Skip to main content

कोलेस्ट्रेरॉल

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 02/12/2015 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
रोज नवनवे ऐकायला, वाचायला मिळते आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाचा पार बेंबट्या होतो. काही वर्षांपूर्वी कोलेस्टेरॉल विषयी ऐकले, याचा शरीरावर होणारा परिणाम, रक्तवाहिन्यांवर आतून चिकट स्तर निर्माण होणे, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वगैरे. पाठोपाठ कोलेस्टेरॉल न वाढण्यासाठी काय टाळावे या यादीत अनेक आवडत्या पदार्थांची नावे. तेव्हा शेंगदाणे आणि नारळ/खोबरे हे नकार यादीत होते. आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबणार्‍या वैद्यांनी छाती ठोकून सांगितले की साजूक तूप उत्तम, त्यात कोलेस्टेरॉल अजिबात नाही उलट ते शरीराला आवश्यक आहे, या उलट अ‍ॅलोपथी वाले डॉक्टर म्हणतात की ते कोलेस्टेरॉलसाठी वाईटच. अचानक असे वाचनात आले की शेंगदाणे आणि नारळ यामुळे कोलेस्टेरॉलचा धोका अजिबात नाही. आणि अलिकडे वाचनात आले की मुळात कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार यांचा काही संबंध नाही. काही हृदरोग तज्ञांनी असे अनुभव दिले आहेत की त्यांनी जेव्हा आतापर्यंत केलेल्या हृदयशस्त्रक्रियांच्या रुग्णांचा कोलेस्टेरॉल या दृष्टीने अभ्यास केला तर असे आढळुन आले की अर्ध्या रुग्णांचे कोलेस्टेरॉल सर्वसाधारण म्हणजे मर्यादेत होते तर अर्ध्यांचे त्याहूनही कमी होते. काही डॉक्टर्सनी असे प्रतिपादीत केले की जर कोलेल्स्टेरॉल रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर साचते तर ते मूत्रपिंड, यकृत वा पित्ताशयात का साचत नाही? असेही मत आहे की काही बड्या खाद्य़कंपन्यांनी त्यांची 'पथ्याची आरोग्यपूर्ण खाद्य उत्पादने' खपवण्यासाठी हा बागुलबुवा उभा केला. मधुमेहाविषयी सुद्धा असे वाचनात आले की १९९७ सालापर्यंत साखरेचे १४० हे प्रमाण सामान्य मानले जात होते, अचानक १९९७ साली ते ११५ वर आणले गेले आणि रातोरात काही कोटी लोक मधुमेहग्रस्त ठरले. पुढे २००३ साली ते प्रमाण शंभरवर आले. पुन्हा मधुमेहींच्या संख्येत लक्षणिय वाढ. हे प्रमाण घटव्ण्याची शिफारस करणार्‍या मंडळाचे सर्व सदस्य डॉक्टर्स हे बड्या औषध कंपन्यांचे सल्लागार होते. यात तथ्य किती?

वाचने 24016
प्रतिक्रिया 116

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

डांगे साहेब आपण आजही डॉक्टर हा नोबल प्रोफेशन मानता. तो जमाना गेला कारण आता रुग्णही तसेच झाले आहेत. डॉ. श्रीखंडे सारख्या ऋषी तुल्य व्यक्तिमत्वाने डॉक्टरांच्या त्यागाची समाजाला किंमत नाही असे उद्गार काढले आहेत. डॉ रवी बापट यांनी हि अशीच खंत व्यक्त केली आहे. ज्या समाजातून डॉक्टर निर्माण होतात तोच किडलेला आहे. जर बीज किडके असेल तर वृक्ष किडकाच निघणार. हि वस्तुस्थिती मान्य करा. मी लष्करातून निवृत्त झालो तेंव्हा ज्या सोसायटीत मी लहानाचा मोठा झालो त्यांनी माझ्याकडे दवाखाना घेण्यासाठी काही रक्कम "रोख" मागितली. म्हणजे माझे पांढरे पैसे काळे करून द्यावे लागले. त्याच दवाखान्यासाठी मी ४० महिन्यांचा पूर्ण पगार( GROSS) किंवा ६० महिन्यांचा घरात येणारा पगार( नेट) एवढे पैसे भरले तेंव्हा सोसायटीने मला एक छदाम सवलत दिली नाही परंतु दवाखाना सुरु झाल्यावर मात्र ९० % लोकांनी सोसायटीतील लोकांना सवलत किती हे विचारले? २०१२ साली १०० रुपये उद्या देतो २०० रुपये आणून देतो म्हणून विश्वास ठेवला तर दोन फुलस्केप पाने भरतील एवढया रुग्णांनी पैसे बुडवले (जर कधी माझ्या दवाखान्यात आलात तर तुम्हाला पाहायला मिळेल) आणी ती रक्कम थोडी थोडकी नव्हे तर २०,०००/- च्या वर जाते. आज कोणी मला सांगितले कि पैसे उद्या आणून देतो तर मी स्पष्ट नाही म्हणतो. यावर आमच्यावर विश्वास नाही का? पासून माणुसकी नाही हे ऐकावे लागते. आई ची बिले बायकोच्या आणी बापाची बिले स्वतःच्या नावावर मागणारे महाभाग शेकड्यांनी आहेत. बिले वाढवून मागणारे सुद्धा. या समाजातूनच डॉक्टर आले आणी येणार मग समाजाने स्वतःच आत्म परीक्षण करायला नको का? डॉक्टर हा आपलाच घटक आहे तो आपण जितके चांगले तितकेच डॉक्टर चांगले असतील. डॉक्टरनेच त्याग केला पाहिजे, डॉक्टरनेच ग्रामीण सेवा केली पाहिजे,डॉक्टरनेच देश सोडून जायचे नाही. बाकी समाजाने शेण खाल्ले तरी चालेल. PEOPLE GET THE DOCTORS THEY DESERVE.

