. हा कालावधी कमी जास्त असू शकतो. या काळात पालकांकडून एक अत्यंत महत्त्वाची चूक होताना आढळते ती म्हणजे अजून दात येत आहेत, बाळ लहान आहे, या कारणांनी बाळाचे दात स्वच्छच करत नाहीत! तसंच बर्‍याचदा बाळ बाटलीचे दूध पिऊन किंवा आईने पाजल्यावर झोपी जाते. हे दूध बाळाच्या तोंडात शिल्लक असते. त्यावर बॅक्टेरीया ताव मरून अ‍ॅसिड तयार करतात. त्यामुळे बाळाचे समोरचे दात किडायला अगदी लहान वयात सुरुवात होते. आपल्याकडे तर हा इतका सर्रास आढळणारा प्रकार आहे की लोकांना ते दात पडणार म्हणून असे होतात असेही वाटते! मग आईचा प्रश्न असतो इतक्या लहान बाळाचे दात मी कसे घासू? यासाठी केमिस्टकडून एक गॉझचे बंडल विकत आणावे. त्याचे छोटे तुकडे करून ठेवावे. बाळाला पाजले की आपल्या बोटाला ओली गॉझ गुंडाळून दात हलक्या हाताने पुसून घ्यावे. इतका सोपा उपाय!. साधारण पाचपेक्षा जास्त दात आले की बेबी ब्रश आणावा. मुगाच्या डाळीच्या एवढी पेस्ट (साधी कमी फ्लोराईड, साधारण 1000ppm असणारी) दातांवर आपण बोटाने पसरावी. मग हलक्या हाताने ब्रश गोल गोल फिरवून ब्रश करावे. रोज दोन वेळा ब्रशिंग या वयापासूनच सुरू करावे. बाळ करू देत नसल्यास त्याला गुंतवण्यासाठी हातात काहीतरी देऊन ब्रश करावे.
  • बाळाला ज्यूस पॅकमधले फळांचे रस अजिबात देऊ नयेत.दात हमखास किडवणारे असतात हे नुसतेच साखर आणि आम्ल असणारे खोटे फळांचे रस. त्या ऐवजी बाळाला शिजवेलेले सफरचंद, कुस्करलेली केळी असे हळूहळू खाऊ घालावे.
  • दात किडत आहेत असे दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी. कारण याच दातांनी बाळाला पुढे तेरा वर्ष खायचं आहे!
  • दात येण्याच्या काळात बाळाच्या हिरड्या शिवशिवत असतात. त्यामुळे बाळ जे हाताला लागेल ते तोंडात घालू लागते, त्यामुळे जंतूसंसर्ग होऊन बाळ हमखास या काळात आजारी पडते. योग्य काळजी घेतल्यास हे आजारपण टाळता येते. दात येत असल्यामुळे बाळ आजारी पडत नाही. ते काय तोंडात घालते आहे याकडे लक्ष दिल्यास हा त्रास उद्भवू नये.
  • तसंच बाळाच्या मनगटाला पूर्वी खारीक बांधत असत. तो उपाय मला अजूनही टीथर वापरण्यापेक्षा आवडतो. प्लॅस्टिकचा टीथर अचानक फुटून त्यातला मऊ द्रव बाळाच्या तोंडात जाण्याची शक्यता असते. तसंच कोणते घातक रंग वापरले आहेत याची आपल्याला माहिती नसते. त्यापेक्षा बाळ नजरेसमोर असेल तेव्हा खारीक बांधून दिलेली केव्हाही सुरक्षित उपाय. अर्थात त्यावरही लक्ष हवेच.
अशा प्रकारे बाळाची काळजी घेतल्यास अगदी लहान मुलांचे दात किडून त्यांचे होणारे हाल आपण टाळू शकतो. आता पुढच्या भागात मोठ्या मुलांच्या दातांकडे लक्ष देऊ!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 29996
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

आता रुटीन चेकअप नक्किच केल्या जाईल. खुपच उपयुक्त माहिती आहे.

खूप छान मालीका. काकांच्या घरात दोन बाळे येणार आहेत. त्यामुळे अगदी वेळेवर आलाय धागा...