In reply to by सुबोध खरे

आपण मांडलेले अनुभव शंभर टक्के मान्य आहेत. पण आपल्याला असे वाईट अनुभव आले म्हणून आपण चुकीच्या मार्गाने गेलेला पैसा कमवायचा प्रयत्न कराल काय? मी सदसदविवेकबुद्धी, प्रामाणिकता याबद्दल बोलत नाही. तुमचे गेलेले पैसे काढायला किंवा अतिरिक्त कमवायला काहीतरी (कुणाला आरोग्याच्या दॄष्टीने त्रासदायक वा कशीही नसलेली) क्लृप्ती लढवालच. पण माझे एवढे लाख गेले तर आता कुणा डॉक्टरशी संगनमत करून येणार्‍या रुग्णांना गरज नसलेल्या शस्त्रक्रिया करायला लावून, आपल्या अंगावर येणार नाही अशी काळजी घेऊन गल्ला भराल काय? किंवा कुणीही असे करणे योग्य असेल काय? डॉक्टरकी हा एक व्यवसाय आहे, त्यांना त्यांचे उचित मानधन, सोयीसुविधा, हक्क अधिकार मिळालेच पाहिजेत हे मी आधीही एका धाग्यावर कळकळीने मांडले होते. पण समाज त्यांना फसवतो म्हणून त्यांनी समाजाला अशा पद्धतीने फसवणे पटत नाही. तुम्ही एक प्रकारे डॉक्टरांच्या त्या सर्व कृत्यांचे समर्थन करत आहात असे वाटते. वैद्यकिय व्यवसायाच्या बाबतीत 'टीट फॉर टॅट' विचारपद्धती चूकीची आहे.

In reply to by संदीप डांगे

व्यवसायाशी संबंधित नाहीच आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती ही प्रत्येक व्यवसायात असते. मी पत्रकारितेत असताना एक प्रसंग घडला होता. माझ्या एका वरिष्ठ सहका-याने एक प्रकरण शोधून काढलं होतं आणि त्यात दोन पोलिस अधिकारी involved होते. त्याला फोन आला होता की तुम्ही पोलिसांविरूद्ध का स्टोरी करताय? त्यावर त्याचं उत्तर हे होतं की मी गुन्हेगारांविरुद्ध स्टोरी करतोय आणि त्यातले काही जण पोलिस आहेत. मला वाटतं या सगळ्या वादविवादात हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे.

In reply to by सर्वसाक्षी

समजा जर कोलेस्टेरॉल आणि ह्रूदयविकार यांचा संबंध नसेल तर ते कमी करायचे उपचार का घ्यावे? जर मधुमेहाचे प्रमाण १४० असेल तर ११० च्या व्यक्तिने उपचार का घ्यावेत?
अत्यंत बरोबर. फक्त इतकंच म्हणणं आहे की खात्री करुन घेण्यासाठीसुद्धा मुळात नवा दावा करणारा सोर्स कोणता आहे हे पाहूनही किमान क्रेडिबिलिटी ओळखता येऊ शकते. उदा. मॉडर्न मेडिसिनच्या काही स्टँडर्ड जर्नल्समधे किंवा अनेक वेगवेगळ्या डॉक्टर्सच्या पाठिंब्याने कुठे अभ्यासनिबंध प्रसिद्ध झाला असेल तर शहानिशा करुन घेण्याइतपत योग्यता समजली जाईल. कुठल्यातरी आठवडी पुरवणीत चूर्णबीर्ण किंवा रक्तशुद्धीवाली सिरप्स बनवणार्‍या कंपनीने "स्पॉन्सर" केलेल्या चौकटीत अशी टेक्सासछाप संशोधनं उल्लेखिलेली असतील तर त्यांचा विचारही न करणं उत्तम.

In reply to by गवि

बाकी चर्चा वाचत आहे. पण टेक्सासच्या अस्मितेला आव्हान देण्याबद्दल गविंचा निषेध. -- टेक्साससुंदरी

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असंच काही नाही. तुम्ही सांगलीतली वर्ल्डफेमस टेक्सास ओली भेळ खाल्ली आहेत का? चांगली असते.

स्वस्तातील औषध लवकर परिणामकारक ठरत नाही म्हणतात असेच काही नाही. एकच औषध वेगवेगळ्या कंपन्यांचे यात खूप तफावत असू शकते दर्जा एकच असूनही. उदा. FDC (ELEKTRAL वाले) यांचे एटोर्व्हास्टाटीन ZIVAST २५ रुपयाला १० गोळ्या मिळतात तेच RANBAXY चे स्टोअर व्हास १८० रुपयाला १० गोळ्या मिळतात. राहिली गोष्ट नकली गोळ्यांची -- सर्वच नकली गोळ्यात औषध नसतेच असे नाही. उदा. टिनीडाझोल हे औषध पोटातील आम्लामुळे विघटन पावते त्यामुळे ते इंटेरीक कोटेड म्हणजे आम्लात न विरघळणाऱ्या आवरणाच्या गोळीतून देणे आवश्यक आहे. यासाठी ५०० मिली ग्राम गोळी प्रथम तयार करावी लागते आणी त्या प्रत्येक गोळीवर हे इंटेरीक कोटेडचे आवरण चढवावे लागते. या उत्पादन पद्धती साठी बराच खर्च येतो तेंव्हा नुसता रंग चढवून दिली तर तुम्हाला काय कळेल. तिच्यातील टिनीडाझोल मोजले तर ५०० मिग्राम आढळेल पण गोळी घेतली तर नुसती जळजळ होईल आणी हगवण मात्र थांम्ब्णार नाही. मग आपले विद्वान शेजारी असतातच सांगायला, "आधुनिक औषधांचे साईड इफेक्टच फार असतात." आम्ही सुरुवातीला होल सेलर कडून जेनेरीक औषधे घेतली तेंव्हा मी त्याला हि शंका विचारली कि तू हि औषधे मला विकतो आहेस ती नकली नाहीत ना ? त्यावर तो म्हणाला साहेब मी तुम्हाला फार तर एकदा फसवू शकेन पण मला धंदा करायचा आहे. एकदा फसव्ल्यावर तुम्ही माझ्याकडून माल परत घ्याल का? त्यामुळे डॉक्टर स्वतः खात्रीशीर माणसाकडूनच औषधे विकत घेतात. पण ती औषधे लोक विकत करीत नाहीत असा आमचा अनुभव आहे . लोकांचा केमिस्ट वर जास्त विश्वास आहे त्याला कोण काय करणार?

चांगला धागा. खरे सरांचे प्रतिसाद देखील छान आयुर्हीत यांचा उल्लेख आल्यामुळे एक गोष्ट आठवली. आयुर्हीत मोड ऑन अबक बद्दल अधिक माहिती हवी असेल तर मला व्यनि करा . आयुर्हीत मोड ऑफ =) =)

डाॅ. सुबोध, तुमच्यासारखे उदात्त विचाराच्या डाॅक्टरांची संख्या खूप कमी आहे. डाॅक्टरच्या बेजबाबदार व बेपर्वाहीची एक घटना. आमच्या एका नातेवाईकाला डोळ्यासाठी स्टेम सेल थेरेपी करण्यासाठी कारने मुंबईच्या सायन हाॅस्पिटलमध्ये त्याला बघून तारीख घेण्यासाठी नेले. सर्व पेशंट मुख्य डाॅक्टरची (या डाॅक्टरचे मुंबईत स्वत:चे स्टेम सेल हाॅस्पिटल आहे) सकाळी 10 पासून वाट पहात होते, डाॅक्टर संध्याकाळी 5 वाजता आले. पेशंटचे रिपोर्टस तपासताना मुख्य डाॅक्टरांचे काजू, फुटाणे, शेंगदाणे खाणे चालू होते. आमच्या नातेवाईकाला पुढील महिन्याची तारीख दिली. त्याप्रमाणे सर्व तयारी करून नातेवाईक सायनला गेले. तेथे गेल्यावर डाॅक्टर गावाला गेलेत पुढच्या महिन्यात या असे सांगितले. 5-10 हजार रूपये वाया गेले. पुढच्या महिन्यात नातेवाईकाला सायन मध्ये अॅडमिट केले. दोन दिवस आैषध व तिसर्या दिवशी बोन मॅरोमधून स्टेम सेल घेणे चालू झाले. प्रोसिजर चालू असताना जेन्टस डाॅक्टर व वार्डबाॅचे लेडी डाॅक्टरसमोर फालतू जोक चालू होते. पेशंटला जनरल अॅनेस्थेशिया दिल्यामुळे सगळे कळत होते. त्यानंतर बोन मॅरो मधून काढलेल्या स्टेम सेलवर प्रक्रिया करून ते परत शरीरात टाकण्यासाठी 4 तास लागले. यावरून पेशंटने सरकारी दवाखान्यात न येता खाजगी दवाखान्यात जावे अशी डाॅक्टरची इच्छाआहे असे वाटले.