नमस्कार अजयाताई, फार उपयोगी लेखमालिका आहे. काही प्रश्न - १) माझे वय ३१ असून आजवर एकही दात किडलेला नाही. मी गेली अनेक वर्षे सकाळ संध्याकाळ दात घासतो. तरीही १५ दिवसांपूर्वी सर्वात शेवटच्या दाताचा छोटासा तुकडा पडला. तो किंचित काळसर होता. असे का व्हावे हे समजत नाही. हे झाल्यापासून मी रात्रीचे दात घासणे बंद करून त्याऐवजी तुर्टीच्या पाण्याने चुळा भरणे सुरू केले. हे बरोबर आहे का ? २) माझी तब्येत ठणठणीत असते पण माझे दात मजबूत नाहीत. मला उस दातांनी कचाकच तोडून खाता येत नाही किंवा बिअरचे झाकण दातांनी उचकटता येत नाही. कैरी खाल्ल्यावर दात चटकन आंबतात. सगळ्यात पुढचे २ दात आपोआप झिजले. लिंबू जास्त खाल्ल्याने ते झिजले असे डेंटिस्टने सांगितले. माझ्या जेवणात दूध, ताक यांचा पुरेपूर अंतर्भाव आहे. ३) पुढची ४० वर्षे एकही दात किडू किंवा पडू नये यासाठी काय करावे लागेल ? ४) माझ्या दातांचा नैसर्गिक दुबळेपणा माझ्या मुलीकडे गेला असल्यास (ती ३ महिन्यांची आहे) काय करावे ? कृपया मार्गदर्शन करा.

तुमच्या पहिल्या प्रश्नाबद्दल मी पुढे लिहिणारच आहे .इथे थोडक्यात सांगते. बर्याचदा आपण किती वेळा ब्रश करतो यावर आपली ओरल हेल्थ आजमावली जाते! तसे करु नका.आपण ब्रश किती वेळा करतो त्याहून महत्त्वाचे तो कसा करतो हे असते.यामध्ये अनेक घटक येतात. काही शेवटचे दात ब्रश जाऊ शकत नाही अशा अवघड ठिकाणी असणे.मग ब्रशिंगचा उपयोग होणार नाही. ब्रश मोठा वापरणे हे एक अगदी नेहमी आढळणारे कारण.ब्रशचा ब्रिसलयुक्त भाग हा फार तर दोन दात कव्हर करेल इतकाच असावा.त्याला पुढे प्लॅस्टिकचे मोठे एक्स्टेन्शन नको.त्यामुळे काय होतं,हे प्लॅस्टिक पुढे जाते.ब्रिसल्स नाही.आपल्याला ब्रश केल्यासारखे वाटते.पण ब्रशिंग होत नाही.मग तिथे अन्नकण साठणे ,सडणे ,किडणे,दात कमकुवत होऊन एक दिवस तुकडा पडणे हे होते.यासाठीच नेहमी ब्रशिंग डेन्टिस्ट कडून समजावून घ्यावे.ज्युनियर ब्रश वापरलेला पण चालेल.पतंजलीच्या दुकानात एक अगदी दहा रुपयाचा छोटासा ब्रश मिळतो.तोही चांगला आहे.डेन्टिस्टकडे जाऊन दात भरुन जरुर घ्या. जसे नुसत्या पाण्याने भांडी घासता येत नाहीत तसेच नुसत्या चुळांनी दात घासता येत नाही.दातावरचा प्लाक झाडून काढावा लागतो. २ दात झिजण्याचे कारण अती जोरात हाॅरिझाॅन्टल ब्रशिंग ,सतत आंबट पदार्थ खाणे, अॅसिडिटी,रिफ्लक्सने होणारी अॅसिडिटी अशी बरीच असू शकतात.तसेच दात गर्भावस्थेमध्ये तयार होत असतात.या काळात माता कुपोषित असल्यास ,कॅल्शिअम ,डि ३ कमतरता असल्यास मुलांचे दात कमकुवत असू शकतात. ३. डेन्टिस्ट कडून तुमच्या दंतरचनेप्रमाणे ब्रशिंग समजावून घ्या. दोन वेळा ब्रशिंग जरुर करा.शुगर फ्रि च्युइंग गम वापरा.किडलेले दात वेळीच भरा.नियमित दाताचे स्केलिंग करुन घ्या.सेन्सिटिव्हिटी पेस्ट डेन्टिस्टच्या सल्ल्याने सुरू करा.आणि बंद करु नका. ४.मुलीचे दात आल्या आल्या वर दिल्याप्रमाणे साफ करणे,पाच सहा दात आले की बेबी ब्रशने दोन्ही वेळा घासणे,तिला रात्री दूध पाजून झोपवत असल्यास दात साफ करुन थोडेसे पाणी देणे,कॅल्शिअम ,डि३ बद्दल बालरोगतज्ञाचा सल्ला घेऊन सुरु ठेवणे. मोठी झाल्यावरसाठी या मालिकेचा भाग २ वाचणे :)