In reply to by हेमंत लाटकर

पेशंटला जनरल अॅनेस्थेशिया दिल्यामुळे सगळे कळत होते.
तुम्हाला लोकल म्हणायचं असावं.

लघु घनता कोलेस्टेरॉल आणि हृदरोग यांच्यामधील सरळ गुणोत्तर आता प्रस्थापित झालं आहे*. लघु घनता कोलेस्टेरोल कमी (~३०% कमी) करण्यासाठी स्टॅटिन वर्गातली औषधे उपलब्ध आहेत. त्यात फायझरचे अटोर्व्हास्टॅटिन (ब्रान्ड नेम लिपिटॉर) नुकतेच पेटंट पिरियड संपवून जेनेरिक झालेले आहे. त्याहीपुढे जाऊन जर लघु घनता कोलेस्टेरॉल अजून कमी (~५०-६०% कमी) करायचं असेल तर त्यावर इव्होल्युक्युमॅब नांवाचे नवीन इंजेक्टेबल ड्रग बाजारात आले आहे.* गरजूंनी इंटरनेटवर अजून माहिती काढावी. *पिवळा डांबिस ह्या भुताने झपाटलेल्या झाडाचा ह्या संशोधनात्मक अभ्यासात प्रत्यक्ष सहभाग आहे. अजून जास्त काही लिहिणे अप्रस्तुत होईल.

डॉक्टर्सची तुलना बेइमान रीक्शावाले, मॅकॅनिकस, विमा एजंट यांच्याबरोबर करतात ते काही पटले नाही. (काही जण तर चक्क पेशंटला लुबाडण्याच्या वृत्तीचे समर्थनही करताना दीसतात.) जशी आपण कोर्टातील न्यायाधीश, पोलीस, लष्कर, रीझर्व बँकेतील उच्चाधीकारी, IAS ऑफीसर्स, सचीव यांच्याकडुन उच्च नैतीकतेची अपेक्षा ठेवतो, तीच अपेक्षा समाज डॉक्टर्स कडुनही ठेवतो. खुप साधी गोष्ट आहे. ज्याच्याकडे आपण स्वतःला विश्वासाने सोपवतो त्याच्याकडुन होणारी फसवणुक ही साधी लबाडी कींवा बेईमानी नसुन विश्वासघात असतो, तोही थोड्याफार पैशांसाठी केलेला. काही डॉक्टर्सच्या रुग्णांच्या फसवणुकीच्या प्रकारामुळे लोकांचा सर्वच डॉक्टर्स वरील विश्वास कमी होणे ही फार सिरीयस गोष्ट आहे, जीचा संपुर्ण समाजावर खुप दुरगामी परीणाम होईल.

In reply to by नेत्रेश

लोकांचा सर्वच डॉक्टर्स वरील विश्वास कमी होणे ही फार सिरीयस गोष्ट आहे,
उगाचच भयंकरीकरण करू नका. माझा डॉक्टरांवरील विश्वास अजिबात कमी झाला नाहीये. आणि माझ्या माहितीतल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींचा सुद्धा. क्वचित एखाद्या डॉक्टरचे वागणे/ बोलणे पटत नाही ( जनरली उद्धटपणा आणि वेळ कमी देणे आणि वेळ न पाळणे ). पण त्यांच्या बद्दल विश्वास कमी झाला नाही. रुग्णानी पण काळजी घ्यावी ती मी घेतो. उगाच रस्त्यावर पाटी दिसली म्हणुन दिसेल त्या डॉक्टर कडे जात पण नाही. कोणाच्या तरी अनुभवावरुन च कोणत्या डॉक्टर कडे जायचे ते ठरवतो. जमले तर डॉक्टर कुठल्या विद्यापिठातुन पास झाला आहे हे शोधतो आणि कॉलेज चे नाव कळले तर बेस्टच. तरुण डॉक्टरांना टाळतो. ४५-५० वयाच्या पुढचा असेल तर उत्तमच.

In reply to by प्रसाद१९७१

उगाच रस्त्यावर पाटी दिसली म्हणुन दिसेल त्या डॉक्टर कडे जात पण नाही. कोणाच्या तरी अनुभवावरुन च कोणत्या डॉक्टर कडे जायचे ते ठरवतो. जमले तर डॉक्टर कुठल्या विद्यापिठातुन पास झाला आहे हे शोधतो आणि कॉलेज चे नाव कळले तर बेस्टच. तरुण डॉक्टरांना टाळतो. ४५-५० वयाच्या पुढचा असेल तर उत्तमच.
हे सगळं बघूनही अनुभव वाईट आले तर काय म्हणाल..? डॉक्टरांच्या व्यवसायातल्या गैरप्रकारांचे खापर सातत्याने रुग्णांवरच फोडणे हेही जास्त सिरियस आहे.

In reply to by संदीप डांगे

हे सगळं बघूनही अनुभव वाईट आले तर काय म्हणाल..?
आपले दुर्दैव!!! सर्व गोष्टी आपण कंट्रोल करु शकतो असे वाटु देऊ नये. आपल्या आयुष्यात अश्या अनेक गोष्टी असतात ज्याचा कार्यकारण भाव समजत नाही. बर्‍याच वेळेस आपला काही दोष पण नसतो ( असे आपल्याला वाटते ). ह्या सर्वावर "स्वीकार" हे एकच उत्तर आहे.

In reply to by प्रसाद१९७१

मला तर उलट तरुण डॉक्टर्स लेटेस्ट वैद्यकीय ज्ञानाशी जास्त परिचित / संपर्कात असलेले, जास्त शक्यतांचा विचार करणारे, उत्साही, (कदाचित क्लायंटेल एस्टॅब्लिश करायच्या ध्येयाने) जास्त सखोल लक्ष देणारे वाटतात. तुलनेत वयस्कर डॉक्टर जुन्या विचारांचे, शिष्ट - तर्हेवाईक असणं म्हणजेच प्रसिद्ध असणं अशा गटातले, पेशंटला जराशीही वैद्यकीय ज्ञानाची माहिती न देणारे, रुढीप्रिय असतात. सरसकटीकरण नव्हे पण खरंच अनेक जुने डॉक्टर नॉलेज अपडेटच्या बाबतीत जरा साचलेपण आलेले असतात असे अनुभव आले आहेत. पुन्हा एकदा.. हे सर्वांबाबत खरं नसेलही.

In reply to by गवि

गवि- ४५-५० म्हणजे तरुण च समजले जातात हो. त्यातल्या त्यात डॉक्टर लोक तर जास्त च तरुण रहातात. :-) पायलट ला नाही का काही हजार तासाचे उडणे गरजेचे असते. तसे डॉक्टर नी काही हजार पेशंट बघितलेले असतील तर बरे.

In reply to by प्रसाद१९७१

गवि- ४५-५० म्हणजे तरुण च समजले जातात हो.
तेही खरंच. शिकून सेटल होईस्तो डोईवर केसांची एलओसी बरीच उत्तरेकडे सरकलेली दिसते अनेकांची. ;-)

In reply to by नेत्रेश

स्वार्थ हा असा एकमेव दुर्गुण आहे जो आपल्याला दुसर्‍याकडे असलेला चालत नाही. नैतिकतेच्या गप्पा मारनारे इतर नोकरी, व्यवसायातील अनैतिकता खपवून घेतात. फक्त वैद्यकीय पेशाकडूनच नैतिकतेच्या अपेक्षा ठेवतात. आर्थिक कारणांमुळे सरकारी नोकर्,लोकप्रतिनीधी व इतर व्यावसायीकांमध्ये अनैतिकता वाढली. ह्याला समाजाने विरोध न केल्याने ही आर्थिक अनैतिकता वैद्यकीय पेशातही आली. त्यामुळे फक्त वैद्यकीय पेशालातील अनैतिकतेला टार्गेट करण्याऐवजी सिस्टीममधील इतर अनैतीक कृत्य करनार्‍यांनाही विरोध करायला हवा.

In reply to by मार्मिक गोडसे

फक्त वैद्यकीय पेशालातील अनैतिकतेला टार्गेट करण्याऐवजी सिस्टीममधील इतर अनैतीक कृत्य करनार्‍यांनाही विरोध करायला हवा.
तुम्ही किती विरोध करता हो वैद्यकिय अनैतिकतेला? तुम्ही तर इथे मान्यही करायला तयार नाही की अनैतिकता आहे. विरोध तर दूरच राहिला. आणि हो, तुमच्या प्रतिसादावर उत्तर देतो, जरा थांबा. अर्ध लिहिलंय अर्ध बाकी आहे. सवड मिळाली की टाकतो. डोण्ट वरी. कीप बॅकिंग डॉक्टर्स हु डिसॅबल्ड पेशंट्स बट फ्युमिंग ऑन टीचर्स फॉर फ्यु रुपीज.

ह्याला समाजाने विरोध न केल्याने ही आर्थिक अनैतिकता वैद्यकीय पेशातही आली.
हे वाचले नाही का तुम्ही? फ्यु रुपीजचा प्रश्न नाही नैतिकतेचा आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

प्रश्न आर्थिक अनैतिकतेचा नसून व्यावसायिक अनैतिकतेचा आहे याकडे आपले बहुधा लक्षच नाही. डॉक्टरांना पैसाच कमवायचा असेल तर त्यासाठी पेशंटचे जीव धोक्यात घालणे किंवा नको त्या शस्त्रक्रिया, महागड्या टेस्टस सांगणे गरजेचे आहे काय? पैसाच कमवायची हौस असेल तर इतर अनेक व्यवसाय आहेत, डॉक्टरांना दैवयोगे बुद्धीमत्ताही चांगली मिळालेली असते. तुम्ही सुरवातीपासून दोन वेगळ्या मुद्द्यांमधे तुलना करुन घोळ घालताय. आर्थिक अनैतिकता आणि व्यावसायिक अनैतिकता ह्यात फरक आहे.

In reply to by संदीप डांगे

मी मालाडला राहतो. माझ्या आसपास बरेचशे डॉक्टर आहेत. त्यात एक नावाजलेले बालरोगतज्ञ आहेत. सकाळ संध्याकाळ त्याच्याकडे गर्दी असते. तिथुनच जवळ दूसरे बालरोगतज्ञ आहेत. त्यांच्याकडे मात्र मोजकेच रुग्ण असतात. मला गर्दीचा तिटकारा आहे त्यामुळे मी माझ्या मुलाला कमी गर्दी असलेल्या ठिकाणी घेऊन जातो. एकदा ते डॉक्टर नसल्यामुळे गर्दीवाल्या डॉक्टरकडे जाण्याचा योग आला. आजार होता साधी सर्दी व् वायरल ताप. डॉक्टरांनी सरळ एंटीबायोटिक्स लिहून दिली. माझे पहिले डॉक्टर मात्र साधी ओषधे लिहून देत. मी नंतर माझ्या पहिल्या डॉक्टरांना यासम्बंधि विचारले. त्यांनी सांगितले की आजकाल सर्वाना इंस्टेंट पाहिजे असते . वायरल ताप असेल तर कड़क पथ्य व् साधी ओषधे घेऊन तीन चार दिवसात आराम मिळतो. पण कोणाची तितके थाम्बायची तयारी नसते. बाय द वे तुमचे अनुभव वाचले. पण मला आलेले अनुभव चांगले आहेत. आणि हो जर मला जास्त पैसे देऊन चांगली सेवा मिळत असेल तर मला ते फसवल्यासारखे वाटत नाही. आजकाल डॉक्टर रिस्क घ्यायला बघत नाहीत. त्यामुळे तुम्हाला भरमसाठ टेस्ट ते करायला लावतात. उत्तम उपाय म्हणजे अशे डॉक्टर टाळणे. पण नंतर गुण नाही आला की तुम्ही बोम्बलणार. डोक्याला मार लागला की सीटी स्कैन करने आजकाल सर्रास् झाले आहे. माझ्या व् तुमच्या लहानपनि अशी स्थिति नव्हती. अहो ऐडमिट पण करत न्हवते. माझे विचाराल तर आता मी नक्कीच सीटी करून घेइन व् नॉर्मल असेल तर घरी येऊन बिनधास्त झोपेन.

In reply to by भंकस बाबा

आजकाल डॉक्टर रिस्क घ्यायला बघत नाहीत. त्यामुळे तुम्हाला भरमसाठ टेस्ट ते करायला लावतात.
रिस्क डॉक्टर पेक्षा रुग्णाला असते. त्यामुळे टेस्ट करायची की नाही ते रुग्णानी ठरवायचे.

In reply to by प्रसाद१९७१

हे पण रुग्णानेच ठरवायचं तर डॉक्टरने काय करायचं? डॉक्टर आणि न्हाव्यात काहीतरी फरक करा राव....!

In reply to by संदीप डांगे

डॉक्टर आणि न्हाव्यात काहीतरी फरक करा राव....!
तुम्हाला फरक वाटत नसला तर तुम्ही आजारी पडलात तर न्हाव्या कडे जा. तसेही हल्ली लोक न्हाव्याला केस कापायचे २०० रुपये देतात, पण डॉक्टर ला द्यायची वेळ आली तर २०० रुपये जास्त वाटतात. हलके घ्या पण विचार करा. ब्र्यायडल मेक-अप साठी कमीतकमी पॅकेज १० हजार रुपयांचे आहे. नॉर्मली लोक २०-३० हजार खर्च करतात. फक्त ३-४ तासाचे काम असते. लग्नाच्या फोटो चे पॅकेज ५० हजार कमीत कमी., इतके रेट जनरल सर्जन ला पण मिळत नाही. ----------- निदानात चुक झाली तर डॉक्टरचा दोष, आणि निदान चूकू नये म्हणुन टेस्ट करायला सांगितल्या तरी डॉकटर चा च दोष.

In reply to by प्रसाद१९७१

चर्चेचा विषय बदलताय कशाला? डॉक्टरने आपल्या कौशल्याचे किती पैसे घ्यावे ह्याबद्दल आधीच एका धाग्यात पुरेपुर चर्चा झालीये. त्यात माझे मत तुम्हाला आठवत नसेल तर सांगतो. डॉक्टरने आपल्या कौशल्याचे योग्य ते पैसे घ्यावे. त्यात अजिबात कसूर करू नये. त्याबद्दल मी डॉक्टरांच्या बाजूनेच बोललोय. कुणाही व्यावसायिकाच्या बाजूनेच बोलेन. ज्याला परवडतं त्याने उपचार घ्यावे, नसता मरावे. सो सिम्पल! पण पैसे घेऊन रुग्णाला फसवणे पसंत नाहीये. निदानात चुक झाली तर डॉक्टरचा दोष, आणि निदान चूकू नये म्हणुन टेस्ट करायला सांगितल्या तरी डॉकटर चा च दोष तुम्हीच वर बोललात की टेस्ट करावी की नको हे रुग्णाने ठरवावे. म्हणून मी म्हटलं की न्हाव्यात आणि डॉक्टरमधे फरक ठेवा. मी न्हाव्याला जाऊन तर विचारत नाही ना की बाबारे केस कापु की नको, कापायचे असल्यास किती आणि कसे कापू तूच ठरव. तुला जसं जमेल तसं दे कापून. आजारी पडल्यावर माझ्याकडे चॉइस असतो काय? मुद्द्यांची सरमिसळ करू नका बंधो...!

In reply to by संदीप डांगे

मी तर माझ्या नेहमीच्या हजामाकडे जातो व् डोके त्याच्यासमोर ठेवतो, कारण त्याला माहीत असते मला कोणता कट पाहिजे. डॉक्टरला मात्र मला सांगावे लागते. डांगेजि तुमचा जो जनरल डॉक्टर असतो त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याला या व्यवसाआतले चक्केपंजे माहीत असतात. जर तुमचे संबध चांगले असतील तर तो तुम्हाला फशी पाड़नार नाही.

In reply to by भंकस बाबा

ओके फाईन. जर संबंध चांगले नसतील तर तो फशी पाडण्याची मुभा आहे. राईट...! असू दे. ज्याचे त्याचे मत ज्याचे त्याचे जवळ. पण मला संबंध चर्चेमध्ये जो सूर जाणवला तो असा की आजारी पडणे हे रुग्णाची चूक आहे. डॉक्टरने फसवणे ही चूक नाही. जसे काही लोक म्हणतात, मुलीने रात्री घराबाहेर पडणे चूक आहे, तसेच.

In reply to by संदीप डांगे

डांगे , जर तुम्ही तुमचा हेकेखोरपणा सोडला तर पुष्कळ पुढे जाल हो? तुमच्या अनुभवामुळे तुम्ही दुसर्याला शहाणे नाही तर येडे करत आहात. विश्वास नावाची वस्तु अजूनही शिल्लक आहे.

In reply to by भंकस बाबा

भंकसबाबा, लोक इथे एकाच वेळेस विश्वास ठेवा आणि ठेवू नका चे दोन्ही सल्ले देऊन येडे करत आहेत त्याचं काय करायचं...?

आणी हो
माझा कुठल्याही प्रकारच्या भ्रष्ट आचाराला विरोध आहे.
हे माझ्या वरील एका प्रतिसादात लिहिले होते ते वाचले नाही का?

कारण ही व्यावसायिक अनैतिकता आर्थिकतेतुनच आली आहे.

फक्त डॉक्टर कसे वागतात हा मुद्दा परत परत सांगितला जातोय. परंतु कोलेस्टेरोल जर प्रमाणाबाहेर वाढलंच नाही तर? सध्या अन्नप्रक्रिया उद्योग फार जोरात चालू आहे. प्रत्येक गोष्ट त्याच्या बेसिक स्वरुपात न ठेवता उगाच जास्तीच्या प्रक्रिया करून त्याची पोषण दृष्ट्या वाट लावतात. उदा. पूर्वी घाणीतून काढलेलं खाद्यतेल मिळायचं. ते कसं चिपचिपित आहे आणि ते वापरणं कसं धोकादायक आहे हे आपल्याला बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जाहिरातींचा मारा करून पटवून दिलं. त्यांचं जास्त प्रक्रिया केलेलं तेल जे तळलेल्या पदार्थांवर अगदी कमी प्रमाणात राहतं त्यामुळे आरोग्यास चांगलं आहे असं आपल्याला पटवण्यात आलं. असं प्रक्रिया केलेलं तेल खरं तर जास्त घातक असतं. त्यामुळे फक्त डॉक्टरच नाही तर मानक ठरवणारे, अन्न प्रक्रिया करणारे, जाहिरात करणारे या सगळ्याचं छुपे संबंध आणि फायदे असतात. मुलांच्या दुधात टाकायच्या पावडरींमध्ये साखर खूप जास्त प्रमाणात असते. खरी पोषण मुल्य नसतातच. एवढ्या लहान वयापासून ते त्यांचं भावी गिऱ्हाईक बनवायच्या मागे असतात. अमेरिकन FDA च्या मुख्य panel वरील ७५% सदस्य हे फूड प्रोसेसिंग कंपन्यांशी जवळचे संबंध असलेले आहेत. एखादा पदार्थ तुम्हाला FDA कडून पास करून घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या सोयीच्या प्रयोगशाळेत त्याच्या टेस्ट करून ते FDA ला सदर करायचे. त्यावर FDA फक्त ते बघून तुम्हाला परवाना देते. प्रयोगशाळेत बनवलेले खाद्यपदार्थ, बाहेरून टाकलेले पोषक द्रव्य हे आपल्या आरोग्यास घातकच आहेत.

लेटेस्ट काय ठरलंय? कोलेस्ट्रॉल वाईट आहे की नाही? असल्यास.. ते कमी करण्यास काय करावे? आणि चांगले कॉलेस्ट्रॉल वाढवावे कसे?

स्वतः 100 घेतल्याशिवाय शेतकऱ्याचा 7/12 न देणारा तलाठी जेव्हा डॉक्टर च्या बनवाबनवी बद्दल बोलतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते... आणि चार लिटर दुधाचे पाणी, साबुदाणा, यूरिया, साखर टाकून 8 लिटर करणारा शेतकरी जेव्हा डॉक्टर च्या कमाई बद्दल बोलतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते... जाहिरात करताना खोटे दावे करून सामान्य ग्राहकांना फसवणारा बिल्डर जेव्हा डॉक्टर च्या खोटेपणावर आक्षेप घेतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते.... डोळ्यादेखत खोट्याचे खरे करणारा वकील जेव्हा डॉ च्या चुकीच्या प्रॅक्टिस बद्दल बोलतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते... सावज मिळाले की दोन्ही बाजूनी पैसे खाऊन मिटवामिटवी करणारा पोलीस डॉक्टर च्या रेफरल वरती आगपाखड करतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते... 5000 हजार रुपये घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षेचे पेपर आधीच पुरवणारे प्राध्यापक जेव्हा डॉक्टरांनी रक्त लघवीच्या तपासण्या करायला सांगितल्यावर हे अनैतिक आहे असे म्हणतात तेव्हा मला फार आश्चर्य वाटते... मी डॉक्टर ने खोटेपणा करावा याच्या बाजूने अजिबात बोलत नाहीए पण आपले ठेवायचे झाकून अन लोकांचे पाहायचे वाकून ही वृत्ती नको हे म्हणणं आहे.. जगातला भ्रष्टाचार होत नसलेला एक तरी व्यवसाय मला सांगा... उडदामाजी काळे गोरे प्रत्येक ठिकाणी असतातच; त्यांना खड्या सारखे बाजूला सारून चांगल्याचे कौतुक करावे... संसार आहे, जुने लोक म्हणतात संसार ही लबाडी च आहे... godfather च्या पहिल्या पानावरचे वाक्य लक्षात असू द्यावे.. Behind every fortune, there is crime!!!